स्कंध १० वा - अध्याय ६३ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
॥७४४॥
चार मास कोठें गेला अनिरुध्द । द्वारकेंत शोध करिती बहु ॥१॥
अंती नारदांनीं कथिला वृत्तांत । शोणितपुरांत बध्द बाळ ॥२॥
शोणितपुरीं तै जाती राम-कृष्ण । साब तैं प्रद्युम्न आदि वीर ॥३॥
अक्षौहिणी सैन्य घेऊनि द्वादश । शोणितपुरास वेढा देती ॥४॥
नगरविध्वंस आरंभिला त्यांनी । रक्षणा धांवूनि येई रुद्र ॥५॥
कार्तिकेयादिक वीरही पातले । युध्द तैं जुंपलें घोर तेथें ॥६॥
वासुदेव म्हणे समसमां वीर । शोधुनियां शर ताडिताती ॥७॥
॥७४५॥
हरि-हर करिती युध्द । बळिराम तैं कुभांड ॥१॥
स्कंद-प्रद्युम्न लढती । सांब बाणाच्या पुत्रासी ॥२॥
सात्यकी तो बाणावरी । शरवर्षावचि करी ।\३॥
ऐसें निकराचें युध्द । पाहावयासी विबुध ॥४॥
येती विमानीं बैसूनि । विरंचीही तो गगनीं ॥५॥
शिवगण पळूनि जाती । करितां कृष्णें बाणवृष्टी ॥६॥
अस्त्रें शिवाची सकल । जाति होऊन विफल ॥७॥
वासुदेव म्हणे स्कंद । जाई त्यजूनि रणास ॥८॥
॥७४६॥
कूपकर्ण -कुभांडांसी बलराम । मुसळें तांडून विध्द करी ॥१॥
पळूनियां जाति शिवदुत ऐसें । पाहूनि बाणातें कोप येई ॥२॥
अंती सात्यकीतें सोडूनि कृष्णासी । क्रोधाकुल ताडी बहु बाण ॥३॥
पंचशत चापें घेई जी करांत । छेदी तीं अच्युत क्षणार्धेचि ॥४॥
रथ, सारथी तैं अश्वही वधूनि । केला शंखध्वनि विक्राळ रुप धरी ॥६॥
पाहूनि ते नग्न, वळवूनि रथ । नेतसे अन्यत्र द्वारकेश ॥७॥
साधूनि ते संधि बाण जाई गृहीं । ज्वर धांव घेई रणांगणीं ॥८॥
वासुदेव म्हणे शिरे पाद तीन । शिवाचा तो जाण घोर दूत ॥९॥
॥७४७॥
शीतज्वर तदा धाडिला कृष्णानें । भांडती क्रोधानें ज्वर दोघे ॥१॥
माहेश्वर तेंवी वैष्णव ते वीर । जाहला जर्जर शिवदूत ॥२॥
आश्रय तयासी मिळेनाचि कोठें । अंती तो कृष्णातें प्रार्थीतसे ॥३॥
म्हणे देवा, निष्क्रिय तूं ज्ञानरुप । नियंता विश्वास निराकार ॥४॥
साकारासी बाधा होतसे आमुची । निर्गुणापुढती क्षुद्र आह्मीं ॥५॥
काल, कर्म, जीव, बीजांकुरादिक । मायाचि हे तव सर्व देवा ॥६॥
देवकीचा पुत्र म्हणती तुजसी । सकल मायाचि जाणतों मी ॥७॥
आजवरी बहु धर्मरक्षनार्थ । देवा, अवतार, घेतलेसी ॥८॥
क्षमा करीं, ऐसें विनवितो ज्वर । म्हणे वासुदेव पुढती ऐका ॥९॥
॥७४८॥
अभय तयासी देऊनियां कृष्ण । ज्वरासी हांसून आज्ञा करी ॥१॥
संवाद आपुला स्मरेल तयासी । बाधा न कदापि होवो तव ॥२॥
यापरी निघूनि जातांचि तो ज्वर । सुदर्शनचक्र सोडी हरी ॥३॥
छेदूनियां कर बाणाचे सहस्त्र । टाकितां शंकर प्रार्थी कृष्णा ॥४॥
वासुदेव म्हणे शिवोक्त प्रार्थना । देऊनियां घ्याना परिसा आतां ॥५॥
॥७४९॥
कृष्णा, बाणाचें अज्ञान । स्वाभाविकचि हे जाण ॥१॥
अगोचर तुझे रुप । कथिती वेदही प्रत्यक्ष ॥२॥
तेज सूर्याप्रति तूंचि । देवा, कृपेंनें अर्पिसी ॥३॥
न कळे आह्मां सगुणही । निर्गुणाची वार्ता नाही ॥४॥
रोमरोमीं तुझा देव । देवा, धर्म त्वदह्र्दय ॥५॥
धर्मरक्षणें जगासी । संरक्षाया अवतरसी ॥६॥
तव कृपेवीण कार्य । करणें आह्मांतें अशक्य ॥७॥
वासुदेव म्हणी शिव । वदती ऐका पुढें काय ॥८॥
॥७५०॥
ईश्वरा, स्वतंत्र जनीं तूंचि एक । तो मेघाच्छादित सूर्य भासे ॥१॥
परी मेघांप्रति दाखवितो तोचि । विषय झाकंती तेंवी तुज ॥२॥
परी बोध त्यांचा तुझ्याचि कृपेनें । जन्म-मरण भ्रमें मुढांप्रति ॥३॥
नरदेहीही जो स्वस्वरुप ज्ञान व्हावया न यत्न करी कदा ॥४॥
दु:ख शोकमग्न होईल तो सदा । शरण त्वत्पदा पातलों मी ॥५॥
वासुदेव म्हणे प्रार्थूनि कृष्णातें । शिव वदती जें तेंचि ऐका ॥६॥
॥७५१॥
देवा, बाणासुरा दिधलें अभय । प्रल्हादवंशीय जाणूनि तो ॥१॥
अनुग्रह करीं तयावरी देवा । संतोष केशवा तदा होई ॥२॥
म्हणी शिवा, तव पुरविली इच्छा । पुत्र हा बलीचा बाणासुर ॥३॥
वध त्याचा व्हावा ऐसें न मी इच्छी । प्रतिज्ञाचि माझी तैसी असे ॥४॥
हरावया दर्प छेदियेले कर । अवशिष्ट चार रक्षियेले ॥५॥
जयावरी तव कृपा तो निर्भय । म्हणे वासुदेव पुढती ऐका ॥६॥
॥७५२॥
आदरें मस्तक ठेऊनि चरणीं । बाण जोडी पाणी श्रीकृष्णातें ॥१॥
बैसवूनि रथीं अनिरुध्दाप्रति । त्या स्थळीं अणिती उषेसवें ॥२॥
रुद्राज्ञेनें त्यांचा करुनि सन्मान । अक्षौहिणी सैन्य अर्पी बाण ॥३॥
पाठवणी करी बाण आनंदानें । जाती द्वारकेतें सकक्ल तदा ॥४॥
यादव सामोरे येती तैं तयांसी गुढया -तोरणांची नगरीं शोभा ।\५॥
द्वारकेंत ऐसा होई समारंभ । अंतरीं आनंद सकलांप्रति ॥६॥
निवेदिती शुक हरि-हरयुध्द । स्मरतील नित्य विजय तयां ॥७॥
वासुदेव म्हणे नित्य प्रात:काळीं । स्मरतां वनमाळी तोष पावे ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 11, 2019
TOP