पांडवप्रताप - अध्याय १८ वा
पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.
॥ श्री गणेशाय नमः जो कमलोद्भवाचा जनक देखा ॥ जो प्रेमळांचा निजसखा ॥ बाप रे धर्माचा पाठिराखा ॥ सारथि पार्थाचा निर्धारं ॥१॥
जो द्रौपदीचा कैवारी ॥ जो नंद गृहींचा खिल्लारी ॥ जो दुर्जनांचा संहारकारी ॥ साह्मकारी साधूंचा ॥२॥
जो क्षीराब्धितनयेचा प्रियकर ॥ जो आनकदुंदुभीचा कुमार ॥ जो यादवकुलभास्कर ॥ मन्मथ शत्रु ध्याय जया ॥३॥
जो कालसी शासनकर्ता ॥ जो ब्रह्या दिकांसी निर्मिता ॥ जो महामायेचा निजभर्ता ॥ कर्ता हर्ता पाळिता जो ॥४॥
जो क्षीराब्धीचा जामात ॥ तेणें धर्माचे घरीं केलें अद्भुत ॥ स्वसंकल्पें उठविलें प्रेत ॥ गतकथार्थ इतुका असे ॥५॥
गजरें होत राजसूय यज्ञ ॥ नित्य उत्तम अन्न संतर्पण ॥ जेविती ऋत्विज ब्राह्यण ॥ नामस्मरणें गर्जती ॥६॥
जेथें पुरविता पुरविता भगवान ॥ तें काय वर्णूं मी दिव्यान्न ॥ त्या अन्नाचे सुवासें पूर्ण ॥ सुरगण लाळ घोंटिती ॥७॥
त्या अन्न सुवासासी वेधोन ॥ वसंत करी भोंवतीं प्रदक्षिण ॥ नित्य जेविती ऋषि गण ॥ परी वीट न उये सर्वथा ॥८॥
जैसा सोमकांताचा अचळ ॥ तैसा भात शुभ्र निर्मळ ॥ जैसा सुवर्णरंग पीत निखळ ॥ तैसें वरान्न वाढियेलें ॥९॥
अमृतासी आणिती आणिती उणें ॥ ऐशीं पंचभक्ष्यें परमान्नें ॥ विप्र जेविती हरिस्मरणें ॥ वारंवार गर्जती ॥१०॥
घृतदुग्ध दधिमधु सरोवर ॥ शाका सुवासें भरिती अंबरें ॥ जेथें पुरविता इंदिरावर ॥ तेथींची गोडी काय वर्णूं ॥११॥
जेथें वाढीत याज्ञसेनी ॥ जे श्री कृष्णाची प्रिय भगिनी ॥ जैसी झळके सौदामिनी ॥ तैसी वाढीत चपलत्वें ॥१२॥
अन्नें वाढितां निवाडें ॥ उभयहस्तीचे झळकती चुडे ॥ जेविती त्यावरी उजेड पडे ॥ दिव्य रूपडें द्रौपदीचें ॥१३॥
जे सुंदर घनश्याम वर्णा ॥ म्हणोनि द्रौपदीसी म्हणती कृष्ण ॥ जे सुभद्रेहुनि आवडे जगज्जीवना ॥ ते पूर्ण अपर्णा अवतरली ॥१४॥
विशाल भाल पद्मनेत्री ॥ सुहास्यवदना चारुगात्री ॥ जे द्रुपदरा जयाची पुत्री ख्याति जियेची त्रिभुवनीं ॥१५॥
एक कोशपर्यंत ॥ जिचे अंगींचा सुवास धांवत ॥ बोलतां हिर्यां ऐसे दंत झळकत ॥ किंवा विखरत रत्नराशी ॥१६॥
ऐशी ते केवळ अन्न पूर्णा ॥ सदा अन्न वाढी ब्राह्यणां ॥ जिच्या करपात्रींच्या अन्न ॥ तुटी नाहीं कल्पांतीं ॥१७॥
द्रौपदी चपलत्वें वाढीत ॥ तें धर्म श्री कृष्ण विलोकीत ॥ कृष्णरंगें रंगली सत्य ॥ श्रम कल्पांतीं न बाधे ॥१८॥
लक्षानुलक्ष जेविती ब्राह्मण ॥ कृष्णा एकली वाढी आपण ॥ परी घडिघडी श्री कृष्ण वदन विलोकी परतोन सप्रेम ॥१९॥
न्याहाळूनि पाहे हरिरूप सुरेख ॥ तों स्वेदें डवरला मुख मृगांक ॥ मृगमदतिलक सुवासिक ॥ घर्मेंकरूनि भिजला असे ॥२०॥
सुरंग विराजे पीतांबर ॥ गळां डोलती मुक्ताहार ॥ कौस्तु भतेजें अंबर ॥ परिपूर्ण कोंदलें पैं ॥२१॥
जो गोपी मान सराजहंस ॥ जो स्वानंदक्षीर सागर विलास ॥ तो जगद्वंद्य पुराण पुरुष ॥ याज्ञ सेनी विलोकी ॥२२॥
जें वैकुंठपीठींचें निधान ॥ जें जलजोद्भवाचें देव तार्चन ॥ जें सनका दिकांचें ह्र्दयरत्न ॥ जें प्रिय ठेवणें स्मरारीचें ॥२३॥
जो भक्त पालक दीन बंधु ॥ त्याचा विलोकूनि वदनेंदु ॥ पुढें वाढितां ब्रह्यानंदु ॥ ह्रदयीं न माये द्रौपदीचे ॥२४॥
ब्राह्यण जेवूनि ऊठती ॥ सवेंचि नृपांच्या बैसती पंक्ती ॥ द्रर्योधनादि कौरव दुर्मती ॥ तेही बैसती भोजना ॥२५॥
पांडव आणि जगत्पती ॥ इतुकेचि मागें राहती ॥ वरकड बैसती एके पंक्ती ॥ जेवा वया कारणें ॥२६॥
वाढावया लागीं पुढती ॥ सरसावली द्रौपदी सती ॥ जैसा मेघ सोसरोनि मागुती ॥ वर्षाव करी अद्भुत ॥२७॥
वदनांतूनि शब्द निघत ॥ त्यांचा जैसा न कळे अंत ॥ तैशी द्रौपदी वाढीत ॥ परी अन्न न सरे पात्रीचें ॥२८॥
कीं अद्भुत क्षीरसागरीं ॥ येती लहरींवरी लहरी ॥ तैशी द्रुपदराज कुमारी ॥ उठाव करी दुसरेनें ॥२९॥
जैशा जलदा चिया धारा ॥ वर्षती न कळे अपारा ॥ तैशी ते कृष्णा सुंदरा ॥ वाढी पात्रें असंख्यात ॥३०॥
परी क्षणक्षणां परतोन ॥ विलोकी जगज्जीवनाचें वदन ॥ तों अंगींची उटी घर्मेंकरून ॥ ठायीं ठायीं पुसलीसे ॥३१॥
भक्तांचे जे कष्ट सर्व ॥ आपण अंगें सोशी रमाधव ॥ उणें पडों नेदी केशव ॥ जो दयार्णव जगदात्मा ॥३२॥
सुखरूप वाढीत द्रौपदी ॥ श्रम कदा अंगीं न बाधी ॥ अंगें सोशी कृपानिधी ॥ कष्ट सर्वही भक्तांचे ॥३३॥
असो द्रौपदी पाहे मागुती ॥ अनुपम दिसे कृष्ण मूर्ती ॥ जिची त्रिभुवनीं अगाध कीर्ती ॥ वर्णितां नेति म्हणती वेद ॥३४॥
ब्रह्यींचें तेज गोळा होऊन ॥ कृष्ण रूप ओतिलें सगुण ॥ तोचि सच्चिदा नंदतुन कृष्ण ॥ भक्तजन प्रति पालक जो ॥३५॥
ऐसें वाढितां द्रौपदीस ॥ काय बोले जगन्निवास ॥ बाई आजि बहु भागलीस ॥ प्राण सखे द्रौपदी ॥३६॥
पृष्ठावरूनि तेव्हां हात ॥ उतरी कमलोद्भवाचा तात ॥ द्रौपदीसी आनंद होत बहुत ॥ मना माजी न समाये ॥३७॥
परतोनि पाहे हरिरूप सगुण ॥ किरीट कुंडल मंडित पूर्ण ॥ सरळ नासिक आकर्ण नयन ॥ वदन सुहास्य अत्यंत ॥३८॥
मुकुटा भोंवता दाटला घर्म ॥ देखतां द्रौपदी जाहली सप्रेम ॥ म्हणे मजलागीं पर ब्रह्य ॥ बहुत श्रम पावतसे ॥३९॥
मी आतां काय होऊं उतराई ॥ माझे सांवळे कृष्णाबाई ॥ ऐसें बोलतां ते समयीं ॥ सद्नद जाहली याज्ञ सेनी ॥४०॥
प्रेमें अंग तेव्हां फुगत ॥ दोन्ही बाहुवटें तटतटित ॥ बिरडें तुटलें अकस्मात ॥ कौरव पंक्तींत वाढितां ॥४१॥
पल्लव जाहला विगलित ॥ वक्षःस्थल उघडें पडत ॥ हात आकर्षोनि कृष्ण तेथ ॥ घाबरी पाहे चहूंकडे ॥४२॥
शकुनि सुयोधन कर्ण ॥ एकाकडे एक दाविती खूण ॥ नाना विनोद दुर्जन ॥ करिते जाहले तेधवां ॥४३॥
मग लगबग करिती अवघे ॥ एका सारखें एक न मागे ॥ एक म्हणे येथें उभी कां गे ॥ अन्न आणीं सत्वर ॥४४॥
एक म्हणती उठा रे सकळ ॥ आजि दिसतो अन्नाचा दुष्काळ ॥ परम लज्जित वेल्हाळ ॥ मुख कमल कोमाइलें ॥४५॥
नेत्रीं वाहती अश्रुधारा ॥ भोंवतीं वाट पाहे सुंदरा ॥ म्हणे श्रीरंगा यादवेश्वरा ॥ तुज कां हें बा कळेना ॥४६॥
हांक फोडिती अवघे जण ॥ अन्न पदार्थ मागती भिन्न भिन्न ॥ जैसें सहस्त्र व्याघ्रीं करितां गर्जन ॥ हरिणीचा प्राण जाऊं पाहे ॥४७॥
कीं आक्रंदत तान्हें बालक ॥ त्यासी तोडिती सहस्त्र वृश्चिक ॥ कीं क्षत देखोनि बहुत काक ॥ उकरा वया धांवती ॥४८॥
कीं चवाठां पडिलें अन्न ॥ तेथें एक दांचि धांवती श्वान श्वान ॥ तैसे ते कौरव दुर्जन ॥ नसतेंचि जाण मागती ॥४९॥
एक म्हणती भात आणीं ॥ एक म्हणती आजि हरिदिनी ॥ एक म्हणती ऐका हो वहिनी ॥ तुम्हां कष्ट दोन्ही पडताती ॥५०॥
एका वृक्षावरी थडका हाणितां ॥ डाहळ्या डळमळती समस्ता ॥ एके कर्दळीसी पांच गज भिडतां ॥ मग तिची अवस्था उरे कैंची ॥५१॥
तैसें रजनी माजी तत्त्वतां ॥ पांचांशीं सुरत युद्धु करितां ॥ गात्रें ढिलीं जाहलीं पाहतां ॥ एक डोलवूनि माथा होय म्हणे ॥५२॥
ऐसें संकट देखोन ॥ परतोनि विलोकी हरिवदन ॥ म्हणे कृष्णा लपावया सदन ॥ तुजवांचून नाहीं कोठें ॥५३॥
जे दुरात्मे पापमती ॥ तेचि सद्भक्तांचें उणें पाहती ॥ द्रौपदीचा सारथि जगत्पती ॥ म्हणे नाभीं नाभी याज्ञ सेनी ॥५४॥
तो यादवेद्र मन मोहन ॥ द्रौपदीचे अंतरीं प्रवेशोन ॥ भुजांवरी भुजा निर्माण ॥ करिता जाहला ते वेळे ॥५५॥
बिरडें घालून सत्वर ॥ सवेंचि सरसाविला पदर ॥ टवटवला मुख चंद्र ॥ द्रौप दीचा तेधवां ॥५६॥
बाप भक्तवत्सल कृपानिधी ॥ चतुर्भुज केलि द्रौपदी ॥ दुर्जन जे कां मंदबुद्धी ॥ अधोवदनें पाहती ॥५७॥
द्रौपदी आणि श्री कृष्ण ॥ पात्रा प्रती दिसती भिन्न ॥ जें जें पाहिजे अन्न ॥ तें तें तयां ओपिती ॥५८॥
उगवतां जैसा दिनकर ॥ लाजोनि पळे अंधार ॥ कीं विष्णु सहस्त्रनामें दोषसंहार ॥ होय जैसा एका एकीं ॥५९॥
कीं मस्तकीं उर्वी धरितां ॥ सर्षप प्राय भोगिनाथा ॥ किंवा वातात्मजें द्रोणाद्रि आणितां ॥ श्रम सहसा वाटेना ॥६०॥
तैसें द्रौपदीसी वाटे जाण ॥ म्हणे किती मागतील दुर्जन ॥ हें त्रिभूवन संपूर्ण ॥ जेवूं घालीन एकदांचि ॥६१॥
शुंभनि शुंभ मारूनी ॥ यशस्वी जाहली भवानी ॥ तैसी विजयी याज्ञ सेनी ॥ कौरव गर्व निवटूनियां ॥६२॥
जान्हवीचा होतां स्पर्श ॥ एकदांचि हरती सर्व दोष ॥ कीं हरिकीर्तन ऐकतां भूतांस ॥ होऊनि त्रास पळती पैं ॥६३॥
जो जो मागे कोणी पदार्थ ॥ त्या पुढें टाकी अन्नाचा पर्वत ॥ भीमासी क्रोध आला बहुत ॥ काय बोले दुर्जनांतें ॥६४॥
म्हणे अन्न टाकितां निश्चितीं ॥ शिखा उपटूनि देईन हातीं ॥ सकल सुरात्मे खालीं पाहती ॥ प्रत्युत्तर न देती कोणीही ॥६५॥
अतंर मलिनतेचें भाजन ॥ त्यांत बुडाले अवघे दुर्जन ॥ भीमाचा क्रोध देखोन ॥ कोणासी वचन न काढवे ॥६६॥
कीं दिव्य देतां खोटें होय ॥ कीं समरीं पावे पराजय ॥ तैसे दुरात्मे यादवराय ॥ अपमानीत तेधवां ॥६७॥
कीं तस्करासी मारमारूनी ॥ शुष्क काष्ठ जोडिती चरणीं ॥ तैसे कौरव दिसती ते क्षणीं ॥ तेजहीन दुरात्मे ॥६८॥
भक्त बोलती ते वेळीं ॥ धन्य हे कृष्णा वेल्हाळी ॥ श्री कृष्णें आपणा ऐसी केली ॥ चतुर्भुज प्रत्यक्ष ॥६९॥
आंचवोनि आले समस्त ॥ गंगात्मज तयांसी म्हणत ॥ अरे हे द्रौपदी देवी अद्भुत ॥ नमस्कारा इयेतें ॥७०॥
हे मंगल दायक भवानी ॥ इसी वर मागा प्रार्थूनी ॥ हे कोपलिया निर्वाणीं ॥ कुलक्षय करील ॥७१॥
हिचे ठायीं कल्पितां विपरीत ॥ भस्म व्हाल तुम्ही समस्त ॥ परी ते न ऐकती उन्मत्त ॥ महापापिष्ठ विषयांध जे ॥७२॥
असो द्रौपदी गेली गृहांत ॥ मागें गेला वैकुंठनाथ ॥ पायीं मिठी तेव्हां घालीत ॥ प्रेमें स्फुंदत द्रौपदी ॥७३॥
कुंती पांडवही ते वेळे ॥ सदना माजी प्रवेशले ॥ म्हणती श्रीरंगा आजि वारिलें ॥ थोर संकट माउलिये ॥७४॥
धर्म म्हणे जगन्नाथा ॥ कोणते उपकार आठवूं आतां ॥ अन्नदाता गुरु भयत्राता ॥ तुजपरता दिसेना ॥७५॥
भीम सेन अर्जुन ॥ स्फुंदस्फुंदोनि करिती रोदन ॥ त्यांसी ह्रदयीं धरूनि मधुसूदन ॥ करी समाधान तयांचें ॥७६॥
द्रौपदीसी गहिंवर न सांवरे ॥ नेत्रीं वाहती जीवनझरे ॥ म्हणे श्री कृष्णे त्रिभुवन सुंदरें ॥ उपकार न विसरें जन्मो जन्मीं ॥७७॥
श्रीरंगाचे जिजकंठीं ॥ कुंती येऊनि घाली मिठी ॥ म्हणे कृपाळुवा जगजेठी ॥ द्रौपदीसी समजावीं ॥७८॥
मग द्रौपदीसी म्हणे चक्रपाणी ॥ वाढितां कष्टलीस गे माय बहिणी ॥ तूं सद्नुण रत्नांची खाणी ॥ प्राणांहूनि आवडसी पैं ॥७९॥
मग द्रौपदी बोले वचन ॥ मी कोठेंही जन्म घेईन ॥ परी तूंचि बंधु होईं श्री कृष्ण ॥ पाठिराखा कैवारी ॥८०॥
असो ऐसा एक संवत्सर ॥ राज सूययज्ञ होत थोर ॥ नित्य किती जेविती विप्र ॥ लेखा नाहीं तयांसी ॥८१॥
सकळांचीं भोजनें जाहल्यावरी ॥ मग पांडवां सहित पूतनारी ॥ कुंती द्रौपदी सुंदरी ॥ पंक्तीसी बैसती आठही जणें ॥८२॥
कृष्णपंक्तीसी भोजन ॥ ब्राह्मादिकां न घडे पूर्ण ॥ धन्य धन्य ते पंडुनंदन ॥ जगज्जीवन वश ज्यांतें ॥८३॥
नित्य ब्राह्मणांच्या होती पंक्ती ॥ स्वयें उच्छिष्ट काढी श्रीपती ॥ ज्यासी वेदशास्त्रें वाखाणिती ॥ अगाध कीर्ति अनुपम ॥८४॥
ठेवूनि थोरपणाची प्रौढी ॥ द्वारकाधीश पात्रें काढी ॥ लाहेंलाहें तांतडीं ॥ पुढती पंक्ति बैसा वया ॥८५॥
उच्छिष्टें काढितां जगन्मोहन ॥ ठायीं ठायीं लेपलें अन्न ॥ अन्न ब्रह्मरूप मी संपूर्ण ॥ ऐक्यरूप दावीतसे ॥८६॥
एके पंक्तीसी लक्ष बाह्मण ॥ ऐशा अमित पंक्ति पूर्ण ॥ कोटिसंख्या होतां जाण ॥ स्वर्गीं घंटा वाजे एकदां ॥८७॥
त्यावरूनि कळे गणित ॥ मग धर्म राज संतोषत ॥ म्हणे श्री कृष्णा तुज हो प्रीत्यर्थ ॥ विश्वंभरा विश्वेशा ॥८८॥
तो महोत्साह पहा वया जाण ॥ तेथें आला वेद व्यास नंदन ॥ जो योगियां माजी मुकुट रत्न ॥ चंड किरण दुसरा पैं ॥८९॥
काम क्रोध जेणें जिंकिले ॥ रंभेनें नानापरी छळिलें ॥ परी नाहीं चित्त चळलें ॥ मन आकळिलें जयानें ॥९०॥
जो चिदंबरींचा निशाकर ॥ कीं अपरोक्षज्ञानाचा समुद्र ॥ कीं शांतीचा पूर्णागर ॥ शुकरूपें टवटवला ॥९१॥
असो यज्ञ मंडप द्वारीं क्षणैक ॥ उभा राहिला श्री शुक ॥ तों मंडप घसणी होतसे देख ॥ मार्ग न दिसे जावया ॥९२॥
श्री शुक विचारी मनांत ॥ धर्म केवळ श्री कृष्ण भक्त ॥ तेथींचा प्रसाद मज होईल प्राप्त ॥ तरी सार्थक जन्माचें ॥९३॥
श्री कृष्ण जेथें उच्छिष्टें काढीत ॥ पडले पत्रावळींचे पर्वत ॥ शुक योगींद्र बैसोनि तेथ ॥ उच्छिष्ट शितें भक्षीतसे ॥९४॥
मुखी घालितां एक ग्रास ॥ स्वार्गीं घणघणा घंटाघोष ॥ कदा न राहे आसमास ॥ गजर विशेष जाहला ॥९५॥
श्री कृष्णासी धर्मराज बोलत ॥ हें काय जी वर्तलें अद्भुत ॥ स्वर्घंटाघणघणाट किमर्थ ॥ सांगें स्वामी याद वेंद्रा ॥९६॥
कोटी ब्राह्यण जेवितां ॥ एक नाद होय तत्त्वतां ॥ आतां कदान राहे वाजतां ॥ जगन्नाथा नवल हें ॥९७॥
हरि म्हणे येथें तत्त्वतां ॥ जेविला असेल ब्रह्मवेत्ता ॥ ब्रह्म वेत्त्यासी वंदिती माथां ॥ ब्रह्मा दिक सहस्त्राक्ष ॥९८॥
ब्राह्मण जे कां यातिमात्र ॥ ते एकशत साचार ॥ त्यांतुल्य एक वेदज्ञ विप्र ॥ ग्रंथत्रयीं ज्ञान ज्याचें ॥९९॥
वेदज्ञाहूनि शत गुणें बहुत ॥ जो वेदार्थ करणार पंडित ॥ त्याहोनि अनुष्ठानी क्रियावंत ॥ शत गुणें आगळा ॥१००॥
अनुष्ठानियाहूनि शत गुणें आगळा ॥ एक इंद्रियजित बोलिला ॥ त्यांत शत गुणें विष्णु भक्त सत्त्वाथिला ॥ जो भेदरहित निर्मत्सर ॥१०१॥
त्याहूनि शत गुणें विशेष शुद्ध ॥ एक जाण तो ब्रह्मानंद ॥ ज्याचे द्दष्टीसी भेदाभेद ॥ कदा जनीं दिसेना ॥१०२॥
ऐसा ज्ञानिया तुझे घरीं ॥ तृप्त जाहला आजि निर्धारीं ॥ ऐकें चौघे जण या पृथ्वीवरी ॥ ब्रह्मज्ञानी अद्भुत ॥१०३॥
कपिल याज्ञवल्क्य शुक ॥ श्री दत्तात्रेय चौथा देख ॥ जो परिपूर्ण ज्ञानार्क ॥ अत्रितनय अवतरला ॥१०४॥
धर्म हरिचरन द्दढ धरीत ॥ जो येथें जाहला जी तृप्त ॥ तो मज दाखवीं निश्चित ॥ म्हणोनि आळी घेटली ॥१०५॥
मग धर्माचा धरूनि हस्त ॥ वेगें दोघे बाहेर येत ॥ तों रूप पालटोनि व्याससुत ॥ वेगें वेंचीत उच्छिष्टशितें ॥१०६॥
श्रीहरि म्हणे धर्मा देख ॥ हा व्या सपुत्र महाराज शुक ॥ ऐकतां धर्में धांवोनि निःशंक ॥ चरण धरिले तयाचे ॥१०७॥
शुक मागें पाहे परतोन ॥ तों उभा देखिला जगन्मोहन ॥ दोघांसी जाहलें आलिंगन ॥ प्रेमें करून सद्नद ॥१०८॥
सवेंचि धर्मासी भेटला ॥ धर्में शुकाचा हस्त धरिला ॥ मग मंडपांत आणुनि बैसविला ॥ सिंहासनीं सुवर्णाचे ॥१०९॥
शुक देखतांचि द्दष्टीं ॥ आनंदल्या ऋषींच्या कोटी ॥ मग धर्माहातीं जगजेठी ॥ पूजन करवी शुकाचें ॥११०॥
असो एक संवत्सर लोटला ॥ राज सूययज्ञ संपूर्ण जाहला ॥ तेथींचा वर्णावया सोहळा ॥ शेषही शक्त नव्हेचि ॥१११॥
भीष्म निरोपी धर्मातें ॥ आहेर अर्पीं समस्तांतें ॥ सकल बैसवूनि मयसभेतें ॥ तेथींचीं कौतुकें दाखवावीं ॥११२॥
असो राज सूययज्ञा जे जे आले ॥ तितुके सभेसी आणिले ॥ राजे ऋषी बैसविले ॥ ठायीं ठायीं सभास्थानीं ॥११३॥
धर्में अहेर सिद्ध केले ॥ वस्त्राभरणांचे पर्वत पडिले ॥ मुख्य सिंहासन मध्यें घातलें ॥ अग्रपूजा करावया ॥११४॥
भीष्म म्हणे धर्मराया ॥ आचार्य ऋत्विज ऋषिवर्यां ॥ यथा योग्य पाहूनियां ॥ पूजा समग्र समर्पीं ॥११५॥
पुरुषांलागीं सप्त भूषणें ॥ तीन वस्त्रें कनकवर्णें ॥ द्वादशांगीं अलंकार लेणें ॥ स्त्रियांसी देणें तैसेंचि ॥११६॥
अंतर्वसन बहिर्वसन ॥ कंचुकी वैरणें प्रावरण ॥ पंचवसनें संपूर्ण ॥ स्त्रियांलागीं देईं कां ॥११७॥
तों धर्म कुरुनायका ॥ माझिया जनका चिया जनका ॥ अग्रपूजेचा अधिकारी देखा ॥ कोण मज निरोपी ॥११८॥
भीष्म म्हणे पंडुसुता ॥ या श्री कृष्णाहूनि परता ॥ हें ब्रह्मांड शोधितां ॥ श्रेष्ठ नाहीं आणिक ॥११९॥
हा जलजोद्भवाचा जनिता ॥ अपर्णापती वंदी माथां ॥ शक्रपद पाहतां ॥ कृपेनें याणें दीधलें ॥१२०॥
जो जगदंकुरमूलकंद ॥ जो त्रिभुवन मंदिरस्तंभ अभेद ॥ जो विश्वंभर ब्रह्मानंद ॥ याहूनि थोर कोण असे ॥१२१॥
ह्रदय वैकुंठपीठा आंत ॥ जें विरिंचीचें आराध्यदैवत ॥ अंतःकरण संबळींत वाहत ॥ अनका दिक अत्यादरें ॥१२२॥
हाचि मूल मायेचा भर्ता ॥ हाचि अनंत ब्राह्मांडांचा कर्ता ॥ कैवल्य भांडारींचें ठेवणें तत्त्वतां ॥ भक्तांलागीं सगुण होय ॥१२३॥
वेद पुराण आणि शास्त्र ॥ आग्रहें करितीं अर्थ विचित्र ॥ तो हाचि जाण कोमलगात्र ॥ राजीवनेत्र श्री कृष्ण ॥१२४॥
त्वंपद तत्पद असिपद ॥ यंहूनि वेगला शुद्ध बुद्ध ॥ वेदांतशास्त्र ॥ गर्जें अगाध ॥ तो हा गोविंद ओळखें ॥१२५॥
मीमांसक स्थापिती कर्म ॥ ज्यालागीं आचरावें आचरावे स्वधर्म ॥ तो हा जाण पुरुषोत्तम ॥ पूर्ण ब्रह्म सर्वेश ॥१२६॥
नैयायिक म्हणती कर्ता ईश्वर ॥ जीवासी न कळे स्वरूप अपार ॥ तो हाचि जाण श्री करधर ॥ पूर्णावतार परमात्मा ॥१२७॥
प्रकृति पुरुषांचा ऐक्यार्थ ॥ सांख्यशास्त्र असे गर्जत ॥ तो हा क्षीराब्धीचा जामात ॥ रुक्मिणी सहित अवतरला ॥१२८॥
व्या कर्ण शास्त्रीं सप्तविभक्ती ॥ नाना सूत्रें नामें साधिती ॥ तोचि हा कंसांतक यदुपती ॥ अमूर्त मूर्तत्वासी पावला ॥१२९॥
अष्टांगयोगादि साधन ॥ पातंजलशास्त्रीं हेंचि कथन ॥ तो योग साधूनि चरण ॥ याचेचि पाविजे निर्धारीं ॥१३०॥
शैव यासी म्हणती शिव ॥ वैष्णव भाविती माधव ॥ सौर म्हणती सविता स्वयमेव ॥ तो हा केशव जाण पां ॥१३१॥
गाणपत्य म्हणती गणेश ॥ तो हा जाण द्वारकाधीश ॥ शाक्त म्हणती शक्ति विशेष ॥ माया विलास हाचि दावी ॥१३२॥
संतांचे ह्रदयींचें जीवन ॥ जो समरधीर दुष्ट भंजन ॥ तुमचे द्दष्टीसी सोयरा पूर्ण ॥ जगद्भुषण दिसे हा ॥१३३॥
जे दुर्जन दुरात्मे पामर ॥ ते यासी म्हणती कपटी दुराचार ॥ हा जगद्नुरु यादवेंद्र ॥ जो मुरहर मधुसूदन ॥१३४॥
त्या श्री कृष्णासी टाकून ॥ कोणाचें करिसी येथें पूजन ॥ ऐसें बोलतां गंगा नंदन ॥ सहदेवें पूजा सिद्ध केली ॥१३५॥
अग्रोदकाचा भरूनि कलश ॥ षोडशोपचार जे जे विशेष ॥ पूजावया आदिपुरुष ॥ धर्मराज सिद्ध जाहला ॥१३६॥
सुगंध चंदन पात्र घेऊन ॥ उभा ठाकला भीम सेन ॥ सुवा सपुष्पमाला धरून ॥ पार्थ उभा आवडीं ॥१३७॥
हिर्यांची तिवई तिवई अढळ ॥ लाहेंलाहें मांडी नकुळ ॥ क्षीरोदक वसन निर्मळ ॥ घडी घातली तयावरी ॥१३८॥
धर्म म्हणे यदुकुलतिलका ॥ या चौरंगीं बैसोनि मन्मथ जनका ॥ पूजा घ्यावी वैकुंठनायका ॥ कर्ममोचका मुरारे ॥१३९॥
पुढील कार्य जाणोनि साचार ॥ आग्रह न धरी श्री करधर ॥ पूजासनीं बैसला यादवेंद्र ॥ जय जय कार जाहला ॥१४०॥
प्रतिविंध्या दिक द्रौपदीचे कुमार ॥ वेगें धरिती छत्रचामर ॥ वाळ्याचे विंजणे सुखकर ॥ दोहींकडे वारिताती ॥१४१॥
सुभद्रेचा पुत्र अभिमन्य ॥ उभा ठाकला पादुका घेऊन ॥ भीष्म विदुरादि अवघे भक्तजन ॥ उभे ठाकले आवडीं ॥१४२॥
वेष्णव कीर्तन करिती ॥ हरिरंगें आनंदें नाचती ॥ विष्णु चरित्रें अद्भुत गाती ॥ टाळ्या वाजविती आनंदें ॥१४३॥
विमानीं पाहती सुरवर ॥ वर्षती सुमनांचे संभार ॥ सनका दिकांचे नेत्र ॥ प्रेम जलें पूर्ण भरले ॥१४४॥
नाना वाद्यांचा गजर होत ॥ बंदी जन यदुवंश वर्णींत ॥ षोडशोपचारें इंदिराकांत ॥ धर्म पूजीत ते वेळे ॥१४५॥
हरिचरण धरूनि हातीं ॥ प्रेमें प्रक्षाली धर्मनृपती ॥ जेथीनि जान्हवीची उत्पत्ति ॥ जे सदा तळहातीं सिंधु कन्या ॥१४६॥
सद्नुरूसी शरण जाऊन ॥ ज्ञानें ओळखिजे निर्गुण ॥ यापरीस गोड सगुण ॥ भक्तांलागीं अवतरला ॥१४७॥
जो पुराण पुरुष परात्पर ॥ जो आनकदुंदुभीचा कुमार ॥ हेरंबजननीचा वर ॥ ह्रदयीं ध्याय जयातें ॥१४८॥
केवल ब्रह्मानंद मुरोन ॥ मूर्ति ओतिली हे सगुण ॥ श्रुती सही न वर्णवे पूर्ण ॥ बुडे मन ज्यामाजी ॥१४९॥
तो अलंकार मंडित पूर्ण ॥ मुकुट कुंडलें सुहास्य वदन ॥ कृपाकटाक्षें करून ॥ निज भक्त न्याहाळीतसे ॥१५०॥
कपाळीं मृग मदाचा तिलक ॥ अंगीं केशर उटी सुरेख ॥ वैजयंतीचें तेज अधिक ॥ ह्रदयीं पद्क झळकतसे ॥१५१॥
मनोहर पीतवसन ॥ मुक्तालग पदक विराज मान ॥ उत्तरीयवस्त्र झळके पूर्ण ॥ जेवीं चपळा निराळीं ॥१५२॥
चरणीं ब्रीदें तोडर रुळती ॥ असुरांवरी गजर करिती ॥ ऐसा तो यादवेंद्र जगत्पती ॥ धर्मराजें पूजिला ॥१५३॥
श्री कृष्ण मूर्ति वर्णितां ॥ सहस्त्रवदन शिणला तत्ततां ॥ वेद भागला गीतीं गातां ॥ तया पूजिती पंडुसुत ॥१५४॥
वेदशास्त्र ग्रंथ पाहोन ॥ ज्यांचे शिणले सदा नयन ॥ ते श्री कृष्ण मूर्ति विलोकून ॥ ब्रह्मा नंदेम डोलती ॥१५५॥
जे वैराग्यें जाहले पूर्ण भरित ॥ जे तीर्थें हिंडती विरक्त ॥ तेही देखतां द्वारकानाथ ॥ श्रमरहित जाहले ॥१५६॥
जे जप तप अनुष्ठान ॥ कर्मकुशल करिती यज्ञ ॥ जे एकांतीं बैसले गुहा सेवून ॥ ते हरिरूप पाहोन निवाले ॥१५७॥
हेलावला सौंदर्य समुद्र ॥ कीं आनंदाचा लोटला ॥ पूर ॥ देखतां श्रीरंग पूर्ण पूर्ण चंद्र ॥ भक्तचकोर वेधले ॥१५८॥
तो वैकुंठींचा नृपवर ॥ बाह्मण देव अत्युदार ॥ जो ब्रह्मा नंद वेदांचें माहेर ॥ जो भ्रतार इंदिरेचा ॥१५९॥
कोटयनुकोटी मीन केतन ॥ नखांवरूनि सांडावे ओंवाळून ॥ त्याचें आपुले हातें पूजन ॥ पंडुनंदन करीतसे ॥१६०॥
वस्त्रें भूषणें अलंकार ॥ अर्पिले सोळाही उपचार ॥ करणां सहित मन सुकुमार ॥ सुमनें चरणीं समर्पिलीं ॥१६१॥
डोळे भरूनि हरि पाहिला ॥ तैसाचि ह्रदयीं मग रेखिला ॥ जैसा निर्वात स्थानीं दीप ठेविला ॥ तो कदाकाळीं न हाले ॥१६२॥
ऐसा पूजिला याद वेंद्र ॥ परी दुर्जन क्षोभले समग्र ॥ आतां शिशुपालाचें शिर ॥ उडवील साचार श्री कृष्ण ॥१६३॥
शत शिव्या देईल सभेंत ॥ शेवटीं तया मोक्ष प्राप्त ॥ ते सुरस कथा पंडित ॥ परिसोत अत्यादरें करू नियां ॥१६४॥
श्री धर वरद ब्रह्मा नंद ॥ जो अक्षय्य अभंग त्रिभुवनवंद्य ॥ पांडव गृहीं जग दंकुर कंद ॥ विराजे सदा स्वानंदें ॥१६५॥
सुरस पांडवप्रवात ग्रंथ ॥ सभापर्व व्यास भारत ॥ त्यां तील सारांश यथार्थ ॥ अष्टादशाध्यायीं कथियेला ॥१६६॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ सभापर्वटीका श्री धर कृत ॥ धर्में पूजिला द्वार कानाथ ॥ इतुका अर्थ यामाजी ॥१६७॥
इति श्री पांडवप्रताप अष्टादशाध्यायः ॥१८॥
N/A
References : N/A
Last Updated : February 08, 2012
TOP