मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय १७ वा

पांडवप्रताप - अध्याय १७ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री कृष्ण कृपेनें पांडव समर्थ ॥ अक्षय्य भांडारें अक्षय्य रथ ॥ गांडीव चाप अक्षय्य सत्य ॥ आक्षय्य तूणीर सर्वदा ॥१॥
त्यावरी मयासुरें उचित ॥ सभा दिधली अत्यद्भुत ॥ जरासंध मारिला बलोन्मत्त ॥ तो पुरुषार्थ ठसावला ॥२॥
बावीस सहस्त्र राजे सोडविले ॥ आपुलेसे करूनि स्थापिले ॥ धर्में यावरी काय केलें ॥ आज्ञापिले चौघे बंधु ॥३॥
उत्तर दिशेसी जाय अर्जुन ॥ सवें दलभार घेऊन ॥ प्रताप कल्लोक संपूर्ण ॥ उचंबळत ब्रह्मांड भरी ॥४॥
कोणी राजे युद्ध करिती ॥ सवेंचि मागुती शरण येती ॥ एक पहिलेचि मित्र भूपती ॥ जरासंधाचे बंदींचे ॥५॥
देशोदेशींचा झाडा पूर्ण ॥ घेत चालिला श्वेतवाहन ॥ समूहनामें राजा जिंकोन ॥ अपार धन घेतलें ॥६॥
त्याचा समागमें घेतला भार ॥ पुढें देखिलें प्राग्जोतिष नगर ॥ नरक पुत्र भग दत्त वीर ॥ तीन दिवसांत जिंकिला ॥७॥
कुंतलींचा राजा बृहत ॥ त्यासही जिंकी वीर पार्थ ॥ तो पद्मराग रत्नें ओपीत ॥ शतकोटि पांडवांतें ॥८॥
सेनविदनामें महारथ ॥ सुनाभ सुवर्चस बहुत ॥ पर्वतवासी हे समस्त ॥ मार्गघ्न तस्कर जिंकिले ॥९॥
हिमाचल ओलांडोनि समस्त ॥ पुढें जिंकीत चालिला पार्थ ॥ धन रत्नें सुवर्ण पर्वत ॥ असंख्य येत करभार ॥१०॥
पुरुषखंड हाटक देश ॥ गोरक्ष पर्वत सुवर्ण विशेष ॥ मानससरोवरीं अतिप्रकाश ॥ रत्न खाणी देखिल्या ॥११॥
येथींचा पाट वाहे शुद्ध ॥ तेचि जाणिजे सरयू प्रसिद्ध ॥ संख्या एक अर्बुद ॥ हस्ती भरिले सुरत्नें ॥१२॥
गंधर्वदेश जिंकून ॥ नाना दुर्गस्थानें कठिण ॥ जेथें नाहीं मनुष्यांचें गमन ॥ तेथें अर्जुन पावला ॥१३॥
ज्या ज्या देशीं धन घेतलें ॥ त्यांचे हातीं शक्रप्रस्था पाठविलें ॥ आश्व रथ गज भरिले ॥ पावते केले धर्मातें ॥१४॥
एवं उत्तर दिशा जिंकून ॥ अपार वस्तु सामग्री घेऊन ॥ धर्मराजा पुढें आपूण ॥ पार्थ वीर समर्पी ॥१५॥
भांडारें भरलीं संपूर्ण ॥ नगरांत न मावे धन ॥ मग शक्र प्रस्था बाहेरी नेऊन ॥ धनराशी ठेविल्या ॥१६॥
पूर्व दिशेसी भीम सेन ॥ देश जिंकीत चालिला संपुर्ण ॥ पांचालपुरा येऊन ॥ नगरा बाहेर राहिला ॥१७॥
द्रुपद प्रेमें धांवला ॥ वृकोदरासी भेटला ॥ अपार करभार दिधला ॥ सवें चालिला साह्यातें ॥१८॥
गंडकी ओलांडूनि जात ॥ विदेह भेटला मिथिलानाथ ॥ पुढें सुशर्मा जिंकीत ॥ अपार भेटत नृपती पैं ॥१९॥
धन देऊनि पुष्कळ ॥ आदरें भेटला शिशुपाल ॥ तेरा दिवस सहदल ॥ भीमसेन राहिला ॥२०॥
बृहद्वल कोसलपति सबल ॥ जिंकीत जात म्लेच्छ मंडल ॥ ते धन देऊनि पुष्कळ ॥ पाय वंदिती भीमाचे ॥२१॥
पर्वत वासी येती तस्कर ॥ वस्त्रें ललामें देती अपार ॥ नाना शस्त्रजातींचे संभार ॥ अलंकार विचित्र पैं ॥२२॥
मलयागर कृष्णागर चंदन ॥ केशर कस्तूरी जवादी पूर्ण ॥ पोतास पाच कचोरे सुगंध जाण ॥ अपार देती भीमातें ॥२३॥
पूर्व दिशा सर्व जिंकून ॥ अपार संपत्ति पर्वत घेऊन ॥ धर्मासी भेटला भीमसेन ॥ आनंदें गगन पूर्ण जाहलें ॥२४॥
दक्षिणा घ्यावया निश्चित ॥ सहदेव पाठविला माद्रीसुत ॥ पृतना घेऊनि असंख्यात ॥ जाता जाहला बलाब्धि ॥२५॥
शूरसेनासी जिंकून ॥ दंतवक्रासी आलिंगून ॥ कुंतिभोजें भेटोन ॥ अपार धन दीधलें ॥२६॥
मत्स्य सुकुमार सुमित्र ॥ युद्धीं जिंकोनि पटच्चर ॥ रत्नधनराशी अपार ॥ अर्तिते जाहले सहदेवा ॥२७॥
भोजकटकनगरीं जाण ॥ रुक्मिया झुंजला द्वयदिन ॥ मग दासत्व अंगीकारून ॥ पूजासंभार समर्पी ॥२८॥
बहुत जिंकीत सहदेव ॥ धाकें भेटती सर्वही राव ॥ किष्किंधा वेढी बलार्णव ॥ युद्ध असंभाव्य जाहलें ॥२९॥
मैद द्विविद वानर ॥ केशधरणीं युद्ध अपार ॥ जालिया मग वालीनें भांडार ॥ फोडोनि द्र्व्य दीधलें ॥३०॥
शुक्रबृहस्पती ऐशीं तेजाळ ॥ रत्न मुक्तें दिधलीं पुष्कळ ॥ पुढें माहिष्मती पुरी सबळ ॥ नीळ राज्य करी तेथें ॥३१॥
जो दुसरा शक्र म्हणवीत ॥ वन्हि जयाचा जामात ॥ तया नगर प्रदेशीं दला समवेत ॥ येत जाहला सहदेव ॥३२॥
तों अग्नि क्षोभला अकस्मात ॥ सहदेवाचें दल जाळीत ॥ अश्व गज वीर रथ ॥ हव्यवाट जाळीतसे ॥३३॥
संकटीं पडला पंडुकुमार म्हणे दूर राहिला श्रीकरधर ॥ सव्यसाची विद्यासमुद्र ॥ वृकोदर दुरावला ॥३४॥
नसे दलभार किंचित ॥ कृशान आम्हांसीं झुंजत ॥ वैश्वानर होय शांत ॥ ऐसा प्रकार समजेना ॥३५॥
माहिष्मती नगरीं तत्त्वतां ॥ चहूंवर्णांच्या योषिता ॥ जारकर्मीं परम रता ॥ विधिनिषेध नसेचि ॥३६॥
राजा नील याग करीत ॥ फुंकितां कष्टले बहुत ॥ परी न पेटेचि पुरुहूत ॥ मग येत राज कन्या ॥३७॥
ते लावण्यसरिता गुणराशी ॥ रूपासी न तुळे रंभा उर्वशी ॥ अंगीं परिमल अहर्निशीं ॥ सुंगधासी सीमा नसेचि ॥३८॥
तिणें फुंकितां तथे वेळीं ॥ मन्मथें व्यापिला ज्वाला माली ॥ अनलही विरहानलीं ॥ पप्त जाहला तेधवां ॥३९॥
वदनद्वयें चुंबावें ॥ कीं सप्तहस्तीं आलिंगावें ॥ मग तो त्रिचरण स्वभावें ॥ विप्रवेषें प्रकटला ॥४०॥
मग जाहलें पाणि ग्रहण ॥ त्यावरी बोले विभावसु आपण ॥ व्यभिचार करितां निर्दोष पूर्ण ॥ स्त्रिया नगरींच्या करीन मी ॥४२॥
दक्षिण दिशे समुद्रतीर ॥ केरल मल्याळ देश थोर ॥ जारकर्मरीति अपवित्र ॥ तेथें चालत अद्यापि ॥४३॥
आणि श्वशुरा प्रति बोले अग्न ॥ परकें दल येतां जाळीन ॥ मग घरजांवयी कृशान ॥ नीलें करून ठेविला ॥४४॥
यालागीं अग्नि जाळीत ॥ मग सहदेव होऊनि शुचिर्भूत ॥ अग्नीचें स्तवन करीत ॥ हात जोडूनि तेधवां ॥४५॥
चित्र भानू अनल बृहद्भानु ॥ कृशानु ज्वलन हुताशनु ॥ विभावसु वीतिहोत्र हव्यवाहनु ॥ वैश्वानर कृष्णवर्त्मा ॥४६॥
भूरितेजा लोहिताश्व पावक ॥ मेषवाहन मरुन्मित्र देख ॥ चत्वरिश्रृंग त्रिपद अधो मुख ॥ द्विमूर्धा सप्तपाणी ॥४७॥
महाराज तूं जातवेद ॥ ज्वाला माली वेद प्रतिपाद्य ॥ सकल देवांत मुख्य तूं वंद्य ॥ सागर जीवन शोषक तूं ॥४८॥
मदन दहन तृतीय नयनीं ॥ वास करिता तूं सदा अग्नी ॥ विश्वाचे जठरीं अवतरोनी ॥ पालन करिसी पवित्रा ॥४९॥
तूं व्हावया पूर्ण ॥ आरंभिला राजसूय यज्ञ ॥ तुज दिधलें आमंत्रण ॥ सामुग्री जाण मेळवितों ॥५०॥
ऐसें स्ववन ॥ प्रत्यक्ष प्रकटला हुताशन ॥ शीतळ केलें सकळ सैन्य ॥ क्षेमालिंगन देऊनियां ॥५१॥
सहदेवासी म्हणे वैश्वानर ॥ पार्थें मजवरी केला उपकार ॥ खांडववन देऊनि समग्र ॥ रोग माझा दवडिला ॥५२॥
श्री कृष्ण भक्तांसी विघ्न ॥ मी न करीं गेलिया प्राण ॥ प्रर्‍हाद म्यां रक्षिला पूर्ण ॥ लंकादहनीं हनुमंत ॥५३॥
जे न करिती हरिस्मरण ॥ न ऐकती पांडवांचे कीर्तन ॥ नाचरती स्वधर्माचरण ॥ जाळीन सदनें तयांचीं ॥५३॥
जे निंदक अभक्त दुर्जन ॥ न करिती माझें स्तवन पूजन ॥ जे न करिती सूर्याराधन ॥ त्यांसी जाळीन क्षणमात्रें ॥५५॥
काय असूनि उत्तम सदन ॥ जेथें नाहीं ब्राह्मण भोजन ॥ जेथें नव्हेचि हरिकीर्तन ॥ तें मी जाळीन अकस्मात ॥५६॥
अतिथि जाय निराश ॥ मातापितयांचा करी द्वेष ॥ गुरुदर्शनीं जया आळस ॥ जाळीन सर्व तयांचें ॥५७॥
वडील बंधु माझा धर्म ॥ त्यासी न मानिती जे अधम ॥ मी क्षोभोनि करीन भस्म ॥ नृप तस्कर नागविती ॥५८॥
यालागीं सहदेवा अवधारीं ॥ मी तुमचा साह्यकारी ॥ असो नीलराज ते अवसरीं ॥ भेतविला सहदेवा ॥५९॥
संपूर्ण होय राजसूय यज्ञ ॥ ऐसें नीलें दिधलें धन ॥ म्हणे राज सूययज्ञीं येईन ॥ श्री कृष्ण चरण पहा वया ॥६०॥
पुढें सहदेव चालिला बळें ॥ सागर द्वीपीं म्लेच्छ मंडळें ॥ पुरुषार्थें जिंकोनि सकलें ॥ करभार घेतला ॥६१॥
फिरंगी हबसान ताम्र ॥ मंडलें जिंकिलीं समग्र ॥ निषाद राक्षस अपार ॥ जिंकिले बळें तेधवां ॥६२॥
कर्णव सनहीन एकचरण ॥ काल मुखे गुदहीन ॥ जलचर पति तिमिंगिल जिंकून ॥ द्र्व्यरत्नें घेतलीं ॥६३॥
चोल मंडल द्रविड देश ॥ कर्नाटक त्रिगुल निःशेष ॥ पत्र धाडिलें लंकेस ॥ बिभी षणास सहदेवें ॥६४॥
बिभीषण म्हणे दिवस धन्य ॥ भेटला सहदेवासी येऊन ॥ रावण भांडारींचीं रत्नें आणून ॥ असंख्यात समर्पिलीं ॥६५॥
नाना वस्तूंचे संभार ॥ जे त्रिभुवनीं दुर्लभ साचार ॥ राक्ष समाथां देऊनि अपार ॥ शक्रप्रस्था पाठ विले ॥६६॥
सहदेव म्हणे बिभीषणा ॥ आपण यावें राज सूययज्ञा ॥ असो तयाची घेऊनि आज्ञा ॥ शक्र प्रस्था परतला ॥६७॥
वंदोनियां धर्मनृपती ॥ अर्पिल्या सकळ संपत्ती ॥ यावरी नकुल दला प्रती ॥ घेऊनि चालिला पश्चिमे ॥६८॥
नकुलाचा बल प्रताप ॥ जिंकिले पश्चिमेचे भूप ॥ असो द्वारकेसमीप ॥ नकुल बाहेर उतरला ॥६९॥
दूताहातीं सत्वर ॥ धर्म राज मुद्रांकित पत्र ॥ द्वारकेसी धाडी माद्रीपुत्र ॥ करभार देइंजे म्हणोनि ॥७०॥
पत्र देखोनि राजीवनेत्र ॥ मस्तकीं वंदी जल जगात्र ॥ सच्चिदानंद सर्वेश्वर ॥ हर्षनिर्भर जाहला ॥७१॥
इंदिरावर कृपाघन ॥ काय बोलत हांसोन ॥ मी धर्माचा अंकित पूर्ण ॥ सर्व देईन मज सहित ॥७२॥
अपार करभार द्या रे नेऊन ॥ मीही जाईन आणिक घेऊन ॥ धनर त्नांचे पर्वत पूर्ण ॥ पाठविले नकुलाप्रती ॥७३॥
तो लावण्या मृतसागर ॥ भक्तवल्लभ करुणाकर ॥ नकुलासी येऊनि सत्वर ॥ नगरा बाहेर भेटला ॥७४॥
येतां देखोनि तमालनील ॥ सप्रेम होऊनि धांवे नकुल ॥ द्दढ धरिले चरण कमल ॥ नेत्री जल वाहातसे ॥७५॥
श्री कृष्ण चरण क्षालन ॥ केलें नेत्रोदकेंकरून ॥ श्रीरंगें तया उचलोन ॥ ह्रदयीं धरिलें आवडीं ॥७६॥
प्रेमें स्फुंदत नकुल ॥ मी अन्यायी दास केवळ ॥ तूं माउली परम स्त्रेहाळ ॥ अपराध पोटीं घालिसी ॥७७॥
मी अन्यायी यादवेंद्रा ॥ पत्राचे मस्तकीं करूनि मुद्रा ॥ भक्तमान सचकोर चंद्रा ॥ तुजलागीं पाठविलें ॥७८॥
महा पुण्याचे पर्वत ॥ तुजलागीं धर्म संस्थापनीं घेतले ॥ अवतार म्यां युगानुयुगीं ॥८०॥
असो आज्ञा घेऊनि त्वरित ॥ पुरंदर प्रस्था जात माद्री सुत ॥ दया सागर भगवंत ॥ गुण वर्णी तयाचे ॥८१॥
खर्व अर्बुद पद्म शंख ॥ निधींच्या निधि न करवे लेख ॥ द्र्व्य रत्नें आणूनि देख ॥ धर्म राज संतोष विला ॥८२॥
जे ते देशींचीं मनुष्यें पाहीं ॥ वेठीसी धरू नियां सर्वही ॥ संपत्तिभार मस्तकीं लवलाहीं ॥ घेऊनि येती शक्र प्रस्था ॥८३॥
संपूर्ण जाहला दिग्वि जय ॥ उदय पावला प्रताप सूर्य ॥ शत्रुखद्योत समुदाय ॥ तेजहीन दीसती ॥८४॥
ऐसे दिवस कांहीं लोटले ॥ मग धर्म राज बंधू प्रती बोले ॥ हें कर भार द्रव्या आणिलें ॥ त्याचें करावें सार्थक ॥८५॥
पडले द्र्व्याचे पर्वत ॥ सहस्त्र गज भरी वेंचिलें नित्य ॥ तरी सहस्त्र वर्षें पर्यंत ॥ द्र्व्य न सरे सर्वथा ॥८६॥
सर्व सामुग्री सिद्ध जाहली ॥ याग आरं भावा ये काळीं ॥ आप्त सुह्रद सोयरे सकळी ॥ पाचारावे यज्ञातें ॥८७॥
पाचारावे ब्राह्मण समस्त ॥ जे शापानु ग्रह समर्थ ॥ वेदो नारायण साक्षात ॥ ज्यांचें ह्रदयीं नांदतसे ॥८८॥
सप्तपुर्‍या तीर्थें अगाध ॥ तेथें जे जे वसती ब्रह्म वृंद ॥ जे वेदांत ज्ञानी ब्रह्मा नंद ॥ निज सुखें डोलती ॥८९॥
शाण्णव कुलींचे भूपाळ ॥ आप्त सोयरे द्रुपदादि सकळ ॥ विराटा दिक महानृपाळ ॥ यज्ञालागीं पाचारा ॥९०॥
द्वारकेसी आधीं पाठवावें दूत ॥ जगद्वंद्य आमुचें कुलदैवत ॥ तो स्वामी श्री कृष्णनाथ ॥ रुक्मिणी सहित पाचारा ॥९१॥
द्रोणाचार्य कृपाचार्य ॥ धृतराष्ट्र भीष्मादि आर्य ॥ जे केवल ज्ञान सूर्य ॥ पाचारावें आधीं येथें ॥९२॥
दुर्योधना दिक बंधु सर्व ॥ पाचारावे सर्व कौरव ॥ विदुर महाज्ञानी कृपार्णव ॥ आधीं येथें बोलावा ॥९३॥
ऐसी आज्ञा देतां भूपती ॥ लक्षा नुलाक्ष दूत धांवती ॥ धर्माची आज्ञा सर्वांची सांगती ॥ नृप निघती वेगेंशीं ॥९४॥
तों दैव उदेलें अद्भुत ॥ दूत न पाठवितां अकस्मात ॥ निज भारेशीं वैकुंठनाथ ॥ नगरा जवळी पातला ॥९५॥
दूत धांवत आले धर्मा जवळी ॥ सांगती समीप आले वनमाळी ॥ कुंजर भेरी गर्जती निराळीं ॥ प्रति शब्द न समाये ॥९६॥
ऐकतां धर्म राज गहिंवरला ॥ दूत म्यां अजूनि नाहीं पाठविला ॥ अंतर ओळखोनि धांविन्नला ॥ स्वामी माझा मजलागीं ॥९७॥
एक प्रेम धरितां हरिपायीं ॥ मूळाविण येतो लवलाहीं ॥ माझ्या भाग्यासी अंत नाहीं ॥ आला जांवई भीमकाचा ॥९८॥
बंधूं सहित धर्मराव ॥ नगरा बाहेरी घेतसे धांव ॥ तों सेने सहित इंदिराधव ॥ पंडुपुत्रें देखिला ॥९९॥
सवें सोळा सहस्त्र कामिनी ॥ मुख्य रुक्मिणी विश्व जननी ॥ छप्पन्न कोटी यादव श्रेणी ॥ तितुक्या तेव्हां असती संगें ॥१००॥
साठ लक्ष कृष्ण कुमार ॥ कन्या स्नुषा आल्या समग्र ॥ चौदा सहस्त्र भेरी प्रचंड थोर ॥ गज पृष्ठावरी धडकती ॥१०१॥
गज तुरंग पदाति रथ ॥ अनुपम अलंकार मंडित ॥ ध्वज अपार लख लखित ॥ जेवीं पुष्करीं सौदामिनी ॥१०२॥
मित्रा ऐसीं मित्र पत्रें ॥ चंद्र मंडला तुल्य तळपती छत्रें ॥ नील आरक्त वर्ण ॥ विचित्रें ॥ संख्येरहित दिसताती ॥१०३॥
कुंचे चामरें झळकती ॥ गज महानादें किंकाटती ॥ हिरे जडिले दंतोदंतीं ॥ कर्णीं डोलती मुक्ताघोंस ॥१०४॥
रत्न जडित पाखरा सुरेख ॥ घंटा गर्जती अधो मूख ॥ मज वाटतें ते कृष्णो पासक ॥ हरिनामें किंकाटती ॥१०५॥
अतिरथी जे उद्भट वीर ॥ पाठीसी चालती कृष्ण कुमार ॥ महारणपांडित धनुर्धर ॥ प्रचंड शूर हरीचे ॥१०६॥
गज स्कंधीं बैसोनि बंदी जन ॥ हिर प्रताप वाखाणिती गर्जोन ॥ पुढें कनकवेत्र धारी धांवोन ॥ वाव करिती चाला वया ॥१०७॥
श्री कृष्णा भोंवते राजे घनदाट ॥ आदळती मुकुटांसी मुकुट ॥ ऐसा द्वारकानाथ वरिष्ठ ॥ धर्मराजें देखिला ॥१०८॥
पांचही जणांसी ते काळीं ॥ क्षेम देतसे वनमाळी ॥ धर्म हरीचे अंघ्रिकमळीं ॥ मस्तक ठेवी आदरें ॥१०९॥
हरि म्हणे तूं दीक्षित सहजीं ॥ तुझी पूजा करावी आजी ॥ असो धर्में श्रीरंग नगरा माजी ॥ मंदिरासी आणिला ॥११०॥
चौदा सहस्त्र मत्त वारण पातले करभार ॥ अठयायशीं सहस्त्र ऋषीश्वर ॥ शिष्यां सहित पातले ॥११२॥
जे जरा संधाचे बंदीं पडिले ॥ बावीस सहस्त्र राजे सोडविले ॥ तितुकेही यज्ञ पहा वया आले ॥ संगें करभार घेऊ नियां ॥११३॥
धनाच्या राशी अपार ॥ स्वर्गाहूनि पाठवी कुबेर ॥ त्रिदशां सहित सुरेश्वर ॥ विमानारुढ पाहातसे ॥११४॥
नव ग्रह सुप्रसन्न ॥ जय लाभ उभे कर जोडून ॥ श्री राम भक्त बिभीषण ॥ आनंदें पाहों पातला ॥११५॥
सप्त द्वीपें छप्पन्न देश ॥ नवखंडींचे नराधीश ॥ भीष्मद्रोणादिक कौरवेश ॥ प्रत्रां सहित धृतराष्ट ॥११६॥
जे जे आले राजेश्वर ॥ त्यांसी धर्में जाऊनि समोर ॥ बहुत करू नियां आदर ॥ इंद्रप्रस्था आणिलें ॥११७॥
कोटी शिल्पकारीं अगोदर ॥ चंदन सदनें निर्मिलीं विचित्र ॥ सकल ऋषी राजे यांसी पवित्र ॥ तींचि सदनें दीधलीं ॥११८॥
धर्म म्हणे सहदेवातें ॥ धौम्यपुरो हिताचे अनुमतें ॥ जे जे सामुग्री लागेल यज्ञातें ॥ ते सिद्ध करीं सत्वर ॥११९॥
मग भीष्म आणि जगन्मोहन ॥ एकासनीं बैसवून ॥ कृष्णपदीं मस्तक ठेवून ॥ धर्मराज विनवीतसे ॥१२०॥
जें जें मनीं इच्छिलें ॥ तें तें रमाधवें पुरविलें ॥ सकल राजे भृत्य जाहले ॥ द्र्व्य सांचलें असंभाव्य ॥१२१॥
तरी येथें कार्यें वांटिल्याविण ॥ सिद्धी न पावे कदा यज्ञ ॥ कोणा योग्य कोण कारण ॥ तूं नारायण जाणसी ॥१२२॥
आम्ही नेणतीं लेकुरें श्रीरंगा ॥ आम्हांसी एक कार्य सांगा ॥ कंसांतका भक्त भव भंगा ॥ आज्ञा करीं सत्वरी ॥१२३॥
मग बोले श्रीकरधर ॥ मी चतुर नव्हे नृपवर ॥ मी नंदाचा गोरक्षक साचार ॥ मज हा विचार समजेना ॥१२४॥
यावरी अर्जुनाचा सारथि होय ॥ हें तों जाणे भुवनत्रय ॥ धर्में धरिले द्दढ पाय ॥ तरी मी काय करूं आतां ॥१२५॥
हरि म्हणे मी इतुकें करीन ॥ द्विजांचीं चरणां बुजें क्षालीन ॥ उच्छिष्टपात्रें काढीन ॥ इतुकें कारण मज देईं ॥१२६॥
ऋषींसी लागतील जे उपचार ॥ ते विदुरें द्यावे समग्र ॥ राजपूजेसी चतुर ॥ संजय शिष्य व्यसाचा ॥१२७॥
द्रव्य लागेल जें अपार ॥ तें तें पुरवावें समग्र ॥ द्रोणाचे आज्ञें द्रोण पुत्र ॥ अश्वत्थामा करील हें ॥१२८॥
अपार आल्या राज पृतना ॥ त्यांसी भक्ष्य भोज्याची विचारणा ॥ हें कार्य सांगावें दुःशासन ॥ अवश्य म्हणे धर्मराव ॥१२९॥
ब्राह्मणांसी दक्षिणा सहज ॥ देईल कृपाचार्य महाराज ॥ जो प्रताप सूर्य तेजःपुंज ॥ वेदज्ञ आणि रणपंडित ॥१३०॥
राजे आणिती बहु धनें ॥ तें ॥ द्दष्टीं पाहोनि दुर्योधनें ॥ मग भांडारीं ठेविजे यत्नें ॥ अवश्य म्हणे पंडुपुत्र ॥१३१॥
यज्ञासी येतील महाविघ्नें ॥ तितुकीं निवारावीं अर्जुनें ॥ ब्राह्मणांची प्रार्थना भीमसेनें ॥ भोजन समयीं करावी ॥१३२॥
सुमन माला गंधाक्षता ॥ धूप दीप परिमल द्रव्य तत्त्वतां ॥ हीं अर्पावीं समस्तां ॥ नकुलासी हें सांगिजे ॥१३३॥
घृतमध्वादिक पंचामृतें ॥ हीं सहदेवें वाढिजे एकचित्तें ॥ न्यून पूर्ण होईल तेथें ॥ गंगात्मजें विलोकावें ॥१३४॥
विप्रराजांच्या बैसती पंक्ती ॥ त्यांसी वाढील द्रौपदी सती ॥ जे अन्नपूर्णा केवळ भगवती ॥ करीत तृप्ति समस्तां ॥१३५॥
प्रतिविंध्यादि जे राजकुमार ॥ अत्यंत सुंगध करूनि नीर ॥ भोजन करितां वारंवार ॥ पुरविजे शीघ्र तयांनीं ॥१३६॥
त्रयोदश गुणी विडे विचित्र ॥ एक तांभूल सहस्त्रपत्र ॥ हा धृष्टधुम्ना सांगावा विचार ॥ धर्मराज अवश्य म्हणे ॥१३७॥
धर्मराया तूं यजमान ॥ भोंवतीं घेऊनि दिव्य ब्राह्यण ॥ यथासांग करीं यज्ञ ॥ जेणें त्रिभुवन धन्य म्हणे ॥१३८॥
ऋत्विज नेमिले चौघे जण ॥ त्यांत कमलोद्भव मुख्य पूर्व ॥ दुजा सत्यवती ह्रदयरत्न ॥ वेदज्ञ केवळ सूर्य जो ॥१३९॥
तिजा ब्रह्म नंदन वसिष्ठ ॥ चौथा याज्ञ्वल्क्य अतिवरिष्ठ ॥ हे चौघे ऋत्विज स्पष्ट ॥ धर्मराया योजीं कीं ॥१४०॥
राजा आणि भणंग दीन ॥ सर्वांसी अन्न सम समान ॥ हें मुख्य प्रभूचें लक्षण ॥ यज्ञा पूर्ण होय तेणें ॥१४१॥
ऐसी आज्ञा देऊनि सकळां ॥ मग यज्ञासी आरंभ केला ॥ दीक्षा ग्रहणीं धर्म बैसला ॥ विप्रां सहित मखा जवळी ॥१४२॥
एक संवत्सर पर्यंत ॥ वसुधारा अखंड चालत ॥ जातवेद जाहला तृप्त ॥ न्यून पदार्थ एकही नसे ॥१४३॥
विभाग पावोनि समस्त ॥ जय जय कारें देव गर्जत ॥ असं भाव्य पुष्प वृष्टी होत ॥ शक्र प्रस्थावरी तेधवां ॥१४४॥
ऋषी राजे थोर लहान ॥ रत्नताटीं करिती भोजन ॥ षड्रसान्नें जेविती पूर्ण ॥ जीं दुर्लभ सुरांतें ॥१४५॥
तों विप्रांसी प्रार्थी भीम सेन ॥ बोले परम कठिण वचन ॥ म्हणे टाकाल जरी अन्न ॥ तरी मी बांधीन शेंडीसी ॥१४६॥
उदरापुरतेंचि मागोनि घ्यावें ॥ पात्रीं सांडितां बरवें नव्हे ॥ म्हणे माझे स्वभाव ठावे ॥ तुम्हांसी आहेत सर्वही ॥१४७॥
भीमाच्या धाकेंकरून ॥ ब्राह्मण जेविती किंचित अन्न ॥ विप्र गेले शुष्क होऊन ॥ तें जगज्जीवनें जाणीतलें ॥१४८॥
भीमासी म्हणे जगन्मोहन ॥ गंध मादन ऋषि परम निपुण ॥ त्यासी सत्वरी बोलावून ॥ अगत्य कारण असे त्याचें ॥१४९॥
भीमाचे ठायीं अभिमान ॥ मी एक बळें आगळा पूर्ण ॥ वृकोदर जात वेगें करून ॥ गंध मादन आणा वया ॥१५०॥
तों वाटेसी एका पर्वतांत ॥ वृद्धवेष धरूनि बहुत ॥ बैसला होता हनुमंत ॥ पुच्छ आडवें टाकूनि ॥१५१॥
त्यासी भीम बोले प्रौढी ॥ वानरा वाटेचें पुच्छ काढीं ॥ मज जाणें आहे तांतडी ॥ ऋषि दर्शना कारणें ॥१५२॥
तो हनुमंत बोले नम्र वचन ॥ भीमा मज आलें वृद्धपण ॥ हें पुच्छ जड जाहलें पूर्ण ॥ आतां माझ्यानें उचलेना ॥१५३॥
तरी तूं बळिया भीम सेन ॥ एकीकडे ठेवीं उचलोन ॥ अवश्य म्हणे कुंती नंदन ॥ पुच्छ उचलूं पाहातसे ॥१५४॥
नव सहस्त्र वारणांचें बळ ॥ तें भीम सेनें वेंचिलें सकळ ॥ तों पुच्छ न ढळे अढळा ॥ जैसा अचल पडियेला ॥१५५॥
हतबल जाहला भीमसेन ॥ गदगदां हांसे वायुनंदन ॥ म्हणे धर्मानुजा गर्व सांडून ॥ कृष्ण भजनीं राहीं तूं ॥१५६॥
मग भीमें स्वतूनि हनुमंता ॥ म्हणे तूं आवडसी रघुनाथा ॥ आणि दशास्य बलहंता ॥ सीताशोकहर्ता तूंचि पैं ॥१५७॥
निरभिमान भीमासी देखिलें ॥ मग पुच्छ हनुमंतें काढिलें ॥ गंध मादन पर्वतासी ते वेळे ॥ धर्मानुज पातला ॥१५८॥
द्दष्टी देखिला गंध मादन ॥ अंग जैसें दिव्य सुवर्ण ॥ परी तया सूकराचें वदन ॥ दुर्गांधि पूर्ण येतसे ॥१५९॥
भीमें केला नमस्कार ॥ उभा राहिला जोडूनि कर ॥ म्हणे तुम्हांसी पाचारी यादवेश्वर ॥ यग होतसे धर्मसदनीं ॥१६०॥
मग बोले गंध मादन ॥ हें परम दुर्गंधि सूकरवदन ॥ मी तेथें न येंचि घेऊन ॥ उपहासिती सर्वही ॥१६१॥
भीम म्हणे महाऋषी ॥ तुझी कांती सुवर्णा ऐसी ॥ ऐसें तुज मुख व्हावयासी ॥ काय कारण सांग पां ॥१६२॥
येरू म्हणे ऐकें सावधान ॥ पूर्वीं मी होतों बहुत सधन ॥ सर्व दानें केलीं पूर्ण ॥ यथाविधी करूनियां ॥१६३॥
परी ब्राह्मणांचा जाय प्राण ॥ ऐसें बोलिलों कठिण वचन ॥ यालागीं ऐसे जाहलें वदन ॥ पंडुनंदना जाण आं ॥१६४॥
भीमा तूं तरी सावधान ॥ नको बोलूं कठोर वचन ॥ मनांत दचकला भीमसेन ॥ आला परतोन इंद्र प्रस्था ॥१६५
मग विप्रांसी म्हणे ॥ स्वामी सावकाश जी जेवा ॥ न रुचे त्याचा त्याग कराव ॥ प्रासद ठेवावा निजपात्रीं ॥१६६॥
विप्र म्हणती नवल जाहलें ॥ यासी हे गुण कोणें लाविले ॥ प्रार्थना करितां नम्र बोले ॥ आमुचें फळलें भाग्य वाटे ॥१६७॥
असो धर्माची संपदा बहुत ॥ देखतां दुर्योधन संतापत ॥ म्हणे याचा साह्याकारी कृष्णनाथ ॥ त्याचेनि समस्त पूर्ण होय ॥१६८॥
श्री कृष्णासी म्हणे दुर्योधन ॥ तुझें पांडवांवरी बहु मन ॥ तूं एवढा देव होऊन ॥ समता नसे तुझे ठायीं ॥१६९॥
पांडवांशीं धरिसी प्रीती ॥ तैसी आम्हांकडे नाहीं रीती ॥ तुझे ठायीं द्वैत श्रीपती ॥ नवल मज वाटतें ॥१७०॥
हरि म्हणे दुर्योधना ॥ मी समसमान अवघ्या जणां ॥ एकासी अधिक एकासी उणा ॥ सर्वथा नाहीं विचारीं ॥१७१॥
दरिद्री राजा हो कां रंक ॥ सर्वांसी समान जैसा अर्क ॥ किंवा गंगेचें उदक ॥ सर्वां सही सम जैसें ॥१७२॥
कीं सर्वां घटीं समान अंबर ॥ कीं सर्वांसी समान जैसा समीर ॥ कीं गगनीं उगवतां रोहिणीवर ॥ शीतल जैसा सर्वांतें ॥१७३॥
तैसा मी दुर्योधना असें जाण ॥ परी जेकां कुटिल जन ॥ ते समत्व विषमत्व संपूर्ण ॥ माझ्या ठायीं भाविती ॥१७४॥
जे भक्त धरिती अत्यादर ॥ त्यांसी जवळी वाटें मी यादवेंद्र ॥ मी समीप असोनि साचार ॥ अभक्त दूरी भाविती ॥१७५॥
त्याची दावा वया प्रचीती ॥ दुर्योधनासी म्हणे यदुपती ॥ एक कारण असे निश्चिती ॥ तें तूं ऐकें सुयोधना ॥१७६॥
इतुके हे बैसले ब्राह्मण ॥ त्यांत एक सत्पात्र निवडून ॥ लवकरी आणीं उत्तम दान ॥ देणें असे तयासी ॥१७७॥
दुर्योधन चालिला पहावया ॥ मग बोला विलें धर्मराया ॥ म्हणे एक द्विज नष्ट पाहूनियां ॥ वेगें आणीं आतांचि ॥१७८॥
धर्म जों पाहे ब्राह्मण ॥ तों केवळ दिसती सूर्य नारायण ॥ महातपस्वी पुण्यपरायण ॥ नष्ट एकही दिसेना ॥१७९॥
परतोनि आला हरीपाशीं ॥ म्हणे अवघे आहेत पुण्यराशी ॥ अपवित्र गुण एकासी ॥ न दिसे कोठें सर्वथा ॥१८०॥
इकडे दुर्योधन शोधीत शोधीत ॥ अवघें ऋषि मंडळ पहात ॥ एकही धड नाहीं त्यांत ॥ दुषणें बहुत दिसती तया ॥१८१॥
हरिजवळी आला सत्वर ॥ म्हणे अवघेचि अपवित्र ॥ एकही न दिसे सत्पात्र ॥ दोष सर्वत्र असती पैं ॥१८२॥
दुर्योधनासी म्हणे जगज्जीवन ॥ तुझें ह्रदय कपटी मलिन ॥ सदोषिया निर्दोष जाण ॥ त्रिभुवनींही दिसेना ॥१८३॥
दुरात्मा जो दुर्बुद्धि खळ ॥ त्यासी अवघे दिसती अमंगळ ॥ द्दष्टीं कोणी न दिसे निर्मळ ॥ पापें समूळ वेष्टिला ॥१८४॥
वेश्येचिया नयनीं ॥ सकळ स्त्रिया दिसती जारिणी ॥ तैसा दुरात्मा तूं पापखाणी ॥ मलिन मनीं सर्वथा ॥१८५॥
धर्मासी अवघे दिसती पुण्यवंत ॥ तेचि तुज दोषी भासत ॥ दुर्योधन न बोले तटस्थ ॥ जो उन्मत्त विषयांध ॥१८६॥
असो एक वर्ष पर्यंत ॥ राजसूययज्ञीं उत्साह होत ॥ तों नवल एक वर्तलें तेथ ॥ श्रोते सावचित्त ऐकोत पां ॥१८७॥
जान्हवीचे तीरीं जाण ॥ कोणी एक तपस्वी ब्राह्मण ॥ अरण्यामाजी गुफा बांधोन ॥ स्त्रियेसहित राहातसे ॥१८८॥
परम तेजस्वी ब्राह्मण ॥ सदा करी शिवो पासन ॥ नित्य कैला साहूनि विमान ॥ संध्या समयीं येतसे ॥१८९॥
तये विमानीं बैसोनि दोघें ॥ कैलासासी जाती सवेगें ॥ शिवार्चन करूनि निजांगें ॥ येती परतोनि आश्रमासी ॥१९०॥
ऐसें असतां एके काळीं ॥ दोघें हिंडती बनस्थलीं ॥ विमान यावयाची वेळ जाहली ॥ पुष्पें तोडिती सर्वग ॥१९१॥
तों तेथें एकान्तवन देखोन ॥ कामातुर जाहला ब्राह्मण ॥ स्त्रियेसी म्हणे भोगदान ॥ देईं मज येथेंचि ॥१९२॥
तंव ती म्हणे भ्रतारासी ॥ चंडांशु आला मध्यान्हासी ॥ पुढें जाणें असे शिवपूजेसी ॥ ही गोष्ट मानसीं धरूं नका ॥१९३॥
तुम्ही सर्व शास्त्रीं निपुण ॥ बरवें पहा विचारून ॥ तंव तो कामें व्यापिला पूर्ण ॥ घूर्णित नयन जाहले ॥१९४॥
अंतर भरलें अनंगें ॥ पंथ सोदूनि जाय आडमार्गें ॥ तों काल सर्पें डंखिला वेगें ॥ प्राण गेले तत्काळ ॥१९५॥
अचेतन पडिलें प्रेत ॥ जवळी आली स्त्री धांवत ॥ अट्टहासें शोक करीत ॥ तों नारद तेथें पातला ॥१९‍६॥
नारद पुसे काय जाहलें ॥ तिनें जाहलें तें सर्व कथिलें ॥ नारद म्हणे हें काय केलें ॥ कां वचन मोडिलें भ्रतारचें ॥१९७॥
तंव ते म्हणे नारदमुनी ॥ कांहीं उपाय सांगा ये क्षणीं ॥ येरू म्हणे शक्र प्रस्था घेऊनी ॥ प्रेत जाईं सवेग ॥१९८॥
यज्ञापाशीं टाकीं प्रेत ॥ तेथें मिळाले श्रेष्ठ समस्त ॥ मी तुज दावितों शक्र प्रस्थ ॥ उचलीं कुणप वेगेंशीं ॥१९९॥
पुढें चाले नारद मुनी ॥ मागें ते येई प्रेत घेऊनी ॥ यज्ञ मंडपांत आणूनी ॥ अकस्मात टाकिलें ॥२००॥
म्हणे सर्पदंशें मेला भ्रतार ॥ कोणीं उठवावा उठवावा सत्वर ॥ तरीच मखफल होय साचार ॥ देखोनि युधिष्ठिर घाबरला ॥२०१॥
म्हणे यज्ञासी विघ्न ओढवलें ॥ जैसें दुग्धामाजी जैंधव पडलें ॥ स्वाहाकार ॥ खोळंबले ॥ ह्स्त आखुडिले ब्राह्यणीं ॥२०२॥
धर्म जाहला दीन वदन ॥ समस्तांसी विनवी कर जोडून ॥ कोणी तरी तपस्तेज वेंचून ॥ उठवा शीघ्र कुणप हें ॥२०३॥
तटस्थ पाहती सभाजन ॥ कोणी न बोले कांहीं वचन ॥ धर्में उदकें भरूनि नयन ॥ जगद्वंद्याकडे पाहिलें ॥२०४॥
म्हणे कैवारिया भक्तवत्सला ॥ शेवटीं हा अनर्थ ओढवला ॥ जैसा विदेशाहूनि ग्रामासी आला ॥ वेशींत नागविला तस्करीं ॥२०५॥
हातासी लागावें जों निधान ॥ तों तेथें विवशी पडे येऊन ॥ म्हणे मायबाप तूं जगज्जीवन ॥ तुझा यज्ञ सांभाळीं ॥२०६॥
मी किंकर तुझा दीन ॥ तूं सांभाळीं आपुला यज्ञ ॥ मी यज्ञकर्ता म्हणवीन ॥ तरी जिव्हा हे झडोन पडो ॥२०७॥
