मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ८५ वा

स्कंध १० वा - अध्याय ८५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥९२७॥
स्यमंतपंचकी व्यासादि मुनीनीं । कृष्णासी स्तवूनि वंदियेलें ॥१॥
ऐकूनि तें, राम-कृष्ण हे ईश्वर । जाहला निर्धार वसुदेवाचा ॥२॥
चिंतनीं तो त्याचि असतां निमग्न । एकदां वंदन करिती दोघे ॥३॥
आशीर्वाद तयां देऊनि प्रेमानें । वसुदेव म्हणे तयांप्रति ॥४॥
श्रीधरा, हे संकर्षणा तुह्मीं दोघे । आधार जगातें निश्चयानें ॥५॥
वासुदेव म्हणे माय श्रीहरीची । येई प्रत्ययासी विवेकानें ॥६॥

॥९२८॥
चिंतितां रुपासी मति हे कुंठित । यथार्थ स्वरुप तुलितां नये ॥१॥
अन्यत्र कोठेंचि गवसे न तेंचि । सामर्थ्य तुम्हांसी अलौकिक ॥२॥
सकलही वस्तु तुझेचि स्वरुप । कार्यकारणास तूंचि मूळ ॥३॥
भोगार्थ जयाच्या वस्तूंतही तूंचि । दिक्कालादि तूंचि वस्तुस्थित ॥४॥
तात्पर्य, हें सर्व तुझेंचि स्वरुप । उपभोक्ता तूंच आलिप्तत्वें ॥५॥
अधोक्षजा, तूंचि पालक-पोषक । देवादिकां तूंच ज्ञानादाता ॥६॥
वासुदेव म्हणे बाणवेधकाची । शक्ति, न बाणाची वसुदेवोक्ति ॥७॥

॥९२९॥
तृणादिकां जेंवी चालना वायुनें । प्राणिमात्र जाणीं तेंवी तृण ॥१॥
यायुसम तूंचि चालविसी त्यासी । लोकोत्तर ऐसी शक्ति तव ॥२॥
आल्हादक चंद्र, अग्नि विदाहक । सूर्य तो प्रेरक, दीप्त तारे ॥३॥
सुस्थिर पर्वत, भूमि आधारक । सकल सुगंध सौख्यदाई ॥४॥
जीवनसामर्थ्य उदकाचे ठाई । पावनत्व पाही वायुचें तें ॥५॥
देहाचें कौशल्य मनाचा निर्णय । ग्रहणसामर्थ्य इंद्रियांचें ॥६॥
परापश्यंत्यादि वाणीचे विकार । देवा, सर्व सर्व तूंचि एक ॥७॥
वासुदेव म्हणे अहंकारत्रय । माया विश्वोद्भवमूळ तूंचि ॥८॥

॥९३०॥
घटामाजी जेंवी मृत्तिकाचि सत्य । तेंवी तूंच एक सत्य जगीं ॥१॥
घालवी सकल भेद एक माया । वास्तविक देवा, सर्व तूंचि ॥२॥
मायेच्या निरासें एकत्व प्रत्यय । तावत्काल जीव, भेद मानी ॥३॥
भवपाशबध्द तावत्काल जीव्व । केवळ मानवजन्में कळे ॥४॥
अपूर्व हा ऐसा लाभूनिही जन्म । गेले बहु दिन व्यर्थ माझे ॥५॥
’ मी माझे ’ मी माझे धरुनि हा ध्यास । सकल आयुष्य व्यर्थ गेलें ॥६॥
रामा-कृष्णा, आतां करुनि प्रेरणा । करावें या दीना पाशमुक्त ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसा उतावीळ । ज्ञानार्थ जो जीव तोचि धन्य ॥८॥

॥९३१॥
पुरे पुरे आतां विषयांचे कोड । झाला तेणें घात आयुष्याचा ॥१॥
देहावरी बहु केलें प्रेम, तेणें । नेणूनि तुम्हांतें अंध झालों ॥२॥
भजळांतूनि सोडवारे मज । करुनि सद्वोध तीर दावा ॥३॥
सुतपा तैं पृश्नि, कश्यप-अदिति । कथिलेसी तूंचि पूर्वी मज ॥४॥
तेचि आह्मीं आतां वसुदेव -देवकी । धर्मरक्षणासी अवतार हा ॥५॥
कथिलेंसी ऐसें, परी मायामोहें । नाही उमजल आम्हांसी तें ॥६॥
वासुदेव म्हणे कृपेनें जागृति । येई वसुदेवासी योग्यवेळीं ॥७॥

॥९३२॥
निवेदिती शुक अनुताप ऐसा । पाहूनि पित्याचा हास्यमुखें ॥१॥
बोले यदुनाथ ताता, सत्य सत्य । बोललासी तेंच धरीं ध्यानी ॥२॥
ताता, हे सकल विश्व असे मीचि । बोलले व्यासादि तेंचि सत्य ॥३॥
अद्वैतभाव हा प्रत्ययासी आणी । भिन्न भावें जनीं भासे ब्रह्म ॥४॥
मानवासी ज्ञान, देवांसी वैभव । प्रगटे सामर्थ्य गजादिकी ॥५॥
मशक ते क्षुद्र, उपाधि हे जाण । करी संगोपन ज्ञानाचें या ॥६॥
याचि ज्ञानें मोह नष्ट होई सर्व । चिंती वासुदेव कृष्णोक्ति हे ॥७॥

॥९३३॥
ऐकूनि ते वाणी वसुदेव शांत । होऊनियां स्वस्थ राहियेला ॥१॥
देवकी अद्यापि नव्हती सुस्थिर । सामर्थ्य अपार जाणूनिही ॥२॥
सांदिपनीपुत्र दिधला कृष्णानें । तेंवी निज बाळें पाहूं इच्छी ॥३॥
पाहूनि हे संधी बोलली बाळांसी । अलौकिक शक्ति तुह्मांप्रति ॥४॥
धर्माचें रक्षण, दुष्टनिर्दलन । हेतु हा धरुन पातलांती ॥५॥
शरण मी तुम्हां मनोरथपूर्ती । करुनि, मजसी धन्य करा ॥६॥
गुरुपुत्रासम पुत्रषट्‍क माझें । दाखवावें मातें स्वसामर्थ्यें ॥७॥
वासुदेव म्हणे मातेचें ह्र्दय । झुरे बाळांस्तव केंवी पहा ॥८॥

॥९३४॥
राम-कृष्ण ऐसें ऐकूनि वचन । तत्काळ जाऊन सुतलामाजी ॥१॥
भेटलें बळीसी हर्षला तैं बळी । पूजा त्यांची करी प्रेमभावें ॥२॥
सर्व परिवारासवें त्यां वंदूनि । अर्पिलें चरणी सकलैश्वर्य ॥३॥
देहाचेही स्वत्व अर्पूनिया अंती ॥ होऊनियां चित्तीं स्वस्थ बैसे ॥४॥
वासुदेव म्हणे पुढती स्तवन । धरुनियां प्रेम करी बळि ॥५॥

॥९३५॥
म्हणे संकर्षणा, धूलिकणासम । मस्तकीं हे जाण धरिसी पृथ्वी ॥१॥
कृष्णा, कर्म-भक्ति-ज्ञानयोग तूंचि । घडे प्रारब्धेंचि दर्शन हें ॥२॥
भक्ताहूनि आह्मीं दैत्याचि भाग्याचे । विरोधेंही लाभे सकलैश्वर्य ॥३॥
न कळे मायेचा खेळ हा कां ऐसा । सात्विक वृत्तीचा अर्पी ठेवा ॥४॥
अनासक्ति आतां अर्पावी मजसी । गलित फलांची इच्छा देई ॥५॥
सर्वदा तूं आतां दे मज सत्संग । करावें निष्पाप दास्यें मज ॥६॥
वासुदेव म्हणे ऐकूनि तें कृष्ण । बोलला वचन बलीप्रति ॥७॥

॥९३६॥
बले, स्वायंभूव मन्वतरामाजी । पुत्र मरीचीसी होते सहा ॥१॥
सरस्वतीमागें धांवतां विरंची । हंसतां ते, त्यांसी शापी ब्रह्मा ॥२॥
पुढती हिरण्यकशिपूचे पुत्र । जाहले जे अद्य देवकीचे ॥३॥
तुझ्या सन्निध ते असती सांप्रत । तयांस्तव शोक करी माता ॥४॥
नेतों आह्मीं तयां होतां कार्यभाग । पावतील मोक्ष यथाक्रम ॥५॥
ऐकूनि तत्काळ बलि तयांप्रति । अर्पिता, ते येती द्वारकेंत ॥६॥
वासुदेव म्हणे अशक्य हा शब्द । नसेचि विश्वांत ईश्वरातें ॥७॥

॥९३७॥
स्मर, उद्गीथ तो, तेंवी । परिश्वंग, पतंगहि ॥१॥
क्षुद्रभृत्‍ तेंवी घृणि । नामें पूर्वीची घ्या ध्यानीं ॥२॥
पुत्र तेचि देवकीचे । झाले होते या जन्मीचें ॥३॥
पाहूनियां बाळांप्रति । पान्हा फुटे देवकीसी ॥४॥
आलिंगूनि अंकी घेई । स्तनपानही करवी ॥५॥
उच्छिष्ट तें श्रीकृष्णाचें । अमृतचि झालें होतें ॥६॥
प्राशूनियां तें, बालक । होती क्षणी देवरुप ॥७॥
वंदूनियां सकलांसी । गेले हर्षे देवलोकीं ॥८॥
पाहूनियां त्यां देवकी । स्थिर झाली ब्रह्मरुपीं ॥९॥
वासुदेव म्हणे कथा । करी पावन हे जगा ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP