॥७२९॥
शोडष सहस्त्र अष्टोत्तर शत । स्त्रियांतें दश दश पुत्र होती ॥१॥
पृथक् पृथक् रुपें घेऊनियां हरी । राहिला मंदिरीं प्रत्येकीच्या ॥२॥
प्रत्येकीसी वाटे प्रिय मीचि यातें । कृष्णदर्शनाचें सौख्य तयां ॥३॥
मोहक वदन आकर्ण नयन । विशाल ते जाण बाहू त्याचे ॥४॥
मनोहर वाणी ऐकूनि तयाची । रमती विलासी क्षणोक्षणीं ॥५॥
वासुदेव म्हणे प्रभूचें सान्निध्य । लाभतांही मोक्ष सकलां नसे ॥६॥
॥७३०॥
स्वरुप न त्याचें ओळखिलें कोणी । विषयीं रंगूनि मूढपणें ॥१॥
स्वाधीन तो तेणें नव्हताचि त्यांच्या । मोह विषयांचा निरसे केंवी ॥२॥
नररुपीचि त्या भुलल्या केवळ । बोध न अचल रुपाचा त्यां ॥३॥
सामोरें जाऊनि अर्ध्यपाद्यादिक । अर्पावे, तांबुल समर्पावा ॥४॥
पादसंवाहन गंधानुलेपन । चामर ढाळून सौहार्दानें ॥५॥
म्रर्दूनियां अंग अभ्यंग घालावें । भक्ष्य-भोज्य व्हावे सिध्द सदा ॥६॥
आसन शय्याही निर्मल राखावी । नित्य हीच घाई तयांप्रति ॥७॥
रुक्मिणी ते पटटराणी श्रीकृष्णाची । वासुदेव कथी पुत्र तिचे ॥८॥
॥७३१॥
प्रद्युम्न, तो चारुदेष्ण, तैं सुदेष्ण । चारुदेह जाण सुचारु तो ॥१॥
चारुगुप्त, भदचारु, चारुचंद्र । विचारु, तो अंत्य पुत्र चारु ॥२॥
भामेप्रति भानु, सुभानु, स्वर्भानु । प्रभानु, भानुमान् चंद्रभानु ॥३॥
बृहद्भानु, अतिभानु, श्रीभानुही । पतिभानु पाही अंतिम तो ॥४॥
जांबवतीलागीं सांब तैं सुमित्र । पुरुजित, शतजित् सहस्त्रजित ॥५॥
विजय तै चित्रकेतु, वसुमान् । द्रविड, ऋतु जाण अंतिम तो ॥६॥
वीर, चंद्रादिक सत्येचे जाणावे । श्रुत, कवि, पाहें कालिंदीचे ॥७॥
प्रघोष, गात्रवान् सिंहादिक दश । लक्ष्मणेचे पुत्र सुविख्यात ॥८॥
वृकादिक जाणा मित्रविंदेप्रति । संग्रामजितादि भद्रेचे ते ॥९॥
वासुदेव म्हणी दीप्तिमानादिक । रोहिणीचे पुत्र दश संख्य ॥१०॥
॥७३२॥
प्रत्येकीसी दश पुत्रलाभ ऐसा । आनंदासी तोटा नसे तेथें ॥१॥
रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न विख्यात । रुक्मवती त्यास कांता गुणी ॥२॥
अनिरुध्द पुत्र जाहला तियेसी । रुक्मि भोजपति आजा त्याचा ॥३॥
कोटयवधि पौत्र प्रपौत्र कृष्णातें । नसे हे ज्ञात्यातें नवल कांहीं ॥४॥
रुक्मिणीचें हित इच्छी सदा रुक्मि । प्रमाधारें जनीं वैर टळे ॥५॥
रुक्मवती कन्या, प्रद्युम्ना वरितां । रुक्मि स्वस्थ होता त्याचि प्रेमे ॥६॥
राजांचा विरोध हरिला प्रद्युम्नें । कन्या श्रीकृष्णातें होत्या बहु ॥७॥
प्रत्येकीसी एक कन्या, रुक्मिणीसी । नामें ’ चारुमती ’ कन्या एक ॥८॥
वासुदेव म्हणे कृतवर्मापुत्र । ’बली ’ तो जामात रुक्मिणीचा ॥९॥
॥७३३॥
निवेदिती शुक नृपासी दुष्टांचें । सर्वदाचि असे दुर्वर्तन ॥१॥
भक्षूं नय कोणी श्रीकृष्णाचे अन्य । रुक्मीचा हा जाण नियम होता ॥२॥
तैसेंचि त्या कोणी देऊं नये कांही । दंडकही पाहीं वैरभावें ॥३॥
परी निज पौत्री ’ रोचना नामक । अर्पी अनिरुध्दास रुक्मि प्रेमें ॥४॥
विवाहीं त्या जाती रुक्मिणी, बलराम । श्रीकृष्ण, प्रद्युम्न, सांबादिक ॥
कलिंगादि नृप तेंही भोजकटी । तया समयासी आले होते ॥६॥
वासुदेव म्हणे रुक्मीसी ते बोध । करिताती मूढ ऐका काय ॥७॥
॥७३४॥
बलरामासवें करीं द्यूतक्रीडा । सूड यादवांचा उगवीसील ॥१॥
ऐकूनि तें रुक्मि पाचारुनि रामा । युक्त द्यूतकर्मामाजी होई ॥२॥
शतसहस्त्र तैं दशसहस्त्राचा । पण बलरामाचा जिंकी रुक्मि ॥३॥
पाहूनि तै रामा कलिंगाधिपति । उपहासें अति हास्य करी ॥४॥
असह्य त रामा जाहलें पुढती । लक्ष मुद्रा द्यूतीं लावी रुक्मि ॥५॥
रामानें तो पण जिंकियेला परी । मिथ्या शब्देंहरी रुक्मि, मुद्रा ॥६॥
वासुदेव म्हणे क्रोध तै रामासी । मुद्रा दश कोटी लावी पणा ॥७॥
॥७३५॥
राम तोही डाव जिंकी परी रुक्मि । म्हणे जिंकिलें मी साक्ष घेई ॥१॥
कलिंगाधिपति साक्ष या कर्मासी । नभांत तैं उक्ति घुमली एक ॥२॥
जिंकिलें रामानें, रुक्मि कथी मिथ्या । ऐकूनि त्या शब्दां रुक्मि बोले ॥३॥
अक्षविद्येमाजी मठठ बलराम । युध्दाचेंही ज्ञान नसे तया ॥४॥
मिथ्या नभोवाणी, जिंकिला मी पण । क्रुध्द बलराम तदा होई ॥५॥
लोहदंडें प्राण घेई तैं रुक्मीचा । कलिंगही तदा पळून जाई ॥६॥
परी दशपाद गेला न जो तोचि । दंत त्याचे पाडी बलराम ॥७॥
अन्यही जे साह्य जाहले नृपाळ । शिक्षा बलभद्र करी तयां ॥८॥
वासुदेव म्हणे तटस्थ तैं कृष्ण । करी अवलोकन घडे तेंचि ॥९॥
॥७३६॥
बळिरामाप्रति साह्य । करितां रुक्मिणी कोपेल ॥१॥
पक्ष रुक्मीचा वा घेतां । कोप बळिरामचित्ता ॥२॥
राम-रुक्मीणीचीं मनें । कलुषितचि या कर्मे ॥३॥
ऐसें वाटलें कृष्णासी । पुढती गेले स्वस्थानासी ॥४॥
वासुदेव म्हणे पेंच । थोरांतेंही संसारांत ॥५॥