तृणादिकाने आच्छादित अशा भूमिवर, डोक्यास वस्त्र गुंडाळून, यज्ञोपवीत कंठलंबित अथवा पृष्ठभागी अथवा कानावर ठेवून, नाकावर वस्त्र धरून, दिवसास व संशिकाली उत्तराभिमुख आणि रात्री दक्षिणाभिमुख मौनी, पायात जोडा न घातलेला, असा होत्साता खाली बसून मूत्र अथवा पुरीष यांचा उत्सर्ग करावा. यज्ञोपवीत कंठलंबित केल्याशिवाय कानावर ठेवणे हा अनाचार आहे. मार्ग, जल, देवालय, नदीतीर इत्यादिकांचे समीप मलोत्सर्ग निषिद्ध आहे. जलाशयापासून बारा हात जागा सोडून मूत्रोत्सर्ग करावा, जागा असल्यास सोळा हात सोडून करावा; पुरीषोत्सर्ग करण्याच त्याच्या चौपट जागा सोडावी. सूर्यासन्मुख उत्सर्ग केला असता अथवा स्वतःच्या मलाचे दर्शन झाले असता सूर्याचे अथवा गाईचे दर्शन घ्यावे. नंतर शिश्न धरून उठून शौच करावे (प्रक्षालन करावे). मूत्रोत्सर्ग केला असता एकदा लिंगाला, तीनदा डाव्या हाताला व दोनदा दोन्ही हातांना मृत्तिका लावावी व तितके वेळ जलाने क्षालन करावे. शुक्रपतन झाल्यास दुप्पट व मैथुन केल्यास याच्या तिप्पट शुद्धि सांगितली आहे. पुरीषोत्सर्ग केल्यास लिंगास एकदा, गुदद्वारास तीनदा, डाव्या हाताला दहावेळा आणि दोन्ही हातांना सात सात वेळा आणि पायांना सात अथवा तीन वेळा मृत्तिका लावावी. ब्रह्मचारी असेल तर याच्या दुप्पट व संन्याशी असेल तर याच्या चौपट शुद्धि करावी. रात्रीच्या वेळी उदक, मृत्तिका यांची ही शुद्धि निमपट करावी. रोगी असेल तर त्याच्या निमपट करावी. स्त्री, शूद्र, बाल यांनी त्याच्याही निमपटीने करावी. वर सांगितलेल्या संख्येने शुद्धि करून देखील दुर्गंधि नाहीशी न होईल तर ते नाहीशी होईपर्यंत शुद्धि करावी. मृत्तिका घ्यावयाची ती ओल्या आवळ्याइतकी घ्यावी. जल नसल्यामुळे शुद्धि करण्यास विलंब लागला तर सचैल स्नान करावे. वर सांगितल्याप्रमाणे शोच (शुद्धि) न केली तर आठशे गायत्री जप करून तीन वेळा प्राणायाम करावा. मूत्र केल्यावर चार वेळा, पुरीषानंतर बारा अथवा आठ वेळा आणि भोजनानंतर सोळा वेळा चूळ भरून टाकावी.