पांडवप्रताप - अध्याय ४४ वा
पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ पुंडलीकवरदा पुरुषोत्तमा ॥ भक्त मान सोद्यान विहंगमा ॥ भीमातट विहारा मेघश्यामा ॥ निगमागमा वंद्या तूं ॥१॥
पांडवरक्षका पंढरीशा ॥ विला सिया परम पुरुषा भगिनी मानूनि पंडुस्नुषा ॥ पार्था प्रति रक्षिसी तूं ॥२॥
पांडवांचे भाग्य देखा ॥ न वर्णवेचि सहस्त्र मुखा ॥ तूं तयांचा पाठिराखा ॥ अंतर्बाह्य ॥ अंतर्बाह्य रक्षिसी ॥३॥
मागें संपलें ॥ आतां द्रोणपर्व आरंभिलें ॥ जें अत्यंत रसागळें ॥ सादर श्रोतीं परिसिजे ॥४॥
पदकां मध्यें नायक हिरा ॥ तैसें द्रोण पर्व अवधारा ॥ उरी न उरे दोष मात्रा ॥ श्रवण करितां साक्षेपें ॥५॥
जेथें माजला वीररस ॥ ऐकतां चतुरां परम सुरस ॥ जन मेजय पुसे वैशंपायनास ॥ सांग विशेष कथा पुढें ॥६॥
गंगा त्मज पहुडला शरपंजरीं ॥ मग समर माज विला कोणेपरी ॥ व्यासशिष्य म्हणे अवधारीं ॥ जन मेजया राजेंद्रा ॥७॥
शंतनुज पडलियावरी ॥ शोभा न दिसे पृतनेवरी ॥ जैशी विगत धवा नारी ॥ कीं निम्नगा सलिला विण ॥८॥
भंगली नौका महाजळीं ॥ बुडावया जैसी डळमळी ॥ तैसीच चमू ते काळीं ॥ भयें व्याप्त दिसतसे ॥९॥
भीष्मासी बाण उशी देऊन ॥ कौरव पांडव करिती नमन ॥ करू नियां प्रदक्षिण ॥ मग युद्धासी प्रवर्तले ॥१०॥
पूर्ण दशदिन पर्यंत ॥ तेणें युद्ध केलें अद्भुत ॥ दहा सहस्त्र रणपंडित ॥ महारथी नित्य पाडिले ॥११॥
भीष्म प्रताप आठवून ॥ शोक करिती कौरव संपूर्ण ॥ द्रोण आणि शारद्वत कर्ण ॥ अत्युद्विग्न जाहले ॥१२॥
दुर्यो धन तेचि रात्रीं ॥ चिंतानळें आहाळे चित्तीं ॥ मग जाऊनि गुरु शिभिरा प्रती ॥ नमूनि बोलता जाहला ॥१३॥
म्हणे कवींद्र गुरुं हूनियां ॥ तुझा महिमा द्रोणाचार्या ॥ यावरी चमू रक्षावया ॥ तुजहूनि कोणी थोर नसे ॥१४॥
काळ मृत्यु भयंकर ॥ यांपासूनि रक्षिता तूं आचार्य ॥ तूं शिरीं असतां पाहें ॥ सदा निर्भय असों आम्ही ॥१५॥
मग वस्त्रें भूषणें आणोन ॥ प्रीतीनें पूजिला गुरु द्रोण ॥ सेनापतित्व रणपट्टा पूर्ण ॥ आचार्यासी दिधला पैं ॥१६॥
चार्ही वेद मुखोद्नत ॥ सकल शास्त्रीं पारंगत ॥ पाठीशीं तूणीर विरा जत ॥ विजे ऐसें सायकासन ॥१७॥
पांडव कौरव यादव समस्त ॥ हे द्रोणाचे शिष्य अंकित ॥ ज्याच्या वरदहस्तें मिरवत ॥ मुकुट सुभद्रापतीचा ॥१८॥
तो प्रसन्न होऊनि गुरुराणा ॥ म्हणे वर मागें सुयो धना ॥ मग तो लागोनि आचार्यचरणां ॥ कौरवेश बोलतसे ॥१९॥
तरी अजात शत्रु कुंती सुत ॥ धरूनि देईं आम्हांसी जित ॥ धर्माचा वध मी निश्चित ॥ इच्छीत नाहीं आचार्या ॥२०॥
धर्मासी वधितां जाण ॥ आम्हांसी उरों नेदी अर्जुन ॥ तया जित धरितां शरण ॥ सर्व येतील आम्हांतें ॥२१॥
पुढती खेळोनियां द्यूत ॥ वनवासासी पाठवूं पांडव त्वरित ॥ मग म्हणे भरद्वाज सुत ॥ तूं बोललासी ॥२२॥
माझा शिष्य होय अर्जुन ॥ परी विद्येनें आगळा मजहून ॥ तारकारिजनक पाकशासन ॥ केले प्रसन्न स्वर्गीं तेणें ॥२३॥
शस्त्रें अस्त्रें मंत्र विशेष ॥ जीं त्रिभुवनीं न ठाउकीं कोणास ॥ ते विद्या ठाउकी सव्यसाचीस ॥ तरी तो फोडीं यांवेगळा ॥२४॥
वेगळा होतांचि फाल्गुन ॥ क्षणमात्रें धर्मासी धरीन ॥ ऐसें ऐकतां दुर्यो धन ॥ परम आनंदें बोलत ॥२५॥
म्हणे नाना उपाय करून ॥ वेगळा नेतों श्वेतवाहन ॥ अजात शतु धरून ॥ जीत आम्हांसी द्यावा तुम्हीं ॥२६॥
ऐसा नेम होतां तत्काळ ॥ गाजलीं रणवाद्यें तुंबळ ॥ तो समाचार सकळ ॥ पांडवपांचाळां समजला ॥२७॥
धर्म म्हणे आचार्य प्रतिज्ञा ॥ कळली असे कीं अर्जुना ॥ सांवरूनि सकळ पृतना ॥ सावधान असावें ॥२८॥
पार्थ म्हणे आलियाही कृतान्त ॥ मी तुज रक्षीन यथार्थ ॥ परी एक कर्म अद्भुत ॥ सहसा माझेनें न करवे ॥२९॥
मर्यादा सांडील मेदिनीवसन ॥ वरूण दिशे उगवेल सहस्त्र किरण ॥ हेंही घडे परी माझेन ॥ आचार्यवध न करवे ॥३०॥
मृग जळीं बुडेल अगस्ती ॥ तमकूपीं पडेल गभस्ती ॥ तृणालिका धरूनि नेती ॥ अरुणा नुजासी घडेल हें ॥३१॥
मशक धरीक सौदामिनी ॥ भोगींद्र सांडील कुंभिनी ॥ परी द्रोणवध माझेनी ॥ कल्पांतींही करवेना ॥३२॥
जो वाचस्पतीची अपर प्रतिमा ॥ ज्याचा त्रिभुवनीं न माये महिमा ॥ पृथ्वीहूनि आगळी क्षमा ॥ तो माझेनें धर्मा न वधवे ॥३३॥
द्रोण स्नेहाचे समुद्रीं ॥ म्यां बुडी दिधली अहो रात्रीं ॥ जेणें पुत्राहूनि मजवरी ॥ प्रीति ठेविली अपार ॥३४॥
या शरीराच्या करून ॥ आचार्यपदीं लेववीन ॥ परी मी नव्हेंचि उत्तीर्ण ॥ कांहीं एक तयाचा ॥३५॥
समरांगणीं टाकूनि बाण ॥ त्याशीं धर्म युद्ध निर्वाण ॥ करीन परी गुरूचा प्राण ॥ कदा माझेंनें न घेववे ॥३६॥
तुज धरा वया येतो द्रोण ॥ माझी प्रतिज्ञा तुज रक्षीन ॥ असो उदय पावला सह्स्त्र किरण ॥ दरिद्रा अंतीं भाग्य जैसें ॥३७॥
वाद्यें गर्जती नानाविध ॥ दोन्ही दळें जाहलीं सिद्ध ॥ पांच जन्य देवदत्तांचा नाद ॥ गगना माजी न सांठवे ॥३८॥
तों गजर जाहला तुंबळ ॥ नादें डळमळला भूगोळ ॥ चतुर्दश लोक सकळ ॥ भयें काळ कांपतसे ॥३९॥
वाटे गगन पडेल तुटोनी ॥ कीं वरती जाईल अवनी ॥ भगणें रिचवती मेदिनीं ॥ दचके मनीं उरगेंद्र ॥४०॥
कूर्म खालीं पृष्ठी सांवरीत ॥ आदिसूकर निटावी दांत ॥ तो कोल्हाळ ऐकतां कांपत ॥ महाबलवंत धोंकड जे ॥४१॥
नाना वाद्यांचे बोभाट ॥ उभयदळांचा कडकडाट ॥ त्यांचे मध्य भागीं अचाट ॥ विजयरथ पार्थाचा ॥४२॥
ध्वज स्तंभीं महारुद्र ॥ वेळोवेळां करी भुभुःकार ॥ रण सागरीं रथ जहाज थोर ॥ कर्ण धार हनुमंत वरी ॥४३॥
रथीं सारथीं इंदिरावर ॥ जो लावण्याब्धि शतपत्रनेत्र ॥ पांडव भाग्य जो सहस्त्रवक्र ॥ तोही वर्णूं शकेना ॥४४॥
सर्वांत श्रेष्ठ वैकुंठ धाम ॥ तैसा दिसतो रथोत्तम ॥ प्रलयचपले ऐसा ध्वज परम ॥ पालवीत परवीरां ॥४५॥
जैसा सुपर्णपक्ष फडकत ॥ तैसें ध्वजाचें तेज तळपत ॥ हरिहर दोघे रक्षीत ॥ धनंजयासी रणांगणीं ॥४६॥
इकडे कौरव दळीं गुरु द्रोण ॥ जैसा निरभ्र गगनीं चंडकिरण ॥ पांडवचमू परम दारुण ॥ न धरी द्दष्टींत पुरुषार्थें ॥४७॥
आचार्य तेज अद्भुत ॥ पाहतां पांडव पृतना भयभीत ॥ वाटे समरांगणीं कृतान्त ॥ द्रोण रूपें अवतरला ॥४८॥
पांडवसेना सरितापती ॥ घोटूं इच्छी द्रोण अगस्ती ॥ तेव्हां वाद्य गजरें ॥ थरथरत क्षणक्षणां ॥४९॥
जैसी तरूवरी चपला पडे तुटोन ॥ तैसा पुढें धांवला गुरु द्रोण ॥ तेव्हां सायकासना पासून ॥ बाण घन वर्षत ॥५०॥
शिखी जाळी तृणकानन ॥ कीं द्विजेंद्र संहारी काद्रवेयगण ॥ तैसी पांडववाहिनी गुरु द्रोण ॥ संहारीत गण वेना ॥५१॥
कणसें छेदूनि नेत कृषीवल ॥ रिते दंड दिसती सरळ ॥ शिरांरहित वीर सबळ ॥ केले बहुत आचार्यें ॥५२॥
पदक्रमवर्ण क्रमें करून ॥ द्रोणे केलें वेदाध्ययन ॥ त्याचि त्वरेनें मार्गण ॥ सुटती चापा पासूनी ॥५३॥
चापमेघ अनिवार ॥ शरधारा सुटल्या अपार ॥ चालिले रुधिराचे आरक्त पूर ॥ पुसती मार्ग सिंधूचा ॥५४॥
ऐसें द्रोणें केलें अभिनव ॥ तों स्यंदनारूढ सहदेव ॥ शकुनीवरी वर्षाव ॥ बाणांचा करीत धांवला ॥५५॥
तंव परम क्रोधें शकुनी ॥ बाण वर्षत तये क्षणीं ॥ जैसा सव्यापसव्य आर्षवचनीं ॥ मूढ पंडिता पुढें अनुवादे ॥५६॥
संवत्सरसंख्या बाणीं ॥ शकुनी खिळिला सहदेवें रणीं ॥ तूणीर चाप रथ छेदूनी ॥ क्षणमात्रें टाकिला ॥५७॥
मारिले अश्व आणि सारथी ॥ मग शकुनी होऊनि विरथी ॥ गदा घेऊनि त्वरितगतीं ॥ सहदेवावरी लोटला ॥५८॥
गदा घायें रणांगणीं ॥ सारथी मारिला तये क्षणीं ॥ सहदेवें शक्ति टाकूनी ॥ शकुनी ह्रदयीं भेदिला ॥५९॥
तों रथारूढ भीम सेन ॥ पुढें धांवला वर्षत बाण ॥ दुर्यो धनाचें सैन्य ॥ अपार भेदिलें तेणें पैं ॥६०॥
तों दुर्यो धन बंधु निश्चिती ॥ जयाचें नाम विंशती ॥ तो पुढें धांवला त्वरितगती ॥ मागें टाकूनि सैन्यातें ॥६१॥
त्याचे ह्रदयीं वीस बाण ॥ विधिता जाहला भीम सेन ॥ तेणें तीस बाण टाकून ॥ वृकोदरासी भेदिलें ॥६२॥
भीमकरींचें सायका सन ॥ तेणें छेदिलें न लागतां क्षण ॥ मग पवना त्मज गदा घेऊन ॥ पवनवेगें धांवला ॥६३॥
रथ सारथी अश्व पाहें ॥ चूर्ण केले एकाचि घायें ॥ जैसे काम क्रोध लोभ ज्ञानियें ॥ मनोजयें जिंकिले पैं ॥६४॥
जो नकुलाचा मातुळ ॥ माद्रीबंधु शल्य सबळ ॥ त्यावरी नकुळ परम चपळ ॥ मनो जवें धांवला ॥६५॥
शल्याचे अंगीं बाण ॥ नकुळ भेदी बळें करून ॥ रथ सारथी तुरंग जाण ॥ पाडी छेदून तत्काळ ॥६६॥
शल्य दुसरे रथीं बैसत ॥ दश बाण टाकूनि त्वरित ॥ ह्रदयीं भेदिला भगिनी सुत ॥ पराक्रमें रणांगणीं ॥६७॥
चैद्य देशींचा राजा धृष्टकेत ॥ तेणें देखिला शारद्वत ॥ दोघांचें युद्ध अद्भुत ॥ होतें जाहलें तेधवां ॥६८॥
विद्युल्लता पडे अकस्मात ॥ तैसा सात्यकी धांवला त्वरित ॥ सत्तर बाणीं बलाद्भुत ॥ कृतवर्मा तेणें खिळियेला ॥६९॥
तेणें सत्याहत्तर बाणीं ॥ सात्यकी भेदिला तये क्षणीं ॥ सभापति पांडवांकडूनी ॥ सुशर्म्यावरी धांविन्नला ॥७०॥
कर्ण आणि विराट ॥ युद्ध करिती तेव्हां अचाट ॥ भगदत्त द्रुपद सुभत ॥ रणांगणीं भीडती ॥७१॥
शिखंडी आणि भूरिश्रव ॥ दाविती युद्धाचें लाघव ॥ घटोत्कच बलार्णव ॥ तेणें अलंबुष पाचारिला ॥७२॥
पांडवदळांतूनि चेकितान ॥ धांवला विंदानुविंद लक्षून ॥ श्रीरंगभगिनी नंदन ॥ स्यंदनारूढ धांवला ॥७३॥
उद्यानीं संचरे सौदामिनी ॥ तेवीं अरिसेनेंत प्रवेशे ते क्षणीं ॥ कौरव जर्जर केले रणीं ॥ निजर पाहती ॥७४॥
सुयोधनबंधु नाम पौरव ॥ तेणें सौभद्रावरी घातली धांव ॥ जैसी अळिकेनें घेतली हांव उरगरिपु जिंकावया ॥७५॥
तो महावीर प्रत्यर्जुन ॥ पौरवावरी निर्वाण सोडिले बाण ॥ ध्वज रथ सूत शरासन ॥ न लागतां क्षण छेदिले ॥७६॥
ह्रदयीं भेदिले दश बाण ॥ पौरव पडला मूर्च्छा येऊन ॥ तों कृतवर्म्यानें अभिमन्य ॥ सिंहनादें पाचारिला ॥७७॥
कृतवर्मा वर्षे बाण जाळ ॥ तें छेदी सुभद्रा बाळ ॥ बाळ नव्हे तो केवळ काळ ॥ कौरव चमू संहारी ॥७८॥
कृतवर्मा शत बाणीं ॥ जर्जर केला समरांगणीं ॥ तंव पौरव मागुत्यानी ॥ गदा घेऊनि धांवला ॥७९॥
गदा भिरकावितां जाण ॥ छेदूनि पाडी अभिमन्य ॥ मग तो पौरव केशीं धरून ॥ मुष्टि प्रहारें धुमसिला ॥८०॥
जैसें कुंजरें मार्जार धरूनी ॥ मर्दिलें शुंडादंडें करूनी ॥ तों जय द्रथ खडग घेऊनी ॥ सोभद्रावरी धांवला ॥८१॥
तंत्र दुर्यो धनाचा शालक ॥ मस्तकीं करूनि खेटक ॥ रथाखालीं रिघोनि देख ॥ अश्वा स्यंदन छेदीतसे ॥८२॥
श्येनपक्षी उडे बलाद्भुत ॥ तैसा उडाला पार्थसुत ॥ गदाघायें जय द्रथ ॥ विकळ केला भूतळीं ॥८३॥
सवेंचि उठोनि जय द्रथ ॥ शक्ति दोहीं हातीं ओपीत ॥ तों अभिमन्यें धरूनि अकस्मात ॥ त्या जवरी भिरका विली ॥८४॥
अविधि देखोनि दैवत ॥ साधकावरी जेवीं परतत ॥ तैसा शक्तीनें जय द्रथ ॥ भुजा स्थानीं भेदिला ॥८५॥
सवेंचि रथीं चढे पार्थ सुय ॥ बहु बाणीं भेदिला जय द्रथ ॥ अवघे भुभुज मान वित ॥ युद्ध देखोनि तयाचें ॥८६॥
इंदिरावर भगिनी सुत ॥ त्याचा पराक्रम देखोनि अद्भुत ॥ कौरव लोटले समस्त ॥ काक जैसे हंसावरी ॥८७॥
शल्यें टाकूनि बाण ॥ छेदिला अभिमन्याचा स्यंदन ॥ उणें देखतां भीम सेन ॥ पंचाननापरी धांवे ॥८८॥
देखो नियां महाव्याघ्र ॥ पळती जैसे मृगांचे भार ॥ तैसा कौरव सेना सागर ॥ पळाला तो भीमभयें ॥८९॥
पळतां गज पायीं धरी ॥ आपटूनि भिरकावी अंबरीं ॥ गदा घायें चूर्ण करी ॥ स्यंदन आणि वीरांतें ॥९०॥
पर्वतावरी पडे पर्वत ॥ तैसा शल्य भीमावरी धांवत ॥ दोन घटिका पर्यंत ॥ महायुद्ध जाहलें ॥९१॥
वर्म पाहूनि रण मंडळीं ॥ गदा हाणिती महाबळी ॥ नाना मंडळें गति आगळी ॥ थोर चमत्कार दाविती ॥९२॥
एक मेरु एक मंदार ॥ एक समुद्र एक अंबर ॥ एक वासुकी एक सहस्त्रवक्र ॥ तैसे दोघे दिसती पैं ॥९३॥
दोन्ही दळींचे नृपती ॥ युद्ध पाहोनि ग्रीवा तुका विती ॥ पर्वत कुंकुमें चर्चिजेती ॥ तैसे दिसती दोघेही ॥९४॥
गदा घायें दोघे जण ॥ पडले तेव्हां मूर्च्छा येऊन ॥ मग शल्यासी स्यंदनीं घालोन ॥ नेत कृतवर्मा तेधवां ॥९५॥
जैसा लागतां प्रभंजन ॥ जलद जाल जाय वितळोन ॥ तैसी कौरव सेना भयें करून ॥ पाळती जाहली तेधवां ॥९६॥
यावरी कर्ण पुत्र वृष सेन ॥ धांवे रहंवरीं आरूढ होऊन ॥ तों शतानीक तिकडून ॥ पार्थ पुत्र धांवला ॥९७॥
युद्ध जाहलें घटिका एक ॥ किंचित माघारला शतानीक ॥ तों प्रतिविंध्यादि चौघे देख ॥ पाठीराखे धांवले ॥९८॥
त्या पंच कुमारीं मिळोनी ॥ खिळिली सकळ कौरव वाहिनी ॥ हस्तला घव पाहतां नयनीं ॥ पांडव मनीं आनंदले ॥९९॥
तों कौरव समस्त लोटले ॥ देखतां कौंतेय पांचाळ उठले ॥ कोटयवधि बाण सोडिले ॥ क्षीण केले महावीर ॥१००॥
मग तो प्रतापार्क अद्भुत ॥ आचार्य धांवला जैसा कृतान्त ॥ त्यावरी धर्म राज अकस्मात ॥ परम वेगें धांवला ॥१०१॥
द्रोणें पांच बाणीं पाहीं ॥ धर्म राज भेदिला ह्रदयीं ॥ तों युधिष्ठिरें लवलाहीं ॥ उसणें घेतलें तयाचें ॥१०२॥
शतार्ध बाण सोडून ॥ सर्वांगीं भेदिला गुरु द्रोण ॥ तों धांवला धृष्टद्युम्न ॥ अपार बाण वर्षत ॥१०३॥
प्रलयीं खवळे जैसा काळ ॥ तैसा द्रोण कोपला पुण्य शील ॥ धृष्टद्युम्न तत्काळ ॥ शत बाणीं खिळियेला ॥१०४॥
सूर्य कला संख्यबाणीं ॥ शिखंडी खिळिला तये क्षणीं ॥ दश मुख नेत्र संख्य बाणीं ॥ उत्तमौजा भेदिला ॥१०५॥
भूत संख्य टाकूनि बाण ॥ नकुल भेदी गुरु द्रोण सागर संख्य बाणें करून ॥ सहदेव खिळियेला ॥१०६॥
विद्या संख्य दिव्य शरीं ॥ धर्म राज भेदिला समरीं ॥ द्रौपदीच्या पंच पुत्रांवरी ॥ वेदसंख्या समान ॥१०७॥
शशिकला संख्य सोडूनि शर ॥ समरीं खिळिला सात्यकी वीर ॥ पुराण संख्य बाणीं वृकोदर ॥ एकएकीं विंधिला ॥१०८॥
मग जितुका वीरमात्र ॥ अवतार संख्या प्रमाण टाकूनि शर ॥ विराट पांचाळ भूभुज जर्जर ॥ केले सर्वत्र आचार्यें ॥१०९॥
द्रोण पराक्रम देखोन ॥ डोळविती ग्रीवा सुरगण ॥ पृथ्वीचे नृप संपूर्ण ॥ धन्य धन्य म्हणती द्रोणासी ॥११०॥
ऐसें देखोनि विपरीत ॥ जेवीं उदया चळीं उगवे आदित्य ॥ तैसा विजयरथारूढ अकस्मात ॥ सुभद्रानाथ धांवला ॥१११॥
ते वेळीं सायकांचा घन ॥ द्रोणावरी पाडीत अर्जुन ॥ बाण जाळें करून ॥ अंबरमणि आच्छादिला ॥११२॥
द्रोणें तैसेचि घालोनि शर ॥ आच्छादिलें तेव्हां अंबर ॥ तम दाटलें धुमधुमाकार ॥ कोणी कोणा दिसेना ॥११३॥
जलधारा सुटती अपार ॥ तैसे वीरां अंगीं रुतती शर ॥ दोन्ही दळींचे वीर ॥ भयातुर पाहती ॥११४॥
द्रोण आणि सुभद्रापती ॥ एकासी एक न दिसती ॥ तों मावळला गभस्ती ॥ शिबिरा प्रति चालिले ॥११५॥
परम घोर निशा काळी ॥ कृष्ण वर्ण वस्त्र नेसली ॥ भगणें अपार उगवलीं ॥ ठसे झळकती ठायीं ठायीं ॥११६॥
आचार्य शिबिरा प्रति जाऊन ॥ बोलता जाहला सुयोधन ॥ म्हणे तुमचें नेमवचन ॥ धर्म जीवंत धरावा ॥११७॥
श्रेष्ठीं बोलिलें जें वचन ॥ तें दावावें सत्य करून ॥ तरीच पुरुषार्थें परिपूर्ण ॥ त्रिभुवन भरेल हें साच ॥११८॥
मग बोले भरद्वाज नंदन ॥ धर्मासी रथितो अर्जुन ॥ तयाशीं युद्ध कंदन ॥ कृतान्त करूं न शकेचि ॥११९॥
जो वैकुंठींचा वेल्हाळ ॥ तो सारथी ज्याचा तमालनीळ ॥ ध्वजस्तंभीं जो कां केवळ ॥ महारुद्र रक्षीतसे ॥१२०॥
अर्जुन स्वयें अमरपती ॥ निर्वैर करावया हे क्षिती ॥ अवतरला असे निश्चितीं ॥ काय कीर्ति सांगावी ॥१२१॥
हरि हर मघवा पाहीं ॥ तिघे जाहले एके ठायीं ॥ विजयरथ न हाले कांहीं ॥ गांडीव तूणीर अक्षय्य ॥१२२॥
तरी तो विजय धर्मा पासून ॥ वेगळा न्यावा तुम्हीं फोडून ॥ आजि एक महारथी मारीन ॥ प्रतिज्ञा पूर्ण करीन मी ॥१२३॥
तों सुशर्मा सुवर्मा सुरथ ॥ सुधन्वा सुबाहु बलाद्भुत ॥ मेळवूनि अवघे त्रिगर्त ॥ बोलती तेधवां ॥१२४॥
समसप्तकांसी मेळवून ॥ उद्यां नेतों फोडूनि अर्जुन ॥ रणीं घेऊं त्याचा प्राण ॥ सुयो धना जाण हें ॥१२५॥
हें जरी न करवे तत्त्वतां ॥ तरी पंक्तिभेद गुरुहत्या ॥ तीं पापें आमुच्या माथां ॥ जरी पार्थ न जिंकं ॥१२६॥
रणीं जिंकूं अर्जुन ॥ अथवा देऊं आपुला प्राण ॥ देहान्तप्रायश्चित्त घेऊन ॥ होम दान करूं पैं ॥१२७॥
परम संतोषोनि दुर्यो धन ॥ ह्रदयीं आलिंगी पांच जण ॥ म्हणे वस्त्रें भूषणें देऊन ॥ विजय वधून सत्वर या ॥१२८॥
उदया चलावरी रविचक्र आलें ॥ सिद्ध जाहलीं दोन्ही दळें ॥ रणतुरें खांखाती सबळें ॥ हाकांनीं भरलें अंबर ॥१२९॥
मग दुर्यो धनें काय केलें ॥ समसप्तक वेगळे निवडिले ॥ तीस लक्ष दिधले ॥ सुशर्मा श्रेष्ठ त्यांमाजी ॥१३०॥
जो बोलावील युद्धासी ॥ तिकडेचि जाणें पार्थासी ॥ धनंजया युद्ध करीं आम्हांशीं ॥ ऐसें समसप्तक बोलिले ॥१३१॥
वृषभ माजले जेवीं बहुत ॥ सिंहाशीं युद्ध करूं पाहात ॥ कीं दंद शूक उन्प्रत्त ॥ पाचारिती विनायका ॥१३२॥
चंद्रार्धव्य़ूह रचून ॥ म्हणती कां न ये अर्जुन ॥ अवघे कोलाहल करिती मिळोन ॥ शस्त्रें उचलोन उदित पैं ॥१३३॥
श्रीरंगासी म्हणे पार्थ ॥ हे कोल्हाळ करिती त्रिगर्त ॥ आजि यांचा करीन अंत ॥ जाहले मत्त बहुत हे ॥१३४॥
मग भीमासी म्हणे अर्जुन ॥ नकुळ सहदेव आदिकरून ॥ पांचाळ विराट मिळोन ॥ धर्मरा यासी रक्षावें ॥१३५॥
न लागतां एकही क्षण ॥ समसप्तकांसी येतों ॥ मारून ॥ श्रीकृष्णासी म्हणे अर्जुन ॥ चालवीं स्यंदन त्वरेनें ॥१३६॥
धन्य धन्य तो पार्थवीर ॥ सच्चिदानंद सर्वेश्वर ॥ वैकुंठपति इंदिरावर ॥ सारथी जाहला जयाचा ॥१३७॥
सांवळें अनुपम वदन ॥ आकर्ण विशाल राजीव नयन ॥ मुकुट कुंडलें अधर पूर्ण ॥ पोंवळवेली सारिखे ॥१३८॥
विशाळ भाळीं दिव्य केशर ॥ कौस्तुभ वैजयंती मनोहर ॥ कांसे कसिला पीतांबर ॥ चरणीं तोडर ब्रीदावळी ॥१३९॥
चतुर्भुज श्याम सुंदर ॥ रथीं सारथी रमावर ॥ ध्वजस्तंभीं महारुद्र ॥ केला भुभुःकार सत्राणें ॥१४०॥
हनुमंता भोंवतीं भूतें अपार ॥ तींही हांक फोडिती अनिवार ॥ विष्णु वाहन पक्षांचा फडत्कार ॥ तैसा ध्वज तळपतसे ॥१४१॥
घडघडिला विजय रथ ॥ पवन वेगें वारू जात ॥ पांच जन्य देवदत्त ॥ रमानाथ पार्थ वाजविती ॥१४२॥
आला आला रे अर्जुन ॥ भुभुःकारे वायु नंदन ॥ सकळ दळ कंपाय मान ॥ धुळीनें नभ पूर्ण भरलें ॥१४३॥
पार्थ कृष्णा कडे पाहे विलोकून ॥ धुळीनें भरलें मुकुट वदन ॥ श्रीरसागरींचें निधान ॥ हो हो म्हणोनि वारू थोपी ॥१४४॥
गांडीव धनुष्य चढविलें ॥ अर्जुनें निर्वाण मांडिलें ॥ अमर्याद रण पाडिलें ॥ वीर पळती दशदिशां ॥१४५॥
पळत्यांसी सुशर्मा म्हणत ॥ धीर धरा परता समस्त ॥ दुर्यो धनाशीं शपथ ॥ केली व्यर्थ आजि कां ॥१४६॥
मग समस्तीं तये क्षणीं ॥ विजय रथ झांकिला बाणीं ॥ जैसे बहुत मूर्ख निळोनी ॥ पांडिताशीं वाद करिती ॥१४७॥
चपले ऐसा त्वरें करून ॥ रथ फिरवीत भगवान ॥ समसप्तकांचे भार मोडून ॥ जाय स्यंदन पलीकडे ॥१४८॥
अलातचक्रा ऐसा रथ ॥ फिरतां कोणा न दिसे व्यक्त ॥ शर सोडिती अमित ॥ परी ते न लागती पार्थातें ॥१४९॥
लक्ष्य चुकोनि सत्वर ॥ आपुल्या वीरांसी लागती शर ॥ पार्थरूप येरायेर ॥ परस्परें दिसताती ॥१५०॥
एकासी एक मारिती घाय ॥ ऐसाचि जाहला सेनाक्षय ॥ कंबधें उडती झाडूनि पाय ॥ टाळ्या वाजवीत नाचती ॥१५१॥
इकडे धृष्टद्युम्न आणि द्रोण ॥ युद्ध करिती निर्वाण ॥ परस्परें सोडूनि बाण ॥ घेऊं प्राण इच्छिती ॥१५२॥
आचार्य पराक्रम अद्भुत ॥ पांडवसैन्य भंगलें समस्त ॥ तों महावीर सत्यजित ॥ द्रोणावरी धांवला ॥१५३॥
तेणें सोडूनि साठ शर ॥ द्रोणाचार्य केला जर्जर ॥ उडविलें सारथ्याचें शिर ॥ ध्वज छेदूनि पाडिला ॥१५४॥
परम संतप्त होऊनि द्रोण ॥ विचारूनि टाकीतसे बाण ॥ त्याचें करावया निवारण ॥ कृतान्त शक्त नव्हेचि ॥१५५॥
कल्पान्तचपले समान ॥ अकस्मात आला बाण ॥ सत्यजिताचें शिर छेदून ॥ आकाशपंथें उडविलें ॥१५६॥
विराट बंधु जो शतानीक ॥ तो शर सोडी द्रोणा सन्मुख ॥ जैसा पर्वत गिळावया मशक ॥ मुख पसरूनि धांवला ॥१५७॥
सोडूनि एक अर्धचंद्र शर ॥ शतानी काचें उडविलें शिर ॥ वसुनामा द्रुपद कुमार ॥ तोही धाडिला यमालया ॥१५८॥
भयभीत झाला युधिष्ठिर ॥ सेना वितळली समग्र ॥ आचार्यस्तवन अपार ॥ सुयो धन करी तेव्हां ॥१५९॥
सकळ पापांवरी एक हरिनाम ॥ जैसें जाळूनि क्षणें करी भस्म ॥ तैसा मारीत उठला भीम ॥ तो पराक्रम न वर्णवे ॥१६०॥
धर्म सहदेव नकुळ ॥ उठिले विराट पांचाळ ॥ द्रौपदीचे पांच बाळ ॥ शर सोडीत धांवती ॥१६१॥
घालूनियां बाण जाळ ॥ आच्छादिलें कौरव दळ ॥ गांधार धांवले सकळ ॥ एकदांचि पराक्रमें ॥१६२॥
दुर्मर्षण सुबाहु जय द्रथ ॥ विंदानुविंद बलाद्भुत ॥ शल्य बाल्हीक गुरु सुत ॥ सुयो धन दुःशाशसन पैं ॥१६३॥
दोःशासनी लक्ष्मण विकर्ण ॥ दुर्मुख पुरुजित आणि कर्ण ॥ वार्ध्यक्षमी सोमदत्त मणिमंत जाण ॥ अलंबुष राक्षस तो ॥१६४॥
इतुके उठिले महावीर ॥ करिती पांडवचमू संहार ॥ पूर्वीं युद्धें जाहलीं अपार ॥ परी हा प्रकार नाहीं कोठें ॥१६५॥
पूर्वीं वृत्रारि शत्रु जनक ॥ आणि श्रावणारितनय देख ॥ यांचें युद्ध वर्णिलें बहुतेक ॥ परी हें अद्भुत त्याहूनि ॥१६६॥
अजा भारीं प्रवेशे वृक ॥ तैसा गज सेनेंत वृकोदर देख ॥ संहारीत असंख्य ॥ मदोन्मत्त इभ तेव्हां ॥१६७॥
निबिड जलद जाल गहन ॥ क्षणांत निवारी चंड पवन ॥ तैसे कुंजर भीम सेन ॥ संहारून अक्षयी उभा ॥१६८॥
हें देखोनि सुयोधन ॥ धांवला वर्षत मार्गण ॥ भीमें तुणीर सायका सन ॥ रथ ध्वज छेदिला ॥१६९॥
ऐसें देखोनियां सवेग ॥ म्लेंच्छमेळा घेऊनि धांवे अंग ॥ धर्मानु जावरी सवेरी ॥ बाण घन वर्षतसे ॥१७०॥
दिव्य शर सोडोनि वृकोदर ॥ उडवी अंगरायाचें शिर ॥ केला यवनांचा संहार ॥ गगनीं सुरवर पाहती ॥१७१॥
तों प्राग्ज्योतिषपुरींचा नृपनाथ ॥ नरक सुत जो भगदत्त ॥ महागजारूढ बलोन्मत्त ॥ बाण वर्षत धांवला ॥१७२॥
सोडूनि शशिवदन बाण ॥ भीमाचा स्यंदन केला चूर्ण ॥ मग तो वृकोदर गदा घेऊन ॥ नरक सुतावरी धांवला ॥१७३॥
कुलालचक्रापरी देख ॥ महाद्विप फेरी तो भगद्त्त ॥ भीम गजासी आकळीत ॥ परी तो सहसा नाटोपे ॥१७४॥
गदाघायें झोडी वृकोदर ॥ परी कधीं नाटोपे अनिवार ॥ जिकडे तळपे कुंती कुमार ॥ पाठीलाग न सोडी ॥१७५॥
द्रौपदीचे पंचनंदन ॥ शिखंडी द्रुपद धृष्टद्युम्न ॥ भगदत्तावरी बाण ॥ जाळ वर्षती तेधवां ॥१७६॥
परी तो भगदत्त महावीर ॥ तितुक्यांचेही तोडूनि शर ॥ आपुल्या सायकीं जर्जर ॥ सकळ वीर केले त्याणें ॥१७७॥
सात्यकीनें शत बाण ॥ भगदत्तावरी सोडिले निर्वाण ॥ परी तितुकेही छेदून ॥ गज लोटिला सात्यकीवरी ॥१७८॥
गजें धरूनि स्य़ंदन ॥ अश्वासहित केला चूर्ण ॥ सत्यकी चपल उसळोन ॥ एकीकडे निघाला ॥१७९॥
ऐरावतारूढ संक्रंदन ॥ तैसा दिसे नरक नंदन ॥ वीरांसहित गज अश्व धरून ॥ आपटूनियां टाकीतसे ॥१८०॥
कित्येक गजें मारिले रथी ॥ बहुतांचे मारिले सारथी ॥ भगदत्तें लाविली ख्याती ॥ कोणी येती न समोर ॥१८१॥
रुचिपर्वा प्रतापी विराट पुत्र ॥ त्यावरी भगदत्तें टाकूनि शर ॥ ऊर्ध्वपंथें उडविलें शिर ॥ महावीर पाहती ॥१८२॥
गोरक्षक पिटी गोभार ॥ तैसे महावीरांचे संभार ॥ पळविता जाहला कुंजर ॥ अनिवार सर्वांसी ॥१८३॥
हें धर्मराजें देखोन ॥ सोडी त्यावरी शत बाण ॥ नव्वद बाणीं धृष्टद्युम्न ॥ भेदिता जाहला तयातें ॥१८४॥
अर्धशत दिव्य शर ॥ सोडिता जाहला वृकोदर ॥ द्रौपदीचे पंच पुत्र ॥ शत शत शर टाकिती ॥१८५॥
तितुक्यांचेंही बाण जाळ ॥ भगद्त्तें तोडिलें तत्काळ ॥ गजें संहारिलें बहुत दळ ॥ जाहला कोल्हाळ तेधवां ॥१८६॥
परम आनंदला दुर्योधन ॥ वाद्यें वाजविती विजय वर्धन ॥ वारंवार करिती गर्जन ॥ तें अर्जुन ऐकतसे ॥१८७॥
घालू नियां ब्रह्मास्त्र ॥ समसप्तकांचा केला संहार ॥ सुशर्मा सांडूनि समर ॥ पळता जाहला तेधवां ॥१८८॥
कृष्णासी श्रीकृष्ण म्हणे ते क्षणीं ॥ धन्य तूं वीरचक्रचूडामणी ॥ आतां चला भगदत्तें वाहिनी ॥ आटिली तिकडे आमुची ॥१८९॥
करावया धर्मरक्षण ॥ वेगें धांवले कृष्णार्जुन ॥ अहो ते घोडे सुपर्णा समान ॥ जगन्मोहन धांवडी ॥१९०॥
कडकडूनि होय चपलापात ॥ तैसे रथा सहित कृष्ण पार्थ ॥ भगदत्तापुढें आले अकस्मात ॥ दोन्ही दळें देखती ॥१९१॥
कौरव दळ भयभीत ॥ म्हणती करील सैन्याचा निःपात ॥ तों बाण वर्षों लागला पार्थ ॥ नव्हें गणित तयांचें ॥१९२॥
वणवा जाळी तृणविपिन ॥ तैसे पाडीत अपार सैन्य ॥ तें भगदत्तें देखोन ॥ किरीटीवरी लोटला ॥१९३॥
कृष्णार्जुनांवरी बाण ॥ भगदत्त टाकी लक्षून ॥ परी रथ फेरी जगन्मोहन ॥ एक मार्गण लागों नेदी ॥१९४॥
अलातचक्राहून ॥ चपल फेरीतसे स्यंदन ॥ दश बाणीं नरकनंदन ॥ भेदीत तेव्हां मुरहरा ॥१९५॥
सच्चिदानंदतनु सगुण ॥ भेदूनि गेले दश बाण ॥ परी रथावरूनि मधुसूदन ॥ अणुमात्र न चळेचि ॥१९६॥
बाण सोडी श्वेतवाहन ॥ तोडिलें हातींचें शरासन ॥ नरकसुतें भिरकावून ॥ चौदा तोमर दीधले ॥१९७॥
तितुकेही छेदूनि पार्थें ॥ निष्फळ दवडिले गगनपंथें ॥ यावरी सुभद्राकांतें ॥ द्वादश बाण सोडिले ॥१९८॥
भगदत्ताचे ह्रदयीं ॥ बाण भेदले ते समयीं ॥ यावरी शक्ति टाकिली लवलाहीं ॥ कृष्णावरी दैत्यसुतें ॥१९९॥
ती वरिचेवरी अर्जुनें ॥ त्रिखंड केली त्याचि क्षणें ॥ सवेंचि पार्थें वज्रबाणें ॥ इभ भेदिला कुंभस्थळीं ॥२००॥
भयभीत जाहला वारण ॥ नाटोपेचि घेतलें रान ॥ जैशी दुर्बळाची स्त्री वैरीण ॥ नाटोपेचि तयासी ॥२०१॥
सवेंचि पार्थें बाण सोडिले ॥ गजाचे अंगींचे कवच ॥ छेदिलें ॥ चार्ही चरण ॥ तोडिले ॥ क्षण एक न लागतां ॥२०२॥
वृक्ष पडे उन्मळोन ॥ तैसा गज जाहला गत प्राण ॥ भगदत्त परिघ घेऊन ॥ कृष्णावरी लोटला ॥२०३॥
मग सव्यसाची काढी बाण ॥ धाराग्रीं दैवत सहस्त्र नयन ॥ सहस्त्र करतुल्य वदन ॥ शरासनीं योजिला तो ॥२०४॥
भगदत्ताचा कंठ लक्षून ॥ बाण गेला न लागतां क्षण ॥ ऊर्ध्वपंथें उडवून ॥ शिर नेलें क्षणमात्रें ॥२०५॥
मुकुटकुंडलमंडित ॥ शिर पडलें कौरव दळांत ॥ जय वाद्यें वाजवीत ॥ पांडवदळीं तेधवां ॥२०६॥
कौरव दळीं हाहाकार ॥ म्हणती पडला महावीर ॥ शकुनीचे बंधु सोडीत शर ॥ किरीटीवर धांवले ॥२०७॥
नामें वृषकेतु आणि अचळ ॥ पार्थें सोडिले शर तेजाळ ॥ दोघांचीं शिरें तत्काळ ॥ छेदूनि नेलीं ऊर्ध्वपंथें ॥२०८॥
हाहाकार जाहला ते क्षणीं ॥ क्रोधें युद्धा आला शकुनी ॥ कापटयकोश पापखाणी ॥ सर्वा अनर्थांसी मूळ जो ॥२०९॥
कापटय विद्या करोनि तेथें ॥ पार्थावरी सोडिलीं भूतें प्रेतें ॥ वेष्टूनियां पार्थाचे रथाचे ॥ हांका देत भीडती ॥२१०॥
विक्राळ वदन नानावर्ण ॥ देखतां अशुचि कंपाय मान ॥ त्यांवरी पार्थें ब्रह्मास्त्र सोडून ॥ एकदांचि संहारिलीं ॥२११॥
जैसें घेतां एक नाम ॥ महापापें होती भस्म ॥ कीं काम क्रोध मोह भ्रम ॥ आत्म विज्ञानें वितळती ॥२१२॥
आणिक अस्त्रांचे संभार ॥ शकुनी सोडी कापटय सागर ॥ परी तो श्रीरंगभगिनीवर ॥ क्षणमात्रें निवारी ॥२१३॥
पार्थ म्हणे रे शकुनी ॥ दुरात्मा तूं पाप खाणी ॥ मजशीं संघट्टोनि रणीं ॥ जय कैसा पावसी ॥२१४॥
आपुलें तेज खद्योत ॥ वासरमणीप्रति दावीत ॥ कीं मृगेंद्रा पुढें दावी उन्मत्त ॥ मार्जार आपुलीं उड्डाणें ॥२१५॥
पंडितापुढें मूढ ॥ वृथा करीत बडबड ॥ कीं ब्रीदें बांधोनि प्रचंड ॥ रासभ गात तुंबरू पुढें ॥२१६॥
राजहंसा समोर जाण ॥ काक दाखवी जेवीं उड्डाण ॥ कीं मूषक टाकारून ॥ भोगींद्रावरी चालिला ॥२१७॥
ऐसें बोलूनि तत्काळ ॥ शकुनीवरी घातलें शरजाळ ॥ पांच शत वीर प्रबळ ॥ शकुनीचे तेव्हां मारिले ॥२१८॥
अश्व सारथी स्यंदन ॥ शकुनीचा केला चूर्ण ॥ धनुष्य कवच तूणीर तोडून ॥ क्षणमात्रें टाकिलें ॥२१९॥
विपरीत समय देखोन ॥ शकुनी पळाला सोडूनि रण ॥ जैसा भ्रष्टला टाकूनि स्वजन ॥ परदेशा प्रति जाय ॥२२०॥
कौरव सेना जाहली जर्जर ॥ वाहनें टाकूनि पळती वीर ॥ त्यांसी धीर देत द्रोण पुत्र ॥ बाण वर्षत धांवला ॥२२१॥
तयावरी भीम सेन ॥ सोडी बाणांपाठीं बाण ॥ अस्ताचलासी सहस्त्रकिरण ॥ जाता जाहला तेधवां ॥२२२॥
पांडवप्रताप ग्रंथ थोर ॥ द्रोणपर्व सुरस अपार ॥ पुढें श्रीरंगभगिनी कुमार ॥ भंगेल रणीं परिसा तें ॥२२३॥
श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ॥ पांडुरंगा पुंडलीकवरदा ॥ पांडवरक्षका गोविंदा ॥ पार्थसारथी जाहलासि तूं ॥२२४॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ द्रोणपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ चव्वेचाळिसाव्यांत कथियेला ॥२२५॥
इति श्रीपांडवप्रतापे चतुश्चत्वारिंशाध्यायः ॥४४॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2012
TOP