मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय २३ वा

पांडवप्रताप - अध्याय २३ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥
भव पंकजोद्भव पाकशासन ॥ सदा वंदिती ज्याचे चरण ॥ चार सहा अष्टादश गुण ॥ ज्याचे वर्णिती सर्वदा ॥१॥
जो यदुकुलतिलकावतंस ॥ आनकदुंदुभिमान सहंस ॥ लीलाविग्रही आदि पुरुष ॥ देवकी तनय जगदात्मा ॥२॥
नंद ह्रदया रविंद मिलेंद ॥ निज भक्त चित्तचात कजलद ॥ भैमीनयनाब्जा नंद ॥ प्रकाशक मित्र जो ॥३॥
भवगजविदारक कंठीरव ॥ मुचुकुंदोद्धारक रमाधव ॥ कंसचाणूर मर्दक करुणार्णव ॥ अभिनव जलद वर्ण जो ॥४॥
उग्र सेन मानस विषाद हरण ॥ शिशुपा लांतक वृष्णिकुल भूषण ॥ अनंतकल्याण दायक पीतवसन ॥ शरणागत कुलिशपंजर जो ॥५॥
जननमरण विपिन कृशान ॥ दानन्वकुलरा शिनिकृंतन ॥ नखमुकुरीं ज्याचे मीन केतन ॥ कोटयनुकोटी बिंबले ॥६॥
माया चक्र चालक पुराण पुरुष ॥ लावण्यामृत सागर ॥ मनोहरवेष ॥ सच्चिदानंद पंढरीश ॥ मधुमुरनरक भंजन जो ॥७॥
जो दशावतार चरित्र चालक ॥ तो हा पांडुरंग पांडवपालक ॥ पंडुस्त्रुषालज्जारक्षक ॥ लीलाकौतुक दावीतसे ॥८॥
भूवैकुंठ पांडुरंगनगर ॥ चंद्रभाग मानससरोवर ॥ राजहंस तूं श्रीधर ॥ अत्युदार जगदात्मा ॥९॥
जो सत्यवती ह्रदय रत्न ॥ वेदाब्जविकासक चंडकिरण ॥ साठ लक्ष श्लोक जाण ॥ जेणें निर्मिले अवलीलें ॥१०॥
जेथें लेखक परम चतुर ॥ जाहला महाराज नरकुंजर ॥ तेथील साहित्यरस अपार ॥ मानव केवीं वर्णूं शके ॥११॥
व्यासमति महारजत पर्वत ॥ वैशंपायना लाधला किंचित ॥ त्यांतील सारांश साहित्य ॥ अलंकार प्राकृत हें ॥१२॥
आदिपर्व सभापर्व पुर्ण ॥ श्रीधरमुख निमित्त करून ॥ पांडुरंग रुक्मिणी जीवन ॥ ब्रह्या नंदें वदला हो ॥१३॥
मागें सभापर्व ॥ पुढें वनपर्व आरंभिलें ॥ महापापें क्षुद्र सकळें ॥ श्रवण मात्रें दग्ध होती ॥१४॥
कीं हें वनपर्व वसंतवन ॥ सप्रेम श्रोते वृक्ष सघन ॥ नवपल्लवीं विराजमान ॥ नवविध भजनें सुफलित ॥१५॥
सभापर्व संपतां ॥ शेवटीं वर्णिली सुरस कथा ॥ द्रौपदी सभेसी विटंबितां ॥ जगन्निवास पावला ॥१६॥
पुढें अन्योन्य द्यूत खेळोन ॥ वना निघाले पृथानंदन ॥ विदुर कुंतीसी घेऊन ॥ जगपुरा प्रति पावला ॥१७॥
यावरी कैसी कथेची रचना ॥ परीक्षितिसुत पुसे वैशंपायना ॥ माझे पूर्वज गेले वना ॥ ज्ञानसंपन्ना सांग कैसे ॥१८॥
वैशंपायन म्हणे कुंभिनी नायका ॥ अष्टादशपर्वांची हे नौका ॥ व्यासवंशाची सुरेखा ॥ सर्वजनां आश्रय ॥१९॥
हे यष्टि धरोनि हातीं ॥ सर्वदा जे मुक्त विचरती ॥ ते अडखळोनि न पडती ॥ भवगर्तेंत तत्त्वतां ॥२०॥
दोषपशु श्रृंगें उभारून ॥ सर्वथा न येती चवताळोन ॥ अज्ञातरजनींत रक्षी जाण ॥ अष्टादशपर्वयष्टि हे ॥२१॥
असो वना निघाले पंडुनंदन ॥ सवें कृष्ण भगिनी गण निधान ॥ मागूनि आला इंद्रसेन ॥ रथ घेऊन पांचही ॥२२॥
इंद्रसेनासमवेत पूर्ण ॥ सेवक आले चौदा जण ॥ स्यदनीं आरूढले पंडुनंदन ॥ तों प्रजा येती धांवोनियां ॥२३॥
गजपुरांतूनि प्रजांचे भार ॥ निघाले तेव्हां अपार ॥ कीं प्रजासरितांचे पूर ॥ धर्मसमुद्रा प्रति पावती ॥२४॥
विचार करिती प्रजा समस्त ॥ कदा न राहावें गजपुरांत ॥ अरे हे भीष्म द्रोण वृद्ध बहुत ॥ अधर्मरत सर्वही ॥२५॥
कपट द्यूत निर्मून ॥ लटिकेचि जिंकिले पंडुनंदन ॥ दुर्योधन दुर्जन अग्न ॥ वंशकानन जाळील ॥२६॥
शकुनि दुःशासन कर्ण ॥ दुर्योधनाचे दुष्ट प्रधान ॥ त्यासी दुष्टबुद्धि शिकवून ॥ अधिकाधिक खवळविती ॥२७॥
धर्मसमागमें करून ॥ सुखें सेवूं आम्ही कानन ॥ ऐसें बोलत प्रजाजन ॥ धर्माकडे धांवती ॥२८॥
चार्‍ही वर्णांच्या प्रजा ॥ येऊनि नमिती धर्मराजा ॥ आम्ही तुजसवें पंडुतनुजा ॥ वनवासालागीं येऊं ॥२९॥
शिल्पशास्त्रीं जे परम सुजाण ॥ सूत्रधार लोहकर्मीं लोहकर्मीं निपुण ॥ कनकालंकारीं निःसीम सुज्ञान ॥ ऐसे अपार पातले ॥३०॥
ताम्र घडणार चतुर ॥ पाषाणमूर्ति कोरणार ॥ रत्न परीक्षा करणार ॥ आले सत्वर धर्मा पाशीं ॥३१॥
वणिज नाना वस्तुरक्षक ॥ कुंभकर्ते तैलकारक ॥ रजक रंगारी गौळी सकळिक ॥ धर्मदर्शन पातले ॥३२॥
साळी माळी सोनी चतुर ॥ दुसीभुसी नापिक अपार ॥ सुगंध तैल मृगमद केशर ॥ विक्रयकार धांवती ॥३३॥
व्यापारी धनधान्यरक्षक ॥ तडिदंबरें विणिते परीक्षक ॥ किरात गुरव चिकित्सक ॥ धनिक व्यवहारी धांवती ॥३४॥
कृषिकारक खनक चित्रकार ॥ मातंग चर्मक अतिशूद्र ॥ धर्मदर्शनीं प्रेमा अपार ॥ धरूनि त्वरें धांवती ॥३५॥
असो सर्व मिळोन ॥ धर्मापुढें करिती रोदन ॥ गजपुरीं राजा दुर्योधन ॥ वास आमुचेनि न करवे ॥३६॥
तैसे पांडव निघतां वनांतरीं ॥ प्रजा बुडाल्या शोकसागरीं ॥ म्हणती धर्मात्मजा अवधारीं ॥ आम्ही गजपुरीं न राहों ॥३८॥
राजा केवळ रजनीचर ॥ प्रधान ते प्रत्यक्ष व्याघ्र ॥ ग्रामसिंह सेवक समग्र ॥ तरी प्रजा केवीं नांदती ॥३९॥
प्रजा रंजावी निरंतर ॥ तोचि म्हणावा राजेश्वर ॥ अनीतिदासीचा पदर ॥ ज्यासी न लागे कालत्रयीं ॥४०॥
सत्कीर्तिधर्मपत्नीशीं रत ॥ निजप्राण ऐशा प्रजा पाळीत ॥ अधर्मपंकें ज्याचें चित्त ॥ न मळे निर्दोष सर्वदा ॥४१॥
सुह्रद प्रजा आणि भूसुर ॥ ज्याचें कल्याण चिंतिती अहोरात्र ॥ उभारिला यशध्वज जेवीं चंद्र ॥ शरत्कालींचा निर्मल पैं ॥४२॥
जो  निश्चयांबरींचा ध्रुव पूर्ण ॥ अचल न चळे सत्यवचन ॥ जेणें स्वसत्तापट्टकूल नेसवून ॥ श्रृंगारिली कुंभिनी हे ॥४३॥
साधुसंग्रह दुष्टनिग्रह साचार ॥ शरणागतां कुलिशपंजर ॥ दानशस्त्रें दुःखदरिद्रा ॥ निवटी सर्व याचकांचें ॥४४॥
दान धर्माचीं ओझीं फार ॥ नेतां कंटाळती याचक विप्र ॥ दानमेघवृष्टीनें निर्धार ॥ याचकधूली आर्द्र झाली ॥४५॥
हर्षाकुरें पिकली ॥ प्रजेचा आनंद न माये गगनीं ॥ राजघनवाणी ऐकतां श्रवणीं ॥ मन मयूर नाचतसे ॥४६॥
या लक्षणीं मंडित तूं पंडूनंदन ॥ आम्हांसी चिंतार्णवीं लोटून ॥ त्वां सेवूं आदरिलें तपोवन ॥ आम्ही तुजविण दीण दिसों ॥४७॥
कपट द्यूत मेघें थोर ॥ तूं द्दष्टी न पडसी धर्म चंद्र ॥ आम्ही प्रजा आर्त चकोर ॥ चिंताग्नींत पडियेलों ॥४८॥
निष्कलंक तूं शशांकशीतल ॥ वियोगराहूमध्यें सबळ ॥ त्रयोदशवर्षीं शुद्ध मंडल ॥ वदनेंदु कधीं विलोकूं ॥४९॥
कपट द्य्त केतूनें पूर्ण ॥ धर्म झांकला चंडकिरण ॥ तेरावे वर्षीं मुक्तिस्त्रान ॥ तोंवरी उपोषण पडियेलें ॥५०॥
त्रयोदश वर्षें क्रमोनि रजनी ॥ कईं उगवेल धर्म दिन मणी ॥ पौर जन वदन कम लिनी ॥ विकासती एकदांचि ॥५१॥
मेघ ओळले पंडुनंदन ॥ कपट द्यूत हा प्रभंजन ॥ दूरी नेलें झडपोन ॥ जीवनेंविण सुकलों आम्ही ॥५२॥
पांचही पांडव राजहंस ॥ सांडवूनि गजपुर सरोवर मानस ॥ पाठविले कंटकवनास ॥ द्रौपदी सहित दुष्टांनीं ॥५३॥
असो ऐसा प्रजांचा प्रेमा ॥ ऐकतां स्त्रेह दाटला धर्मा ॥ म्हणे घोर विपिना जाणें आम्हां ॥ येणें तुम्हां नव्हे तेथें ॥५४॥
भीष्म द्रोण विदुर ॥ वडील प्रज्ञाचक्षु राजेंद्र ॥ ग्रामांत असतां साचार ॥ तुम्हां दुःख नव्हेचि ॥५५॥
मजवरी कृपा करूनी ॥ सुखें नांदा निजसदनीं ॥ त्रयोदश वर्षें क्रमोनी ॥ तुम्हां पाशीं मी येतों ॥५६॥
भीड धर्माची गहन ॥ प्रजा न देती प्रतिवचन ॥ धर्माचे धरूनियां चरण ॥ अधोवदन स्फुंदती ॥५७॥
दीनवदन अत्यंत ॥ प्रजा प्रवेशल्या गजपुरांत ॥ शक्रप्रस्थींचे जन समस्त ॥ शोक करीत परतले ॥५८॥
इकडे भीष्मजननीवें तीर ॥ पांडव पावले सत्वर ॥ विशाल न्यग्रोधतरुवर ॥ तयातळीं रजनी क्रमियेली ॥५९॥
साही जणीं जलाहार ॥ ते दिवशीं केला निर्धार ॥ भूमीवरी शयन सामार ॥ वरी अंबर पांघरावया ॥६०॥
उदयासी आलें रविचक्र ॥ तों शक्रपस्थ आणि वारणापुर ॥ तेथींचे आले भूसुर ॥ धर्माजवळी सर्वही ॥६१॥
अग्निहोत्री याज्ञिक ॥ चहूं वेदांचे पाठक ॥ षट्‍शास्त्रवेत्ते देख ॥ मुखोद्नत पुराणें ॥६२॥
पुरश्चरणी अधिक ॥ सामर्थ्यें खोळंबवितील अर्क ॥ शापानुग्रह समर्थ देख ॥ असंख्यात मिळाले ॥६३॥
सुर आणि भूसुर ॥ यांशीं भेद नाहीं अणुमात्र ॥ धर्मासी विनविती विप्र ॥ आम्ही येऊं तुजसमागमें ॥६४॥
तुझे संगतीं कंठूं काळ ॥ धर्मा तूं पुण्यशीळ ॥ तुजवरी भार न घालूं सकळ ॥ अन्न आच्छादन न मागों ॥६५॥
कंदमूलें भक्षून ॥ करूं सर्वदा अनुष्ठान ॥ चिंतूं तुझें कल्याण ॥ नाहीं कारण दुसरें पैं ॥६६॥
वेद शास्त्र पुराण ॥ नाना इतिहास पुण्य पावन ॥ धर्मा तुज करवूं श्रवण ॥ जय कल्याण प्राप्तीसी ॥७६॥
धर्म म्हणे घोर वनवास ॥ ब्राह्मण हो तुम्ही पावाल क्लेश ॥ तें मज न पाहवे निःशेष ॥ निर्दोष यश न जोडे ॥६८॥
त्यां माजी शौनकनामा विप्र ॥ म्हणे युधिष्ठिरा ऐक साचार ॥ तुवां पूर्वीं पूजिले धरामर ॥ तेणें निर्भर जाहलों आम्ही ॥६९॥
धर्मा तूं न करीं शोक ॥ सर्व पुरवील जगन्नायक ॥ तूं गोब्राह्मणप्रतिपालक ॥ अजातशत्रु धर्मात्मा ॥७०॥
धन धान्य असोनि गांठीं ॥ जो कृपणता धरी पोटीं ॥ ही नव्हे अवंचक हातवटी ॥ महाकपटी तो जाण ॥७१॥
जयापाशीं नाहीं धन ॥ तरी तया इतुकेंचि भजन ॥ द्यावें ब्राह्मणांसी अभ्युत्यान ॥ स्थूलासन आदरें ॥७२॥
उदकदान प्रिय भाषण ॥ नमन आणि विप्रस्तवन ॥ इतुकेनें होय सर्व कल्याण ॥ सकल पूजन पावलें ॥७३॥
मग धौम्य बोले वचन ॥ धर्मा तूं करीं पुरश्चरण ॥ प्रत्यक्षदैवत सूर्य नारायण ॥ अमित अन्न पुरवील ॥७४॥
विप्रपालना यथार्थ ॥ हाचि उपाय जाण सत्य ॥ ऐकतां आनंदला कुंतीसुत ॥ तप अद्भुत मांडिलें ॥७५॥
जितेंद्रिय निराहार ॥ साधूनि सप्तमी रविवार ॥ प्राणायाम करूनि युधिष्ठिर ॥ पूजा प्रकार समर्पी ॥७६॥
नाभिपद्म पर्यंत ॥ सलिलीं धर्म उभा राहात ॥ त्रिपाद ऋचा मंत्र जपत ॥ न्यासयुक्त यथाविधि ॥७७॥
एक मंडल पर्यंत ॥ धर्मराव तप करीत ॥ स्तवन मांडिलें अद्भुत ॥ ऊर्ध्व वदनें ते काळीं ॥७८॥
सूर्य भजन सूर्य स्तवन ॥ पांचाली करी प्रीती करून ॥ जेणें प्रसन्न होय नारायण ॥ सहस्त्रकिरण तमांतक ॥७९॥
जय तमनाशका सहस्त्रकिरण ॥ अंबरचूडामणे सूर्य नारायण ॥ जीवमिलिंदबंधच्छेदना ॥ ह्रदय कमल विकासका ॥८०॥
सर्व मंगल कल्याण कारणा ॥ रोग प्रशमना आयुर्वर्धना ॥ नमो मार्तंडा दुष्टदमना ॥ हाटकवर्णा वासरमणे ॥८१॥
मित्र रवि सूर्य भानु दिवाकर ॥ खग पूष हिरण्यगर्भा तमोहरा ॥ मरीच्यादित्य सवित्रर्क भास्करा ॥ अमिततेजा नमो तुज ॥८२॥
आदि पुरुषा निर्विकारा ॥ हरिहरविरिंचिस्वरूपधरा ॥ काश्यपेया सहस्त्रकरा ॥ वसुधामरां प्रिय तूंचि ॥८३॥
जन्म मृत्यु जराव्याधिहरणा ॥ भयदरिद्र्दुःखविध्वंसना ॥ कालात्मया सर्वकारणा ॥ विश्वनयन प्रकाशका ॥८४॥
एकचक्र कनकभूषित रथ ॥ सप्तमुख हय वेग बहुत ॥ निमिषार्धामध्यें अपार पंथ ॥ क्रमोनि जात मनोगती ॥८५॥
मुख दैवत सूर्य नारायण ॥ सुर्यो नुष्ठानें श्रेष्ठ ब्राह्मण ॥ वरकड दैवतें कल्पित पूर्ण ॥ चंडकिरण प्रत्यक्ष ॥८६॥
सूर्य मंडल विलोकून ॥ नित्य जो कां न करी नमन ॥ तो अभाग्य परम अज्ञान ॥ अल्पायुषी जाणावा ॥८७॥
व्यास वाल्मीक सुर भूपाल ॥ वर्णिती अद्भुत सूर्य पासक सदा शुशील ॥ यम काल वंदी तया ॥८८॥
देखोनि धर्माचें तप तीव्र ॥ मूर्ति मंत उतरला दिनकर ॥ कर्णजनक तो सत्वर ॥ थाली देत धर्मा प्रती ॥८९॥
द्वादश वर्षें पर्यंत ॥ उत्तमान्न जें जें इच्छीत ॥ षड्रस चतुर्विध रसभरित ॥ उत्पन्न होईल यांतूनि ॥९०॥
कोटयवधि जेवितां ब्राह्मण ॥ परी न सरे कदा अन्न ॥ शेवटीं तुम्ही द्रौपदी जेवनून ॥ मग धुवून ठेविजे हे ॥९१॥
पांचाली जेविलिया जाण ॥ मग ते दिवशीं न निघे अन्न ॥ माझें उदयीक करूनि स्मरण ॥ करा पूजन थालीचें ॥९२॥
सृष्टीचा उद्भव होय किती ॥ हे नव्हे कदा गणती ॥ तैसी थालीच्या अन्नाची मिती ॥ सहस्त्राक्षा न करवे ॥९३॥
ऐसें बोलोनि पद्मिनीनाथ ॥ अंतर्धान पावला त्वरित ॥ पुढें काम्यकवनीं प्रवेशत ॥ पांडव विप्रांसमवेत पैं ॥९४॥
नित्य पांडव पार्थ उठोन ॥ करिताती तमांतकाचें स्तवन ॥ थाली प्रसवे इच्छित अन्न ॥ अपार ब्राह्मण जेविती ॥९५॥
विप्रभोजन पंचमहायज्ञ ॥ तेणें कौंतेय आनंद घन ॥ रात्रं दिवस पुराण श्रवण ॥ वेदाध्ययन शास्त्रचर्चा ॥९६॥
न्याय मीमांसा सांख्य अद्भुत ॥ पातंजल व्याकर वेदान्त ॥ पंडित मुखेम पंडुसुत ॥ श्रवण मनन करी सदा ॥९७॥
महाद्भाग्य हेंचि उत्तम ॥ अखंड ज्यासी सत्यमागम ॥ तीर्थाटन व्रतें तप परम ॥ मग कासया करावें ॥९८॥
सत्यमागम ज्यास ॥ त्यासी नित्य वैकुंठवास ॥ तरी पांडव भाग्य विशेष ॥ वनीं समागम संतांचा ॥९९॥
अद्भुत पुण्य़ ज्याचे पदरीं ॥ त्याचीं चिन्हें ऐक चारी ॥ उदार सत्पात्रीं दान करी ॥ कदाकाळीं विटेना ॥१००॥
सर्वदा बोले मधुर ॥ न वदे कदा वचन निष्ठुर ॥ श्री कृष्णीं बहुत आदर ॥ कायावाचा मानसें ॥१०१॥
परमादरें ब्राह्मण पूजन ॥ देत धन धान्य आसन वसन ॥ या चहूं चिन्हीं मंडित पूर्ण ॥ तोचि अंश श्रीहरीचा ॥१०२॥
म्हणोनि धन्य पंडुनंदन ॥ सर्वलक्षणीं मंडित पूर्ण ॥ यावरी गजपुरींचें वर्तमान ॥ सावधान ऐकें राया ॥१०३॥
प्रज्ञाचक्षु म्हणे क्षत्त्या ॥ तुझे ठायीं असे ममता ॥ तरी मज कांहीं सांगें हिता ॥ कैसें आतां करावें ॥१०४॥
चिंतेचिया कूपांत ॥ पाडिलों सर्वज्ञा देईं हात ॥ आधि हा वणवा जाळीत ॥ विवेकमेघ वर्षें तूं ॥१०५॥
ह्रदयकुंडीं क्रोधाग्न ॥ प्रदीप्त करूनि पंडुनंदन ॥ वना गेले प्रतिज्ञा करून ॥ जी अलोट हरिहरां ॥१०६॥
त्यांच्या दुःखें प्रजा लोक ॥ अहोरात्र करिती शोक ॥ दारुण त्यांचा शापपावक ॥ कौरववंशकानन जाळील ॥१०७॥
तरी प्रजा भजती प्रेमें करून ॥ पांडवस्त्रेह होय वर्धमान ॥ विदुरा ऐसें बोलें वचन ॥ तूं सर्वज्ञ सर्व विषयीं ॥१०८॥
विदुर म्हणे पुढत पुढती ॥ किती सांगों आतां तुज नीती ॥ आपुले कुमार धरूनि हाती ॥ धर्मचरणांवरी घालीं पैं ॥१०९॥
करुणा भाकोनि क्षमा मागावी ॥ तुम्हीं मागें निंदा केली आघवी ॥ आतां स्तुति करूनि बरवी ॥ ते विरवावी शुद्धमनें ॥११०॥
दुर्योधन दुःशासन शकुनि कर्ण ॥ यांसी धर्माचे करीं देऊन ॥ पदर पसरूनि प्राणदान ॥ घ्यावें मागोन सत्वरी ॥१११॥
भीमाचे पोटांत डोई घालून ॥ देईं हातीं दुःशासन ॥ दुर्योधनाचे मस्तकीं हस्त सुखघन ॥ धर्मरायाचा ठेवीतीं ॥११२॥
पार्थाचीं पदाब्नें निर्मल ॥ तेथें स्पर्शवीं कर्णाचें भाल ॥ शकुनि हा कुटिल खल ॥ सहदेवचरणांवरी घालीं गा ॥११३॥
तूं आपुल्या नेत्रोदकें देख ॥ धर्मासी करीं अभिषेक ॥ ऐसें करितां अक्षय्य सुख ॥ ब्रह्मांडभरि तुज होय ॥११४॥
तुझें न ऐकती पुत्र वचन ॥ तरी गारुडी सर्पासी करी दीन ॥ तेवीं भीष्मद्रोणांसी सांगोन ॥ आकळोन घालीं बंदींत ॥११५॥
नासिकद्वारें गुण ओवून ॥ महावृषभ करिती दीन ॥ कीं मत्त द्विरद आकळोन ॥ आकर्षून ठेविती ॥११६॥
कुपुत्र पोटांतील रोग ॥ छेदोनि काढावा सवेग ॥ हनन रक्षण त्याग ॥ यांतील एक करीं वेगें ॥११७॥
ऐसीं वचनें ऐकोन ॥ क्रोधें संतप्त अंबिकानंदन ॥ म्हणे तुझें समता ज्ञान ॥ सर्वही मज समजलें ॥११८॥
पांडववांचें करितां स्तवन ॥ कधींच न धाये तुझें मन ॥ जेव्हां तुज पुसावें जाण ॥ वारंवार हेंचि वदसी ॥११९॥
तिहीं हरवूनियां पण ॥ कानना गेले उठोन ॥ आम्हीच शत मूर्ख पूर्ण ॥ तुज पुसतसों विचार ॥१२०॥
तूं हितशूत्र पाहतां ॥ तुजपाशीं नाहीं आप्तता ॥ आमुचें अनहित तत्त्वतां ॥ पुनःपुन्हां तेंचि कथिसी ॥१२१॥
दुर्योधनासी धरूनि आधीं ॥ घालिसी पांडवांचियें बंदीं ॥ कळों आली तुझी बुद्धी ॥ घात त्रिशुद्धी करणार ॥१२२॥
तुझें पांडवांकडे मन ॥ मत्पुत्रांचें पाहसी न्यून ॥ तूं नलगेसी मज लागून ॥ जाईं येथून आतांचि ॥१२३॥
अवश्य म्हणोनि विदुर ॥ रथारूढ जाहला सत्वर ॥ काम्यकवना प्रति चतुर ॥ परमवेगें पातला ॥१२४॥
दूरी देखोनि विदुर ॥ बंधूंसी बोले युधिष्ठिर ॥ क्षत्ता कां येतो सत्वर ॥ काय विचार कल्पूनि ॥१२५॥
कीं शकुनि आणि सुयोधन ॥ तिहीं दिधला पाठवून ॥ कपट द्यूत दुसरेन ॥ खेळावयालागीं पैं ॥१२६॥
तरी मी यावरी अवधारा ॥ नच जाईं कौरवांचे मंदिरा ॥ क्षत्ता समीप देखतां त्वरा ॥ पांचही पांडव ऊठिले ॥१२७॥
सर्वही विदुरासी नमून ॥ आदरें देती आलिंगन ॥ मग बैसवूनि वर्तमान ॥ क्षत्ता सांगे गजपुरींचें ॥१२८॥
म्यां बहुत प्रकारें अत्यंत ॥ अंधासी सांगितलें स्वहित ॥ परी तो मनीं न धरी यथार्थ ॥ नानापरी बोधितां ॥१२९॥
शुद्धमार्ग टाकून ॥ आडमार्गें जो करी गमन ॥ त्यासी अपाय येतील दारुण ॥ नेघें म्हणतां न चुकती ॥१३०॥
सर्वांशीं द्वेष करीत ॥ आपुलें क्षेम कल्याण चिंतीत ॥ तरी त्यासी अनर्थ येती शोधीत ॥ नेघें म्हणतां न चुकती ॥१३१॥
महासतीचा अभिलाष धरीत ॥ बळेंचि क्षोभवीत संतभक्त ॥ बलवंतताशीं वैर लावीत ॥ येतील अनर्थ न प्रार्थितां ॥१३३॥
उसां धुसधुसीत उरग ॥ सुखें निद्रा केवीं ये मग ॥ शूलावरी बळेंचि टाकी अंग ॥ येती अनर्थ न प्रार्थितां ॥१३४॥
परवित्ताचा अभिलाष धरीत ॥ परकांतेशीं इच्छी सुरत ॥ छत्रपतीशीं द्वेष धरीत ॥ येती अनर्थ न प्रार्थितां ॥१३५॥
समर्थाचीं वर्में देख ॥ लोकांत बोले जो शत मूर्ख ॥ तपस्वियांसी छळूनि पाहे कौतुक ॥ येती अनर्थ न प्रार्थितां ॥१३६॥
सद्विवेक मित्र करून ॥ विहितपंथें करावें गमन ॥ सुधार साहूनि गहन ॥ संतांचीं वचनें मानावीं ॥१३७॥
परयोषिता परवित्त ॥ तृणाहूनि नीच मानीत ॥ चतुराशीं वाढवी मित्रत्व ॥ शास्त्र म्हणत धन्य त्यासी ॥१३८॥
असो विदुरावांचूनि तत्काल ॥ धृतराष्ट्र जाहला व्याकुल ॥ म्हणे मज न गमे वेळ ॥ तयावीण क्षणभरी ॥१३९॥
मी अंध नेत्रांविण ॥ अंतरीं अंध बुद्धिहीन ॥ विदुराविण समजवी कोण ॥ आश्रय आहे पाहतां ॥१४०॥
संजयासी म्हणे प्रज्ञा नयन ॥ काम्यकवना प्रति जाऊन ॥ विदुरासी येईं घेऊन ॥ समजावून आतांचि ॥१४१॥
संजय तत्काल निघाला ॥ काम्यकवना प्रति पावला ॥ तों धर्म ताप सवेष देखिला ॥ विद्वज्जनवेष्टित ॥१४२॥
वल्कलें अजिनें शोभत ॥ भस्म सर्वांगीं विराजत ॥ जैसा व्योमकेश मिरवत ॥ तपस मंडळी माझारी ॥१४३॥
देवीं वेष्टिला सहस्त्रनेत्र ॥ कीं किरण चक्रांत विराजे मित्र ॥ कीं दिव्यरत्ना भोंवते अपार ॥ जोहरी जैसे मिळती पैं ॥१४४॥
तैसा शोभला पंडुनंदन ॥ तों संजय उभा ठाकला येऊन ॥ पांडव नमिती धांवोन ॥ क्षेमालिंगन देती प्रेमें ॥१४५॥
संजय म्हणे विदुरा लागून ॥ कंठीं धरिला रायें प्राण ॥ जीवनाविण जैसा मीन ॥ तेवीं तुजवांचून ॥ व्याकुल ॥१४६॥
विदुरासी समजावून ॥ तत्कालचि गेला घेऊन ॥ प्रज्ञाचक्षु भेटला उठोन ॥ समाधान ॥ करी बहुत तेव्हां ॥१४७॥
विदुर गेला रुसोन ॥ माघारां आणिला समजावून ॥ हें ऐकोनि दुर्योधन ॥ परम क्षोभ पावला ॥१४८॥
आमुचा घातकर्ता क्षत्ता ॥ कां वृद्धें आणिला मागुता ॥ तो नाना उपाय करूनि आतां ॥ पांडव येथें आणील ॥१४९॥
मी आपुल्या उदरीं शस्त्र घालीन ॥ किंवा करीन महा विषपान ॥ शकुनि मी त्यागीन प्राण ॥ पांडव द्दष्टीं देखतां ॥१५०॥
ऐसा उपाय करा उठाउठीं ॥ पांडव पुनः न पडती द्दष्टीं ॥ कर्ण शकुनि म्हणे कष्टी ॥ होऊं नको दुर्योधना ॥१५१॥
जरी येथें आले पांडुनंदन ॥ पुनः कपट द्यूत खेळोन ॥ तत्काल टाकूं जिंकून ॥ एक क्षण न लागतां ॥१५२॥
शकुनि म्हणे असा सावधान ॥ दूरी आहेत जों पांचाल श्रीकृष्ण ॥ तों त्वरित घाला घालावा जाऊन ॥ टाकावे वधून पांचही ॥१५३॥
सिद्ध केलें सकल सैन्य ॥ तों एकांतीं सत्यवती नंदन ॥ अंधा सांगे येऊन ॥ अनर्थ पूर्ण पुढें दिसे ॥१५४॥
घाला घालूं इच्छीत ॥ तरी हे पडती अनर्थांत ॥ पांडवांसी श्रीरंग रक्षीत ॥ अंतर्बाह्य सर्वदा ॥१५५॥
अंध पाय शिवे हातें ॥ म्यां प्रेरिलें नाहीं त्यांतें ॥ ते जाती घाला घालावयातें ॥ तरी मी प्राण देईन ॥१५६॥
हेरमुखें वार्ता ऐकोन  ॥ मग उगेचि राहिले दुर्जन ॥ म्हणती विसर पाडून ॥ गुप्तरूपें पुढें जाऊं ॥१५७॥
असो धृतराष्ट्र बोले वचन ॥ स्वामी तूंचि बोधीं दुर्योधन ॥ व्यास म्हणे मैत्रेय जाण ॥ येईल येथें शीघ्रचि ॥१५८॥
तो बोधील तुझिया सुता ॥ परी हा नायकेचि शिकवितां ॥ तो शाप शस्त्रें तत्त्वतां ॥ ताडील यासी क्षणार्धें ॥१५९॥
ऐसें बोलोनि पराशरसुत ॥ अंतर्धान पावला त्वरित ॥ दुर्योधन पित्या जवळी येत ॥ तों मैत्रेय पातला ॥१६०॥
देदीप्यमान भानु मूर्तिमंत ॥ तैसा देखिला अकस्मात ॥ सुतां सहित अंबिकासुत ॥ सन्मानीत तयासी ॥१६१॥
सुयोधन पुसे वर्तमान ॥ कोठोनि जाहलें आगमन ॥ मैत्रेय म्हणे तीर्थें संपूर्ण ॥ करीत आलों काम्यकवना ॥१६२॥
तों पांडव देखिले अकस्मात ॥ जटाधर वल्कलवेष्टित ॥ तृणशेजेवरी निजत ॥ उष्ण वात बहु तेथें ॥१६३॥
परम सुकुमार पांचाली ॥ चंपककलिका श्रृंगारशाली ॥ वातोष्णें कोमाइली ॥ आपाद देखिली समग्र म्यां ॥१६४॥
कपट द्यूत खेळोन ॥ बाहेर घातले पंडुनंदन ॥ अद्यापि तरी ऐकें वचन ॥ आणीं बोलावून जाऊनि तूं ॥१६५॥
महासाधु विदुर भक्त ॥ विख्यात वीर बलवंत ॥ हिडिंब किर्मीर अद्भुत ॥ राक्षस मारिले भीम सेनें ॥१६६॥
खांडववन देऊनि वैश्वानरा ॥ जर्जर केलें निर्जरेश्वरा ॥ अरे त्या कपिवरध्वज महाविरा ॥ समरीं कोण जिंकील ॥१६७॥
सोमवंश विजयध्वज ॥ सर्वलक्षण युक्त धर्मराज ॥ तरी त्यासी देईं राज्य ॥ यथाविभग समत्वें ॥१६८॥
दोह सांडीं सुयोधन ॥ वांचविणें आहे आपुल्या प्राणा ॥ तरी तूं जाऊनि काम्यकवना ॥ पृथानंदनां आणीं वेगीं ॥१६९॥
ऐसें ऐकतां दुर्योधन ॥ परम क्षोभला जैसा कृशान ॥ श्मश्रु हातें पिळून ॥ अंक हातें थापटीत ॥१७०॥
सव्यपद घांसी मेदिनीं ॥ गर्वें न बोलेचि पापखाणी ॥ सक्रोधें हुंकार देऊनी ॥ अधर दशनें रगडीत ॥१७१॥
ऐसें देखतांचि जाण ॥ प्रलयीं क्षोभे मृडानीरमण ॥ तैसा शाप वदे मैत्रेय दारूण ॥ जो कां अलोट हरिहरां ॥१७२॥
म्हणे चांडाळ तूं दुर्योधन ॥ द्वेषी हिंसक कुटिल पूर्ण ॥ करिसी तपस्वियांचा अपमान ॥ गर्वें करून बोलसी ॥१७३॥
न धरिसी ब्राह्मणांची मर्यादा ॥ दुष्टा मलिना मतिमंदा ॥ तुझे अंकीम भीमाची गदा ॥ विद्युल्लतेऐशी पडेल ॥१७४॥
तैणेंचि अंक चूर्ण होऊन ॥ तळमळूनि सोडिसील प्राण ॥ माझें असत्य शापवचन ॥ जलजा सनाचेन पैं नोहे ॥१७५॥
मदें माजला जेवीं बस्त ॥ कीं पिसाळलें श्वान यथार्थ ॥ कीं डुकर माजलें बनांत ॥ हाणी दांत भलत्यासी ॥१७६॥
तैसा तूं माजलासी पूर्ण ॥ पक्क फणस जेवीं होय चूर्ण ॥ तेवीं भीमगदेंकरून ॥ छिन्नभिन्न अंक होय कां ॥१७७॥
ऐसें मैत्रेय बोलोन ॥ सवेंचि पावला अंतर्धान ॥ जैसा कायेंतूनि जाय प्राण ॥ तो नेणवे कोणासी ॥१७८॥
भयभीत दुर्योधन ॥ चिंतार्णवीं गेला बुडोन ॥ शोकें तळमळे अंबिकानंदन ॥ म्हणे वर्तमान बरें न दिसे ॥१७९॥
यावरी विदुरासी बोलावून ॥ धृतराष्ट्र पुसे परम उद्विग्न ॥ तुवां देखिलें काम्यकवन ॥ तरी वर्तमान एक सांगें ॥१८०॥
भीमें मारिला किर्मीर ॥ ते कथा मज सांगें समग्र ॥ मग बोले चतुर विदुर ॥ ऋषि मुखें ऐकिले म्यां ॥१८१॥
गजपुरांतूनि निघाले पंडुनंदन ॥ तीन दिवसां पावले काम्यकवन ॥ रजनींत जातां मार्ग क्रमून ॥ तों किर्मीर राक्षस धांवला ॥१८२॥
महाविशाल रजनीचर ॥ कज्जलवर्ण पर्वताकार ॥ भाळीं चर्चिला सिंदूर ॥ दाढा शूभ्र भयानक ॥१८३॥
त्याच्या भयेंकरूनी तेथें न वसे प्राणी ॥ तो पांडवांसी आडवा येऊनी ॥ कवण म्हणोनि पुसतसे ॥१८४॥
त्यासी देखोनि द्रौपदी भयभीत ॥ नेत्र झांकी होय कंपित ॥ अर्जुन तियेसी सांवरीत ॥ म्हणे कांहीं मनांत भिऊं नको ॥१८५॥
राक्षसासी पंडुनंदन ॥ पुसती तूं आहेस कोण ॥ येरू म्हणे मी किर्मीर जाण ॥ बकासुराचा बंधु पैं ॥१८६॥
पुरुषमात्र धरून ॥ मी भक्षितों न लागतां क्षण ॥ तुम्ही पांच जण आहां कोण ॥ नेतां कामिनी कोणाची ॥१८७॥
धर्म म्हणे आम्ही पंदुकुमार ॥ हस्तिनापुरींचे राज्यधर ॥ मग बोले किर्मीर ॥ दावा वृकोदर कोणता तो ॥१८८॥
त्या भीमाच्या रक्तेकरून ॥ करीन बकासुराचें तर्पण ॥ मग त्यासी सगळाचि ग्रासीन ॥ करीन चूर्ण दंतांखालीं ॥१८९॥
माझा बकासुर बलगहन ॥ तेणें मारिला कपटे करून ॥ बहुत दिवस भीमा लागून ॥ शोधितां आजि सांपडला ॥१९०॥
ऐसें बोलतां किर्मीर ॥ हांक फोडी वृकोदर ॥ पर्वताकार तरुवर ॥ उपडून हातीं घेतला ॥१९१॥
अर्जुनें न लागतां क्षण ॥ गांडीवासी चढविला गुण ॥ तों किर्मीर वृक्ष घेऊन ॥ भीमावरी धांवला ॥१९२॥
भीम म्हणे रे कीटका ॥ बकदर्शना तुज मशका ॥ पाठवितों यमलोका ॥ अर्ध क्षण न लागतां ॥१९३॥
एक काल एक कृतान्त ॥ एक अखया एक हनुमंत ॥ एक एकाचे पृष्ठीवरी मोडीत ॥ झाडें सर्व उपडोनि ॥१९४॥
द्वादश योजनें पर्यंत ॥ महीवृक्ष भंगले समस्त ॥ मग शिला आणि पर्वत ॥ परस्परें टाकिती ॥१९५॥
मल्लयुद्ध अद्भुत ॥ जाहले घटिका चारपर्यंत ॥ मग भीमें अलातचक्रवत ॥ चरणीं धरूनि भोंवंडिला ॥१९६॥
तैसाचि आपटिला झडकरी ॥ मग पाय देऊनि पृष्ठीवरी ॥ धरूनि शिर पादाग्रीं ॥ मध्यभागीं मोडिला ॥१९७॥
दुंदुभी फुटतां ध्वनि उमटत ॥ तैसा राक्षस देहांतीं आरडत ॥ कुंजरासी होय पर्वतपात ॥ भूमीवरी तेवीं पडियेला ॥१९८॥
ऐसा युरुषार्थ करूनि पंडुनंदन ॥ गेले द्वैतवना लागून ॥ द्रौपदी परम आनंदोन ॥ म्हणे धन्य वृकोदरा ॥१९९॥
ऐसी कथा सांगतां विदुर ॥ श्वासोच्छवास टाकी धृतराष्ट्र ॥ म्हणे मैत्रयाचा शाप क्रूर ॥ कालत्रयीं टळेना ॥२००॥
असो यावरी कष्टी वनवासी पांडव ॥ भेटावयासी आले राजे सर्व ॥ छप्पन्न कोटि यादव ॥ यादवेंद्रासमवेत पैं ॥२०१॥
वसुदेव आणि उद्धव अक्रूर ॥ उग्रसेन रेवतीवर ॥ दळासहित सत्वर ॥ द्वैतवना पातले ॥२०२॥
शिखंडी आणि धृष्टद्युन्म ॥ आले द्रौपदीचे बंधु धांवोन ॥ कौरवांसी निंदिती पूर्ण ॥ क्रोधेकरून सर्वही ॥२०३॥
श्रीरंगासी देखोन ॥ पांडव घालिती लोटांगण ॥ द्रौपदी धांवूनि धरी चरण ॥ प्रेमेंकरून स्फुंदत ॥२०४॥
द्रौपदीसी म्हणे यादवेंद्र ॥ माये तुवां कष्ट देखिले अपार ॥ तरी कौरवरक्तें समग्र ॥ धरातल भिजवीन ॥२०५॥
देखोनि अंतकाळ ॥ त्यांच्या स्त्रिया रडतील सकल ॥ तो तूम देखसी कोल्हाळ ॥ अल्पकाळेंचि यावरी ॥२०६॥
उतरूनि पृथ्वीचा भार ॥ धर्मावरी धरीन छत्र ॥ यावरी त्रयोदश वर्षांनंतर ॥ सोहळा देखसी कृष्णे तूं ॥२०७॥
वस्त्रहरणाचे दुःख अद्भुत ॥ आठवूनि कृष्णा शोक करीत ॥ म्हणे पांचही पति बलवंत ॥ उगेचि होते तये वेळीं ॥२०८॥
कैवारिया भक्तवत्सला ॥ वस्त्रें पुरविलीं ते वेळां ॥ करुणाकरा दयाळा ॥ लाज माझी रक्षिली ॥२०९॥
धर्म म्हणे उपकार ॥ किती आठवावे अपार ॥ कुंभिनीचें करूनि पत्र ॥ लिहितां चरित्र सरेना ॥२१०॥
पांचालीचे पंच पुत्र ॥ महायोद्धे वयकिशोर ॥ द्रौपदीपांडवांसी सत्वर ॥ धृष्टद्युन्में भेटविले ॥२११॥
प्रतिविंध्य श्रुतसोम शतानीक ॥ श्रुतसेन श्रुतकर्मा देख ॥ पितयांतुल्या ते बालक ॥ परम पुरुषार्थी पांचही ॥२१२॥
सुभद्रा आणि अभिमन्य ॥ कृष्णासंगें आले द्वारकेहून ॥ सौभद्रें पांडवांसी वंदून ॥ केलें नम द्रौपदीसी ॥२१३॥
यावरी देशोदेशींचे राव ॥ स्तविती द्वादश जातींचे यादव ॥ वसुदेव बलभद्र उद्धव ॥ समयोचित बोलती ॥२१४॥
धृष्टद्युन्म प्रतिज्ञा करीत ॥ द्रोणासी मारीन क्षणांत ॥ शिखंडी म्हणे मी करीन अंत ॥ वृद्ध भीष्माचा यावरी ॥२१५॥
सुयोधन दुःशासन ॥ भीमहस्तें सोडितील प्राण ॥ कर्णाचा काळ अर्जुन ॥ शल्यासी मरण धर्महस्तें ॥२१६॥
माद्रीनंदन प्राण ॥ शकुनीचा घेतील न लागतां क्षण ॥ असो सर्वही कौरव सैन्य ॥ पांचही मिळोन आटितील ॥२१७॥
यावरी यादवां सहित यादवेंद्र ॥ सुभद्र आणि सौभद्र ॥ द्वारकेसी गेले सत्वर ॥ आज्ञा घेऊनि पांडवांची ॥२१८॥
घेऊनि द्रौपदीचे नंदन ॥ पांचालपुरा गेला धृष्टद्युन्म ॥ सकल राजे प्रजाजन ॥ निजदेशा प्रति जाती ॥२१९॥
यावरी द्वैतवनीं पंडुकुमार ॥ राहिले घेऊनि अपार विप्र ॥ तेथें द्वादश संवत्सर ॥ क्रमिते जाहले सत्समागमें ॥२२०॥
नित्य नैमित्तिक कर्म ॥ व्रतें हवनें पितृश्राद्धें उत्तम ॥ अग्निसेवा त्रिकाल होम ॥ देत धर्म आदरेंशीं ॥२२१॥
पक्षेष्टि मासेष्टी ॥ नक्षत्रेष्टि प्रियपरमेष्टी ॥ चातुर्मास्य पर्वें पोटीं ॥ आचरतां आनंद धर्मातें ॥२२२॥
याग सदनीं वेदघोष ॥ ओंकारवषट्‍कारध्वनि सुरस ॥ ते ते महा ऋषी निर्दोष ॥ येचि रीतीं आचरती ॥२२३॥
यथा सुखें राहिले ब्राह्मण ॥ कुंडवेदिका शास्त्र प्रमाण ॥ सायंकालीं देदीप्यमान ॥ तिन्ही अग्नि शोभती ॥२२४॥
चहूं वेदांचें अध्ययन ॥ शास्त्रचर्चा पुराण श्रवण ॥ पांडवांजवळी हरिकीर्तन ॥ रात्रीं करिती कित्येक ॥२२५॥
मार्कंडेय महाऋषी ॥ येऊनि भेटला पांडवांसी ॥ म्हणे धर्मा तूं वनवासी ॥ सुखी आहेसी वाटतें ॥२२६॥
प्रत्यक्ष परब्रह्म राम चंद्र ॥ चौदा वर्षें सेविलें तेणें वन घोर ॥ मग रामकथा समग्र ॥ धर्मराया सांगितली ॥२२७॥
ते रामकथा वर्वावी समस्त ॥ तरी समुद्रा ऐसा वाढेल ग्रंथ ॥ वाल्मीकिकृत्य सत्य यथार्थ ॥ सप्तही कांडें कथियेलीं ॥२२८॥
पांडुरंगकृपें यथार्थ ॥ चाळीस अध्याय राम विजय ग्रंथ ॥ ती कथा श्रोतीं पहावी तेथ ॥ अत्यादरें करू नियां ॥२२९॥
द्वैतवन परम सुंदर ॥ नाना जातींचे तरुवर ॥ भेदीत गेले अंबर ॥ मनोहर सदाफल जे ॥२३०॥
छाया शीतल सघन ॥ माजी न दिसे सूर्य किरण ॥ नारळी केळी पोफळी रातांजन ॥ सुवासचंदन मलयागर ॥२३१॥
अशोक वृक्ष उतोतिया ॥ राय आंवळे आंबे खिरणिया ॥ निंबें कवट वाढोनियां ॥ सुंदर डाहळिया डोलती ॥२३२॥
दाळिंबी रायकेळी मंदरा ॥ चंदन वृक्ष मोहो अंजीर ॥ चंपक जाई जुई परिकर ॥ बकुल मोगरी सेवंतिया ॥२३३॥
शतपत्र जपा वृक्ष परिकर ॥ तुलसी करवीर कोविदार ॥ कनकवेली नागवेली सुंदर ॥ पवळवेली आरक्त ॥२३४॥
मयूरें चातकें बदकें ॥ कस्तूरीमृग जवादी बिडालकें ॥ राजहंस नकुलें चक्रवाकें ॥ कोकिला कौतुकें बाहती ॥२३५॥
धन्य धन्य धर्म राज नृपती ॥ श्वापदें निर्वैर विचरती ॥ योग साधनें ऋषी आचरतीं ॥ गायक गर्जती आलापें ॥२३६॥
रसाळ आणि परमपावन ॥ अरण्यपर्व गोड गहन ॥ स्वधर्मनिष्ठ धर्म परायण ॥ त्यासीच जाण रुचे हें ॥२३७॥
वनपर्व कमल सुरस ॥ पंडितमिलिंद घेती सुवास ॥ कुटिल निंदकदर्दुरांस ॥ कुतर्कपंक प्राप्त सदा ॥२३८॥
दर्दुरीं निंदिला कमल पराग ॥ परी सदा राहती सज्जनभृंग ॥ ज्यांचे ह्रदयीं श्री पांडुरंग ॥ सर्वकाळ वसतसे ॥२३९॥
ब्रह्मा नंदा पंढरीराया ॥ श्री धर वरदा कौवारिया ॥ अभंगा निर्विकारा करुणालय ॥ ठेवीं पायां जवळचि ॥२४०॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ अरण्यपर्व व्यास भारत ॥ त्यां तील सारांश यथार्थ ॥ तेविसाव्यांत कथियेला ॥२४१॥
स्वस्ति श्री पांडवप्रातप ग्रंथ ॥ अरण्यपर्वटीका श्रीधर कृत ॥ काम्यकवनांतून द्वैतवनांत ॥ पांडवगमन कथियेलें ॥२४२॥
इति श्री धरकृतपांडवप्रतापे वनपर्वणि त्रयोविंशाध्यायः ॥२३॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

॥ श्री पांडवप्रताप वनपर्व त्रयोविंशाध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 09, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP