मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ६८ वा

स्कंध १० वा - अध्याय ६८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥७८१॥
दुर्योधनकन्या लक्ष्मणा नामक । स्वयंवर श्रेष्ठ होतें तिचें ॥१॥
राजपुत्र बहु पातले त्याठाई । कृष्णपुत्र जाई सांब तेथें ॥२॥
बलात्कारें तेणें हरिलें कन्येसी । क्रोध्द कौरवांसी तदा येई ॥३॥
म्हणती ते सांव अविचारभ्रष्ट । बंधनचि इष्ट वाटे त्यासी ॥४॥
उग्रसेनादिक पावतील क्रोध । नसे आह्मां भय लवही त्यांचे ॥५॥
सर्वथा ते नित्य आमुच्या आधीन । राज्याधिकार न तयांलागीं ॥६॥
वासुदेव म्हणी कौरवांचा भाव । येतांचि यादव बांधूं तयां ॥७॥

॥७८२॥
भीष्मही या कृत्या देती अनुमोदन । युध्दार्थ स्यंदन हांकिताती ॥१॥
महारथी सांव केवळ दृष्टीनें । कांपवी वीरांतें क्रोधावेशें ॥२॥
भीष्मादिक वीरषटुक तैं धांवलें । विध्द तयां केलें कृष्णपुत्रें ॥३॥
भीषादिही तदा प्रशंसा करिती । अधर्मे लढती पुढती वीर ॥४॥
अनेकांनीं अंती एकासी बांधिलें । नगरीं आणिलें कन्येसवें ॥५॥
वासुदेव म्हणे वृत्त हे समस्त । कळवी नारद उग्रसेना ॥६॥

॥७८३॥
ऐकूनि तें उग्रसेन । सिध्द करा म्हणे सैन्य ॥१॥
बळिराम साम इच्छी । म्हणी कलह टळावाचि ॥२॥
ज्ञानवृध्द सचिवांसवें । समालागीं जाई स्वयें ॥३॥
नगरासमीप पातला । पुढती उध्दव धाडिला ॥४॥
भीष्मादिकांसी वंदूनि । वदला राम उपवनीं ।\५॥
पातलासे भेटीस्तव । हर्ष पावले कौरव ॥६॥
सत्कारुनि उध्दवासी । गेले रामाच्या भेटीसी ॥७॥
वासुदेव म्हणे राम । सजला करावया साम ॥८॥

॥७८४॥
म्हणे उग्रसेननृपाचा मी दूत । ऐकूनियां वृत्त अधर्म्य हें ॥१॥
कलह न व्हावा हेचि मनीं इच्छा । धरुनि, अपराधा साहियेलें ॥२॥
यास्तव सांबासी सोडावें त्वरित । परी कौरवांस रुचले न तें ॥३॥
सद्‍बुध्दि दुष्टांसी केंवी ते रुचावी । क्रोध तया येई भाषणे त्या ॥४॥
निर्भर्त्सना बहु आरंभिली त्यांनीं । तो न वचनी राहियेला ॥५॥
पाईच्या वहाणा म्हणती यादव । मस्तकी ते पाय अद्य देती ॥६॥
वासुदेव म्हणे समयीं दुष्टांची । व्यक्त होई मति सर्वकाल ॥७॥

॥७८५॥
कुंतीविवाहें हां संबंध आमुचा । येई यादवांचा आप्तभावें ॥१॥
पंक्तिभोजनही नव्हतेंचि पूर्वी । लाभली पदवी आम्हांयोगे ॥२॥
राज्यही आम्हीचि अर्पिलें तयांसी । अधिकार त्यांसी राज्याचा न ॥३॥
दुर्लक्षें आमुच्या तयां राजचिन्हें । सर्पासम त्यांचे कृत्य अद्य ॥४॥
शिरोधार्य आज्ञा आमुची जयांतें । क्षुद्र आह्मांसी ते करिती आज्ञा ।\५॥
सिंहहस्तगत वस्तु इच्छी मेष । तैसीच हे मूर्ख करिती क्रिया ॥६॥
कौरव जिंकणें दोवांही न शक्य । काय हे सांबास मागताती ॥७॥
वासुदेव म्हणे मूढ तो मूढचि । साम न तयासी श्रेष्ठ वाटे ॥८॥

॥७८६॥
बोलूनि हे जाती कौरव स्वस्थानी । क्रोधाकुल मनीं बलराम ॥१॥
म्हणे या मूढांसी दंडणेंचि योग्य । जाहले उन्मत्त स्पष्ट भासे ॥२॥
वडिलार्जित धनें मूढांसी उन्माद । साम न तयांस रुचे कदा ॥३॥
आवरुनि कृष्णादिकां आलो सामा । ऐसी निर्भर्त्सना ऐकावया ॥४॥
काय न कृष्णासी राज्याचा अधिकार । इंद्रादि अमर दास ज्याचे ॥५॥
काय आह्मीं यांच्या पाईच्या वहाणा । बल या मूढांना दिसो अद्य ॥६॥
वासुदेव म्हणे बोलुनि यापरी । क्रोधें हलधारी उचली हल ॥७॥

॥७८७॥
दक्षिण तटाच्या अधोभागीं हल । रोऊनि नगर उचली राम ॥१॥
पालथें कराया यदा ओढूं लागे । तदा होती जागे महामूढ ॥२॥
गंगेमाजी आतां बुडेल नगरीं । पाहूनि सत्वरी धांव घेती ॥३॥
लक्ष्मणेसमेत घेऊनि सांबासी । बलरामाप्रति शरण आले ॥४॥
दांतीं धरुनियां तृण त्या स्तविती । घेसी शिरोभागीं म्हणती पृथ्वी ॥५॥
परोपरी अंती प्रार्थूनियां रामा। धरुनि चरणां नम्र होती ॥६॥
वासुदेव म्हणे तदा बलराम । दयाळु होऊन शांत झाला ॥७॥

॥७८८॥
सांबालागीं कन्येसवें बहु धन । अर्पी दुर्योधन अत्यानंदे ॥१॥
द्वादश शर तो अर्पी तया गज । अश्व सव्वालक्ष सुलक्षणी ॥२॥
षट‍सहस्त्र रथ, दासीही सहस्त्र । अर्पी सालंकार सेवेप्रति ॥३॥
बळिराम ऐशा घेऊनि सांबासी । येई द्वारकेसी अत्यानंदे ॥४॥
सकल वृत्तांत कथूनि यादवां । उग्रसेना केला नमस्कार ॥५॥
ओढिलें ते पुर अद्यापि तैसेचि । उंच उत्तरेसी गंगातीरी ॥६॥
वासुदेव म्हणे लीला या अतर्क्य । सामान्यासी सत्य दिसतीचिना ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP