पांडवप्रताप - अध्याय ३८ वा
पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.
॥ श्री गणेशाय नमः ॥ वैशंपायन म्हणे पुण्यरूपा ॥ ऐकें जन मेजया महानृपा ॥ चार याम क्रमिली क्षपा ॥ सनत्सुजात समागमें ॥१॥
मेघापरीस उदार ॥ ज्ञान वर्षला तो विधिपुत्र ॥ उदयाचलीं येतां मित्र ॥ तम निःशेष हारपलें ॥२॥
परम देदीप्यमान तरणी ॥ भीष्म शारद्वत द्रोण द्रौणी ॥ सुयोधन दुःशासन कर्ण शकुनी ॥ सभास्थानीं बैसले ॥३॥
अर्कज सौबल बाल्हीक ॥ प्रज्ञाचक्षु क्रुरु नायक ॥ सभा घन वटली सम्यक ॥ शक्रस्थाना सारिखी ॥४॥
तों संजय परम प्रवीण ॥ सभेसी बैसला येऊन ॥ मग सांगता जाहला वर्तमान ॥ पंडुकुमारांचें सर्वही ॥५॥
धर्में वृद्धकनिष्ठां लागून ॥ सांगितलें आशीर्वाद क्षेम नमन ॥ दुर्योधन म्हणे तरी संजया संपूर्ण ॥ सांग अर्जुन बोलिला तें ॥६॥
संजय म्हणे जें ते बोलिले ॥ तेंचि कथितों नाहीं आगळें ॥ तुम्ही जरी न कोपाल वहिलें ॥ तरी वर्तलें तें सांगेन मी ॥७॥
प्रज्ञाचक्षु म्हणे कां कोपावें ॥ बोलिले तेंचि त्वां सांगावें ॥ संजय म्हणे ऐकावें ॥ सर्व सादर होऊनी ॥८॥
क्रोधें बोलिला अर्जुन ॥ दुरात्मा जो सूतपुत्र कर्ण ॥ त्याचा समरीं घेईन प्राण ॥ तरीच गांडीव वापधारी मी ॥९॥
धर्मराज उघडील दिव्य द्दष्टी ॥ तेव्हां भस्म करील सर्व कौरव सृष्टी ॥ हा वृकोदर वीर जेठी ॥ यापुढें पृष्ठी कृतान्त दावी ॥१०॥
माद्री सुत इच्छीत मनीं ॥ केव्हां माजेल रणचेदिनी ॥ द्वारावतीची भवानी ॥ श्रीरंगरूपिणी चतुर्भुज ॥११॥
तीस आम्हीं नवशिलें उदंड ॥ कीं तुज पुढें करूं होमकुंड ॥ कौरव बस्त प्रचंड ॥ दळासहित बळी देऊं ॥१२॥
आम्ही अरण्यांत श्रमलों बहुत ॥ कौरव समरीं लोळवूं समस्त ॥ धर्माचा क्रोध सांचला बहुत ॥ कौरव संहार करील तो ॥१३॥
कुठारधार छेदी सर्व वनें ॥ कीं तृण जाळिजे त्रिचरणें ॥ भीम सूर्य शत्रू उडुगणें ॥ तेजहीन पैं होती ॥१४॥
शत्रु जलद जाल सघन ॥ भीम सुटतां प्रभंजन ॥ क्षणें जाती वितळोन ॥ शीघ्रकाळें यावरी ॥१५॥
कौरव वमूषकांचा मार्ग लक्षी ॥ सहदेव भुजंग धुसधुशी ॥ नकुलव्याघ्र आपटी शेंपटी ॥ शत्रुजंबुक कोठें वसती ॥१६॥
हा महावीर धृष्टद्युम्न ॥ नरवीरांमाजी पंचानन ॥ हा सात्यकी प्रलयाग्न ॥ शत्रूवन जाळूं इच्छी ॥१७॥
हे प्रतिविंध्यादि पांच कुमार ॥ उदित युद्धासी अहोरात्र ॥ हा कृष्ण सद्दश सौभद्र ॥ कृतांतासी गणीना ॥१८॥
मेरु मंदार सबळ सदट ॥ तैसे द्रौपद आणि विराट ॥ देशोदेशींचे राजे अचाट ॥ त्यांचा पराक्रम न वर्णवे ॥१९॥
दुर्योधन दुःशासन ॥ यांचा काळ भीमसेन ॥ हें हरि हर कमलासन ॥ नव्हे अप्रमाण ॥ त्यांचेनी ॥२०॥
भीष्माचा काळ शिखंडी जाण ॥ द्रोणासी बधील धृष्टद्युम्न ॥ सर्व भौम धर्म आपण ॥ शल्यासी मारूं इच्छीत ॥२१॥
सहदेव शकुनीचा काळ ॥ उलूकासी मारील नकुळ ॥ कौलिकपुत्राचें शिरकमळ ॥ मीच छेदीन स्वहस्तें ॥२२॥
उरले जे कां धार्त राष्ट्र ॥ सर्वांचा काळ हा वृकोदर ॥ धृतराष्ट्राचें पालन समग्र ॥ आम्हीच करूं शेवटीं ॥२३॥
वीज तळपे जैसी अंबरीं ॥ तैसा श्रीरंग रथ फेरी ॥ तेव्हां वीर पळतील दशदिशांतरीं ॥ शस्त्रें अस्त्रें टाकोनियां ॥२४॥
कौरव तस्कर संपूर्ण ॥ यांचे तोडीन हस्त चरण ॥ जयद्रथाचें शिर छेदीन ॥ द्रौपदीस घेऊन पळत होता ॥२५॥
त्यांहीं शब्द शस्त्रें सोडिलीं अपार ॥ लोहशस्त्रें आम्ही देऊं प्रत्युत्तर ॥ कृष्णद्वेषी चांडाळ समग्र ॥ संहारीन नेम हा ॥२६॥
माझिया चापासी आहे गवसणी ॥ परी प्रतिचाप क्षणक्षणां झणाणी ॥ तृणीर भरलासे बाणीं ॥ करकरती बाहेर ॥ यावया ॥२७॥
काळ फोडीन रणांगणीं ॥ यवपिष्टवत करीन धरणी ॥ आकाशमंडप उघडोनी ॥ पाडीन स्वर्ग खालता ॥२८॥
माझिया रथाचा ध्वज अद्भुत ॥ वायु नसतां फडकत ॥ भूतांसह हनुमंत ॥ वाट पाहात रणाची ॥२९॥
सर्पाचिया परी झडकरी ॥ असिलता निघती मेणाबाहेरी ॥ शक्ति जाळ माझें थरथरी ॥ अस्त्रें विचार करिताती ॥३०॥
परम प्रतापी पंडुकुमार ॥ परी धृतराष्ट्र आणि गंगापुत्र ॥ शारद्वत आचार्य गुरुवर ॥ यांचे चरण न विसरती ॥३१॥
मग बोले गंगा नंदन ॥ विधीनें केलें प्रजांचें समाधान ॥ भूभार उतरावया संपूर्ण ॥ नरनारायण अवतरले ॥३२॥
ते हेचि कृष्णार्जुन ॥ भूभार ॥ उतरतील संपूर्ण ॥ दुर्योधना होईं सावधान ॥ वंशवन जळूं नको ॥३३॥
कपिध्वज रणांगणीं ॥ देखिला नाहीं तुम्हीं नयनीं ॥ तोंवरी धर्मासी आणोनी ॥ राज्य विभाग देइंजे ॥३४॥
आतां नायकसी आमुचें वचन ॥ समरीं जेव्हां सोडिशील प्राण ॥ तेव्हां होईल आठवण ॥ आमुचिया वचनाची ॥३५॥
कर्ण शकुनि दुःशासन ॥ यांचें नायकें कदा वचन ॥ मम वाक्यसुधारस सेवून ॥ आमर होऊन नांदें कां ॥३६॥
सक्रोध बोले वीर कर्ण ॥ अरे हा भयभीत वृद्ध पूर्ण ॥ क्षत्रियधर्म सोडून ॥ दीनवदन गोष्टी सांगे ॥३७॥
सेनेसमवेत पांडव ॥ मी रणीं संहरीन सर्व ॥ एकछत्री राणीव ॥ दुर्योधनाचें करीन मी ॥३८॥
भीष्म म्हणे रे कर्णा ॥ कां करिसी व्यर्थ वल्गना ॥ गोग्रहणीं गेऊनि कृष्णवदना ॥ कां रे सर्व पळालां ॥३९॥
गंधर्वीं कौरव धरूनि नेले ॥ तेव्हां तुझें बळ कोठें गेलें ॥ अधम हो तुम्हां सोडविलें ॥ भीमार्जुनीं धांवोनी ॥४०॥
यावरी महाराज गुरुद्रोण ॥ धृतराष्ट्रासी बोले वचन ॥ जें बोलिला देवव्रत गर्जोन ॥ सत्य सत्य जाण हें ॥४१॥
जों माजली नाहीं रणकुंभिनी ॥ तों मैत्री करा जाऊनी ॥ तों अंध म्हणे ते क्षणीं ॥ मज भय वाटे भीमाचें ॥४२॥
भीमाचिया बळापुढें ॥ न तुळती उभय दळें पडिपाडें ॥ त्याचा गदाघाय ज्यावरी पडे ॥ तेथें उरी उरेना ॥४३॥
मी तयाचें समाधान ॥ पहिलेंचि करितों जाऊन ॥ तरीच हा अनर्थ ॥ चुकता दारुण ॥ आतां ते कदा नाटोपती ॥४४॥
उपजत मूर्ख माझे नंदन ॥ नायकती श्रेष्ठांचें वचन ॥ भीम ऐरावत दारुण ॥ वंशवन उपडील ॥४५॥
तेणें जरासंध मारिला ॥ किर्मीर हिडिंब बक वधिला ॥ सबळ कीचकांचा मेळा ॥ मृत्यु नगरा धाडिला ॥४६॥
तो या सकळांसी मारील देख ॥ माझेनें नायकवेल स्नुषांचा शोक ॥ मी त्यांचे द्वारीं लोळेन बहुतेक ॥ पुत्रशोकें करू नियां ॥४७॥
धन्य पांडव बलवंत ॥ माझी मर्यादा पाळिती बहुत ॥ येर्हवीं हे दुर्जन समस्त ॥ नेतील क्षणांत बांधोनि ॥४८॥
संजय म्हणे द्रौपदी सभेसी ॥ आणिली तेव्हां उगाचि होतासी ॥ आतां काय या गोष्टी करिसी ॥ भय मानसीं धरोनियां ॥४९॥
तुझे पुत्र बांधून ॥ गंधर्वीं नेले धरून ॥ तेव्हां धांवले भीमार्जुन ॥ पराक्रमें त्यांहीं सोडविले ॥५०॥
परम पराक्रमी वृकोदर ॥ करील तव पुत्रांचा संहार ॥ तुझी बालबुद्धि साचार ॥ मोहेंकरोनि तत्त्वतां ॥५१॥
दुर्योधन बोले वचन ॥ हा अनिवार कृतांतासी द्रोण ॥ रणपंडित परम निपुण ॥ कृपाचार्य पराक्रमी ॥५२॥
संहाररुद्राची अपरप्रतिमा ॥ तो हा नरलोकीं अश्वत्थामा ॥ या कर्णाचा युद्धमहिमा ॥ एका वक्रें न वर्णवे ॥५३॥
निष्पांडवी धरित्री ॥ करीन सत्वर यावरी ॥ हे राजे मजकारणें समरीं ॥ प्राण देतील भरंवसा ॥५४॥
पांडव निर्बल पक्षहीन ॥ त्यांत साह्य जरी आले स्वर्गाहून ॥ शक्र शिव रमारमण ॥ कमलासन जरी आला ॥५५॥
त्यांसही संहारूं समरीं ॥ हा निश्चिय आमुचे अंतरीं ॥ रेवतीरमण गुरु शिरीं ॥ बळ माझें जाण पां ॥५६॥
धर्म भ्याड अति दीन ॥ पांच गांव मागतो कर जोडून ॥ परी एक पाऊल धरणी जाण ॥ त्यास नेदीं निर्धारें ॥५७॥
मी गदा पडताळीन जेव्हां ॥ समरीं मजशीं न तगे मघवा ॥ या सर्व राजांचा वर्णावा ॥ पराक्रम किती हो ॥५८॥
करूनि एकत्र द्वादश मित्र ॥ हा घडिला कीं स्वर्धुनी पुत्र ॥ या द्रोणाशीं माजवी समर ॥ ऐसा वीर नसेचि ॥५९॥
आम्ही दळाशीं अवघेजण ॥ एकीकडे बळें संपूर्ण ॥ एकला हा वीर कर्ण ॥ पराक्रमें आगळा ॥६०॥
वीरचक्रचूकडामणी ॥ उदार धीर समरांगणीं ॥ तरी कवचकुंडलें मागोनी ॥ गोला घेऊनि सुत्रामा ॥६१॥
ही वासवी शक्ति सोडील कर्ण ॥ तेव्हां कदा न वांचे अर्जुन ॥ भीष्मप्रतिज्ञा अति दारुण ॥ वीर मारीन दश सहस्त्र ॥६२॥
संजय म्हणे पंडुकुमार ॥ निर्भय निःशंक ॥ प्रलयरुद्र ॥ समरीं ठाकतील समोर ॥ पंचादित्य प्रतापी ॥६३॥
सभोंवता एक योजन ॥ दिसे अर्जुनाचा उंच स्यंदन ॥ कपिवरध्वज भेदीत गगन ॥ दश योजन भोंवता दिसे ॥६४॥
तिंहीं वांटूनि घेतले वीर ॥ शिखंडीचा भाग गंगा पुत्र ॥ धृष्टद्युम्न महावीर ॥ द्रोण गुरुसी वधील ॥६५॥
शल्यासी वधील धर्म ॥ दुर्योधनदुःशासनांसी भीम ॥ समरीं मारील हा नेम ॥ शतही बंधूंसमवेत ॥६६॥
कर्णासी सुभद्रावर ॥ मारील समरीं निर्धार ॥ सहदेवहातें शकुनि वीर ॥ मृत्यु सदना जाईल ॥६७॥
शकुनीचा पुत्र उलूक जाण ॥ नकुल त्याचा घेईल प्राण ॥ बृहद्वल आणि लक्ष्मण ॥ यांसी आवंतिलें अभिमन्यें ॥६८॥
यादववीर युयुधान ॥ तेणें नेमिला चेकितान ॥ तुमचें अकरा अक्षौहिणी सैन्य ॥ द्दष्टीं नाहीं तयांचे ॥६९॥
एकल्या अर्जुनें गोग्रहणीं ॥ केला पुरुषार्थ आठवा मनीं ॥ शतही कीचक मारूनी ॥ निशींत टाकिले वृकोदरें ॥७०॥
दुर्योधन बोले पराक्रम ॥ उद्यां पांडवांचा करीन होम ॥ धृतराष्ट्र बोले अतिसंभ्रम ॥ कां बल्गना व्यर्थ करिसी ॥७१॥
अरे प्राणींतसमयीं जाण ॥ माझें तुम्हांसी आठवेल वचन ॥ परमपराक्रमी भीमार्जुन ॥ संहारितील सर्वांसी ॥७२॥
संजय म्हणे एकांतीं जाण ॥ दिव्यस्यंदनीं श्रीकृष्णार्जुन ॥ एक शय्येवरी दोघेजण ॥ पहुडले नयनीं देखिले म्यां ॥७३॥
नकुल सहदेव सौभद्र ॥ जेथें जाऊं न शकती द्रौपदीपुत्र ॥ तें परमसुवास एकान्त मंदिर ॥ तेथें पार्थ श्रीधर पहुडले ॥७४॥
ध्वजवज्ररेखांकित बरवे ॥ देखिले म्यां श्रीरंगाचे तळवे ॥ ते सुभद्रावरे प्रेमभावें ॥ तळहातितां देखिले म्यां ॥७५॥
सनका दिक कमलासन ॥ करितां योगयाग साधन ॥ यांचेही द्दष्टीस जाण ॥ अगोचर पदतळवे ते ॥७६॥
ते पाय आपुले अंकीं धरून ॥ क्षणोक्षणीं तळहाती अर्जुन ॥ सवेंचि हातीं धरूनि श्रीकृष्ण ॥ पहुडवीत पार्थातें ॥७७॥
भोजन शयन पान ॥ गमनागमन संभाषण ॥ एके ठायीं दोघे जण ॥ क्षणभरी दूर न होती ॥७८॥
ते निजले असतां दोघेजण ॥ तेथें मी निजभाग्यें करून ॥ उभा ठाकलों जाऊन ॥ तोम उभयतांचे चरण देखिले ॥७९॥
श्रीकृष्णतळव्यांवरी चिन्हें अद्भुत ॥ तैशींचे पायीं झळकत ॥ मी देखोनि जाहलों तटस्थ ॥ धन्य भाग पार्थाचें ॥८०॥
अर्जुनासी निद्रा नाहीं निःशेष ॥ म्हणोनि नाम गुडाकेश ॥ मज देखतां तो नरवीरेश ॥ उठोनियां बैसला ॥८१॥
श्रीरंगाचे चुरितां चरण ॥ सावध जाहला जगज्जीवन ॥ मज आसनावरी बैसवून ॥ गौरव बहुत पैं केला ॥८२॥
मी बोलिलों तेथें वचन ॥ कीं जातों कुंजरपुरा लागून ॥ मग मजप्रति रुक्मिणीरमण ॥ बोलिला तेंचि ऐकें पां ॥८३॥
सांगें भीष्मद्रोणदुर्यो धनां ॥ सकळ भूभुजां थोरलहानां ॥ भगदत्तशल्यकर्णी ॥ संजया सांग सर्वांसी ॥८४॥
जप तप याग दानें ॥ अष्टभोग ललनांसी देणें ॥ पुत्रकन्यांचीं समाधानें ॥ संभाषणें मित्रांशीं ॥८५॥
करा दिव्यान्न भोजना ॥ ठेवूं नका कांहीं वासना ॥ तुम्हां आलें मरण चुकेना ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥८६॥
द्रौपदीच्या दुःखें करून ॥ मी आरंबळें रात्रंदिन ॥ अर्जुनाची पाठी राखोन ॥ संहार करिन सर्वांचा ॥८७॥
त्रिदशांसह शचीरमण ॥ तुम्हां रक्षूं आलिया जाण ॥ क्षणांत हें ब्रह्मांड जाळीन ॥ सुदर्शन सोडूनियां ॥८८॥
पार्थाचे हस्तें करून ॥ एकादन अक्षौहिणी दळ संहारीन ॥ नातरी हें सुदर्शन ॥ मी सोडीन शेवटीं ॥८९॥
या पांचांतूनि एक वीर ॥ करील तुमचा संहार ॥ अवघे जालिया एकत्र ॥ तरी मग उरी कायसी ॥९०॥
ऐसें एकांतीं कृष्णार्जुन ॥ बोलिले तेव्हां मज लागून ॥ दोघांचें बोलणें एकचि जाण ॥ नसे अन्य दुसरें पैं ॥९१॥
ऐसें ऐकतां अंबिकानंदन ॥ भयभीत होऊनि बोले वचन ॥ दुर्योधना वर्तमान ॥ पुढें बरें दिसेना ॥९२॥
हें दळ मेळ विलें त्वां निर्धारीं ॥ याचा भरंवसा कदा न धरीं ॥ पार्थासी साह्य समरीं ॥ हरि हर इंद्रादि जाणिजे ॥९३॥
मग बोलती सुयोधन कर्ण ॥ तुम्ही सुखें करा मंदिरीं शयन ॥ क्षणांत पांडव संहारून ॥ दळासह टाकूं आम्ही ॥९४॥
गंगात्मज म्हणे कर्णा ॥ कां करिसी व्यर्थ वल्गना ॥ गोग्रहणीं कृष्ण वदना ॥ करूनि पळालेति सर्वही ॥९५॥
श्रीरंग सोडील सुदर्शन ॥ मग कैंचे उरेल तुमचें सैन्य ॥ नका कुल टाकूं संहारून ॥ ऐका वचन शिकविलें ॥९६॥
क्रोधें बोले कर्ण वीर ॥ आहे गंगाकुमार ॥ तों मी कदा न धरीं शस्त्र ॥ नेम माझा हा जाणिजे ॥९७॥
शस्त्रें टाकूनि रागें कर्ण ॥ गेला जेव्हां सभेंतूनि उठून ॥ तेव्हां भीष्मासी म्हणे सुयोधन ॥ तुम्ही पाठिराखे पांडवांचे ॥९८॥
तुमचे बळें आम्ही पाहीं ॥ समरीं सहसा भीत नाहीं ॥ आम्ही चौघे मिळूनि सर्वही ॥ पांडवसेना संहारूं ॥९९॥
दुःशासन शकुनि कर्ण ॥ चौथा मी पराक्रमी सुयोधन ॥ टाकूं सर्व संहारून ॥ भरंवसा पूर्ण असों द्यावा ॥१००॥
विदुर बोले तेव्हां नीती ॥ जे कां स्वजातीशीं विरोध करिती ॥ वृद्धांसी क्षणोक्षणीं अपमानिती ॥ ते अनर्थीं पडतील ॥१०१॥
धृतराष्ट्र म्हणे सुयोधना ॥ बा रे ऐकें वृद्धांचे वचना ॥ द्रौपदीस्वयंवरीं भीमार्जुनां ॥ साह्य कवण होता पैं ॥१०२॥
गोग्रहणीं साह्य नव्हता कृष्ण ॥ आतां मिळालें अपार सैन्य ॥ तों दुर्योधन सभा सोडून ॥ रागें गेला सवसदना ॥१०३॥
अंधासी एकांतीं येऊन ॥ भेटला सत्यवतीनंदन ॥ म्हणे हें एकीकडे ॥ त्रिभुवन ॥ एक जनार्दक एकीकडे ॥१०४॥
श्रीकृष्ण महिमा अपार ॥ नेणाच तुम्ही पामर ॥ मनें सृष्टि मनें संहार ॥ करी साचार श्रीकृष्ण ॥१०५॥
पांडवांचें निमित्त करून ॥ भूभार उतरील संपूर्ण ॥ भव पंकजोद्भव कर जोडून ॥ ज्याचें स्तवन करिताती ॥१०६॥
गांधारीनें दुर्योधन ॥ एकांतीं आणिला बोलावून ॥ म्हणे ऐकें वडिलांचें वचन ॥ भेटें जाऊन धर्मराजा ॥१०७॥
उतरावया भूभार ॥ अवतरलासे श्रीकरधर ॥ न ऐकसी शिकविलें साचार ॥ तरी मरण जवळी आलें ॥१०८॥
भीम घालील गदा उचलोन ॥ मग माझें आठ विसील वचन ॥ हें कालत्रयीं न चुके जाण ॥ सत्य वचन सांगतें ॥१०९॥
इकडे जगद्वंद्य जगज्जीवन ॥ त्याप्रति धर्मं बोले वचन ॥ तुजवांचूनि रक्षिता जाण ॥ दुजा कोण असे आम्हां ॥११०॥
बाळाचें पालन करीं बरवें ॥ हें मातेसी काय सांगावें ॥ शांति क्षमा दया धरा म्हणावें ॥ न लागेचि सज्जनां ॥१११॥
श्रीरंग श्याम सुंदर ॥ आपण जावें हस्तिनापुरा ॥ कौरवांचे शोधावें अंतरा ॥ साम भेद करोनि ॥११२॥
त्रयोदश वर्षें वनीं क्रमिलीं ॥ कुंती माता मज अंतरली ॥ तिची भेट होय वनमाळी ॥ त्वरितचि करीं ऐसें तूं ॥११३॥
परम उन्मत्त दुर्योधन ॥ राज्यमदें मद्यपान ॥ स्त्रीविषय धन यौवन ॥ तेणें करून भुललासे ॥११४॥
यावरी बोले राजीवनयन ॥ मी तेथवरी एकदां जाईन ॥ शिष्टाई करूनि बोधीन ॥ दुरात्म्या दुर्योधनातें ॥११५॥
युधिष्ठिर म्हणे जगन्नाथा ॥ तो तुझें न ऐके बोधितां ॥ मज ऐसें वाटतें चित्ता ॥ त्वां एथूनि नच जावें ॥११६॥
मग बोले रुक्मिणी जीवन ॥ मी एकदां तेथवरी जाईन ॥ संदेह सर्व फेडीन ॥ जेणेंकरूनि बोल न लागे ॥११७॥
तेथें वर्ततां विपरीत ॥ सुदर्शन सोडीन अकस्मात ॥ करीन दुष्टांचा निःपात ॥ एका क्षणांत धर्मराया ॥११८॥
धर्म म्हणे श्रीहरी ॥ सर्व भावें करावी मैत्री ॥ भीम म्हणे मुरारी ॥ पंच ग्राम माग त्यांतें ॥११९॥
पार्थ म्हणे समान ॥ जरी अर्ध राज्य देतील वांटून ॥ आणि दुर्योधनें एथें येऊन ॥ धर्मरायासी नमावें ॥१२०॥
तंव बोले नकुल ॥ जरी दुर्योधन शरण येईल ॥ अर्ध राज्य देईल ॥ तरीच मैत्री करावी ॥१२१॥
ऐसें ऐकोनि द्रुपदनंदिनी ॥ म्हणे श्रीरंगा मी तुझी भगिनी ॥ अद्यापि घातली नाहीं वेणी ॥ त्रयोदश वर्षें जाहलीं कीं ॥१२२॥
हातीं धरोनियां केश ॥ म्हणे हे जगन्निवास ह्रषीकेश ॥ दुःशासनें धरुनि निःशेष ॥ नेलें ओढीत सभेमाजी ॥१२३॥
ऐसें बोलतां द्रुपदबाळा ॥ नयनीं अश्रु कंठ दाटला ॥ म्हणे विश्वव्यापका ते वेळां ॥ वस्त्रें पुरविलें त्वां असंख्य ॥१२४॥
मज सभेंत करितां नग्न ॥ हे पांचही पाहती अधोवदन ॥ आतां होऊनियां दीन ॥ पंच ग्राम मागती ॥१२५॥
अंगीं बलप्रती असतां पूर्ण ॥ मग कां मागावें याचकपण ॥ प्रतापें समर माजवून ॥ राज्यासन मग घ्यावें ॥१२६॥
हें जरी न होय तुमचेन ॥ तरी जा मागुती सेवा अरण्य ॥ पंच पुत्र आणि अभिमन्य ॥ दुर्जन संहारीन यांहातीं ॥१२७॥
ऐसें पांचाळी बोलतां ते क्षणीं ॥ आसुवें भिजतसे कुंभिनी ॥ श्रीरंग म्हणे वो माय बहिणी ॥ खेद मनीं करूं नको ॥१२८॥
यावरी सत्वरचि जाणा ॥ एकेक कौरव येती रणा ॥ स्नानासी जातील कौरवललना ॥ तें तूं डोळां विलोकिसी ॥१२९॥
ऐसें बोलोनि जगज्जीवन ॥ करोनियां जप हवन ॥ आपुले स्यंदनावरी आरूढोन ॥ निघता जाहला गरुड ध्वज ॥१३०॥
वारू योजिले अतिसुरेख ॥ शैब्य सुग्रीव बलाहक ॥ मेघपुष्प चवथा देख ॥ पुढें दारुक धुरेसी ॥१३१॥
शंख चक्र गदा पद्म ॥ घेऊनि बैसला मेघश्याम ॥ सवें सात्यकी बीरोत्तम ॥ निघाले वेगेंकरोनी ॥१३२॥
पांडव आणि भूभुज ॥ सकळी ॥ बोळवीत चालिले वनमाळी ॥ मग श्रीरंगें राहवूनि ते वेळीं ॥ निघे वेगेंचि गजपुरा ॥१३३॥
वाटेसी जातां जगदीश्वर ॥ भेटती बहुत ऋषीश्वर ॥ म्हणती आम्ही येतों समग्र ॥ कौरव सभेसी श्रीरंगा ॥१३४॥
तूं तेथें बोलसी कवणे रीती ॥ तें आमुचे श्रवण ॥ ऐकूं इच्छिती ॥ अवश्य म्हणे रुक्मिणीपती ॥ यावें सत्वर मागूनियां ॥१३५॥
मेघीं विद्युल्लता देदीप्यमान ॥ तैसें हातीं झळके सुदर्शन ॥ कोटिमदनतात जगन्मोहन ॥ शोभायमान दिसतसे ॥१३६॥
क्षीराब्धीचें ठेवणें देख ॥ तैसा लखलखीत हातीं शंख ॥ गदा ते वाटे बहुतेक ॥ आदित्यतेजें घडियेली ॥१३७॥
वाटे चंडकिरण आटून ॥ घडिलें हातींचें दिव्य पद्म ॥ सच्चिदानंद मेघश्याम ॥ निगमागम वर्णिती जया ॥१३८॥
प्रलयाग्नीचा कल्लोक भडकत ॥ तैसे उत्तरीयवस्त्र झळकत ॥ दशांप्रति मुक्ता तळपत ॥ कृत्तिकापुंज ज्यापरी ॥१३९॥
तो परम तेजाळ क्षीरोदक ॥ कीं शभ्रयशा चढलें बिक ॥ कीं शुद्ध श्र्वेत मृडानीनायक ॥ कर्पूरेंकरूनि उटियेला ॥१४०॥
कीं दिव्य रजत गाळोनि ओतिलें ॥ कीं पेरोजें कैलास डवरिलें ॥ कीं जान्हवीतोयें ओपिलें ॥ दिनकरनाथें स्वहस्तें ॥१४१॥
तो सच्चिदानंदतनु सगुण ॥ अतसिकुसुमाभास पूर्ण ॥ त्याचिया रंगेकरून ॥ नीलोत्पलें लेपिलीं ॥१४२॥
नभासी चढला तोचि रंग ॥ त्याचि प्रभेनें रंगले मेघ ॥ इंद्रनीळ मणि सुरंग ॥ त्याचि प्रकाशें जाहले ॥१४३॥
तेथींचें सौंदर्य अद्भुत ॥ गरुडपाचूसी तेज दिसत ॥ मर्गजासी बिक चढत ॥ तनु सांवळी देखोनि ॥१४४॥
तो वैकुंठींचा सुकुमार ॥ भक्तह्रन्मंदिरांगणमंदार ॥ कुरवंडी करावी साचार ॥ कोटि मकरध्वज करूनियां ॥१४५॥
ब्रह्मांड फोडोनि बाहेरी ॥ अंगींचा सुवास धांवत वरी ॥ लावण्यामृत सागर कैटभारी ॥ लीलावतारी वेधक जो ॥१४६॥
पूर्ण ब्रह्मानंद यादवेंद्र ॥ लीलाविग्रही श्रीकरधर ॥ ह्रदयीं रेखिला निरंतर ॥ निजभक्तीं प्रेम बळें ॥१४७॥
असो निघाला जेव्हां यादवेंद्र ॥ धर्में अनिवार महावीर ॥ सवें दिधले सहस्त्र शूर ॥ जे कालातें न लेखिती ॥१४८॥
आणि कही सेवकांचीं चक्रें ॥ सेवा करणार चतुर निर्धारें ॥ सवें दिधले सूपशास्त्रें ॥ जाणते आणि हडपिये ॥१४९॥
धृतराष्ट्रासी जाहलें श्रुत ॥ कीं गजपुरा येतो ॥ मन्मथतात ॥ तो सभेंत समस्तां आज्ञापीत ॥ जा हो समस्त सामोरे ॥१५०॥
सन्मान करूनि बहुत ॥ सभेंत आणा तो भगवंत ॥ त्यासी पूजितां सुख अद्भुत ॥ अकल्याण न पूजितां ॥१५१॥
दुर्योधना सभा श्रृंगारीं ॥ स्वहस्तें हरीची पूजा करीं ॥ असो श्रृंगारिली नगरी ॥ मखरें द्वारीं गुढिया बहू ॥१५२॥
शक्रसभेहूनि आगळी ॥ सभा तेव्हां श्रृंगारिली ॥ ज्या मार्गें येत वनमाळी ॥ शिबिरें दिधलीं तये ठायीं ॥१५३॥
जे जे स्थळीं राहात वनमाळी ॥ सेवक राबती उपचारीं सकळीं ॥ चंदनकस्तूरींचे सडे ते वेळीं ॥ शिंपितां सुगंध फांकतसे ॥१५४॥
दुःशासनाचिये सदनीं ॥ वस्तीस स्थळ नेमिलें चक्रापाणी ॥ दुर्योधनाची दांभिक करणी ॥ कापटय अंतरीं कल्पोनियां ॥१५५॥
पद्मदलाकार वदन ॥ वाचा शीतळ जेवीं चंदन ॥ परी ह्रदयीं कापटय दारुण ॥ दुर्योधन दुरात्मा तो ॥१५६॥
अंतरीं शठत्व अपार ॥ शब्द सुरस बाहेर आदर ॥ परी चित्तांत परम कातर ॥ कापटय सागर दुरात्मा ॥१५७॥
साधुवेष धरोनि शुद्ध ॥ यात्रेसी आले जैसे मैंद ॥ कीं वाटपाडे रजनींत प्रसिद्ध ॥ सिद्ध होऊनि बैसले ॥१५८॥
जैसा नटाचा वेष जाण ॥ कीं विषाचें शीतळपण ॥ कीं सावचोराचें गोड वचन ॥ परप्राणहरणार्थ ॥१५९॥
तैसा तो पापी सुयोधन ॥ वरी वरी बोले गोड वचन ॥ शकुनि दुःशासन कर्ण ॥ तिघांसी एकांतीं बोला विलें ॥१६०॥
म्हणे शिष्टाई करूं येतां कृष्ण ॥ त्यासी करावें येथें बंधन ॥ इतुकेनें पांडव बलक्षीण ॥ सहजचि मग जाहले ॥१६१॥
त्रिकालज्ञानी जो विदुर ॥ त्यासी कळला सर्व समाचार ॥ तें जाणोनि गंगाकुमार ॥ म्हणे संहार होईल आतां ॥१६२॥
तों येरीकडे नगर प्रदेशीं ॥ राहिला तेव्हां ह्रषीकेशी ॥ प्रातःकाळीं उठोनि गजपुरासी ॥ येता जाहला जगद्नुरु ॥१६३॥
धृतराष्ट्र म्हणे सामोरें ॥ श्रीरंगासी जावें त्वरें ॥ सदनासी आणावें आदरें ॥ वाद्यगजरेंकरोनियां ॥१६४॥
शकुनि सुयोधन दुःशासन कर्ण ॥ हे चौघे भिन्न करून ॥ अवघे निघाले जगज्जीवन ॥ आणावया सामोरे ॥१६५॥
भीष्म द्रोण शारद्वत ॥ दळभाराशीं निघाला कृपीसुत ॥ आबालवृद्ध समस्त ॥ पौरजन धांवती पहावया ॥१६६॥
आपुलिया गोष्ठीं गोपुरीं ॥ चढोनि पाहती नरनारी ॥ मंडपघसणी जाहली भारी ॥ कृष्ण सुकुमार पाहावया ॥१६७॥
महाराज भवगज विदारक पंचानन ॥ त्यासी भेटले भीष्म द्रोण ॥ मग अनुक्रमें करून ॥ लहान थोर आलिंगिती ॥१६८॥
ग्रहचक्रीं जैसा मित्र ॥ तैसा शोभे स्मरारि मित्र ॥ भक्तद्वेषी जे अमित्र ॥ त्यांसी शासन कर्ता जो ॥१६९॥
लीलाविग्रही भगवंत ॥ मिरवत आला गजपुरांत ॥ धृतराष्ट्र गृहीं प्रवेशत ॥ अंबिकासुत आनंदला ॥१७०॥
प्रज्ञाचक्षु उभा ठाकून ॥ श्रीरंगासी दिधलें आलिंगन ॥ मग कनकासनीं बैसवून ॥ विश्वपूज्य पूजिला ॥१७१॥
सभेंत बैसला जगन्नाथ ॥ चौघे कपटी विलोकिती गुप्त ॥ सूर्य पहावया दिवाभीत ॥ भयभीत जैसे कां ॥१७२॥
पूजिलें देखोनि जगज्जीवना ॥ परम खेद वाटे दुर्जनां ॥ मग तो सर्वज्ञ घेऊनि आज्ञा ॥ विदुरगृहा प्रति गेला ॥१७३॥
विदुरें घालोनि लोटांगण ॥ नयनोदकें क्षाळिले चरण ॥ श्रीरंगाचे मुखावरून ॥ निंबलोण उतरिलें ॥१७४॥
वस्तु ओंवाळोनि अपार ॥ याचकांसी देता जाहला विदुर ॥ आसनीं बैसवूनि उपचार ॥ पूजेचे सर्व समर्पिले ॥१७५॥
म्हणे धन्य माझे नयन ॥ देखती श्रीरंगाचे चरण ॥ धन्य पर्व सुदिन ॥ आजि मज जाहलें ॥१७६॥
अष्टमी नवमी चतुर्दशी ॥ दिनत्रय पुण्यराशी ॥ पिंडपितृयज्ञ महा मखासी ॥ निश्चयेंशीं केलें म्यां ॥१७७॥
घरासी आला श्रीकरधर ॥ तरी इतुकें पुण्य जोडलें समग्र ॥ असो विदुराशीं एकांत विचार ॥ बहुत केला श्रीरंगें ॥१७८॥
यावरी तो इंदिरावर ॥ प्रवेशे कुंतीचें मंदिर ॥ पितृभगिनीसी सर्वेश्वर ॥ वंदन करीत आदरें ॥१७९॥
कुंती गळां मिठी घालून ॥ शोक करी पांडवांलागून ॥ मग श्रीरंगें तीस बैसवून ॥ वर्तमान सांगीतलें ॥१८०॥
कुंती म्हणे जगजेठी ॥ उपजत माझीं बाळकें कष्टी ॥ अहा सृष्टिकर्त्या परमेष्ठी ॥ माझें प्राक्तन ऐसें कां ॥१८१॥
मज टाकूनि काननास ॥ गेले पांचही राजहंस ॥ परम सुकुमार डोळस ॥ द्नुपदात्मजा गेली सवें ॥१८२॥
तेरा वर्षें जाहलीं पूर्ण ॥ मी प्राणसखीस कै देखेन ॥ सभेसी गांजिली नेऊन ॥ तुवां मान रक्षिला तिचा ॥१८३॥
कृष्णा पांडवांसी सांग त्वरित ॥ जरी तुम्ही असाल माझे सुत ॥ तरी युद्ध करूनि अद्बुत ॥ राज्य घ्यावें सर्वही ॥१८४॥
मज दुःख जाहलें दिनरजनीं ॥ मम प्राणसखी तव भगिनी ॥ रजस्वला एकवसनी ॥ सभेंत दुर्जनीं गांजिली ॥१८५॥
असो पितृभगिनी लागोनी ॥ संबोखी तेव्हां मोक्षदानी ॥ म्हणे जें जें असे तुझें ॥ तैसेंचि होऊनि येईल ॥१८६॥
सभेसी बैसला सुयोधन ॥ तेथें सात्यकीसह गेला श्रीकृष्ण ॥ पुढें येऊनि अंधनंदन ॥ क्षेमालिंगन ॥ दिधलें पैं ॥१८७॥
उत्तमासनीं बसैवून ॥ पूजिला जेव्हां जगज्जीवन ॥ जो त्रिभुवन सुंदर सुहास्यवदन ॥ त्यासी सुयोधन बोलत ॥१८८॥
म्हणे आजि जगज्जीवना ॥ माझे गृहासी यावें भोजना ॥ परी न मानी यादवराणा ॥ वेदपुराणां वंद्य जो ॥१८९॥
श्रीकृष्ण म्हणे दुयोंधना ॥ आम्ही आलों ज्या कारणा ॥ तें झालिया विण भोजना ॥ न करूं जाण सर्वथा ॥१९०॥
पांडव माझे पंचप्राण ॥ त्यांशीं द्वेष करी जो अनुदिन ॥ त्याचे गृहीं सहसा भोजन ॥ कल्पांतींही मज घडेना ॥१९१॥
मद्भक्तांचा द्वेष करी ॥ तोचि माझा मुख्य वैरी ॥ त्यासी मी नाना प्रकारीं ॥ निर्दाळीन सुयोधना ॥१९२॥
विदुराचे मी आजि निजमंदिरीं ॥ भोजन करीन निर्धारीं ॥ ऐसें बोलूनि कंसारी ॥ उठोनि गेला स्वस्थाना ॥१९३॥
भीष्म द्रोण जाऊनि तेथें ॥ प्रार्थिते जाहले श्रीहरीतें ॥ म्हणती विश्वव्यापका भोजनातें ॥ चला आमुचे सदनासी ॥१९४॥
हरि म्हणे मी येईन भोजन ॥ परी समय नोहे आणा मना ॥ मग त्यांणीं घेऊनि आज्ञा ॥ स्वसदनासी गमन केलें ॥१९५॥
मग विप्रांसह मनमोहन ॥ विदुरगृहीं करी भोजन ॥ विदुराची भक्ति देखून ॥ जगज्जीवन भाळला ॥१९६॥
असो भोजन ॥ जाहलिया एकांतीं ॥ विदुर म्हणे जगत्पती ॥ हा दुर्योधन पापमती ॥ परम चांडाळ दुरात्मा ॥१९७॥
तुम्ही येथें येवोनि कांहीं ॥ हा सर्वथा ऐकणार नाहीं ॥ त्याचे सभेसी कदाही ॥ न जावें तुम्हीं श्रीरंगा ॥१९८॥
सैन्यबळें माजोनि कुमती ॥ जगत्पते तुझा द्वेष करिती ॥ त्यांचे सवें निश्चिती ॥ न बोलावें तुवां कदाही ॥१९९॥
मग बोले जगज्जीवन ॥ चार गोष्टी पाहों सांगोन ॥ नायकती तरी दुर्जन ॥ फळें पावतील शेवटीं ॥२००॥
असो ते रजनींत रमानाथ ॥ विदुरगृहीं निद्रा करीत ॥ उषःकालीं उठोनि समस्त ॥ सत्कर्मधर्म आटोपिती ॥२०१॥
विदुरगृहासी ते क्षणीं ॥ येत दुर्योधन आणि शकुनी ॥ म्हणती वडील बैसले ते स्थानीं ॥ चक्रपाणी तुम्ही चला ॥२०२॥
अवश्य म्हणे कमलाकांत ॥ निजरथीं बैसोनि त्वरित ॥ सवें घेतला विदुर भक्त ॥ निजरथावरी रमावरें ॥२०३॥
शकुनि सुयोधन ॥ निजरथीं ॥ बैसोनि चालिले सभेप्रती ॥ सहस्त्र वीर सवें निघती ॥ श्रीरंगाचे तेधवां ॥२०४॥
सौबल आणि तो सात्यकी वीर ॥ कृष्णरथीं बैसले प्रीतिपात्र ॥ सभे येतां जलदगात्र ॥ उभे ठाकती सर्वही ॥२०५॥
श्रेष्ठासनीं बैसवून ॥ धृतराष्ट्रें पूजिला जगन्मोहन ॥ यावरी जें जाहलें वर्तमान ॥ तें पुढिले अध्यायीं परिसिजे ॥२०६॥
पांडवप्रताप ग्रंथ सुंदर ॥ सकळ साहित्याचें भांडार ॥ ब्रह्मानंदें सांगे श्रीधर ॥ पंडित चतुर परिसोत कां ॥२०७॥
हा असे वरद ग्रंथ ॥ जें कर्णीं सांगे पंढरीनाथ ॥ तेंचि लिहिलेंसे यथार्थ ॥ श्रीधर वदे श्रोतयां ॥२०८॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ उद्योगपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ अडतिसाव्यांत कथियेला ॥२०९॥
इति श्री श्रीधरकृतपांडप्रतापे उद्योगपर्वणि अष्टत्रिंशत्तमाध्यायः ॥३८॥ ॥ श्रीकृष्णार्पनमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2012
TOP