मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ६९ वा

स्कंध १० वा - अध्याय ६९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥७८९॥
परिक्षिताप्रति निवेदिती शुक । इच्छा नारदास एक होई ॥१॥
संसार कृष्णाचा कैसा होई पाहू । द्वारकेसी जाऊं म्हणूनि आला ॥२॥
एकाचि देहानें अनेक स्त्रियांसी । वागवितो केंवी पाहूं कृष्ण ॥३॥
द्वारकेसन्निध पाहिली उद्यानें । फुललीं अंबुजें विविध तेथें ॥४॥
लक्षावधि राजमंदिरें पाहिली । रत्न-सुवर्णाचीं पात्रें त्यांत ॥५॥
रौप्य-स्फटिकाची भूमि त्या मंदिरी । शोभली नगरी राजमार्गे ॥६॥
वासुदेव म्हणे चौक, सभा पेठा, । भोजन-शाळांचा डौल बहु ॥७॥

॥७९०॥
देवालयें बहु पाहूनि आनंद । व्यवस्था उत्कृष्ट तयांमाजी ॥१॥
ध्वजपताकांची छाया सर्व ठायीं । धन्यवाद घेई विश्वकर्मा ॥२॥
मंदिरें स्त्रियांची पाहिली नारदें । नानाविध रत्ने अंतर्बाह्य ॥३॥
भोगसाधनांची पाहूनि समृद्धी । विस्मय अंतरी नारदाच्या ॥४॥
गृहस्थ आश्रम पहावा कृष्णाचा । हाचि मनीं होता हेतु त्याच्या ॥५॥
वासुदेव म्हणे यास्तव रुक्मिणी - । सदनीं जाऊनि पाही मुनि ॥६॥

॥७९१॥
प्रवाळांचे स्तंभ वैडूर्य तुळया । भित्ती भूमीसी त्या इंद्रनील ॥१॥
रम्य छतावरी मौक्तिकझालरी । पीठें विराजलीं हस्तिदंती ॥२॥
मणिमय बहु पर्यक शोभती । सुभूषित दासी-दास दक्ष ॥३॥
रत्नदीपकांति फांकली नभांत । सुवास सर्वत्र चंदनाचा ॥४॥
गवाक्षीं मयूर, धूपधूम्रा मेघ- । मानूनियां, नृत्य करिती हर्षे ॥५॥
दासीसवें पट्टराणी कृष्णावरी । ढाळिते चवरी पाही मुनि ॥६॥
वासुदेव म्हणे पाहूनि मुनीसी । जोडूनि करांसी उठला कृष्ण ॥७॥

॥७९२॥
बैसवूनि उच्चस्थानी । प्रेमे चरण प्रक्षाळूनि ॥१॥
तीर्थ मस्तकी घेतलें । रहस्य हें ध्यानी घ्यावें ॥२॥
ब्राह्मणाभिमानी कृष्ण । देई जगा हें शिक्षण ॥३॥
यथाविधी त्या पूजूनि । बोले सुमधुर वाणी ॥४॥
येणें कोठूनि जाहलें । कार्य काय निवेदावें ॥५॥
वासुदेव म्हणे मुनि । वदले संतोष पावूनि ॥६॥

॥७९३॥
साधुजनमैत्री, दुष्टांसी शासन । लोकनाथा, जाण ब्रीद तव ॥१॥
विश्वकल्याणार्थ तव अवतार । संसारांत धीर सकलां तूंचि ॥२॥
विरंचीही नित्य स्मरतो त्वत्पाद । दर्शन ते अद्य मजलागीं ॥३॥
निरंतर याचि पदांचे स्मरण । राहो हेंच दान देई मज ॥४॥
वासुदेव म्हणे बोलुनियां ऐसें । सोडी त्या स्थळातें मुनिराज ॥५॥

॥७९४॥
अचिंत्य सामर्थ्य पहाया हरीचें । अन्य मंदिरातें जाई मुनि ॥१॥
पाही तयास्थळीं प्रियेसमवेत । क्रीडतो अच्युत मित्रासवें ॥२॥
पाहूनि नारदा पूर्वीसम कृष्ण । आदरें उठून नमन करी ॥३॥
रुक्मिणीमंदिरीं जणुं न पाहिलें । ऐसेंचि दाविलें नारदासी ॥४॥
सत्कारुनि मग प्रार्थी मुनीप्रती । सेवा व्हावी कैसी मुनिश्रेष्ठा ॥५॥
विषयनिमग्न असें मी सर्वदा । स्वीकारुनि सेवा धन्य करा ॥६॥
वासुदेव म्हणे विस्मयें नारद । उठूनि तैसेच पुढती जाती ॥७॥

॥७९५॥
अन्य मंदिरांत कृष्ण बालकांस । खेळवी, नारद ऐसें पाहे ॥१॥
अन्यत्र तो पाही कृष्ण करी स्नान । चाललें हवन अन्यस्थळीं ॥२॥
पंचमहायज्ञ, करीतसे कोठें । भोजन विप्रांतें कोठें अर्पी ॥३॥
कोठें संध्या, कोठें जप गायत्रीचा । कोठें अंबारीचा थाट चाले ॥४॥
रथावरी कोठें चढावया सिध्द । पर्यकीं निद्रिस्थ दिसे कोठें ॥५॥
सूत-मागधादि कोठें त्या स्तविती । कोठें गुजगोष्टी उद्धवाच्या ॥६॥
वासुदेव म्हणे वारांगनानृत्य - । अवलोकनांत दंग कोठें ॥७॥

॥७९६॥
कोठें जलक्रीडा कोठें धेनुदानें । इतिहास-पुराणे श्रवण कोठें ॥१॥
स्त्रियांसी विनोद कोठें धर्माचार । विलासोपभोग द्रव्यार्जन ॥२॥
परब्रह्मचिंतनांत कोठें मग्न । सद्‍गुरुपूजन कोठें करी ॥३॥
कलह, सामही कोठें दिसे, त्याचा । भक्तजनचिंता करी कोठें ॥४॥
जुळवी विवाह, कन्येप्रति कोठें - । धाडी सासु‍र्‍यातें समजावूनि ॥५॥
दिवाळसणासी आणावा जामात । ऐसा करी बेत कवण्याठाई ॥६॥
वासुदेव म्हणे कोठें जातकर्म । कोठें करी यज्ञ श्रध्दायुक्त ॥७॥

॥७९७॥
कूप-तडागादि बांधी कोण्याठाई । निर्मी उद्यानेंही कोठें मठ ॥१॥
मृगयेंत मग्न ऐसा दिसे कोठें । गुप्तहेर कोठें नवलकारी ॥२॥
पाहूनि नारद ऐशा बहुलीला । विस्मित जाहला अंतरांत ॥३॥
म्हणे देवा, नरदेहसंपादणी । पाहूनियां मनी मोह पडे ॥४॥
यास्तव निरोप देई आतां मज । इच्छितों चरित्र नित्य गावें ॥५॥
पुरवावी इच्छा हेचि आतां मम । करी त्या नमन वासुदेव ॥६॥

॥७९८॥
नारदासी तदा बोलले श्रीकृष्ण । शास्त्रनिवेदन करितों स्वयें ॥१॥
यास्तव तैसेंचि वागणेंही प्राप्त । प्रक्षाळिलें पाद तेणे तव ॥२॥
खेद न तयाचा मानावा नारदा । धर्मचि हा माझा आश्रमीं या ॥३॥
एकचि अनेक, अनेकी हा एक । पाहूनि कौतुक नारदासी ॥४॥
वासुदेव म्हणे करीत स्मरण । द्वारका सोडून मुनि जाई ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP