॥८९६॥
रायालागीं शुक कथिती श्रीकृष्ण । आरंभी प्रयाण कुरक्षेत्रीं ॥१॥
सूर्यग्रहणाची साधूनि पर्वणी । यादव घेऊनि समवेत ॥२॥
ग्रहणीं त्य तम कल्पात्नासमान । पडेल, वचन ज्योतिषांचें ॥३॥
योग तो साधाया सर्व नृपवृंद । स्यमंतपंचक गांठिताती ॥४॥
स्यमंतपंचक महा पुण्यक्षेत्र । रुधिराचें र्हद नव तेथें ॥५॥
भरिले रामानेम क्षत्रियां वधूनि । ईश्वरचि जनीं परशुराम ॥६॥
वासुदेव म्हणे राजवधपाप । अल्पही नव्हतेंच परशुरामा ॥७॥
॥८९७॥
लोकशिक्षणार्थ स्यमंतपंचकीं । यज्ञ बहु करी परशुराम ॥१॥
पापमुक्त ऐसा जाहला सत्कर्मे । क्षेत्र ऐसें जाणें श्रेष्ठचि तें ॥२॥
कुरुक्षेत्री जन जमले अपार । यादवही थोर थोर आले ॥३॥
श्रीकृष्ण, बलराम, अक्रूर, वसुदेव, । प्रद्युम्न, अहुक, गद, सांब ॥४॥
द्वारवतीमाजी सुचंद्र, सारण । शुक तेंवी जाण कृतवर्मा ॥५॥
रक्षणार्थ हर्षे राहियेले होते । स्त्रियाही क्षेत्रातें गेल्या होत्या ॥६॥
चतुरंग देवसेनेसम सेना । शोभ्वी त्या स्थाना यादवांची ॥७॥
नवर्हदीं स्नान करुनि यादव । दानेही अपूर्व करिती तेथें ॥८॥
वासुदेव म्हणे घेऊनि विप्राज्ञा । राहिले त्या स्थाना शिबिरांमाजी ॥९॥
॥८९८॥
वृक्षछायेमाजी बांधूनि शिबिरें । आनंदे राहिले काहीं दिन ॥१॥
मत्स्य, उशीनर, कौसल्य, विदर्भ- । देशींच्या नृपांस भेट देती ॥२॥
वैरीपक्षीयही मुत्सद्यांशीं सख्य । करिती महत्व ओळखूनि ॥३॥
नंद-यशोदादि गोप-गोपिकाही । भेटती त्या ठाई राम- कृष्णां ॥४॥
प्रेमाश्रुंचा पूर लोटे त्या समयीं । पूर्वस्मृति होई सकलांप्रति ॥५॥
सद्गदित कंठें दाटले रोमांच । आलिगिती एकमेकां सर्व ॥६॥
वासुदेव म्हणे यादवस्तियाही । भेटल्या गोपिसीं अत्यानंदें ॥७॥
॥८९९॥
पृथा-यादवांची होई मग भेट । माता-पिता आप्त पाही कुंती ॥१॥
पुत्र-पौतही ते पाहूनि कृष्णाचे । विसरे स्वदु:खें आनंदे त्या ॥२॥
वसुदेवाप्रति बोले तदा कुंती । कांरे तुज स्मृति जाहली न ॥३॥
ओढवतां दैव कोणी न कोणाचा । सिध्दांत हा साचा सत्य वाटे ॥४॥
वसुदेव म्हणे भगिनीवो, ईश । ठेवील तैसेंच वसणें प्राप्त ॥५॥
कंसाच्या बंदीत पाडिले तेणेंचि । आणियेली स्थिति तेणेंचि ही ॥६॥
वासुदेव म्हणे ईश्वराधीन जे । तयांसीच शोभे ऐसी वाणी ॥७॥
॥९००॥
निवेदिती शुक भीष्मद्रोणादिक । गांधारी धृतराष्ट्र पुत्रांसवें ॥१॥
सस्त्रीक पांडव, संजय, विदुर । कूप, कुंतीभोज, विराटादि ॥२॥
भीष्मक, नग्नजित्, पुरुजित् द्रुपद । शल्य, काशिराज, धृतकेतु ॥३॥
दमघोष, युधामन्यु, विशालाक्ष । मैथिल, केकय , मद्रपति ॥४॥
सुशर्मा, बाल्हिकाआदि सर्व नृप । श्रीकृष्णाची भेट सुखें घेती ॥५॥
वासुदेव म्हणे स्वागत तयांचें । करिती आनंदे राम-कृष्ण ॥६॥
॥९०१॥
उग्रसेनाप्रति तदा भीष्मादिक । म्हणती कृतार्थ राजा तुंचि ॥१॥
भोजपते, योगियांही जो दुर्लभ । सर्वदा समीप तोचि तुझ्या ॥२॥
श्रीकृष्णयशाचा अपूर्व महिमा । पावनत्व वेदां वर्णनें त्या ॥३॥
विष्णुपदस्पर्शे गंगा पापहारी । कृपेनें धरित्री सकलाधार ॥४॥
राया, भोगूनिही विषय तुह्मांसी । लाभेल सद्गति निश्चय हा ॥५॥
वासुदेव म्हणे भगवत्सान्निध्यें । व्यवहार ज्यांचे, कृतार्थ ते ॥६॥
॥९०२॥
गोपीसवें नंद, कृष्ण त्या शिबिती । वास्तव्य तैं करी अत्यानंदे ॥१॥
पाहूनि त्यातें कंसदत्तक्लेश । आठवी वसुदेव सकलही ते ॥२॥
कृष्ण-बलराम होती सद्गदित । पाहुनि नंदास मातेसवें ॥३॥
वंदितां तयांसी यशोदा त्या अंकीं । घेऊनियां अंगी फिरवी हस्त ॥४॥
रोहिणी, देवकी, यशोदेसी प्रेमें । देती अत्यानंदे आलिंगन ॥५॥
वासुदेव म्हणे सद्गदकंठानें । बोलती प्रेमानें तिजलागीं त्या ॥६॥
॥९०३॥
यशोदे, तुझे उपकार फिटती न ऐसे ॥
लाळिलें -पाळिलें प्रेमे तूं राम-कृष्णांते ॥१॥
लाड पुरवूनि त्यांते प्रेमे रक्षिलेंसी ॥
समभाव ऐसा जयां, तयां लाभे कीर्ति ॥२॥
कृश्णातें पहाया गोपी होत्या उत्कंठित ॥
नित्य कृष्णास्तव देती विरंचीते दोष ॥३॥
पांपण्या नेत्रांच्या विघ्न आणिती दर्शना ॥
नित्यचि हें ऐशापरी बोलती ललना ॥४॥
निवेदिती शुक राया, गोपीसम प्रेम ॥
कदा कोणाचेंही कोठें दिसेनाचि जाण ॥५॥
वासुदेव म्हणे गोपी पाहूनि कृष्णासी ॥
कृष्णरुपामाजी क्षणी एकरुप होती ॥६॥
॥९०४॥
ओळखूनि ब्रह्मभाव । भेटे एकांती त्या देव ॥१॥
कुशल पुसूनि तयांतें । म्हणे स्मरतां कां मातें ॥२॥
मानूनियां कृतघ्नता । दोष मज लावितां कां ॥३॥
मैंत्रिणीनों, प्राणिमात्र । नित्य ईश्वराअंकित ॥४॥
त्यांचा संयोग-वियोग । ईश्वराची इच्छा एक ॥५॥
माझ्या वियोगेंचि ऐसी । श्रेष्ठ अवस्था तुमची ॥६॥
सामान्यही भक्ता मुक्ति । लाभे कां न ते तुह्मांसी ॥७॥
सर्वब्यापक मी एक । अन्य सकल भौतिक ॥८॥
सर्वसाक्षी मीचि आत्मा । तया उपाधि बाधेना ॥९॥
वासुदेव म्हणे कृष्ण । वदे स्मरा हे वचन ॥१०॥
॥९०५॥
ऐकूनि तो बोध प्रार्थिती गोपिका । ऐकें यदुनाथा विनती एक ॥१॥
कृष्णा, ज्या पदाच्या ध्यानांत निमग्न । असताती जाण योगीश्रेष्ठ ॥२॥
चरण ते नित्य स्थापूनि ह्र्दयी । व्यावृत्ति करावी संसाराची ॥३॥
ध्यानभ्रष्ट कदा न होवोचि मन । ऐसी कृपा पूर्ण असूं द्यावी ॥४॥
वासुदेव म्हणे प्रार्थना गोपींची । नित्य राहो स्मृति देवा, तव ॥५॥