मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय २५ वा

पांडवप्रताप - अध्याय २५ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥
बृहदश्वा म्हणे धर्मराजा ॥ सोमवंशविजयध्वजा ॥ पुण्यश्लोक भूभुजां ॥ माजी नल प्रथमचि ॥१॥
नैषधदेश परम पावन ॥ तेथील नराधिप वीरसेन ॥ चुतुःषष्टिकला प्रवीण ॥ नल नामा पुत्र त्याचा ॥२॥
चतुर्दश विद्या पारंगत ॥ बोलका जैसा अंगिरासुत ॥ स्वरूपासी तुलितां यथार्थ ॥ यंबरारि सरी न पावे ॥३॥
धनुर्वेदीम परम निपुण ॥ जाणे अश्वशिक्षापरीक्षालक्षण ॥ सर्व रायांत मुकुट रत्न ॥ शचीरमण पृथ्वीवरी ॥४॥
नव ग्रहांत वासरमणि देख ॥ कीं द्विजांत श्रेष्ठ विनायक ॥ कीं दंदशूकांत अधिक ॥ सहस्त्रशीर्ष प्रतापी ॥५॥
धनुर्धरांमाजी श्रेष्टी ॥ भूमिजावर कीं भुगुकुलवरिष्ठ ॥ समरांगणीं परम धीट ॥ जैसा ध्रुव न हाले ॥६॥
विदर्भदेशींचा राजेंद्रा ॥ भीमकनामा परम चतुर ॥ उदरीं नाहीं त्यासी पुत्र ॥ जाहलें विचित्र पूर्वदत्तें ॥७॥
घरा आला ऋषि दमन ॥ रायें पुजिला आदरें करून ॥ तेणें दिलें वरदान ॥ पुत्र तीन तुज होती ॥८॥
एक कन्या चारुगात्री ॥ जैसी इंदिरा इंदिरा इंदीवरनेत्री ॥ मित्र तुल्य पुत्र उदरीं ॥ सवेंचि जाहले तयातें ॥९॥
दम दान्त दमन ॥ दमयंती कन्या दिव्य रत्न ॥ लावण्य भूमीचें निधान ॥ आकर्ण नयन विराजती ॥१०॥
जाहली स्वरूपाची सीमा ॥ ते मृडानीची अपर प्रतिमा ॥ तिचें स्वरूप कमल जन्मा ॥ दुसरें निर्मूं न शकेचि ॥११॥
ते शतक्रतूची प्रिया ॥ कीं अवतरली अब्जतनया ॥ बहुत वर्णिती वरारोहा ॥ इची प्रतिमा नसेचि ॥१२॥
देवगंधर्व कन्या नागिणी ॥ इच्या दासी शोभती पद्मिणी ॥ अत्रिस्त्रुषा लावण्य खाणी ॥ स्वरूप पाहोनि लज्जित ॥१३॥
चक्षुश्रव्याची कुमारी ॥ वृत्रारिशत्रूची अंतुरी ॥ द्विदशनेत्राची नारी ॥ न पवे सरी इयेची ॥१४॥
तारकारिजन कशत्रुप्रिया ॥ स्वरूपें वर्णिल्या बहुत स्त्रिया ॥ गुणें स्वरूपें दमयंतीनें तयां ॥ लघुत्व सर्वां आणिलें ॥१५॥
भाळीं आरक्त अक्षय्य रत्न मणी ॥ द्विज जैसे हिर्‍यांची खाणी ॥ बोलतां प्रकाश पडे धरणीं ॥ तटस्थ नयन पाहतां ॥१६॥
शशिकला तेजस्वी षोडश ॥ चिरूनि केले द्विज बत्तीस ॥ कलंक भरिला संधीस ॥ अति राजस दिसती ते ॥१७॥
सव्यहस्तींची अंगुलिका ॥ सुधारस स्त्रवत देखा ॥ स्पर्शतां कुणपाचिया मुखा ॥ प्राण परते सवेंचि ॥१८॥
मृग मीन कल्हार खंजन ॥ ओंवाळावे नयनां वरून ॥ विराजए सोगयाचेम अंजन ॥ मीन केतन देखोनि नाचे ॥१९॥
एक कोशपर्यंत ॥ अंगींचा सुवास धांवत ॥ पदमुद्रा उमटत ॥ चालतां आरक्त भूमीवरी ॥२०॥
द्विजेंद्र लज्जित देखतां वदन ॥ मृगेंद्र लज्जित कटि पाहून ॥ करींद्र गमनातें देखोन ॥ लज्जायमान सहजचि ॥२१॥
कुरलकुंतलीं जिंकिलें मिलिंदचक्र ॥ कामांकुशीं मंदले मय़ूर ॥ अंगिरातनुजकवींद्र ॥ कर्ण भूषणीं राहिले ॥२२॥
विचित्र शक्रसायकासन ॥ त्यासी सिंदूररेखा आणी न्यून ॥ मनसिज आपुला प्राण ॥ ओंवाळील देखतां ॥२३॥
ऐसी तिची रंगप्रभा ॥ आणिली लेणियां दिव्य शोभा ॥ चामीकरतत्त्वगाभा ॥ तैसी कांति तियेची ॥२४॥
भोंवत्या सख्या रंजविती ॥ श्रृंगाररस एक गाती ॥ सकल नृपांत विशेष वर्णिती ॥ सौंदर्यकीर्ति नलाची ॥२५॥
ऐकतां नलाचें वर्णन ॥ भैमीचें गुंतलें तेथें मन ॥ इकडे नैषध सदनीम अनुदिन ॥ सख्या वर्णिती दमयंतीतें ॥२६॥
ऐकतां वैदर्भीचा श्रृंगार ॥ विरहे व्यापला वीरसेनकुमार ॥ एके दिक्शीं तो नृपवर ॥ मृगयेलागीं चालिला ॥२७॥
तों देखिल्या हंसपंक्ती ॥ शुद्ध श्वेत तयांची अंगकांती ॥ कीं निर्दोष यश निश्चितीं ॥ हंस सर्व लेइले ॥२८॥
शात कुंभ प्रभेसमान ॥ पक्ष झळकती विराजमान ॥ चरण आणि नयन ॥ प्रवाल मण्यांसारिखे ॥२९॥
नलकरपंकजीं मुक्तमाळ ॥ कविगुरुऐसीं मुक्तें तेजाळ ॥ देखोनि एक हंस तत्काळ ॥ नळाचे करीं आरूढला ॥३०॥
मनुष्यवाणी हंस बोलत ॥ नैषधा न करीं माझा घात ॥ दमयंती होईल तुज प्राप्त ॥ ऐसा प्रमत्न करीन मी ॥३१॥
नळें ऐसी ऐकता वाणी ॥ म्हणे तूं आवडसी प्राणाहूनी ॥ तरी तूं आतां विलंब टाकूनी ॥ वैदर्भदेशा प्रति जाईं गा ॥३२॥
अवश्य म्हणोनि त्वरित ॥ उडाला सकल हंसांसहित ॥ नगरा बाहेर राहिले समस्त ॥ मुख्य तो जात भैमीगृहा ॥३३॥
दिव्य मराळ देखोनियां ॥ सख्या धांवती धरावया ॥ मग दमयंतीनें जाऊनियां ॥ प्रार्थूनि जवळी आणिला ॥३४॥
कोमल हस्तें कुरवाळीत ॥ पंडिता ऐसा हंस बोलत ॥ म्हणे मृगशावाक्षी ऐक मात ॥ मी आहे हिंडत त्रिभुवनी ॥३५॥
उदंड देखिले भूभुज ॥ परी नळ ऐसा नाहीं तेजः पुंज ॥ ज्याचें विलोकितां वदनां बुज ॥ मीनध्वज खालीं पाहे ॥३६॥
क्षीराब्धींत कलंक धुऊन ॥ बाहेर निघाला रोहिणीरमण ॥ तैसें नैषधाचें वदन ॥ पाहतां मन उल्हासे ॥३७॥
कोंदणावरी बैसे हिरा ॥ तैसी तूं होईं त्याची दारा ॥ जैसा श्रीरंग आणि इंदिरा ॥ तैसी शोभा दिसेल ॥३८॥
