स्कंध १० वा - अध्याय ७७ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
॥८५४॥
पुढती प्रद्युम्न करी आचमन । धनुष्य घेऊन वदला सूता ॥१॥
द्युमानासमीप स्यंदन हा नेई । सूत तदा नेई रथ तेथें ॥२॥
रथ, अश्व, सूत, छेदी तैं प्रद्युम्न । अंती तोडी मान द्युमानाची ॥३॥
यादवही अन्य लढलें विक्रमें । कृष्णासी दुश्विन्हें दिसती तदा ॥४॥
राजसूयोत्तर पांडवसदनी । आसतांचि, रणीं इकडे ऐसें ॥५॥
वासुदेव म्हणे पाहुनि दुश्चिन्हें । कृष्ण रामासवें चिंति मनी ॥६॥
॥८५५॥
वैर्यांनीं ही संधि साधिली असावी । द्वारका गांठावी त्वरित आतां ॥१॥
मग बांधवांचा घेऊनि निरोप । येई द्वारकेस यदुराणा ॥२॥
तदा संरक्षण ठेऊनि रामातें । सिध्द समरातें होई कृष्ण ॥३॥
गरुडध्वजासी पाहूनि यादव । पावले उत्साह रणीं बहु ॥४॥
सूतावरी शाल्व सोडी तदा शक्ति । श्रीकृष्ण ती छेदी क्षणार्धात ॥५॥
वासुदेव म्हणे शारड्.धनु तदा । ताडूनियां शरा पाडी शाल्व ॥६॥
॥८५६॥
भयाकुल तदा यादव जाहले । शाल्व शौर्ये बोले तयावेळीं ॥१॥
मूढा, आतां गांठ जाण हे कोणासी । कांता शिशुपालाची हरिलीसी त्वां ॥२॥
बेसावध तया वधिलेंसी दुष्टा । न मानीं प्रतिष्ठा दुष्कर्माची ॥३॥
आतां अल्पकालें यमाच्या सदनी । धाडितों हो रणीं स्थिर धैर्ये ॥४॥
वासुदेव म्हणे कृष्ण कथी शाल्वा । करुनि दावावा निज विक्रम ॥५॥
॥८५७॥
बोलुनियां कृष्ण शाल्वाप्रति गदा । ताडितां तो कंपा पावतसे ॥१॥
ताडणार अन्य आघात तो गुप्त । होऊनियां शाल्व न दिसें कोठें ॥२॥
ऐशा दोन घटी जाती तोंचि एक । येऊनि पुरुष कथी कृष्णा ॥३॥
वासुदेव शाल्वें बांधूनियां नेलें । मज पाठविलें देवकीनें ॥४॥
बळिरामातेंही जिंकिल्याचें वृत्त । ऐकूनि अच्युत खिन्न होई ॥५॥
वासुदेव म्हणे इतुक्यांत शाल्व । बध्द वसुदेव पुढती आणी ॥६॥
॥८५८॥
कृष्णाप्रति शाल्व म्हणे वसुदेवा । वधीतसें पहा पुढती तुझ्या ॥१॥
सामर्थ्य असेल तरी रक्षीं यातें । बोलुनियां ऐसें शिर छेदी ॥२॥
घेऊनि तें सौभविमानीं बैसला । क्षण एक झाला कृष्ण दु:खी ॥३॥
अन्यक्षणींचि ते जाणुनियां माया । सिध्द निजकार्या होई कृष्ण ॥४॥
राया, असंबध्द विषय त्यजूनि । मर्म तेंचि ध्यानी घेई एक ॥५॥
शाल्वाप्रति कृष्णें बांधियेले अंती । केली विमानाची शकलें बहु ॥६॥
छिन्न-भिन्न केलें कवच मणीही । मस्तकींचा पाहीं छेदियेला ॥७॥
वासुदेव म्हणे शाल्ववधें पुष्पें । वर्षूनि स्वर्गीचें ह्र्ष्ट देव ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 12, 2019
TOP