जेव्हा कन्येचा विवाह, पुत्राचे उपनयन अथवा प्रथम विवाह ही करणारा चुलता, मातुल, इत्यादिक असेल तेव्हा त्याने संस्कार्याचा पिता मृत असेल तर
"अस्य संस्कार्यस्य पितृपितामह प्रपितामहाः"
इत्यादि प्रयोग करावा. सोदर भ्राता कर्ता असेल तर निराला प्रयोग करण्याचे कारण नाही; कारण, भ्रात्याचा पिता व संस्कार्याचा पिता वगैरे एकच असतात. सापत्न भ्राता असेल तर त्याने
"संस्कार्यस्य मातृपितामही प्रपितामह्यः"
इत्यादि उच्चार करावा. संस्कार्याची माता जिवंत असेल तर मातृपार्वणाचा लोप करावा. संस्कार्य जीवत्पितृक असून मातुल इत्यादिक कर्ता असेल तर
"संस्कार्यपितुः मातृपितामहीप्रपितामह्यः संस्कार्यपितुः पितृपितामहप्रपितामहाः"
इत्यादि उच्चार करून संस्कार्याच्या पित्याचा पिता इत्यादिकांची तीन पार्वणे करावी. संस्कार्याचा पिता व पितामह जिवंत असतील व मातुलादिक कर्ता असेल तर संस्कार्याच्या पित्याची माता, मातामह, इत्यादिकांच्या उद्देशाने दोन पार्वणे करावी. पितृवर्ग, मातृवर्ग व मातामहवर्ग, या तिहीपैकी कोणत्याही दोन वर्गाचा पहिला जिवंत असेल तर तिसर्या वर्गापुरते एक पार्वण करावे. तिन्ही वर्गातील आद्य जिवंत असतील. आणि कर्ता मातुल असेल तर, संस्कार्याच्या पितामहाची माता इत्यादि तीन पार्वणांचा उद्देश करावा. पितामहाची माता वगैरे जिवंत असेल तर त्या पार्वणाचा लोप करावा वगैरे पूर्वीप्रमाणे जाणावे. संस्कार्य जीवत्पितृक असून कर्ता पितृव्य असेल तर उच्चारामध्ये फरक नाही; कारण संस्कार्याच्या पित्याचा पिता वगैरे व पितृव्याचा पिता वगैरे एकच असतात. संस्कार्याचा पिता मृत असून पितामह कर्ता असेल तर
"संस्कार्यस्य पितः मम पितृपितामहौ च नान्दीमुकाः संस्कार्यस्य माता० मातामह०"
इत्यादि उच्चार करावा. संस्कार्याचा पिता जिवंत असून पितामह कर्ता असेल तर कर्त्याने आपली माता, पिता, मातामह यांची पार्वणे 'मम' पदाने युक्त अथवा रहित असा उच्चार करून करावी. याप्रमाणे प्रपितामह कर्ता असेल तेव्हाही जाणावे.