पांडवप्रताप - अध्याय ६० वा
पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जैमिनि म्हणे राजेंद्रा ॥ जनमेजया चातुर्यचंद्रा ॥ श्यामकर्ण आला मणिपुरा ॥ तंव अपूर्व वर्तलें ॥१॥
तेथें बभ्रुवाहन राज्य करी ॥ परमपुण्य सदाचारी ॥ श्रीकृष्णभक्ति नगरीं ॥ सकल लोकां लाविली ॥२॥
प्रजा सुखरुप बोलती ॥ दंड एक छत्रा अमित्राप्रती ॥ बंध सुमनासी निश्चितीं ॥ हार सुंदर गुंफितां ॥३॥
खेळता सारंगपाट मार ॥ अवर्षण नाहीं दुष्काळ दरिद्र ॥ आनंदभरित लोक समग्र ॥ आधि व्याधि कांहीं नसे ॥४॥
आळोआळी सुंदर मंदिरें ॥ मंदिरांप्रति सुवर्णगोपुरें ॥ गोपुरांप्रति एकसरें ॥ चर्या बहुत झळकती ॥५॥
चर्यांप्रति मुक्त हंस ॥ हंस तेथें परमहंस ॥ परमहंसी आशापाश ॥ तुटोनि गेले सकलही ॥६॥
निराशा तेथेंइ ज्ञान ॥ ज्ञान तेथें समाधान ॥ समाधान तेथें गहन ॥ सुख सर्व वसतसे ॥७॥
सुख तेथें संतजन ॥ संत तेथें हरिकीर्तन ॥ कीर्तन तेथें जगज्जीवन ॥ आनंदघन सर्वदा ॥८॥
असत्य नाहींच मुळींहून ॥ लोक बोलती गीर्वाण ॥ शास्त्रश्रवण वेदाध्ययन ॥ घरोघरीं होतसे ॥९॥
नगरींचे वीर समग्र ॥ रणशूर आणि दानशूर ॥ पाठिमोरे अणुमात्र ॥ दोहीं गोष्टींसी न होती ॥१०॥
सर्व राजे लहान थोर ॥ बभ्रुवाहनासी देती करभार ॥ आश्चर्य करी सुभद्रावर ॥ पराक्रम त्याचा ऐकतां ॥११॥
हंसध्वज म्हणे अर्जुना ॥ आम्ही करभार देतों बभ्रुवाहना ॥ त्यासी मातेसमान परललना ॥ नगरीं आज्ञा हेचि त्याची ॥१२॥
तों गृध्र येऊनि अकस्मात ॥ पार्थाचे मुकुटीं बैसत ॥ अपशकुन देखोनि चित्त ॥ खेद पावलें सर्वांचे ॥१३॥
तों सेवकांनी घोडा धरिला ॥ बभ्रुवाहनासमीप आणिला ॥ सभेसी तो महाराज बैसला ॥ सकल नृपांसमवेत ॥१४॥
दहा सहस्त्र स्तंभ ॥ सभेसी मणिमय सुप्रभ ॥ नीळयांची उथाळीं स्वयंभ ॥ तुळवट कार्तस्वराचे ॥१५॥
दांडे पाचूचे झळकत ॥ किलचा आरक्त मणिमंडित ॥ असो तो चित्रांगीचा सुत ॥ पार्थवीर्यै जन्मला ॥१६॥
पार्थे पूर्वीं तीर्थे केलीं ॥ आदिपर्वीं हे कथा कथियेली ॥ उलूपे चित्रांगी वरिली ॥ सुभद्रावरें पूर्वीच ॥१७॥
अश्वोत्तमाचे भाळीं ॥ पत्र लिहिलें तें वाची तये वेळीं ॥ बभ्रुवाहन चित्रांगीजवळी ॥ वर्तमान सांगतसे ॥१८॥
ती म्हणे तुझा पिता अर्जुन ॥ तेणें सोडिला हा श्यामकर्म ॥ तरी तूं त्याजवरी शस्त्र धरुन ॥ उभा ठाकों नकोचि ॥१९॥
घोडा आणि सर्व राज्य घेऊन ॥ जाऊनि देईं पितयालागून ॥ दृढभावें धरीं चरण ॥ थोरपण सांडूनिया ॥२०॥
मग सर्व संपत्तीशीं बभ्रुवाहन ॥ चरणचालीं चालिला शरण ॥ पार्थ पित देखोन ॥ साष्टांग नमन करी तेव्हां ॥२१॥
म्हणे मी तुझा नंदन ॥ चित्रांगीउदरीं जाहलों निर्माण ॥ सर्व राजे विनविती पूर्ण ॥ पुत्रासी भेटें पार्थवीरा ॥२२॥
याएवढा नाहीं पुरुषार्थी ॥ नृप सर्व शरण येती ॥ ऐसा वीर दुजा क्षितीं ॥ पुन्हा न होय सर्वथा ॥२३॥
पार्थचरणीं ठेविलें भाळ जाण ॥ तें न काढीच बभ्रुवाहन ॥ अर्जुनें क्रोधेंकरुन ॥ लत्ता हाणोन लोटिला ॥२४॥
तूं कदा नव्हे माझा सुत । अतिनिर्बळ षंढ भयभीत ॥ कीं जारकर्मे निश्चित ॥ उपजविला चित्रांगीनें ॥२५॥
घोडा धरुनि कैसा सोडिला ॥ अरे माझा अभिमन्यु पुत्र भला ॥ जेणें अद्भुत पराक्रम केला ॥ दोहीं दळांदेखतां ॥२६॥
तो पुत्र माझा सिंह देख ॥ तूं कैंचा जाहलासी जंबुक ॥ तूं नाचणारीचा सुत सम्यक ॥ तूंही नटवा होईं आतां ॥२७॥
शस्त्रें टाकीं ये अवसरीं ॥ नृत्य करुनि पोट भरीं ॥ तूं नव्हेसी क्षत्रिय निर्धारीं ॥ मज निश्चयें कळों आलें ॥२८॥
ऐसें ऐकतां बभ्रुवाहन ॥ क्षोभला जैसा प्रलयाग्न ॥ म्हणे तुझें सर्व सोशीन ॥ परी एक गोष्टी न सोसवे ॥२९॥
माझे मातेसी जारीण ॥ बोलिलासी स्वमुखें करुन ॥ तरी घे हातीं धनुष्यबाणा ॥ क्षत्रियत्व माझें पाहें आतां ॥३०॥
तुझिया गर्वाचीं कवचें पूर्ण ॥ आजि समरांगणीं करीन चूर्ण ॥ अरे मी जरी असेन बभ्रुवाहन ॥ तरी शिर उडवीन तुझें आतां ॥३१॥
इंद्र रुद्र आणि द्रोण ॥ यांपाशीं विद्या शिकलासी जाण ॥ तिचा झाडा दे आझि संपूर्ण ॥ येथें रणयज्ञ करितों मी ॥३२॥
घोडा नेऊनि ते अवसरीं ॥ मागुती बांधिला मणिपुरीं ॥ साठ कोटी रथ ज्याचे भारीं ॥ आठ अर्बुद अश्वोत्तम ॥३३॥
दश कोटी गज सबळ ॥ दोन खर्व पायदळ ॥ मग तो चित्रांगीचा बाळ ॥ रथावरी आरुढला ॥३४॥
म्हणे रे पार्था सावधान ॥ सांभाळीं आले माझे बाण ॥ तुझे देहींचे पंच प्राण ॥ आजि काढीन बाहेरी ॥३५॥
मी कृतान्त बभ्रुवाहन ॥ आजि तुज समरीं रक्षील कोण ॥ तुजसांगातें नृप संपूर्ण ॥ त्यांचा झाडीन गर्व आतां ॥३६॥
तों बाण सोडीत ते वेळां ॥ अनुशाल्व पुढें धांविन्नला ॥ बभ्रुवाहनें जर्जर केला ॥ शंभर बाणीं सक्रोधें ॥३७॥
सूत आणि स्यंदन ॥ अनुशाल्वाचा केला चूर्ण ॥ बाणजाळ दोघे जण ॥ असंभाव्य वर्षती ॥३८॥
अनुशाल्व योद्धा वीर ॥ परी बभ्रुवाहनें केला जर्जर ॥ हातींचे गळाले चापशर ॥ मूर्च्छना येऊनि पडियेला ॥३९॥
यावरी धांवला प्रद्युम्न ॥ सोडी बाणापाठीं बाण ॥ नानाशस्त्रें टाकून ॥ निःशंक भिडती समरांगणीं ॥४०॥
होत युद्धाचें धनचक्र ॥ दोन्ही सेना पडल्या अपार ॥ मोठें माजलें रण भयंकर ॥ रक्ताचे पूर वाहती ॥४१॥
भूतावळी रक्त पिती ॥ तृप्त होऊनि रणीं नाचती ॥ अस्थींचे दुर्ग रचिती ॥ मग भांडती परस्परें ॥४२॥
परस्परें शिरें भिरकाविती ॥ मूर्च्छना येऊनि भूतें पडती ॥ बभ्रुवाहनें केली ख्याती ॥ सेना सर्व संहारिली ॥४३॥
बभ्रुवाहनें सोडिला बाण ॥ तो भेदीत गेला वारण ॥ सवेंचि अश्व रथ छेदून ॥ पदातियांसी मारीत ॥४४॥
माजलें बहुताचि रण ॥ तों पुढें धांवला मेघवर्ण ॥ दोघांचे युद्ध दारुण ॥ शक्रारिसौमित्रांसारिखे ॥४५॥
भ्याद घायाळ पळती ॥ त्यांसी ठाव नेदी कोठें क्षिती ॥ एक गजकलेवरांत दडती ॥ तेथें भेदिती सायक ॥४६॥
समरीं पडले जे वीर ॥ ते विमानारुढ होती सत्वर ॥ त्यांसी देवांगना करिती भ्रतार ॥ घेऊनि जाती आत्मसदना ॥४७॥
भिऊनि जे मेले रणीं ॥ वरिती यक्षिणी ॥ पार्थाची संपदा हरुनी ॥ नेववीत बभ्रुवाहन ॥४८॥
कित्येक वीर धरुनि जीवंत ॥ बभ्रुवाहनें पाठविले नगरांत ॥ पूर्वीं लवकुशे रघुनाथ ॥ ऐसाचि जिंकिला समरांगणीं ॥४९॥
लवकुशांची कथा निश्चितीं ॥ वर्णिली रामविजयग्रंथी ॥ तेचि पहावी पंडितीं ॥ अति सुरस जी कथा ॥५०॥
तीन अध्याय जाण ॥ रामविजयीं लवकुशाख्यान ॥ तेथील कथा श्रोतीं परिसोन ॥ परमसुख पाविजे ॥५१॥
असो यावरी तो हंसध्वज ॥ स्वसेनेशीं धांवला भूभुज ॥ पांच सहस्त्र सेना सतेज ॥ बभ्रुवाहनाची मारिली ॥५२॥
पार्थसुतें तीन बाणीं ॥ हंसध्वज पाडिला रणकुंभिनी ॥ अत्यंत मूर्च्छा येऊनी ॥ निश्चेष्टित राहिला ॥५३॥
मग सुवेग धांवला सत्वर ॥ तेणें माजविलें रण थोर ॥ दहा सहस्त्र कुंजर ॥ रणमेदिनीं पाडिले ॥५४॥
बभ्रुवाहनाचे अनिवार शर ॥ छेदिले सुवेगाचें तत्काल शिर ॥ शिर धांवोनि आदळलें सत्वर ॥ पार्थसुताचे वक्षःस्थलीं ॥५५॥
बभ्रुवानासी आली मूर्च्छना ॥ सवेंचि सावध जाहला त्या क्षणा ॥ तों वृषकेत वीरराणा ॥ समरांगणीं आलासे ॥५६॥
दोघे युद्ध करिती अनिवार ॥ जैसे मेरु आणि मंदार ॥ वर्मे लक्षूनि भेदिती शर ॥ हांकें अंबर गाजविती ॥५७॥
जैसे शिखी पिच्छें पसरिती ॥ तैसे वीर दोघे दिसती ॥ दोघांचे कौशल्य पाहती ॥ देव विमानीं बैसोनी ॥५८॥
जीवंतचि वीर धरुन ॥ नगरांत पाठवी बभ्रुवाहन ॥ त्यांचे घाय बांधविती येऊन ॥ उलूपी आणि चित्रांगी ॥५९॥
भ्रताराचे वीर म्हणून ॥ करिती साक्षेपें पालन ॥ कृष्णपुत्र जो पद्युम्न ॥ तोही धरुन आणिला ॥६०॥
शिबिरासहित सर्व संपत्ती ॥ लुटूनि आणिली नगराप्रती ॥ पार्थ म्हणे पुढें गती ॥ बरवी कांहीं न दिसे ॥६१॥
वृषकेतासी म्हणे पार्थ ॥ तूं तरी गजपुरासी जाईं त्वरित ॥ तुज होतां विपरीत ॥ धर्म कुंती प्राण देती ॥६२॥
आतां अश्वमेध राहिले ॥ असिपत्रव्रत व्यर्थ गेलें ॥ माझें सामर्थ्य बुडालें ॥ मृत्युचिन्हें जाणवती ॥६३॥
वृषकेत म्हणे जी ताता ॥ मी गजपुरा न जाईं तत्त्वतां ॥ पश्चिमे उगवेल सवितां ॥ परी हे गोष्टी न घडेचि ॥६४॥
आजि मी झुंजेन निर्वाण ॥ घेईन बभ्रुवाहनाचा प्राण ॥ म्हणोनि लोटिला स्यंदन ॥ क्रोधें वचन बोलत ॥६५॥
म्हणे बभ्रुवाहना राहें स्थिर । समरीं साहें माझे शर ॥ मग तीन बाणीं कर्णपुत्र ॥ पार्थसुतें भेदिला ॥६६॥
हृदय त्याचें लक्षून ॥ वृषकेतें सोडिले सहा बाण ॥ सवेंचि छेदूनि स्यंदन ॥ चूर्ण केला समरभूमी ॥६७॥
यावरी अस्त्रजाळ ॥ सोडिते जाहले वीर सकळ ॥ नानाशस्त्रें तेजाळ ॥ टाकिताती परस्परें ॥६८॥
ग्रीवा डोलवी पार्थसुत ॥ धन्य योद्धा वृषकेत ॥ मग शक्ति टाकितां अद्भुत ॥ कर्णसुतें छेदिली ती ॥६९॥
कौतुक पाहे अर्जुन ॥ एकाचे एक उडविती स्यंदन ॥ रथासहित कर्णनंदन ॥ उडवून धाडिला सूर्यलोका ॥७०॥
दोन दिवस सूर्यलोकांत ॥ अंबरींच होता भ्रमत ॥ तिसरे दिवशीं वृषकेत ॥ भूमीवरी पडियेला ॥७१॥
बभ्रुवाहनासहित वृषकेतें ॥ रथ उडविला गगनपंथें ॥ तों उडी टाकूनि पार्थसुतें ॥ वृषकेतावरी कोसळला ॥७२॥
पार्थ कौतुक मानी चित्तीं ॥ म्हणे धन्य वीर त्रिजगती ॥ हें युद्ध ‘न भूतो न भविष्यति’ ॥ ऐकिलें ना देखिलें ॥७३॥
अंतरिक्षयुद्ध करिती ॥ सवेंचि उतरती रणक्षितीं ॥ छप्पन्न देशींच्या युद्धगती ॥ दोघे दाविती परस्परें ॥७४॥
ऐसें युद्ध आसमास ॥ दोघांचें जाहलें पांच दिवस ॥ टाकावया श्वासोच्छ्वास ॥ एक निमेष न फावेचि ॥७५॥
यावरी बभ्रुवाहनें एक बाण ॥ सोडिला निर्वाणींचा दारुण ॥ वृषकेताचें शिर जाण ॥ आकाशपंथें उडविलें ॥७६॥
सवेंचि शिर परतलें ॥ पार्थसुताचे हृदयीं आदळलें ॥ मागुती कंदुकाऐसें उडालें ॥ पडिलें पार्थपदाजवळी ॥७७॥
शिर कृष्णाचे स्मरण करीत ॥ कबंध रणीं चवताळत ॥ शिर नसतां एकशत ॥ वीर पाडिले रणांगणीं ॥७८॥
हातीं घेऊनि रथचक्र ॥ शिराविण फिरे कलेवर ॥ वीर मारुनि अपार ॥ मग गडबडे भूमीवरी ॥७९॥
शोकार्णवीं पार्थ निमग्न ॥ शिर तें हृदयीं आलिंगून ॥ वृषकेताचे आठवूनि गुण ॥ आक्रोश करुं लागला ॥८०॥
अहा कर्णा कैसें केलें ॥ बंधुत्व कळूं नाहीं दिधलें ॥ आमुचें ऋण फेडिलें ॥ पुत्ररुपेंकरुनियां ॥८१॥
अरे वृषकेता वेल्हाळा ॥ कर्णजा माझिया लघुबाळा ॥ वत्सा राजसा ये वेळां ॥ मज टाकूनियां गेलासी ॥८२॥
अरे तूं दुसरा प्रतिकर्ण ॥ आम्ही पांचही सुखी तेज देखोन ॥ तुज पाहोनि अभिमन्य ॥ मी विसरलों वृषकेता ॥८३॥
आतां कुंती धर्म देतील प्राण ॥ राहिला अश्वमेध महायज्ञ ॥ अरे तुवां अनुशाल्व जिंकून ॥ पायीं धरुन आणिला ॥८४॥
अरे यौवनाश्व तूं जिंकिला ॥ श्यामकर्ण तो आणिला ॥ कीं मजवरी रुसोनि वेल्हाळा ॥ माझिया बाळा गेलासी ॥८५॥
तुजवरी पांचाळीचें मन ॥ ती ऐकतां त्यागील प्राण ॥ तुझें शिर हरिस्मरण ॥ करीत अजून नवल हें ॥८६॥
वक्षःस्थळ पिटीत अर्जुन ॥ आतां चौघे जण बंधु देतील प्राण ॥ माझा कुलदीपक प्रभाघन ॥ आजि विझाला या ठायीं ॥८७॥
कुलक्षय जाहला निश्चयेंसीं ॥ म्हणे हे कृष्णा द्वारकावासी ॥ यादवेंद्रा काय जाहलासी ॥ गुंतलासी कोणे कार्या ॥८८॥
आम्हांसी प्राप्त हे अवस्था ॥ कां उपेक्षिलें मज अनाथा ॥ दुःखें मूर्च्छना आली पार्था ॥ निश्चेष्टित पडियेला ॥८९॥
त्यासी धनुष्यकोटीकरुन ॥ येऊनि डवची बभ्रुवाहन ॥ म्हणे वेश्येचा मी नंदन ॥ कीं पतिव्रतेचा तें पाहें ॥९०॥
दीन स्त्रियेऐसा व्यर्थ ॥ पडलासी कां येथें रडत ॥ तुवांव युद्ध केलें पूर्वीं अद्भुत ॥ तें मज दावीं क्षणभरी ॥९१॥
तूं जुनाट झुंजार म्हणविसी ॥ ऊठ विद्या दावीं कैसी ॥ लाज सोडूनि रणीं रडसी ॥ दुजया लाविसी दूषणें ॥९२॥
मग उठोनी सुभद्रापती ॥ सत्वर चढला आपुले रथीं ॥ मेघधारा वर्षती ॥ तैसे सायक सोडिले ॥९३॥
सर्वांगी खिळिला बभ्रुवाहन ॥ पृतना संहारिली संपूर्ण ॥ शिरें आकाशपंथें उडोन ॥ मणिपुरामाजी पडताती ॥९४॥
आकाश व्यापिलें बाणीं ॥ धुळी न माये दिशांचे वदनीं ॥ पार्थे वीर पाडिले धरणीं ॥ लेखा त्यांचा न करवे ॥९५॥
दोन्ही हातांचें समसंधान ॥ अलातचक्रवत दिसे सायकासन ॥ टाकूनियां वज्रबाण ॥ कोट पाडिला मणिपुराचा ॥९६॥
गोपुरें खळखळां रिचवती ॥ ग्राम सांडूनि स्त्रिया पळती ॥ बभ्रुवाहन भावी चित्तीं ॥ धन्य क्षितीं किरीटी वीर ॥९७॥
यावरी बभ्रुवाहन ॥ सोडी लक्षांचे लक्ष बाण ॥ पाडिलें छेदून ॥ रथ उडविला निराळीं ॥९८॥
हनुमंतासमवेत रथ ॥ आकाशपंथें असे भ्रमत ॥ मग खालीं उतरोनि पार्थ ॥ शस्त्रें सोडी बहुतचि ॥९९॥
एक काळ एक कृतान्त ॥ समरीं तैसे दोघे दिसत ॥ पार्थे तो आपुला सुत ॥ शरपंथी खिळियेला ॥१००॥
एक रमारमण एक उमारमण ॥ एक शीतकर एक उष्णाकिरण ॥ तों बोले बभ्रुवाहन ॥ अति तीक्ष्ण तेधवां ॥१०१॥
म्हणे माझे मातेसी ठेविलें दूषण ॥ पापिया तुझें न पहावें वदन ॥ त्वां पूर्वी कुलक्षय करुन ॥ आप्त गोत्रज मारिले ॥१०२॥
तूं करीं आतां कृष्णस्मरण ॥ तुझें शिर टाकितों छेदून ॥ तूं अधर्मे मारिला कर्ण ॥ रथचक्र उपटितां ॥१०३॥
पहा बंधु माझा वृषकेत ॥ बाळें केवढा केला पुरुषार्थ ॥ तों गंगेच्या शापें पार्थ ॥ मोह पावला रणांगणीं ॥१०४॥
बभ्रुवाहनें सोडिला अर्धचंद्र शर ॥ उडविलें पार्थाचें शिर ॥ ज्वाला बाणजाळीं साचार ॥ नीलध्वजाची दारा जे ॥१०५॥
पार्थ पडतां रणीं ॥ थरथरा कांपली कुंभिनी ॥ वृषकेताच्या शिराजवळी ते क्षणीं ॥ शिर पडलें पार्थाचें ॥१०६॥
किरीट कुंडलें मंडित ॥ चंद्रसूर्याऐशीं शिरें दिसत ॥ बभ्रुवाहन जयवंत ॥ वाद्यें वाजवीत परतला ॥१०७॥
परम उत्साह करीत ॥ प्रवेशला मणिपुरांत ॥ उलूपी-चित्रांगीस मात ॥ वर्तली ते सर्व श्रुत करी ॥१०८॥
दोघींनी काढिले अलंकार ॥ शिरें भूमीवरी टाकिती सत्वर ॥ आठवूनि पार्थ वीर ॥ दीर्घ हांका फोडिती ॥१०९॥
अहा कृष्णा श्रीकृष्णमित्रा ॥ अहा कृष्णा कोमलगात्रा ॥ तूं अनिवार ब्रह्मादिशक्रां ॥ आजि कैसा रणीं पडिलासी ॥११०॥
गोग्रहणींचा पुरुषार्थ ॥ एकटयानें कौरव जिंकिले समस्त ॥ निवातकवच दैत्य ॥ त्यांचा अंत केला तुवां ॥१११॥
तुझा सारथी इंदिरावर ॥ ध्वजीं भुभुःकारे महारुद्र ॥ अकरा अक्षौहिणी दळ समग्र ॥ तुवां आटिलें रणांगणीं ॥११२॥
अहा महाराज सुभद्रापती ॥ ब्रह्मांडभरी तुझी कीर्ती ॥ सर्व सोडूनि रणक्षितीं ॥ शयन केलें कैसें तुवां ॥११३॥
खद्योतें पाडिला गभस्ती ॥ तंदुळभार मेला हस्ती ॥ कल्पांतींचे सौदामिनीप्रती ॥ शलभें कैसें गिळियेलें ॥११४॥
मशकें केवीं गिळिला पर्वत ॥ मुंगीनें प्राशिला सरिता नाथ ॥ चित्रींच्या सर्पे अकस्मात ॥ अरुणानुज केवीं गिळियेला ॥११५॥
मक्षिकेनें पक्षवातेंकरुनी ॥ केवीं विझविला दावाग्नी ॥ भोगींद्रासी आणूनी ॥ मंडूकें केवीं भक्षिलें ॥११६॥
मातेचा कोलाहल ऐकून ॥ धांवोनि आला बभ्रुवाहन ॥ तों मंगळसूत्रें तोडून ॥ अलंकार सर्व काढिले ॥११७॥
जाहला तो सांगितला वृत्तान्त ॥ माझा अन्याय सांगें येथ ॥ तुज दूषण ठेवूनि लाथ ॥ मज मारिली पितयानें ॥११८॥
तंव त्या बोलती ते समयीं ॥ अरे पितृघातक्या परता होईं ॥ धिक् पुरुषार्थ तुझा सर्वही ॥ वदन न दावीं काळमुख्या ॥११९॥
बभ्रुवाहन म्हणे साचार ॥ माता हो घ्या तुम्ही अलंकार ॥ तंव त्या म्हणती खदिरांगार ॥ लेववीं आतां यावरी ॥१२०॥
अरे आमुचा पति पडला रणीं ॥ आम्हांसी नेईं तये स्थानीं ॥ मग दोघी येऊनि रणांगणीं ॥ प्रेत कवळूनि शोक करिती ॥१२१॥
पार्थाचिये चरणीं ॥ शिरें ठेवूनि बोलती वाणी ॥ हे नाथ ऊठ ये क्षणीं ॥ टाकूनियां आम्हां जासी कां ॥१२२॥
ऊठ राया यंत्र भेदीं बाणीं ॥ ऊठ द्रुपदा आणीं धरुनी ॥ गायी नेल्या कौरवांनी ॥ रथीं बैसोनि धांवें कां ॥१२३॥
गंधर्वीं नेले बंधु समस्त ॥ सोडवीं लवकरी धांवें त्वरित ॥ अरे बभ्रुवाहना तूं नांव केलें अद्बुत ॥ पितृघात करुनियां ॥१२४॥
परशुरामें वधिली माता ॥ तुवां दोघांचिया घाता ॥ अरे तूं यज्ञघातकर्ता ॥ नष्टा पतिता पितृघ्ना ॥१२५॥
आतां द्रौपदी आणि चोघे सहोदर ॥ प्राण देतील ऐकतां समाचार ॥ मातेचा खेद देखोनि अपार ॥ पार्थकुमार गहिंवरला ॥१२६॥
मज उभयलोक अंतरले ॥ माझें जन्म व्यर्थ गेलें ॥ तों उलूपी म्हणे ते वेळे ॥ उपाय एक येथें असे ॥१२७॥
माझा पिता सहस्त्रवदन ॥ अमृतसंजीवनमणि पूर्ण ॥ त्यापाशीं आहे तो आणून ॥ पार्थवृषकेतां जीववावें ॥१२८॥
परी सर्प तेथें अनिवार ॥ कठिण कर्य असे फार ॥ कुंती आली नाहीं जों सत्वर ॥ आधीं साधीं कार्य हें ॥१२९॥
हिमनगजामातें तो मणी ॥ दिधला असे सर्पांलागूनी ॥ सर्प पडती जे मरोनी ॥ स्पर्शतां मणि उठती ते ॥१३०॥
मग बभ्रुवाहन बोलत ॥ यांचीं शरीरें रक्षा शिरांसहित ॥ उलूपी म्हणे पुत्रा तेथ ॥ तुज प्रवेश कदा नव्हे ॥१३१॥
सर्प घेतील तुझा प्राण ॥ तरी मी करितें कांहीं यत्न ॥ मग पुंडरीक नामा सर्प तेथून ॥ उलूपी पाठवी तयातें ॥१३२॥
आपुलें मंगलसूत्र गेलें तुटोन ॥ हें दाखवीं जनकासी नेऊन ॥ मग तो पुंडरीक निघाला तेथून ॥ शेषमंदिरीं पातला ॥१३३॥
तों पाहतां पातालभुवन ॥ वाटे अमरपद न्यून ॥ रत्नमय सर्व पाषाण ॥ भूमि संपूर्ण कनकाची ॥१३४॥
नानावृक्षी समानत्व ॥ जेथें हाटकेश्वर मुख्य दैवत ॥ हाटकनदी सदा वाहत ॥ प्रकाशे तेथें शेषमणि ॥१३५॥
तेथें सूर्याचे नाहीं किरण ॥ सहस्त्रयोजनें विस्तीर्ण ॥ असो तो पुंडरीक वर्तमान ॥ भोगींद्राप्रति सांगत ॥१३६॥
कन्येचें कंठसूत्र तुटलें ॥ तें शेषानें दृष्टीनें पाहिलें ॥ सभेसी सर्व सर्प बैसले ॥ श्रुत जाहलें वर्तमान ॥१३७॥
मणि द्यावया सहस्त्रवदन ॥ सिद्ध जाहला हें जाणोन ॥ धृतराष्ट्रनामा सर्प वचन ॥ क्रोधेंक्रुन बोलत ॥१३८॥
अमृतमणि मृत्युलोकास ॥ नेलिया गेलें सर्व यश ॥ मागुती मणि आम्हांस ॥ सहसा न मिळेचि ॥१३९॥
जरी गरुडें नेला हिरोन ॥ तरी मग कैसें वर्तमान ॥ मातंगऋषीच्या शापेंकरुन ॥ गरुड न ये पाताळा ॥१४०॥
आणि मनुष्य गर्विष्ठ होती ॥ ते आम्हांसी कदा न मानिती ॥ आमुचे मस्तकींचे मणि हिरोनि नेती ॥ ललना करिती कंठहार ॥१४१॥
मग आम्हांसी घेऊनि भिकारी ॥ भीक मागती दारोदारीं ॥ शेष म्हणे कोपेल मुरारी ॥ मणि न देतां तत्त्वतां ॥१४२॥
परमप्रतापी स्वामी श्रीधर ॥ कालिया मर्दूनि वधिला अघासुर ॥ तरी मणिवर देऊनि इंदिरावर ॥ तोषवूनि मित्र करावा ॥१४३॥
तों धृतराष्ट्र बोले वचन ॥ कृष्णचि त्यांसी देईल प्राणदान ॥ परी मणि न देऊं गेलिया प्राण ॥ सत्य जाण भोगींद्रा ॥१४४॥
मग नकुळाहातीं जाणा ॥ शेष सांगूनि पाठवी बभ्रुवाहना ॥ मी मणि देतों परि येथें विघ्ना ॥ सर्प सर्व करिताती ॥१४५॥
तों पुंदरीक सर्प येऊन ॥ बोले उलूपी चित्रांगीलागून ॥ तुम्ही सुखें आतां द्या अग्न ॥ मणि कदा येत नाहीं ॥१४६॥
यावरी तो बभ्रुवाहन ॥ क्षोभला जैसा प्रलयकृशान ॥ बाणाच्या गळां पत्र बांधोन ॥ पातालभुवना पाठविला ॥१४७॥
सर्प पत्र पाहती उकलोन ॥ लिहिलें मणि द्यावा पाठवून ॥ नाहीं तरी तुम्हांसी संहारीन ॥ करीन सर्वस्वें निर्वंश ॥१४८॥
शेष म्हणे हो अवधारा ॥ आतां बभ्रुवाहनाशीं युद्ध करा ॥ अरे धृतराष्ट्रा पामरा ॥ वंशक्षय मांडिला तुवां ॥१४९॥
मग सर्पभार सिद्ध जाहले ॥ रथगजअश्वांवरी आरुढाले ॥ विवरमार्गे पृथ्वीवरी आले ॥ युद्ध मांडलें संबळ तेथें ॥१५०॥
आकाशीं सघन मंडलें ॥ तेवीं दाटलीं चहूंकडे सर्पकुळें ॥ बभ्रुवाहनाचें कटक वेढिलें ॥ संहारिलें बहुसाल ॥१५१॥
भांडत धृतराष्ट्र विखार ॥ सेना संहारिली एकवीस सहस्त्र ॥ मग श्वेतवाहनपुत्र ॥ छेदीत विखार ऊठिला ॥१५२॥
तडतडां तुटती तेथें फणी ॥ नक्षत्रांऐसे रिचवती मणी ॥ म अस्त्रें चहूंकडूनी ॥ मयूर गरुड नकुळादि ॥१५३॥
मधुमेघ सोडूनि अमूप ॥ आधीं न्हाणिले सर्व सर्प ॥ यावरी तीक्ष्ण तेजोरुप ॥ पिपीलिकास्त्र सोडिलें ॥१५४॥
तडतडां पिपीलिका तोडिती ॥ मयूर नकुळ खंडूनि भक्षिती ॥ त्यांत गरुड संहारिती ॥ चडफडती सर्व सर्व ॥१५५॥
बभ्रुवाहनाचे शरण ॥ सर्प धरिती धांवोन ॥ कित्येक शेषासी जाऊन ॥ वर्तमान सांगती ॥१५६॥
शेष गदगदां हांसत ॥ आतां कां रे पळतां भयभीत ॥ मग अमृतमणि पाठवीत ॥ वरी उचित छत्रकुंडलें ॥१५७॥
शेष स्वयें येऊन ॥ बभ्रुवाहनाचें करी समाधान ॥ मणि दिधला देखोन ॥ धृतराष्ट्र सर्प चडफडे ॥१५८॥
आपुल्या पुत्रांसी सांगे बुद्धी ॥ नामें तयांची दुःखभाव दुर्बुद्धी ॥ म्हणे पार्थवृषकेतांचीं शिरें आधीं ॥ अकदाल्भ्यवनीं लपवावीं ॥१५९॥
ते गुप्तरुपें शिरें घेऊनी ॥ लपविती तत्काळ घोर वनीं ॥ उलूपी चित्रांगी दोघी जणी ॥ हाहाकार करिती तेव्हां ॥१६०॥
शिरें नेलीं जाणोन ॥ दुःखें रडे बभ्रुवाहन ॥ म्हणे नासलें कार्य संपूर्ण ॥ केले प्रयत्न व्यर्थ गेले ॥१६१॥
इकडे कुंतीनें देखिलें स्वप्न ॥ पार्थ वृषकेत तेल लावून ॥ उष्ट्रावरी बैसोन ॥ दक्षिणादिशेप्रति गेले ॥१६२॥
कुंतीनें हरीपाशीं सांगतां स्वप्न ॥ त्यावरी बोले जगज्जीवन ॥ वृषकेत आणि अर्जुन ॥ मृत्यु पावले निःसंशय ॥१६३॥
मग गरुडारुढ होऊनि श्रीधर ॥ सवें कुंती आणि वृकोदर ॥ देवकी यशोदा सुंदर ॥ वहनीं बैसोनि चालिल्या ॥१६४॥
निमेष न लागतां ते काळीं ॥ येतीं जाहलीं मणिपुराजवळी ॥ चित्रांगी उलूपी देखिली ॥ हांक जाहली एकचि ॥१६५॥
अर्जुनाचें शिबिर भणभणित ॥ त्यासी दहा सहस्त्र स्तंभ जडित ॥ तैसेचि कळस झळकत ॥ भगणांसी हिणाविती ॥१६६॥
पार्थासी हृदयीं धरुन ॥ शोक करी जगन्मोहन ॥ आल्या समयाचा भाव पूर्ण ॥ पद्मजजनक दाखवीत ॥१६७॥
वृषकेतासी हृदयीं धरुन ॥ कुंती शोकार्णवीं निमग्न । बभ्रुवाहन दीनवदन ॥ धरी चरण वृकोदराचे ॥१६८॥
म्हणे म्या केलें पितृहनन ॥ मजवरी गदा घालीं उचलोन ॥ म्यां मणि आणिला प्रयत्नेंकरुन ॥ शिरें नेलीं कोणीं न कळेचि ॥१६९॥
म्हणे परमात्मा विश्वंभरा ॥ सुदर्शनें छेदीं माझिया शिरा ॥ मजकडे न पाहे कुंती मुरहरा ॥ दुःख म्यां दिधलें सकळांसी ॥१७०॥
शेष म्हणे चक्रपाणी ॥ म्यां मणि दिधला आणूनी ॥ परी शिरें लपविलीं दुर्जनीं ॥ मज कळे कोठें तीं ॥१७१॥
मग बोले शेषशयन ॥ मी बालब्रह्मचारी असेन ॥ तरी दोघे दुर्जन मरोन ॥ शिरें येती आपणचि ॥१७२॥
तों बकदाल्भ्यवनीं ॥ दोघे सर्प पडले मरोनी ॥ आकाशपंथे शिरें येऊनी ॥ कृष्णाजवळी पडियेलीं ॥१७३॥
आपुल्या हातेंकरुन ॥ मणि स्पर्शवी जगज्जीवन ॥ आधीं वृषकेत उठवून ॥ सवेंचि पार्थ उठविला ॥१७४॥
दोघे करिती कृष्णस्मरणा ॥ म्हणती उभा रे उभा बभ्रुवाहना ॥ यावरी वैकुंठांचा राणा ॥ आलिंगीत दोघांतें ॥१७५॥
कुंती भीम सर्व धांवोन ॥ आलिंगिती वृषकेत अर्जुन ॥ सुमनें वर्षती सुरगण ॥ जयजयकार प्रवर्तला ॥१७६॥
मग मणिस्पर्शेकरुन ॥ अवघेंचि उठविलें सैन्य ॥ जेवीं हनुमंतें सौमित्रालागीं द्रोणाद्रि आणून ॥ वानरसैन्य उठविलें ॥१७७॥
जैसे वराचे प्रसंगेंकरुनी ॥ वर्हाडी पावती लुगडी लेणीं ॥ तैसी पार्थानिमित्त वाहिनी ॥ उठविली सर्व तेधवां ॥१७८॥
बभ्रुवाहनासी कुंती ॥ हृदयीं धरुनि जाहली आलिंगिती ॥ यावरी मणिपुरांत प्रवेशती ॥ सभेंत बैसती सर्वही ॥१७९॥
श्रीकृष्ण म्हणे धनंजया ॥ पूर्वस्मरण करुनियां ॥ पुत्र आला घे राया ॥ आलिंगीं आतां तयासी ॥१८०॥
सूर्य कोपला किरणांवरी ॥ समुद्र लहरींशीं दावा करी ॥ अमृत मधुरता बाहेरी ॥ आपुली घालूं इच्छीतसे ॥१८१॥
आपल्या शाखांशीं अबोला ॥ कल्पवृक्षें जेवीं धरिला ॥ चंद्रें कलांचा त्याग केला ॥ मेरु कोपला शिखरांवरी ॥१८२॥
बभ्रुवाहन खालीं पाहतो ॥ प्राण आतां त्यागूं इच्छितो ॥ महावीर हातींचा जातो ॥ हृदयीं त्यासी आलिंगीं ॥१८३॥
भीम हांसोनि बोलिला ॥ धर्मन्यायें तो येथें झुंजला ॥ आणि श्रीरंग पाहतां डोळां ॥ सर्वही पापें दूर गेलीं ॥१८४॥
आम्ही आपुले वडील मारुन ॥ श्रीकृष्णकृपेनें जाहलों पावन ॥ मग बभ्रुवाहन आणि अर्जुन ॥ कृष्णें धरुन भेटविले ॥१८५॥
पांच दिवस राहिले तेथ ॥ उत्साह जाहला अत्यद्बुत ॥ अलंकार वस्त्रें सर्वांसी देत ॥ शेष जात स्वस्थळा ॥१८६॥
उलूपी चित्रांगी दोघी जणी ॥ सर्व संपत्ति धनधान्य घेऊनी ॥ चालिल्या गजपुरालागूनी ॥ आपुलिया स्वधामा ॥१८७॥
यशोदा देवकी कुंती ॥ भीमासमवेत गजपुराप्रती ॥ ब्रह्मानंदे तेव्हां जाती ॥ नाहीं मिती सुखातें ॥१८८॥
पुढें प्रसंग जाणोनि कठिण ॥ पार्थासवें गेला जगज्जीवन ॥ रसाळ कथा करितां श्रवण ॥ चिंता दारुण दूर होय ॥१८९॥
हें बभ्रुवाहनाचें आख्यान ॥ शत्रुनाशक पुण्यपरायण ॥ आणि होय आयुष्यवर्धन ॥ श्रवण पठण करितांचि ॥१९०॥
आणि सर्पभय कदाही ॥ सर्वथा नोहे त्याचे गृहीं ॥ ऐसी ही फलश्रुती पाहीं ॥ नैमिनिभाषित सत्य पैं ॥१९१॥
पांडुरंगपुरविलासिया ॥ ब्रह्मानंदा यतिवर्या ॥ श्रीधरवदा पंढरीराया ॥ कथा सुरस बोलवीं पुढें ॥१९२॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अश्वमेध नैमिनिकृत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ साठाव्यांत कथियेला ॥१९३॥
इति श्रीश्रीधरकृतपांडवप्रतापे अश्वमेधपर्वणि बभ्रुवाहनर्जुनयुद्धकथनं नाम षष्टितमाध्यायः ॥६०॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2012
TOP