मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ७८ वा

स्कंध १० वा - अध्याय ७८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥८५९॥
निवेदिती शुक आतां वक्रदंत । उरला होता दुष्ट शाल्वासम ॥१॥
शाल्ववध्द होतां पातला धांवूनि । गदेतें घेऊनि पादचारी ॥२॥
बोलला तैं कृष्णा मातुलाच्या पोरा । वधीन तुजला मित्रांस्तव ॥३॥
तदाचि विमुक्ति ऋणांतूनि माझी । सावध हो आली गदा नीचा ॥४॥
बोलुनियां गदा हाणिली मस्तकीं । पीडा न कृष्णासी तेणें कांहीं ॥५॥
कृष्णकौमोदकी बसतांचि उरीं । पडे भूमीवरी वमूनि रक्त ॥६॥
वासुदेव म्हणे सर्वाच्या समक्ष । शिरे प्राणज्योत कृष्णमुखीं ॥७॥

॥८६०॥
बंधु त्याचा विदुरथ । येतां कृष्ण सोडी चक्र ॥१॥
शिर उडवूनि त्याचें । क्षणीं सुखवी देवांतें ॥२॥
पूतनादि महा दैत्य । ऐसे विदुरथापर्यंत ॥३॥
संहारिले स्वयें कृष्णें । वधिले कांही बळिरामानें ॥४॥
वासुदेव म्हणे आतां । वृत्त रामाचें परिसा ॥५॥

॥८६१॥
कौरव-पांडव युध्दाचा विचार । पाहूनि बळिभद्र चिंती मनीं ॥१॥
म्हणे हे यभय आपुलेचि जनीं । नसे स्वीकारुनि पक्ष लाभ ॥२॥
यास्तव यात्रेसी निघूनियां जावें । यापरी साधावें इष्टकार्य ॥३॥
चिंतूनियां ऐसें प्रभासादि तीर्थी । करुनि स्नानादि, नैमिषांत ॥४॥
शौनकादि मुनि आरंभिती सत्र । प्राप्त होई तेथ बलराम ॥५॥
पाहूनि तयासी सन्मानिती मुनि । अर्ध्यादि अर्पूनि तोष देती ॥६॥
रोमहर्षण तैं उच्चासनीं होता । सन्मान रामाचा करीचिना ॥७॥
वासुदेव म्हणे हीनवर्ण ऐसा । उन्मात्त पाहतां क्रुध्द राम ॥८॥

॥८६२॥
व्यासशिष्य जरी वदला पुराणें । तरी न विप्रातें श्रेष्ठ कदा ॥१॥
नटासम तेणें दिसे याचें ज्ञान । ढोंगी पाप्याहून असती पापी ॥२॥
धर्माच्या नांवें ते करिताती पाप । योग्य त्यांचा वध करणें मज ॥३॥
बोलुनि यापरी दर्भचि फेंकितां । रोमहर्षणाचा प्राण जाई ॥४॥
वासुदेव म्हणे तदा शौनकादि । वदले रामासी काय ऐका ॥५॥

॥८६३॥
यदुश्रेष्ठा, प्रतिलोमज हा परी । नियोजित सत्रीं कार्यी एका ॥१॥
इतिहास सर्व तेंवी हा पुराणें । जाणे, त्या कारणें ब्रह्मासन - ॥२॥
अर्पिलें याप्रति, आरोग्य, आयुष्य । दिलें होतें यास सत्रामाजी ॥३॥
ब्रह्महत्त्यादोष यास्तव तुजसी । प्रायश्चित्तविधि करीं आतां ॥४॥
नाहींतरी लोक होतील अश्रध्द । आचरती श्रेष्ठ आदर्श तो ॥५॥
वासुदेव म्हणे थोरांचे थोरत्व । कोलसंग्रहार्थ प्रगट होई ॥६॥

॥८६४॥
राम म्हणे आह्मां सन्मार्गाचरण । आवश्यक जनउध्दारार्थ ॥१॥
यास्तव कथावें प्रायश्चित्त मज । असेल जें श्रेष्ठ तेंचि आतां ॥२॥
कथिती तैं मुनि अस्त्रबळ तुझें । वचन आमुचें, तेंवी कार्य ॥३॥
साधेल हें सर्व ऐसें करी आतां । हेतु हा आमुचा सिध्द करीं ॥४॥
राम म्हणे रोमहर्षणाचा पुत्र । उग्रश्रवा तेंच करिल कार्य ॥५॥
आत्मापुत्र ऐसी ध्यानी घ्यावी श्रुती । कथावें मजसी अन्य कार्य ॥६॥
वासुदेव म्हणे जनांच्या हितार्थ । घेती प्रायश्चित्त सुजन सौख्यें ॥७॥

॥८६५॥
कथिती तैं मुनि इल्वलाचा पुत्र । बल्वल, यज्ञास करी विघ्न ॥१॥
रक्त, पू, विष्टाही सिंचूनि त्या स्थानीं । भ्रष्ट करी भूमि वधीं तया ॥२॥
तेंवी प्रदक्षिणा घालीं भारतासी । तेणे पापमुक्ति पावसील ॥३॥
संवत्सर एक ऐसें तीर्थाटन । करुनि क्षालन करी पाप ॥४॥
वासुदेव म्हणे रामासीही विप्र । निवेदिती शास्त्रमर्यादा हे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 13, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP