॥१०१२॥
राव म्हणे मुने, देवासुर नरां । भजतां शंकरा धनलाभ ॥१॥
ऐश्वर्यविहीन सदा विष्णुभक्त । गांजितें दारिद्र्य, तयांप्रति ॥२॥
ऐश्वर्यवंतासी सेवितां विरुध्द । फल, विराग्यास भजतां भाग्य ॥३॥
विपरीत ऐसी स्थिति कां हे गूढ । निवारुनि, मज सौख्य द्यावें ॥४॥
वासुदेव म्हणे शुकोक्त उत्तर । ऐकूनियां स्थिरचित्त व्हावें ॥५॥
॥१०१३॥
राया, निराकार प्रभु मायाश्रयें । त्रिविध स्वरुपें प्रकट होई ॥१॥
उत्पत्ति-स्थित्यादि कार्ये ब्रह्मयादिक । गुणांसम श्रेष्ठ करिती देव ॥२॥
रज, सत्त्व, तमें ब्रह्मा, विष्णु, शिव । गुणांसम कार्य करिती जनीं ॥३॥
आराधनें त्यांच्या तत्तत्फल लाभे । शांति हें सत्वाचें फल जाण ॥४॥
सुखोत्पत्ति रजें, तमानें अविचार । सात्त्विक विचार भजतां हरि ॥५॥
असक्ति न राहे तेणें वैभवाची । उपजे विरक्ति विषयसौख्यीं ॥६॥
वासुदेव म्हणे अंति मोक्षसौख्य । भजतां विष्णूस भक्तां लाभे ॥७॥
॥१०१४॥
रज, तम अन्य देवांसी भजतां । अभिवृध्दि नृपा, पावताती ॥१॥
तेंवी सुखादिक अशाश्वतलाभ । गुणांसम प्राप्त होई तेणें ॥२॥
पुरा हाचि प्रश्न कृष्णाप्रति धर्मे । करितां कथिलें धर्मासी जें ॥३॥
निवेदितों तेंचि घेई तें ऐकोनि । वासुदेव मनी सावधान ॥४॥
॥१०१५॥
कृष्ण म्हणे धर्मा, मदनुग्रहाचा । विपरीत साचा मार्ग भासे ॥१॥
मुख्यफल त्याचें, संसारनिवृत्ति । वासना भक्ताची हरितों तेणे ॥२॥
वासनानाशार्थ , धनादिक भोग । घेतों सावकाश हिरावूनि ॥३॥
लौकिकांत तया होती महाक्लेश । अंतीं आप्त-गोत त्यजूनि जाती ॥४॥
व्यवसायीं त्यासी देतों अपयश । अंतीं त्या वैराग्य प्राप्त होई ॥५॥
पुढती सत्संग लाभतां तयाची । मुख्य कार्यासिध्दि मानितों मी ॥६॥
वासुदेव म्हणे सत्संगानें भक्त । होई ब्रह्मानिष्ठ निश्चयानें ॥७॥
॥१०१६॥
शुध्दचित्त ऐसा होई यथाक्रम । चिंती प्ररब्रह्म एकचित्तें ॥१॥
अधिकारें ऐशा सच्चित्सुखरुप । जाणूनि त्वरित माया लंघी ॥२॥
ऐसें अनासक्त आराधन मम । राया, सुलभ न जगामाजी ॥३॥
यास्तव राजस -तामस देवांतें । भजूनि सौख्यातें मेळविती ॥४॥
पुढती होऊनि मदानें त्या अंध । उपकारकर्त्यास अवमानिती ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसे जे कृतघ्न । तयांचा परिणाम दु:खकारी ॥६॥
॥१०१७॥
सत्वर फल तैं चुकतां पतन । शापही दारुण तेचि देती ॥१॥
विष्णूसी भजतं भय न तें कदा । दीर्घकाल सत्वा पाही परी ॥२॥
पाहूनियां त्याची आराधना हरि । कृपा तयावरी करी प्रेमें ॥३॥
सहसा न त्याचा शाप कोणाप्रति । सत्वगुणें ऐसी स्थिति जाण ॥४॥
वासुदेव म्हणे वृकासुरवृत्त । मुनि दृष्टान्तार्थ निवेदिती ॥५॥
॥१०१८॥
शकुनिदैत्याचा पुत्र वृकासुर । सर्वत्र संचार करी दुष्ट ॥१॥
एकदां नारद भेटतां तयासी । म्हणे मज कथीं सुलभ देव ॥२॥
नारद तयासी वदले त्या वेळीं । भोलासांब करी त्वरित कृपा ॥३॥
क्षुब्धही सत्वरी होऊनि तो शापी । द्शकंठ प्रार्थी तयातेंचि ॥४॥
बाणासुरनेंही प्रार्थितां तयातें । रक्षण पुराचें केलें त्याच्या ॥५॥
वासुदेव म्हणे कैलास उपटून । तोषला रावण सांबबरें ॥६॥
॥१०१९॥
ऐकूनि असुर, जाऊनि केदारी । आराधना करी शंकराची ॥१॥
वरप्राप्तीस्तव स्वमांसहवन । आरंभूनि कर्म करी घोर ॥२॥
सप्तम दिनी तो छेदाया मस्तक । घेऊनियां खड्ग सिध्द होई ॥३॥
कुंडांतूनि शिव प्रकटूनि तदा । धरी हस्त त्याचा वरचेवरी ॥४॥
शिवस्पर्शे दैत्य होई क्षतहीन । वर घे मागून, शिव म्हणे ॥५॥
ऐकूनिया, कर ठेवीन मस्तकीं । मरण तयासी येवो म्हणे ॥६॥
खिन्नचित्तें शिवें अर्पिला तो वर । सर्पासम क्रूर, विषचि वमे ॥७॥
वासुदेव म्हणे पार्वतीहरण । इच्छूनि, धांवून जाई दुष्ट ॥८॥
॥१०२०॥
शिवाच्या मस्तकी ठेवावया हस्त । धांवतांचि सांब पळे यत्नें ॥१॥
पाठलाग त्याचा असुरानें केला । अंती शिव गेला वैकुंठासी ॥२॥
पाहूनि तें, विष्णु ब्रह्मचारी होई । मेखलादि लेई सकल चिन्हें ॥३॥
पुढती जाऊनि म्हणे तो वृकासी । घेईरें, विश्रांति असुरा, येथें ॥४॥
देहासी यापरी देऊं नये क्लेश । सर्व मनोरथ पुरती येणे ॥५॥
इच्छिसी तें मज निवेदी, मी साह्य । होईन त्वत्कार्य जाणुनियां ॥६॥
वासुदेव म्हणे बटुवाक्यें दैत्य । तोषूनि स्ववृत्त कथी त्यासी ॥७॥
॥१०२१॥
ऐकूनि ते सर्व विष्णू म्हणे तया । भजूनियां शिवा वंचित तूं ॥१॥
दक्षशापें शिव पिशाचाधिपति । जाहला तयासी नुरलें बळ ॥२॥
यास्तव विफल होती त्याचे वर । स्वमस्तकीं कर ठेवीं पहा ॥३॥
स्वानुभवें ऐसें वैफल्य कळतां । नाश शंकराचा त्वरित करी ॥४॥
तेणें पुनरपि ऐसी हे वंचना । होऊनियां कोणा दु:ख नसो ॥५॥
वासुदेव म्हणे मोहक ती वाणी । भ्रमला ऐकूनि असुर दुष्ट ॥६॥
॥१०२२॥
नि:शंक आपुल्या मस्तकीचि हस्त । ठेवूनियां दैत्य नष्ट झाला ॥१॥
हर्षानें देवांनीं वर्षिलीं सुमनें । प्रार्थिलें शिवानें विष्णूप्रति ॥२॥
देवा, त्वद्भक्तांसी पीडी जो तयासी । शासन तूं देसी अविलंबेंचि ॥३॥
मत्त जो, प्रत्यक्ष अपराध तव । करील, तयास काय वेळ ॥४॥
राया, ऐसें वृत्त घेऊनियां ध्यानीं । हरिभक्ति मनीं वसो सदा ॥५॥
वासुदेव म्हणे या पुण्यवृत्तांता । ऐकतां, पठतां मोक्ष लाभे ॥६॥