चांडाल, सुतकी, बाळंतीण, रजस्वला, चितेसंबंधी काष्ठ, प्रेत, चांडालाची सावली, इत्यादिकांचा स्पर्श झाला असेल तर स्नान करावे. चांडाल इत्यादिकांना स्पर्श करणारापासून आरंभ करून त्याचा दुसर्याला, दुसर्याच्या तिसर्याला याप्रमाणे स्पर्श झाला असता तिसर्यापर्यंत सचैल स्नान करावे. चवथ्याने आचमन मात्र करावे. त्यापुढे नुसते प्रोक्षण करावे. दुसरा इत्यादिकाला काठी, तृण वगैरेच्या व्यवधानाने स्पर्श झाला असेल तर आचमन मात्र करावे. वस्त्राच्या अंतराने होणारा स्पर्श साक्षात स्पर्शच होय. करिता तसा स्पर्श झाला असता वरीलप्रमाणे तिघांनी स्नान करावे, चवथ्याने मात्र आचमन करावे. नैमित्तिक स्नान प्राप्त झाले असता ते रात्री देखील करावे. मृतदिवस, जन्मदिवस, संक्रांति, श्राद्धदिवस, स्वतःचा जन्मदिवस आणि अस्पृश्याचा स्पर्श झाला असता उष्णोदकाने स्नान करू नये. नैमित्तिक स्नाना विषयी जलतर्पण इत्यादिक विधि नाही. नित्य स्नान केल्यावाचून भोजन केल्यास उपवास करावा. ग्रहण, संक्राति, इत्यादिकांसंबंधी नैमित्तिक स्नान केल्यावाचून भोजन अथवा पान केल्यास आठ हजार गायत्रीजप करावा. शूद्रादिकांचा स्पर्श वगैरे निमित्त असता उपवास करावा. कुत्रा, चांडाल, इत्यादिकांचा स्पर्श झाल्यावर स्नान न करिता भोजन अगर पान केल्यास त्रिरात्रव्रत करावे. रजक इत्यादिकांचा स्पर्श असेल तर याच्या अर्धे प्रायश्चित्त करावे. याप्रमाणे नैमित्तिक स्नान सांगितले.