मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ३७ वा

पांडवप्रताप - अध्याय ३७ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ प्रज्ञाचक्षु राजेश्वर ॥ विदुर त्यासी सांगे नीतिविचार ॥ ऐकतां साधक ज्ञानी समग्र ॥ सुख अपार पावती ॥१॥
विदुर म्हणे कुरुनृपती ॥ शास्त्रज्ञ त्यासी चतुर म्हणती ॥ जो सावधान ॥ प्रंपचपर मार्थीं ॥ न सोडी नीति श्रेष्ठांची ॥२॥
इंद्रियां सहित मन ॥ जिंकूनि केलें आपणाधीन ॥ दुरुत्तरीं गांजितां दुर्जन ॥ अंतःकरण दुखवेना ॥३॥
प्रारब्धभोगें ऐश्वर्य भोगीत ॥ परी सर्व भोगीं अति विरक्त ॥ क्षमेचा केवळ मलय पर्वत ॥ शांत दान्त सर्वदाही ॥४॥
दयेचा तो भांडार केवळ ॥ निर्भय निःशंक निर्मळ ॥ ज्याचें दातृत्व देखोनि विकल ॥ अमरतरु होय पैं ॥५॥
या चिन्हें जो मंडित ॥ तोचि म्हणावा राया पंडित ॥ सर्व जाणोनि नेणीव घेत ॥ देखे भगवंत सर्व भूतीं ॥६॥
परिस राया सावधान ॥ मृत्यु लोका जो आला स्वर्गाहून ॥ कर्म भूमीस पावला जनन ॥ ऐक लोक्षणें तयाचीं ॥७॥
सात्विक ज्ञानीं अत्यंत निर्भर ॥ सुधार साहूनि वाचा मधुर ॥ जो वैष्णवी दीक्षा मनोहर ॥ कायावाचामनें धरी ॥८॥
आवडती पंचप्रणाहून ॥ जीवें भावें ज्यासी ब्राह्मण ॥ माता पिता गुरु देव जाण ॥ यांचें भजन करी सदा ॥९॥
पारधियें वनीं धरिलें पाडस ॥ तें जननी चिंती रात्रं दिवस ॥ तैसें जयाचें मानस ॥ गुरुमाउलीस आठवी ॥१०॥
तृषा लागली महावनीं ॥ उष्णकाळीं धुंडी पाणी ॥ तैसी आवडी संत भजनीं ॥ दिवस रजनीं जयाची ॥११॥
एक नरकींहूनि आला संसारा ॥ त्याचीं चिन्हें ऐक राजेश्वरा ॥ परम कृपण कद्रूच खरा ॥ कवडी वेंचितां प्राण देत ॥१२॥
देवद्विज गुरुनिंदा ॥ जो दुष्टात्मा करी सदा ॥ सांडूइ वेदमर्यादा ॥ वर्ते भलतेंचि दुष्ट तो ॥१३॥
सदाकाळ त्याचें मन ॥ जेथें तेथें इच्छीत धन ॥ आपुला धर्म दानानुष्ठान ॥ सांगे सत्कारून सर्वदा ॥१४॥
घातलें विद्येचें दुकान ॥ वरिवरी दाखवी आचार ॥ पूर्ण ॥ धनवंत द्दष्टीं देखोन ॥ भाटचि होय तयाचा ॥१५॥
जैसा वर्मीं रुपे बाण ॥ तैसा सहज बोले तीक्ष्ण ॥ हिंसा करावया मन ॥ अति उल्हास पावत ॥१६॥
आपुली स्तुति करितां कोणी ॥ मग बोले आनंदें करूनी ॥ कोणी निंदितां तेचि क्षणीं ॥ जाय सुकोनि फुला ऐसा ॥१७॥
सज्जनांची निंदा ऐके ॥ प्रत्युत्तर देत परम सुखें ॥ यासी साधु म्हणती मूर्खें ॥ आम्ही न म्हणों कदाही ॥१८॥
वरिवरी सुंदर वृंदावन ॥ जों जों पिके तों तों कडू पूर्ण ॥ जैसा वृद्ध वयें करून ॥ कुबुद्धि जाण ॥ विशेष ॥१९॥
गुरुचें नाम सांगतां ॥ लाज वाटे ज्याचिया चित्ता ॥ लाजे भगवंताचें नाम घेतां ॥ तरी अन्यवीर्यें उपजला तो ॥२०॥
गुरुलोपकाचें देखतां वदन ॥ तत्काल करावें सचैल स्त्रान ॥ अनामिकाहूनि विशेष जाण ॥ विटाळ त्याचा मानावा ॥२१॥
कीं गंगेंत स्नान करूनियां ॥ जाय मळमूत्र शोधा वया ॥ तैसा आचार दाखवूनियां ॥ असत्य कर्मीं रत होय ॥२२॥
पाकशाळेंत रिघे श्वान ॥ सर्व पात्रांत घाली वदन ॥ तैसी त्याची बुद्धि संपूर्ण ॥ स्पर्शावया धांवतसे ॥२३॥
तीर्थें क्षेत्रें देव संत ॥ म्हणे सर्वही असंमत ॥ यांसी भजोनियां व्यर्थ ॥ धन कां हो नासावें ॥२४॥
मातला जैसा बस्त ॥ तो भलत्यासी थडक देत ॥ तैसा वादविवादीं उदित ॥ धुधुः कारे सर्प जैसा ॥२५॥
वादीं जरी केला निरुत्तर ॥ तरी म्ग कोपें अनिवार ॥ वर्में बोलूनि अपवित्र ॥ करी छळण तयाचें ॥२६॥
शंख करावयाची हौस फार ॥ त्यांत पातला फाल्गुन सत्वर ॥ आधींच अपवित्र जार ॥ तो स्त्रीराज्यीं प्रवेशला ॥२७॥
आधींच मद्यपी उन्मत्त ॥ त्याहीवरी शिंदीवन देखत ॥ कीं तस्करासी नृपनाथ ॥ अभय देत चोरावया ॥२८॥
मर्कटासी मद्य पाजिलें ॥ त्याहीवरी वृश्चिकें दंशिलें ॥ त्यांतही भूत संचरलें ॥ मग अन्याथा जेवीं तें वर्तें ॥२९॥
तैसा अकर्मी आधींच बहुत ॥ त्यावरी भ्रष्ट शास्त्रें विलोकीत ॥ नाना मतें नसते ग्रंथ ॥ मग तें दावीत वचन लोकां ॥३०॥
नसतें जोडी व्यसन ॥ न मिळे तरी वेंची प्राण ॥ स्त्री आणि धन ॥ करी उपासन दोहींची ॥३१॥
चाले उताणा चवडयावरी ॥ भावी भाग्य आपुल्या घरीं ॥ वाचस्पति न पावे सरी ॥ बोल केपणा ज्याचिया ॥३२॥
दुसर्‍याची सद्विद्या देखोनी ॥ अंतरीं मानी परम हानी ॥ कोकिळेचा स्वर ऐकोनी ॥ काक जैसा संतापे ॥३३॥
दीपापोटीं निपजावे रत्न ॥ तेथें काजळ जाहलें कुलक्षण ॥ तैसा पवित्र कुळीं उपजोन ॥ डाग लाविला वंशातें ॥३४॥
उभा केला पाषाण ॥ तो कदा न लवेचि जाण ॥ तैसा देखतां देव ब्राह्मण ॥ कदा नमन करीना ॥३५॥
कुंभीपाकाहूनि अधिक ॥ जन्मकाळींचें महादुःख ॥ मरण काळीं निःशंक ॥ सहस्त्र वृश्चिक वेदना ॥३६॥
ऐसीं दुःखें विशेष देख ॥ आठवीना तो महामूर्ख ॥ त्यासी वाटे बहुतेक ॥ चिरंजीव मी आहें ॥३७॥
सुषुप्तींत बुडे जो नर ॥ तो नेणे नागाविती तस्कर ॥ तैसा देह क्षण भंगुर ॥ नेणती पामर दोघेही ॥३८॥
जैसा न लागतां एक क्षण ॥ चपला पळे रूप दावून ॥ तैसेंचि तें तारुण्य ॥ मावळोनि जाय पैं ॥३९॥
गंगेचा ओहटतां पूर ॥ मागें दरडी उरे अपार ॥ तैसें वृद्धत्व साचार ॥ जवळी आलें न कळे त्या ॥४०॥
मर्कट नाचवी बाजेगार ॥ तैसे स्त्रीपुढें दावी विकार ॥ माता पिता वंचूनि समग्र ॥ द्रव्य वेंची स्त्रियेसी ॥४१॥
ऐकें राया सावधान ॥ त्या अपवित्राचें कुलक्षण ॥ हें ॥ सज्जनीं करूनि श्रवण ॥ असत्य गुण त्यागावे ॥४२॥
देवधर्मांचा द्नव्यार्थ ॥ सदा वेंची तो अनृत ॥ सद्नुरूसी सदा चाळवीत ॥ मिथ्या बोल बोलूनी ॥४३॥
अल्पही नसे वेदाचें ज्ञान ॥ परी उताणा चाले गर्वेंकरून ॥ मी आहें अत्यंत प्रवीण ॥ आपुलें ठायीं भावी तो ॥४४॥
गारुडियासी विद्या किंचित ॥ परी सर्वांगीं ब्रीदें बहुत ॥ विष थोडें परी ऊर्ध्व वाह्त ॥ वृश्चिककंटक जैसा कां ॥४५॥
आपण विधिविधान नेणे ॥ भल्यासी न पुसे अभिमानें ॥ मनासी आलें ऐसेंचि करणें ॥ याग तप जप जें कां ॥४६॥
कोरफड जों जों वाढत ॥ तों तों कडवटपण चढत ॥ तैसा जों जों जाणता होत ॥ करी उन्मत्त क्रिया पैं ॥४७॥
साधूचें पाहे दोष गुण ॥ जरी तो निर्दोष असला पूर्ण ॥ तरी त्यावरी असदारोपण ॥ बळेंचि करी दुष्टात्मा ॥४८॥
ऐकोनियां हरिकीर्तन ॥ बोटें घालूनि बुजवी कान ॥ म्हणे याचें न पाहावें वदन ॥ ऐसा दुर्जन अपवित्र तो ॥४९॥
ब्रह्मचारी यतीश्वर ॥ तापसी विरक्त उदास थोर ॥ यांसी देखोनि म्हणे साचार ॥ हे दंडिले पूर्वदोषें ॥५०॥
सोडूनि पुत्र दारा धन ॥ उगेचि हिंडती रानोरान ॥ भरलिया ठायावरून ॥ यांसी उठविलें ईश्वरें ॥५१॥
दानवपुरोहितें निर्मिलीं शास्त्रें ॥ जीं अभिचारिकें अति अपवित्रें ॥ तेथींचीं वचनें सर्वत्रें ॥ दावी लोकांसी काढून ॥५२॥
भोंवते मिळवूनि अज्ञानी जन ॥ त्यांसी दाखवी योग्यपण ॥ आपुल्या सौदर्यसी मदन ॥ उणा भावी निर्धारें ॥५३॥
कीं विबुधाचार्याहून ॥ दावी व्युत्पत्तीचें थोरपण ॥ आपुल्या पुरुषार्थाशीं सहस्त्रनयन ॥ उणा म्हणोन बोलत ॥५४॥
श्वान जैसें पिसाळलें ॥ किंवा डुकर वनीं माजलें ॥ किंवा हत्तेरूं आंधळें ॥ सव्यापसव्या धांवत ॥५५॥
बिडालकाचे गेले नयन ॥ परी पूषकाची सांचळ ऐकोन ॥ तळमळी धरावया मन ॥ वैराग्य पूर्ण तेवीं त्याचें ॥५६॥
जैसें अंधारीं दिवाभीत ॥ डोळसपणें मिरवत ॥ कीं स्फटिकाचें माणिक सत्य ॥ रंग देऊनि पैं केलें ॥५७॥
तैसें त्याचें थोरपण ॥ द्दष्टीस नाणी त्रिभुवन ॥ विलोकिताम कमलासन ॥ कुलालपण त्यास स्थापी ॥५८॥
ब्रह्मा निजकन्या अभिलाषी ॥ विष्णु भुलला वृंदेसी ॥ लिंगपतन शंकरासी ॥ त्यांसी देव न म्हणों आम्ही ॥५९॥
सहस्त्र भगांकित इंद्र ॥ गुरुदारागमनी चंद्र ॥ तमांतप अत्यंत तीव्र ॥ ऋषी समग्र क्रोधी बहु ॥६०॥
व्यासादिक महर्षी ॥ दूषण अत्यंत ठेवी त्यांसी ॥ एवं सर्वांसी उपहासी ॥ पापराशी चांडाळ ॥६१॥
त्रैलोक्यींचा मद मत्सर ॥ सर्वही करूनि एकत्र ॥ धृतराष्ट्रा तुझा पुत्र ॥ दुर्योंधन घडिलासे ॥६२॥
आपादमस्तक पर्यंत ॥ दुर्जनमय समस्त ॥ त्याची करणी जिकडे जात ॥ तिकडे अनर्थ धांवती ॥६३॥
जीवंतचि पांच जण ॥ मेले ते राया ऐक कोण ॥ दरिद्री व्याधीनें घेतला कवळून ॥ मूर्ख जाण अविवेकी ॥६४॥
प्रवासी नित्य सेवक जाण ॥ हे जीवंतचि पावले मरण ॥ यांहीपेक्षां तो दुर्जन ॥ अपवित्र जाणावा ॥६५॥
पडिला आहे काळ कोण ॥ मज मित्र तरी किती जण ॥ कोण देश काय वर्तमान ॥ नेणे तो मूर्ख जाणावा ॥६६॥
अपार असोनि गांठीं धन ॥ जो मूर्ख न करी धर्म दान ॥ त्याचिया गळां पाषाण बांधोन ॥ समुद्रांत बुडवावा ॥६७॥
दरिद्री न करी जपानुष्ठान ॥ अथवा न करी तीर्थाटन ॥ त्या चिया गळ्यांत पाषाण बांधोन ॥ समुद्रांत बुडवावा ॥६८॥
ज्याचें मन नसे धर्मास ॥ जो अतिमलिन अविश्वस्त ॥ त्याचा कोंडे श्वासोच्छवास ॥ अधर्मीं रत परम जो ॥६९॥
अपात्रीं करितां दान ॥ त्यासी दरिद्र न सोडी कदा जाण ॥ दरिद्रें करी पापाचरण ॥ नरक दारुण भोगी पुढें ॥७०॥
आणिकही उपजे दरिद्री होऊन ॥ मागुती करी पापाचरण ॥ राया सत्पात्रीं देतां दान ॥ ऐक होय कैसें तें ॥७१॥
सत्पात्रीं दान कृष्णार्पण ॥ जैसें वटबीज वर्धमान ॥ मग लक्ष्मी अचल येऊन ॥ राहे गृहीं त्या चिया ॥७२॥
पुण्य वाढे जों जों विशेष ॥ सहज यश पावे निर्दोष ॥ षड्वैरी अष्टपाश ॥ यांहूनि वेगळा तो जाहला ॥७३॥
थोर हेंचि जाण साधन ॥ परललना परधन ॥ येथें ज्याचें उदास मन ॥ तोचि धन्य शास्त्र म्हणे ॥७४॥
आपणाहूनि हीन पुरुष ॥ त्यासीं न बोलावें निःशेष ॥ संतांशीं मैत्री विशेष ॥ दिवसें दिवस वाढवावी ॥७५॥
विद्यावंत ज्ञानी पंडित ॥ ते संग्रहावे देऊनि धन अमित ॥ गृहच्छिद्र आयुष्य वित्त ॥ सहसा बाहेर न सांगावें ॥७६॥
मंत्र औषध मैथुन ॥ दान मान अपमान ॥ सुकृत आणि तीर्थाटन ॥ कादाकाळीं न बोलावें ॥७७॥
जाणीव न धरावी कदा ॥ कोणाचीही न करावी निंदा ॥ नुल्लंघावी वेदमर्यादा ॥ निष्ठुर वाक्य न बोलावें ॥७८॥
आपण न करावें पापाचरण ॥ दुसर्‍याचे दोष टाकावे आच्छादून ॥ हें सज्जनांचें लक्षण ॥ बहु भाषण कासया ॥७९॥
अपत्यहीन ॥ जे भगिनी ॥ ते माते ऐसी पाळावीं सदनीं ॥ माता पिता गुरु वृद्धपणीं ॥ बहुतचि सांभाळिजे ॥८०॥
गुह्य गोष्टी वर्मवाणी ॥ न घालावी स्त्रियेचे कर्णीं ॥ लेखन पठन शास्त्राध्ययनीं ॥ आळस कदा न कीजे ॥८१॥
सत्कर्म दाना घ्यायन ॥ येथें आळस न करावा एक क्षण ॥ स्त्रीभोग निद्रा बहु भोजन ॥ येथें उदास असावें ॥८२॥
गोरक्षक ग्रामकामकरी ॥ कृषिरक्षकासी निद्रा भारी ॥ असावधान भांडारी ॥ तरी अनर्थ होय तेथ ॥८३॥
भार्या दुष्ट शठ मित्र ॥ अज्ञान गुरु पुत्र निष्ठुर ॥ प्रधान कुबुद्धि राव अविचार ॥ व्यर्थ भूभार कासया ॥८४॥
सुह्रदाशीं निष्ठुर देख ॥ जानावा तो आत्मघातक ॥ श्वशुरगृहीं राहे तो शत मूर्ख ॥ आपुला पुरुषार्थ वर्णी मुखें ॥८५॥
विष भक्षूनि प्रचीत पहावया ॥ उरेल कोण सांग राया ॥ आत्महत्या केली शस्त्र खोंचोनियां ॥ त्याचें प्रायश्चित्त कोणीं घ्यावें ॥८६॥
वारितां सर्पावरी निजला ॥ तो जागा पुनः कोणीं देखिला ॥ ब्राह्मणद्वेषें परत्र गेला ॥ देखिला नाहीं कोठेंही ॥८७॥
मातृपितृद्वेषी जो सदा ॥ तो कधीं पावला भगवत्पदा ॥ मद्यपानी पाळी वेदमर्यादा ॥ कालत्रयीं न घडेचि ॥८८॥
मैत्री इच्छिजे जरी विपुल ॥ तरी वाग्वाद न करावा समूळ ॥ अर्थ संबंध करितां केवळ ॥ कलह होय मित्रत्वीं ॥८९॥
मित्र समीप नसतां जाण ॥ त्याचे स्त्रियेशीं एकांतीं भाषण ॥ हे त्यागितां तीन्ही गुण ॥ मित्रत्व चाले बहुकाळ ॥९०॥
भलते गोष्टीं आतुर ॥ दीर्घरोगी वादक थोर ॥ पाखंड पक्ष वाढवी अपार ॥ संग त्याचा न धरावा ॥९१॥
वेदपरायण शास्त्रीं ज्ञान ॥ बहुश्रुतेंचि समाधान ॥ धन ज्यासी तृणासमान ॥ संग त्याचा धरावा ॥९२॥
सुंदर सधन परनारी ॥ एकान्त पाहोनि प्रार्थना करी ॥ काम विकार न उठे अणुभरी ॥ तरी तो ईश्वर म्हणावा ॥९३॥
द्रव्याचा घट निर्जनीं ॥ अवचित देखिला नयनीं ॥ आस्था न धरी जाय ओसंडूनी ॥ तरी तो ईश्वर म्हणावा ॥९४॥
निंदक सोडिती वाग्बाण ॥ पुढें केलें क्षमा ओढण ॥ खेद कदा न उठे मनांतून ॥ तरी तो ईश्वर मानाव ॥९५॥
आपण आचरे सत्कर्मराहटी ॥ दुसर्‍याचे गुण दोष नाणी द्दष्टीं ॥ आत्मरूप पाहे सर्व सृष्टी ॥ तरी ईश्वर म्हणावा ॥९६॥
आपुलें महत्कार्य सोडून ॥ परोपकारीं घाली मन ॥ परपीडा नावडे चित्तांतून ॥ तरी तो ईश्वर म्हणावा ॥९७॥
गुरुद्वेष करी जो चांडाळ ॥ त्याची विद्या तत्काळ निष्फळ ॥ तो अपयश पावे कुटिल ॥ विजय न होय कोठेंही ॥९८॥
मातृद्वेष करी त्रिशुद्धी ॥ भार्या असती भरे व्याधी ॥ पितृद्वेषें कुबुद्धी ॥ पिशाच होऊनि हिंडे तो ॥९९॥
बंधुद्वेष करितां साचार ॥ होय धनाचा संहार ॥ भार्या पतिव्रता निर्धार ॥ अर्धांग जाय तिच्या द्वेषें ॥१००॥
सुमन सुवास घेत भ्रमर ॥ परी त्यासी धक्का न लावी अणुमात्र ॥ तैसा प्रजा पाळी जो नृपवर ॥ न्यायें धन घेऊ नियां ॥१०१॥
घ्यावें वृक्षाचें सुमन ॥ परी वृक्ष न उपडावा मुळींहून ॥ नख आगळें काढावें छेदून ॥ परी तें बोट रक्षावें ॥१०२॥
केश विहिता विहित जाणोन ॥ करावें प्रजेचें पालन ॥ गोत्रजांशीं विरोध जाण ॥ प्राणांतींही न करावा ॥१०४॥
जाणे सारासारनीती ॥ वृद्ध म्हणावें त्याज प्रती ॥ स्वर्ग तोचि सत्संगती ॥ सच्छास्त्र श्रवण सर्वदा ॥१०५॥
दुर्जनसंग तोचि नरक जाण ॥ प्रति पाळावें गुरु वचन ॥ करावें वृद्धांचे सेवन ॥ अकार्य पूर्ण त्यागावें ॥१०६॥
तत्त्ववेत्ता दयाळु उदास जाण ॥ तोचि गुरु आधीं जावें शरण ॥ गुरुवचनीं अवज्ञा पूर्ण ॥ विष दारुण मारक तें ॥१०७॥
दिवसा ऐसें वर्तावें पाहें ॥ जेणें रात्र सुखरूप जाये ॥ संसारीं ऐसें वर्तावें स्वयें ॥ जेणें इह परत्र सुखरूप ॥१०८॥
कार्य त्वरित हेंचि करणें ॥ जन्ममरणांचें मूळ छेदणें ॥ क्रियेसमवेत ज्ञान बोलणें ॥ मोक्षतरूचें बीज हेंचि ॥१०९॥
धर्म तोचि शुद्ध पंथ ॥ मन शुद्ध तो शुचिष्मंत ॥ विवेकी तोचि पंडित ॥ सर्व भूतीं समदर्शन ॥११०॥
पुत्रस्नेह जाण निश्चित ॥ मदिरा न घेतां भुलवीत ॥ तस्कर ते पंच विषय सत्य ॥ एके क्षणांत नागविती ॥१११॥
ज्याची तृष्णा निमाली ॥ तेणें समूळ उपडिली भववल्ली ॥ विषयीं सदा वृत्ति वेधली ॥ अंतर्बाह्य अंध तो ॥११२॥
सुटती ललनांचे नयनशर ॥ व्यथित न होय तो मुख्य शूर ॥ प्राणिमात्र सर्व मित्र ॥ तोचि थोर शास्त्र म्हणे ॥११३॥
स्त्रीचरित्रें खंडिला नच जाय ॥ तोचि चतुर हा निश्चय ॥ सदा हळहळ ज्यासी होय ॥ दरिद्री पाहें तोचि एक ॥११४॥
तृणापरीस नीचपण ॥ परयाञ्चा जया लागून ॥ विचार रहित न करी कारण ॥ जागा जाण तोचि सदा ॥११५॥
ऐसा नीतीचा मेघडंबर ॥ वर्षला महाराज विदुर ॥ आनंदोनि धुतराष्ट्र ॥ बोलता जाहला तेधवां ॥११६॥
म्हणे विदुरा पूर्ण ज्ञान ॥ तें मज सांग करीन श्रवण ॥ यावरी तो सज्ञान ॥ बोलिला काय तें ऐका ॥११७॥
म्हणे येथें सनत्सुजात ॥ येईल आतां ब्रह्म सुत ॥ तो ज्ञान उपदेशील अद्भुत ॥ श्रवण करीं राया तें ॥११८॥
धृतराष्ट्र म्हणे तूं सांग सत्वर ॥ येरू म्हणे मज नाहीं अधिकार ॥ सर्व वर्णांसी गुरु विप्र ॥ ज्ञान अन्यां सांगती ॥११९॥
वर्णानां बाह्मणो गुरुः’ ॥ हा मुख्य शास्त्र विचारु ॥ येथें आग्रह करिती जे साचारु ॥ पाखंडी ते शतमूर्ख ॥१२०॥
आचारहीन मलिन जरी ॥ परी गायत्री मंत्राचा अधिकारी ॥ मुखा पासूनि जन्मले निर्धारीं ॥ आदिपुरुषाचे विप्र हे ॥१२१॥
ब्राह्मणांचें उत्तमाचरण ॥ गायत्री मंत्र वेदाध्ययन ॥ तें जरी करिती इतर वर्ण ॥ तरी दारूण नरक भोगिती ॥१२२॥
खरचर्मीं भरलें गोक्षीर ॥ तें प्राशन ॥ न करिती जैसें पवित्र ॥ तैसें इतरां मुखींचें वेदशास्त्र ॥ श्रवण सहसा न करावें ॥१२३॥
ऐसें बोलतां विदुर ॥ तों निशा जाहली दोन प्रहर ॥ यावरी श्री कृष्ण कृपापात्र ॥ सनत्सुजात चिंतीत ॥१२४॥
सूर्य उतरे आका शाहूनी ॥ तेवीं सनत्सुजात उभा ठाकला येऊनी ॥ विदुर धृतराष्ट्र उठोनी ॥ पाय वंदिती सप्रेम ॥१२५॥
षोडशोपचारें पूजून ॥ तोषविलें सनत्सु जाताचें मन ॥ यावरी करिता जाहला प्रश्न ॥ सावधान ऐका तें ॥१२६॥
म्हणे महाराज तूं ईश्वर ॥ तरी बोलें सच्छास्त्र ॥ आणि मृत्यु हा परम घोर ॥ याचें स्वरूप कैसें असे ॥१२७॥
मृत्यूचें भय कोणास नाहीं ॥ तें सुजाणा आतां सांग सर्वही ॥ यावरी सनत्सु जात ते समयीं ॥ अगाध ज्ञान वर्षला ॥१२८॥
प्रमाद जो कां अनर्थ ॥ भ्रमें करूनि भुलोन जात ॥ तेथेंचि जाण असे मृत्य ॥ पूर्ण गुह्यार्थ राजेंद्रा ॥१२९॥
मृत्यु रहित स्वर्गीं शूर ॥ अप्रमाद करिती साचार ॥ म्हणोनि जाहले जिर्जर ॥ सत्कर्म धर्म आचरोनी ॥१३०॥
यांसही आंगीं चढतां भ्रम ॥ पावती कल्पांतीं विराम ॥ सदा सावधान निःसीम ॥ जन्म मरणातीत ॥ ते ॥१३१॥
जैसें एकचि उदक ॥ विषांत जाऊनि होय मारक ॥ अमृता माजी तारक ॥ तेंचि सहज जाहलें पैं ॥१३२॥
ज्या ज्या रंगांत नीर जाय ॥ तदनुसार स्वरूप होय ॥ तैसी वस्तु सर्वांत समाय ॥ परी अनन्य होय कर्तृत्वें ॥१३३॥
दैत्य मद्य प्राशक समस्त ॥ भ्रमें करूनि पावती मृत्य ॥ भ्रम रहित तेंचि अमृत ॥ घेऊनि देव तृप्त सर्वदा ॥१३४॥
अंतर्बाह्य जो भ्रमला ॥ तो मृत्यूनें सर्वदा गिळिला ॥ ब्रह्मांडगोळ सगळा ॥ भ्रमें भरला ओत प्रोत ॥१३५॥
जन वन सर्व आप्त ॥ भ्रमरूपचि सर्व दिसत ॥ म्हणे ईश्वर कैंचा येथ ॥ भ्रमभूत सर्वही ॥१३६॥
पिंड ब्रह्मांड भ्रमभूत ॥ वेदशास्त्र भ्रमरूप भासत ॥ त्यासी मृत्यूनें ग्रासिलें यथार्थ ॥ न सुटे सत्य कल्पांतीं ॥१३७॥
गेला विषय ध्यानें भुलुनियां ॥ सत्य मानी गृह सुत जाया ॥ कैंचा ईश्वर मिथ्या माया ॥ भजोनियां व्यर्थचि ॥१३८॥
ऐसे सर्वदा जे भ्रमरूप ॥ ते फेरे घेती कोटिकल्प ॥ अंधतम नरक पापरूप ॥ भोगिती गणित नव्हे तें ॥१३९॥
किती वेळां तरी मरावें ॥ अहा कितीदां उपजावें ॥ चौर्‍यायशों लक्ष योनी फिरावें ॥ किती भोगावें दुःख तें ॥१४०॥
ऐसे जे गा नृपनाथा ॥ त्यांसी मृत्यूनें गांगिलें पाहतां ॥ आतां मृत्यू वेगळे तत्त्वतां ॥ त्यांची कथा ऐक पां ॥१४१॥
भक्तिज्ञान वैराग्यबळें ॥ सत्समागमें सदा बोधले ॥ सच्छास्त्रें श्रवण भेदले ॥ जिंहीं जिंकिले षड्वैरी ॥१४२॥
जे गुरुकृपाजीवनींचे मीन ॥ तळपती स्वानंद सुखें करून ॥ जन्म मरणांचें बीज भाजून ॥ सनातन अक्षय ते ॥१४३॥
जे जीवतत्त्व मारूनि जाहले ॥ ते मृत्यूसही वाटूनि प्याले ॥ जन्ममरणांची मुळें ॥ जाळिलीं त्यांहीं समस्त ॥१४४॥
जे मृत्युरहित अक्षय पूर्ण ॥ ऐक तयांचें सांगतों चिन्ह ॥ जीं चिन्हें ऐकतां जन्ममरण ॥ रहित होती साधक ॥१४५॥
आपुलें सुकृत जो पाहीं ॥ स्वमुखें न बोले कालत्रयीं ॥ आपुले विद्येची नवाई ॥ लोकां माजी दावीना ॥१४६॥
न करी दांभिक भजन ॥ न बोले कोणाचें निंदा स्तवन ॥ चराचर जीव संपूर्ण ॥ आत्मरूप पाहे पैं ॥१४७॥
जेणें ह्रदय होय शीतळ ॥ तैसा शब्द बोले कोमळ ॥ अर्हिंसा दया निर्मळ ॥ ह्रदय कोशीं विराज्ती ॥१४८॥
कोणी लोक स्तवन करितां ॥ म्हणे मज गर्व चढेल आतां ॥ यालागीं गजबज चित्ता ॥ वाटे तयाचे ते काळीं ॥१४९॥
अंतर्बाह्य मिर्मळ ॥ जैसें केवळ गंगा जळ ॥ चंद्राहूनि शीतळ ॥ मानस तयाचें जाणावें ॥१५०॥
गगनाहूनि मृदु पूर्ण ॥ त्या पुरुषाचें अंतःकरण ॥ निजबोधें संपूर्ण ॥ बुद्धि त्याची बोधली ॥१५१॥
स्नेहद्दष्टी करूनि सबळ ॥ कूर्मिणी पाहे जैसें बाळ ॥ तैसें हे विश्व सकळ ॥ विलोकीत कृपेनें ॥१५२॥
सकर्दम सरोवर देखोन ॥ मराळ जाय ओसंडून ॥ तैसीं असत्कर्में सोडून ॥ उत्तम पंथें जाय तो ॥१५३॥
दग्धवनीं शुष्ककांतारीं ॥ कोकिळा न बैसे क्षणभरी ॥ तैसे हे जीव दुराचारी ॥ संगति न धरीं तयांची ॥१५४॥
विश्व हें आहे किंवा नाहीं ॥ हें स्मरणचि नसे पाहीं ॥ आणणाशीं तो विदेही ॥ खेळ खेळे एकत्वें ॥१५५॥
जैसे चंदनाचे संगतीं ॥ इतर वृक्ष सुवासिक होती ॥ तैसी त्याची पाहतां रीती ॥ बहुत तरती मुमुक्षू ॥१५६॥
अनुभवकमळीं मकरंद ॥ सेवणार होती मुक्तमिलिंद ॥ कीं तो आनंदवनींचा प्रसिद्ध ॥ मृगेंद्रचि वसतसे ॥१५७॥
तो वैराग्यकैलासींचा शिव ॥ स्वानंदवैकुंठींचा माधव ॥ तो सत्यपदींचा कमलोद्भव ॥ अवतरला स्वलीलें ॥१५८॥
कीं सद्विवेक अमरपुर ॥ तेथींचा राहणार सहस्त्रनेत्र ॥ कीं दयाऽऽकाशींचा सहस्त्रकर ॥ प्रकाशक सर्वांसी ॥१५९॥
द्दश्य समद्राचें आचमन ॥ करितां तो अगस्त्य संपूर्ण ॥ कीं सारासार विचार प्रवीण ॥ सत्यवती कुमार तो ॥१६०॥
किती वर्णावे त्याचे गुण ॥ वर्णितां भागला सहस्त्रवदन ॥ विश्वात्मा तो जगज्जीवन ॥ त्याचा प्राण झाला तो ॥१६१॥
तो मुखीं घालितां ग्रास ॥ तेणें तृप्त होय यज्ञपुरुष ॥ त्याचे उदकपानें सावकाश ॥ रसनायक आनंदे ॥१६२॥
तो हिंडे निर्विकल्प स्थितीं ॥ तेणें पावन जाहल्यें म्हणे क्षिती ॥ त्याच्या पाहण्या माजी दिनपती ॥ सुख प्राप्ती भावीत ॥१६३॥
त्याचे निद्रेंत उन्मनी ॥ विश्रांति घेत येऊनी ॥ समाधि विलसे चरणीं ॥ कर जोडूनि सर्वदा ॥१६४॥
चंद्र उगवतां सोमकांत ॥ पाझरोनि सरोवरें भरीत ॥ तैसा अनुभवीं तो विरत ॥ विश्वा सहित आपण ॥१६५॥
तो भोगी जरी भोग ॥ परी तो विदेही निःसंग ॥ जैसा सतीचे चित्तीं विराग ॥ देहभेद नाठवे ॥१६६॥
सतीचा होत बहु सोहळा ॥ परी ती कांहीं न देखे डोळां ॥ तैसा तेणें भोग भोगिला ॥ न कळे कांहीं त्याला तें ॥१६७॥
चित्रीं पाणी आणि अग्न ॥ दोन्ही दाविलीं रेखून ॥ तरी चित्रपट न भिजे न जळे पूर्ण ॥ मुक्तही जाण तैसा तो ॥१६८॥
कर्ता कार्य कारण ॥ तिघांशीं स्वरूपीं जाहला लीन ॥ विधिनिषेध गिळून ॥ तृप्त जाहला सर्वदा ॥१६९॥
वेडियासी न कळे जाण ॥ मी झांकलों कीं आहें नग्न ॥ तैसा तो प्राप्त ज्ञान ॥ विधि निषेध नेणेचि ॥१७०॥
न्याय कीं अन्याय होत ॥ झें बाळ कासी न कळे किंचित ॥ तैसा तो वृत्तिरहित ॥ स्मरण कांहीं नसेचि ॥१७१॥
चांदणें आणि अंधार ॥ सूर्योदयीं दोहींचा विसर ॥ तैशा प्रवृत्ति निवृत्ति समग्र ॥ नुरतीच स्वरूपोदयीं ॥१७२॥
निर्विकल्पस माधींत मग्न ॥ चहूं देहांचें नाहीं स्मरण ॥ त्याचें कर्म राहिलें पूर्ण ॥ म्हणेल कोण तयासी ॥१७३॥
राहिले प्रवृत्तीचे भाव ॥ ओलांडिली निवृत्तीची सींव ॥ ब्रह्मसाम्राज्य राणीव ॥ प्राप्त जाहली तयातें ॥१७४॥
हार किंवा विखार ॥ जन अनुमानिती समग्र ॥ परी निद्रित जो साचार ॥ दोन्ही त्यासी नेणवती ॥१७५॥
स्थाणू किंवा चोर भासत ॥ शुक्ति किंवा हें रजत ॥ मृगजल कीं जल सत्य ॥ हें कांहींच नेणे तो ॥१७६॥
तैसें साकार कीं निराकार ॥ भ्यासुर किंवा मनोहर ॥ निःशब्द किंवा गजर ॥ नेणे कांहीं मुक्त तो ॥१७७॥
जैशा कल्पांतीं नीरीं ॥ लपाल्या आड गंगा विहिरी ॥ वणवा पेटतां कांतारीं ॥ भास मावळे वनस्पतींचा ॥१७८॥
यात्रा सरल्या सहज ॥ निवान्त राहे गजबज ॥ तैसा तो पावतां स्वरूपतेज ॥ द्दश्य जाळ मावळे ॥१७९॥
तो निर्विषय सर्वकाळ ॥ पंव विषय जड केवळ ॥ शब्द विषय प्रसवे निराळ ॥ मुक्त वेगळा दोहींतें ॥१८०॥
स्पर्शासी प्रसर्व पवन ॥ योगी तयासीं जाहला भिन्न ॥ रूप आणि तेज गाळून ॥ निरंजन जाहला तो ॥१८१॥
जीवन आणि रस ॥ दोहींवेगळा तो निर्दोष ॥ पृथ्वी आणि गंध विषयांस ॥ नातळेचि सोंवळा तो ॥१८२॥
भिंतीवरील चित्रें ॥ चिखलें बुजवितां गेलीं समग्रें ॥ भेदाभेद एकसरें ॥ आत्मतत्त्वीं विराले ॥१८३॥
मठ मोडिले घट फोडिले ॥ आकाश न फुटे सगळें ॥ तैसें द्दश्यत्व हारपलें ॥ आहे संचलें स्वरूप ॥१८४॥
कीं अलंकारांच्या आकृती ॥ मुसेंत विरती एकवृत्तीं ॥ तैसें जग हारपोनि निश्चितीं ॥ जगदीश्वर उरलासे ॥१८५॥
ना तरी जो जागा जाहला ॥ त्यासी स्वन्पाभास हारपला ॥ परी आपणचि उरला ॥ अखंडित अद्वय ॥१८६॥
तो निरपेक्ष विचरत ॥ स्वर्गदि सुखें समस्त ॥ तृणाहूनि नीच मानीत ॥ आशारहित मानसीं ॥१८७॥
विषय त्यागूनि गेला सवेग ॥ देवांसी मोक्ष मागे मग ॥ तरी तो निरपेक्ष नव्हे सांग ॥ मोक्षकाम धरिला तेणें ॥१८८॥
तैसा नव्हे तो ज्ञानी ॥ मोक्षासही न धरी मनीं ॥ मोक्षचि येऊनि चरणीं ॥ लागे तयाच्या निर्धारें ॥१८९॥
जो जन्म मृत्यूंची कथा विसरे ॥ शुभाशुभ मावळलें एकसरें ॥ जेवीं दीप आणि अंधारें ॥ सूर्योदयीं मावळती ॥१९०॥
विश्वस्थित नानाकार ॥ हे अवघेचि त्याचे अवतार ॥ आपुलें स्वरूपें पाहूनि समग्र ॥ आपणचि डोलतसे ॥१९१॥
जीव भुलोनि गेले अपार ॥ त्यांसी सोडवावया ईश्वर ॥ परम दयाळु करुणाकर ॥ त्याचि रूपें अवतरला ॥१९२॥
उदयास्तीं तीव्रता टाकून ॥ सोज्ज्वळ जैसा सूर्य नारायण ॥ तैसा तो स्वप्रकाश पूर्ण ॥ ब्रह्मानंद एकचि ॥१९३॥
जगा चिया नयनद्वारें ॥ आपुलीं स्वरूपें पाहे साचारें ॥ दुजेपणाचें वारें ॥ अणुमात्र स्पर्शेना ॥१९४॥
निष्कलंक क्षयरहित ॥ शीतलत्व टाकूनि समस्त ॥ उदयास्त नाहीं तेथ ॥ आल्हाद कारक चंद्र तो ॥१९५॥
तो होऊनि सकळांचें मन ॥ साक्षी वेगळा चैतन्य घन ॥ कीं तो होऊनि सहस्त्रनयन ॥ हस्तक्रिया सकळ करवी ॥१९६॥
कीं तो स्वयें होऊन विधी ॥ चाळी सकल जनांच्या बुद्धी ॥ तो सकल साकारांचे आदी ॥ निरवधी निर्द्वद्व ॥१९७॥
तो विष्णुरूपें करून ॥ होय सकळांचें अंतःकरण ॥ असो विश्व संपूर्ण ॥ तोचि जाहला निजांगें ॥१९८॥
तेणें धुतलें अवघें गगन ॥ तेणें मोडिले वायूचे चरण ॥ तेणें तेजही जाळून ॥ दाहकत्व दूर केलें ॥१९९॥
तेणें आर्द्रत्व हिरोन ॥ ओपवूनि शुद्ध केलें जीवन ॥ अवनीचें कठिणपण ॥ हिरोनियां घेतलें ॥२००॥
तेणें मनासी केला मार ॥ तोडिलें वासनेचें मंदिर ॥ भूतदयेचें अंबर ॥ नेसोनियां मिरवत ॥२०१॥
बोधवनांत त्रिशुद्धी ॥ तेणें मोकळी सोडिली बुद्धी ॥ चैतन्य सागरीं आधीं ॥ चित्त तेणें बुडविलें ॥२०२॥
स्वरूपांबरीं वृत्ती ॥ आनंद मय त्याच्या क्रीडती ॥ कीं तो ब्रह्मारण्यींचा भद्रजाती ॥ निरंकुश क्रीडत ॥२०३॥
तो आप आपणाशीं बोलत ॥ आत्मस्थितीं पाऊल टाकीत ॥ आहेत तितुकीं कर्में करीत ॥ निराकार सर्वदा तो ॥२०४॥
कीं वैरागरींचा मणि निर्मळ ॥ माणिक करी भेटतां हरळ ॥ तैसे त्याचे द्दष्टीनें सकळ ॥ जीव पावती निजपदा ॥२०५॥
तो आपण तरूनि साचार ॥ बहुतांचा करी उद्धार ॥ तो न दंडी स्वशरीर ॥ व्रतोपवासें करू नियां ॥२०६॥
तो श्रृंगारिक न बोले कधीं ॥ तो भवद्भक्ति प्रतिपादी ॥ तो निजबोधें उद्वोधी ॥ साधकां आणि मुकुक्षां ॥२०७॥
लोकीं स्तुति करितां न फुगे ॥ निंदा करितां न विरागे ॥ तो आनंद सदनीं वागे ॥ द्वैत मागें घालूनी ॥२०८॥
तो वाग्वाद सोडूनि सकळ ॥ बोलणें बोले रसाळ ॥ जेणें सर्वांचें ह्रदय शीतळ ॥ होऊ नियां आनंदे ॥२०९॥
तो ज्ञान मद न धरी अंगीं ॥ तो अहंपण न मिरवी जगीं ॥ तो यथाविधि भोग ॥ हठयोगी नव्हेचि तो ॥२१०॥
तो आम्ही तरलों म्हणोनी ॥ सहसा न बोलेचि जनीं ॥ शिष्य करावे हें मनीं ॥ नावडेचि सर्वथा ॥२११॥
तेणें लौकिकाची सोडिली लाज ॥ तणें जन्ममरणाचें भाजलें बीज ॥ तेणें द्दश्य सांडोनि शेज ॥ निरालंबीं पैं केली ॥२१२॥
साखर पेरिलिया जाण ॥ इक्षुदंड नव्हेचि उत्पन्न ॥ कर्पूर होतां दहन ॥ रक्षा मग नुरेचि ॥२१३॥
त्याचें सकळ कार्य सिद्धीस गेलें ॥ नामरूपांचें ठाण पुशिलें ॥ करणें न करणें उरलें ॥ कांहींच नाहीं तयासी ॥२१४॥
तो ब्रह्मचारी हो गृहस्थ ॥ भिक्षुक अथवा वान प्रस्थ ॥ शरीरप्राक्तनें हो नृपनाथ ॥ अथवा विरक्त नग्न हिंडो ॥२१५॥
तो संसारीं दिसे गुंतला ॥ जैसा सूर्य थिल्लरीं बिंबला ॥ तैसा अलिप्त तो सकळा ॥ क्रिया करूनि सर्वदाही ॥२१६॥
गळोनि गेली सर्व ममता ॥ अंगीं विराजे शांति समता ॥ देहीं असतां विदेहता ॥ न मोडेचि सहसाही ॥२१७॥
सारूनियां त्रिविध भेद ॥ त्रिगुणातीत जो जाहला शुद्ध ॥ त्र्यवस्थातीत निजबोध ॥ रूप जाहला निश्चयें ॥२१८॥
त्रिताप समूळ जाळून ॥ त्रिपुटया सकल गाळून ॥ देहत्रय संहारून ॥ निरंकुश विराजे तो ॥२१९॥
तो देहत्रयाचा नियंता ॥ तो भुवनत्रयाचा प्रतिपाळिता ॥ दोषत्रय तत्त्वतां ॥ द्दष्टीनें त्याच्या वितळती ॥२२०॥
तो भवरोगवैद्य साचार ॥ जीवांच्या डोळ्यांचें पडळ काढणार ॥ कीं तो ज्योतिषी मुहूर्त देणार ॥ अक्षय्य पद पावावया ॥२२१॥
त्याचेनि सकळ तीर्थें पावन ॥ त्याचेनि व्रतें धन्य धन्य ॥ तो सोंवळाचि निर्वाण ॥ द्दश्य़ ओंवळें आतळेना ॥२२२॥
तेणें दुर्वासनेचें वसन फेडिलें ॥ तेणें त्रिगुणांचें जानवें तोडिलें ॥ मन दंडूनि निजबळें ॥ तोचि दंड घेतला ॥२२३॥
द्ददय कमंडलूंतूनि पूर्ण ॥ न पाझरेचि ज्ञान जीवन ॥ आनंद करपात्रीं भोजन ॥ अतींद्रियपण तयाचें ॥२२४॥
सहजीं सहज निश्चित ॥ प्रणवजप तयाचा होत ॥ तो जाहला क्षराक्षरातीत ॥ प्रणवाचाही निजसाक्षी ॥२२५॥
ऐसा न करितां सायास ॥ सहज तेणें घेतला संन्यास ॥ सर्वपदार्थीं उदास ॥ वायु जैसा निरंतर ॥२२६॥
तो निरालंबमंदिरीं ॥ निजला स्वानंदडोल्हारियावरी ॥ जागा होऊनि क्षणभरी ॥ प्रवृत्तीकडे न पाहे ॥२२७॥
तो शेजे पहुडतां सहज मतें ॥ हरपूनि गेलीं पंच भूतें ॥ वेद निःशब्द होऊनि तेथें ॥ उगाचि तटस्थ राहिला ॥२२८॥
समाधि आणि उन्मनी ॥ विलसती त्याचे चरणीं ॥ करणांसीही चोरूनी ॥ अंतःसनीं पहूडला ॥२२९॥
तो ऐक्यवर दिगंबर ॥ शांतिविभूति ॥ चर्चिली सुंदर ॥ शाब्दिक घालूनि बाहेर ॥ मौन निरंतर सेविलें ॥२३०॥
मी करितों सत्कर्माचरण ॥ हा त्यासी न उरे अभिमान ॥ हिंडतां फिरतां पूर्ण ॥ समाधि त्याची मोडेना ॥२३१॥
जो शिबिकेंत जाहला निद्रित ॥ वहनवाहक सुपंथें जात ॥ भूमंडल क्रमितां बहुत ॥ परी त्याची निद्रा न मोडे ॥२३२॥
तैसीं जीवन्मुक्ताचीं करणें ॥ आचरती सत्कर्माचरणें ॥ परी मी करितों ऐसें न म्हणे ॥ समाधिसुखें डोले तो ॥२३३॥
तो अद्वयपदींचा नृप जाण ॥ सद्विवेकाचें उद्यान ॥ कीं कृपेचें पांघरूण ॥ विश्वावरी कर्ता तो ॥२३४॥
कीं तो विदंबरींचा चंद्र ॥ कीं तो आत्मसुखाचा समुद्र ॥ कीं तो आनंदाचें अंबर ॥ उभारलें तेणें रूपें ॥२३५॥
सर्वत्र करी तो गमन ॥ परी न चळे कदा आसन ॥ करूं बैसे जेव्हां भोजन ॥ ग्रासी गगन ॥ शब्दा सहित ॥२३६॥
जगद्भान समूळीं उपटोनी ॥ भोजनीं बैसला गिळूनी ॥ रसना बाहेर घालूनी ॥ सर्व रस चाखीत ॥२३७॥
सर्वांहूनि मृदु गगन ॥ परी तो योगी सुकुमार पूर्ण ॥ निद्रेसमयीं तें कठिण ॥ अंगीं रुपत तयाच्या ॥२३८॥
सेजे न लावितां अंग ॥ निद्रा मोडे त्याची अभंग ॥ मागें लोटूनि द्दश्य भाग ॥ पहुडे स्वसुखीं सर्वदा ॥२३९॥
तो ऐके तेंचि श्रवण ॥ तो बोले तेंचि कीर्तन ॥ आपुल्या स्वसुखीं समाधान ॥ तेंचि स्मरण तयाचें ॥२४०॥
करी गुरुचरणो पासन ॥ परोपकारी सदा मन ॥ तेंचि तयाचें अर्चन ॥ समाधान ॥ सर्व भूतीं ॥२४१॥
सर्व भूतीं तयाचें वंदन ॥ सर्वांहूनि म्हणे मी सान ॥ हेंचि दास्य संपूर्ण ॥ निरहंकारकृति करी तो ॥२४२॥
सर्वभूतें पाहे आत्मवत ॥ हेंचि सख्य त्याचें निश्चित ॥ स्वस्वरूपीं समरस पाहात ॥ हेंचि आत्मनिवेदन पैं ॥२४३॥
तो निजला परी जागृत ॥ जागा परी समाधिस्थ ॥ समाधीपासूनि समस्त ॥ निजसुखें डुले तो ॥२४४॥
बोल तोही विसरोन ॥ धरिलें असे सदा मौन ॥ मौन न मोडतां जाण ॥ बोल बोले रसाळ ॥२४५॥
रसनेसहित रस ॥ गिळूनि तृप्त सावकाश ॥ सावकाशपणें अवकाश ॥ विश्वालागीं जाहला तो ॥२४६॥
विश्व गिळूनि सकळ ॥ स्वच्छंदेंचि खेळे खेळ ॥ खेळ खेळूनि अचंचळ ॥ निजमूळ सोडीना ॥२४७॥
मूळ न सोडितां साचार ॥ आपणचि जाहला विश्वाकार ॥ विश्व हें कधीं रचलें साचार ॥ हें तो नेणे सर्वथा ॥२४८॥
तेथें कैंचें नेणतेपण ॥ तो तरी अक्षय ज्ञानघन ॥ ज्ञानाभिमान मुळींहून ॥ नाहीं किंचित तयातें ॥२४९॥
तेव्हां धृति समूळ विराली ॥ शांति शांतपणांत मुराली ॥ दिवस रात्रि सामावली ॥ स्वप्रकाशीं तयाच्या ॥२५०॥
देहींचा विराला काम ॥ लाजलें सकळ निजकर्म ॥ संगें आला निजधर्म ॥ नाम अनामातीत जो ॥२५१॥
तेथें मोक्ष मुक्त जाहला पूर्ण ॥ साधनाचें केलें उद्यापन ॥ अहिंसा क्षमा निशिदिन ॥ ह्रदय सदनीं खेळती ॥२५२॥
जागृति स्वन्प सुषुप्ती ॥ ह्या समाधींत विश्रांति पावती ॥ तुर्या उन्मनी निश्चितीं ॥ स्वानंदीं होती लीन पैं ॥२५३॥
तेथें शोक द्वेष मावळती ॥ कामना कल्पना दग्ध होती ॥ ध्याता ध्यान ध्येय हारपती ॥ वचनें खुंटती सर्वही ॥२५४॥
दाख विण्यासीं देखणें विरे ॥ भज्य भजक भजनही विसरे ॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान सरे ॥ ग्रीष्मकाळीं तोय जैसें ॥२५५॥
हरपली सकळ मती ॥ गलित झाल्या सर्व वृत्ती ॥ गमनागमन गती ॥ सहजचि खुंटली ॥२५६॥
तेथें अभ्यास सर्वही मुरे ॥ विस्मय आणि अनुभव भरे ॥ बोध आनंद गजरें ॥ जयवाद्यें वाजविती ॥२५७॥
सनत्सुजात बोले गर्जोन ॥ इंहीं लक्षणीं जे मंडित पूर्ण ॥ ते जन्म मृत्यूंसी गिळून ॥ पूर्णत्वासी पावले ॥२५८॥
तों उगवला आदित्या ॥ अंतर्धान पावला सनत्सुजात ॥ प्रज्ञाचक्षु आणि विदुर भक्त ॥ वारंवार स्तविती त्यातें ॥२५९॥
म्हणे केवढें अद्भुत ज्ञान ॥ महाराज वर्षला निर्वाण घन ॥ रत्नांची खाणी पुण्यें करून ॥ उघडिलीसे सभाग्यें त्या ॥२६०॥
जान्हवी पावन सर्वत्र ॥ परी प्रयागीं महिमा अपार ॥ तैसा सदतिसावा अध्याय परिकर ॥ तीर्थराज प्रत्यक्ष जो ॥२६१॥
पांडवप्रताप दिव्य ग्रंथ ॥ त्यामाजी अध्याय हा सनत्सुजात ॥ ज्ञानवैरागरींचा यथार्थ ॥ दिव्य हिरा प्रकटला ॥२६२॥
सदतिसावा अध्याय महामणी ॥ ह्रदय पंकजीं जडिला संतसज्जनीं ॥ भक्तपंडितीं दिवसरजनीं ॥ बारंवार विलोकिजे ॥२६३॥
सनत्सुजात पाहतां ॥ न पडे ज्ञानाची कदा चिंता ॥ प्रिय ठेवणें तत्त्वतां ॥ संतांचा हाचि अध्याय ॥२६४॥
पांडवपालका अब्यंगा ॥ ब्रह्मानंदा पांडुरंग ॥ पुंडलीक ह्रदया रविंदा ॥ श्रीधरवरदा अविनाशा ॥२६५॥
पुढें कथा सुरसा पूर्ण ॥ कौरव बैसतील सभा करून ॥ संजयासी पुसतील वर्तमान ॥ ह्रद्नत काय पांडवांचें ॥२६६॥
यावरी क्षीराब्धीचा जांवई ॥ तेथें करूं येईल शिष्टाई ॥ सुधार साहूनि गोड पाहीं ॥ रसिक कथा पुढें असे ॥२६७॥
ते कथा सुरस गहन ॥ श्रीधरमुखद्वारें करून ॥ ब्रह्मानंद रुक्मिणीरमण ॥ बोलेल तेचि ऐका हो ॥२६८॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ उद्योगपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ सदतिसाव्यांत कथियेला ॥२६९॥
इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे उद्योगपर्वणि विदुरसनत्सुजातनीतिकथनं नाम सप्तत्रिंशाध्यायः ॥३७॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP