अज्ञानेकरून समानगोत्री अथवा समानप्रवरी कन्येशी विवाह झाला असता कन्येचा त्याग करून चांद्रायण प्रायश्चित्त करावे. जाणून विवाह झाला असेल तर दुप्पट प्रायश्चित्त करावे. याप्रमाणे कन्येने याच्या अर्धे प्रायश्चित्त करावे. सपिंडातील कन्येशी विवाह झाला असताही हेच प्रायश्चित्त जाणावे. ब्राह्मणी स्त्रीचा त्याग करणे तो संभोग व धर्मकार्य याविषयी मात्र करावा, कारण तिचे अन्न इत्यादिकांनी मातेप्रमाणे पालन करावे असे वचन आहे. जो सगोत्र इत्यादि कन्येशी विवाह करून गमन करतो त्याने अज्ञानेकरून विवाह केला असल्यास, त्याबद्दल चांद्रायण प्रायश्चित्त करावे आणि गमन केल्याबद्दल दुप्पट चांद्रायण प्रायश्चित्त अधिक करावे. जाणून विवाह व गमन झाली असतील तर यापेक्षा अधिक प्रायश्चित्त करावे असे कोणी ग्रंथकार म्हणतात. "सगोत्र कन्येशी गमन करणारा, गुरुपत्नीशी गमन करणाराला सांगितलेल्या प्रायश्चित्ताने शुद्ध होतो" असे वचन आहे याकरिता षडब्द प्रायश्चित्त करावे; अज्ञानेकरुन झाले असेल, तर तीन अब्द अथवा तीन चांद्रायण प्रायश्चित्त करावे, असे दुसरे ग्रंथकार म्हणतात. अज्ञानेकरून सगोत्र इत्यादिकांचे ठायी उत्पन्न झालेल्या पुत्रांचा सर्व व्यवहार, मातापित्यांनी प्रायश्चित्त घेतल्यानंतर काश्यपगोत्राने करावा; त्यांचा त्याग करू नये. जाणून सगोत्र इत्यादिकांचे ठायी उत्पन्न झालेले, पुत्रादिक चांडाल होत. कारण "आरूढपतिताचे अपत्य, ब्राह्मणीस्त्रीचेठायी शूद्रापासून उत्पन्न झालेली संतति आणि सगोत्र कन्येशी विवाह करून झालेली संतति हे तीन चांडाल समजावे" असे यमस्मृतिमध्ये वचन आहे.