"प्रेतकर्म समाप्त करण्याच्या अगोदर आचतुर्थ म्हणजे चार पुरुष सापिंड्यपर्यंत मंगलकार्य करू नये. त्यानंतर पाचव्या पुरुषापासून शुभदायक होते.' या वचनातील "प्रेतकर्म शब्द सपिंडी करण्याच्या पूर्वी करावयाची कर्मै, सपिंडी आणि सपिंडी केल्यानंतर पार्वणविधीने करावयाची मासिके इतक्यांना लागतो. "सपिंडी करण्याच्या पूर्वी अपकर्ष (पुढचे अगोदर करणे) करून केलेली कर्मे पुन्हा अपकर्षाने करावी; कारण वृद्धिश्राद्धानंतर प्रेतकर्म करण्याचा निषेध सांगितला आहे" असे अनुमासिकांचा अपकर्ष करण्याविषयी वचन आहे.
"अभ्युदय"
शब्दाने नान्दीश्राद्धयुक्त कर्म मात्र ग्रहण करावे. विवाहादिकच घ्यावे असे कोणी ग्रंथकार म्हणतात.
"आचतुर्थ"
या शब्दाने नांदीश्राद्ध करणार्या पुरुषापासून आरंभ करून पित्यापासून मागील चार पुरुष, पुढे होणारे चार पुरुष आणि संतान भेद असेल तर ते चार पुरुष इतक्या सगोत्र पुरुषांचे ग्रहण करावे. ते पुरुष याप्रमाणे - नांदीश्राद्ध करणार्याचा पिता, पितामह, प्रपितामह, सपत्नीकः नांदीश्राद्ध करणार्याची भार्या, पुत्र, पौत्र, प्रपौत्र व त्यांच्या भार्या; भ्राता त्याचे पुत्र, पौत्र त्यांच्या भार्यासहित; चुलता, त्याचे पुत्र, पौत्र व त्यांच्या भार्या; प्रपितामहाचे पुत्र, पौत्र, प्रपौत्र व त्यांच्या भार्या यापैकी कोणी मरण पावले असता त्यांचे अनुमासिकापर्यंत प्रेतकर्म केले नसेल तर मंगल कार्य करू नये; याठिकाणी नान्दीश्राद्ध करणारा म्हणजे मुख्य कर्ताच समजावयाचा, मातुल इत्यादि गौण कर्ता घेऊ नये. ज्याचा पिता मृत झालेला आहे त्याचे उपनयन इत्यादिकांसंबंधी त्या संस्कार्य बटू पासूनच आरंभ करून चार पुरुषांची गणना करावी. मातामह, मातृपितामह आणि मातृप्रपितामह हे भिन्न गोत्री आहेत तरी ते नांदीश्राद्धाचे ठिकाणी देवतारूप असल्यामुळे त्यांचे प्रेतकर्म झाले नसेल तर मंगलकार्य होत नाही. मातामही, मातृपितामही आणि मातृप्रपितामही या स्वतंत्रपणाने नान्दीश्राद्धाच्या देवता नाहीत, करिता त्यांचे दशाहान्त प्रेतकर्म झाले नसले तरी मंगल कार्य करण्याला प्रतिबंध नाही. याप्रमाणे अन्त्य कर्म पूर्ण न झाल्यामुळे मंगल कार्याला होणार्या प्रतिबंधाविषयी निर्णय सांगितला.