॥९५४॥
परीक्षिति म्हणे शब्दमय श्रुति । वर्णू न शकती परब्रह्मा ॥१॥
मुख्या, लक्षणा, तैं गौणी ऐशा तीन । म्हणती सज्जन शब्दवृत्ति ॥२॥
यौगी, व्यजना त्या होती अंतर्भूत । वरील तिहीत, नसती भिन्न ॥३॥
ऐशा तीन वृत्तीव्यतिरिक्त कांहीं । वर्णवे न पाहीं श्रुतीतेहीं ॥४॥
वासुदेव म्हणे वृत्तीचें स्वरुप । ध्यानी घ्यावें स्पष्ट वर्णिले ते ॥५॥
॥९५५॥
स्वाभाविक शक्ति तेचि मुख्या वृत्ति । अर्थ, उच्चरेंचि ध्यानी येई ॥१॥
गो शब्दोच्चारेचि होई अर्थबोध । ’ गाय गाय ’ शब्द पुनरुच्चारें ॥२॥
होतसे, तो अर्थ न कळी सर्वांसी । मुख्या न ते वृत्ति ध्यानी असो ॥३॥
कमंडलु, देवदत्तादि संकेत । रुढ विशिष्टार्थ दर्शविती ॥४॥
वासुदेव म्हणे ऐसी मुख्यावृत्ति । संकेत वा रुढी मूल तिज ॥५॥
॥९५६॥
मुख्यार्थ सोडूनि अन्य अर्थ दावी । ’ लक्षणा ’ गणावी वृत्ति तोचि ॥१॥
’ गंगेवरी गृह ’ वाक्यांत या तीर । अर्थ अभिप्रेत ’ गंगा ’ शब्दें ॥२॥
मुख्यार्थाधारेंचि अर्थ लक्षणेचा । वासुदेव आतां तृतीय कथी ॥३॥
॥९५७॥
गुणांचा आरोप करुनि अन्यत्र । दावीतसे अर्थ ’ गौणीवृत्ति ’ ॥१॥
कल्पनाचि मात्र असे ते जाणावें । पूर्वोक्तचि हीतें गणतां येई ॥२॥
’ देवदत्त सिंह ’ म्हणतां सिंहाचे । अभिप्रेत येथें असती गुण ॥३॥
वासुदेव म्हणे ऐसी गौणीवृत्ति । साह्य शब्दार्थासी होई बहु ॥४॥
॥९५८॥
प्रकृतिप्रत्ययें होई अर्थबोध । ’ यौगी ’ वृत्ति तेच म्हणती ज्ञाते ॥१॥
पंकांत जयासी जन्म तें पंकज । दृष्टांत हा एथ ध्यानी घ्यावा ॥२॥
गर्भित अर्थासी ’ व्यंजना ’ दाविते । संबंध न तेथे मुख्यार्थाचा ॥३॥
’ पराशरशिष्य ’ ज्ञान तैं समत्व । ब्रह्मनिष्ठा स्पष्ट दावी जनी ॥४॥
स्वतंत्र याहुनि वृत्ति नच अन्य । संकेत वा गुण दाविती या ॥५॥
यास्तव सगुण तेंचि कथी शब्द । निर्गुण तयास कथितांनये ॥६॥
मग श्रुति केंवी वर्णील ब्रह्मासी । शंका हे रायाची ध्यानीं घ्यावी ॥७॥
वासुदेव म्हणे शुकमहामुनि । उत्तर चिंतूनि देति ऐका ॥८॥
॥९५९॥
निवेदिती शुक राया, परब्रह्म । मायातीत जाण निर्गूणत्वें ॥१॥
कार्यकारणही नव्हेचि तें, तरी । वर्णवे न परी न म्हणे वेदां ॥२॥
राया, ईश्वराची लीला ते विचित्र । इच्छेनेंचि सर्व करी खेळ ॥३॥
कोणीही नसेचि अज्ञापिता तया । विस्तारी या विश्वा आंवरी तैं ॥४॥
इच्छितांचि सृष्टी अर्पी बुध्यादिक । लाभती पुरुषार्थ ऐसें करी ॥५॥
शब्द -स्पर्शादि तैं स्वर्गही भोगावे । पुनरपि यावें स्वरुपीं इच्छी ॥६॥
धर्म- अर्थादिक चतुष्पदी श्रेणी । यास्तवचि निर्मी ईश स्वयें ॥७॥
वासुदेव म्हणे खेळ ह प्रभूचा । अभिप्राय ऐसा ध्यानी घ्यावा ॥८॥
॥९६०॥
श्रुत्यर्थाचे कोणी करितां चिंतन । निर्गूणत्व जाण सिध्द होई ॥१॥
उत्तानार्थत्वेंचि सगुण वर्णिले । गून न स्पर्शले परब्रह्मा ॥२॥
तात्पर्यवृत्तीनें निरुपाधिक तें । स्पष्टपणें येतें ऐसें ध्यानीं ॥३॥
सर्वज्ञ तें ज्ञान अबाधित ज्याचें ज्ञान्मय ज्याचें तेंवी तप ॥४॥
सर्वव्यापी सर्व सत्ताधीश तेंचि । व्यापूनि पृथ्वीसी गुप्त असे ॥५॥
तया एकानेंचि इच्छिलें बहुत्व । द्र्ष्टा एक तेंच तेज निर्मी ॥६॥
सत्य, ज्ञानरुप, अनंत तें ब्रह्म । तूंही तेंचि जाण स्थूल-सूक्ष्म ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसी वेदवाक्यें । मुनि अर्थरुपें कथिती नृपा ॥८॥
॥९६१॥
राया, लक्षणा ते द्विविध जाणावी । ’ जहत् ’ गंगेवरी घोष तेचि ॥१॥
प्रवाहार्थत्यागें तीराचें ग्रहण । ’ प्राप्त झाले जाण भल्ल आतां ’ ॥२॥
एथ भल्लांसवें भल्लधारी येती । ’ अजहत् ’ स्वरुपी लक्षणा ते ॥३॥
शब्दार्थासी लागे ऐसें तारतम्य । तात्पर्य जाणून लक्षणा ते ॥४॥
निर्विकार मायातीत ब्रह्म ऐसें । उपरोक्त श्रुतींचें प्रतिपादन ॥५॥
परंपराही ते, ’ शब्दब्रह्म ’ वेद । नाही मीचि अद्य कथीं ऐसें ॥६॥
व्यर्थ शुष्क तर्के लाभ नसे कांही । अश्रध्दाचि येई पदरी एक ॥७॥
श्रुतिवाक्यीं श्रध्दा जयाप्रति तोचि । परब्रह्मरुपी लीन होई ॥८॥
वासुदेव म्हणे सिध्दांतबोधार्थ । कथिती संवाद एक मुनि ॥९॥
॥९६२॥
एकदां नारद बदरिकावनी । नारायणध्यानीं मग्न होती ॥१॥
सन्निध तयाच्या कलाप नामक । ग्राम असे एक पुण्यस्थळ ॥२॥
तया ग्रामीं बहु ऋषींची वसती । आश्रमीं ते येती दर्शनार्थ ॥३॥
राया, तैं नारद प्रशन करी हात । नारायण त्यास वदला तदा ॥४॥
जनर्लोकी मुने, परा ब्रह्मसत्र । जाहलें तैं पुत्र विरंचीचे ॥५॥
सनकादिक ते ऋषीही त्या स्थानी । तदा श्वेतद्वीपीं होतासी तूं ॥६॥
वासुदेव म्हणे कथी नारायण । देऊनि तें ध्यान परिसा आतां ॥७॥
॥९६३॥
सनक तो एक सनंदन दुजा । कुमात तो तिजा श्रेष्ठ मुनि ॥१॥
सनत्सुजात तो जाणावा चतुर्थ । विद्या-तपें एकरुप चौघे ॥२॥
आपपरभाव तेंवी औदासीन्य । नव्हतेंचि जाण तयांप्रति ॥३॥
यास्तव विशुध्द शाश्वत सिध्दांत । अमृतस्वरुप प्राप्त झाले ॥४॥
सकलही पात्र असूनि नियमें । सनंदन प्रेमें वचन बोले ॥५॥
ब्रह्मपर केंवी श्रुति हाचि प्रश्न । करिती त्या अन्य सुबोधार्थ ॥६॥
वासुदेव म्हणी सनंदन तदा । सुधामय शब्दां वदते झाले ॥७॥
॥९६४॥
सनकादिकांसी बोले सनंदन । पुरा स्वीकारुन योगमाया ॥१॥
ईश्वरें सकल विश्व हें निर्मिलें । मायेनेंचि केलें स्वरुपी लीन ॥२॥
सृष्टिविधायक शक्तीसवें निद्रा । स्वीकारुनि झाला ईश शांत ॥३॥
निद्रान्ती उत्पत्तिप्रसंगी श्रुतीनी । तयासी वर्णूनि जागें केलें ॥४॥
बंदीजन जेंवी गाऊनियां स्तुति । जागृत करिती नृपालागीं ॥५॥
वासुदेव म्हणे तैसीच हे कृति । आतां वेदस्तुति श्रवण करा ॥६॥
॥९६५॥ ( वेदस्तुति )
परात्पर प्रभो, तव जयजयकार । असो सर्वकाल अजिंक्य तूं ॥१॥
स्थावर-जंगमीं चिन्मय त्वद्रुप । आच्छन्न तें स्पष्ट मायागुणें ॥२॥
आनंदावाप्त्यर्थ नष्ट करी माया । नित्य अज्ञ जीवा भ्रमविते जी ॥३॥
जो जों गुणासक्ति तों तों अधोगति । ऐसी हे जीवासी छळी माया ॥४॥
नियंता तियेचा तूंचि एक देवा । अविचल ठेवा ऐश्वर्याचा ॥५॥
सामर्थ्यसंपन्न इच्छेनेंचि तव । सकल वैभव जोडीतोसी ॥६॥
कर्तुमकर्तुमन्यथा वा कर्तुम् । समर्थ एक तूं जगन्नाथा ॥७॥
वासुदेव म्हणे लौकिक सामर्थ्य । सकलही एक प्रभुचा अंश ॥८॥
॥९६६॥
आपुलें अज्ञान आपणचि नष्ट । करणें अशक्य जीवाप्रति ॥१॥
कारण, मर्यादा सामर्थ्यासी त्याच्या । आवश्यक कृपा तया तव ॥२॥
स्वतंत्र तूं सदा विकारविहीन । माया स्वीकारुन रमसी कदा ॥३॥
प्रमाण आह्मीचि सिध्दान्ता या श्रुति । वासुदेव कथी पुढती ऐका ॥४॥
॥९६७॥
बृहत ब्रह्मांडस्थ देवता इंद्रादि । वर्णितों आह्मींचि सर्वकाळ ॥१॥
साक्षात त्वद्रुपातें वर्णितों न आह्मीं । दोष देती जनी तेणें आह्मां ॥२॥
परी तो व्यर्थ हें विवेकें समजे । आधार तयातें तूंचि एक ॥३॥
भग्न होतां घट मृत्तिकाचि सत्य । तैसेंचि शाश्वत रुप तुझें ॥४॥
इंद्र-सूर्यादि ते सेवक-सेव्यही । निवेदितों पाहीं आह्मीं परी ॥५॥
प्रतिपाद्य त्याचें तूंचि विश्वमूर्ते । तुझ्याविण नसे कांहीं जगीं ॥६॥
इंद्रादिवर्ण्दन तुझेंचि तें देवा । पाषाण, मूत्तिका, भूमीचि जैं ॥७॥
वासुदेव म्हणे नाम-रुपें भेद । भासताती, एक पर्री वस्तु ॥८॥
॥९६८॥
हे मायाचालका, व्यापिसी तूं विश्व । मायानियंतृत्व तुझेठाई ॥१॥
यासत्व त्वत्कथासागरीं बुडतां । येई अलिप्तता सर्व कर्मी ॥२॥
गुणकथांचेंही इतुकें सामर्थ्य । जाणितां प्रत्यक्ष काय न्यून ॥३॥
राग-द्वेष तेंवी सुकृत दुष्कृत । करुनि विधूत, काळातेंही ॥४॥
लंघूनि ते भवबंधविनिर्मुक्त । होतील नसेच शंका कांही ॥५॥
तेणें बुध्दिमंतें दृढभक्तियोग । स्वीकारुनि, तुज स्मरणें इष्ट ॥६॥
चिंतितां तुजसी साफल्य जन्माचें । न घडतां ऐसें भस्त्रा श्वास ॥७॥
वासुदेव म्हणी वायु येतां जातां । भस्त्रेसी तयाचा लाभ काय ॥८॥
॥९६९॥
ईश्वरा, तुझ्याचि अनुग्रहें माया । गुणमय विश्वा उभारिते ॥१॥
यास्तव विषयानंदही कृपाचि । जाणुनि असावी कृतज्ञता ॥२॥
कार्यकारणचि मानूनि केवल । विस्मृति होईल जरी तव ॥३॥
तरी कृतघ्ना त्या माय़ीकही सौख्य । अंतरेल, श्रेष्ठ सौख्य दूर ॥४॥
वासुदेव म्हणे इह-परनाश । ईश्वरविमुख होतां घडे ॥५॥
॥९७०॥
अन्वयें सर्वत्र देवा, तव व्याप्ति । देहामाजी तूंचि पंचकोश ॥१॥
तेणें देह, प्राण, बुध्दि, चैतन्यही । नामें सकलही एक तव ॥२॥
काष्ठामाजी अग्नीसम विश्वान्वित । गूढ तुझे रुप अज्ञाप्रति ॥३॥
मायांश सकल त्यजूनि पाहतां । अंतिम अवस्था तूंचि एक ॥४॥
अवशिष्ट तूंचि एक नारायणा । ’ पुच्छ ’ ऐसी संज्ञा तेणें तुज ॥५॥
असूनि अलिप्त साक्षित्वें त्वद्वास । व्यापूनि विश्वास अलिप्त तूं ॥६॥
वासुदेव म्हणे नित्य निर्विकार । चिन्मय साचार साक्षी असे ॥७॥
॥९७१॥
स्थूल-सूक्ष्मामाजी यद्यपि त्वद्वास । परी न तितुकेंच रुप तुझें ॥१॥
औदासीन्यें सर्व व्यापिसी हा भाव । नसेचि उपाय कथण्या अन्य ॥२॥
शाखाश्रयें कोर जेंवी द्वितीयेची । दावावी तैसीचि अवस्था हे ॥३॥
स्थूलानुरोधानें कल्पना गूढाची । यावया हे युक्ति वरणे प्राप्त ॥४॥
वासुदेव म्हणी अंतर्बाह्य एक । व्यापूनि अवशिष्ट तोचि असे ॥५॥
॥९७२॥
अधिकारभेदें ब्रह्मचिंतनाचे । मार्ग विविध ते सफल होती ॥१॥
उदरांत स्थूल ध्याद्ती मणिपुर । ह्र्दयीं दहर सूक्ष्मस्थान ॥२॥
सकलही नाड्या दहरापासूनि । सुषुम्ना तेथूनि मस्तकीं ते ॥३॥
अग्नी तिच्या ब्रह्मरंध्र महास्थान । विमुक्त ब्रह्मज्ञ तया ध्यानें ॥४॥
वासुदेव म्हणी स्थूल-सूक्ष्माहूनि । पर, तेंचि ज्ञानीजनस्थान ॥५॥
॥९७३॥
ब्रह्मरंध्रादि या स्थानांच्या संबंधें । न्यूनाधिक्य नसे तुजसी देवा ॥१॥
श्रेष्ठ-कनिष्ठादि अनुक्रमाभास । होई परी साच नसेचि तो ॥२॥
व्यापूनि सर्वांचे ह्र्दय तूं होसी । आश्रय विश्वासी तूंचि एक ॥३॥
यास्तव सकल कर्मचा तूं कर्ता- असूनि, न त्यांचा लेप तुज ॥४॥
निर्मूनि सकलां प्रवेश त्यांमाजी । करिसी, हे उक्ति शब्दमात्र ॥५॥
व्यतिरेकभावें त्या त्या योनीमाजी । तुज निर्गुणासी गुणाभास ॥६॥
काष्ठसंबंधें जैं अग्नीसी आकार । मिथ्याचि साचार उपाधि तैं ॥७॥
ऐश्वर्य, प्रभुत्व, उपास्यत्व तेंवी । एक तुझ्याठाई म्हणती ज्ञाते ॥८॥
वासुदेव म्हणे सद्गुणांची सीमा । तूंचि नारायणा, एकमेव ॥९॥
॥९७४॥
प्रभो, वासनाचि जन्मासी कारण । होतां निर्वासन चित्पद तें ॥१॥
जन्म-कर्मादि ती परी तुझ्यावीण ॥ कर्ता करविता न अन्य कोणी ॥२॥
जीवात्मा तो तव काल्पनिक अंश । करितां विवेक अन्य न तो ॥३॥
सामान्य जनीं जो तोचि सूर्यामाजी । अलिप्त तो साक्षी मायातीत ॥४॥
जाणूनि हें ऐक्य, कर्मे श्रौत-स्मार्त । अर्पावईं समस्त एक तुज ॥५॥
भवबंध तेणें तुटे ऐसें ज्ञाते । कथिती आनंदें तेंचि इष्ट ॥६॥
वासुदेव म्हणे नैष्कर्म्य यापरी । ठसतां अंतरी मोक्षलाभ ॥७॥
॥९७५॥
दुर्घटचि तव यथार्थ कल्पना । अवतार नाना यास्तवचि ॥१॥
घेऊनि, अतर्क्य करितोसी कर्मे । गातां साधकातें भक्तिलाभ ॥२॥
मग सारासारज्ञानें हंसासम । पादपद्मी लीन होती भक्त ॥३॥
गृह-धनादि वा मोक्षही त्यां तुच्छ । होई संसारांत विरक्ति त्यां ॥४॥
वासुदेव म्हणे ऐसे भक्तजन । चिंतनांत मग्न होती नित्य ॥५॥
॥९७६॥
तळमळ तुज बहु साधकांची । सिध्द त्यां साह्यासी असती नित्य ॥१॥
इंद्रियलोलुपां कळे न हें परी । यास्तव विषयीं रमती नित्य ॥२॥
वासनानिबध्द होऊनि ते मूढ । घालविती व्यर्थ नरदेह ॥३॥
वासुदेव म्हणे ऐसा आत्मघात । करिताती मूढ अज्ञानानें ॥४॥
॥९७७॥
ईश्वरा, श्रवण, मनन, ध्यानादि । श्रेष्ठ सकलांसी कर्तव्य हें ॥१॥
कवण्याही भावें ध्यातां तुजप्रति । परिणामी प्राप्ति तव होई ॥२॥
प्राणादि संयमें प्रेमभावें भक्ति । करी तयाप्रति सायुज्यता ॥३॥
नवल न यांत परी शत्रुतेंही । देसी तेंचि पाही पद देवा ॥४॥
कामेंही ज्या स्त्रिया तुझ्या ठाई लुब्ध । त्याही होती मुक्त विरागानें ॥५॥
श्रुतिदेवताही आह्मीं हें पाहूनि । लुब्ध त्वच्चरणीम भृंगांसम ॥६॥
वासुदेव म्हणे मधुपासमान । पादपद्मीं लीन होती श्रुति ॥७॥
॥९७८॥
उत्पत्ति -प्रलय होती तुझ्यामाजी । आद्यवस्तु तूंचि तेणें सिध्द ॥१॥
जीवकोटीपूर्वी इंद्रियदेवता । जाणावा विधाता पूर्वी त्यांच्या ॥२॥
आदि, अंत त्याचा तूंचि जगन्नाथा । मूल तव इच्छा सकलांप्रति ॥३॥
स्थावर, जंगम , मर्यादा, देशादि । त्याही नष्ट होती तयांसवें ॥४॥
त्वद्बोधकारक मग नसे कोणी । इंद्रियें प्राणही नष्ट होती ॥५॥
वेद-शास्त्रांचाही अस्त होतां देवा । बोध कोण जीवा करी मग ॥६॥
सन्निधचि तेणे असूनि अज्ञान । निमग्नचि जाण सकल जीव ॥७॥
इच्छितां तूं होई पुन:सृष्टयुत्पत्ति । ज्ञानसाधनेंही लाभताती ॥८॥
तात्पर्य श्रुतीही आह्मीं यथार्थत्वें । जाणतों न तूतें विश्वेश्वरा ॥९॥
वासुदेव म्हणे ईश्वरावबोध । नसेचि सुलभ कवणातेंही ॥१०॥
॥९७९॥
तूंचि पुरातन पुरुष सत्यत्वें । अर्वाचीना कैसे ज्ञान तव ॥१॥
जन्म-मृत्यु ज्याचे पित्याच्या समक्ष । केंवी तो पित्यास जाणणार ॥२॥
संपूर्ण तयासी ज्ञान कैसे व्हावें । नवल मानावें काय यांत ॥३॥
वासुदेव म्हणे यास्तव सेवाचि । योग्य ईश्वराची म्हणती वेद ॥४॥
॥९८०॥
अन्य एक विघ्न असे त्वद्बोधासी । भ्रमांत पाडिती उपदेष्टेचि ॥१॥
निवेदिती कोणी पुरा जे विलीन । जाहलें उत्पन्न पुढतू तेचि ॥२॥
परी भावरुप नव्हतें जें कदा । तोचि भावरुपा पातलेंसे ॥३॥
सुवर्णस्वरुप ताम्रादिकां जेंवी । जीव ईश तेंवी म्हणती कोणी ॥४॥
विपत्तीचा नाश तोचि कोणा मोक्ष । मनेंद्रियादिक विपत्ती त्या ॥५॥
जीवब्रम्हौक्य न तयांलागि मान्य । जीवब्रह्म भिन्न सांख्यादिकां ॥६॥
मीमांसकां सृष्टि अनादि अनंत । तेणें तयां स्वर्ग सत्य वाटे ॥७॥
ऐसें उपदेष्टे बहु भ्रमामाजी । समन्वय त्यांसी कळला नाहीं ॥८॥
तुझ्या ठाई सर्व मानिती हे गुण । आलिप्तताज्ञान नस तयां ॥९॥
वासुदेव म्हणे ज्ञानमय हरि । मायाही त्या स्थळीं कल्पनाचि ॥१०॥
॥९८१॥
भेद हा जनांत प्रत्यक्ष्चि सिध्द । मानावा अभेद न कळे केंवी ॥१॥
प्रामुख्यें हे शंका सकलांच्या चित्ता । न कळे हे मिथ्या विश्व तयां ॥२॥
अधिष्ठान एक तूंचि या विश्वासी । बाधा कल्पनेची नामरुपें ॥३॥
मायेसवें विश्व मिथ्या हा प्रयत्य । सत्यत्व निश्चय ब्रह्मरुपें ॥४॥
मायाअव सृष्टी भ्रमचि ज्ञात्यासी । ब्रह्मरुपें तेंचि सत्य तयां ॥५॥
कुंडल, कटक, विकार हे मिथ्या । तयांही सत्यता सुवर्णत्वें ॥६॥
याचिभावें विश्व सत्य हे ज्ञात्यासी । नामरुपें त्याचींमायामय ॥७॥
वासुदेव म्हणे सत्यमिथ्याभाव । कळेल जयास तोचि धन्य ॥८॥
॥९८२॥
व्यापकत्वें देवा, तूंचि एक श्रेष्ठ । जाणूनि जे भक्त सेवामग्न ॥१॥
मृत्यूच्या मस्तकीं करिती ते नृत्य । होऊनि विमुक्त धन्य होती ॥२॥
इतरांही बोधें सायुज्य ते देती । स्वयेंचि तरती ऐसें नसे ॥३॥
अपूर्णचि शब्दज्ञान तें सर्वदा । बंधन साधका तेंचि होई ॥४॥
वासनानिमग्न करुनि, बंधन । निर्मील, तें ज्ञान बंधनचि ॥५॥
ऐशा ज्ञानियासी स्वयेंही न मुक्ति । केंवी तो अन्यासी उध्दरील ॥६॥
वासुदेव म्हणे भक्तीविण व्यर्थ । सकल पांडित्य भारचि तो ॥७॥
॥९८३॥
मायाचालका, तूं व्यापूनिही विश्व । उपाधींचा लेप नसे तुज ॥१॥
सर्वातर्यामी तूं असूनि प्रेरक । कदाही न लिप्त होसी कोठें ॥२॥
ब्रह्मा इंद्रादीही जाणुनि हें नित्य । कृतज्ञत्वें तुज भजती सदा ॥३॥
प्रसाद म्हणूनि हविर्भाग घेती । मांडलिक जेंवी कारभार ॥४॥
चक्रवर्ति आज्ञा पाळितां न त्यांसी । भीति शासनाची कदाकाळी ॥५॥
वायु, सूर्य, अग्नि, स्वकार्यानिमग्न । राहूनि, ग्रहण करिती हवि ॥६॥
भय सकलां त्यां ईश्वरा, तुझेंचि । यास्तव त्वद्भक्ति उध्दारक ॥७॥
वासुदेव म्हणे मुमुक्षूचें हित । भक्तीनें भगवंत करितां तुष्ट ॥८॥
॥९८४॥
आश्चर्यकारक सृष्टयुत्पत्तिक्रम । इच्छीतांचि जन निर्मिसी हे ॥१॥
लिंगशरीरें जीं प्रलयी विलीन । करितां अवलोकन प्रगट होती ॥२॥
यथार्थवबोध दुष्करचि तव । नसे प्रियाप्रिय तुजसी कांही ॥३॥
नि:पक्षपाती तूं आकाशासमान । यास्तव कल्याण भजतां तुज ॥४॥
बिंब-प्रतिबिंबन्यायें अविद्य्नें । उद्भवती कर्मे जीव बहु ॥५॥
भ्रमण तयांचे होई कर्मासम । वासुदेवा ध्यान प्रभुचें रुचो ॥६॥
॥९८५॥
असंख्य जीव हे निर्मी एक माय । एकत्वचि तयां तरी प्राप्त ॥१॥
अथवा अनंत माया करा मान्य शंका ही येवो न कवणाप्रति ॥२॥
एकजीववादें एकाच्या मोक्षानें । मोक्ष सकलांतें प्राप्त व्हावा ॥३॥
माया ते अनंत मानितां न मुक्ति । लाभेल कदापि जीवालागी ॥४॥
व्यवस्था न ऐशा उभयही पक्षीं । तेणे वस्तुस्थिति बाध पावें ॥५॥
यास्तव अनंतशक्तिशाली माया । एकचि हे कार्या करी बहु ॥६॥
स्वस्वकर्मे जीवां जाणावें बंधन । तुडतां बंधन मुक्ति तयां ॥७॥
वासुदेव म्हणे स्तवनें निर्दोष । बोध करी वेद मुमुक्षूंसी ॥८॥
॥९८६॥
अणु परिमाण मानितां जीवांसी । व्यापी तो देहासी अशक्य हे ॥१॥
देह परिमाणीं अनित्यता येई । परलोक केंवी मग तया ॥२॥
नित्य, सर्वगत यास्तव त्या कोणी । मानिती, न ज्ञानी तुष्ट तेणे ॥३॥
कारण व्यापक नित्य त्या मानितां । निष्फलचि सत्ता होई तव ॥४॥
यास्तव स्थूलत्व-सूक्ष्मत्वही जीवा । नसे तो जाणावा सकल भ्रम ॥५॥
वासुदेव म्हणे सकलही भ्रम । मानिल्यावांचून सुटका नसे ॥६॥
॥९८७॥
मायोपाधि जीव, परमात्मस्वरुपें । नित्य व्याप्तचि ते, जगदीश्वरा ॥१॥
तेणें सर्वकाल नियमन त्यांचें । तवाधीन असे सत्य देवा ॥२॥
इच्छिसी तूं तदा बंधनविमुक्त । करिसी तयांस त्याचियोगे ॥३॥
व्यापकत्वें अंशरुपी या जीवांचें । दुर्घटचि असे निरुपण ॥४॥
कारण, जो बोध जाहला म्हणेल । अज्ञ तो ठरेल श्रुतिवाक्यें ॥५॥
मूकत्वेंचि ज्ञाता निरुपील तुज । होईल कुंठित वाणी त्याची ॥६॥
वासुदेव म्हणे बुध्दीची मर्यादा । संपेल ते यदा तैंचि बोध ॥७॥
॥९८८॥
मायाचालका, तूं जीवासी कारण । कार्यत्वचि जाण जीवांप्रति ॥१॥
अनित्यत्व तेणें येऊनि जीवांतें । कर्मफल त्यांतें अशक्यचि ॥२॥
मृत्यूचि तयांचा तेणे मोक्ष होई । बाध तेणें येई सिध्दान्तासी ॥३॥
’ अविद्याविनाशें ’ आनंदरुपता । ब्रह्मौक्यें, या पक्षा बाध येई ॥४॥
वासुदेव म्हणे आक्षेप स्वयेंचि । कथूनियां श्रुति निवारिती ॥५॥
॥९८९॥
आक्षेप हा नसे सत्य । जीव नव्हे कार्यरुप ॥१॥
उपाधीचि पावे जन्म । अजन्म्यासी केंवी जन्म ॥२॥
म्हणूं प्रकृतीचें कार्य । तरी जीवासी जडत्व ॥३॥
केवळ तो पुरुषकार्य । म्हणतां उपाधि पुरुषास ॥४॥
जीवा कारण संयोग । पुरुष-प्रकृतीचा चांग ॥५॥
ऐसेंही न म्हणे कदा । तेणें दोष येई माथां ॥६॥
तैसें म्हणतां उपाधि । तेंवी नित्यत्व जीवासी ॥७॥
वासुदेव म्हणे पक्ष । ऐसे सर्व हे सदोष ॥८॥
॥९९०॥
पक्षत्रय ऐसे जाणावे सदोष । होतसे अध्यास एकमेकां ॥१॥
तेणें प्राणादिक उपाधि जीवासी । दृष्टान्त याप्रति बुद्बुदाचा ॥२॥
वायु आणि जल अन्योन्याश्रयानें । बुद्बुदरुपानें भासताती ॥३॥
एक वा दोन्हींचें कार्य तें नसेचि । ब्रह्मचि जीवासी उपादान ॥४॥
निमित्तकारण जाणावी प्रकृति । अविद्यायोगेंचि जीवाभास ॥५॥
यावत् उपाधि त्यां बहु नामें-गुण । नष्टोपाधि जाण मुक्त होती ॥६॥
वासुदेव म्हणे उपाधींचे भेद । निवेदिती वेद परिसा आतां ॥७॥
॥९९१॥
स्थूल-सूक्ष्मभेदें उपाधि द्विविध । स्थूल-सूक्ष्मदेह रुप त्यांचे ॥१॥
सुषुप्ति-प्रलयी सूक्ष्मदेह जीवां । देहोपाधि जातां मोक्षलाभ ॥२॥
मधु तो अनेक पुष्पांचा मकरंद । परी पुष्पभेद न कळे तेथें ॥३॥
लिंगदेह तेंवी प्रलयी तुझ्यांत । असूनि न व्यक्त भेदरुपें ॥४॥
सागरीं सरिता विलय यावतां । नाम-रुपभेदा त्यजिती जेंवी ॥५॥
तैसे परब्रह्मीं लीन होतां जीव । होती एकरुप अभेदत्वें ॥६॥
वासुदेव म्हणे होतां निरुपाधि । ब्रह्मत्व जीवासी स्वाभाविक ॥७॥
॥९९२॥
प्रभो, ऐसें मूळ जीवाप्रति तूंचि । स्वाधीन असती तुझ्याचि ते ॥१॥
करुनि स्वकार्य तुझ्यांतचि लीन । होती हें भ्रमण नित्य चाले ॥२॥
खेळ हा मायेचा तेणें भवचक्र । भ्रमण हें प्राप्त जीवाप्रति ॥३॥
यापरी त्रिविध दु:खें जीवाप्रति । भोगणें प्राप्त ही त्वन्मायेनें ॥४॥
कृपेवीण तुझ्या भवबंधच्छेद । सर्वथा अशक्य जीवाप्रति ॥५॥
यास्तवचि ज्ञानी सेविती तुजसी । अलौकिक शक्ति असे तव ॥६॥
तव कृपा होतां नसे कालवाधा । जन्म-मरणाचा बंध तुटे ॥७॥
यास्तव मुमुक्षु सदा सेवारत । व्हावा हेंचि इष्ट तयालागीं ॥८॥
वासुदेव म्हणे कृपेवीण कांही । अन्य मार्ग नाही मोक्षाप्रति ॥९॥
॥९९३॥
ईश्वरा, त्वद्भक्ति रुजावया दृढ । मनाचें ऐकाग्र्य आवश्यक ॥१॥
जिंकिली जातील इंद्रिये तैं प्राण । दुर्घटचि मन आंवरणें ॥२॥
संमयी योगीही एथ होती दीन । व्यर्थ त्यांचे श्रम होती सर्व ॥३॥
आंवराया मनवारुचा त्या वेग । एकचि उपाय सद्गुरु त्यां ॥४॥
अन्य उपायांनी क्लेशमात्र होती । निराशाचि अंती अंतरायें ॥५॥
सद्गुरुप्रसादें भक्ति होतां दृढ । ब्रह्मतत्वबोध साधकासी ॥६॥
समूळचि नष्ट तेणें मायामोह । पुत्र, वित्त, देह न रुचे तया ॥७॥
सामग्री युक्तही नाव होई व्यर्थ । कर्णधार एक नसतां जळीं ॥८॥
वासुदेव म्हणे सद्गुरुवांचूनि । अवस्था ते जनीं साधकाची ॥९॥
॥९९४॥
मायामग्नासी न रुचती साधनें । इच्छी न तो यत्ने तत्वबोध ॥१॥
तीव्र आसक्तीनें कांतारत होई । रंगूनियां जाई सुखसाधनीं ॥२॥
परी नश्वर त्या भोगांनी न तृप्ति । पावूनि विपत्ति भोगी बहु ॥३॥
वासुदेव म्हणे भोगमग्न कदा । इच्छी न परमार्था दुर्दैवानें ॥४॥
॥९९५॥
ऐसी गुरुकृपा होतांही पतन । अभ्यासावांचून पावे नर ॥१॥
विवेक चित्ताचा सुस्थिर न होतां । अध:पात त्याचा निश्चयानें ॥२॥
यास्तव सत्संग आवश्यक त्यासी । स्थैर्य सत्संगेंचि विवेकातें ॥३॥
थोर थोर ऋषी याचि पंथे जाती । दर्शनेंचि शुध्दि होई ज्यांच्या ॥४॥
परी जाणूनिया चांचल्य मनाचें प्रिय पुण्यतीर्थ तयांलागी ॥५॥
माहात्म्यांचे घडे दर्शन त्याक्षेत्री । समागमें त्याचि चित्तस्थैर्य ॥६॥
आसक्ति न मग उरेचि लवही । दया, क्षमा, शांति अंगी बाणे ॥७॥
वासुदेव म्हणे विश्वाचे कल्याण । सुजनांचे मन इच्छी नित्य ॥८॥
॥९९६॥
समाधान ज्ञाते करिती युक्तीने । साशंकित मनें तेणें शांत ॥१॥
नित्यचि हे विश्व ऐसी येई शंका । ब्रह्ममूलका त्य शाश्वतत्व ॥२॥
कटक, कुंडले सुवणचि जेंद्व्वी । ब्रह्मरुप तेंवी म्हणती विश्व ॥३॥
परी समाधान असे या शंकेचें । नित्यत्व विश्वातें क्षणही नसे ॥४॥
कारणासमचि कार्य हा नियम । सर्वत्र दिसे न अबाधित ॥५॥
पित्यासम पुत्र होईचि न ऐसें । दंडकृतध्वंसें न घडे दंड ॥६॥
वासुदेव म्हणी पुनरपि शंका । घेऊनि निरासा करिती वेद ॥७॥
॥९९७॥
उपादान तेंवी निमित्त ही दोन । कारणें जाणून घ्यावीं मनीं ॥१॥
मृत्तिका घटासी उपादान होई । गर्दभ तें पाहीं निमित्तचि ॥२॥
उपादानरुप कार्याचें स्वरुप । न राही निमित्त कार्यामाजी ॥३॥
यास्तव कनक राही कुंडलांत । ध्वंसामाजी दंड उरेचिना ॥४॥
तेंवी उपादान ब्रह्म या विश्वासी । शाश्वतत्व त्यासी तेणें योग्य ॥५॥
वासुदेव म्हणे नित्यत्व विश्वाचें । ऐसें पूर्वपक्षें पुन:सिध्द ॥६॥
॥९९८॥
पूर्वपक्षासी त्या उत्तर श्रुतीचें सर्पभान जैसें रज्जूवरी ॥१॥
रज्जूचि तयासी उपादान होई । सत्यत्व न येई परी सर्पा ॥२॥
तैसेंचि हें विश्व म्हणतां अनित्य । पुन:पूर्वपक्ष पुढती ठाके ॥३॥
केवळ रज्जू न सर्पा उपादान । रज्जू तैं अज्ञान कारण त्या ॥४॥
यास्तव कारणासम घडे कार्य । नसेचि अयोग्य तेथ कांही ॥५॥
ऐशा पूर्वपक्षा उत्तर श्रुतीचें । इष्टचि हा असे पक्ष आम्हां ॥६॥
वासुदेव म्हणे केंवी इष्टापति । निवेदिती श्रुति परीसा आतां ॥७॥
॥९९९॥
श्रुति निवेदिती हाचि पक्ष श्रेष्ठ । रज्जूवरी सर्प तेंवी विश्व ॥१॥
सर्पासम विश्व मिथ्याचि जाणावें । पूर्वपक्षी तेणे चकित होई ॥२॥
परी पुनरपि अन्य एक शंका । व्यवहार कैसा भ्रमें म्हणे ॥३॥
शुक्तिरजतासी मोल न ये हाटीं । चित्रस्थ उदकीं कोण बुडे ॥४॥
विश्वव्यवहार घडतां प्रत्यक्ष । चित्रासम त्यास कोण लेखी ॥५॥
वासुदेव म्हणे याही शंकेप्रति । निरुत्तर श्रुति करी पहा ॥६॥
॥१०००॥
सत्यानेंचि होई व्यवहार ऐसें । सर्वकाळ नसे जगीं सत्य ॥१॥
सर्पभ्रमानेंही भय-कंपादिक । परंपरा अंध चालतसे ॥२॥
’भूत’ ’भूत’ ऐसें ओरडतां एक । भूत ऐसें लोक मानिताती ॥३॥
तैसेचि असूनि विश्व हें असत्य । होती व्यवहार मूढपणें ॥४॥
पूर्वपक्षी तदा म्हणी वेदानेंही । अक्षय्य फलाची कथिली वाट ॥५॥
तेणें अक्षय्यत्व येई विषयांसी । नित्यत्व विश्वासी याहीमार्गे ॥६॥
वासुदेव म्हणे निवारिली शंका । वेदांनीं तें ऐका हेही केंवी ॥७॥
॥१००१॥
सिध्दान्तानुसारी घडावें सत्कर्म । यास्तव वचन वेदांचें हें ॥१॥
वाच्यार्थे न एथें कळें अभिप्राय । करणें समन्वय आवश्यक ॥२॥
स्वर्गादिक फलें नष्ट होती हेंही । कथियेलें पाहीं वेदानींचि ॥३॥
यास्तव विवेकें बोध या वाक्यांचा । स्मरुनि सिध्दांता, करणें प्राप्त ॥४॥
पात्रतेसमान जाणूनि हा बोध । चित्तशुध्दिमार्ग स्वीकारावा ॥५॥
आशय श्रुतींचा जाणूनियां हाचि । रमावें सन्मार्गी स्वहितास्तव ॥६॥
तात्पर्य, अनित्य अवघें हें विश्व । म्हणे वासुदेव कथिती श्रुति ॥७॥
॥१००२॥
नसेल हें सत्य परी असत्यत्व । सिध्दिप्रद बोध नसे कोठें ॥१॥
ऐसेंही नसेचि अन्य प्रमाणांनी । असत्यत्व ध्यानीं येई याचें ॥२॥
भूत-भविष्यही नसेचि जयासी । वर्तमान त्यासी कैशापरी ॥३॥
अनुमानें ऐशा विश्व हें अनित्य । भास हा केवळ परब्रह्मीं ॥४॥
घट-अलंकार -आयुधांसमान । सत्य उपादान एकमेव ॥५॥
मृत्तिकाचि घट, भूषणें कनक । लोहचि आयुध सर्वकाल ॥६॥
अनित्य आकारें नामरुप भिन्न । परी स्वरुप न भिन्न त्यांचे ॥७॥
तैसेंचि हें विश्व ब्रह्मावरी भासे । आग्रहें, कुतर्के मूढां सत्य ॥८॥
वासुदेव म्हणे मूळरुपें सत्य । आभास हें दृश्य ध्यानीं घ्यावें ॥९॥
॥१००३॥
प्रभो, ऐशापरी असत्य हें विश्व । असूनियां जीव दु:ख भोगी ॥१॥
ईशमात्र सदा अलिप्तचि असे । काय हे जीवाचें न कळे पाप ॥२॥
ऐशा आक्षेपाचें समाधान आतां । करुनि पाहतां येई ध्यानीं ॥३॥
कांतीवरी लोभ नसे जै सर्पाचा । मायेचें न ईशा ममत्व तैं ॥४॥
मायाधीश ईश जीवमायाधीन । होऊनि दारुण दु:ख भोगी ॥५॥
आसक्त तो जी अनासक्त ईश । असक्तीनें द:ख जीवा बहू ॥६॥
मायाबंध त्याचा तुटायाकारणीं । आमुच्या मुखानें कथिला मार्ग ॥७॥
वासुदेव म्हणे दयालुत्वें ईश । साधकांसे मार्ग स्वयें दावी ॥८॥
॥१००४॥
सदा अंतर्मुख व्हावें । ध्यान तुझेचि करावें ॥१॥
सर्वसंग परिताग । करुनिही इच्छी भोग ॥२॥
ऐसी कामना जयासी । कासया त्या वनवृत्ति ॥३॥
वाताशनही तें व्यर्थ । तेणें न लाभे प्रसाद ॥४॥
ह्रदयग्रंथि तुटल्याविण । त्याग-भक्तीचाही शीण ॥५॥
मुळापासूनि भोगेच्छा । खणिल्यांवाचूनि शिणतां ॥६॥
सकल साधनें तीं व्यर्थ । वासुदेव ह्र्ष्टचित्त ॥७॥
॥१००५॥
विस्मरण होतां कंठस्थ मण्याचें । सामीप्य तयाचें अर्थशून्य ॥१॥
चित्तशुध्दीवीण तैसींच साधनें । लोलंगता तेणे विषयांचीच ॥२॥
इह-पर ऐशा मार्गे नष्ट होई । गृहस्थासमही त्या न सौख्य ॥३॥
असूनि धनेच्छा, यतित्व तें बाधे । चोरुनि सुखातें उपभोगितां ॥४॥
ऐसा मार्गभ्रष्ट पावतो पतन । भोगितो दारुण नरक अंती ॥५॥
वासुदेव म्हणे दांभिकत्वें ऐसी । अवस्था मूढाची जनीं होई ॥६॥
॥१००६॥
प्रभो, देहासक्ति त्यागिल्यांवाचूनि । कदाही न जनी ज्ञान कोणा ॥१॥
यास्तव ऐहिक सौख्य विरागानें । साधनीं असावें दक्ष सदा ॥२॥
भक्तभावें ऐसा रंगूनियां जातां । भोगूनि प्रारब्धा अलिप्तत्व ॥३॥
सुख-दु:खी समा, तया न कर्तव्य । राखी संप्रदाय यदृच्छेनें ॥४॥
वासुदेव म्हणे कर्तव्याकर्तव्व्य । मुक्त होतां, काय बंधन हें ॥५॥
॥१००७॥
ब्रह्मा-इंद्रातेंही अगम्य त्वद्रुप । जाणसी न अंत तूंही तव ॥१॥
ईश्वरा, अतर्क्य ऐसा त्वन्महिमा । वैगुण्य ह्यें कोणा नच वाटो ॥२॥
अंतचि नसतां कळावा तो केंवी । दोष न लवही यास्तव हा ॥३॥
शशशृंगलाभ न होतां न दोष । प्रयत्न बहुत करुनि कोणा ॥४॥
वासुदेव म्हणे ऐसें अनंतत्व । जाणुनियां चित्त लीन होवो ॥५॥
॥१००८॥
ईश्वरा, गगनीं रज:कण जेंवी । ब्रह्मांडें ही तेंव्वा त्वद्रुपांत ॥१॥
कालचक्रें गति पावती असंख्य । आश्चर्य अतर्क्य त्रैलोक्यीं हें ॥२॥
सनातना, तव गुणांसी न अंत । यास्तवचि मूक आह्मीं श्रुति ॥३॥
सगुणाचेही न वर्णवती गुण । निर्गुणवर्णन केंवी मग ॥४॥
नेति नेति ऐशा निषेधस्वरुपें । लक्षणादि रुपें कथितों आह्मीं ॥५॥
वासुदेव म्हणे मूकत्व श्रुतींचें । ज्ञानचि प्रभूचें, न अज्ञान ॥६॥
॥१००९॥
नारायणमुनि कथिती नारदा । ऐकूनि या बोधा तुष्ट मुनि ॥१॥
सनंदनाप्रति पूजिलें तयांनी । कृतार्थ होऊनि अत्यानंदें ॥२॥
श्रुतिसार ऐसें कथिलें ऋषींनीं । कामना जळूनि भस्म येणें ॥३॥
चिंतूनियां यातें, करावें भ्रमण । आनंद् पावून पृथ्वीवरी ॥४॥
नारायणोक्ति हे ऐकूनि नारद । होऊनि संतुष्ट मनी बहु ॥५॥
नारायणाप्रति प्रेमानें वंदूनि । घातलें चरणी लोटांगण ॥६॥
परीक्षितप्रश्ना हें वेदस्तुतीनें । उत्तर मुनीचें सविस्तर ॥७॥
पुढती नारद जाती व्यासाश्रमीं । कृतार्थता मनीं वासुदेवा ॥८॥
॥१०१०॥
निवेदिती शुक राया, नारदानें । बोध हा प्रेमानें कथिला ताता ॥१॥
राया, शब्दमय वेद ईश्वरातें । वर्णिताती ऐसे यथार्थत्वें ॥२॥
वेदस्तुतीचें या नृपाळा, तात्पर्य । निवेदितों भाव धरुनि ऐकें ॥३॥
प्रलयीं जे जीव ईशरुपीं लीन । पुरुषार्थसाधन तयां घडो ॥४॥
यास्तव उत्पत्ति- स्थित्यादि करुनि । परमात्मा जनीं साक्षिरुप ॥५॥
निमित्तोपादान एकचि विश्वासी । जीवभोगार्थचि रचना ऐसी ॥६॥
स्वयेंचि जीवांतें भोग अर्पी ईश । अनन्य भक्तांस मुक्त करी ॥७॥
वासुदेव म्हणे नटूनि आपण । स्वयें नारायण खेळ करी ॥८॥
॥१०११॥
निद्रिस्थ तो जेंवी शरीरी उदास । संसारी विरक्त तेंवी भक्त ॥१॥
पुढती विलीन होऊनि ब्रह्मांत । मायोपाधित्याग करिती सौख्यें ॥२॥
अखंडानंदांत पुढती निमग्न । सायुज्यसदन संपादिती ॥३॥
यास्तव नृपाळा, मायामोहपाश । छेदी त्या प्रभूस, नित्य घ्यावें ॥४॥
सकल जीवांसी ईशभक्तिध्यान । घडावे, चिंतन तेंचि घडो ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसी ’ वेदस्तुति ’ । चिंतिंतां जीवासी मुक्तिप्रद ॥६॥
( वेदस्तुति समाप्त )