मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ३६ वा

पांडवप्रताप - अध्याय ३६ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीपांडुरंगपुर विहारा ॥ ब्रह्मानंदा अत्युदारा ॥ पुंडलीकवरदा रुक्मिणीवरा ॥ जगद्वंद्या जगद्नुरो ॥१॥
विद्वज्जन विश्रामधामा ॥ योगिजनमनो विहंगमा ॥ द्वारकाधीशा पुरुषोत्तमा ॥ नामरूपातीत तूं ॥२॥
गोपीनयनाञ विकास मित्र ॥ विषकंठवंद्या शत पत्र नेत्रा ॥ कमलोद्भव जनका नीलगात्रा ॥ सुत्रामा महिमा नेणेचि ॥३॥
उद्भव ह्रदयाञ मिलिंदा ॥ अक्रूरचित्त चात कजलदा ॥ क्षीराब्धि जामाता सुखकंदा ॥ द्विरदवरदा द्विजेंद्रवहना ॥४॥
आनकदुंदु भितप महो दया ॥ पीतव सना कमला लया ॥ तुझी लीला पंढरीराया ॥ येथूनि पुढें वदवावी ॥५॥
विराट पर्व मागें संपलें ॥ येथूनि उद्योग पर्व रसागळें ॥ वैशंपायनें कथियेलें ॥ वेद व्यास प्रसादें ॥६॥
जन मेयया ऐसा श्रोता ॥ व्यास शिष्य मुख्य सरस वक्ता ॥ तेणें गाइली जे कथा ॥ तेचि आतां परिसिजे ॥७॥
प्राकृत भाषा हे आरुष ॥ म्हणोनि न ठेवावा दोष ॥ मूळ भारतींचा सारांश ॥ अर्थ चतुरीं विलोकावा ॥८॥
बहुत बोलतां वाढेल ग्रंथ ॥ ध्वनित बोलतां न कळे अर्थ ॥ पाल्हाळ संकोच टाकूनि परिमित ॥ रस सुरस वर्णिला ॥९॥
आद्यंत न पाहतां अर्थ ॥ द्वेषें दोष ठेवी अकस्मात ॥ जाणिजे तो शत मूर्ख निश्चित ॥ नव्हे पंडित विवेकी ॥१०॥
केवढी खळ आहे आपुली बुद्धी ॥ महा चतुरांचे ग्रंथ निंदी ॥ नसता दोष ठेवी कुबुद्धी ॥ तरी पडेल बंदीं यमाचे ॥११॥
श्रीधर विनवी पंडितां ॥ पुढें ऐकावी रसाळ कथा ॥ विराट पर्व संततां ॥ कथा शेवटीं वर्णिली ॥१२॥
विराटें आपुली कन्या ॥ उत्तरा दिधली अभिमन्या ॥ सर्व नृप आले लग्ना ॥ आणि पांडवां भेटा वया ॥१३॥
विराट नगरा समीप ग्राम ॥ उपलव्य जयाचें नाम ॥ पांडव नृपां सहित परम ॥ सुखें तेथें राहिले ॥१४॥
ब्रह्मा नंदें पंडुनंदन ॥ सभेंत बैसले आनंद घन ॥ चतुर वृद्ध परम निपुण ॥ विराट द्रुपद बैसती ॥१५॥
सात्यकी आणि रेवतीरमण ॥ निकट बैसती प्रीती करून ॥ श्रीरंग आणि फाल्गुन ॥ भेटोनि जवळी बैसती ॥१६॥
नकुल सहदेव भीमसेन ॥ हे धर्माचे पाठीसी विराज मान ॥ द्रौपदीचे पंच नंदन ॥ आणि अभिमन्यु पुढें शोभे ॥१७॥
आणि कही राजे आप्त ॥ सभोंवते बैसले समस्त ॥ धृष्टद्युम्न आणि विराट सुत ॥ राज कुमार विराजती ॥१८॥
वाघें राहवूनि समस्त ॥ उगे राहिले एक मुहूर्त ॥ कोणीही न बोले तेथ ॥ पाहती तटस्थ उगेचि ॥१९॥
सुरम्य श्रीरंगाचें वदन ॥ समस्त पाहती विलोकून ॥ यावरी तो जगज्जीवन ॥ बोलता जाहला तेधवां ॥२०॥
कौरवांचे अन्याय बहुत ॥ तुम्हीं देखिले ऐकिले समस्त ॥ पंडुरायाचें राज्य यथार्थ ॥ हें विख्यात जाणतां कीं ॥२१॥
जेणें स्वसत्ताव सनें करूनी ॥ पालाणिली हे कुंभिनी ॥ सर्वही राजे जिंकूनी ॥ शत मख आचरला ॥२२॥
त्या पंडुनृपाचे हे सुत ॥ त्रिभुवनीं विख्यात बलाद्भुत ॥ भीमार्जुनांचे पुरुषार्थ ॥ देखिले कीं समस्तीं ॥२३॥
हिडिंब बक किर्मीर ॥ कीचक मारिले समग्र ॥ त्या भीमासी हे धार्त राष्ट्र ॥ मारितां अशक्य काय असे ॥२४॥
खांडववन देऊनि समग्र ॥ सुखी केला वैश्वानर ॥ निर्जरां सहित निर्जरेंद्र ॥ केला जर्जर समरांगणीं ॥२५॥
निवात कवचांचा पुशिला ठाव ॥ शेवटीं कौरव पळविले सर्व ॥ गोग्रहण काली अभिनव ॥ पुरुषार्थ केला धनंजयें ॥२६॥
ऐसा अंगीं पुरुषार्थ ॥ परी यांहीं रक्षिलें सत्य ॥ वनवास आणि अज्ञात ॥ त्रयोदश वर्षें क्रमियेलीं ॥२७॥
अजात शत्रु धर्मनृपती ॥ केवळ भोळा चक्रवर्ती ॥ त्यासी जिंकूनि कपटद्यूतीं ॥ गांजिली सती द्रौपदी ॥२८॥
तरी दुर्योधनाचा समाचार ॥ घ्यावया आतां काय उशीर ॥ राज्य विभाग समग्र ॥ देतो किंवा नाहीं तो ॥२९॥
नाहीं तरी तुम्ही आम्ही आप्त ॥ पांडवांचे आहों समस्त ॥ युद्ध करूनि अद्भुत ॥ कौरव दुष्ट संहारावे ॥३०॥
जेवीं मातेचिया कैवारें ॥ अवनी निःक्षत्रिय केली परशुधरें ॥ तेवीं द्रौपदीचे मिषें समग्रें ॥ कौरव सपक्ष आटती ॥३१॥
पंडूचे पंच कुल दीपक सुढाळ ॥ मम स्नेहें भरित तेजाळ ॥ त्यांवरी पडतां कौरव पतंग सकळ ॥ भस्म होती सपक्ष ते ॥३२॥
कीं उगवले पंचा दित्य ॥ तेथें कायसे कौरव खद्योत ॥ त्रयोदश वर्षें रजनींत ॥ झगमगीत होते पैं ॥३३॥
पंच पांडव कुठार तीक्ष्ण ॥ मी धर्ता स्वसत्तें करून ॥ छेदीन कौरव वृक्ष दारुण ॥ शाखां उपशाखां समवेत ॥३४॥
कीं हे पांडव पंच प्रलयाग्न ॥ मी साह्य सबळ प्रभंजन ॥ कौरव शुष्ककंटक विपिन ॥ जाळीन क्षण न लागतां ॥३५।
यावरी बोले रोहिणी सुत ॥ होय धर्मदुर्योधनांचें हित ॥ तो प्रकार करावा बहुत ॥ दीजे राज्य अर्ध वांटूनी ॥३६॥
तरी एक शिष्ट द्यावा पाठवून ॥ त्यांचें करी समाधान ॥ विदुर कृपाचार्य भीष्म द्रोण ॥ तेथें वडील आहेत ॥३७॥
युद्ध न करावें साचार ॥ साम करावें हा निर्धार ॥ धर्में द्यूत खेळूनि समग्र ॥ राज्य आपुलें हारविलें ॥३८॥
शकुनीचा अन्याय काय तेथ ॥ तों सात्यकी बोले क्रोध युक्त ॥ म्हणे कृष्णा ग्रजा तूं यथार्थ ॥ दुर्जनांचा पाठिराखा ॥३९॥
धर्मराज भोळा अत्यंत ॥ दुर्जनीं कपटें जिंकिलें सत्य ॥ उद्यां कौरव रणीं मारूनि समस्त ॥ धर्मा पुढें पहुडवीन ॥४०॥
महा पुरुषार्थी पंच वीर ॥ हे प्रतिपांडव पंच कुमार ॥ हा प्रत्यर्जुन सौभद्र ॥ यापुढें समरीं कोण तगे ॥४१॥
क्षत्रिय धर्म हा साचार ॥ कीं दुर्जन संहारावे समग्र ॥ द्दष्टीं देखतां मारक विखार ॥ तोंड आधीं ठेंचावें ॥४२॥
कीं वृश्चिक द्दष्टीं देखोन ॥ पादरक्षेनें करिजे चूर्ण ॥ परपीडक संहारून ॥ आधीं टाकावे धर्म हा ॥४३॥
धर्में यावरी तत्त्वतां ॥ कदा न धरावी नम्रता ॥ राज्य न देतां समस्तां ॥ मृत्यु नगरा धाडावें ॥४४॥
राज्य घ्यावें हिरोन ॥ अथवा आपुले वेंचावे प्राण ॥ मग काय व्यर्थ वांचोन ॥ षंढवत संसारीं ॥४५॥
धर्मा ऐक माझें उत्तर ॥ धाकुटे अथवा वडील वीर ॥ त्यांसी सांगोनि पाठवीं नमस्कार ॥ वचनें नम्र बोलावीं ॥४६॥
आपुल्या सामर्थ्यवैभवें करुन ॥ शत्रु विभांडावे संपूर्ण ॥ इतुकें नव्हे तरी कृष्ण वदन ॥ करून जावें वनांतरीं ॥४७॥
पुरुष लक्षण हेंचि परम ॥ जों कुडींत आहे आत्माराम ॥ तोंवरी पुरुषार्थाचा संभ्रस ॥ ब्रह्मांड भरी दाविजे ॥४८॥
यावरी द्रौपदी बोले वचन ॥ परम पापात्मा दुर्योधन ॥ त्याशीं गेलियाही प्राण ॥ मृदु वचन न बोलावें ॥४९॥
वृक व्याघ्र विखार पाहें ॥ यांशीं मृदु बोलोनि साध्य काय ॥ पत्रें पाठवूनि सकळ राय ॥ सत्वर आधीं बोलावा ॥५०॥
त्वरा करा आतां बहुत ॥ भगदत्तादि राजे समस्त ॥ छप्पन्न देशींचे नृपनाथ ॥ बोलावा सत्वर त्यां आधीं ॥५१॥
चतुःसमुद्र पर्यंत ॥ सप्तद्वीप नव खंडांत ॥ वसती राजे समस्त ॥ आधीं येथें बोलावा ॥५२॥
सहस्त्र कामें सोडून ॥ आधीं पत्रें पाठवा लिहून ॥ दुर्योधन प्रार्थून ॥ नेईल आधीं एकादा ॥५३॥
पांचाल राज बोलिला तेव्हा ॥ आमुचा पुरोहित चतुर बरवा ॥ तो पुढें पाठवावा ॥ कुंजर पुरासी ये वेळे ॥५४॥
श्रीरंग म्हणे राया सुजाणा ॥ बोलिलासी उत्तम वचना ॥ एक शिष्ट पाठवूनि आणा मना ॥ अंतर त्यांचें कैसें असे ॥५५॥
साम भेद दंड करून ॥ शत्रु करावे आपणा धीन ॥ ओळखूनि पराचें चिन्ह ॥ चतुरें तैसेंचि वर्तावें ॥५६॥
मंत्रें आकर्षिजे विषधर ॥ उदकें शांत वावा वैश्वानर ॥ वेदांत ज्ञानें भवसमुद्र ॥ उतरूनि जावें पैलपारा ॥५७॥
काम क्रोध शत्रु समग्र ॥ ते विवेकीं जिंकावे साचार ॥ भक्तिबळें ईश्वर ॥ आपणाधीन करावा ॥५८॥
शमदमबळें करून ॥ मनोजय करिती सज्ञान ॥ व्युत्पत्तीच्या बळें गहन ॥ अर्थ काढिती पंडित ॥५९॥
पाषाणा खालीं सांपडे हस्त ॥ तो युक्तीनें काढावा अकस्मात ॥ बळें करूनि ओढितां तेथा ॥ व्यथा प्राप्त पैं ॥६०॥
तैसा आधीं साम करून ॥ वश करावा सुयोधन ॥ समयोचित जाणे चिन्ह ॥ ऐसा शिष्ट पाठवावा ॥६१॥
सभेसी बैसतां जाऊन ॥ दिसे जैसा वाचस्पति समान ॥ सरस्वती ज्यासी प्रसन्न ॥ समयो चित शब्द देत ॥६२॥
वेद शास्त्र पुराण ॥ हें ज्यासी करतला मल कवत पूर्ण ॥ तेजस्वी जैसा चंडकिरण ॥ सभा स्थानीं तेवीं दिसे ॥६३॥
जरी वरी शत्रु लोटले समप्त ॥ त्या समयीं जैसा वैवस्वत ॥ कीं दुसरा कल शोद्भव सत्य ॥ शत्रु सागर प्राशावया ॥६४॥
ह्र्दय निर्मळ कापटयरहित ॥ भोळा जैसा उमाकांत ॥ श्रेष्ठत्वें सभेंत मिरवत ॥ शचीनाथ जयापरी ॥६५॥
वारण चक्रांत रिघोन ॥ आपुलें कार्य साधी पंचानन ॥ कीं एकलाचि जाऊनि सुपर्ण ॥ अमृत घेऊन जेवीं आला ॥६६॥
कीं एकला जाऊनि गुरु पुत्र ॥ साधूनि ये संजीवनी मंत्र ॥ कीं सागर उतरूनि रुद्रावतार ॥ शुद्धि करूनि परतला ॥६७॥
तैसेंचि कार्य साधून ॥ सत्वर येई जो परतोन ॥ ऐसा पाठवावा निवडून ॥ शीघ्रकाळेंचि तत्त्वतां ॥६८॥
आम्ही आलों येथें लग्ना ॥ जातों आपुलिया स्वस्थाना ॥ बोलावूं पाठवा मही रत्नां ॥ आम्हां सहित ॥६९॥
मग बैसोनि आपुल्या रथीं ॥ द्वारकेसी गेले रुक्मिणीपती ॥ इकडे सर्व रायांसी धर्मनृपती ॥ पाठवी बोलावूं तेधवां ॥७०॥
धर्माचीं पत्रें घेऊनी ॥ अपार हेर धांवती ते क्षणीं ॥ देशोदेशीं जाऊनी ॥ निघा म्हणती सत्वर ॥७१॥
दुर्योधनें पत्रें पाठवूनि सत्वर ॥ राजे आणिले छत्रधर ॥ दळें मिळालीं अपार ॥ कुंजरपुरा भोंवतीं ॥७२॥
पांडव प्रिय जे कां नृपती ॥ ते विराट नगरा प्रति जाती ॥ त्यांसी सामोरा जाऊनि प्रीतीं ॥ धर्म आणी अत्यादरें ॥७३॥
द्नुपद म्हणे उपाध्याया लागून ॥ चवर्‍यायशीं योनींत दिव्य रत्न ॥ नरदेह परम पावन ॥ श्रेष्ठ ब्राह्मण त्यांत तूंचि ॥७४॥
त्याहीवरी तूं ब्रह्मवेत्ता वेदज्ञ बुद्धीनें कविगुरूं समान ॥ तुज साह्य तेथें पूर्ण ॥ विदुर असे धर्मात्मा ॥७५॥
तोंवरी आम्ही दळें ॥ येथें मेळवितों सकळें ॥ मग शिष्यां सहित ते वेळे ॥ विप्र गेला गजपुरा ॥७६॥
द्वारकेसी सुभद्रापती ॥ पाठवी सत्वर धर्मनृपती ॥ दुर्योधन समीरगतीं ॥ त्याही पुढें धांवत ॥७७॥
कापटयनिधि सुयोधन ॥ त्वरें प्रवेशला कृष्ण सदन ॥ तें जाणोनि शतपत्र नयन ॥ निद्रा करीत निजशेजे ॥७८॥
तों तेथें आला दुर्योधन ॥ म्हणे हा गोवळा छत्रहीन ॥ याचे पायथां बैसेन ॥ हें कालत्रयीं घडेना ॥७९॥
उशाकडे जाऊनि सत्वर ॥ बैसला तो दुष्ट गांधार ॥ तों सवेंचि पातला सुभद्रावर ॥ तंव तो पायथां बैसला ॥८०॥
ध्वज वज्र ऊर्ध्वरेखा समवेत ॥ जे तळवे सुंदर अति आरक्त ॥ सनका दिक जे ह्रदयीं ध्यात ॥ विलोकीत पार्थ प्रीतीनें ॥८१॥
कोण वर्णी चरणरजांची थोरी ॥ उद्धरीली कमलोद्भव कुमारी ॥ केली कुञा दिव्य नारी ॥ स्पशोंनियां चरणरजें ॥८२॥
वृंदावनींचे तृण पाषाण ॥ उद्धरिले चरणीं चालोन ॥ बळिराज नेऊन ॥ रसातळीं स्थापिला ॥८३॥
तेचि तळवे आरक्त ॥ पार्थ स्वहस्तें तळहातित ॥ तों सत्वर उठोनि भगवंत ॥ विजया कडे पाहूं लागला ॥८४॥
म्हणे का आलासी सखया पार्था ॥ येरू म्हणे विश्वव्यापका समर्था ॥ तूं गुरु देव माता पिता ॥ पाठिराखा आमुचा ॥८५॥
सेना मिळाली संपूर्ण ॥ परी दीपाविण जैसें सदन ॥ जळाविण जेवीं अन्न ॥ तैसें तुजविण दिसतसे ॥८६॥
मग बोले दुर्योधन ॥ मी आधीं बैसलों येऊन ॥ म्हणे वृष्णि कुल भूषण ॥ म्यां अर्जुन देखिला आधीं ॥८७॥
मज नाहीं युद्ध करणें ॥ अथवा समरीं शस्त्र धरणें ॥ फुकट नेऊनि काय पाळणें ॥ अर्जुनेंही आम्हांसी ॥८८॥
माझे नारायणगण बहुत ॥ सेना आहे अपरिमित ॥ पार्था दुर्योधना ॥ सांग यथार्थ ॥ दोहींत काय आवडे तें ॥८९॥
पार्थ म्हणे तूं शस्त्र न धरीं ॥ अथवा समरीं युद्ध न करीं ॥ तूं कृपाद्दष्टीनें मुरारी ॥ विलोकूनि पाहें आम्हांतें ॥९०॥
दुरूनि पाहे कूर्मीण ॥ तेणें पिलियां होत अमृतपान ॥ तूं नुसताचि येऊन ॥ उभा राहें श्रीरंग ॥९१॥
दुर्योधन म्हणे जगज्जीवना ॥ देईं आम्हांसी अवघी सेना ॥ तुज निःशस्त्रिया येऊनि जाणा ॥ काय कारण सांग पां ॥९२॥
जाहलें जें वर्तमान ॥ बलरा मासी सांगे दुर्योधन ॥ तूं श्रीगुरु माझा येऊन ॥ करीं साह्य सर्वही ॥९३॥
बलराम म्हणे ऐक निवाडें ॥ कृष्ण परब्रह्म जाण तिकडे ॥ त्यासी टाकूनि मज तुम्हां कडे ॥ येतां न ये निश्चियेंशीं ॥९४॥
तरी मी इकडे ना तिकडे पाहें ॥ न होईं कदा मी कोणासी साह्य ॥ तरी दुर्योधना तूं जाईं लवलाहें ॥ क्षात्रधर्में युद्ध करीं ॥९५॥
एक अक्षौहिणी दळा सहित ॥ कृतवर्मा यादव विख्यात ॥ तो नेईं तूं साह्यार्थ ॥ युद्ध अद्भुत करावें ॥९६॥
असो कृतवर्म्या सहित दळ घेऊन ॥ गजपुरा गेला दुर्योधन ॥ इकडे धनंजयासी बोले मन मोहन ॥ तूं कां मज घेतलें ॥९७॥
पार्थ म्हणे जगत्पती ॥ तूं बैसें माझे मनोरथीं ॥ तुज ऐसा असतां सारथी ॥ शिक्षा लावीन कृतांता ॥९८॥
रथीं बैसोनि पार्थ रुक्मिणीकांत ॥ गेले धर्मासी भेटा वया त्वरित ॥ इकडे शल्यासी बोलावूं निश्चित ॥ धर्मरायें पाठविलें ॥९९॥
अर्धयोजन रुंद पृतना ॥ मार्गें जातां होय गर्जना ॥ तों माद्रीचा बंधु पंडुनंदनां ॥ साह्य चालिला वेगेंशीं ॥१००॥
तिकडे शल्य जातो जाणोन ॥ गुप्तरूपें दुर्योधन ॥ चतुर सेवक पाठवून ॥ उपचार मार्गीं समर्पी ॥१०१॥
वस्तीस अगणित सुंदरें ॥ मार्गीं निर्मिलीं चंदनागारें ॥ सुगंध उदकें मनोहरें ॥ अष्ट भोग ठायीं ठायीं ॥१०२॥
ते अष्ट भोग कोण कोण ॥ ऐका तयांची नाम खूण ॥ सुगंध वनिता वस्त्र गायन ॥ तांबूल भोजन अनुक्रमें ॥१०३॥
शय्या आणि दीपक ॥ अष्ट भोग हेचि सम्यक ॥ षड्रस अन्नें सुरेख ॥ अनुक्रमें समर्पिलीं ॥१०४॥
सुयोधनाचे प्रधान ॥ शल्या पुढें राबती प्रीती करूण ॥ समयो चित समर्पिती आणून ॥ जाहला प्रसन्न शल्य तेव्हां ॥१०५॥
म्हणे मागाल तें देईन ॥ तों गुप्तरूपें प्रकटे दुर्योधन ॥ म्हणे हे माझी सेवा संपूर्ण ॥ होईं तूं प्रसन्न मजलागीं ॥१०६॥
मज सहाय होऊनि देईं यश ॥ मग तो शल्य म्हणे अवश्य ॥ दुर्योधना तूं जाईं नगरास ॥ मी धर्मास भेटोनि येतों पैं ॥१०७॥
दुर्योधन बोले नम्र वचन ॥ सांभाळीं आपुलें वरदान ॥ शल्यें अवश्य म्हणोन ॥ उपलव्या प्रति आला ॥१०८॥
तेथें उतरूनि सावकाश ॥ शिबिरें उभविलीं आसमास ॥ तेथें स्नान संध्या कर्म सुरस ॥ सारूनियां ते वेळे ॥१०९॥
पांडवां प्रति भेटोन ॥ दिधलें परम समाधान ॥ म्हणे तुम्ही वनवास भोगून ॥ परम कष्ट पावलां ॥११०॥
धर्मा तूं परम पावन ॥ नलहरिश्चंद्रां समान ॥ असो तुझिया पत्रा वरून ॥ सेने सहित येत होतों ॥१११॥
मज दुर्योधनें ठकवून ॥ गोवूनि केलें आपणा धीन ॥ मग अजात शत्रु बोले वचन ॥ अवश्य जाईं मातुला ॥११२॥
परी इतुकें देईं मज लागून ॥ तूं अश्व ह्रदय जाणसी संपूर्ण ॥ तरी तूं कर्णाचें सारथ्य करून ॥ तेजो भंग करीं त्याचा ॥११३॥
आमुचा प्रताप वर्णीं ॥ करीं तयाची तेजोहानी ॥ हें अयोग्य परी ये क्षणीं ॥ अंगीकारीं आम्हां करितां ॥११४॥
अवश्य म्हणे शल्य वीर ॥ रणीं त्याचा मोडीन धीर ॥ बलक्षीण करूनि समग्र ॥ यश येईल तुम्हांतें ॥११५॥
सर्वोपचारीं तोषविला ॥ शल्य गजपुरा प्रति गेला ॥ इकडे पांडवांकडे आला ॥ सात्यकी निजदळेंशीं ॥११६॥
धर्मा भोंवतें ते क्षणीं ॥ दळ मिळालें सात अक्षौहिणी ॥ तिकडे एकादशाक्षौहिणी वाहिनी ॥ दुर्योधनें मेळविली ॥११७॥
सकळ यादवां सहित ॥ कृतवर्मा आला तेथ ॥ सौबल कांबोज जयद्रथ ॥ यवन मंडळी पातली ॥११८॥
पर्वतीय राजे अपार ॥ सेने सहित आले सत्वर ॥ असो द्रुपदाचा पुरोहित विप्र ॥ सत्वर भेटला दुर्योधना ॥११९॥
त्याचा करूनि सन्मान ॥ दुर्योधन पुसे वर्त मान ॥ विप्र म्हणे मज लागून ॥ द्नुपदरायें धाडिलें ॥१२०॥
तुम्ही राज्य करितां विशेष ॥ पांडवांसी कां वनवास ॥ अनर्थ करूनि बहुवस ॥ त्यांसी बाहेर घातलें ॥१२१॥
तरी तुम्हीं मैत्री करून ॥ कलह टाकावा वारून ॥ परम महाबळी अर्जुन ॥ साह्य भगवान तयांसी ॥१२२॥
अकरा अक्षौहिणी दळ संपूर्ण ॥ न होय एका अर्जुना समान ॥ बलाधिक्य तो भीम सेन ॥ रणीं कृतान्त सबळ जो ॥१२३॥
ऐसे पांडव बलवंत होती ॥ तुम्हांशीं मैत्रीं करूं इच्छिती ॥ धन्य धन्य तेचि जगतीं ॥ बंधु तुमचे निर्धारें ॥१२४॥
यावरी बोले सूर्य नंदन ॥ पांडव गेले प्रतिज्ञा बोलून ॥ मूर्ख हो तें खरें करून ॥ दाखवा आधीं म्हणावें ॥१२५॥
एक पाऊल मात्र मेदिनी ॥ नेदूं तयांसी ये क्षणीं ॥ त्यांसी सांगा जाऊनी ॥ भय सांडूनि युद्धासी या ॥१२६॥
विराट नगरीं गुप्त राहिले ॥ परी आम्हीं तेव्हांचि ओळखिले ॥ पुनः वनवास करा वहिले ॥ मग या बळें युद्धासी ॥१२७॥
अथवा याच कवृत्ति धरून ॥ या आधीं आम्हांसी शरण ॥ मग एकादा ग्राम देऊन ॥ करूं रक्षण तुमचें पैं ॥१२८॥
गंगात्मज बोले वचना ॥ गोग्रहणीं एकल्या अर्जुना ॥ कां रे जिंकिलें नाहीं कर्णा ॥ आतां वल्गना क्रितोसी ॥१२९॥
शस्त्रें अस्त्रें सांडून ॥ आलासी गजपुरीं पळोन ॥ भीमें कीचक टाकिले मारून ॥ तूंचि मनीं आठवीं कीं ॥१३०॥
अनिवार अर्जुनाचे बाण ॥ घेतील जेव्हां तुमचा प्राण ॥ तेव्हां आठवाल आमुचें वचन ॥ कलेवर त्याग करितां पैं ॥१३१॥
कौरवांची आज्ञा घेऊन ॥ गेला द्रुपदाचा ब्राह्मण ॥ पांचाल रायासी वर्तमान ॥ जाहलें तेंचि सांगितलें ॥१३२॥
इकडे धृत राष्ट्र बोले ते अवसरीं ॥ संजया तूं जाईं तेथवरी ॥ माझा आशीर्वाद सांगोनि लवकरी ॥ अंतर त्यांचें शोधीं कां ॥१३३॥
मैत्री करावया इच्छिती ॥ किंवा समर भूमीसी भिडती ॥ ते आहेत पुण्यवंत सुमती ॥ स्नेह वाढविती सर्वांशीं ॥१३४॥
ते पांचही प्रलयाग्न ॥ क्षणांत जाळिती शत्रुकानन ॥ यादव कुल पंचानन ॥ त्यांसी साह्य सर्वस्वें ॥१३५॥
बहु तपें पुण्य थोर ॥ प्रति शंकर युधिष्ठिर ॥ क्रोधद्दष्टीनेंचि समग्र ॥ भस्म करील शत्रूंतें ॥१३६॥
तरी संजया तूं जाऊन ॥ बोलें धर्मासी नम्रवचन ॥ मग चालिला तो रथीं बैसोन ॥ उपल व्यासी पावला ॥१३७॥
पांचही कौंतेय अनुक्रमें करून ॥ संजयासी देती आलिंगन ॥ म्हणती वृद्ध सुखी कीं अवघे जण ॥ पुत्र पौत्रां समवेत ॥१३८॥
संजय म्हणे सुखी अवघे जण ॥ रायें तुम्हांसी सांगितलें आशी र्वचन ॥ पांडव म्हणती रात्रं दिन ॥ त्यांचे चरण स्मरतों आम्ही ॥१३९॥
हस्तिनापुरींचे विप्र ॥ सुखी कीं पुसे युधिष्ठिर ॥ ब्राह्मणांचे मान समग्र ॥ दुर्योधन रक्षितो कीं ॥१४०॥
वृद्ध आणि गुरु यांचें सेवन ॥ सदा करितो कीं मनांतून ॥ दान याग मित्ररक्षण ॥ प्रजापालन करितो कीं ॥१४१॥
पांडवांपासूनि पापाचरण ॥ घडलें म्हणती कीं नाहीं जन ॥ भीमार्जुनांचा पराक्रम पूर्ण ॥ दुर्योधन स्मरतो कीं ॥१४२॥
गंधर्वांहातींचा सोडवून ॥ चुक विला मरणा पासून ॥ तें आठ वितो कीं सुयोधन ॥ उपकार मनीं मानितो कीं ॥१४३॥
संजय म्हणे धर्मात्मजा ॥ सोमवंश विजय ध्वजा ॥ नागपुरिंच्या सर्व प्रजा ॥ तुज कल्याण चिंतिती ॥१४४॥
प्रज्ञाचक्षु आदि करूनी ॥ द्रोण भीष्मा दिकांचे मनीं ॥ द्दढ मैत्री साधूनी ॥ अर्ध राज्य द्यावें तुम्हां ॥१४५॥
युयुधान विराट द्रुपद ॥ समस्तही ऐका नृपवृंद ॥ उभय पक्षीं कल्याण आनंद ॥ तेंचि सर्व करा तुम्ही ॥१४६॥
स्वर्धुनीतनय भारद्वाज शारद्वत ॥ साम करावें सर्वांचें मनोगत ॥ यावरी युधिष्ठिर बोलत ॥ हेंचि मनीं माझिया ॥१४७॥
परी प्रज्ञाचक्षु राजेश्वर ॥ पुत्र लोभें भ्रमला थोर ॥ सद्वुद्धी पासूनि भ्रष्टला ज्येष्ठ पुत्र ॥ तयासी विचार न सांगे ॥१४८॥
दुर्योधनाचे मनीं ॥ आपण भोगावी सर्व कुंभिनी ॥ त्या चिया गर्वाहूनि ठेंगणी ॥ वाढी झाली मेरूची ॥१४९॥
परी हरिध्वज नयनीं ॥ देखिला नाहीं जों रणमेदिनीं ॥ खगवर ध्वज स्यंदनीं ॥ पुढें आरूढला नाहीं जों ॥१५०॥
तोंवरीच हे वल्गना ॥ बोलतां गोड वाटे सुयोधना ॥ गदे सहित जों भीमसेना ॥ रणांगणीं न देखिलें ॥१५१॥
संजया जाऊनि त्वरित ॥ सांग हें पाकशासन प्रस्थ ॥ पंडुरायाचें राज्य समस्त ॥ परी आम्हीं गजपुर दिलें तूतें ॥१५२॥
त्यावरी वैकुंठींचा वेल्हाळ ॥ रुक्मिणी मान ससरोवर मराळ ॥ भक्त काम कल्पद्रुम तमालनीळ ॥ मेघ गंभीर गिरा बोले ॥१५३॥
क्षत्रिय धर्म आचरून ॥ राज्य घ्यावें पराक्रमें करून ॥ तरी इह परत्र कीर्ति पूर्ण ॥ दुकदुमेल धर्म राजा ॥१५४॥
क्षत्रिय धर्म आचरतां जाण ॥ जरी पावलां समरीं मरण ॥ तरी उत्तम लोक पावोन ॥ कीर्ति होय त्रिभुवनीं ॥१५५॥
संजया जाऊनि सांग सत्वर ॥ दे पांडवांसी राज्य समग्र ॥ मग ते तुज देतील गजपुर ॥ बंधु म्हणोनि प्रीतीनें ॥१५६॥
मरण त्याचें जवळी आलें ॥ तरीच तेणें दळ मेळविलें ॥ नायके वृद्धांचें शिकविलें ॥ अवश्य काळ चुकेना ॥१५७॥
कपटद्यूत खेळले जे वेळीं ॥ दुःशा सनें धांवूनि पांचाळी ॥ केशीं धरूनि सभेसी नेली ॥ दीन अनाथ जैसी कां ॥१५८॥
कोरव जन परम दुर्जन ॥ कर्णा दिकीं सोडिले शब्द बाण ॥ ते घाय अजूनि जाण ॥ नाहीं मिळाले संजया ॥१५९॥
दुर्यो धन शकुनि दुःशासन ॥ यांच्या रक्तें भूलिंगासी होईल स्नपन ॥ कर्णाचें शिर जाईल उडोन ॥ घाय मिळतील तेव्हां तें ॥१६०॥
पांच पांडव प्रलयानळ ॥ त्यांसी नांव ठेविलें षढतीळ ॥ पांचाळीचीं वस्त्रें हिरूनि सकळ ॥ सभेंत वल्कलें नेसविलीं ॥१६१॥
असो सर्वांसी विचारून ॥ संजय चालिला तेथून ॥ धर्मराज बोले वचन ॥ वृद्धासी नमन सांग माझें ॥१६२॥
भीष्म द्रोण शारद्वत ॥ गजपुरींचे विप्र प्रति आदित्य ॥ प्रज्ञा चक्षु विदुरादि समस्त ॥ सांग नमन माझें सर्वां ॥१६३॥
कुंती गांधारी माता ॥ यांचिया चरणांवरी माझा माथा ॥ आम्ही सुखी आहों सांग समस्तां ॥ श्री कृष्ण दयेंकरूनियां ॥१६४॥
धृतराष्ट्राचे चरण ॥ वंदूनि सांगें इतुकें वचन ॥ पंचग्राम देईं आम्हां लागून ॥ नामा भिधानें ऐक पां ॥१६५॥
अविस्थळ वृकस्थळ जयंत ॥ वारूणावत आणि शक्रप्रस्थ ॥ इतुके देऊनि समस्त ॥ कलहमूळ खंडीं कां ॥१६६॥
मग वस्त्राभारणीं ते वेळां ॥ संजय धर्में गौरविला ॥ निजरथीं बैसोनि पावला ॥ गजपुरा तत्काळ ॥१६७॥
धृतराष्ट्रासी भेटोन ॥ झालें तें सांगें वर्त मान ॥ यावरी समस्त द्विज गृहांसी जाऊन ॥ धर्मवचनें निरोपी ॥१६८॥
मागुती धृतराष्ट्रा जवळी येऊन ॥ संजय बोले हितवचन ॥ म्हणे आप्त दूरी दवडून ॥ अनाप्त जवळी केले तुवां ॥१६९॥
चिंतामणि भिरकावून ॥ घेतले खांदां जड पाषाण ॥ अमृत घट उल्लंघून ॥ पिइजे धूण जैसें पां ॥१७०॥
पूज्य मूर्ति ओसंडून ॥ गुरवाचे जैसे धरिले चरण ॥ राज कुमार वर टाकून ॥ नवरी वरी मृदंगिया ॥१७१॥
पाडूनि देवळाचें शिखर ॥ भोंवतें घातलें आवार ॥ नागवूनि यात्रा समग्र ॥ अन्न सत्र घातलें ॥१७२॥
फणस टाकूनि रसाळ ॥ प्रीतीनें घेतलें कनकफळ ॥ मुक्ताफळ टाकूनि तेजाळ ॥ गुंज जैसी घेतली ॥१७३॥
गार घेऊनि टाकिला हिरा ॥ तम घेउनि दवडिलें दिनकरा ॥ पाच भिरकावूनि सत्वरा ॥ कांच जवळी रक्षिली ॥१७४॥
परीस टाकूनि घेतला खडा ॥ पंडित देऊनि आणिला वेडा ॥ कल्पवृक्ष देऊनि रोकडा ॥ पलांडु घेतला जैसा कां ॥१७५॥
निजसुख देऊनि घेतलें दुःख ॥ मृगमद टाकूनि घेतली राख ॥ चंदन टाकूइ सुरेख ॥ गोमय जैसें घेतलें ॥१७६॥
तैसें राया केलें साचार ॥ वना धाडूनि पंडुकुमार ॥ कैंचे मेळवूनि नृपवर ॥ आप्त परम मानिले ॥१७७॥
ऐकें धृतराष्ट्रा नृपती ॥ सर्वही लोक तुज निंदिती ॥ यावरी संजयाच्या वचनोक्ती ॥ उपेक्षीत वृद्ध तो ॥१७८॥
मग दूत पाठवुनि सत्वर ॥ अंधें बोला विला विदुर ॥ म्हणे संजय वचन निष्ठुर ॥ बोलतो पहा मजलागीं ॥१७९॥
त्याचीं वचनें ऐक साचार ॥ त्यासी द्यावें प्रत्युत्तर ॥ मग करावा विचार ॥ सामभेदें करोनी ॥१८०॥
विदुरा हित सांगें मज प्रती ॥ आहे कैसी उत्तम नीती ॥ मज न गमे निश्चितीं ॥ चिंतानलीं पडियेलों ॥१८१॥
यावरी तो विदुर ॥ वर्षेल ज्ञानाचा सागर ॥ तें ब्रह्मानंद श्रीधर ॥ वर्णील सार अभंग ॥१८२॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ उद्योगपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ छत्तिसाव्यांत कथियेला ॥१८३॥
इति श्रीध्रकृते उद्योगपर्वणि षट्र्‍त्रिंशत्तमाध्ययः ॥३६॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ श्रीपांडवप्रताप उद्योगपर्व षट‍त्रिंशत्तमाध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP