मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ५९ वा

पांडवप्रताप - अध्याय ५९ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ पूर्वा ध्यायींचें अनुसंधान ॥ धर्में सोडिला श्याक कर्ण ॥ पाठीशीं रक्षीतसे अर्जुन ॥ सकल रायां समवेत ॥१॥
वृषकेत मदन मेघ वर्ण ॥ यौवनाश्व सुवेग गहन ॥ अनुशाल्व वीर आपर सैन्य ॥ श्याम कर्ण रक्षिती ॥२॥
दक्षिण दिशॆ घोडा चालिला ॥ माहिष्मती नगरा आला ॥ नील ध्वज राजा तेजा गळा ॥ पुरुषार्यी आणि पुण्य शील ॥३॥
त्याचा पुत्र नामें प्रवीर ॥ रणपंडित प्रतापशूर ॥ मदन मंजरी स्त्री सुकुमार ॥ तीसमवेत वनीं क्रीडे ॥४॥
तों तेणें देखिला श्याम कर्ण ॥ पत्र वाचूं लागला धरून ॥ सोम वंशीं विजय ध्वज पूर्ण ॥ पंडुराज प्रतापी ॥५॥
त्याचा पुत्र धर्म राजेंद्र ॥ साह्य श्रीरंग जग दुद्धार ॥ तेणें श्याम कर्ण सोडिला सत्वर ॥ पृथ्वीतळ जिंकावया ॥६॥
घोडा रक्षितो सुभद्रानाथ ॥ गांडीव धर्ता रणपंडित ॥ जो बळें सबळ नृपनाथ ॥ तेणें वारू धरावा हा ॥७॥
पत्र वाचूनि प्रवीर ॥ स्त्रिया गांवांत पाठविल्या समग्र ॥ सैन्य आण विलें अपार ॥ धांवला समोर युद्धातें ॥८॥
घोडा पाठविला गांवांत ॥ ऐसें देखूनि कर्ण सुत ॥ निज दळाशीं बाण वर्षत ॥ प्रवीरा वरी धांवला ॥९॥
सवेंचि शत बाण टाकिले ॥ ते प्रवीरें वरच्यावरी छेदिले ॥ कर्ण जावरी प्रेरिले ॥ शत बाण तेणेंही ॥१०॥
ते कर्ण कुमारें छेदून ॥ दुज्र सत्तर बाण सोडून ॥ ह्रदयीं भेदिला नील ध्वज नंदन ॥ हांकें गगन गाजविलें ॥११॥
तों तीन अक्षौहिणी दळा सहित ॥ नील ध्वज रणपंडित ॥ तयावरी धांवला वीर पार्थ ॥ संग्राम अद्भुत मांडला ॥१२॥
मांडलें युद्धाचें घन चक्र ॥ उभय सेनेचा होत संहार ॥ तों नील ध्वजाचा जामात वैश्वानर ॥ सेना जाळीत पांडवांची ॥१३॥
असो वरुणास्त्र सोडी अर्जुन ॥ परी सहसा नाटोपे अग्न ॥ मग अग्नि नारायणाचें स्तवन ॥ पार्थें केलें तेधवां ॥१५॥
शुचिर्भूत होऊनि पार्थ ॥ अग्नी पुढें जोडीत ॥ म्हणे हे द्विमूर्धान सप्तहस्त ॥ त्रिचरणा अवधारीं ॥१६॥
विश्वपालका कृशाना ॥ चत्वारिश्रॄंगा सप्तजिव्हा धारणा ॥ स्त्रिया स्वाहा स्वाधारमणा ॥ मेष वाहना अवधारीं ॥१७॥
तुजचि करा वया तृप्त ॥ अश्वमेध मांडिला अद्भुत ॥ तुज म्यां खांडववन दिधलें यथार्थ ॥ प्राण मित्र म्हणो नियां ॥१८॥
मग प्रसन्न जाहला अग्न ॥ म्हणे अर्जुना ऐकें वचन ॥ कृष्ण स्वरूप परिपूर्न ॥ कळलें नाहीं तुम्हांतें ॥१९॥
पूर्ण ब्रह्मानंद ह्रषीकेश ॥ तो तुमचे रात्रं दिवस ॥ तो असतां तुम्हांसी दोष ॥ कालत्रयीं न लागती ॥२०॥
सर्वेश्वर साह्य श्रीरंग ॥ तुम्हीं कासया मांडिला याग ॥ सकल दोषां होत भंग ॥ ज्याचें नाम मुखीं गातां ॥२१॥
असो अग्नि होऊनि कृपाळ ॥ उठविलें पार्थाचें सर्व दळ ॥ मग श्वशुरा प्रति तत्काळ ॥ जाऊनि बोलता जाहला ॥२२॥
म्हणे हा कृष्ण प्रिय कृष्ण ॥ याशीं तूं सख्य करीं प्रीती करून ॥ तों स्वधेची माता ज्वाला दारुण ॥ नील ध्वजा प्रति बोले ॥२३॥
मैत्री करूं नको युद्ध करीं ॥ पांडव तो मारीं पुरुषार्थें समरीं ॥ मग नील ध्वज परिवारीं ॥ पार्था वरी लोटला ॥२४॥