मग ते विदर्भराजबाळी ॥ श्रृंगारसरोवरमराळी ॥ म्हणे हंसोत्तमा ये काळीं ॥ मनोवेगें जाईं कां ॥३९॥
नैषधराज वर होय पूर्ण ॥ ऐसे करीं त्वरें जाऊन ॥ कीर्ति ऐकोनि तृप्त जाहले कर्ण ॥ परी उदित मन पहावया ॥४०॥
गगनमार्गें हंस सत्वरा ॥ आला तत्काल नैषध मंदिरा ॥ नल ह्रदयीं धरूनि मित्रा ॥ समाचार पुसतसे ॥४१॥
हंस म्हणे जलाविण ॥ तळमळत जैसा मीन ॥ तैसी विरहज्वरें करून ॥ विदर्भकन्या जाहली ॥४२॥
रतिवर शत्रूभूषण कुमारी ॥ सखिया देती न अंगीकारी ॥ लोक  प्राणेशवनजात सुंदरी ॥ त्यागिली दूरी विरहज्वरें ॥४३॥
त्रयोदश करूनि चतुर्गुण ॥ भोगिवेष्टित जो तरु जाण ॥ तुझ्या विरहें करून ॥ पंक त्याचा न शिवेचि ॥४४॥
आसन शयन भोजन ॥ विषतुल्य मानी तुजविण ॥ सुमनहार पावकासमान ॥ तैसे भासती तियेतें ॥४५॥
जल जवदन आरक्त ओंठ ॥ जलजवत शोभे कंठ ॥ जलजमाल अवीट ॥ तोडूनि टाकी तव विरहें ॥४६॥
जलाविराहित दिव्यान्न ॥ तैसी ते जाहली तुजविण ॥ अनलवत भोग पूर्ण ॥ नलावीण मानी ते ॥४७॥
इकडे भैमीच्या सख्या जाण ॥ भीमकासी सांगती वर्वमान ॥ तुझे कन्येसी ध्यान ॥ नैषधाचें लागलें ॥४८॥
रायें आरंभिलें स्वयंवर ॥ भूभुजांसी पत्रें लिहिलीं सत्वर ॥ छप्पन्न देशींचे नृपवर ॥ येते जाहले तेधवां ॥४९॥
आपलाले पृतनेसहित ॥ नृप आले असंख्यात ॥ द्वादशगांव पर्यंत ॥ नगरा भोंवतीं उतरलें ॥५०॥
यथा कुल यथाशील ॥ रायें नृप पूजिले सकल ॥ तों नारद अमरावतींत तत्काल ॥ सहस्त्रक्षा जाणवीत ॥५१॥
मही रत्नां माजी निर्दोष ॥ वैदर्भराज अति विशेष ॥ त्याची कन्या बहु रूपस ॥ ते प्रत्यक्ष इंदिरा दुजी ॥५२॥
नलनृपति परम सुंदर ॥ मानसीं इंच्छीत भ्रतार ॥ भीमकें मांडिलें स्वयंवर ॥ भूभुज अपार मिळालें ॥५३॥
तिच्या स्वरूपाची दुजी प्रती ॥ नाहीं नाहीं त्रिजगतीं ॥ ऐसी साक्ष देत सरस्वती ॥ विश्व्तोमुखीं शचीवरा ॥५४॥
भाळीं रत्न मणितिलक विशेष ॥ सव्यकराग्रीं वसे सुधारस ॥ ऐकतां शक्राचें मानस ॥ पाहों इच्छीत तियेतें ॥५५॥
पुरंदर राम कृशान वरुण ॥ वैदर्भनगरा आले चौघे जण ॥ तों त्याचि मार्गें करून ॥ नैषधराजा येतस ॥५६॥
किरणचक्रीं विराजे मित्र ॥ तैसा चमूसहित राजेंद्र ॥ पंचवदनारीहूनि सुंदर ॥ देखोनि शक्रादि पुसताती ॥५७॥
म्हणती पुण्य श्लोका तूं कोण ॥ तो म्हणे मी नळ वीरसेननंदन ॥ मम स्वरूपीं वेधलें भैमीचें मन ॥ म्हणोनि जातों स्वयंवरा ॥५८॥
शक्र म्हणे तूं पुण्य शील ॥ ऐसें लोक वर्णिती सकल ॥ तरी आमुचें दूतत्व निर्मल ॥ निष्कपट तुवां करावें ॥५९॥
इंद्र अग्नि यम वरुण ॥ आम्ही दिक्पाल चौघे जण ॥ तरी ते दमयंती बोधून ॥ वश करीं आम्हांतें ॥६०॥
चौघांत एकासी घालील माळ ॥ ऐसें करीं तूं पुण्य शीळ ॥ आपुला स्वार्थ सांडोनि सकळ ॥ कार्य साधीं एवढें ॥६१॥
नळ म्हणे अंतःपुरांत ॥ मी कैसा जाऊं तेथ ॥ मग वर देत अमरनाथ ॥ न दिससी सत्य कोणी तूं ॥६२॥
एक भैमी वेगळी करून ॥ होईल समस्तां द्दष्टिबंधन ॥ मग एकलाचि नळ तेथून ॥ आला वैदर्भ मंदिरा ॥६३॥
तों अनंतशक्तीं समवेत ॥ त्रिपुरसुंदरी विराजत ॥ स्वरूपीं ओतिले कोटि मन्मथ ॥ तैसी शोभत दमयंती ॥६४॥
शरत्कालींचा चंद्र देख ॥ पाहतां पाहतां वाटे सुख ॥ तैसें तिचें पाहतां श्री मुख ॥ अति आल्हाद नळातें ॥६५॥
तो मुख मृगांक देखोन ॥ चकोर जाहले नैषधन नयन ॥ तयासी वैदर्भीनें पाहून ॥ कामानलें आहाळली ॥६६॥
म्हणे लावण्य गुण निधाना ॥ मम ह्रदया नंदन र्धना ॥ वेध लाविला मम नयनां ॥ बोल वचना कोण तूं ॥६७॥
भैमीच्या सख्या सकळ ॥ तन्मया जाहल्या पाहतां नळ ॥ म्हणती धन्य माउली वेल्हाळ ॥ ऐसा पुत्र प्रसवली ॥६८॥
किती तपें आचरिलीं साचार स कीं अर्चिले रमावर उमावर ॥ कीं दिव्य रत्नीं वसुधामर ॥ तोषविले पूजोनियां ॥६९॥
कीं यथोक्त व्रतें केलीं विचित्र ॥ तरी पावली ऐसा दिव्य पुत्र ॥ याचे पाटीं जे बैसेल पवित्र ॥ तेही धन्य त्रिभुवनीं ॥७०॥
यावरी तो गुणाढय विशेष ॥ भैमीप्रति बोले सुरस ॥ वरुण कृशान यम देवेश ॥ त्यांचा दूत असें ॥७१॥
मी नलनामा वीरसेन सुत ॥ परी लोकपालांचें केलें दूतत्व ॥ ऐकोनि तुझें सुंदरत्व ॥ वरूं इच्छिती शुभानने ॥७२॥
त्यांच्या वरेंकरूनि सत्य ॥ कोणी न देखतां आलों गुप्त ॥ तरी त्या चौघांत त्वरित ॥ एकासी वरीं गुण सरिते ॥७३॥
यावरी वैदर्भी बोले वचन ॥ जेणें निवती नैषध कर्ण ॥ तनुमनधनाशीं शरण ॥ तुज निघालें नृपश्रेष्ठा ॥७४॥
चापाहूनि सुटे बाण ॥ तो केवीं परते मागुतेन ॥ तैसें तुज समर्पिलें मन ॥ जैसें लवण सागरीं ॥७५॥
नळावांचोनि पुरुषमात्र ॥ पिता बंधु किंवा पुत्र ॥ आणिक इच्छीन दुजा वर ॥ तरी हे रसना झडेल ॥७६॥
हंस परम सज्ञान ॥ तेणें सांगितलें वर्तमान ॥ हें स्वयंवर आरंभिलें पूर्ण ॥ तुज लागुन वरावया ॥७७॥
नेषधा सुंदरा चारुगात्रा ॥ लावण्यकोशा आकर्णनेत्रा ॥ चामीकरवर्णा सुहास्यवक्रा ॥ माझ्या अंतरा शोधिसी काय ॥७८॥
तूं न वरिसी मजलागून ॥ तरी आतांचि त्यागीन मी प्राण ॥ स्वर्गींच्या देवांशीं कारण ॥ मज नाहीं  नृपवरा ॥७९॥
मीनासी पाहिजे जल उत्तम ॥ घृतसिंधूचें काय काम ॥ दधिमधुसुधासरोवरें उत्तम ॥ वर्णितां त्यासी न मानती ॥८०॥
वैदर्भी बोले कर जोडून ॥ मी त्या लोकपालांसी करीन नमन ॥ परी कायवाचामनें जाण ॥ जाया तुझी जाहलें ॥८१॥
आतां विनंती हेचि निश्चित ॥ आपण बैसावें लोकपालांत ॥ त्यांदेखतां त्वरित ॥ तुज वरीन नृपवर्या ॥८२॥
ऐसें ऐकतां वेगेंशीं ॥ नळ आला देवांपाशीं ॥ होऊनि निष्कपट मनसी ॥ जाहलें तेंचि कथियेलें ॥८३॥
म्यां तुमचें केलें वर्णन ॥ भैमी म्हणे तुजचि वरीन ॥ लोकपाळांसी बैसवून ॥ स्वयंवराभेंत तत्त्वतां ॥८४॥
तुमचे वंदोनि चरण ॥ म्हणते मजलाचि माळ घालीन ॥ निष्कपट नैषध पूर्न ॥ इंद्रादिकांसी समजलें ॥८५॥
इकडे पृथ्वीचे भूभुज ॥ सभेसी बैसले तेजःपुंज ॥ बहुत बैसले तपस्वी द्विज ॥ शापानु ग्रह समर्थ जे ॥८६॥
अनर्घ्य रत्न पहावया जवळी ॥ मिळे जैसी परीक्षक मंडळी ॥ कीं सिद्धांभोवतीं पाळी ॥ साधकांची विराजे ॥८७॥
तों नैषधासमवेत तत्काळ ॥ सभेसी बैसती लोकपाळ ॥ परी औघेही जाहले नळ ॥ पूर्वरूप पालटूनि ॥८८॥
कीं रगवले पंचादित्य ॥ एक रूप तेजाद्भुत ॥ तों लावण्यहरिणी अकस्मात ॥ माळ घेऊन पातली ॥८९॥
ते लाव्ण्या मृताची पुतळी ॥ कीं सौदामिनी दिव्य प्रकटली ॥ मृगशावाक्षी सभा न्याहाळी ॥ तों पंच नल देखिले ॥९०॥
परम दचकली मनांत ॥ म्हणे पांचही नैषध बैसले येथ ॥ मुख्य यांत वीरसेन सुत ॥ कैसा कळेल मज आतां ॥९१॥
कमला धवा कमला सना ॥ मी अनन्य शरण तुझिया चरणा ॥ मुख्य वीरसेननंदना ॥ मज दाखवीं ये वेळे ॥९२॥
यम वरुणाग्ने सहस्त्र नयना ॥ मी तुमची असें कन्या ॥ मज नैषधाहातीं देऊनियां ॥ नळ जामात करा आपुला ॥९३॥
नलचरणीं असेल माझें मन ॥ तरी देवचिन्हांचें होय ज्ञान ॥ पाहे चौघांकडे विलोकून ॥ तंव नेत्रपातीं न हालती ॥९४॥
अंतरिक्ष आसनें असती ॥ छाया नाहीं पडली जगतीं ॥ भूमीवरी बैसला नैषधपती ॥ लक्षी दमयंती निश्चयें ॥९५॥
ते सौंदर्य कासारमराळी ॥ सौभाग्य गंगा वैदर्भबाळी ॥ गजगमना नळ न्याहाळी ॥ मग माळ वेगेंशीं ॥९६॥
एक सरें वाजती वाद्यें नाना ॥ भेरी ठोकिल्या चंद्रानना ॥ प्रति शब्द न माये गगना ॥ सोहळा कोणा न वर्णवे ॥९७॥
राजे तळमळती मनांत ॥ गेली हातींची अनर्घ्य वस्त ॥ वोहरें उठोनि त्वरित ॥ नमन करिती लोकपाळां ॥९८॥
लोकपाळ संतोषले सत्वर ॥ नळासी देती अष्ट वर ॥ गुप्त व्हावें प्रकट व्हावें गति अपार ॥ स्मरतां अग्नि प्रकटावा ॥९९॥
सत्तव धैर्य पराक्रम पूर्ण ॥ रिक्तकुंभीं प्रकटावें जीवन ॥ हे अष्टवर देऊन ॥ अंतर्धान पावले ॥१००॥
वर्णिती नळाचें भाग्य अपार ॥ स्वस्थाना पावले नृपवर ॥ मग यथासांग सविस्तर ॥ चार दिवस लग्न जाहलें ॥१०१॥
आंदण दिधलें अपार ॥ गज रथ तुरंग यानें सुंदर ॥ दास दासी अलंकार ॥ वस्त्रा भरणां न गणती ॥१०२॥
दमयंती घेऊनि सांगातें ॥ नळ गेला स्वनगरातें ॥ राज्य केलें भूभुजनाथें ॥ भैमीकांतें तैसेंचि ॥१०३॥
दमयंती सह क्रीडतां काल ॥ संवत्सर मानी जैसें पळ ॥ जाहला इंद्रसेन कुमार वेल्हाळ ॥ कन्या जाहली इंद्रसेनी ॥१०४॥
इकडे लोकपाळ पातां जातां स्वर्गवाटे ॥ द्वापार कलि भेटती त्यां वाटे ॥ देव म्हणती बहु नेटें ॥ जातां कोठें सांगा हो ॥१०५॥
कलि म्हणे अवधारा ॥ जातों दमयंतीच्या स्वयंवरा ॥ देव म्हणती वीरसेन कुमारा ॥ वरिलें तिनें प्रीतीनें ॥१०६॥
ऐकतां कलि कोपला सबळ ॥ सांडूनि सुधापानी लोकपाळ ॥ मृत्यु लोकीं हा मानव नळ ॥ त्यासी माळ घातली ॥१०७॥
त्या नळासी दंड करून ॥ हिंडवीन मी रानोरान ॥ एक वस्त्र दोघां लावीन ॥ नेमें आणीन अवदशा ॥१०८॥
कलि म्हणे द्वापारास ॥ तूं होईं कपट पाश ॥ खेळतां जिंकोनि नळास ॥ राज्य भ्रष्ट करावें ॥१०९॥
मग द्वापार आणि कली ॥ गुप्त राहाती नळजवळी ॥ न्य़ून पाहती सदाकाळीं ॥ द्वादश वर्षें पर्यंत ॥११०॥
राजा नैषध पुण्य शीळ ॥ प्रजाप्रतिपालक दयाळ ॥ महायज्ञ करुनि सकळ ॥ देवद्विज तृप्त करी ॥१११॥
निर्दोष यश अक्षय्य कीर्ती ॥ सदा करी याचकांची तृप्ती ॥ निर्दयत्व अनाचार निश्चितीं ॥ सहसा नावडे नळातें ॥११२॥
भगवद्भजनीं परमादर ॥ सत्यवंत सदय अत्युदार ॥ दंडाविषयीं सूर्यकुमार ॥ वैश्वानर पवित्र तैसा ॥११३॥
कलि जपतां बहुत काळ ॥ लघुशंका करूनि आला नळ ॥ पादक्षालन न करितां उतावेळ ॥ संध्यावंदना बैसला ॥११४॥
इतुकें उणें उणें देखतां जाण ॥ कलीनें मांडिलें विंदाण ॥ दायाद एक आला दुरोन ॥ पुष्कर नाम तयाचें ॥११५॥
तयासी कलि म्हणत ॥ नळाशं तूम खेळें द्यूत ॥ द्वापार कपट अक्ष सत्य ॥ वृषभ तेथें होईन मी ॥११६॥
पुष्कर म्हणे वित्त नाहीं मज ॥ केवीं नळाशीं खेळूं पैज ॥ कलि म्हणे तूं होय सतेज ॥ पाठ तुझी राखितों मी ॥११७॥
पन्नास वृषस उभे करीं तत्त्वतां ॥ सर्व राज्य येईल तुझ्या हाता ॥ नैषधासी दवडोनि दिगंतो ॥ दरिद्रव्यथा पाववूं ॥११८॥
कक्षेसी अक्ष घेऊनि सत्वर ॥ नलरायासी भेटला पुष्कार ॥ म्हणे माझीं ही पन्नास ढोर ॥ उभीं करितों खेळें तूं ॥११९॥
मज हारी येतां ढोरें घेईं ॥ तुज म्यां जिंकिल्या राज्य देईं ॥ मग राज्य पदार्थ सर्वही ॥ हिरोनि नेले पुष्करें ॥१२०॥
वारी वारण पदाति रथ ॥ कोश देश गड दुर्ग अमित ॥ पुष्करें जिंकिलें समस्त ॥ चिंताग्रस्त लोक जाहले ॥१२१॥
समस्त प्रजा मिळोन ॥ नाळासी विनविती कर जोडून ॥ कपटद्यूत हें माजवून ॥ सर्वथाही खेळों नको ॥१२२॥
कलीनें व्यापिलें नळाचें मन ॥ प्रजांसी नेदी प्रतिवचन ॥ दमयंती समीप येऊन ॥ नृपालागीं विनवीत ॥१२३॥
म्हणे सकलनृपचक्रचूडामणी ॥ अमात्य विनविती कर जोडूनी ॥ पौरलोक व्याकुल मनीं ॥ न पाहसी कां नृपोत्तमा ॥१२४॥
सर्वथा न बोले नृपनाथ ॥ पणामागें पण हरत ॥ मग वार्ष्णेय सारथि सत्य ॥ बोलावीत दमयंती ॥१२५॥
म्हणे वेगें सिद्ध करीं स्यंदन ॥ इंद्रसेनी आणि इंद्रसेन ॥ दोन्ही बालकें नेऊन ॥ भींमकापाशीं घालावीं ॥१२६॥
नैषधें हरविलें सर्व ॥ आम्हांसी जगती नेदी ठाव ॥ बुडालें राजवैभव ॥ घोर कर्म ओढवलें ॥१२७॥
तें वाष्णेंयें ऐकोन ॥ दोन्ही बाळकें रथीं बैसवून ॥ विदर्भदेशासी नेऊन ॥ घालविलीं अति त्वरें ॥१२८॥
वर्तमान ऐकोनि सर्व ॥ शोकाकुलित भीमकराव ॥ म्हणे विनाशकालीं बुद्धीचें वैभव ॥ विपरीत जाहलें नळाचें ॥१२९॥
यावरी वार्ष्णेय सारथी ॥ ऋतुपर्ण अयोध्येचा नृपती ॥ सेवा अंगीकारूनि निश्चिती ॥ राहिला तो प्रस्तुत तेथें ॥१३०॥
इकडे पुष्कर सर्व हिरोन ॥ नैषधाप्रति बोले वचन ॥ घालीं दमयंतीचा पण ॥ नळ ऐकोन उगाचि ॥१३१॥
मग दोघांचीं भूषणें वस्त्रें ॥ हिरोनि घेतलीं पुष्करें ॥ म्हणे राज्यांतूनि त्वरें ॥ उठा जा तुम्ही आतांचि ॥१३२॥
पुष्करें धांडोरा पिटोन ॥ आज्ञापिले नगरजन ॥ जो नळाशीं करील भाषण ॥ त्यासी दंडीन क्षणार्धें ॥१३३॥
नगराबाहेरी तीन दिन ॥ राहती निराहार दीनवदन ॥ द्वारी उभें राहूं न देती जन ॥ बोलूं वचन न शकती ॥१३४॥
एक एक वसनवेष्टित ॥ अंग उघडें केश मुक्त ॥ प्राण क्षुधेनें  व्याकुल होत ॥ वनांतरीं प्रवेशती ॥१३५॥
तों देखिले शकुंत ॥ नैषध त्यांसी धरूं धांवत ॥ तंव ते दूर दूर पळत ॥ नैषध टाकीत वस्त्र वरी ॥१३६॥
अर्ध टाकिलें वसन ॥ पक्षी अवघे उडाले घेऊन ॥ नैषध जाहला तेव्हां दीनवदन ॥ पक्षी वचन बोलती ॥१३७॥
आम्ही पुष्कराचे अक्ष जाण ॥ घेऊनि जातों तुझें वसन ॥ एवं नळासी नारायण ॥ पाठमोरा जाहला ॥१३८॥
असो नैषधराज नग्न ॥ क्षुधातुर अत्यंत दीन ॥ तों कलि होऊनि मीन ॥ जलाबाहेर पडियेला ॥१३९॥
तो मत्स्य मारूनि त्वरित ॥ वैदर्भीपाशीं नळ देत ॥ म्हणे हा मत्स्य पचवूनि त्वरित ॥ पाक करीं वरानने ॥१४०॥
क्षुधेनें जाताती प्राण ॥ दमयंतीनें भाजिला मीन ॥ जलासमीप धुवावयालागून ॥ मृगशावाक्षी बैसली ॥१४१॥
मत्स्यमुखीं घालोनि अंगुळी ॥ दुर्गंधि धूत वैदर्भबाळी ॥ अमृत स्त्रवतां तत्काळीं ॥ मीन सजीव जाहला ॥१४२॥
न लागतां एक क्षण ॥ अगाध जीवनीं पळाला मीन ॥ देखोनि वीरसेननंदन ॥ परम क्षोभ पावला ॥१४३॥
म्हणे क्षुधेनें जाती माझे प्राण ॥ नष्टे कैसा हरविला मीन ॥ मग म्हणे हा विंध्याद्रि ओलांडून ॥ जाईं आपुल्या माहेरा ॥१४४॥
वैदर्भी बोले वचना ॥ म्हणे राजेंद्रचक्रमुकुटरत्ना ॥ चरुगात्रा विशालनयना ॥ गुणनिधाना मम प्रिया ॥१४५॥
हें शरीर आणि प्राण ॥ ओंवाळीन तुजवरून ॥ तव वदनसरोजीं माझे नयन ॥ मिलिंद होऊन लुब्धले ॥१४६॥
तुज दूःखसमुद्रीं लोटून ॥ जरी जाऊं इंच्छी माझें मन ॥ तरी हे रसना झडोना ॥ कीटक पडोत आतांचि ॥१४७॥
पाहतां तव वदनसुधाकर ॥ नृत्य करी मम मानसचकोर ॥ क्षणभरी न देखतां वक्र ॥ वाट नेत्र उन्मळती ॥१४८॥  
प्राणपतीचें भाग्य पाहूनी ॥ प्रीति करिती सर्व नितंबिनी ॥ भ्रतार दुःखी द्दष्टीं देखोनी ॥ जाती पापिणी टाकूनियां ॥१४९॥
मी वैदर्भराजनंदिनी ॥ मज प्रसवली नाहीं ऐसी जननी ॥ तुज सांडोनि घोर विपिनीं ॥ मी न जाईं जनकगृहा ॥१५०॥
अवंचक स्त्री मुख्यप्रधान ॥ होय मित्रांमाजी चूडारत्न ॥ सुखदुःखांची भागीण ॥ सांगातीण अंतकाळीं ॥१५१॥
ऐकोनि पद्माक्षीच्या निर्धारा ॥ नलनेत्रीं आल्या अश्रुधारा ॥ परी कलीच्या गति विचित्रा ॥ वियोग पाडिला क्षणार्धें ॥१५२॥
वैदर्भी म्हणे कमलेक्षणा ॥ मज मार्ग कां दाविसी क्षणक्षणा ॥ तरी जाऊं चला वैदर्भदर्शना ॥ राज्य सर्व ओपील तूतें ॥१५३॥
नैषध म्हणे अवदशा घेऊन ॥ केवीं तव जनका दावूं वदन ॥ हें न घडे मजपासून ॥ कल्पांतींही सुलक्षणे ॥१५४॥
क्षुधें उष्णें कष्टलों बहुत ॥ जलीं मत्स्य भाजला गेला सत्य ॥ पवन पक्षी वस्त्र हिरोनि नेत ॥ अर्ध दिधलें नेसावया ॥१५५॥
अस्ता गेला वासरणी ॥ पुढें शून्यमाळा देखिली नयनीं ॥ दोघें पहुडलीं तये स्थानीं ॥ अंगासी धरणी खुपतसे ॥१५६॥
दूःखें निद्रा आली दमयंतीप्रती ॥ नैषध जागा विचारी चित्तीं ॥ पाहूनियां वैदर्भीप्रती ॥ म्हणे मरण मज कां न ये ॥१५७॥
हे सकल प्रमदांची ईश्वरी ॥ इची प्रतिमा नाहीं उर्वीवरी ॥ अहा वैदर्भराजकुमारी ॥ धरणीवरी पडियेली ॥१५८॥
जिचे अंगींचा परम सुवास ॥ तिचे धुळींत लोळती केश ॥ हे ह्रषीकेश व्योमकेश ॥ काय दुःख पाहतां हें ॥१५९॥
मनीं विचारी वीरसेननंदन ॥ जाऊं इचा त्याग करून ॥ इचें दुःख माझे नयन ॥ शक्त न होती देखावया ॥१६०॥
हे पतिव्रतांत शिरोरत्न ॥ कोणी पुरुष करितां प्रयत्न ॥ द्दष्टीनें टाकील भस्म करून ॥ नलगे रक्षण दुजें कांहीं ॥१६१॥
तों कलीनें ए अवसरीं ॥ नळापुढें टाकिली सुरी ॥ अर्धवस्त्र छेदोनि निर्धारीं ॥ नळ तेथूनि निघाला ॥१६२॥
शतपदें गेला ते अवसरी ॥ गहिंवर दाटला अंतरीं ॥ परतोनि पाहे राजकुमारी ॥ अनाथापरी पडलीसे ॥१६३॥
क्षणक्षणां येत परतोनी ॥ अश्रुजीवनीं भिजे धरणी ॥ म्हणे अन्याय नसतां ये वनीं ॥ कैसी त्यागूं इयेतें ॥१६४॥
जिच्या अंगुष्ठावरून ॥ सांडणें करावा मीनकेतन ॥ जिचें वदनांबुज पाहोन ॥ रंभा उर्वशी लज्जित ॥१६५॥
स्वप्नांतही हे नसे त्याज्य ॥ देखिला नाहीं तैसा अन्याय ॥ जागृत जाहल्या करील काय ॥ प्राण देईल मजलागीं ॥१६६॥
पृथ्वी आप अनल अनिल गगन ॥ यांसी नळ प्रार्थी कर जोडोन ॥ वृकव्याघ्रादि प्राणी दारुण ॥ करा रक्षण इयेचें ॥१६७॥
मग कठिण करूनि मन ॥ प्रवेशला घोर विपिन ॥ आठवूनि वैदर्भीचे गुण ॥ करी रोदन राव तो ॥१६८॥
दमयंती जागी होत ॥ घाबरेपणें पाहे कान्त ॥ तों अर्धवस्त्र छेदूनि त्वरित ॥ टाकूनि गेला घोर वना ॥१६९॥
वक्षःस्थल बडवून ॥ भूमीसी पडे मूर्च्छा येऊन ॥ नैषधा नैषधा म्हणोन ॥ रानोरान हिंडतसे ॥१७०॥
लोभियांचें जैसें धन ॥ तस्करीं नेलें हिरोन ॥ तैसी वैदर्भी नाम घेऊन ॥ रजनीमाजी वनीं धांवें ॥१७१॥
अहा पुण्यश्लोका नलराया ॥ मी मुक्तकेशीं झाडीन तुझे पायां ॥ तुजवरूनि माझी काया ॥ कुरवंडी करीन आतांचि ॥१७२॥
हे नैषधा गुणसमुद्र ॥ कीं विनोद करिसी राजेंद्रा ॥ जवळी असोनि अति उदारा ॥ प्रत्युत्तरा न देसी ॥१७३॥
चरणीं चालतां श्रमली बहुत ॥ मूर्च्छना येऊनि वाटे पडत ॥ म्हणे हा नाथ हा नाथ ॥ म्हणोनि धांवत चहूंकडे ॥१७४॥
आंधलें सोडोनि वनांतरीं ॥ सांगाती गेला दुरिच्या दूरी ॥ तीच दमयंतीची परी ॥ अंत नाहीं शोकातें ॥१७५॥
तिचे सुकुमार चरण ॥ रुतती खडे कंटक तीक्ष्ण ॥ वैदर्भीची करुणा देखोन ॥ वृक्ष पक्षी गहिंवरती ॥१७६॥
वैरभाव टाकोनी ॥ सकल श्वापदें रडती ते क्षणीं ॥ सव्यापसव्या जाय घोर काननीं ॥ मार्ग कोठें दिसेना ॥१७७॥
वनीं हिंडतां वैदर्भबाळी ॥ अजगरें अकस्मात गिळिली ॥ नलराया धांव ये वेळीं ॥ अजगरें ग्रासिली तव प्रिया ॥१७८॥
कर्णीं ऐकतां करुणास्वर ॥ व्याध एक धांवला सत्वर ॥ तेणें शस्त्रें फाडोनि अजगर ॥ लावण्यगंगा सोडविली ॥१७९॥
व्याधें प्रक्षालूनि केलें सावधान ॥ म्हणे पद्माक्षी तूं आहेस कोण ॥ भैमीनें सांगितलें वर्तमान ॥ पूर्वींहून वर्तलें जें ॥१८०॥
देखोनि सौदर्य अपार ॥ व्याध जाहला कामातुर ॥ आलिंगन द्यावयासी सत्वर ॥ सरसावला पापी तो ॥१८१॥
मरण विसरूनि पतंग ॥ दीपास चुंबूं धांवे सवेग ॥ कीं राजहंसासी काग ॥ स्पर्शावया धांवला ॥१८२॥
असो वैदर्भीनें क्षोभूनि परम ॥ व्याध तत्काल केला भस्म ॥ जैसा पंचाननापुढें काम ॥ गेला दग्ध होऊनि ॥१८३॥
असो त्या घोर अरण्यांत ॥ दमयंती नलनाम घेत जात ॥ श्वापदें होती भयभीत ॥ स्वरूप देखतां भैमीचें ॥१८४॥
अर्धवस्त्र जात नेसोनी ॥ मुक्तकेशा पद्मनयनी ॥ श्वापदांप्रति पुसे वनीं ॥ नळ देखिला काय सांगा ॥१८५॥
मज कां न येचि मरण ॥ श्वापद हो भक्षा मजलागून ॥ हे विंध्याचला बोल वचन ॥ नलराव कोठें आहे पां ॥१८६॥
उत्तरपंथें जात दमयंती ॥ तों देखिल्या तापसंपक्ती ॥ जितेंद्रिय तपश्चर्या करिती ॥ पुसे त्यांप्रति कोमलांगी ॥१८७॥
तापसी म्हणती हे कोण मंगळा ॥ आमुची तपश्चर्या आली फळा ॥ कीं प्रणवरूपिणी वेल्हाळा ॥ महामाया आदिशक्ती ॥१८८॥
कीं हे साक्षात अपर्णा ॥ कीं पद्मजातजनकाची ललना ॥ कीं प्रत्यक्ष हे मित्रकन्या ॥ प्रसन्न व्हावया उतरली ॥१८९॥
कीं नळाची दमयंती ॥ जीस बहु काव्यकर्त वर्णिती ॥ तों समीप येऊनि जाहली पुसती ॥ देखिला नृपति नळ काय ॥१९०॥
कष्टी देखोनि अपार ॥ गहिंवरें दाटले वसुधामर ॥ म्हणती सौभाग्यसरिते तुझा प्राणेश्वर ॥ तुज सत्वर भेटेल हो ॥१९१॥
बालपद्मदलनयनी ॥ गेली विंध्याद्रि ओलांडूनी ॥ पुढें नदी तीरीं देखिले ते क्षणीं ॥ सौदागर उतरले ॥१९२॥
वणिक्पति मुख्य देख ॥ त्याचें नाम सार्थवाहक ॥ तो सर्व वस्तूंचा रक्षक ॥ गज तुरंग रथादि ॥१९३॥
त्यांची धरूनि संगती ॥ रजनी क्रमीत दमयंती ॥ तों वनींचें निरंकुश हस्ती ॥ उदकप्राशना तेथें आले ॥१९४॥
मत्तइभ नाटोपती कोण ॥ मारीत चालिले वणिकूसेना ॥ अंधारीं व्यक्त न दिसती कोणा ॥ महाप्रलय वर्तला ॥१९५॥
ठाव नेदी कोठें क्षिती ॥ महावनीं प्रवेशे दमयंती ॥ असो उगवला गभस्ती ॥ वणिक्‍ किंचित उरलै पैं ॥१९६॥
त्यांचे संगतीं सुंदरी ॥ पावली चैद्यवसूची पुरी ॥ नगरांत जातां झडकरी ॥ लोक अपार मिळाले ॥१९७॥
तेथें राजा सुबाहु थोर ॥ त्याचे मातेनें लक्षिली सुंदर ॥ धात्री पाठवूनि सत्वर ॥ उपरीवरी नेली ते ॥१९८॥
राजमाता पुसे प्रीतीनें ॥ तूं कोणाची सांग मृगलोचने ॥ अमरप्रभे सुहास्यवदने ॥ जाहलें येणें कोठोनि ॥१९९॥
मग वैदर्भी तेव्हां बोलत ॥ असंख्यालक्षणी माझा कांत ॥ कर्मभोगें जाहलें विपरीत ॥ आलें हिंडत अर्धवस्त्रीं ॥२००॥
मग बोले राजमाता ॥ मी शोधूनि आणीन तुझ्या कांता ॥ अथवा तोचि येईल तत्त्वतां ॥ तुजकारणें शोधीत ॥२०१॥
तुज देखोनि माये ॥ मज बहु स्रेह उपजला आहे ॥ तूं मजपाशीं सदा राहें ॥ कन्या माझी होय तूं ॥२०२॥
दमयंती बोले वचन ॥ न करीं मी कोणाचें उच्छिष्टभोजन ॥ अथवा पादप्रक्षालन ॥ न करीं भाषण कोणाशीं ॥२०३॥
पति आणिसी शोधून ॥ तरी मी तुजपाशीं राहीन ॥ राजमातेनें भाक देऊन ॥ कन्या म्हणोन ठेविली ॥२०४॥
सुनंदानामें कन्या जाण ॥ भैमी जाहली तिची सांगातीण ॥ असो इकडे नळ घोर कानन ॥ हिंडतसे अति शोकें ॥२०५॥
तों अद्भुत देखिला दावानळ ॥ आकाशपंथें चालली ज्वाळ ॥ नळा धांव धांव तत्काळ ॥ कर्णीं ध्वनि ऐकिली ॥२०६॥
नळ जवळी आला धांवत ॥ तों कर्कोटक बैसला कुंडलवत ॥ म्हणे राया वणवा अद्भुत ॥ काढीं मज येथोनि ॥२०७॥
मी पूर्वीं बहुत उन्मत्त ॥ सर्वथा मी निंदीं साधुभक्त ॥ नारदें शापिलें यथार्थ ॥ कर्कोटकदेह पावसी ॥२०८॥
मग मीं करोनि म्लानवदन ॥ धरिले नारदस्वामीचे चरण ॥ नारदासी स्त्रेह दाटला पूर्ण ॥ काय वचन ॥ बोलत ॥२०९॥
मग उःशाप बोलिला तत्काल ॥ तुज वनीं उद्धरील नल ॥ तरी माझेनें न घालवे पाऊल ॥ काढूनि घेईं मज आतां ॥२१०॥
कर्कोटक जाहला लहान ॥ नळें खांदां घेतला उचलोन ॥ वणव्याबाहेरी नेऊन ॥ ठेविता जाहल तेधवां ॥२११॥
तों कर्कोटकें हस्तासी दंश केला ॥ विषानलें नळ काळ जाहला ॥ कर्कोटक म्हणे राजा नला ॥ चिंता कांहीं करूं नको ॥२१२॥
म्यां तुझें रूप झांकिलें निःशेष ॥ तुज न बाधी दुसरें विष ॥ कार्य जाहलिया निःशेष ॥ पूर्ववत होशील तूं ॥२१३॥
कर्कोटकें दिधलें दिव्य वसन ॥ हें नैषधा करीं जतन ॥ माजें करूनि स्मरण ॥ शेवटीं हें पांघुरें ॥२१४॥
तेणें पूर्वस्वरूप होशील ॥ भेटेल दमयंती वेल्हाळ ॥ स्वराज्यासी पावशील ॥ पुण्यश्लोका नलराया ॥२१५॥
ऐसें तो नाग बोलोन ॥ तत्काल पावला अंतर्धान ॥ मग नलराय अयोध्येसी आऊन ॥ ऋतुपर्णरायासी भेटला ॥२१६॥
ऋतुपर्ण पुसे तूं कोण ॥ येरू म्हणे मी बाहुकाभिधान ॥ अश्वसारथ्यगतिलक्षण ॥ जाणतसें सर्वही ॥२१७॥
ठाऊक आहे सूपशास्त्र ॥ अन्नें करीन चित्रविचित्र ॥ ऋतुपर्णें संतोषोनि अपार ॥ अश्वशिक्षे ठेविला ॥२१८॥
वार्ष्णेय सारथि आहे ॥ परी तुं सर्वांहूनि श्रेष्ठ होयें ॥ असो बाहुक राहिला पाहें ॥ सेवा करूनि रायाची ॥२१९॥
विकल होऊनि रजनीमाझारीं ॥ दमयंतीलागीं विलाप करी ॥ अहा प्राणवल्लभे सुंदरी ॥ कोणीकडे गेलीस ॥२२०॥
तों जीवलनामें राजसेवक जाण ॥ बाहुकासी पुसे वर्तमान ॥ रात्रीं विलाप करिसी दारुण ॥ तें कारण सांग पां ॥२२१॥
बाहुक म्हणे ते क्षणीं ॥ कोणीएक मंदबुद्धि प्राणी ॥ दिव्य स्त्री सांडोनि वनीं ॥ आतां मनीं झुरतसे ॥२२२॥
निरपराध स्त्री निर्मल ॥ सौंदर्यसमुद्रींचें मुक्ताफल ॥ श्रृंगारवैरागरींचें तेजाळ ॥ दिव्यरत्न त्यागिलें ॥२२३॥
ऐसी सांडोनि सुंदरी ॥ आतां मूर्ख तो शोक करी ॥ त्याची रीति ये अवसरीं ॥ मी सहज दावितों ॥२२४॥
इकडे वैदर्भीचीं बाळें पाहून ॥ भीमकराजा शोकें क्षीण ॥ शोधावया ब्राह्मण ॥ पृथ्वीवरी पाठविले ॥२२५॥
जामात आणि कन्यारत्न ॥ ठायीं पाडील जो ब्राह्मण ॥ त्यासी अलंकार सहस्त्रगोदान ॥ देईन जाण मागेल तें ॥२२६॥
छप्पन्न देशांमाजी जाण ॥ साक्षेपें शोधिती ब्राह्मण ॥ त्यांत सुदेव ज्याचें अभिधान ॥ चैद्यवसुपुरीं आला तो ॥२२७॥
तेणें दमयंती देखिली ॥ जैसी राहूनें चंद्रप्रभा ग्रासिली ॥ कीं दिव्यप्रवालवल्ली ॥ दग्ध जाहली अग्नींत ॥२२८॥
पंकें माखिलें मुक्ताफळ ॥ तैसी झांकिली ते वेल्हाळ ॥ तों सुदेव देखतां तत्काळ ॥ रडों लागली वैदर्भी ॥२२९॥
शोकार्णवीं भैमी पडली ॥ देखोनि सुनंदा सद्नद जाहली ॥ राजमाता जवळी आली ॥ पुसों लागली विप्रातें ॥२३०॥
सुदेव सांगत तिजप्रती ॥ तुझे भगिनीची कन्या हे दमयंती ॥ वनीं सांडोनि गेला पती ॥ इची गति हे जाहली ॥२३१॥
ही सकल प्रमदांची स्वामिणी ॥ कपाळीं अक्षय्य रत्नमणी ॥ सुनंदा कपाळ धुवोनी ॥ पाहती जाहली तेधवां ॥२३२॥
तों भाळीं रत्नमणि झळाळी ॥ राजमाता कंठीं मिठी घाली ॥ म्हणे म्यां नाहीं ओळखिली ॥ भगिनीकन्या माझी हे ॥२३३॥
अहा अन्याय जाहला प्रबळ ॥ नोळखे भगिनीकन्या वेल्हाळ ॥ जैसें जवळी असोनि मुक्ताफळ ॥ अंधाप्रति दिसेना ॥२३४॥
दमयंती बोले वचन ॥ माते मी पितृगृहासी जाईन ॥ संगें देऊनि अपार सैन्य ॥ वैदर्भपुरा पाठविली ॥२३५॥
द्दष्टीं न पडतां भ्रतार ॥ नेघेचि वस्त्रें अलंकार ॥ वहनीं बैसवूनि सुंदर ॥ निजमाहेरा पाठविली ॥२३६॥
द्दष्टीं देखतां दमयंती ॥ माता पिता वेगें भेटती ॥ बाळें येऊनि गळां पडती ॥ नाहीं अंत शोकातें ॥२३७॥
सुदेव शांतवी समस्तां ॥ आतां कां शोक करितां वृथा ॥ नळ शोधावा तत्त्वतां ॥ अवनीमाजी यावरी ॥२३८॥
मग सुदेवासी सहस्त्र गोदान ॥ पूजिला अलंकार देऊन ॥ वैदर्भ म्हणे वीरसेननंदन ॥ शोधीं आतां सत्वर ॥२३९॥
माझें वनीं हरपलें दिव्यरत्न ॥ जो कोणी देईल आणुन ॥ त्यासी मी दिव्यवस्त्रालंकारीं पूजीन ॥ सुरभि देईन सहस्त्रवरी ॥२४०॥
असो ग्राम घोष पुरें पट्टणें ॥ द्विज शोधिती नळाकारणें ॥ देश दुर्गें कठिण स्थानें ॥ पाहती बहुत कुशलत्वें ॥२४१॥
त्यांत पर्णादनामा ब्राह्मण ॥ तो आला अयोध्येहून ॥ दमयंतीतें वर्तमान ॥ सांगता जाहला तेथींचें ॥२४२॥
अयोध्यानगर परम पवित्र ॥ घेतला घरोघरीं समाचार ॥ अहो दमयंती तुझें चरित्र ॥ जाहलें तें सर्व कथियेलें ॥२४३॥
सर्व पुरुषां ऐकविलें कर्णीं ॥ प्रत्युत्तर न देती कोणी ॥ परी राजसारथि ऐकोनी ॥ साक्षेपें जवळी पातला ॥२४४॥
तयाचें नाम बाहुक ॥ तेणें तुझ्या गोष्टी ऐकोनि देख ॥ करिता जाहला अपार शोक ॥ न कळत कोणातें ॥२४५॥
म्हणे अहा दमयंती राणी ॥ निरपराध त्यागिली कामिनी ॥ प्राणवल्लभा कोणे वनीं ॥ रडत फिरत असेल ॥२४६॥
अहा प्रिये गुणभरिते ॥ गुणगंभीरे सौभाग्यसरिते ॥ पतिमानसकल्पलते ॥ पतिव्रते धन्य तूं ॥२४७॥
कुलवंत कामिनी शुद्ध ॥ जरी जाहला पतीचा अपराध ॥ तरी न धरिती ह्रदयीं खेद ॥ कांहीं शब्द न ठेविती ॥२४८॥
पर्णादें सांगतां वर्तमान ॥ भैमीनें त्यासी गौरवून ॥ मग पाठविला सुदेव ब्राह्मण ॥ अयोध्येसी तेधवां ॥२४९॥
विप्र ज्ञानी परम चतुर ॥ ऋतुपर्णासी भेटला सत्वर ॥ दमयंतीनें सांगितला विचार ॥ तोचि त्यासी कथियेला ॥२५०॥
म्हणे दमयंतीचें स्वयंवर पूर्ण ॥ पुनः मांडिलें दुसरेन ॥ उदयीक प्रातःकालीं आहे लग्न ॥ नेम हाचि केला असे ॥२५१॥
प्रातःकालीं येईल जो भूपाळ ॥ त्यासी ते घालील माळ ॥ ऋतुपर्णें तत्काळ ॥ बाहुका वर्तमान सांगितलें ॥२५२॥
दमयंतीचें उदयीक लग्न ॥ नैषध मनांत भावी पूर्ण ॥ मजकारणें करिते प्रयत्न ॥ गुणनिधान दमयंती ॥२५३॥
बाहुक रायासी बोले वचन ॥ सुर्योदय न होतां पूर्ण ॥ पांचशत योजन ॥ रथा चालवीन जाण पां ॥२५४॥
मग पवनासमान तुरंग ॥ बाहुकें काढिले सवेग ॥ रोडके देखोनि क्षीणांग ॥ ऋतुपर्ण बोलतसे ॥२५५॥
म्हणे उत्तम अश्वरत्नें टाकून ॥ हे रोडके आणिले निवडून ॥ तों बाहुक बोले वचन ॥ यांची परीक्षा मी जाणें ॥२५६॥
केतकीचें लघुपत्र जाण ॥ धाकटा दिसे पंचानन ॥ थोरपणासी नाहीं कारण ॥ ऐकतां ऋतुपर्ण तोषला ॥२५७॥
या अश्वांचें अंतर सवेग ॥ राया कळेल क्रमितां मार्ग ॥ चिमणें रत्न सुरंग ॥ थोर पाषाण कासया ॥२५८॥
मग रथीं ऋतुपर्ण बैसला ॥ घोडे जुंपिले ते वेळां ॥ वार्ष्णेयें सारथ्य केलें नळा ॥ पूर्वीं जाण नेमाचें ॥२५९॥
तुरंग जाती जैसा पवन ॥ परम संतोषला ऋतुपर्ण ॥ म्हणे अश्वज्ञानी निपुण ॥ मातलि किंवा नळ एक ॥२६०॥
मातलीऐसे याचे गुण ॥ परी शरीर दिसे विवर्ण ॥ तों उत्तरीय वस्त्र पडलें गळोन ॥ घे घे म्हणोन राव बोले ॥२६१॥
तों बाहुक बोले वचन ॥ द्वादश योजनीं राहिलें वसन ॥ तों बिभीतकवृक्ष देखोन ॥ ऋतुपर्ण बोलत ॥२६२॥
या वृक्षासी फळें पर्णें किती ॥ बाहुका तुज सांगेन गणती ॥ स्थिर करूनि रथगती ॥ कौतुकें नृप बोलतसे ॥२६३॥
बाहुकें उतरूनि रथातळीं ॥ फळें पर्णें सर्व मोजिलीं ॥ सांगितलीं तितुकींच भरलीं ॥ परमाश्वर्य करीत तो ॥२६४॥
मग संख्य़ेची विद्या संपूर्ण ॥ दुसरें अक्षह्रदयज्ञान ॥ दोन विद्या ऋतुपर्ण ॥ बाहुकासी समर्पी ॥२६५॥
अश्वशिक्षापरीक्षाज्ञान ॥ बाहुकापाशीं शिके ऋतुपर्ण ॥ विद्येनें विद्या संपूर्ण ॥ सफळ जाहली दोघांतें ॥२६६॥
बाहुकें अक्षविद्या जाणतां ॥ ह्रदयांतूनि कलि निघाला अवचिता ॥ नळाचे चरणीं ठेविला माथा ॥ बोलता जाहला मूर्तिमंत ॥२६७॥
म्हणे म्यां तुज छळिलें बहुत ॥ हें जो चरित्र श्रवण करीत ॥ त्यासी मी पीडींना यथार्थ ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥२६८॥
मग बिभीतकाच्या वृक्षांत तत्काळ ॥ प्रवेशला तो कलि खळ ॥ म्हणोनि बिभीतकवृक्ष अमंगळ ॥ छायेसमीप न बैसावें ॥२६९॥
ऐसे वार्ष्णेय बाहुक ऋतुपर्ण ॥ तिघे रथारूढ होऊन ॥ वैदर्भपुरीं पाहती येऊन ॥ तों तेथें कांहीं दिसेना ॥२७०॥
न दिसे कांहीं स्वयंवराची स्थिती ॥ कोणी नाहींत भूपती ॥ ऋतुपर्ण तेव्हां चित्ती ॥ परम लज्जित जाहला ॥२७१॥
तों भैमीप्रति शकुन ॥ जाणविती शुभचिन्ह ॥ मग उपरीवरी चढोन ॥ रथगति परीक्षी ॥२७२॥
म्हणे हे रथगति जाणा ॥ नळाविण न ये कोणा ॥ असो भीमक ऋतुपर्णा ॥ भेटता जाहला येऊनि ॥२७३॥
भीमकें गृहासी नेऊन ॥ आदरें पूजिला ऋतुपर्ण ॥ म्हणे कां जाहलें आगमन ॥ काय कारण कल्पिलें ॥२७४॥
मग अयोध्यापति बोले वचना ॥ सहज आलों तुमच्या दर्शना ॥ रायें देऊनि उत्तम सदना ॥ उपचार सर्व पाठविले ॥२७५॥
रथाशाळेसी बाहुक जाण ॥ राहता जाहला जाऊन ॥ तुरंग सेवा करून ॥ यथोपचारें तोषविले ॥२७६॥
मग यावरी दमयंती ॥ पाठवी केशिनीनामें दूती ॥ म्हणे परीक्षा करूनि बहुरीतीं ॥ येईं पाहूनि कोण तो ॥२७७॥
तों केशिनी चतुर येऊनी ॥ पुसत बाहुकालागूनी ॥ काय कारण कल्पूनी ॥ तुम्ही येथें पातलां ॥२७८॥
तो म्हणे दमयंतीचें स्वयंवर ॥ बोलिला येऊनि सुदेव विप्र ॥ म्हणोनि अयोध्येचा नृपवर ॥ ऋतुपर्ण येथें पातला ॥२७९॥
मी त्याचा सारथि बाहुक ॥ वार्ष्णेय नलसारथि देख ॥ केशिनी पुसे नैषध सम्यक ॥ कोठें आहे सांग पां ॥२८०॥
बाहुक म्हणे नेणवे कांहीं ॥ गुप्त राहिला कोणे ठायीं ॥ काया पालटोनि महीं ॥ कोठें हिंडतो कळेना ॥२८१॥
केशिनी माघारी येऊन ॥ दमयंतीसी सांगे वर्तमान ॥ नेसला आहे अर्धवसन ॥ परी काया जाण ते नव्हे ॥२८२॥
त्याची पाहतां वर्तणूक ॥ नळाऐसी दिसे सम्यक ॥ सत्कर्माचरण सद्विवेक ॥ नैषधाऐसा दिसतो पैं ॥२८३॥
वैदर्भी म्हणे जाऊन ॥ आणिक पाहें सर्व चिन्ह ॥ देऊं नको उदक अग्न ॥ लेंकुरें घेऊन जाईं तेथें ॥२८४॥
मग दोन्ही बाळें घेऊनी ॥ त्यापाशीं गेली ते क्षणीं ॥ बाळें द्दष्टीं देखोनी ॥ अश्रु नयनीं आणिले ॥२८५॥
दोघें आलिंगूनि ह्र्दयीं ॥ खेद करी त्या मिति नाहीं ॥ मग तीं बाळें ठेवूनि महीं ॥ केशिनीशीं बोलत ॥२८६॥
माझीं बाळें ऐशींच घरीं ॥ मज अंतरलीं बहु दूरी ॥ यांसी देखोनि अंतरीं ॥ गहिंवर मज दाटला ॥२८७॥
यावरी केशिनी पाहे चिन्ह ॥ येतां जातां द्वारांतून ॥ खालती न करी मान ॥ होऊनि वामत जातसे ॥२८८॥
रिता कुंभ ठेविला ॥ तो द्दष्टीनें पाहतांचि भरला ॥ तृण फुंकितां ते वेळां ॥ अग्नि प्रकटला तत्काळ ॥२८९॥
अग्नीवरी पडतां वस्त्र ॥ न जळेचि कांहीं अणुमात्र ॥ सुमनें चोळिलीं विचित्र ॥ सवेंचि मागुती टवटवती ॥२९०॥
केशिनीनें येऊन ॥ सर्व कथिलें वर्तमान ॥ भैमी म्हणे वीरसेन ॥ सतु होय निश्चयेंशीं ॥२९१॥
मातापितयांसी पाठवी सांगोनी ॥ मी बाहुकासी पाहूं काय नयनीं ॥ रायें बाहुकासी बोलावूनी ॥ भैमीकडे पाठविलें ॥२९२॥
मुक्तकेशा अर्धवस्त्रीं ॥ बाहुकें भैसी देखिली नेत्रीं ॥ खालीं पाहोनि शोक करी ॥ शब्द बाहेरी फुटेना ॥१९३॥
नेत्रांसी वस्त्र लावून ॥ दमयंती करी रोदन ॥ म्हणे हे उमारमण रमारण ॥ नल रूप प्रकटवो ॥२९४॥
तों अंतरिक्षवाणी बोलत ॥ नलराया पाहूं नको अंत ॥ आपुलें स्वरूप पुण्यवंत ॥ प्रकट करीं एधवां ॥२९५॥
करूनि कर्कोटकस्मरण ॥ नळ पांघुरला प्रसादवसन ॥ बालसूर्या समान ॥ पूर्वरूप प्रकटलें ॥२९६॥
मग दमयंती धांवोन ॥ द्दढ धरी नळाचे चरण ॥ कंठीं मिठी घालून ॥ पूर्वदुःख आठवलें ॥२९७॥
वृंदारक पुष्पसंभार ॥ वर्षती तेव्हां वारंवार ॥ भीमक धांवला सत्वर ॥ वाद्यगजर जाहले ॥२९८॥
भीमक आणि नैषधपती ॥ सप्रेम एकमेकांसी आलिंगिती ॥ ऋतुपर्णें धांवूनि प्रीतीं ॥ नैषधासी वंदिलें ॥२९९॥
जोडोनियां दोन्ही कर ॥ म्हणे माझे अपराध थोर ॥ नेणोनि घडले साचार ॥ ते समग्र क्षमा करीं ॥३००॥
नळ आणि दमयंती ॥ वस्त्रालंकारें सप्रेम पूजिती ॥ देशोदेशींचे राजे धांवती ॥ करभार घेऊनियां ॥३०१॥
आज्ञा घेऊनि ऋतुपर्ण ॥ अयोध्येसी गेला तेथून ॥ नैषध अपार सेना घेऊन ॥ निषधदेशाप्रति आला ॥३०२॥
पुष्करासी बोलावूनि त्वरित ॥ म्हणे आतां खेळें द्यूत ॥ अथवा युद्ध करीं अद्भुत ॥ महानिष्ठुरा पापिष्ठा ॥३०३॥
मग नळें द्यूत खेळोन ॥ राज्य घेतलें सर्व जिंकोन ॥ पुष्करासी एक ग्राम देऊन ॥ कृपा करून रक्षिला ॥३०४॥
नळ दमयंतीसमवेत ॥ सुखरूप स्वराज्य़ीं नांदत ॥ यथाकालीं मेघ वर्षत ॥ प्रजा समस्त सुखी बहु ॥३०५॥
हें ऐकतां नलाख्यान ॥ कलिनाशक सुखवर्धन ॥ श्रोते वक्ते कल्याण ॥ सुखरूप नांदती ॥३०६॥
बृहदश्वानामक ऋषि ॥ तेणें ही कथा सांगितली धर्मासी ॥ म्हणे तूं स्वराज्य पावसी ॥ नैषधाऐसें मागुत्यानें ॥३०७॥
बृह्दश्व्यानें अक्षह्रदय पाहीं ॥ धर्मासी शिकविलें सर्वही ॥ म्हणे आतां गजपुरा जाईं ॥ जिंकूनि घेईं राज्य सर्व ॥३०८॥
पांडवप्रताप ग्रंथ विशेष ॥ त्यांत हें नलोपाख्यान सुरस ॥ ऐकतां संतुष्ट होय मानस ॥ आसमास पुण्य जोडे ॥३०९॥
ब्रह्मा नंद श्रीधर ॥ पंडितांसी विनवी जोडूनि कर ॥ नलोपाख्यान वारंवार ॥ श्रवण करा आदरें ॥३१०॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ वनपर्व व्यासभारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ पंचविसाव्यांत कथियेला ॥३११॥
स्वति श्रीपांडवप्रातप ग्रंथ ॥ वनपर्वटीका श्रीधरकृत ॥ बृहदश्वानें धर्माप्रत ॥ नलोपाख्यान कथियेलें ॥३१२॥
इति श्रीपांडवप्रतापे वनपर्वणि पंचविंशाध्यायः ॥२५॥ श्रीकृष्णार्पनमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 09, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP