मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
भला जन्म हा तुला लाधला खु...

रामजोशी - भला जन्म हा तुला लाधला खु...

मराठी शब्दसंपत्ति


भला जन्म हा तुला लाधला खुलास हृदयीं बुधा । धरिसि तरि हरिचा सेवक सुधा ॥धृ०॥
चराचरीं गुरु तरावयाल नरा शिरावरि हरी । जरी तरि समज धरी अंतरीं । हटातटानें पटा रंगवुनि जटा धरिशि कां शिरीं । मठाची उठाठेव कां तरी । वनांत अथवा जनांत हो कां मनांत व्हावें परी । हरीचें नांव भवांबुधिं तरी । चाल ॥ काय गळ्यांत घालुनि तुळशीचीं लांकडें । ही काय भवाला दुर करितिल माकडें । बाहेर मिरविशी आंत हरिशिं वांकडें । अशा भक्तिच्या रसारहित तूं कशा म्हणविशी बुधा । हरिरस सांडुनि घेसी दुधा ॥ भला० ॥1॥  
जाळ गळ्यामधिं माळ कशाला व्याळ काम कोपला । आंतुनि बाहेर म्हणविशी भला । वित्त पाहतां पित्त येतसे चित्त पाहिजे मला । असें हरि म्हणतो नुमजे तुला । दांभिक्त वर संभावित अभ्यंतरीं नाहिंस बिंबला । बहिर्मुख नर नरका लाधला ॥ चा० ॥ तूं पोटासाठीं करिं खटपट भलतिशी । परि भक्तिरसाविण हरि भेटेल काय तुशी । काय मौन धरुनियां गोमुखिला जाळिशी । स्वार्थसुखें परमार्थ बुडविला अनर्थ केला सुधा । न जाणसि कांजी म्हणसी सुधा । भला० ॥२॥
टिळा टोपिवर शिळा पडो या बिळांत करिसी जपा । तथापि न होय हरीची कृपा । दर्भ मुष्टिच्या गर्भिं धरुनिया निर्भर पशुची वपा । जाळिशी तिळा तांदुला तुपा । दंडकमंडलु बंड माजविशी मुंड मुंडिशी तपा । न सार्थक लटक्या सार्‍या गपा ॥ चा० ॥ ही बारबार तलवार येइल काय पुन्हा । ह्या दुर्लभ नरदेहांत ठेविशी कुण्हा । भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा । वर्म कळेना धर्म घडेना कर्म चित्त न द्विधा । सदा हरि कविरायावर फ़िदा ।  भला जन्म हा तुला० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP