स्कंध १० वा - अध्याय ६७ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
॥७७७॥
राव म्हणे मुने, चरित्र रामाचें । ऐकावेसें वाटे अन्य कांहीं ॥१॥
निवेदिती मुनि वानर द्विविद । भौमासुरमित्र होता एक ॥२॥
मित्रवधें तया होता बहु क्रोध । व्हावें ऋणमुक्त ऐसें चिंती ॥३॥
जाळपोळ तेणें बहु आरंभिली । उद्धस्तचि केलीं नगरें ग्रामें ॥४॥
द्वारावतीवरी कटाक्ष तयाचा । सान्निध्यें आनर्ता पीडी बहु ॥५॥
वासुदेव म्हणे विविध प्रकारें । दुष्कर्म मांडिलें कपिनें ऐसें ॥६॥
॥७७८॥
दशसहस्त्र नागांचें । बळ होतें त्या कपीतें ॥१॥
फुगवी सागर तो कदा । बुडवी तीरस्थ प्रदेशां ॥२॥
ऋषिआश्रमचि मोडी । यज्ञक्रियाही उच्छेदी ॥३॥
मल-मूत्रविसर्जन । करी अग्निकुंडी जाण ॥४॥
स्त्रिया-पुरुषां गुहेंत । चिणूनियां वधी दुष्ट ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसा । उपद्रव होई लोकां ॥६॥
॥७७९॥
रैवतकावरी एकदां बलराम । स्त्रियांसवें जाण क्रीडा करी ॥१॥
वारूणीधुंद तो गायन आरंभी । द्विविद त्या भागी तदा होता ॥२॥
येऊनियां वृक्ष हालवी तो तेथें । शब्दही कपीचे करी बहु ॥३॥
मर्कटचेष्टा ती पाहिली स्त्रियांनी । परी राम मनी स्वस्थ होता ॥४॥
मर्कट तैं वेडी-वांकुडीं वदनें । करुनि स्त्रियांतें भेडसावी ॥५॥
तदा राम एक मारी त्या पाषाण । परी चुकवून जाई कपि ॥६॥
वासुदेव म्हणे वारुणीकलश । रामाचा तो कीश पळवी दूर ।\७॥
॥७८०॥
ओढूनि, कलश, फाडिलीं स्त्रीवस्त्रें । पाहुनि रामातें क्रोध येई ॥१॥
आठवूनि पूर्व दुष्कृत्यें वधार्थ । जाहला तैं सिध्द बलराम ॥२॥
नांगर-मुसळ घेतलीं करांत । ताडी तैं द्विविद वृक्ष एक ॥३॥
रामानें वृक्षासी छिन्न भिन्न केलें । वृक्ष तैं आदळें कपिशिरी ॥४॥
वृक्षामागें वृक्ष फेकूनियां अंती । कपि करी वृष्टि पाषाणांची ॥५॥
अंती द्वंद्वयुध्दा प्रवृत्त जाहला । प्रहार त्या केला रामें एक ॥६॥
मुष्टिप्रहारें त्या ओकला रुधिर । पडे धरणीवर गतप्राण ॥७॥
वासुदेव म्हणे होई पुष्पवृष्टि । जाई सदनासी बलराम ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 12, 2019
TOP