तों अनिवार पार्थाचें तेज ॥ रणींहूनि पळविला नील ध्वज ॥ म्हणे स्त्रीबुद्धीनें काज ॥ सिद्धी न पावे सर्वथा ॥२५॥
अपार धन आणि श्याम कर्ण ॥ घेऊनि भेटला अर्जुनासी येऊन ॥ सवें आपण अपार सैन्य ॥ साह्य चालिला तेधवां ॥२६॥
मग ते ज्वाला रुसोन ॥ गेली बंधूकडे निघोन ॥ उल्मुक नाम त्या लागून ॥ वर्तमान सांगतसे ॥२७॥
म्हणे माझा भ्रतार आणि नंदन ॥ पार्थें नेले पुढें घालून ॥ उल्मुक म्हणे माझेन ॥ युद्ध पार्थाशीं न करवे ॥२८॥
मग ती ज्वाला तेथून ॥ चालिली भागीरथी ओलांडून ॥ पुढें इचा विटाळ न व्हावा पूर्ण ॥ महापापीण गंगा हे ॥२९॥
भागीरथी म्हणे तियेसी ॥ कां हो ज्वाळे मज निंदिसी ॥ ती म्हणे सात बाळें तुवां परियेसीं ॥ निर्दयें जाण मारिलीं ॥३०॥
तुझ्या भीष्माचा मारक पार्थ ॥ तो हा जातो पृथ्वी जिंकीत ॥ यावरी गंगा शाप देत ॥ आठवूनि देव व्रता ॥३१॥
या षण्मासांत साचार ॥ रणीं पडेल पार्थाचें शिर ॥ मग ते ज्वाला होऊनि शर ॥ बभ्रुवाहना जवळी गेली ॥३२॥
शररूप धरूनि सत्य ॥ त्याच्या भातां राहिली गुप्त ॥ इकडे श्याम कर्णासी रक्षीत ॥ जात पार्थ दळेंशीं ॥३३॥
पुढें चंडशिला देखोनि सुरंग ॥ तिशीं श्याम कर्ण घांशी अंग ॥ तों तेथेंचि जडला सवेग ॥ हालेना ऐसा जाहला ॥३४॥
न सुटे कदा श्याम कर्ण ॥ आश्चर्य करीत अर्जुन ॥ तेथें सौभरीचा आश्रम देखोन ॥ त्यासी नमून पुसतसे ॥३५॥
सौभरी बोले हांसोन ॥ म्हणे पांडव तुम्ही परम ॥ अज्ञान ॥ पूर्ण ब्रह्म घरीं श्रीकृष्ण ॥ संशय अजूनि न जाय ॥३६॥
संशयें व्यापिलें तुमचें चित्त ॥ अश्वमेध मांडिला व्यर्थ ॥ ज्या श्रीकृष्णाचें घेतां चरणतीर्थ ॥ कोटी यागांचें फळ होय ॥३७॥
तुज गीता उपदे शिली ॥ ते नाहींच तुजला सफळ जाहली ॥ अरे हरि ध्यान करा सकळी ॥ पापा होळी होय तेणें ॥३८॥
ज्ञानाहूनि ध्यान विशेष ॥ गीतेंत बोलिला द्वारकाधीश ॥ त्यासी टाकूनि देशो देश ॥ अश्वापाठीं हिंडतां ॥३९॥
प्रत्यक्ष टाकूनि श्रीहरी ॥ हिंडतां घेऊनि चतुष्पद हरी ॥ जो पूर्ण ब्रह्म निर्विकारी ॥ त्याचें स्वरूप नोळखा ॥४०॥
सांडोनियां दिव्या हिरा ॥ कां वेंचितां अरण्यगारा ॥ जो अनादि परात्पर सोयरा ॥ त्याचें स्वरूप नोळखाचि ॥४१॥
चंद्र सूर्य आणि अग्न ॥ ज्याच्या तेजांत होती निमग्न ॥ तो तुमचा सारथि जाहला सगुण ॥ त्याचें स्वरूप नोळखा ॥४२॥
असो हरिमाया परम गूढ ॥ तेणें तुम्ही सर्व जाहलेति मूढ ॥ आतां श्याम कर्ण ॥ शिळेसी जडला द्दढ ॥ वर्त मान तें ऐका ॥४३॥
उद्दाल काची स्त्री दारुण ॥ सांगे तें न ऐकेचि वचन ॥ शुभ सांगतां अशुभ करून ॥ क्षणामाजी टाकीत ॥४४॥
नको म्हणावें तें ह्टेंचि करी ॥ शिणवी त्यासी दुराचारी ॥ तों कौंडिन्य ऋषि निर्धारीं ॥ आश्रमा पातला तयाच्या ॥४५॥
म्हणे कां तुझें शरीर कृश जाहलें ॥ तेणें सर्व वर्तमान सांगितलें ॥ तो म्हणे विपरीत बोलें ॥ करावें तें न करीं म्हणें ॥४६॥
मग त्या प्रमाणें तो वर्तत ॥ करावें तें नको म्हणत ॥ तों पिंडप्रदान करूनि यथार्थ ॥ विसरू नियां बोलिला ॥४७॥
म्हणे पिंड गंगेंत टाकावे वहिले ॥ तिणें उकिरडयांत नेऊनि टाकिले ॥ मग उद्दालकें शापिलें ॥ चंडशिला तूं होय ॥४८॥
मग तिणें धरूनि चरण ॥ म्हणे बोलें उश्शापवचन ॥ तो म्हणे अर्जुन हस्तें करून ॥ उद्धरून जाशील तूं ॥४९॥
असो तेथें जाऊनि पार्थ ॥ शिळेसी लावितांचि हस्त ॥ सत्वर होऊनि पूर्ववत ॥ पतिदर्शन सिद्ध जाहली ॥५०॥
पुढें घोडा चालिला सत्वर ॥ तों देखिलें चंपकापुर ॥ तेथें हंसध्वज राजेंद्र ॥ महा उदार वैष्णव तो ॥५१॥
म्हणे प्रसंगें करून ॥ होईल श्रीरंगाचें दर्शन ॥ हंस ध्वज घेऊनि सैन्य ॥ नगरा बाहेर निघाला ॥५२॥
सत्तर सहस्त्र भद्राजाती ॥ ज्याच्या सैन्यामाजी चालती ॥ रथ स्वारां नाहीं गणती ॥ एकपत्नी व्रती तो ॥५३॥
एकपत्नी व्रत धीर ॥ तेचि ठिविले सेवक शूर ॥ धन देतसे अपार ॥ चंपकापुर सुखी सदा ॥५४॥
विदूरथ विरथ चंद्र सेन ॥ सुदर्शन सुधन्वा पंच नंदन ॥ रायें नगरातें धेंडा पिटोन ॥ श्रुत केलें सर्वांसी ॥५५॥
आजि कोणी पुरुषवीर ॥ नगरांत न रहावा साचार ॥ श्रीकृष्ण दर्शना सत्वर ॥ बाहेर निघा रे त्वरेनें ॥५६॥
पुत्र बंधु हो आप्त ॥ जो आजि राहील नगरांत ॥ त्यासी तैलकटाह करूनि तप्त ॥ आंत घालीन निर्धारें ॥५७॥
समस्त बाहेर आले वीर ॥ परी सुधन्वा राज पुत्र ॥ त्याची स्त्री परम सुंदर ॥ तिणें सुधन्वा गुणें मोहिला ॥५८॥
म्हणे आजि चतुर्थ दिवस ॥ टाकूनि जातां लागेल दोष ॥ बाल हत्या पातक विशेष ॥ जाणोनि आजि राहवें ॥५९॥
उदरीं होईल जलद ॥ तेणेंचि वंश पावन शुद्ध ॥ ऐसा प्रभाव तीनें करूनि बोध ॥ सुधन्वा वीर राहविला ॥६०॥
ऋतु देऊनि प्रातःकाळीं ॥ सुधन्वा आला पित्या जवळी ॥ नमन करीत ते वेळीं ॥ देखतां राव कोपला ॥६१॥
म्हणे यासी घालावें कढईंत ॥ आज्ञा भंगी तो नव्हे सुत ॥ शंख लिखित पुरोहित ॥ घेऊनि जाती सुधन्व्यासी ॥६२॥
राव संगें परिवार देत ॥ यासी उचलूनि टाका रे कढईंत ॥ प्रधान पाहती तटस्थ ॥ न चले वचनार्थ कोणाचा ॥६३॥
कढई जवळी त्वरें नेती सुधन्वा मग विचारी चित्तीं ॥ कोणीसी आतां स्मरावें अंतीं ॥ एका श्रीपतीवांचोनियां ॥६४॥
कृष्णा गोविंदा माधवा ॥ अच्युता नारायणा केशवा ॥ मुकुंदा श्रीधरा कमला धवा ॥ पांडवजन प्रति पालका ॥६५॥
जय जय जग दुद्धरणा ॥ द्रौपदीलज्जारक्षका पीतवसना ॥ पंचशर जनका पंचवदना ॥ प्रिय अत्यंत होसी तूं ॥६६॥
मधुकैट भारी मुरमर्दना ॥ पद्मजजनका पद्मलोचना ॥ क्षीराब्धिवासा जगन्मोहना ॥ धांव त्वरें ये वेळीं ॥६७॥
समरांगणीं देईन प्राण ॥ परी हरि नको हें दुर्मरण ॥ दावाग्नींत रक्षिले गोधन ॥ मज लागून रक्षीं तैसा ॥६८॥
सेवकीं उचलूनि त्वरित ॥ सुधन्वा टाकिला कढईंत ॥ येरू स्मरण तैसेंचि करीत ॥ वैकुंठनाथ काय करी ॥६९॥
जैसें स्वजनांचें मानस निर्मळ ॥ तैसें तैल जाहलें शीतळ ॥ त्रिविध ताप क्लेशजाळ ॥ नाम स्मरणें दूर होती ॥७०॥
जैसें सलिलीं कमल टवटवित ॥ तैसा कढई माजी बैसला निवान्त ॥ सहस्त्रनामें अनुक्रमें पढत ॥ भगवंताचीं स्वानंदें ॥७१॥
भोंवते जन जे पाहती ॥ नयनीं प्रेमाश्रु त्यांचे लोटती ॥ तंव हंस ध्वज नृपती ॥ पाहावया धांवला ॥७२॥
तों तप्ततैला माजी तेव्हां ॥ आनंद मय देखिला सुधन्वा ॥ अच्युता जना र्दना माधवा ॥ नामावळी गातसे ॥७३॥
सर्व जनांचे नेत्रीं अवधारा ॥ प्रेमें सुटल्या विमलां बुधारा ॥ शंख लिखित म्हणती राजेश्वरा ॥ कपट कीं सत्य पाहावें ॥७४॥
नारळ आंत टाकिले ॥ दोन भाग होऊनि उसळले ॥ दोघांचे कपाळीं दोन शकलें ॥ पाषाणा ऐसें बैसलीं ॥७५॥
कढईंतूनि तैल उसळलें ॥ शंखलिखितांचें अंग भाजलें ॥ दोघे अनुतापें तापलें ॥ म्हणती घडले दोष आम्हां ॥७६॥
भगवद्भक्तांचा महिमा अपार ॥ नेणोंचि आम्ही पामर ॥ म्हणती तैलकधईंत साचार ॥ उडी आम्ही घालूं आतां ॥७७॥
मग सुधन्या धांवोन ॥ करी तयांचें समाधाव ॥ हंस ध्वज सप्रेम होऊन ॥ पुत्रालागीं आलिंगी ॥७८॥
म्हणे धन्य तुझेनि हा वंश ॥ विष्णु भक्त तूं निर्दोष ॥ यावरी सेना सांवरूनि आस मास ॥ रथा रूढ जाहला ॥७९॥
पित यासी नमूनि ते वेळां ॥ सुधन्वा दळ भारेंशीं धांवला ॥ भूगोल तेव्हां डळमळला ॥ दोन्ही द्ळें मिळालीं ॥८०॥
सुधन्या आणि सुरथ ॥ युद्ध करिती तेव्हां अद्भुत ॥ तिकडूनि पार्थ वृषकेत ॥ प्रद्युम्न सात्यकी धांवलें ॥८१॥  
यौवनाश्व सुवेग वीर ॥ अनुशाल्व नील ध्वज प्रवीर ॥ चपले ऐसे कर्ण कुमार ॥ त्यांतूनि पुढें धांवला ॥८२॥
सुधन्वा पुसे वृषकेता लागून ॥ तूं वीर आहेस कोणाचा कोण ॥ येरू म्हणे धीर वीर उदार कर्ण ॥ त्याचा पुत्र मी आहें ॥८३॥
मग दोघां मध्यें अपार ॥ मांडलें युद्धाचें घन चक्र ॥ तो लाघवी कर्ण कुमार ॥ विद्या अपार तयाची ॥८४॥
सव्यतर्जनी हालवूनि जाणा ॥ वीर समस्त डोलविती माना ॥ मग सुधन्वा निवारी वृषकेत बाणां ॥ पांडव सेना खिळियेली ॥८५॥
कर्ण पुत्राचा रथ ॥ आकाशपंथें तेव्हां उडवीत ॥ येरू परतोनि सवेंचि येत ॥ उसणें घेत आपुलें ॥८६॥
सुधन्व्याचा स्यंदन ॥ उडवी आकाशीं जैसें तृण ॥ तों प्रद्युम्नें सोडूनि बाण ॥ रथ छेदिला सुधन्व्याचा ॥८७॥
तेणेंही रुक्मिणी पुत्राचा स्यंदन ॥ रणीं केला छिन्नभिन्न ॥ ह्रदयीं भेदिले पंच बाण ॥ मूर्च्छेनें व्यापिला तेधवां ॥८८॥
कृतवर्मा युद्ध करी ॥ तोही मूर्च्छित पडिला समरीं ॥ अनुशाल्व धांवला याउपरी ॥ निर्वाण बाण वर्षत ॥८९॥
तोही सुधन्व्यानें शरीं खिळिला ॥ अनुशाल्व ध्वज स्तंभीं टेंकला ॥ देखोनि सात्यकी धांवला ॥ तोही पाडिला मूर्च्छागत ॥९०॥
मग धांवला सुभद्रावर ॥ देखोनि हांसे हंस ध्वज पुत्र ॥ म्हणे कृष्ण बळें अपार ॥ युद्ध केलें पूर्वीं तुवां ॥९१॥
आजि सारथी नाहीं ह्रषीकेशी ॥ तरी युद्ध करीं आतां मजशीं ॥ तुझी धनु र्विद्या कैसी ॥ पाहूं जुनाट झुंजारा ॥९२॥
अर्जुनें  टाकिले शत शर ॥ सुधन्व्यानें सोडिले सहस्त्र ॥ लक्ष बाण सुभद्रावर ॥ प्रेरिता जाहला तयावरी ॥९३॥
येरें टाकिले द्श लक्ष पाठीं ॥ पार्थें टाकिले सवेंचि कोटी ॥ न मावती आकाशाचे पोटीं ॥ वरी मंडप जाहला ॥९४॥
पार्थें टाकिलें अग्न्यस्त्र ॥ येरें सोडिलें जलदास्त्र ॥ सुधन्व्यानें वातास्त्र ॥ सवेंचि प्रेरिलें तेधवां ॥९५॥
पार्थें टाकिलें पर्वतास्त्र ॥ येरें सोडिलें वज्रास्त्र ॥ त्याणें अर्जुनाचा रथ ॥ केला चूर्ण समरांगणीं ॥९६॥
सुधन्वा म्हणे करीं हरिस्मरण ॥ घरीं सांडूनियां भगवान ॥ नाहीं तो दोष कल्पून ॥ अश्वमेध मांडिला ॥९७॥
ऐसें बोलोनि सत्वर ॥ उडविलें सारथ्याचें शिर ॥ घाबरा जाहला सुभद्रावर ॥ म्हणे कैसें करूं आतां ॥९८॥
म्हणे धांवें मित्र करव सना ॥ नीलगात्रा शतपत्र नयना ॥ क्षीराब्धिजावरा सहस्त्रवदना ॥ संकट पडलें धांवें कां ॥९९॥
रजनी अंतीं उगवे रविचक्र ॥ तैसा रथीं बैसला श्रीधर ॥ आनंदला पंडुपुत्र ॥ पाय धरी सप्रेम ॥१००॥
सुधन्वा आपुलिया रथा वरून ॥ श्रीरंगासी नमी प्रेमें करून ॥ म्हणे स्वामी आलासी धांवोन ॥ निज जन रक्षावया ॥१०१॥
सुधन्वा म्हणे अर्जुना ॥ आतां करीं एक प्रतिज्ञा ॥ मग तो पाकशा सनी ते क्षणां ॥ काय वचन बोलत ॥१०२॥
तीन बाणांचा नेम साचार ॥ सुधन्व्या तुझें उडवीन शिर ॥ हें नव्हें तरी पितृगण समग्र ॥ अधःपतन पावती ॥१०३॥
सुधन्वा म्हणे तुझे तीन बाण ॥ जरी मी न टाकीं खंडून ॥ तरी मी नरकासी जाईन ॥ जगन्मोहना पाहें तूं ॥१०४॥
जगदात्मया कंसारी ॥ ठेवणें रक्षिजें नानापरी ॥ तैसें पार्थासी जतन करीं ॥ समरीं उरी नुरोचि ॥१०५॥
मग तो सुधन्या रणपंडित ॥ शत बाणीं विंधिला पार्थ ॥ शतशरीं मदनतात ॥ परम पुरुषार्थें भेदिला ॥१०६॥
कृष्णार्जुनां सहित रथ ॥ तेणें उडविला अकस्मात ॥ वातचक्रीं भोंवत भोंवत ॥ एक योजनावरी पडियेला ॥१०७॥
मग श्रीकृष्ण म्हणे अर्जुना ॥ कासया केली रे व्यर्थ ॥ प्रतिज्ञा ॥ जय द्रथीं नेमवचना ॥ संकट मज घातलें ॥१०८॥
अर्जुन म्हणे वनमाळी ॥ तान्हयासी रक्षिसी माउली ॥ तुझिया स्नेहाचिया शीतळ साउली ॥ खालीं आम्ही सुखरूप ॥१०९॥
श्रीकृष्ण म्हणे रथा वरी भार ॥ पार्था मी घालितों अपार ॥ परी तो सुधन्वा महावीर ॥ उडवी क्षण न लागतां ॥११०॥
हे वीर समस्त एकपत्नी व्रती ॥ पार्था तुम्हीं आम्हीं भोगिल्या बहुत युवती ॥ तो सत्यवादी भक्त निश्चितीं ॥ म्हणोनि यश येत तया ॥१११॥
मग श्रीकृष्णें रथ लोटिला ॥ सुधन्व्या समोर उभा केला ॥ अर्जुनें पहिला शर सोडिला ॥ द्दढसंकल्प करू नियां ॥११२॥
गोवर्धव उचलोनि सबळ ॥ गोकुळ रक्षीत तमालनीळ ॥ त्या पुण्यें करूनि तत्काळ ॥ शिर तुटो सुधन्व्याचें ॥११३॥
ऐसें म्हणोनि सोडिला बाण ॥ सुधन्व्यानें छेदिला न लागतां क्षण ॥ आश्चर्य करी अर्जुन ॥ दुसरा मार्गण लाविला ॥११४॥
परशुरामावतारीं दुष्ट मारून ॥ उर्वी ब्राह्मणां दिधली दान ॥ त्या पुण्यें करून ॥ शिर तुटो सुधन्व्याचें ॥११५॥
प्रलयचपलेऐसा बाण ॥ पार्थें सोडिला चापापासून ॥ तोही तोडिला न लागतां क्षण ॥ हंस ध्वज पाहातसे ॥११६॥
विजयी जाणोनि निजसुत ॥ हंस ध्वज जय वाद्यें वाजवीत ॥ तिसरा बाण घेत पार्थ ॥ अति समर्थ तेजस्वी ॥११७॥
पृथ्वी तेज वायु अंबर ॥ यांचें सत्त्व या शरीं समग्र ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ समर्थ्येंशीं तेथें असती ॥११८॥
रामावतारीं एकपत्नीव्रत ॥ श्रीरंगा तुवां केलें बहुत ॥ त्याचि पुण्यें अकस्मात ॥ शिर उडो सुधन्व्याचें ॥११९॥
आजि मी यासी न मारीं जरी ॥ शिव विष्णु प्रतिमा फोडिल्या तरी ॥ सुधन्वा म्हणे श्रीहरी ॥ पार्थासी रक्षीं बहु आतां ॥१२०॥
अर्जुनें सोडिला शर ॥ क्षणें छेदी हंसध्वज कुमार ॥ अर्ध पडिला पृथ्वी वरी साचार ॥ अर्ध अनिवार नाटोपे ॥१२१॥
बहुत बाणीं छेदितां ॥ नाटोपेचि तो तत्त्वतां ॥ कंठीं बैसला तो अवचितां ॥ शिर उडविलें सुधन्व्याचें ॥१२२॥
