आर्दा इत्यादि दहा नक्षत्री सूर्य असता विवाह, मुंज इत्यादि मंगल कार्ये वसिष्ठ वगैरेनी निषिद्ध सांगितली आहेत असे मयूख ग्रंथात आढळते. परंतु हा निषेध कौस्तुभ, निर्णयसिंधु इत्यादि ग्रंथात तसेच मार्तंड आदिकरून ज्योतिष ग्रंथांत देखील सांगितला नाही. म्हणून बहुतेक शिष्टजन आर्दा वगैरे नक्षत्रांच्या प्रवेशाचा दोष मानीत नाहीत. विवाहाला अमावास्या निषिद्ध आहे. चतुर्थी नवमी, चतुर्दशी, अष्टमी व षष्ठी या तिथि अल्प फल देणार्या आहेत. इतर तिथि शुभ फल देणार्या आहेत. शुक्ल पक्ष श्रेष्ठ होय, कृष्णपक्ष त्रयोदशीपर्यंत मध्यम होय. सोमवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार हे शुभ होत. बाकीचे वार मध्यम होत. रोहिणी, मृग, मघा, तीन उत्तरा, हस्त, स्वाती, मूळ, अनुराधा, रेवती ही नक्षत्रे सर्वसंमत आहेत. हरदत्ताच्या मते चित्रा, श्रवण, धनिष्ठा आणि अश्विनी ही चार नक्षत्रेही वरील नक्षत्राप्रमाणे शुभ आहेत. यामध्ये दुष्ट ग्रहाने युक्त नक्षत्र असेल ते वर्ज्य करावे.