मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
गणेश हरि पाटिल

गणेश हरि पाटिल

मराठी शब्दसंपत्ति


( जाति मंजरी )
फुलतात वल्लरी रानजाइच्या तिथें
दरवळे गन्ध त्यामुळें भान हरपतें
चहुबाजुं टेकड्या, खालाटिंत पाझरे --
सानुली झरी, तिथ चिंवचिंवती पाखरें     १

वार्‍यावर डुलती सोनावळिचीं फुलें
वाजविती तरवड - बाळें निज खुळखुळे
चिमुकली झेण्डुची बहीण मखमल डुले
गोकर्ण आपुलीं झुलवि निळां कुण्डलें     २

कांटेरी वेड्या रुक्ष तिथें बाभळी
ज्यांवरी घरकुलीं न्हाव्यांचीं लटकलीं
करडांसह तेथें बागडती शेरड्या
कल्कलाट करती झाडांवर भोरड्या     ३

पिकलेलें मोठें कंवठ खालती पडे
आवाज ‘ धप्प ’ मग घुमतो चोंहींकडे
पांखरें गाति, किरकिरति रानचे किडे
तेथला असा एकांत मला आवडे     ४

आसपास बेटें निवडुंगांचीं तिथें
घायपात भोंतीं सम्शेरी रोखिते
शेजारुनि गेल्या अरुंद पान्धींतुनी
रहदारी चाले बाजाराच्या दिनीं     ५

झाडींत तेथल्या शिरल्यावर वाटतें
राहतों जादुच्या अद्भूत बेटामध्यें
मज बाळपणीं जी मौज तिथें वाटली
तीच ती आजही अनुभविअतों त्या स्थळीं      ६

मी काल पाहिला हिरवा जेथें मळा
पाहिला आज बांधिला तेथें बंगला
ओसाड जाहलीं खेडीं मी पाहिलीं
उत्कर्ष पावलीं शहरें मी पाहिलीं     ७

मी कितीक स्थित्यंतरें जगीं पाहिलीं
तीच ती स्थिती नांदते मात्र त्या स्थळीं
अधिकांश याहुनी असतिल रम्य स्थळें
स्वाभावि परि मज आकर्षण तेथलें     ८

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP