पांडवप्रताप - अध्याय ७ वा
पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.
॥ श्री गणेशाय नमः ॥
पुण्य तोय गुहा गुण ॥ अप्रमेय चारही वस्तु पूर्ण ॥ भारत समुद्र मेरु नारायण ॥ अंत न कळे शोधितां ॥१॥
जन मेजय म्हणे वैशंपायाना ॥ विचित्र वीर्याच्या अंगना ॥ तिघे पुत्र प्रसवल्या जाणा ॥ पुढें रचना बोलें कैशी ॥२॥
येरू म्हणे तिघे पुत्र ॥ व्या सवीर्यें परम चतुर ॥ शास्त्र विद्याभ्यास अपार ॥ भीष्म करवी तयांतें ॥३॥
पंडु धृत राष्ट्र दोघे जण ॥ झाले वेद शास्त्र प्रवीण ॥ सकल विद्ये मध्यें निपुण ॥ विदुर ज्ञानी साधु तो ॥४॥
चौदा विद्या चौसष्ट कला ॥ धनु र्वेद मंत्र माला ॥ अस्त्र विद्या गुणा गळा ॥ पंडुराज निपुण तो ॥५॥
यथा कालीं मेघ वर्षती ॥ अष्टादश धान्यें पिकती ॥ वृक्षीं सदा फळें विराजती ॥ नाहीं गणती उद्यानां ॥६॥
त्रिकाल गायींस क्षीर ॥ शोधितां तिळ मात्र नाहीं दरिद्र ॥ आधिव्याधिरहित समग्र ॥ प्रजा अपार सुखी सदा ॥७॥
चारी आश्रम चारी वर्ण ॥ स्वविघेंत सकल निपुण ॥ कोणा सही नसे दुर्मरण ॥ हरिकीर्तन घरो घरीं ॥८॥
वेद शास्त्रा दिध्वनी ॥ ब्राह्मण गर्जती अनुदिनीं ॥ पति व्रता सकल कामिनी ॥ पुरुष स्वपत्नीरत सदा ॥९॥
प्रजा ऋषि प्रधान उत्तम ॥ त्यांसी पुसे एकांतीं भीष्म ॥ राज्यासी योग्य परम ॥ कोण असे सांगा पां ॥१०॥
अंधर्त्वं उणा धृत राष्ट्र ॥ क्षेत्र विरुद्ध उणा विदुर ॥ सकल म्हणती राज्याधिकार ॥ पंदुरा यासी देइंजे ॥११॥
सर्व विषयीं चतुर विदुर ॥ भीष्म पुसे क्षणोक्षणीं विचार ॥ कनिष्ठ म्हणोनि अव्हेर ॥ सहसाही करीना ॥१२॥
तिन्ही प्रबुद्ध झाले तरुण ॥ आतां करावें यांचें लग्न ॥ सकल कर्ता गंगा नंदन ॥ विचार करी विदुराशीं ॥१३॥
चित्रपटीं रेखिल्या तिघी जणी ॥ बहुत वाखाणिल्या विचक्षणीं ॥ एक गांधारीं सौबल नंदिनी ॥ वसुदेव भगिनी कुंती दुजी ॥१४॥
मद्र्दुहिता माद्री ॥ तिघी विख्यात पृथ्वीवरी ॥ विदुर म्हणे माझे विचारीं ॥ योग्य तिघी याचि पैं ॥१५॥
भीष्मासी सांगती ऋषीश्वर ॥ गांधारीनें अर्चिला अपर्णा वर ॥ शत पुत्र होतील निर्धार ॥ दिधाला वर त्रिनेत्रें ॥१६॥
भीष्म ऐकतां संतोषत ॥ म्हणे वंश वृद्धि व्हावी बहुत ॥ प्रज्ञाचक्षूतें निश्चित ॥ भार्या तीच करावी ॥१७॥
पुरो हित सुबुद्ध पाठविला ॥ गांधार नृपतीस भेटला ॥ भीष्मवाक्य राव ते वेळां ॥ शिरीं वंदी आवडीं ॥१८॥
अंधत्वदोष धरून चित्तें ॥ कन्या नेमिली धृत राष्ट्रातें ॥ गांधारीनें ऐकतां गोष्टी ते ॥ पट नेत्रांतें बांधिला ॥१९॥
सेने सहित शकुनी ॥ रथीं बैसवूनि आपुली भगिनी ॥ कुंजर पुरा नेऊनी ॥ देत सुलग्नीं अंधातें ॥२०॥
चार दिवस उत्साह थोर ॥ याचक सुखी केले अपार ॥ आंदण दिधलें साचार ॥ कुबेर संपत्ती सारिखें ॥२१॥
परम पति व्रता गांधारी ॥ सौंदर्यासी उण्या निर्जरनारी ॥ पतिसेवेसी सादर अहो रात्रीं ॥ वाढवी प्रीति विशेष ॥२२॥
शूर सेन वसुदेव पिता ॥ कुंती जाण तयाची दुहिता ॥ स्त्रेहवादें कन्या तत्त्वतां ॥ कुंति भोजा दिधली ती ॥२३॥
पितृ गृहीं असतां कुंती ॥ तों उदय पावला भाग्यग भस्ती ॥ अनसूया नंदन गृहा प्रती ॥ दुर्वा समुनी पातला ॥२४॥
कुंति भोजें राहविला मंदिरीं ॥ कुंती सेवा करी अहो रात्रीं ॥ जें जें मागे जे अवसरीं ॥ तें तें देऊनि तोषवीत ॥२५॥
संतोषोनि अत्रिपुत्र ॥ कुंतीस ओपिले पांच मंत्र ॥ कर्णीं सांगोनि पवित्र ॥ मस्तकीं हस्त ठेविला ॥२६॥
आपत्काल होतां प्राप्त ॥ पंच मंत्रस्वरूपें दैवत ॥ दिव्य तेजें प्रकटत ॥ पुत्र देती स्वरेतें ॥२७॥
मित्र वैवस्वत पवन ॥ बिडौजा अश्विनी कुमार पांच जण ॥ ज्याचें करिसी आवाहन ॥ होईल प्रसन्न दैवत तें ॥२८॥
न्यास बीज प्रणव ध्यान ॥ ह्रदयीं धरी कुंती आपण ॥ लोभी जीवेंसीं आवरी धन ॥ तेवीं जतन करी सदा ॥२९॥
आश्रमासी गेला दुर्वा सुमुनी ॥ एके पर्व काळीं देव तटिनी ॥ तीरा आली कुंति भोजनंदिनी ॥ दुजें कोणी नसे तेथें ॥३०॥
म्हणे मंत्राची पहावी प्रतीत ॥ जपें आव्हा निला आदित्य ॥ तों प्रत्यक्ष सविता मूर्ति मंत ॥ उभा ठाकला तत्काल ॥३१॥
अर्क मणे कुरंग नयनी ॥ कां पाचारिलें नितं बिनी ॥ येरी घाबरली अधोवदनी ॥ मंजुळ वाणी बोलत ॥३२॥
कोणा सही न कळत ॥ मज भोग देऊनि व्हावें गुप्त ॥ न भंगावें कुमारित्व ॥ न व्हावें श्रुत उभयपक्षीं ॥३३॥
कुंतीस म्हणे आदित्य ॥ गांठीं पुण्याचे महा पर्वत ॥ तेव्हां माझें दर्शन होत ॥ भाग्य अद्भुत तुझें हो ॥३४॥
माझा संग होतां जाण ॥ कुमारित्व न भंगे पूर्ण ॥ पुढें महा भूभुज येऊन ॥ तुज वरील आदरें ॥३५॥
मग कुंतीस दिधली भेटी ॥ सुरता नंदें पडिली मिठी ॥ पुत्र उपजला तत्काळ पोटीं ॥ प्रति सूर्य दुसरा तो ॥३६॥
किरीट कुंडलें कटीं मेखळा ॥ सर्व भूषर्णा तेजागळा ॥ सुवर्ण कवच स्वयंभू लेइला ॥ तेज दश दिशा न समाये ॥३७॥
भय आणि संतोष ॥ कुंती आंगीं उपजे विशेष ॥ स्वस्थाना गेला चंडांश ॥ साशंकित कुंती मनीं ॥३८॥
बाळ टाकूनि गंगा जलीं ॥ कुंती पितृ सदनीं प्रवे शली ॥ इकडे बाळ न बुडे कदा काळीं ॥ रक्षिती झाली जान्हवी स्वयें ॥३९॥
उत्तुंग लहरी उसळत ॥ त्यांशींच बाळ असे खेळत ॥ तों राधापति किरात ॥ प्रीतीनें उचली तयातें ॥४०॥
कडिये घेतला बाळ सत्वर ॥ उचंबळला स्त्रेह समुद्र ॥ रुंजी घालिती नेत्र भ्रमर ॥ मुख कमळीं तयाच्या ॥४१॥
पाहतां बाळ काच्या वदना ॥ धणी न पुरे किरात नयना ॥ बोलावूनि आपुली राधा ॥ अंगना ॥ ओंटीं घातळा तियेच्या ॥४२॥
राधेनें पाळिला आर्तें ॥ म्हणोनि राधेय म्हणती तयातें ॥ वसुषेण नाम किरातें ॥ ठेविलें अति आवडीं ॥४३॥
साक्षात्कारें करून ॥ ऋषि कर विती वेदा ध्ययन ॥ धनुर्वेद शिकला पूर्ण ॥ झाला निपुण वेद शास्त्रीं ॥४४॥
अर्जु नापासोनि न व्हावा मृत्य ॥ ऐसें जाणोनि आदित्य ॥ सूर्योप स्थान मंत्र जपत ॥ प्रकटे अर्क त्या पुढें ॥४५॥
कर्णाचे कर्णीं मित्र सांगत ॥ तूं सूर्योप स्थान जपीं नित्य ॥ याचक देखतां त्वरित ॥ उदार होईं सर्वस्वें ॥४६॥
परी अंगीं कवच जडलें अहर्निशीं ॥ तें सहसा नेदीं कोणासी ॥ शत्रुशस्त्रें निश्चयेंसीं ॥ मरण तुज नव्हे कदा ॥४७॥
ऐसें सांगोनि ते वेळीं ॥ स्वस्थळा गेला अंशुमाळी ॥ असो महा उदार कर्ण ॥ सूर्यो पासक निश्चयें ॥४८॥
आपुला पुत्र जो पार्थ ॥ इंद्र धरुनि त्याचा स्वार्थ ॥ अनुष्ठानीं बैसतां सूर्य सुत ॥ आला त्यातें छळा वया ॥४९॥
ब्राह्मण रूप धरूनि मधवा ॥ म्हणे कर्णराया सुदैवा ॥ दीनवचनें मागतों एधवां ॥ कवच देईं अंर्गांचें ॥५०॥
दधीचि निजास्थि देत ॥ कपोतासी शिबी मांस अर्पीत ॥ त्याहूनि तूं दाता अद्भुत ॥ देईं कवच अक्षय्य ॥५१॥
ऐसें ऐकतां वचन ॥ महाराज उदार तो अर्कनंदन ॥ त्वचे सहित कवच काढून ॥ ब्राह्मणासी दीधलें ॥५२॥
आश्चर्य करी निर्जर पती ॥ प्रसन्न होऊनि दिधली दिव्य शक्ती ॥ म्हणे संकट मांडल्या प्राणांतीं ॥ समरांगणीं प्रेरावी ॥५३॥
ऐसें बोलोनि देव राणा ॥ गेला आपुले स्वस्थाना ॥ कर्णाचिया उदारपणा ॥ तुलना नाहीं त्रिभुवनीं ॥५४॥
मंत्रें अस्त्रें शस्त्रें मंडित ॥ दुजा नाहीं रण पंडित ॥ धनुर्धारांमाजी विख्यात ॥ जामदग्न्या सारिखा ॥५५॥
जयाचें सौंदर्य़ पाहतां अद्भुत ॥ लाजोनि जाय रतिकांत ॥ चंद्र अधो वदन होत ॥ कर्ण स्वरूप देखोनी ॥५६॥
स्त्रियांनीं द्दष्टीं देखतां कर्ण ॥ अंगीं तत्काळ द्र्वे मदन ॥ उपमेसी एक रुक्मिणी रमण ॥ मग दुसरा नसेचि ॥५७॥
क्षत्रियांसी विद्यादान ॥ कदा नेदी जाम दग्न्य ॥ धनुर्वेद पढावया पूर्ण ॥ कर्ण गेला विप्ररूपें ॥५८॥
नमस्कारूनि ते काळीं ॥ पुढें उभा बद्धां जळी ॥ रेणुकानंदन म्हणे ते वेळीं ॥ बोलें वर्ण कोण तुझा ॥५९॥
येरू म्हणे मी श्रेष्ठ वर्ण देख ॥ राहें म्हणे भृगुकुलतिलक ॥ कविगुरु समान त्यास तर्क ॥ विद्या सकळिक शिकला तो ॥६०॥
इंद्र चिंता करी मनांत ॥ पार्थासी करील हा पुढें अनर्थ ॥ अपाय योजी अमरनाथ ॥ तों अपूर्व वर्तलें ॥६१॥
एकदां कर्णाचे अंकीं देख ॥ शिर ठेवूनि निजतां क्षत्रियांतक ॥ निद्रा लागली मुहूर्त एक ॥ तों शचीनायक पातला ॥६२॥
खालीं भ्रमर होऊनि ते अवसरीं ॥ काष्ठवत कर्णाची मांडी कोरी ॥ रक्तप्रवाह चालिला धरणी वरी ॥ परी न हाले अणु मात्र ॥६३॥
मांडी अवघी कोरूनि क्षोभें ॥ भार्गवाच्या कर्णास झोंबे ॥ जागा जाहला सवेगें ॥ तों रक्त प्रवाह देखिला ॥६४॥
कर्णासी म्हणे एवढा धीर ॥ धरिलासी तूं नव्हसी भूसुर ॥ महाक्षत्रिय समर धीर ॥ नाम सांग आपुलें ॥६५॥
येरू म्हणे मी वीर कर्ण ॥ मग म्हणे रेणुकानंदन ॥ तुझे कीर्तीनें भरेल त्रिभुवन ॥ उदारपण अगाध ॥६६॥
क्षत्रियांसी विद्या पाहीं ॥ मी सर्वथा देत नाहीं ॥ तूं चोरूनि शिकलासी सर्वही ॥ परी शेवटीं निष्फल ॥६७॥
तुझी विद्या मिरवेला सर्वां ठायीं ॥ परी पार्था पुढें निष्फळ सर्वही ॥ आज्ञा मागूनि कर्ण लवलाहीं ॥ स्वस्थलासी पातला ॥६८॥
सिंहावलो कनें करून ॥ मागील पहा कथानु संधान ॥ पंडूचें आरं भिलें लग्न ॥ ऐका कथानक श्रोते हो ॥६९॥
जो पद्मनाभ पद्मज जनक ॥ त्याचे पदपद्मीं उद्भवली सुरेख ॥ तिचा तनय देव व्रत देख ॥ विचार करी विदुराशीं ॥७०॥
कुंति भोजापाशीं ब्राह्मण ॥ साधा वया लग्न कारण ॥ पाठवीत गंगा नंदन ॥ सुलग्न मुहूर्त पाहोनी ॥७१॥
कुंति भोजासी भेटला विप्र ॥ सांगे सर्वही समाचार ॥ म्हणे धन्य भाग्य साचार ॥ पंडु जामात जाहला ॥७२॥
वसुदेव पिता शूरसेन ॥ कुंतीसी गेला घेऊन ॥ पंडु सहित गंगा नंदन ॥ तेथें आला दळभारें ॥७३॥
विधियुक्त जाहलें लग्न ॥ दिधलें अपार आंदण ॥ हस्तिना पुरा परतोन ॥ वोहरें ॥ घेऊन पातला ॥७४॥
यावरी पंडूसी अंगना दुसरी ॥ भीष्म करीत ते अवसरीं ॥ मद्ररायाची माद्री ॥ परम सुंदर ॥ पृथ्वींत ॥७५॥
भीषें पाठविली पुरो हित ॥ कन्ये सहित मद्रनाथ ॥ गजपुरासी येऊनि त्वरित ॥ विधियुक्त लग्न केलें पैं ॥७६॥
विदुरानुमतें गंगा नंदन ॥ अश्वमेध आरंभी यज्ञा ॥ अपार दळभार घेऊन ॥ पंडू चालिला दिग्वि जया ॥७७॥
जगतीस सेनावसन ॥ नेसवूनि जिंकी संपूर्ण ॥ भीष्म भयें करून ॥ कर भार देती भूभुज ॥७८॥
छप्पन्न देशींचे राजे सहज ॥ जिंकीत जात पंडुराज ॥ कोणी युद्धासी बांधिती पैज ॥ हारी येतां भेटती ॥७९॥
कोणी नाम प्रताप ऐकोन ॥ अगोदर भेटती येऊन ॥ अनर्त देशीचा नृप पूर्ण ॥ बल भीम जिंकिला ॥८०॥
शाकल द्वीपींचा प्रतिधान ॥ गंधर्व देश जिंकिला संपूर्ण ॥ सवालक्ष पर्वत घेऊन ॥ राजे सांगातें चाल विले ॥८१॥
हिम वंत श्वेत पर्वत ॥ किंपुरुष खंड जिंकिलें समस्त ॥ गोरक्ष पर्वत सुवर्ण प्रसवत ॥ द्रव्य अमित मेळ विलें ॥८२॥
जेथींचा पाट निश्चित ॥ शरय़ू अयोध्ये पुढें विराजित ॥ तें मान ससरोवर अद्भुत ॥ पंडु विस्मित देखतां ॥८३॥
दिव्य रत्नांच्या खाणी तेथ ॥ प्रवाल वल्ली तेजें अद्भुत ॥ गजमौक्तिकें पसरलीं बहुत ॥ जेवीं गगनीं उडुगण ॥८४॥
करिशावक खेळती ॥ कस्तूरी मृग विराजती ॥ कर्पूर कदली डोलती ॥ कोकिला कूजती ॥ सुस्वरें ॥८५॥
ज्यासी जी आवडे वस्त ॥ ती अवश्य घ्यावी तेथ ॥ सागर वलयां कित ॥ पृथ्वी समस्त ॥ पंडुनृपनाथें जिंकिली ॥८६॥
एवं दिग्विजय करूनि समस्त ॥ गजपुरा आला पंडुनृपनाथ ॥ दल भारेंसी गंगा सुत ॥ भेटावया जात सामोरा ॥८७॥
समोर देखतां देव व्रता ॥ पंडु रथाखालीं उतरत ॥ भीष्माचीं पदाब्जें नमीत ॥ आलिंगीत आवडीं ॥८८॥
पंडुसहित देव व्रत ॥ मिरवत आले गज पुरांत ॥ सत्यवतीसी नमूनि सांगत ॥ वर्तमान सर्वही ॥८९॥
द्र्व्य रन्तें अलंकार ॥ वस्तु आणिल्या अपार ॥ नगरांत न मावे मग बाहेर ॥ पर्वताकार रचियेल्या ॥९०॥
मग धृतरष्ट्राचे हातीं ॥ शत याग करवी पंडुनृपती ॥ तो पसारा सांगतां नाहीं मिती ॥ पुढें ग्रंथ परिसिजे ॥९१॥
यावरी पंडुनृपनाथ ॥ उभयदारां समवेत ॥ मृगयामिषें वास करीत ॥ कानना माजी स्वेच्छेनें ॥९२॥
हिमवंत गिरीचे पाठारीं ॥ किती एक दिवस वास करी ॥ उभय दारां समवेत कांतारीं ॥ क्रीडा कौतुकें विचरत ॥९३॥
भोग समग्री समस्त ॥ प्रज्ञा चक्षु पुरवीत ॥ लेह्य पेय खाद्य चोष्य बहुत ॥ भक्ष्य भोज्य षड्र्स पैं ॥९४॥
शुष्टक सुपक्व स्त्रिग्ध विदग्ध ॥ हीं चतुर्विध अन्नें प्रसिद्ध ॥ धृत राष्ट्र पाठवी करूनि सिद्ध ॥ दूताहातीं सर्वदा ॥९५॥
महापार्श्वराज नंदिनी ॥ भीष्में आदरें आणोनी ॥ विदुरासी केली पत्नी ॥ यथा सांग विवाहें ॥९६॥
तिचे पोटीं परम चतुर ॥ विनय नामा जाहला कुमार ॥ पितया तुल्य विवेक समुद्र ॥ सारासार जाणता ॥९७॥
धृत राष्ट्रासी शतपुत्र ॥ होते जाहले महावीर ॥ वेश्यागर्भीं जन्मला निर्धार ॥ युयुत्सु यांचे वेगळा ॥९८॥
पंच देव वीर्यं वनांत ॥ पंडूसी जाहले पांच सुत ॥ धृत राष्ट्रासी एक शत ॥ एकदांचि जाहले ॥९९॥
जन मेजय म्हणे वैशंपायना ॥ तीक्ष्ण प्रज्ञा कुठार धारणा ॥ संशय कानन खंडना ॥ कथा कैशी सांग पां ॥१००॥
एक दांचि शत पुत्र गांधारी ॥ कैशी प्रसवली कोणे परी ॥ पंच पुत्र कुंतीच्या उदरीं ॥ देव कैसे अवतरले ॥१०१॥
मग म्हणे वैशं पायन ॥ एकदां गांधारीची भख्ति देखोन ॥ प्रसन्न जाहला कृष्ण द्वैपायन ॥ म्हणे शत पुत्र तुज होतील ॥१०२॥
व्यास वदोनि गोलिया वरी ॥ गर्भिणी जहली गांधारी ॥ पंचविंशति मासां भीतरी ॥ प्रसूत नोहे सर्वथा ॥१०३॥
तों वार्ता सांगती विप्र ॥ कुंतीस जाहला पुत्र युधिष्ठिर ॥ जैसा उदया चळीं बाळ मित्र ॥ तेवीं तेजस्वी जन्मला ॥१०४॥
ऐसें ऐकतां गांधारी ॥ ईर्ष्या उपजली अंतरीं ॥ अंधासी न कळतां निर्धारीं ॥ उदर ताडीत पाषणें ॥१०५॥
तों लव थवीत रक्तवर्ण ॥ पिशवी पडली पोटांतून ॥ जाहलें देखोनि गर्भ पतन ॥ सौबली रडे आक्रोशें ॥१०६॥
जाहला थोर आकान्त ॥ तों व्यास पातला अकस्मात ॥ म्हणे माझें वचन नव्हे व्यर्थ ॥ चिंता ग्रस्त होऊं नको ॥१०७॥
उदकें पिशवी प्रोक्षीत ॥ तों शत भाग जाहले तेथ ॥ फणसणर्भींचे गरे निघत ॥ तैसे निवडत वेगळाले ॥१०८॥
अंगुष्ठ पर्व प्रमाण ॥ शत कुंभीं घृत भरून ॥ त्यांत घातले भिन्न भिन्न ॥ व्यास देवाचे आज्ञेनें ॥१०९॥
तंव शत पुत्रां वरी ॥ त्यांत एक निघाली कुमारी ॥ दुःशीला नामें निर्धारीं ॥ परम प्रिय सर्वांतें ॥११०॥
व्यास देवें मंत्रून ॥ एकांतीं कुंभ ठेविले नेऊन ॥ कुंभा प्रति दीप ठेवून ॥ रक्षणा नारी बैस विल्या ॥१११॥
नऊ मास भरतां पूर्ण ॥ प्रथम उपजला दुर्यों धन ॥ रासभ ध्वनी ऐसा पूर्ण ॥ टाहो फोडिला ते काळीं ॥११२॥
मेघ वर्षे रक्तधारीं ॥ प्रळय वायु सुटला ते अवसरीं ॥ थरथरां कांपे धरित्री ॥ आले शहारे जनांतें ॥११३॥
दिग्दाह होत कैसा ॥ धुंधरल्या दश दिशा ॥ दिवा भीतें बोभाती दिवसा ॥ श्वानें रडती दीर्घ स्वरें ॥११४॥
रासभस्वर ऐकतां ते अवसरीं ॥ अवधीं रासभें बाहती नगरीं ॥ भालू भुंकती वोखटे स्वरीं ॥ गजपुरीं हलकल्लोळ ॥११५॥
भविष्य सांगती ऋषी सकळी ॥ वडील सुत सर्वांचे मूळीं ॥ करील स्ववंशाची होळी ॥ सकळ रायां समवेत ॥११६॥
महा विष्णूशीं करील द्वेष ॥ दीर्घ दुःख देईल वडिलांस ॥ परमाग्रही तामस ॥ कापटय सागर दुरात्मा ॥११७॥
नाय केल श्रेष्ठांचें वचन ॥ यावरी बोले विदुर सुजाण ॥ प्रज्ञा चक्षो ऐकें पूर्ण ॥ त्याग करीं ज्येष्ठाचा ॥११८॥
वांच विणें असेल आपुलें कुळ ॥ तरी हा टाकावा चांडाळ ॥ जैसा बोटासी डंखितां व्याळ ॥ बोट तत्काळ खंडिती ॥११९॥
त्यागोनि मोह अनुमान ॥ गंगा जळीं देईं टाकून ॥ सर्वांचें होईल कल्याण ॥ आनंद घन लोक होती ॥१२०॥
दुर्योधनातें ह्रदयीं आलिंगोन ॥ धृत राष्ट्र बोले गर्जोन ॥ मी तुमचें वचन प्रमाण ॥ कदा पिही नायकें ॥१२१॥
मुख्य धुर वडील नंदन ॥ मी त्यावरूनि ओंवाळीन प्राण ॥ अरिष्टें उदेलीं तीं कालें करून ॥ शांत होतील आपें आप ॥१२२॥
असो दुर्योधन जन्मला ये रीतीं ॥ मग एका मागें एक निप जती ॥ परम पुष्ट बलाढय होती ॥ धार्त राष्ट्र अवघे पैं ॥१२३॥
गांधारी असतां गर्भीण ॥ रायासी पीडित मीन केतन ॥ अंधें केलें वेश्या गमन ॥ तो युयुत्सु जन्मला ॥१२४॥
असो इकडे पंडुराज वनीं ॥ मृगया खेळतां दिव्य काननीं ॥ मृग मृगींसी सुखमैथुनीं ॥ क्रीडतां विंधूनि पाडिलीं ॥१२५॥
तंव तो कुरंगरुपें तापसी ॥ पंडु धांवोनि आला त्यापाशीं ॥ ऋषि म्हणे पापराशी ॥ महा हिंसक पापिष्ठ तूं ॥१२६॥
मैथुनीं गुंतला भोजनीं बैसला ॥ कीं दुश्चिंत पाठिमोरा निजला ॥ त्यांसी वधितां लागला ॥ क्षात्र धर्मा कलंक ॥१२७॥
कुरंग करी हाहाकार ॥ मीं कर्दम नामा जाण विप्र ॥ लोक शंकें साचार ॥ मृग वेष धरियेला ॥१२८॥
पूर्ण न होतां मैथुन ॥ पापिया घेतलासी आमुचा प्राण ॥ राजा म्हणे मी नेणोन ॥ मृगें म्हणोनि वधियेलीं ॥१२९॥
आमुचा घेईं शाप दारुण ॥ तुज स्त्रीसंग होतां येथून ॥ तत्काळचि जातील प्राण ॥ पळ मात्र न लागतां ॥१३०॥
ऐसें बोलूनि दोघां जणीं ॥ प्राण दिधले तेचि क्षणीं ॥ पंडुराज उद्विग्न मनीं ॥ म्लान जाहला अति दुःखें ॥१३१॥
ब्रह्महत्येचें पाप पूर्ण ॥ वरी अंतरलें विषय मैथुन ॥ दोघी स्त्रियांसी पाचा रून ॥ वर्त मान सर्व सांगे ॥१३२॥
आक्रोशें बोले नृपवर ॥ मज कासया व्हावा राज्य भार ॥ तुम्हां ऐशा स्त्रिया सुंदर ॥ कासया मज आतां पैं ॥१३३॥
मज काय आतां हस्तिना पुर ॥ मज कासया वस्त्रालंकार ॥ व्यर्थ गेला जन्म संसार ॥ नाहीं पुत्र संता नही ॥१३४॥
आतां तुम्हीं दोघीं नगरासी ॥ जावें सत्यवती पाशीं ॥ अंबिका अंबालिका तेजोराशी ॥ त्यांसमीप असावें ॥१३५॥
भीष्म आणि विदुर ॥ यांची सेवा करावी सादर ॥ तुमचा आमुचा निर्धार ॥ ऋणानुबंध तुटला हो ॥१३६॥
मी सेवीन द्दढ कानन ॥ देह अनुतापें दंडीन ॥ पावेन पर लोक सदन ॥ तें साधन करीन मी ॥१३७॥
तों कुंती आणि माद्री ॥ विनविती जोडिल्या करीं ॥ आम्हीं सेवा करूनि अहो रात्रीं ॥ जवळी राहूं शिष्यत्वें ॥१३८॥
आम्ही दारा तूं कान्त ॥ हे भावना विसरूं समस्त ॥ अष्ट भोग त्यागूनि त्वरित ॥ राहों सेवेसी शिष्यत्वें ॥१३९॥
त्यांचें ऐकतां निश्वय वचन ॥ अवश्य म्हणे अंबालिका नंदन ॥ चित्रींचीं नारी नर जाण ॥ तैशीं वर्तूं लागलीं ॥१४०॥
आपुलीं वस्त्रें भूषणें समस्त ॥ पंडु ब्राह्मणांसी देत ॥ जैसा चंपक सुमनें वर्षत ॥ उदारत्वें पांथिकां ॥१४१॥
वेष्टूनियां वल्कलांबर ॥ भस्में चर्चिलें कलेवर ॥ ऐसा देखुनि पंडुनृपवर ॥ कुंती माद्री काय करिती ॥१४२॥
आम्रवृक्ष आपुलीं ॥ पाडा येतां फलें सकलीं ॥ टाकी तैशीं काढिलीं ॥ वस्त्रें भूषणें सतींनीं ॥१४३॥
पाचारूनि ऋषीश्वर ॥ वांटिती वस्त्रालंकार ॥ वेष्टूनियां वल्कलांबर ॥ पतिसन्निध तिष्ठती ॥१४४॥
चतु रंग दल बहुत ॥ त्यासी आज्ञापी नुपनाथ ॥ गजपुरा जाऊनि समस्त ॥ भीष्मधृत राष्ट्रांसी सांगिजे ॥१४५॥
आमुचा ऐसा जाहला विचार ॥ आपुला सांभाळा राज्य भार ॥ आतां भेटी हेचि निर्धार ॥ साधूं परत्र यावरी ॥१४६॥
रोदन करीत गेले समस्त ॥ जाण विती भीष्मधृत राष्ट्रां प्रत ॥ वर्षला एकचि आकांत ॥ शोका अंत नाहीं तेथें ॥१४७॥
इकडे घेऊनि उभय पत्नी ॥ पंडु प्रवेशे महाकाननीं ॥ वल्कलें वेष्टोनि तृणासनीं ॥ शय्या करिती उघडीच ॥१४८॥
नागेशगिरीश ओलांडून विलोकिती चित्ररथवन ॥ कालकूटगिरीवरी जाण ॥ दारां सहित ओळंघला ॥१४९॥
पुढें हिमाचलीं वास करिती ॥ वाहे दुग्धवर्ण भागीरथी ॥ जिच्या बिंदु मात्रें उद्धरती ॥ महापातकी हिंसक ॥१५०॥
तेथें ताप सांचे वृंद ॥ ठायीं ठायीं होत आनंद ॥ पुढें इंद्रधुम्न सरोवर अगाध ॥ पंडुराव पाहातसे ॥१५१॥
पुढें स्वार्गासी लगटला ॥ शत श्रृंत पर्वत देखिला ॥ जेथें ऋषींचा वसे मेळा ॥ वेदध्वनि गर्जत ॥१५२॥
जेथें दिव्य वृक्षीं सदा फल ॥ गंधर्वगायन निर्मल ॥ जें ऐकतां मंजुळ ॥ पंच प्राण तोषती ॥१५३॥
जेथें चंद्र सूर्य कांत पाषाण ॥ विमानीं दिसती सुरगण ॥ भूमिका सुवर्णा समान ॥ नवरत्नांची वाळू जेथें ॥१५४॥
जेथें मणिमय मंडप झळ कती ॥ अष्ट नायिका सदा क्रीडती ॥ प्रत्यक्ष देवांच्या मूर्ती ॥ येती सर्वदा ॥१५५॥
असो संत संगतीं नृपनाथ ॥ श्रवण मननें काल क्रमीत ॥ उभयकालीं होम देत ॥ अतिथि पूजा यथाविधि ॥१५६॥
देखोन पंडूचें तप खडतर ॥ ऋषि आश्चर्य करिती थोर ॥ मोठा तपस्वी पंडुनृपवर ॥ ब्रह्मर्षी सारिखा ॥१५७॥
तपोबलें करून वेगें ॥ ऋषी चालिले स्वर्ग मार्गें ॥ पंडुराज त्यांचेनि संगें ॥ चाले मागें हळूहळू ॥१५८॥
ऋषी पंडूसी म्हणती समस्त ॥ परम कठिण स्वर्गपथ ॥ पुण्याचे महा पर्वत ॥ गांठीसी तेणेंचि चढावें ॥१५९॥
येथें वाट न चाले मन पवनासी ॥ तूं दारां सहित केवीं येसी ॥ त्याही वरी निपुत्रि कासी ॥ मार्ग सह साही फुटेना ॥१६०॥
देव ऋषी दारा पितर ॥ या चहूं ऋणां पासूनि मुक्त साचार ॥ तोचि येथें चढेल नर ॥ इतरां मार्ग न चले हा ॥१६१॥
आतां नाना उपाय करून ॥ वाढवीं आपुलें संतान ॥ जाहलें जैसें द्वैपायना पासून ॥ जनन तुमचें त्यापरीं ॥१६२॥
उदरीं होतील सुत ॥ ते सत्क्रिया आचरतील समस्त ॥ मृग शापा पासाव होशी मुक्त ॥ मग स्वर्गपंथें चालसी ॥१६३॥
ऐसें ऐकूनि गज पुर पती ॥ खेद पावला परम चित्तीं ॥ नमस्का रूनि ऋषि पंक्ती ॥ स्त्रियां साहित परतला ॥१६४॥
एकान्त वनीं बैसून ॥ कुंती प्रति बोले वचन ॥ तूं महर्षीसी प्रार्थून ॥ संतति वाढवीं ममाज्ञें ॥१६५॥
शंका न धरावी मनांत ॥ आम्ही झालों व्यासा पासूनि सुत ॥ तैसेंचि तूंही करीं त्वरित ॥ तरी मुक्त तुम्ही आम्ही ॥१६६॥
शास्त्रीं सांगितले विचार ॥ बहुपरींचे असती पुत्र ॥ त्यांत ऋषिवीर्य पवित्र ॥ दिव्य सुत उपजवीं ॥१६७॥
कुंती म्हणे पितयाचे घरीं ॥ मी असतां बाल पणीं निर्धारीं ॥ दुर्वास ऋषीची सेवा करीं ॥ पित्राज्ञेकरू नियां ॥१६८॥
सेवेने संतोषला अत्रि पुत्र ॥ मज दिधले पांच मंत्र ॥ पुढील भविष्य जाणता पवित्र ॥ महा उदार ऋषी तो ॥१६९॥
एका मंत्राची मीं प्रचीत ॥ पाहिली कुमारी दशेंत ॥ प्रसन्न जाहला आदित्य ॥ कर्ण तत्काल जन्मला ॥१७०॥
तो राधेचे घरीं वाढे पुत्र ॥ आतां उरले चार मंत्र ॥ तुमची आज्ञा होईल पवित्र ॥ तरी बालकें जन्मवीन ॥१७१॥
ऐसें ऐकतां पंडुराज ॥ ह्रदयीं धरिली तत्काल भाज ॥ म्हणे तूंचि उद्धरिसी मज ॥ उभवी ध्वज सोम वंसीं ॥१७२॥
दरिद्रि यासी जोडलें धन ॥ मरति यासी अमृत पान ॥ कीं जन्मां धासी आले नयन ॥ तैसा पंडु संतोषला ॥१७३॥
तृषाक्रांत सोडितां प्राण ॥ मुखीं घालिजे शीतल जीवन ॥ कीं दुष्काळीं मिळे मिष्टान्न ॥ पंडु तैसा आनंदला ॥१७४॥
असो ते पृथा देवी आपण ॥ सारू नियां गंगा स्त्रान ॥ करूनि पंडुरा यासी नमन ॥ करी अवाहन धर्माचें ॥१७५॥
आदरें जोडूनियां हस्त ॥ नेत्र लावूनि मंत्र जपत ॥ तंव सूर्य प्रभे सम अकस्मात ॥ सूर्य सुत उतरला ॥१७६॥
दिव्य अंग कन कवर्ण ॥ कनक दिरीट कनकव सन ॥ कनकांगद ओप देती पूर्ण ॥ कनकदंड कमलकरीं ॥१७७॥
कुंती उदित देहदानीं ॥ सुरतानंदें मिसळलीं दोन्हीं ॥ वीर्य पडतां तेचि क्षणीं ॥ युधिष्ठार जन्मला ॥१७८॥
देववाणी गगनीं गर्जत ॥ सर्व भौम हा होईल सत्य ॥ पुण्य श्लोक दयावंत ॥ धर्म पुत्र धर्मात्मा ॥१७९॥
गांधारी गर्भवती असतां ॥ वर्ष एक पूर्ण भरतां ॥ धर्म जन्मला तत्त्वतां ॥ कुंती उदरीं अगोदर ॥१८०॥
तिथि वार नक्षत्र ॥ शुभ करण योग पवित्र ॥ सोम वंशीं पंडु पुत्र ॥ छत्रपति जन्मला ॥१८१॥
धर्म राजा देखोनि द्दष्टी ॥ पंडूच्या आनंद न समाये पोटीं ॥ म्हणे यासी पाठिराखा उठा उठी ॥ वल्लभे वेगें प्रसवें कीं ॥१८२॥
यावरी वसु देव भगिनी ॥ वायु मंत्र जपे ते क्षणीं ॥ लोक प्राणेश येऊनी ॥ सुरत युद्धा प्रवर्तला ॥१८३॥
सुरत संपतां समग्र ॥ पुत्र एक बल समुद्र ॥ तेजस्वी जैसा भास्कर ॥ भीम सेन जन्मला ॥१८४॥
मातृ हस्तीं न मावे बाळ ॥ हातींचा निसटला तत्काळ ॥ खालीं पडतां सबळ ॥ शिला चूर्ण जाहली ॥१८५॥
सिंह गर्जने ऐसा टाहो फोडीत ॥ कुंती थरथरां भयें कांपत ॥ गगनीं देव भेरी गर्जत ॥ पुष्प वृष्टि होत तेव्हां ॥१८६॥
तों देव वाणी गर्जत ॥ बळिया बाळ पंडु सुत ॥ पूर्वीं एक हनुमंत ॥ भीम सेन दुसरा हा ॥१८७॥
पूर्वीं ऐसा जाहला नाहीं ॥ पुढें कदा न होय पाहीं ॥ दैत्य राक्षस सर्वही ॥ संहारील निजबळें ॥१८८॥
याचे बलें सर्वेश्वर ॥ उतरील सकळ भूभार ॥ भविष्य ऐकोनि पंडुनृपवर ॥ परमानंद पावला ॥१८९॥
मग म्हणे अंगने प्रती ॥ आतां प्रार्थीं अमरपती ॥ एक वर्ष पर्यंत निश्चितीं ॥ मी आराधीन इंद्रातें ॥१९०॥
ऊर्ध्व जोडो नियां पाणी ॥ उभा राहिला एके चरणीं ॥ पृथे सहित अनुष्ठानीं ॥ एक वर्ष पर्यंत पैं ॥१९१॥
मग प्रकटला देव राज ॥ कां कामिनी बोला विलें मज ॥ येरी म्हणे पुत्र दे तेजः पुंज ॥ कौसल्या देवकी सारिखा ॥१९२॥
पाकशा सन म्हणे कुरंग नयनी ॥ बोलसी त्या हूनि विशेष गुणी ॥ उप मेसी एक चक्र पाणी ॥ ऐसा पुत्र देईन ॥१९३॥
कुंती आणि अमरपती ॥ सुरता नंदीं निमग्न होती ॥ तों नरेश्वर दिव्य मूर्ती ॥ पार्थ पावला जन्म पावला ॥१९४॥
तों गंभीर गिरा गर्जत ॥ आकाश वाणी बोलत ॥ जैसा शास्त्रां माजी वेदान्त ॥ तैसा पार्थ सोमवंशीं ॥१९५॥
नर आणि नारायण ॥ द्विधारूपें रमारमण ॥ भूभार उतरा वया लागून ॥ मृत्यु लोकीं अवतरले ॥१९६॥
पूर्वीं एक वीर भार्गव ॥ दुसरा भूभुजा वतार राघव ॥ तैसा सोमवंसीं नर पार्थिव ॥ पार्थ वीर जाणिजे ॥१९७॥
निवत कवच वधूनी ॥ संतोष वील वज्र पाणी ॥ खांडववन देऊनि अग्नी ॥ तृप्त पुरुषार्थें ॥१९८॥
संग्रोमटेव पाहूनि विशेष ॥ आनंद पावेल व्यो मकेश ॥ पाशुपत देईल निर्दोष ॥ महदस्त्र ते कालीं ॥१९९॥
कृष्ण मित्र हा अद्भुत ॥ ध्वजीं बैसवील अंजनी सुत ॥ ऐकोनि पंडु ऋषि समस्त ॥ जय जय क्रारें गर्जती ॥२००॥
भूपाल जिंकुनि समरां गणीं ॥ बांधील निजाज्ञेचे दावणीं ॥ भूपवृष भांच्या पाठीवरी गोणी ॥ कर भारांच्या आणील ॥२०१॥
सुरेश दुंदुभि त्राहाटी ॥ वर्षत दिव्य सुमन वृष्टी ॥ स्वर्गींची जितकी सृष्टी ॥ तितुकी पाहा वया ॥ पातली ॥२०२॥
ऐसा जन्मला वीर पार्थ ॥ तों माद्रीचें मन दुश्चिंत ॥ ममोदरीं नाहीं सुत ॥ म्हणोनि खेद करीतसे ॥२०३॥
पंडु म्हणे कुंतीतें ॥ तुवां तोष विलें बहुत आम्हांतें ॥ परी खेद जाहला माद्रीतें ॥ तो परिहारीं वल्लभें ॥२०४॥
जाणो नियां पति मानस ॥ एक मंत्र दिधला माद्रीस ॥ सम वेत बीजन्यास ॥ जप करवी तिज हातीं ॥२०५॥
तों अश्विनी कुमार तेथें आले ॥ स्वरेत देऊनि तये वेळे ॥ पुत्र आवळे जावळे ॥ जन्म विते जाहले तेधवां ॥२०६॥
नकुल आणि सह देव ॥ एक रूप एक ठेव ॥ एवं पंच पुत्रांचें वैभव ॥ पंडुराज भोगीतसे ॥२०७॥
धर्म भीम अर्जुन ॥ तिघे कुंतीचे नंदन ॥ नकुल सह देव सुजाण ॥ माद्री उदरीं जन्मले ॥२०८॥
जाहलें पांडवांचेम जनन ॥ जें बोलिला कृष्ण द्वैपायय ॥ तेंचि प्राकृत भाषेक रून ॥ तुम्हां पुढें निरोपिलें ॥२०९॥
शत शृंगनामक पर्वतीं ॥ राहिला असे पंडुनृपती ॥ सुधार साहुनि ॥ निश्चितीं ॥ कथा पुढें गोड असे ॥२१०॥
पांडुरंग नगर पुण्य रूप ॥ श्री विठ्ठल मूर्ती समीप ॥ निपजला पांडवप्रताप ॥ ग्रंथ परम हा ॥२११॥
मूळ भारत प्रमाण ॥ तेचि कथा येथें संपूर्ण ॥ निर्मत्सर ह्रदय करून ॥ पंडित भक्तीं पहावें ॥२१२॥
ब्रह्मा नंदा अवधूता ॥ श्री धर वरदा पंढरीनाथा ॥ पुढें वदबीं रसाळ कथा ॥ व्यास भारता अन्वयें ती ॥२१३॥
स्वस्ति श्री पांडव प्रताप ग्रंथ ॥ आदिपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ सप्तमाध्यायीं कथियेला ॥२१४॥
॥ इति श्री श्री धर कृतपांडव प्रतापा दिपर्वणि सप्तमाध्यायः ॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्री पांडवप्रताप आदिपर्व सप्तमाध्याय समाप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 18, 2012
TOP