अंतःपटधारणापासून कन्यादानापर्यंत कृत्य कोणी अग्निस्थापनानंतर करतात, कोणी पूर्वांग होम झाल्यानंतर करतात, कोणी आज्यसंस्कारानंतर करतात, याप्रमाणे अनेक पक्ष आहेत. त्याविषयी आपापल्या गृह्यसूत्राप्रमाणे व जसा आचार असेल त्याप्रमाणे व्यवस्था जाणावी. त्यानंतर वधूवरांना अभिषेक करावा. नंतर त्यांनी परस्परांच्या हातात कंकणे बांधावी. नंतर अक्षतारोपण, परस्परांनी परस्परांना तिलक लावणे, माळा घालणे, अष्टपुत्री, कंचुकी, मंगळसुत्र, इत्यादि वराने वधूला देणे, गणपतीची पूजा करणे, लाडू बांधणे, अंगावरील वस्त्राचे टोकास गाठ देणे, लक्ष्मी आदि देवतांचे पूजन करणे, इत्यादि ऋग्वेदी यांच्या कन्यादानाचा अनुक्रम आहे. इतर शास्त्रीयांचा त्यांच्या त्यांच्या गृह्यसूत्राप्रमाणे जाणावा.