ऐकोनि धर्माचें वचन ॥ गहिंवरले अवघे भक्तजन ॥ जे शिशुपाला दिक दुर्जन ॥ हर्ष पूर्ण मनीं त्यांच्या ॥२०८॥
खुणाविती एकासी एक ॥ बरें म्हणती जाहलें कौतुक ॥ चांडाल दुरात्मे देख ॥ उणें पाहती भक्तांचें ॥२०९॥
परी धर्माचा पाठिराखा थोर ॥ वैकुंठपुरींचा सुकुमार ॥ तो उणें पडों नेदी अणुमात्र ॥ कमलनेत्र ॥२१०॥
मेघगंभीर गिरा गिरी गजोंन ॥ बोले रुक्मिणी प्राणजीवन ॥ मन्मथजनक जनार्दक ॥ पांडवजनरक्षक जो ॥२११॥
म्हणे वेंचावें कांहीं निजतप ॥ तरी उठेल हें कुणप ॥ यावरी विरिंचीचा बाप ॥ काय करिता जाहला ॥२१२॥
जो पीतवसन श्रीकरधर ॥ सुरंग रुळे उत्तरीयवस्त्र ॥ मंदहास्य वारिजनेत्र ॥ पेताजवळी आला तो ॥२१३॥
हातीं घेतलीं रत्नजडित झारी ॥ सव्यकरें ओती पुण्यवारी ॥ कृष्णद्वेषी जे पापकारी ॥ हांसों लागले गदगदां ॥२१४॥
शिशुपालादि कौरव दुर्जन ॥ म्हणती हा काय आचरला पुण्य ॥ कोणतें तप केलें निर्वाण ॥ जन्मादारभ्य आजिवरी ॥२१५॥
महाकपटी चोर जार ॥ गोवळ्यांचें उच्छिष्ट खाणार ॥ एक म्हणती धरा धीर ॥ कौतुक पहा उगेचि ॥२१६॥
तों काय बोले मधुकैटभारी ॥ मी आजन्म पर्यंत असेन ब्रह्मचारी ॥ तों अवघे हांसती दुराचारी ॥ हस्तीसी हस्त मेळवूनि ॥२१७॥
ब्रह्मचर्य संकल्प करून ॥ ब्राह्मणाचे मुखीं जीवन ॥ जगज्जीवनें घालितांचि खडबडून ॥ उठला विप्र ते वेळे ॥२१८॥
जाहला एकचि जय जय कार ॥ देव वर्षती सुमन संभार ॥ प्रेमें दाटला युधिष्ठिर ॥ भक्त अपार स्वविती तेव्हां ॥२१९॥
खळ दुर्जन ते वेळीं ॥ अधोवदन पाहती सकळी ॥ आनंदली भक्त मंडळी ॥ पिटिली टाळी सकळिकीं ॥२२०॥
असो उठविला जो ब्राह्मण ॥ त्याचें धर्में केलें पूजन ॥ स्त्रियेसहित गौरवून ॥ वस्त्रें भूषणें अर्पिलीं ॥२२१॥
तों यज्ञामधूनि एक जंबुक ॥ अकस्मात निघाला एका एक ॥ कुंडवेदिकेवरी बैसोनि देख ॥ पुढील भविष्य वाखाणी ॥२२२॥
गर्जोनि बोले जंबुक शब्द ॥ एथें एकाचा होईल शिरश्छेद ॥ पुढें दिसतो मोठा विरोध ॥ कलह अगाध माजेल ॥२२३॥
एथोनि तेरा वर्षें अवधारा ॥ निर्वेंर होईल वसुंधरा ॥ जितुके नृप आले धर्म मंदिरा ॥ तितुकेही आटतील ॥२२४॥
ऐसें तो जंबुक बोलिला ॥ तेथेंचि मग अद्दश्य जाहला ॥ असो पुढें स्वाहाकार चालिला ॥ ब्राह्मण हस्तें करू नियां ॥२२५॥
हें जैमिनि भारतींचें मत ॥ श्रोतीं पहावें असे यथार्थ ॥ श्री कृष्णें उठविलें प्रेत ॥ हेंही कथानक तेथींचें ॥२२६॥
कथा हे गोड ऐकिली ॥ म्हणोनि ती एथें योजिली ॥ शिशुपालाचें शिर वनमाळी ॥ छेदील तें परिसा आतां ॥२२७॥
पुढिले अध्यायीं सुरस ॥ द्रौपदी वाढील समस्तांस करितां आवर्तन ॥ सकल पुरती मनोरथ ॥२२९॥
संपत्ति विद्या पुत्र धन ॥ कामिक पावती करितां श्रवण ॥ हें श्री विठ्ठलें वरदान ॥ पंढरीसी दीधलें ॥२३०॥
पंढरीनगरींच यथार्थ ॥ प्रकाटला पांडवप्रताप ग्रंथ ॥ श्रवणें सकल संकटें वारीत ॥ सत्य सत्य श्रोते हो ॥२३१॥
श्री धरवरदा अभंगा ॥ रुक्मिणीवल्लभा पांडुरंगा ॥ पांडवरक्षका भक्तभवभंगा ॥ अव्यया निःसंगा सुखाब्धें ॥२३२॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ सभापर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ सप्तदशाध्यायीं कथियेला ॥२३३॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ सभापर्वटीका श्री धरकृत ॥ भीमगर्वमोचन उठविलें प्रेत ॥ जंबुकें भविष्य कथियेलें ॥२३४॥
इति श्री श्रीधरकृत पांडवप्रतापे सभापर्वणि सप्तद्शाध्यायः समाप्तः ॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ श्री पांडवप्रताप सभापर्व सप्तदशाध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 08, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP