रविवारी अथवा शनिवारी, हस्त नक्षत्री अथवा इतर शुभ दिवशी फुले व फळे यांनी युक्त अशा रुईच्या झाडापाशी जाऊन अर्करूपी कन्येचे दान करणारा आचार्य वरून तांबडे गंध इत्यादिकाने भूषित होऊन वराने देशकालादिकांचा उच्चार करून
"मम तृतीय मानुषीविवाहजन्यदोष परिहारार्थ तृतीयमर्कविवाहं करिष्ये"
असा संकल्प करावा. आचार्यवरणापासून नांदीश्राद्धापर्यंत कर्म करावे. दान करणाराने मधुपर्क यज्ञोपवीत, वस्त्र, गंध, माळा इत्यादिकांनी वराची पूजा करावी. नंतर अर्कवृक्षाच्या पुढे बसून
"त्रिलोकवासिन सप्ताश्वच्छायया सहितो रवे । तृतीयोद्वाहजं दोषं निवारय सुखं कुरु ॥
याप्रमाणे प्रार्थना करून छायायुक्त रवीचे अर्कवृक्षाच्या ठिकाणी ध्यान करून उदकाचे मंत्रांनी (समुद्र ज्येष्ठा०) अभिषेक करावा व "आकृष्णेन०" इत्यादि मंत्रांनी वस्त्रादिके करून पूजा करावी. श्वेतवस्त्रे व सूत्र यांनी आवेष्टन करून गुडौदन नैवेद्य दाखवून तांबूल द्यावा.
"मम प्रीतिकरा मेयं मया स्पृष्टा पुरातनी । अर्कजा ब्रह्मणा सृष्टाद्यास्मान्संप्रति रक्षतु ॥"
या मंत्राने अर्कवृक्षाला प्रदक्षिणा करून
"नमस्ते मंगले देवि नमः सवितुरात्मजे ॥
त्राहि मां कृपया देवि पत६नीत्वं म इहागता ॥
अर्क त्वं ब्रह्मणा सृष्टः सर्वप्राणिहिताय वै ।
वृक्षमाणमधिभूतस्त्वं देवानां प्रीतिवर्धनं ॥
तृतीयोद्वाहजं पापं मृत्युं चाशु विनाशय ।"
हे मंत्र म्हणून पुन्हा प्रदक्षिणा करावी. अंतःपटधारणापासून कन्यादानापर्यंत सर्व विधि करून कन्यादान करणाराने
"आदित्यास्य प्रपौत्री सवितुः पौत्री अर्कस्य पुत्री काश्यप गोत्रामर्कन्या अमुकगोत्राय वराय तुभ्यं संप्रददे ।
अर्ककन्यामित्रं विप्र यथाशक्तिविभूषिताम ।
गोत्राय शर्मणे तुभ्यं दत्ता विप्र समाश्रय ॥"
या मंत्रांनी अर्ककन्या द्यावी. नंतर दक्षिणा देऊन गायत्रीमंत्राने अर्क व वर यांना सुत्राचे वेष्टन करून
"बृहत्साम०" या मंत्राने अर्क आणि वर यांना कंकण बांधावे. अर्कवृक्षाच्या चार दिशांना चार कुंभ स्थापून त्या कुंभांचे ठिकाणी श्रीविष्णुची नाममंत्राने षोडशोपचारे पूजा करावी. अर्काचे उत्तर दिशेस अर्कपत्नीने अन्वारब्ध होऊन वराने
"अस्याः सम्यग्भार्यात्वसिद्ध्यर्थं प्राणिग्रहहोमं करिष्ये "
असा संकल्प करून
"आधार देवते आज्येनेत्यन्ते बृहस्पति अग्नि अग्नि वायुं सूर्य प्रजापति चाज्यद्रव्येण शेषेण स्विष्टकृतम"
याप्रमाणे अन्वाधान करावे. नंतर आधारापर्यंत कर्म करून प्रधान होम करावा.
"संगोभिरित्यस्यांगिरसो बृहस्पतिस्त्रिष्टुप आज्यहोमे विनियोगः संगोभिरांगिरसो० बृहस्पतय इदं न मम । यस्यैत्वेति वामदेवोग्निस्त्रिष्टुप । यस्मै त्वा कामकायाय वयं सम्राड्यजामहे । तमस्मभ्यं कामं दत्त्वाथेदं त्व घृतं पिब स्वाहा अग्नय इदं न मम ।"
या मंत्रांनी होम केल्यावर व्यस्तसमस्तव्याह्रति मंत्रांनि हवन करून होमशेष समाप्त करावा.
"मया कृतमिदं कर्म स्थावरेषु जरायुणा ।
अर्कापत्यानि नो देहि तत्सर्वं क्षन्तुमर्हसि ॥
अशी प्रार्थना करून शांतिसूक्ताचा पाठ करवावा. आचार्याला दोन गोप्रदाने देऊन स्वतः धारण केलेली वस्त्रे आचार्याला देऊन दुसरी धारण करावी. दहा अथवा तीन ब्राह्मणांना भोजन घालावे. याप्रमाणे अर्कविवाह सांगितला.