मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
दत्तात्रय कोंडो घाटे

दत्तात्रय कोंडो घाटे

मराठी शब्दसंपत्ति


( चाल - फुलें वेलीचीं. )
बघुनि मन धालें
साफल्य दृष्टिचें झालें ! ध्रु०
पाउस बर्फाचा जणुं पडतो;
रजताचा जणुं मेघ वितळतो;
किंवा चंद्रकांत पाझरतो;
किंवा चंद्रकांत पाझरतो;
जणूं शीतांगी --
मत्प्रिया मला आलिंगी !     १
शीतल चंदनरसांत पडलों;प
अथवा अमृतडोहिं बिडालों;
किंवा सुखस्वप्नीं सांपडलों;
न कळे काहीं --
जिव वेडावुनि हा जाई !     २
शांतिदेवता निराकारिणी
वसते जणुं या मंगल स्थानीं,
सांगे मजला या उद्यानीं,
“ चंचल बाला ! --
बघ इथें जगन्नाथाला ! ”     ३
सृष्टिसुंदरी नटली थटली
सूक्ष्म धवल वल्कला नेसली;
खुलली जणुं सुमवेली फुलली;
रम्य ही शोभा --
हिजपुढें काय ती रंभा ?     ४
शांत तटिनि जणुं पथ स्फटिकाचा
जातिपुष्पपथ वनदेवीचा
किंवा ओघ सजिव रजताचा
कीं रत्नाची --
मेखलाच उद्यानाची !      ५
विश्वमित्रीजलिं या कालीं
तटवनभूमी बिंबित झाली,
वरतीं तैसें दिसतें खालीं,
अद्भुत झालें --
पाताळ आज पाहीलें !     ६
तारांगणही स्पष्ट बिंबिलें,
स्नाना जणुं हे मुनि अवतरले;
तेजोनिधि कीं ऋषी बैसले;
ध्यान धरोनी --
जलसमाधिस्थ होवोनी !     ७
शशिरायाही आंत उतरला,
कलहंसापरि पोहुं लागला;
तटिनीनें जणुं हृदयीं धरिला;
प्रेमळ कांत --
पाहुनी इथें एकांत !     ८
जेथें असली श्रेष्ठ मंडळी.
तेथेंच गरिबा जागा दिधली;
शंका सखये ! परि उद्भवली,
खरी मम काया --
उदकांमधि वा भोवरि या !     ९
वरतीं खालीं दिसतें गगन;
मध्यें लंबित अपुलें भवन;
वातावरणीं आधाराविण
गोजिरवाणी --
फेंकिला चेंडु हा कोणी !     १०
द्विगुणित शोभा द्विगुणित शांती;
द्विगुणित आनंदाची भरती,
दृष्टि बावरली --
वर पाहूं किंवा खालीं !     ११
स्मरणशक्ति गे ! जागृत होईं;
दर्शनदुर्लभ शोभा पाहीं,
विसरुं नको बघ यांतिल कांहीं,
वारंवार --
कोठुनी असें दिसणार ?     १२

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP