स्कंध १० वा - अध्याय ७६ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
॥८५०॥
रायाप्रति शुक कथिताती शाल्व । शिशुपालमित्र होता एक ॥१॥
रुक्मिणीविवाहीं झाला पराभूत । होऊनियां क्रुध्द तयावेळीं ॥२॥
यादवविहीन करीन हे पृथ्वी । प्रतिज्ञा त्यावेळीं केली तेणें ॥३॥
आराधना केली यास्तव शिवाची । मृत्तिकाचि भक्षी एक मुष्टि ॥४॥
वर्ष एक शिवें दुर्लक्षचि केलें । दुष्टाचें जाणिलें कृष्णवैर ॥५॥
पुढती तयातें होता तो प्रसन्न । मागूनि विमान घेई शाल्व ॥६॥
इच्छागामी, यादवांसी भयप्रद । विमान अभेद्य असो म्हणे ॥७॥
भौम नामें तदा मयासुरकृत । विमान तयास दिधलें शिवें ॥८॥
वासुदेव म्हणे अदृश्यही होई । इष्ट त्या समयीं विमान तें ॥९॥
॥८५१॥
लाभतां विमान द्वारावतीवरी । शाल्व चाल करी सेनेसवें ॥१॥
उध्वस्त नगर करीत तो जाई । पाषाणादि पाहीं फेंकी बहु ॥२॥
क्लेश तदा बहु होती नागरिकां । प्रद्युम्न तैं लोकां धीर देई ॥३॥
पुढती शाल्वासी होई घोर युध्द । करी मायायुध्द शाल्व यत्नें ॥४॥
परी त्या निवारी प्रद्युम्न लीलेनें । हर्षित तैं मनें यादवांची ॥५॥
जल, भूमि, नभ आक्रमी विमान । रुपें बहु जाण कदा घेई ॥६॥
वासुदेव म्हणे शराघातें यान । केलें बहु क्षीण यादवांनीं ॥७॥
॥८५२॥
भयाकुल शाल्व फेंकी बहु शर । परी यदुवीर डरले नाहीं ॥१॥
प्रधान द्युमाळी प्रद्युम्नासी गदा । ताडूनि, जिंकिला गर्जे ऐसें ॥२॥
आघातें त्या मूर्च्छा येई प्रद्युम्नासी । दारुकपुत्रचि सूत त्याचा ॥३॥
प्रद्युम्नाचा रथ नेला तेणे दुर । येई भानावर मुहुर्ते तो ॥४॥
रणांतूनि दूर पाहूनि आपणां । प्रद्युम्नाच्या मना खेद वाटे ॥५॥
सारथ्यासी वीर बोलला क्रोधानें । म्हणे व्यर्थ जिणे केलेंसी त्वां ॥६॥
वासुदेव म्हणे पलायन शब्द । येईल, हा खेद प्रद्युम्नासी ॥७॥
॥८५३॥
राम-कृष्णांप्रति निवेदूं मी काय । दोष लावितील सकल स्त्रिया ॥१॥
अपयश काय कथूं मी स्वमुखें । कांरे मज ऐसें दूर नेलें ॥२॥
सूत म्हणे वीरा, सूतधर्म जैसा । वागतों मी तैसा ध्यानी घेईं ॥३॥
रथी यदा येई प्राणसंकटांत । तदा हेंचि इष्ट कथिलें धर्मे ॥४॥
वासुदेव म्हणे प्रद्युम्नासी ऐसें । कथियेलें सूतें निजशास्त्र ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : December 12, 2019
TOP