मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ५३ वा

स्कंध १० वा - अध्याय ५३ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥६३९॥
निवेदिती शुक ऐकूनि निरोप । करुनियां स्मित वदले हरी ॥१॥
रुक्मिणीसमचि विप्रा, मम स्थिति । निद्राही मजसी येईचिना ॥२॥
कारण, द्वेषानें शिशुपालाप्रति । रुक्मि तिज अर्पी जाणतों मी ॥३॥
परी ते सुंदरी मजसीच इच्छी । जिंकूनि खलासी वरिन तिज ॥४॥
आग्निस्फुलिंग जैं वायु नेई सौख्यें । तैसें रुक्मिणीतें हरिन विप्रा ॥५॥
वासुदेव म्हणे मुहूर्तनिश्चय । कदा तें केशव पुसूनि घेई ॥६॥
॥६४०॥
अवधि एकचि दिन ऐसें यदा । कळे, तैं बाहुका पाचारुनि ॥१॥
म्हणे रथ सिध्द करुनि आणावा । तदा सूत अश्वां सिध्द करी ॥२॥
शैब्य, सुग्रीव तो तेंवी मेघपुष्प । जोडी बलाहक रथालागीं ॥३॥
आणूनियां रथ, जोडूनियां पाणी । सन्निध येऊनि सूत उभा ॥४॥
तदा बैसवूनि प्रथम विप्रातें । मागोमाग बैसे शारंगपाणी ॥५॥
आनर्त लंघूनि विदर्भात येई । वायुसम पाही वेग रथा ॥६॥
वासुदेव म्हणे कुंडिनपुरासी । एका रात्रीमाजी प्राप्त झाले ॥७॥
॥६४१॥
विदर्भ नगरी तदा समारंभ मोठा ।
सजवी पुरीते स्वयें पुत्रमोहें राजा ॥१॥
चित्रविचित्र पताका तोरणें गुढ्यांनीं ॥
शोभलें नगर सडे सुगंधी द्रव्यांनी ॥२॥
ऐश्वर्य, सौंदर्य माझे अन्याहूनि श्रेष्ठ ॥
अहमहमिका ऐसी दावाया जनांत ॥३॥
पूजन, अर्चन तेंवी भोजनाची घाई ॥
पुण्याहवाचन राजमंदिरांत होई ॥४॥
वधुवस्त्र मांगलिकस्त्रानें रुक्मीणीसी ॥
अलंकार लेववूनि स्त्रिया नेसविती ।\५॥
विवाहसूत्रही करीं बांधूनि प्रेमानें ॥
रक्षणाविधीही केला दिव्य विभूतीनें ॥६॥
अथर्वणोक्त मंत्रांनीं केला ग्रहशांति ।
रौप्य, सुवर्ण, धेनूंचीं दानेंही विप्रांसी ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसी मंडपी सिध्दता ॥
होई, काय राजगृही आनंदासी तोटा ॥८॥
॥६४२॥
चेदिपति दमघोष । पुत्रविवाहें हर्षित ॥१॥
यथाशास्त्र करुनि विधि । येती कुंडिनपुरासी ॥२॥
भावी जामात्यासी नृप । जाई सामोरा सहर्ष ॥३॥
करी सीमांतपूजेसी । शिशुपाल ह्र्ष्ट चित्तीं ॥४॥
इष्ट मंदिरी जानोसा । येतं तोष जनां मोठा ॥५॥
वासुदेव म्हणे राव । आले पहाया विवाह ॥६॥
॥६४३॥
एकुलती एक कन्या भीमकाची । मांडलिक येती जाणूनियां ।\१॥
मांडलिकांसवें तेंवी दमघाष । पुत्रासवें प्राप्त विवाहार्थ ॥२॥
शाल्व, जरासंध, विदूरथादिक । द्वेष्टे सर्व नृप श्रीहरीचे ॥३॥
हरितील कन्या राम-कृष्ण ऐसी । शंका तयां होती समस्तांसी ॥४॥
सकलही सिध्द होते या विचारें । रामातेंही कळे वृत्त त्यांचें ॥५॥
कृष्ण साह्यास्तव घेऊनि तो सन्य । करुनि प्रयाण मार्ग क्रमी ॥६॥
वासुदेव म्हणी रुक्मिणीसी चिंता । कृष्णागमनाचा ध्यास तिज ॥७॥
॥६४४॥
सूर्योदयींच गोविंद । यावा अपेक्षा हे तिज ॥१॥
परी विग्रही येईना । केंवी चिंता हे तन्मता ॥२॥
पुढती विचारतरंग । चिंतनें त्या होई दंग ॥३॥
चिंति एकदां मनांत । कृष्णासवें येई विप्र ॥४॥
करी विचार फिरुनि । मज उद्धट मानूनि ॥५॥
नाकारिलें काय कृष्णें । विप्र निरुत्साही तेणें ॥६॥
हीन भाग्येंचि देवता । पावल्या की काय क्रोधा ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसी । बाधे कल्पना कन्येसी ॥८॥
॥६४५॥
तर्क -वितर्कांनीं गोंधळूनि गेली । चिंतेनें त्या झाली स्तब्ध अंती ।\१॥
अद्यापि येण्याची वेळ असे ऐसें । चिंतूनि मनातें धीर देई ॥२॥
अश्रुपूर्ण नेत्र मिटी तदा घटट । स्फुरे वामनेत्र इतुक्यामाजी ॥३॥
वामअंकाचेही होई तै स्फुरण । पाहुनि सुचिन्ह हर्ष पावे ॥४॥
आशेनें त्या नेत्र उघडूनि पही । विप्र तोचि येई पुअढती तिच्या ॥५॥
वासुदेव म्हणे, तयातें प्रसन्न । पाहुनियां मन ह्र्स्ष्ट होई ॥६॥
॥६४६॥
अत्युत्साजे म्हणे जाहलेंना कार्य । तदा कथी विप्र सकल वृत्त ॥१॥
पातला श्रीहरि ऐसेंही कथिलें भरतें तैं आलें आनंदाचें ॥२॥
अर्पावें या विप्रा काय तें कळेना । आनंदें वंदना करी अंती ॥३॥
प्रत्यक्ष लक्ष्मीचि विप्रपाई लीन । करावें याहून हित काय ॥४॥
वासुदेव म्हणे वृत्त भीष्मकासी । कळतां तयासी हर्ष वाटे ॥५॥

॥६४७॥
राम-कृष्णांसी तो जाऊनि सामोरा । आदरें सत्कारा सिध्द होई ॥१॥
मधुपर्कादिकी पूजिलें तयांसी । वस्त-भूषा अर्पी मूल्यवान ॥२॥
सैन्यासवें आणी समारंभें पुरी । सकलांचा करी राव मान ॥३॥
पालटल्या आता कल्पना सर्वांच्या । ह्मणती जमाता कृष्ण होवो ॥४॥
पूर्वपुण्य येवो फळासी म्हणती । नागरिक येती दर्शनार्थ ॥५॥
नेत्रांजलीनेंचि कृष्णरुपामृत । प्राशूनि संतोष पावताती ।\६॥
वासुदेव म्हणे थोरांच्या सान्निध्यें । विचार जनांचे थोर होती ॥७॥

॥६४८॥
पूर्वदिनीं देवीदर्शनाची रीत । सिध्द दर्शनार्थ कन्या होई ॥१॥
रक्षक तियेच्या सभोवतीं होते । शस्त्रधारी योध्दे सकवच ॥२॥
आजोळच्या तेंवी घरच्या बहुत । स्त्रियाही सानंद जमल्या होत्या ।३॥
दुंदुभि, पणव, शंख, मृदंगादि । मंगलवाद्ये तीं वाजताती ॥४॥
पूजासाहित्य तैं पक्वान्नाची ताटें । फलभार शोभे ललनाहस्तीं ॥५॥
सालंकृत विप्रस्त्रियाही बहुत । वारांगना नृत्य करित जाती ॥६॥
वासुदेव म्हणे सूत तैं मागध । गाती स्तुतिपाठ अत्यानंदें ॥७॥

॥६४९॥
ऐशा समारंभे चालली रुक्मिणी । श्रीकृष्णचिंतनीं दंग झाली ॥१॥
मौनव्रतें येई मंदिरासन्निध । करी हस्तपादप्रक्षालन ॥२॥
आचमनें शुचिर्भूत शांतचित्त । होऊनि प्रविष्ट मंदिरी ती ॥३॥
पूजाविधिज्ञात्या , स्त्रिया कोणी वृध्द । जाती मंदिरांत तिच्यासवें ।\४॥
आज्ञेसम त्याच्या वंदूनि अंबेसी । स्फूर्तमंत्रें प्रार्थी नववधु ॥५॥
सुपुत्रवती हे अंबिके, तुजसी । असावी प्रणति वारंवार ॥६॥
पति मज लाभो भगवान कृष्ण । अनुग्रह पूर्ण होवो ऐसा ॥७॥
वासुदेव म्हणे प्रार्थना यापरी । अंबिकेची करी कन्या प्रेमें ॥८॥

॥६५०॥
रायाप्रति मुनि बोललें पुढती । सिध्द पूजनासी होई कन्या ॥१॥
शुध्दोदक, गंध, अक्षता, धूपादि । वस्त्रभूषणेंही पूजा करी ॥२॥
नैवद्यही नाना अर्पिले सुखानें । श्रीफलादि फलें ओंटी भरी ॥३॥
सप्रेम आरती करुनि पुढती । ओंटया, अपूपादि द्रव्यें भरी ॥४॥
तांबूल, मंगलसूत्रें, इक्षुदंड । फलेंही विविध ब्राह्मणीतें ॥५॥
वायनस्वरुपें अर्पी अत्यादरें । तयांचे घेतले आशीर्वाद ॥६॥
देवीसवें ब्राह्मणीसीही वंदूनि । प्रसाद घेऊनि सोडी मौन ॥७॥
वासुदेव म्हणे मंदिराबाहेरी । धरुनियां करीं सखिसी येई ॥८॥

॥६५१॥
नृपाळही सर्व समारंभशोभा । पहावया तदा आले होते ॥१॥
रुक्मिणीचें रुप पाहूनियां त्यांसी । उद्भवली चित्ती मदनबाधा ॥२॥
मोहपीडित ते होऊनियां गेले । शुक तैं बोललें नृपाळासी ॥३॥
राया, ईश्वराची माया ते प्रत्यक्ष । हरी कां न चित्त नृपाळांचें ॥४॥
वासुदेव म्हणे रुप  रुक्मिणीचें । वर्णवेल कैसे शेषातेंही ॥५॥

॥६५२॥
सिंहकटी चंद्रवदना, कुंडलें । वदन शोभलें मनोहर ॥१॥
कमरपट्ट्याचें तेज हरी चित्त । उगम कलिकेस यौवनाच्या ॥२॥
पाणिदार नेत्र हरिणीसमान । हालताती जाण कुरळे केशं ॥३॥
पक्कबिंबफलासम ते अधर । दंतपंक्तीवर कांति त्यांची ॥४॥
कुंदकळ्यांसम शोभा ते दंतांची । राजहंसगति शोभा देई ॥५॥
विराजती बहु चरणी नुपुरें । सलील शोभलें वदनी हास्य ॥६॥
वासुदेव म्हणे अनुपम ऐसें । रुप रुक्मिणीचें वर्णवेना ॥७॥

॥६५३॥
कृष्णें अवलोकावें मज । हेतु हाचि अंतरांत ॥१॥
पाहूनियां रुप तिचें । मोहमग्न होती राजे ॥२॥
पडले वाहनावरुनि । गेले बेभान होऊनि ॥३॥
फेंकी सलज्ज कटाक्ष । शोधावया श्रीकृष्णास ॥४॥
तोंचि पाही जगन्नाथा । धरिती चरण तीच दिशा ॥५॥
रथावरी येऊं इच्छी । ऐसें पाहूनि श्रीपति ॥६॥
समीपचि आणी रथ । अवलोकिती सर्व नृप ॥७॥
वासुदेव म्हणे हरि । लीला समक्षचि करी ॥८॥

॥६५४॥
रुक्मिणीतें कर आपुला देऊनि । घेई उचलूनि रथावरी ॥१॥
जंबुकांसमक्ष पराक्रमें भक्ष्य । नेई जेवी सिंह तैसी क्रिया ॥२॥
गरुडध्वजानें हरुनि रुक्मिणी । विक्रमेंकरुनि नेला रथ ॥३॥
रामासवें तदा निघाले यादव । कर्म तें असह्य सकल नृपां ॥४॥
हरिणांनीं सिंहा हरावें त्यापरी । अवस्था ते झाली क्षत्रियांची ॥५॥
केवळ गोप हें हरुनियां यश । सकलांसमक्ष निघूनि गेले ॥६॥
वासुदेव म्हणे निर्भय सज्जन । करिती सत्कर्म निर्भयत्वें ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP