स्कंध १० वा - अध्याय ८० वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
॥८७३॥
परीक्षित म्हणे मुनिराया मज । निवेदावें वृत्त श्रीहरीचें ॥१॥
करील जे त्याचे वाणी गुणगान । श्रवण जे कर्ण करिती त्याचें ॥२॥
धन्य धन्य तेचि निश्चयें तूं मानीं । कृतार्थता जनीं ईशभक्तां ॥३॥
शुक तैं रायासी म्हणती ब्राह्मण । होता एक जाण ख्यात जगीं ॥४॥
’ सुदाम ’ तयाचें नाम, ब्रह्मवेत्ता । विरक्त कृष्णाचा परम मित्र ॥५॥
वासुदेव म्हणे यदृच्छासंतुष्ट । होता तो गृहस्थ जितेंद्रिय ॥६॥
॥८७४॥
पतिव्रता त्याची कांता । सेवेमाजी दक्ष सदा ॥१॥
दारिद्यानें तयाप्रति । चिंता अन्न-वस्त्राचीही ॥२॥
साध्वी, पतीसी एकदां । भीत भीत वदे शब्दा ॥३॥
जाणतें मी जगत्पति । कृष्ण सन्मित्र तुह्मांसी ॥४॥
जरी भेटाक तयातें । दैन्य हरील तो साचें ॥५॥
नसे संशय मजसी । करुणा तया स्वभक्तांची ॥६॥
द्रव्य अर्पी जरी कृष्ण । तरी अन्यांचेंही मन ॥७॥
होऊनिया अनुकूल । द्रव्य तुम्हां अर्पितील ॥८॥
वासुदेव म्हणे कांता । कथी ऐशा मधुर वचा ॥९॥
॥८७५॥
मधुर वचन ऐकूनि कांतेचे । सुदाम मनातें कथी स्वयें ॥१॥
द्रव्यलाभ जरी जाहला न कांही । दुर्शन हा नाहीं अल्प लाभ ॥२॥
यास्तव द्वारकागमन करावें । निर्धार हा पाहे करी विप्र ॥३॥
मग कांतेप्रति म्हणे कांही भेट । दे मज कृष्णास अर्पावया ॥४॥
तदा त्या साध्वीनें विप्रगृहीं भीक । मागूनि पृथुक मेळविले ॥५॥
चार मुष्टि कण्या आणुनि यापरी । गुंडाळी ती वरी चिंधी एक ॥६॥
वासुदेव म्हणे घेऊनि ती भेट । द्वारकेची वाट क्रमी विप्र ॥७॥
॥८७६॥
कृष्णदर्शनाची धरुनि उत्कंठा । मार्ग द्वारकेचा लंघीतसे ॥१॥
योग्यवेळी येई द्वारकानगरीं । प्रवेशूनि पुरीमाजी हर्षे ॥२॥
राणीवशामाजी पातला सत्वरी । शिरला मंदिरीं एक्या रम्य ॥३॥
शिरतांचि तेथें आनंदला विप्र । पाहिलें तयास श्रीकृष्णानें ॥४॥
त्यजूनियां प्रियांमचक सत्वरी । आलिंगीं श्रीहरी मित्राप्रति ॥५॥
उभयांच्या नेत्री वाहे अश्रुपूर । बैसविला विप्र निजमंचकीं ॥६॥
वासुदेव म्हणे पादधावनादि । विप्रातें सविधि पूजी कृष्ण ॥७॥
॥८७७॥
तीर्थ घेऊनि मस्तकीं । उट्या लावियेल्या अंगीं ॥१॥
धूप-दीप तैं तांबुल । अर्पी तयासी गोपाल ॥२॥
धेनू समर्पूनि प्रेमें । कुशल तयासी पुशिलें ॥३॥
जीर्ण वस्त्रधारी विप्र । मलिन तो कृशदेह ॥४॥
असूनि, चामर रुक्मिणी । ढाळी आदरें वंदूनि ॥५॥
अंत:पुरी तैं विस्मय । पाहूनियां बहु होय ॥६॥
म्हणती काय भाग्य याचें । कृष्ण त्यागूनि लक्ष्मीतें ॥७॥
वश जाहला याप्रति । वासुदेव विप्रा वंदी ॥८॥
॥८७८॥
पुढती श्रीकृष्ण सुदाम्याकारणें । वृत्त पुशी प्रेमें सकल त्याचें ॥१॥
मित्रा, गुरुगृह त्यागिल्यापासूनि । गृहस्थआश्रमी रमसी की न ॥२॥
अनासक्तचित्ता जाणतो मी तुज । पूर्वीपासूनीच विरक्तातें ॥३॥
भूषण हे तुज मित्रा, निश्चयेसी । प्रारब्धें भोगिती विषय कोणी ॥४॥
अनासक्तीचित्तें असूनि अलिप्त । वागतो तैसाच मीही मित्रा ॥५॥
वासुदेव म्हणे लोकसंग्रहाची । एकचि कृष्णासी इच्छा होती ॥६॥
॥८७९॥
मित्रा, आठवे तो गुरुगृहवास । स्मरणें अलिप्त होई मन ॥१॥
जन्मदाता एक विद्यादाता अन्य । तृतीय जो जाण गुरु मीचि ॥२॥
सत्कर्म बोधक पित्याहूनि श्रेष्ठ । सत्कर्मे मनुज तरती भव ॥३॥
सर्वभूतस्वामी गुरुसेवेनें मी । तोषतों न तेंवी अन्यकर्मे ॥४॥
यास्तव सद्गुरुसेवा तें वरिष्ठ । साधन, मन्निष्ठ म्हणती सदा ॥५॥
वासुदेव म्हणे कथूनियां ऐसें । स्मृती स्वमित्रातें देई एक ॥६॥
॥८८०॥
गुरुपत्नीनें एकदां । केली काष्ठांची अपेक्षा ॥१॥
गेलों आज्ञेनें त्या वनीं । मित्रा, आठवीं ते मनीं ॥२॥
जातां वनामाजी तेथ । पर्जन्य ये अकस्मात ॥३॥
वादळही झाले थोर । विजा लवल्या अपार ॥४॥
कडाडले मेघ अति । गेला भानूही अस्तासी ॥५॥
पडला निबिड अंधार । भरलें उदक सर्वत्र ॥६॥
वासुदेव म्हणे पाणी । कथी बहु चक्रपाणी ॥७॥
॥८८१॥
निम्नोन्नत देश झांकूनियां गेले । मस्तकीं घेतलें काष्ठभार ॥१॥
एकमेका साह्य होऊनि काननी । चाललो धरुनि परस्परां ॥२॥
इतक्यांत येती शोधार्थ गुरुजी । पाहूनि आह्मांसीं शीतमग्न ॥३॥
बाळांनो, किती हे आह्मांस्तव कष्ट । घेतलेती स्पष्ट प्रत्यय हा ॥४॥
देहाहूनि प्रिय नसे या जगतीं । तुच्छ त्या देहासी लेखियेले ॥५॥
भूषणास्पद ही तुम्हां गुरुसेवा । ऐसाचि करावा प्रत्युपकार ॥६॥
वासुदेव म्हणे सद्गुरु प्रसन्न । होऊनि, वचन वदले ऐका ॥७॥
॥८८२॥
सफल होतील सर्व मनोरथ । इह परसौख्य अध्ययनें ॥१॥
लाभेल तुह्मांसी कथितों संतोषें । अपवाद यातें नसे कदा ॥२॥
कृष्ण म्हणे मित्रा, ऐशा बहु गोष्टी । तुज आठवती काय सांगें ॥३॥
गुरुअनुग्रहें लाभे श्रेष्ठ शांति । मित्रा, धरी चित्ती सर्वकाळ ॥४॥
वासुदेव म्हणे यापरी स्मरण । देई भगवान सुदाम्यातें ॥५॥
॥८८३॥
विप्र म्हणे देवा, गुरुआश्रमांत । सर्वश्रेष्ठ संग घडला तव ॥१॥
भाग्य माझे थोर मानितों मी तेंचि । प्राप्तव्य कांहींचि नुरलें तेणें ॥२॥
मूर्तिंमंत वेदमय तव देह । लवही संदेह मज नसे ॥३॥
केवळ लौकिकास्तव गुरुगृहीं । राहिलासी पाहीं जगन्नाथा ॥४॥
वासुदेव म्हणे सुदामा यापरी । यथार्थत्वें करी वर्णनातें ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : December 13, 2019
TOP