॥७१४॥
निवेदिती शुक कथा ऐका ते मधुर ।
रुक्मिणीमातेच्यासवें कृष्णाचा कलह ॥१॥
रुक्मिणीमंदिरीं कृष्ण एकदां सुखानें ।
पहुडले होते, पाय चुरी ते प्रेमानें ॥२॥
छत लावियेलें रम्य मौक्तिक झालरी ॥
डोलती, मंदिरीं तया रम्य छतावरी ॥३॥
विविध रत्नांच्या दीपमाळाही शोभती ॥
बटमोगर्यांच्या माळा सर्वत्र डोलती ॥४॥
सुगंधें त्या गुंजारव करिताती भृंग ॥
कोमलकरांनी सेवा करीतसे चंद्र ॥५॥
समीपचि पातिजार आरामवनांत ।
मैलागिरिचंदनाचा मंदिरांत धूप ॥६॥
वासुदेव म्हणे तया संमिश्र सुगंधें ॥
बहर सुखासी येई चित्त रमे मोदें ॥७॥
॥७१५॥
रंगमहालीं त्या उत्कृष्ट मंचकीं । दुग्धधवल ती शय्या शोभे ॥१॥
रत्नजडित तो विंझुणा करांत । रुक्मिणी प्रभूस वारा घाली ॥२॥
कंकणें-मुद्रिकानाद तदा होई । नृपरांचा येई मधुर शब्द ॥३॥
वर्णवे न शोभा रुक्मिणीमातेची । उटि केशराची वक्षस्थळीं ॥४॥
रत्नहार तेणें भासला आरक्त । मेखला कटीस झळके बहु ॥५॥
मुखकमलाची अनुपम शोभा । कुरळया केशांचा खेळ चाले ॥६॥
कर्णभूषणेंही शोभती बहुत । पुतळ्यांनीं कंठ विरजला ॥७॥
वासुदेव म्हणे पदर जरीचा । बांधियेला होता आंवरुनि ॥८॥
॥७१६॥
पाहूनि तें रुप श्रीकृष्ण भगवान । बोलले वचन रुक्मिणीसी ॥१॥
राजकन्यें, देवांसम पराक्रमी । तैसेचि सद्गुणी रुपवंत ॥२॥
धनाढय, उदार तेंवी बलावंत । बहु राजपुत्र शिशुपालादि ॥३॥
वरण्यासी तुज असतां उत्सुक । बंधु, पिता सिध्द असतां तव ॥४॥
मजसीच कांवो, वरिलेंसी सांगें । काय तुज तेथें न्यून होतें ॥५॥
वासुदेव म्हणे आपुली न्यूनता । रुक्मिणीसी ऐका कथी कृष्ण ॥६॥
॥७१७॥
सुंदरी, महीषी व्हावीस तूं कोणी । यादव हे आम्ही राज्यहीन ॥१॥
जरासंधभयें राहिलों सागरीं । कां वो स्वीकारिली न्यूनता हे ॥२॥
आधीन स्त्रियांच्या नसे जो तयाची । कांता दु:ख भोगी सामान्यत्वें ॥३॥
राज्य नसो परी सन्मान असावा । कथिलेसी जीवा ऐसें तरी ॥४॥
तेंही नसे सत्य संगतींत माझ्या । असती बहुधा दरिद्रीचि ॥५॥
लेखिताती थोर, तुच्छचि तयांसी । संपन्न मजसी स्तवितीचिना ॥६॥
वासुदेव म्हणे कृष्ण कथी वेडये । कुलही न माझे पाहिलेसीं ॥७॥
॥७१८॥
राजकन्या तूं शाहाणी । चिंतिलेंसी नाहीं मनीं ॥१॥
सर्वगोष्टीमाजी ऐसी । केंवी चूक झाली तुझी ॥२॥
केंवी रुपमती मज । रुपहिना भुललीस ॥३॥
गुणांनीहीं तूं उत्तम । त्याहिकाजीं मी अधम ॥४॥
कैसी सम-विषमांची । जनी व्हावी स्थिर मैत्री ॥५॥
नारदादि मुनिवाणी । भुललीस तूं ऐकूनि ॥६॥
कैसा सुटला विवेक । होई अद्यापि सावध ॥७॥
वासुदेव म्हणे हरी । पहा केंवी चेष्टा करी ॥८॥
॥७१९॥
अद्यापीही करीं निवड साजेशी । इह-परलोकीं मिळवीं सुख ॥१॥
संभव सुखाचा भाग्यवंत कोणी । वरितां या जनीम अद्यापीही ॥२॥
शिशुपालादींचा गर्व हरावया । आणिली या ठायां केवळ तुज ॥३॥
आतां परतूनि धाडण्या मी सिध्द । आत्मानंदी धुंद सर्वदा मी ॥४॥
स्त्री-पुत्र-धनाचा मज नसे लोभ । साक्षी मी अलिप्त दीपासम ॥५॥
यास्तव सुंदरी, करुनि विचार । ठरवीं साचार निश्चयातें ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसा उपरोध । करुनि गोविंद स्वस्थ राही ॥७॥
॥७२०॥
निवेदिती शुक राया, याचिवेळीं । ऐसें कां वनमाळी म्हणसी, वदे ॥१॥
ऐकें तरी, येई रुक्मिणीच्या मनीं । तदा मीचि जनीं प्रभुसीप्रिय ॥२॥
बाह्मात्कारी प्रेम करी इतरांसी । आवडती मीचि एक तया ॥३॥
ज्ञात्याचीही बुध्दी ऐश्वर्यानें भ्रष्ट । होई हेंचि स्पष्ट दिसे येणें ॥४॥
सर्वदा कृष्नाच्या सन्नीध असूनि । भ्रमली रुक्मिणी अहंभावें ॥५॥
यास्तव श्रेष्ठत्व ईश्वराचें नित्य । चिंतावें मनांत सद्भक्तांनीं ॥६॥
वासुदेव म्हणे अहंभाव कोणा । नाडील कळेना कवण्यावेळीं ॥७॥
॥७२१॥
अप्रिय भाषण ऐकूनि पतीचें । कंप रुक्मिणीतें सुटला बहु ॥१॥
सद्गदित कंठ जाहला तियेचा । नेत्रीं अश्रुधारा वाहताती ॥२॥
चिंतासागरांत बुडूनि ते गेली । शुध्दी न राहिली देहाचीही ॥३॥
विंझुणा हातीचा गळूनियां गेला । कृशत्व तियेला येई क्षणीं ॥४॥
रत्नकंकणेंही गळली हातीचीं । कोसळे भूमीसी कदलीसम ॥५॥
सैल होऊनियां वेणी अस्ताव्यस्त । कृष्ण मृदुकेश होती क्षणी ॥६॥
वासुदेव म्हणे श्रीकृष्ण सांवळा । पाहुनि द्रवला अंतरांत ॥७॥
॥७२२॥
चतुर्भुज रुप तत्काळ घेऊनि । मंचक त्यजूनि रुक्मिणीतें ॥१॥
सावध करुनि निजकरें नेत्र । पुसूनियां दृढ ह्र्दयीं धरी ॥२॥
दु:खाश्रुसिक्त ते पुशी वक्षस्थल । बोलला मधुर शब्दें तिज ॥३॥
प्रिये, दु:ख तुज द्यावें हे न मनीं । ऐकावी त्वद्वाणी कोपाकुल ॥४॥
हेचि मम इच्छा जाणावी सर्वथा । प्रणयकोधें तुझा अधर स्फुरे ॥५॥
आरक्तचंचल होवोत हे नेत्र । भ्रुकुटी या वक्र विस्तारोत ॥६॥
मग ती पहावी शोभा हेंचि मनीं । होतें तें या क्षणीं सिध्द झालें ॥७॥
वासुदेव म्हणे विनोदें श्रीकृष्ण । बोलला वचन पुढती ऐका ॥८॥
॥७२३॥
लाभ काय ऐसें म्हणून नको येणें । प्रिये मद्वचनें बोध घेई ॥१॥
गृहस्थाश्रमींच्या सुखाचा विचार । करितां साचार ध्यानीं येई ॥२॥
नर्मविनोद जो स्त्रियांच्यासमेत । तेंचि एक सौख्य, इतर दु:ख ॥३॥
यास्तव बोललों सत्य न तें मानीं । खेद हा त्यजूनि हांसे प्रिये ॥४॥
राया, अभिप्राय कळतां कृष्णाचा । खेद रुक्मिणीचा सर्व गेला ॥५॥
सलज्ज सुहास्ययुक्त ती कटाक्ष । फेंकूनि प्रभूस अवलोकी तैं ॥६॥
वासुदेव म्हणे बोले जैं रुक्मिणी । आतां तें ऐकूनि सौख्य पावा ॥७॥
॥७२४॥
सतचितसुखरुपा देवा, आत्मारामा । ऐश्वर्यनिधाना सकलाधारा ॥१॥
कोठें तूं, मी कोठें, कामीजनप्रिय । त्रिगुण स्वभाव अशाश्वत ॥२॥
चिन्मया सकल राजांचे तूं मूळ । सागरी निश्वळ वास तुझा ॥३॥
ऐश्वर्यमत्तांसी रुचे न त्वद्भक्ति । दरिद्रि, विरागी भक्त तव ॥४॥
सेवकही तव इच्छिती न राज्य । तुजलागी पाड काय त्याचा ॥५॥
वासुदेव म्हणी एकेका प्रश्नाचें । उत्तर आनंदें देई देवी ॥६॥
॥७२५॥
स्वानंदनिमग्ना, नारदोक्त स्तुति । निश्वयें अद्यापि सत्य वाटे ॥१॥
आत्मस्वरुपा तूं भक्तां उद्धारक । यास्तवचि तुज वरिलें प्रेमें ॥२॥
लवही न माझा प्रमाद या कामी । राज्यही त्यजूनि भजती ज्ञाते ॥३॥
पृथु, भरतादि लीन ते तुझ्यांत । कृपेनें तुझ्याच जाणतें हें ॥४॥
वरुनि तुजसी लाभलें जे हित । अन्यत्र कोठेंच मिळतें न तें ॥५॥
प्रियकरा, राजे कथिलेसी तूं जे । गर्दभ स्थियांचे जाहले ते ॥६॥
वासुदेव म्हणे लंपटांची स्थिति । कथिते कृष्णासी भीमकन्या ॥७॥
॥७२६॥
वृषभ ते क्लेश भोगिती सर्वदा । अवमान त्यांचा श्वानासम ॥१॥
गृह-दारासक्त मार्जार, हिंसक । काबाडी न मज वरण्या योग्य ॥२॥
हतभागिनी ती वरील तयांसी । मूढ अल्पमति, कंथितें स्पष्ट ॥३॥
त्वचा, श्मश्रु, लोम, नख, केशादिक । भासती सुरेख परी बाह्य ॥४॥
कफ, पित्त, विष्ठा, मूत्र, अंतर्भागीं । सुंदर तयांसी म्हणे कोण ॥५॥
शवचि ते, तुज आसक्ति न कांही । म्हणसी परी नाही न्यून मज ॥६॥
रजोगुणाश्रय करिसी तूं यदा । कृपादृष्टि तदा लाभे मज ॥७॥
वासुदेव म्हणे सर्व कामपूर्ती - होई, म्हणे देवी अवलोकनें ॥८॥
॥७२७॥
रुक्मिणीसी तदा कृष्ण । ऐका बोले जें वचन ॥१॥
साध्वी, ऐकूनि हे शब्द । बहु वाटला आनंद ॥२॥
यास्तवचि केली चेष्टा । कस पाहिला प्रेमाचा ॥३॥
एकनिष्ठ तव प्रेम । झाला निश्चय हे जाण ॥४॥
मजवरी करणें प्रीति । श्रेयस्कर हें सर्वांसी ॥५॥
हेंचि मोक्षाचें साधन । नसो कामनिक प्रेम ॥६॥
तोषवूनि मजप्रति । वैभव जे इच्छिताती ॥७॥
मंदभाग्य ते जाणावे । मज भजसी तूं भावें ॥८॥
विरळचि ऐशा स्त्रिया । प्रेम निर्व्याज हें जयां ॥९॥
वासुदेव म्हणे कृष्ण । सकल सौख्याचें निधान ॥१०॥
॥७२८॥
प्रिये, विरुप मी केलें त्या रुक्मीसी । परी तव शांति ढळली नाहीं \।१॥
रामातेंही तेणे वाटालें आश्चर्य । प्रेम तव थोर ऐसें स्पष्ट ॥२॥
पाठवूनि विप्रा आराधिले मज । प्राणही पणास लावूनियां ॥३॥
तेणें हे रुक्मिणी, जाहलों मी ऋणि । मुक्त ऋणांतूनि कैसा होऊं ॥४॥
परीक्षिताप्रति निवेदिती शुक । यापरी विनोद श्रीहरीचा ॥५॥
सामान्यांसमचि करुनि हा क्रीडा । रुक्मिणीसी सदा सौख्य देई ॥६॥
अन्य स्त्रियांच्याही मंदिरीं श्रीहरी । विविध रुपें करी क्रीडा बहु ॥७॥
वासुदेव म्हणे कौतुक हरीचें । भक्तीवीण कैसें ध्यानी येई ॥८॥