शिर करी कृष्ण स्मरण ॥ पंडिलें हरिचरणां जवळी येऊन ॥ श्रीरंगें तें उचलून ॥ ह्रदयीं धरिलें आवडीं ॥१२३॥
मुखांतूनि अंतज्योंति निघाली ॥ ते श्रीकृष्ण मुखीं प्रवेशली ॥ लवणाची पुतळी विराली ॥ समुद्रा माजी जैसी कां ॥१२४॥
हरीनें शिर ते वेळे ॥ हंस ध्वजा वरी भिरका विलें ॥ तें हंस ध्वजें उचलिलें ॥ आरं भिलें शोकातें ॥१२५॥
मुखावरी ठेवी मुख ॥ हंस ध्वज करी शोक ॥ म्हणे सुपुत्रा तूं कुलोद्धारक ॥ रणपंडित पुरुषार्थी ॥१२६॥
तूं एकपत्नीव्रती पूर्ण ॥ विष्णु भक्त पुण्य पावन ॥ तुज म्यां कढईंत उचलून ॥ नेणोनियां टाकिलें ॥१२७॥
तोचि राग धरूनि मनीं ॥ बा रें काय जातोसी ऊसोनी ॥ सखया तुज न जाळीच अग्नी ॥ महावैष्णव जाणो नियां ॥१२८॥
श्रीकृष्ण मुखीं तुझी ज्योती ॥ शिरोनि तुटली कीं पुनरा वृत्ती ॥ ऐसा पुत्र त्रिजगतीं ॥ नाहीं कोणासी जाहला ॥१२९॥
अहा गेलें पुत्र रत्न ॥ अहा हरविलें म्यां निधान ॥ ऐसा निढळ बडवून ॥ शोक करी हंस ध्वज ॥१३०॥
ऐसा पुत्र सुलक्षण ॥ मज अभाग्यासी जिरे कोठून ॥ महावीर कृष्णार्जुन ॥ जेणें समरीं जर्जर केले ॥१३१॥
श्रीकृष्ण सोडूनि वहिलें ॥ कां शिर मजपाशीं आलें ॥ हंस ध्वजें माघारें टाकिलें ॥ येऊनि पडिलें हरी जवळी ॥१३२॥
मग श्रीरंगें भिरकाविलें गगनीं ॥ तें रुद्रगणीं नेलें उचलूनी ॥ मुंडमाळेंत नेऊनी ॥ सदाशिवाचे ओंविलें ॥१३३॥
यावरी बाण वर्षत ॥ धांवला हो वीर सुरथ ॥ म्हणे कृष्णा आजि रक्षीं पार्थ ॥ बहुत प्रकारें करू नियां ॥१३४॥
पार्थासी म्हणे द्वारकानाथ ॥ आतां प्रलय करील हा सुरथ ॥ अर्जुन म्हणे रणीं कृतान्त ॥ तुझ्या बळें जिंकूं आम्ही ॥१३५॥
प्रद्युम्नीसी म्हणे हरी ॥ तूं आतां सुरथाशीं युद्ध करीं ॥ मग पार्थाचा रथ मुरारी ॥ तीन योजनें दूरी नेत ॥१३६॥
स्रुरथें युद्ध केलें अद्भुत ॥ समरीं जिंकिला वीर मन्मथ ॥ पाडूनियां मूर्च्छागत ॥ सर्व दळ संहारिलें ॥१३७॥
जेथें होते कृष्णार्जुन ॥ तेथें उभा ठाकला येऊन ॥ बाणीं आच्छादिला स्यंदन ॥ कुंती नंदन आवेशला ॥१३८॥
छेदूनि सुरथाचा रथ ॥ क्षण न लागतां मारिला सूत ॥ सवेंचि तेणें रथा सहित पार्थ ॥ गगनमंडळीं उडविला ॥१३९॥
कृष्ण आणि अंजनी कुमार ॥ रथा वरी घालिती भार ॥ परी तो सुरथ वीर ॥ उडवी क्षण न लागतां ॥१४०॥
मग धांवोनि वीर सुरथ ॥ उचलिला हातें पार्थाचा रथ ॥ म्हणे टाकूं समुद्रांत ॥ किंत गजपुरा पाठवूं ॥१४१॥
म्ग पंच बाणीं सुरथ ॥ पार्थें ह्रदयीं ताडिला अकस्मात ॥ मूर्च्छना आली ते सांवरीत ॥ गेला आपुल्या रहंवरीं ॥१४२॥
सुरथ म्हणे पार्था ॥ प्रतिज्ञा करीं कांहीं आतां ॥ येरू म्हणे तत्त्वतां ॥ शिर तुझें उडवीन ॥१४३॥
अष्टोत्तर शत रथ ॥ सुरथाचे छेदी वीर पार्थ ॥ मग सुरथाचा वाम हस्त ॥ छेदोनियां पाडिला ॥१४४॥
मग गदा घेऊनि सव्य हस्तीं ॥ मारिले पार्थाचे सहस्त्र हत्ती ॥ गदाघायें जगत्पती ॥ रथा वरी चढोनि ताडिला ॥१४५॥
मग छेदिला सव्य हस्त ॥ दोन्ही पायीं दळ संहारीत ॥ पाय छेदिले मग गडबडींत ॥ धडें विदारीत वीरांचीं ॥१४६॥
सवेंचि शिर उडविलें ॥ पार्थाचे कपाळीं आदळलें ॥ मूर्च्छा येऊनि ते वेळे ॥ रथा खालीं पडियेला ॥१४७॥
मूर्च्छा सांवरूनि पार्थ ॥ रथा वरी वेगें चढत ॥ मग सुरथाचें शिर मदनतात ॥ तेव्हां देत गरुडापाशी ॥१४८॥
म्हणे प्रयागीं नेऊनि सत्वर ॥ टाकीं हे सुरथाचें शिर ॥ जान्हवींत अस्थि पडतां साचार ॥ स्वर्गीं वास कल्प वरी ॥१४९॥
मग तें शिर नेऊन ॥ प्रयागीं टाकिता जाहला सुपर्ण ॥ तें नंदीनें उचलून ॥ शिवमाळेंत ओंविलें ॥१५०॥
यावरी तो हंस ध्वज ॥ युद्धा उठावला तेजःपुंज ॥ मग त्यावरी गुरुड ध्वज ॥ काय करिता जाहला ॥१५१॥
रथा खालीं उतरोन ॥ चालिला चारी भुजा पसरूना ॥ म्हणे सखया दे आलिंगन ॥ हंस ध्वजा मम प्रिया ॥१५२॥
हंस ध्वज प्रेमें करून ॥ धांवोनि धरी श्रीकृष्ण चरण ॥ श्रीरंगें ह्र्दयीं धरून ॥ समाधान करीतसे ॥१५३॥
पुत्र शोक न करीं नृपती ॥ हंस ध्वज म्हणे जगत्पती ॥ तुज देखतां जाहली तृप्ती ॥ न करीं खंती कांहीं एक ॥१५४॥
परिवारा समवेत कृष्णार्जुन ॥ हंस ध्वजें राहविले पंचदिन ॥ श्याम कर्ण दिधला आणून ॥ साह्य आपण चालिला ॥१५५॥
मग सर्व रायांसी पुसोन ॥ गजपुरासी गेला रुक्मिणी रमण ॥ यावरी पुढें चालिला श्याम कर्ण ॥ वीर संपूर्ण रक्षिती ॥१५६॥
वारू होऊनि तृषाक्रांत ॥ मार्गीं सरोवरीं जीवन प्राशीत ॥ घोडा व्याघ्र जाहला अकस्मात ॥ आश्चर्य पार्थ करीतसे ॥१५७॥
तेथें एक होता ऋषी ॥ तो सांगता जाहला पार्थासी ॥ म्हणे अकृतनामा तापसी ॥ येथें तप करीत होता ॥१५८॥
तो स्नान करितां पुण्यशील ॥ जल ग्राहें ओढिला तत्काळ ॥ तेणें शापूनि तो कुटिल ॥ भस्म केला क्षणार्धें ॥१५९॥
ऋषीनें शापिलें सरोवर ॥ जीवन प्राशितां होईल व्याघ्र ॥ मग हरिस्मरण पार्थ वीर ॥ करितां विघ्न निरसलें ॥१६०॥
पूर्ववत जाहला श्याम कर्ण ॥ आणिक एके सरोवरीं जल प्राशन ॥ करितां घोडी जाहली जाण ॥ तेंही कारण ऐकें पां ॥१६१॥
तेथें पूर्वीं तप करीत भवानी ॥ म्हणे येथें पुरुष येतां कोणी ॥ तत्काल होईल कामिनी ॥ अश्व म्हणोनि अश्विनी जाहला ॥१६२॥
तेथें अर्जुनें केलें शक्ति स्तवन ॥ पूर्ववत जाहला श्याम कर्ण ॥ पुढें जातां गहन ॥ स्त्रीराज्य देखिलें ॥१६३॥
तेथें मुख्य स्त्री प्रमिला ॥ तिणें तो अश्वोत्तम धरिला ॥ बाहेर निघाला स्त्रियांचा मेळा ॥ नाना वहनीं आरूढोनि ॥१६४॥
शस्त्रास्त्रकवचयुक्त ॥ पांच लक्ष स्त्रिया निघत ॥ पार्थाशीं प्रमिला बोलत ॥ करीं युद्ध आम्हांशीं ॥१६५॥
कठिण लोह मुख बाण ॥ दुजे नयन कटाक्ष शर तीक्ष्ण ॥ पार्थें सोडितां मार्गण ॥ तों जाहली आकाशीं ॥१६६॥
स्त्रियांसी मारूं नये समरीं ॥ तरी तूं आतां ईस वरीं ॥ मग प्रमिलेनें ते अवसरीं ॥ माळ घातली पार्थातें ॥१६७॥
पार्थ म्हणे मी ब्रतस्थ ॥ तूं हस्तिनापुरा जाईं त्वरित ॥ मग लक्षस्त्रियां सहित ॥ प्रमिला गेली धर्म दर्शना ॥१६८॥
राज्यांतील द्र्व्य अपार ॥ हस्तिनापुरा पाठविलें समग्र ॥ पुढें छप्पन्न देशींचे नृपवर ॥ जिंकीत पार्थ जातसे ॥१६९॥
पुढें भीषण नामा असुर ॥ तीन कोटी सेना भयंकर ॥ त्याचा उपाध्याय दुराचार ॥ मेदू नाम तयाचें ॥१७०॥
नरांचीं आंतडीं वळूनि त्वरित ॥ केलें त्यांचें यज्ञोपवीत ॥ रक्तें राबिलीं वस्त्रें नेसत ॥ सिंदूर चर्चिला भाळीं ज्याचे ॥१७१॥
तेणें घोडा धरून ॥ भीषणासी भेटला जाऊन ॥ म्हणे तुझा पिता बक जाण ॥ पार्था ग्रजें मारिला ॥१७२॥
तरी या पार्थासी मारूनि एधवां ॥ नरमेध अगत्य करावा ॥ दशग्रीवें हा हा याग बरवा ॥ पूर्वीं केला होत पैं ॥१७३॥
मग तो मेदू पुरोहित ॥ यज्ञमंडप सिद्ध करीत ॥ म्हणे युद्धा जावें तुम्हीं समस्त ॥ जीवंत पार्थ ॥ धरूनि आणा ॥१७४॥
तों एक राक्षसी पर्वतावरी चढोन ॥ पार्थचमू पाहे न्याहाळून ॥ तों ध्वजीं देखिला वायु नंदन ॥ राक्ष समर्दन कर्ता जो ॥१७५॥
दोहीं ह्स्तीं शंख करीत ॥ म्हणे पळा रे पळा असुर हो समस्त ॥ लंका जाळिली तो कृतान्त ॥ वायुसुत आला असे ॥१७६॥
तों एक असुरी बोलत ॥ कासया काढिला तो हनुमंत ॥ आतां माझिया स्तनभारेंचि समस्त ॥ कटक बुडवीन पार्थाचें ॥१७७॥
माझे स्तन म्यां टाकिले पाठीवरून ॥ मागें लोळत एक योजन ॥ दुजी म्हणे लंबाय मान ॥ पांच योजनें माझे असती ॥१७८॥
ऐसिया राक्षसी बहुत ॥ धांवल्या तेव्हां कुच भवंडीत ॥ दळ आटिलें अंसख्यात ॥ असुरी भिडती तीन कोटी ॥१७९॥
पार्थासी म्हणे भीषण ॥ क्षणांत गज पुरी मी घेईन ॥ भीमाचें रक्त मी प्राशीन ॥ घेतों सूड पितयाचा ॥१८०॥
अनिवार राक्षसींचा मार ॥ देखोनि कोपला रुद्नावतार ॥ भारे बांधूनि असुरी समग्र ॥ आपटूनि मरिल्या ॥१८१॥
यावरी असुर संहार ॥ करीत वेगें राघवकिंकर ॥ भीषण रूपें धरी अपार ॥ वृक व्याघ्र सर्पादि ॥१८२॥
मग तो कापटय सागर ॥ माया एक निर्मूनि सत्वर ॥ होऊनि बैसला मुनीश्वर ॥ शिष्य वेद षढताती ॥१८३॥
भोंवतें उद्यान परिकर ॥ सरोवरें भरलीं अपार ॥ रचिले समिधांचे भार ॥ अग्निहोत्र मंडप तेथें ॥१८४॥
जैसा कक्षेसी घालूनि पाश ॥ मैंद बैसे मार्गीं छायेस ॥ कीं वायस जाहला राजहंस ॥ चुना अंगास माखू नियां ॥१८५॥
पार्थाशीं बोले मधुर ॥ आम्ही अग्निहोत्री येथें विप्र ॥ आम्हांसी पीडिती असुर ॥ दरिद्रें बहुत गांजियेलें ॥१८६॥
आतां आम्हां भल्या ब्राह्मणां ॥ काय देतां जी गुरु दक्षिणा ॥ कापटया कळलें अर्जुना ॥ चापावरी बाण योजिला ॥१८७॥
भीषणाचें छेदिलें शिर ॥ शिष्य पळों लागले असुर ॥ पुच्छें झोडूनियां वायु कुमार ॥ धुम सुनियां मारिले ॥१८८॥
कित्येक गांवांत गेले पळोन ॥ पुच्छें समग्र आणिले शोधून ॥ भार समस्तांचे बांधोन ॥ आपटून मारिले ॥१८९॥
मेदू उपाध्याय पळोन ॥ गेला यजमंडप टाकून ॥ पार्थें तें नगर लुटून ॥ अपार संपत्ति भरियेली ॥१९०॥
यावरी तो श्याम कर्ण ॥ चालिला मणिपुराचा मार्ग लक्षून ॥ तेथें राज्य करी बभ्रु वाहन ॥ जो कां नंदन पार्थाचा ॥१९१॥
तो आतां घोडा धरून ॥ अपार तेथें माज वील रण ॥ ते रसाळ कथा गहन ॥ श्रवण करोत पंडित ॥१९२॥
जैमिनि सांगे जन मेजया ॥ पुढें कथा सुरस राया ॥ महापातकें जाती विलया ॥ क्षुद्रें अथवा प्रकीर्णें ॥१९३॥
श्रीब्रह्मानंदा अव्यंगा ॥ श्रीधरवरदा पांडुरंगा ॥ रुक्मिणी ह्रदया रविंद्र भृंगा ॥ कथा रसिक बोलवीं ॥१९४॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अश्वमेधपर्व जैमिनि कृत ॥ त्यांतील सारांशा यथार्थ ॥ एकुणसाठाव्यांत कथियेला ॥१९५॥
इति श्रीश्रीधरकृतपांडवप्रतापे अश्वमेधपर्वणि एकोनषष्टितमाध्यायः ॥५९॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP