मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय २७ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय २७ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय २७ वा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ अष्टावक्राचें आख्यान ॥ मागें संपलें संपूर्ण ॥ यावरी लोमशाप्रति पंडुनंदन ॥ धर्मराज बोलत ॥१॥याज्ञवल्क्यानें आघवें ज्ञान ॥ उपदेशिलें जनकालागून ॥ ती पुण्यकथा सांग पूर्ण ॥ करूं श्रवण सर्वही ॥२॥मार्गें जातां क्रमेल वेळ ॥ मुनि बोले ती कथा रसाळ ॥ यावरी लोमश पुण्यशीळ ॥ सुरस इतिहास सांगतसे ॥३॥दत्तात्रेय शुक कपिलमुनी ॥ चौथा याज्ञावल्क्य निर्वाणज्ञानी ॥ ज्यांचा महिमा वेदपुराणीं ॥ वर्णिजेतॊ अत्यादरें ॥४॥योगभ्रष्ट उपजतज्ञानी ॥ याज्ञवक्ल्य महामुनी ॥ वेदविघेलगूनी ॥ ऊर्ध्वरेता गुरु केला ॥५॥तेथें केलें वेदपठण ॥ विधियुक्त अर्थ पाहिला संपूर्ण ॥ परी जाहलें नाहीं समाधान ॥ ब्रह्मविद्येवांचूनियां ॥६॥सकल विद्यांमाजी मुकुटमणी ॥ अध्यात्मविद्या ज्ञानखाणी ॥ त्या विद्येलागीं दिवसरजणी ॥ गुरुसेवा करी बहु ॥७॥जो ब्रह्मविद्येचा दाता ॥ तो गुरु नव्हेचि तत्वतां ॥ कर्मकांडीं कुशल जाणता ॥ मीमांसक पुरता गुरु तो ॥८॥तों जनकराव परम सज्ञान ॥ पोटीं नाहीं पुत्रसंतान ॥ बहुत यज्ञ अनुष्ठान ॥ करितां कदा न होय पैं ॥९॥तों घरासी आला एक द्विज ॥ तेणें जनकासी सांगितलें गुज ॥ त्या याज्ञावल्क्याच्या अक्षता सतेज ॥ जरी मस्तकीं पडती तुझ्या ॥१०॥तरी होईल तत्काल सुत ॥ ऐकतां तोषला नृपनाथ ॥ मग ऊर्ध्वरेता ऋषि समर्थ ॥ गेला द्र्शान त्याचिया ॥११॥ऋषीस साष्टांगें नमून ॥ जनक विनवी कर जोडून ॥ तुमचा याज्ञवल्क्य शिष्य सुजाण ॥ धाडा भोजना आमुचे येथें ॥१२॥ऋषि म्हणे तो व्रतस्थ ॥ येईल कीं न येईल तेथ ॥ तरी एक सांगतों मुखार्थ ॥ तोचि करीं निर्धारें ॥१३॥सप्तशत शिष्य परियेसीं ॥ एक एक बोलावीं प्रतिदिवसीं ॥ ज्येष्ठापासूनि अनुक्रमेंशीं ॥ शेवटवरी पूजीं कां ॥१४॥याज्ञवल्याचा येतां दिवस ॥ आपणचि येईल तो नेमास ॥ ऐकतां तोषला मिथिलाधीश ॥ म्हणे अवश्य ऋषिवर्या ॥१५॥प्रथम दिवशीं पट्टशिष्य ॥ पूजी भोजन देऊनि नरेश ॥ त्याच्या मंत्राक्षता विशेष ॥ मसतकीं धरी आदरें ॥१६॥ऐसेंचि नित्यकाळ होत ॥ एकेक शिष्य भोजन करूनि जात ॥ परी याज्ञवल्क्याचा दिवस सत्य ॥ न कळे कोणता निश्चयें ॥१७॥त्याहीमाजी एकादे दिवशीं ॥ राव गुंते राज्यकार्यासी ॥ किंवा जात मृगयेसी ॥ न साधे पंक्तीसी दिवस तया ॥१८॥जनक सांगे पट्टराणीसी ॥ याज्ञवल्क्य येईल कोणे दिवशीं ॥ बहुत सावधान मानसीं ॥ अक्षता मस्तकीं घेईं तूं ॥१९॥प्रत्यहीं येत ब्राह्मण ॥ अक्षता देत मंत्रून ॥ समीप नसतां यजमान ॥ नृपपत्नीस देती मग ॥२०॥तीही समीप नसतां जाण ॥ राजमंचकीं टाकिती नेऊन ॥ तों आपुला दिवस लक्षून ॥ याज्ञवल्क्या आला भोजना ॥२१॥तों अद्दष्टरेखा विपरीत ॥ मृगयेसी गेला मिथिलानाथ ॥ राणी जाहली ऋतुस्त्रात ॥ तों जेवूनि पुसत याज्ञवल्क्य ॥२२॥म्हणे अक्षता ध्यावया कोणी ॥ आहे कीं नाहीं नृप राणी ॥ याज्ञवल्याचें स्वरूप नोळखोनी ॥ राजसेवक बोलती ॥२३॥राकमंचकीं अक्षता टाकोनी ॥ द्विजा जाईं आश्रमालागूनी ॥ परी तो महाराज केवळ तरणी ॥ स्वरूप कोणी ओळखेना ॥२४॥समीप असतां निधान ॥ अभाग्यासी न कळे पूर्ण ॥ कीं पुढें पडलें पडलें दिव्य रत्न ॥ अंध जैसा नेणेचि ॥२५॥असो शयनशाळेंत ॥ याज्ञवल्क्य अक्षता टाकीत ॥ मंचकस्तंभीं जाऊनि पडत ॥ महिमा अद्भुत कोणी नेणे ॥२६॥शयनशाळा घेतली झांकून ॥ याज्ञवल्क्य गेला आश्रमालागून ॥ नृप आला मृगया करून ॥ शयनस्थानी प्रवेशला ॥२७॥तों मंचकस्तंभासी अभिनव ॥ कोमल फुटले पल्लव ॥ आश्वर्य करी जनकराव ॥ निकट सेवक बोलाविले ॥२८॥शयनशाळेंत आला होता कोण ॥ सेवक बोलती कर जोडून ॥ नित्यावळीचा ब्रह्मण ॥ अक्षता टाकून गेला जी ॥२९॥जनक शोक करीत पाहे ॥ म्हणे याज्ञवल्क्य पूर्ण होये ॥ कारण कोरडे काष्टीं लवलाहें ॥ नवपल्लव फुटले कीं ॥३०॥गहन कर्मगति विचित्र ॥ मज कैंचा आतां पुत्र ॥ महाराज तो पुण्यपवित्र ॥ दर्शनही मज नव्हेचि ॥३१॥अहा वाउगी गोष्ट जाहली ॥ कामधेनु सदनाप्रति आली ॥ ते काष्ठप्रहारें मारूनि पिटिली ॥ परी केली तैसीच ॥३२॥धुवण म्हणोनि अमृत ॥ अभागी उकरडां ओतीत ॥ चिंतामणि गोफणींत ॥ दरिद्री जैसा घालवी ॥३३॥गृहासी पातला सुपर्व ॥ काक म्हणोनि मारिला पाषाण ॥ कीं परिस जैसा फोडून ॥ पायरीस घातला ॥३४॥कल्पवृक्ष दैवें भेटला ॥ कुडा म्हणोनि तो तोडिला ॥ तैसा याज्ञवल्क्य न ओळखिला ॥ हतदैवें कोणींही ॥३५॥मागुती ऋषीजवळी जाऊन ॥ जनक घाली लोटांगण ॥ म्हणे एकदां मागुत्यान ॥ याज्ञवल्क्य धाडिंजे ॥३६॥ऋषि म्हणे तो परम हट्टी होये ॥ सर्वथाही भोजना न ये ॥ जनक श्रमोनि पाहें ॥ मिथिलेप्रति गेला हो ॥३७॥ऐक धर्मा सावधान ॥ गुरु कर्मकांडीं परमनिपुण ॥ याज्ञवल्क्य वेदांतज्ञान ॥ पुसे त्यासी क्षणक्षणां ॥३८॥तें अध्यात्म न कळे त्यासी ॥ गुरु क्षोभे परम मानसीं ॥ कर्मकांडा आचरतां दिननिशीं ॥ संशय उपजे चित्तातें ॥३९॥विधिनिषेध पाहतां अपार ॥ व्याकुळ होय परम विप्र ॥ विधियुक्त परम प्रकार ॥ घडला नाहीं वाटे मज ॥४०॥मन व्याकुळ अत्यंत ॥ गुरुनें आरंभिलें प्रायश्चित्त ॥ परी वृद्ध आपण अशक्त ॥ प्रायश्चित्त नाचरवे ॥४१॥आणिक होते शिष्य बहुत ॥ त्यांसी म्हणे आचरा प्रायश्चित्त ॥ मज श्रेय द्या समस्त ॥ विधियुक्त करोनि ॥४२॥तों याज्ञवल्क्य बोलत ॥ हीं तो बाळकें समस्त ॥ मी हें आचरीन प्रायश्चित ॥ आज्ञा त्वरित करणें जी ॥४३॥तो अभिमान सांडून ॥ करूं नेणे बोलिलें वचन ॥ तों गुरु क्षोभला दारूण ॥ म्हणे अभिमान तुज जाहला ॥४४॥तुज दंड करीन यथार्थ ॥ माझी वेदविद्या टाकीं समस्त ॥ ऐसा त्याचा गुरु बोलत ॥ क्रोधें संतप्त कांपतसे ॥४५॥मग याज्ञवल्क्य विद्या वमीत ॥ जैसा खदिरांगार धगधगित ॥ ऋषि तित्तिरपक्षी होत ॥ विद्या प्राशीत आपुली ॥४६॥वमिला वेद प्राशीत ॥ तो तैत्तिरीयशाखाभेद होत ॥ अद्यापि तित्तिरपक्षी भक्षीत ॥ विंगळ्यांच्या आहारातें ॥४७॥गुरूसी करूनि नमन ॥ याज्ञवल्क्य निघाला तेथून ॥ मग आचरोनि अनुष्ठान ॥ निघे शरण सूर्यासी ॥४८॥देवतात्रयस्वरूप पूर्ण ॥ प्रत्यक्ष दैवत सूर्यनारायण ॥ याज्ञवल्क्यासी होऊनि प्रसन्न ॥ ब्रह्मविद्या उपदेशिली ॥४९॥विदेह पढला अद्भुत ॥ अनुच्छिष्ट मंत्र सांगत ॥ अपरोक्षज्ञान झालें प्राप्त ॥ होय विख्यात तिहीं लोकीं ॥५०॥अध्ययन तप ज्ञान ॥ सर्वविषयीं याज्ञवक्ल्य पूर्ण ॥ कीर्तीनें भरलें त्रिभुवन ॥ धन्य धन्य सर्व म्हणती ॥५१॥असो ऐकतां पूर्व कीर्तीनें ॥ अल्पज्ञानी ऋषी जे होते ॥ ते प्रवर्तोनि निंदेतें ॥ नाना दूषणें लाविती ॥५२॥जैसी मृगेंद्राची निंदा देख ॥ करिती मागें जंबुक ॥ अळिका महणती विनायक ॥ धरूनि आणूं क्षणमात्रें ॥५३॥यश धैर्य सद्नुण ॥ सभाग्याचे कर्णीं ऐकोन ॥ परम खेद मानिती कुजन ॥ नसतेंचि दूषण लाविती ॥५४॥एवं निंदेसी प्रवर्तले ऋषी ॥ म्हणती सूर्यें कैसें उपदेशिलें यासी ॥ आदित्य जाळी सकळांसी ॥ हा तेथें कैसा वांचला ॥५५॥देहधारी होऊनि सूर्यनारायण ॥ यासी कैसें उपदेशिलें ज्ञान ॥ मीमांसक हें न मानिती वचन ॥ असत्य पूर्ण याज्ञवल्क्य ॥५६॥यासी गुरु कैंचा सूर्यनारायण ॥ याणेंचि स्वर वर्ण भिन्न करून ॥ वेद केला जनरंजन ॥ जैसें भाषण नटाचें ॥५७॥वेद वमूनि गुरु त्यागिला ॥ सूर्यासी कधीं शरण गेला ॥ ऐसा ऋषिजन निंदेसी प्रवर्तला ॥ समाचार ऐकिला याज्ञवल्क्यें ॥५८॥परी समाधानी ऋषीचें चित्त ॥ विषाद नुपजे मनांत ॥ निंदकांसी प्रीति वाढवीत ॥ भावीत परम मित्र हे ॥५९॥दुर्जनासीं प्रीतिभाषण ॥ हें संतांचें मुख्य लक्षण ॥ आणि दुसर्याचे दोषगुण ॥ गेलियाही प्राण न बोलती ॥६०॥जनक इच्छिता जाहला मानसीं ॥ कीं शरण रिघावें सद्नुरुसी ॥ तरी सर्वज्ञ दयाळु निश्चयेंसीं ॥ गुरु तोचि करावा ॥६१॥यालागीं पूर्ण आत्मज्ञानी ॥ जनकराव इच्छी मनीं ॥ सद्नुरु भेटावा म्हणोनी ॥ याग तेणें आरंभिला ॥६२॥परम सन्मानेंकरून ॥ बोलाविले समस्त ऋषिजन ॥ याज्ञवल्क्य ऋषी बोलावून ॥ यागालागीं आणिला ॥६३॥नवग्रहांमाजी मित्र ॥ कीं त्रिदशांमाजी इंदिरावर ॥ कीं तपियांमाजी पिनाकधर ॥ तैसा ऋषींत याज्ञवल्क्य ॥६४॥यगाचें करूनि मिष ॥ याज्ञवक्ल्य आणिला घरास ॥ शरण रिघावें तयास ॥ अनुताप बहु वसे अंतरीं ॥६५॥जन्म मरण गर्भवास ॥ संसारदुःखें असोस ॥ यालागीं शरण रिघावें गुरूस ॥ ऐसें मिथिलेश भावीत ॥६६॥याज्ञवल्क्यासी बहुत वंदीत ॥ निंदिती कोणी दुष्ट किंचित ॥ परी महाराज खेदरहित ॥ शरण यासी रिघावें ॥६७॥याज्ञवल्क्यासी रिघोनि शरण ॥ पुसूं जरी आत्मज्ञान ॥ तरी बहुत ऋषी मिळोन ॥ गलबला येथें करितील ॥६८॥याज्ञवक्ल्याचें थोरपण ॥ प्रकटावया तेतें संपूर्ण ॥ जनकें मांडिलें विंदाण ॥ सावधान परिसावें ॥६९॥सुवर्णाच्या सहस्त्र गायी ॥ वत्सांसहित केल्या ते समयीं ॥ श्रॄंगारूनि सकलकी ॥ दक्षिणेसहित ठेविल्या ॥७०॥दानशाळेसी नृपनाथ ॥ दानोद्कझारी करीं घेत ॥ ऋषी बोलावूनि समस्त ॥ काय बोलता जाहला ॥७१॥जो ब्रह्मवेत्ता संपूर्ण ॥ निस्पृह आणि सर्वज्ञ ॥ तेणेंचि यावें उठोन ॥ गायी देईन सर्व त्यासी ॥७२॥हें ऐकोनि भूसुर ॥ करिती आपुले ठायीं विचार ॥ आम्ही वक्ते निस्पृह साचार ॥ केवीं उत्तर बोलावें ॥७३॥मी ब्रह्मवेत्ता म्हणवणें ॥ हेंचि आधीं लाजिजवाणें ॥ त्यावरी निस्पृहता मिरवणें ॥ गायी घेणें कासया ॥७४॥ऐसिया गोष्टी कठिण ॥ कोण घेईल गाय़ी दान ॥ त्यासीं वाद अत्यंत करून ॥ टाकूं जिंकून क्षणार्धें ॥७५॥जनक म्हणे तत्त्वतां ॥ कां कोणी न उठे ब्रह्मवेत्ता ॥ सर्व प्रत्युत्तर न देतां ॥ अधोवदन पाहती ॥७६॥करावया भवचापभंजन ॥ उठिला जैसा मित्रकुलभूषण ॥ तैस याज्ञवल्क्य उठोन ॥ उभा राहिला ते वेळे ॥७७॥शिष्यांलागीं आज्ञापीत ॥ गायी गृहा न्याव्या समस्त ॥ अलंकादक्षिणेसहित ॥ उचला येथूनि तत्त्वतां ॥७८॥याज्ञवल्क्य म्हणे जनकासी ॥ ब्रह्मवेत्ता तूं पुससी ॥ जो सर्वभूतनिवासी ॥ ब्रह्मवेत्ता तो एक ॥७९॥सांडूनि समस्त अहंकृती ॥ सत्यज्ञानानंत स्वयंज्योती ॥ सर्वसाक्षी तो निश्चितीं ॥ शुद्धबुद्ध वेगळा जो ॥८०॥एकमेव द्वितीयं नास्ति ॥ ऐसें बोले वेदश्रुती ॥ एकावांचूनि वसती ॥ नाहीं दुजयाची सर्वथ ॥८१॥एको देवः सर्वभूतेषु गूढः’ ॥ श्रुतीनें भेदावरी वाहिला मेंढा ॥ करूनि द्दश्याचा रगडा ॥ मतवादी विभांडिले ॥८२॥अणोरणीयान् महतो महीयान् ॥ ऐसें श्रुती बोले गर्जोनियां ॥ हा अनुभव आंगीं जयां ॥ उरवूनियां जाण पां ॥८३॥स्वप्रत्ययें बोले वेदश्रुती ॥ तो आत्मा मी पूर्ण निश्चिती ॥ तंव तो अच्युतोऽहमनंतोऽहं म्हणती ॥ जे वेदांती महंत ॥८४॥’ नायं देहो नैवेंद्रियाणि ’॥ सर्वांतीत मी श्रुति वाखाणी ॥ केवळ ब्रह्मसुखाची खाणी ॥ क्षराक्षरातीत मीच ॥८५॥अज अव्यय सर्वज्ञ ॥ अवस्थात्रय निरसोन ॥ जीवशिवांचा साक्षी पूर्व ॥ आद्य अचल अमल मी ॥८६॥मज येणें जाणें नाहीं ॥ तेथें जिणें मरणें कायी ॥ इंद्रियसुखविमुख पाहीं ॥ विदेही साक्षी वेगळा मी ॥८७॥’ न जायते म्रियते वा ’ पहा हो ॥ स्वयें बोले रमानाहो ॥ तो अज नित्य शाश्वत आनंदडोहो ॥ निजसुखभरित मी ॥८८॥निरंतर उपनिषदोद्यानीं ॥ विहारकर्ता मी चिन्मयखणी ॥ द्दश्यसागराचें आचमन करूनी ॥ विदेही विलसे कलशोद्भव ॥८९॥स्वानु भव पांचाचें सुरसारविंद ॥ अखंड भोगी मी मुक्त मिलिंद ॥ मी उदयास्तादि अर्कविशद ॥ द्दश्य भगणें ग्रासक जो ॥९०॥तमद्विरदविदारक मृगेंद्र ॥ भेदधराधरच्छेदक वज्रधर ॥ शंबररिपुजालविकृतिसंहार ॥ कर्ता परात्पर शिव मी ॥९१॥दुर्धर मायावन सकळी ॥ दहनकर्ता मी ज्वालामाळी ॥ भयवल्लीविध्वंसक बळी ॥ निरंकुश इभ मी ॥९२॥पंचकोशांहूनि वेगळा ॥ षड्विकाररहित निराळा ॥ त्रिविध अहंकार कलुष जाहला ॥ छेदक मी जितेंद्रिय ॥९३॥दोषत्रयविरहित ॥ देहत्रयादिवर्जित ॥ स्वानुभवें वर्तत ॥ ब्रह्मानंदें अद्वय मी ॥९४॥ऐसें ऐकतां निरूपण ॥ जनकें धरिले द्दढ चरण ॥ म्हणे मी तनमनधनांशीं शरण ॥ तुजप्रति महाराजा ॥९५॥अष्ट भावें सद्नदित ॥ अलंकारदक्षिणासहित ॥ गोधनें अर्पिलीं समस्त ॥ अनन्यभावेंकरूनियां ॥९६॥ऐसें देखोनि ते वेळीं ॥ क्षोभली समस्त ऋषिमंडळी ॥ सकल सभा गडबडली ॥ निंदेसी सर्व प्रवर्तले ॥९७॥कोणी उठोनि उभे ठाकती ॥ कोणी वैसले ठायींच बोलती ॥ एक क्रोधें थरथरां कांपती ॥ प्रवर्तती वादासी ॥९८॥निर्भर्त्सिती अवघे जण ॥ उच्चारिती दोष गुण ॥ परी याज्ञवल्क्य आनंदघन ॥ संताषें मन पोळेन ॥९९॥ब्राह्मण म्हणती देख ॥ तूं ज्ञाता कैसेनि अधिक ॥ शिष्याहातीं गोधनें सकळिक ॥ न्यावया येथें कोण तूं ॥१००॥मी ब्राह्मवेत्ता म्हणविसी ॥ आशा धरूनि गोधनें नेसी ॥ निस्पृहताही वागविसी ॥ अपमानूनि आम्हांतें ॥१०१॥येरू म्हणे शिष्य सद्विवेक ॥ वृत्तिगायी वळविल्या देख ॥ गोरक्षण करावें सम्यक ॥ श्रुत्यर्थ हा निर्धारें ॥१०२॥चरमवृत्ति जोंवरी बाणे ॥ तोंवरी गायी द्दढ रक्षिणें ॥ पैलपारा आहे जाणें ॥ तोंवरी जतन करावें नौकेसी ॥१०३॥चरम म्हणजे शेवटील स्थिती ॥ जीहूनि थोर नाहीं परती ॥ चंचलता नसे निश्चितीं ॥ चरमवृत्ति ते म्हणिजे ॥१०४॥गोरक्षण न करितां ॥ चरमवृत्ति न ये हाता ॥ अलंकारसमवेत तत्त्वतां ॥ गोधनें बरीं रक्षावीं ॥१०५॥तुम्ही म्हणाल कोणते अलंकार ॥ श्रवणमननादि नऊ प्रकार ॥ दया क्षमा शांति निरंतर ॥ श्रृंगारसहित रक्षाव्या ॥१०६॥निजानुसंधान गोकंठपाश ॥ त्याविण गायी नावरती निःशेष ॥ निरंजन सावकाश ॥ गायी न्याव्या चरावया ॥१०७॥वेदमर्यादाकाठी घेऊनी ॥ गायी वळाव्या क्षणोक्षणीं ॥ परी विषयक्षेत्रीं जाऊनी ॥ भरों न द्याव्या सर्वथा ॥१०८॥ऐसें करितां गोरक्षण ॥ सप्तभुमिका ओलांडून ॥ चरमवृत्ति बाणे पूर्ण ॥ शेवटील जीस म्हणती ॥१०९॥ऐसें याज्ञवल्क्य बोलिला ॥ परी तें न मानेचि तयांला ॥ आश्वलायन अर्थभाग ते वेळां ॥ वाद केला तिहीं बहु ॥११०॥श्वेतकेतु अजमीढ जरत्कारादिक ॥ अवघे याज्ञवल्क्यानें जिंकिले देख ॥ निरुत्तर केलिया अधोमुख ॥ सर्वही खालीं पाहती ॥१११॥तों तेथें गार्गेंयीनामें योगीण ॥ ब्रह्मवेत्ती सदा नग्न ॥ अकस्मात उभी ठाकली येऊन ॥ म्हणे कां रे भांडण करीतसां ॥११२॥जाहला जो पूर्ववृत्तान्त ॥ जनक गार्गेयीप्रति सांगत ॥ ते म्हणे ऋषी हो ऐका समस्त ॥ निवडितें येथें वाद हा ॥११३॥सावधान ऐका सर्वही ॥ जो सजीव करील अवघ्या गायी ॥ तेणेंचि न्याव्या लवलाहीं ॥ निश्चय पूर्ण जाणिजे ॥११४॥समस्त ऋषी तेव्हां बोलती ॥ सजीव गायी केवीं होती ॥ नैयायिक तेथें म्हणती ॥ आम्ही न जीववूं यथार्थ ॥११५॥निर्जीवासी आणावा प्राण ॥ हें ईश्वराचें कर्तृत्व पूर्ण ॥ आम्ही होऊं ईश्वरासमान ॥ कल्पांतींही घडेना ॥११६॥समस्तांच्या खुंटल्या युक्ती ॥ मग तो याज्ञावल्क्य केवळ गभस्ती ॥ म्हणे एक ईश्वर सर्वांभूतीं ॥ जडाजडीं व्यापक ॥११७॥जल स्थल काष्ठ पाषाण ॥ अष्ट धातु औषधी जाण ॥ सर्वत्र ईश्वर व्यापला पूर्ण ॥ हें तों सत्य श्रुत्यर्थीं ॥११८॥ते प्रतिमा प्रत्यक्ष होऊन ॥ भक्तांसीं अर्चाभाव टाकून ॥ साक्षात बोलों लागे वचन ॥ निष्ठा देखोन भाविकांची ॥११९॥धातूची करावी जे मूर्ति ॥ तेथें द्विज प्राणप्रतिष्ठा करिती ॥ आवाहन करितां दैवतें येती ॥ करिती वस्ती धातूंमाजी ॥१२०॥तरी सुवर्णगायींमाजी तत्त्वतां ॥ ईश्वर वास्तव्य करील आतां ॥ याज्ञवल्यानें संकल्प करितां ॥ गायी जाहल्या सजीव ॥१२१॥वत्स करिती स्तनपान ॥ अद्भुत वर्तलें येथें पूर्ण ॥ जनक घाली लोटांगण ॥ म्हणे धन्य ऋषिरावो ॥१२२॥तों बोलती समस्त ब्राह्मण ॥ येणें कौटल्य केलें पूर्ण ॥ किंवा केलें द्दष्टिबंधन ॥ आम्ही न मानूं सर्वथा ॥१२३॥आम्ही यासी नेदूं गोधन ॥ मग गार्गेय़ी बोले वचन ॥ म्हणे विप्र हो ऐका एक खूण ॥ निर्वाणप्रश्न दोन असती ॥१२४॥ते प्रश्न याणें सांगितले ॥ तरी मग सर्वांसी जिंकिलें ॥ तुमचें सामर्थ्य खुंटलें ॥ बोलणें न चाले सहसाही ॥१२५॥सूर्यापुढें जैसा खद्योत धुरंधर ॥ विनायकापुढें पादोदर ॥ कीं महामण्यापुढें गार ॥ भांडेल कोठें सांग पां ॥१२६॥तुम्ही गलबला सांडून ॥ स्वस्थाचित्तें करावें श्रवण ॥ मग याज्ञवल्क्याप्रति वचन ॥ गार्गेयी बोलत ऐका तें ॥१२७॥मी हिंडतें नग्न निःशेष ॥ द्दष्टीसी न दिसे पुरुष ॥ स्त्री नपुंसक पदार्थ द्दश्य ॥ नेणें कांहीं सर्वथा ॥१२८॥कित्येक मज देखोन ॥ मूर्खें भ्याडें झांकिती नयन ॥ कोणी खालीं मुख करून ॥ मजसीं गोष्टी सांगती ॥१२९॥कोणी आणिकांकडे पाहती ॥ मग गोष्टी मजसीं बोलती ॥ कोणी उठोनि पळती ॥ समोर न ठाकती कदाही ॥१३०॥परी विकाररहित पुरुष ॥ आजि मीं देखिला तूं विशेष ॥ इकडे तिकडे न पाहसी निःशेष ॥ समद्दष्टि तुझी असे ॥१३१॥जैसे नग्न पशु हिंडती ॥ तेथें विकार न उठे चित्तीं ॥ कीं वृक्ष पाषाण दिसती ॥ तैसें भाविसी मजला तूं ॥१३२॥तुझी केवळ ब्रह्मस्थिती ॥ वादीं जिंकिलें सकलांप्रती ॥ तरी माझे प्रश्न सांग निश्चितीं ॥ याज्ञावल्क्य यावरी बोले ॥१३३॥तुझ्या प्रश्नांचें करीन निरसन ॥ तूं आडवें घेसी जाणोन ॥ तरी तुझें शिर पडेल तुटोन ॥ जाण खूण हेचि पैं ॥१३४॥अंतरीं जाणोनि यथार्थ ॥ अन्यथा बळें प्रतिपादीत ॥ तरी होईल अनर्थ ॥ शरीर पडेल खालतें ॥१३५॥यावरी करीं तूं आतां प्रश्न ॥ मग गार्गेयी काय बोले वचन ॥ संतीं परिसावें सावधान ॥ ब्रह्मानंदेंकरूनियां ॥१३६॥गार्गेयी म्हणे याज्ञवल्क्यास ॥ म्यां घेतलें संदेहधनुष्य ॥ दोन्ही प्रश्नबाण निःशेष ॥ लावूनि सोडितें तुजवरी ॥१३७॥अविलंबें सोडीं दोन्ही शर ॥ याज्ञवल्क्य बोले उत्तर ॥ सद्नुरु माझा भास्कर ॥ प्रत्युत्तर देईल तो ॥१३८॥काय आहे एकवीस स्वर्गांवरी ॥ सप्तपाताळांखालीं काय निर्धारीं ॥ ओतप्रोत मध्यें अवधारीं ॥ काय आहे सांग पां ॥१३९॥वस्तु व्यापक सर्वांतरीं ॥ हेंही सांग कोणे परी ॥ व्यापूनि वेगळेपणें सर्वत्रीं ॥ कोणे रीतीं सांग पां ॥१४०॥हे स्त्री करिते प्रश्न ॥ म्हणोनि न करीं हेळण ॥ सांगतां तूं न होईं भिन्न ॥ अभेदपणें सांगावें ॥१४१॥मग याज्ञवल्क्य मांडी धैर्यठाण ॥ काढी वेदांतींचे दिव्य बाण ॥ आतां प्रश्नशर घेऊन ॥ विदारील आशंका ते ॥१४२॥तटस्थ पाहे ऋषिमंडळ ॥ सावधान ऐके जनकभूपाळ ॥ ज्ञानी अंतर्लीन निर्मळ ॥ सर्वद्र्ष्टा याज्ञवक्ल्य ॥१४३॥पुससी तूं स्वर्गांवरतें ॥ आणि पाताळांखालतें ॥ बोलतां त्या मर्यादेतें ॥ सांगतां जाय विरोन ॥१४४॥तरी वरी खालीं मध्यें जाण ॥ ओतप्रोत संपूर्ण ॥ अवघें चिन्मात्र आनंदघन ॥ अद्वय निरंजन सर्वही ॥१४५॥जळीं बुडाली जळगार ॥ तीस अंतर्बाह्य अवघें नीर ॥ स्वयें तें सलिल साचार ॥ द्वैतविचार नसेचि ॥१४६॥कीं समुद्रीम पडाले सामुद्रिक ॥ तें स्वयेंचि होय सागर एक ॥ कीं आर्द्रघट भूमीशीं ऐक्य ॥ न मेळवितां मिळाला ॥१४७॥कीं खग जाय ऊर्ध्वपंथें ॥ त्यासी खालीं आणि वरतें ॥ आकाशापासूनि रितें ॥ अणुमात्र नसेचि ॥१४८॥मेदिनीवसनाचें पैलतीरा ॥ द्दश्य जरी नव्हे समग्र ॥ परी अवघा एक साचार ॥ सरितानाथ सत्य कीं ॥१४९॥तैसें वरी खालीं मध्यें संपूर्ण ॥ अवघें चिन्मात्र निरंजन ॥ जेथें सच्चिदानंदघन ॥ हाही संशय ओसरे ॥१५०॥एक कोरूनि धराधर ॥ देवळें केलीं अपार ॥ आकृतीहूनि विकार ॥ परी अचल एकचि ॥१५१॥लहरी कल्लोक तरंग नानाविधी ॥ परी अवघा एकचि जलनिधी ॥ कीं एकीं अनेक उपाधी ॥ चंचलत्वें दिसताती ॥१५२॥जैशा जळगारा विशाळ ॥ अरण्यांत पडल्या पुष्कळ ॥ लेंकुरें आनंदोनि सकळ ॥ खेळावया तेथें गेलीं ॥१५३॥कोणी म्हणती करूं भरती ॥ कोणी पात्रामाजी धरिती॥ कोणी शेवटीं जलचि प्राशिती ॥ निवविती तृषेतें ॥१५४॥म्हणती जल काय शीतल ॥ जैसी गारचि केवळ ॥ तेथें जाणते बोलती सकल ॥ गार किंवा जळ एकचि ॥१५५॥एक म्हणती गारेचा गुण ॥ एक बोलती शीतळ जीवन ॥ घट्ट पृथ्व्यंश कठिण ॥ एक ऐसें स्थापिती ॥१५६॥गार घट्ट विरतां पूर्ण ॥ कोठें पृथ्वीचें कठिणपण ॥ अवघें एकचि जीवन ॥ रूपाभिधानें विरालीं ॥१५७॥शेल्याचे दोरे उकलून ॥ मागुती चिवट केलें जाण ॥ तेथें पट हें अभिधान ॥ सहज मग राहिलें ॥१५८॥तैसें व्यापकत्व सारून ॥ उरलें अनाम निरंजन ॥ पूर्व ब्रह्म सनातन ॥ दुजें कांहीं दिसेना ॥१५९॥ब्रह्मी अन्यथाभास दिसत ॥ त्याचें नांव द्दश्य सत्य ॥ दोरावरी पादोदर भासत ॥ भ्रमेंकरूनि तत्त्वतां ॥१६०॥स्थाणु असतां चोर दिसत ॥ कीं शुक्तीवरी रजत भासत ॥ कीं मृगजलतीर मिथ्याभूत ॥ भ्रांतालागीं सत्य गमे ॥१६१॥तैसी निरसितां भ्रांती ॥ मग सहजचि वस्तुप्राप्ती ॥ यालागीं देशिकाप्रती ॥ शरण जावें अनन्य ॥१६२॥प्रकाशलिया अर्क ॥ मग कोण पुसे हो दीपक ॥ कीं रत्नपरीक्षा करितां देख ॥ गार देती भिरकावूनि ॥१६३॥कीं सुधारस करितां पान ॥ मग इतर रसां पुसे कोण ॥ प्राप्त होतां नृपासन ॥ मग कोरान्न कासया ॥१६४॥तैसें आचार्यकृपें तत्त्वतां ॥ सुखरूप अंगें होतां ॥ मग द्दश्यजाल पाहतां ॥ शोधितांही न सांपडे ॥१६५॥क्रियेसहित ज्ञान शुद्ध ॥ तोचि जाणिजे ब्रह्मविद ॥ त्याचा महिमा वेद ॥ वानी स्वयें निजमुखें ॥१६६॥ऐसें दिव्य निरूपण ॥ वर्षे याज्ञवल्क्य कृपाघन ॥ गार्गेयी आनंदली पूर्ण ॥ प्रेमें नेत्र लाविले ॥१६७॥परी याज्ञवल्क्याचें थोरपण ॥ प्रकटावया समस्तांत जाण ॥ दाटूनि घेतले आडवे प्रश्न ॥ चमत्कार दावावया ॥१६८॥तें अकस्मात गार्गेयीचें शिर ॥ पृथ्वीवरी पडिलें सत्वर ॥ हाहाकार करिती ऋषीश्वर ॥ जनकराव घावरला ॥१६९॥याज्ञवल्क्य बोले वचन ॥ गार्गेंयीसी कोणी आणा प्राण ॥ तोचि गायी जाईल घेऊन ॥ वस्त्रालंकारांसमवेत ॥१७०॥या जडपदार्थ गायी ॥ यांची आम्हांसी चाड नाहीं ॥ विवेकशिष्यांहातीं पाहीं ॥ वृत्तिगायी वळियेल्या ॥१७१॥वत्सांसमवेत गायी ते वेळां ॥ याज्ञवल्क्यें ब्राह्मणांसी वांटिल्या ॥ दक्षिणा अलंकार समर्पवी अकळां ॥ आपण निराळा उदास ॥१७२॥जनक म्हणे ऋषि समस्त ॥ उठवा गागेंयीचें प्रेत ॥ ते म्हणती मृत्युलोकीं अघटित ॥ केवीं घडे मनुष्यां ॥१७३॥आमुचे हातीं काय आहे अमृत ॥ तों उठवावें गार्गेंयीचें प्रेत ॥ मग याज्ञ वल्क्येंबहुत ॥ समर्थ्य प्रकट केलें तेव्हां ॥१७४॥उदक शिंपितां ते वेळीं ॥ गार्गेयी उठोनि उभी ठाकली ॥ याज्ञवल्क्याचे चरणीं लागली ॥ म्हणे त्वां जिंकिलें त्रैलोक्य ॥१७५॥गार्गेयी म्हणे समस्तां द्विजवरां ॥ यासी तुम्ही नमस्कार करा ॥ शरण रिघोनि सत्वरा ॥ आत्महित साधा तुम्ही ॥१७६॥तेथें कित्येक आनंदती ॥ कोणी येऊनि नमस्कार करिती ॥ कोणी मनामाजी तळमळती ॥ प्रवर्तती निंदेसी ॥१७७॥त्यांमध्यें विदग्धऋषीश्वर ॥ तेणें निंदा केली अपार ॥ म्हणे हा कुटिल थोर ॥ प्रेतें उठवी कापटयें ॥१७८॥तेणें निंदा केली बहुत ॥ कासया लिहावी समस्त ॥ मुख्य येथींचा हा अर्थ ॥ ब्रह्मनिष्ठ याज्ञवल्क्य ॥१७९॥निंदा ऐकतां कानीं ॥ वाटे प्राण द्यावा ते क्षणीं ॥ अथवा रागें उठोनी ॥ त्याग करूनि जावें पैं ॥१८०॥तैसा नव्हे याज्ञवल्की ॥ निंदा ऐकतां सर्वदा सुखी ॥ बोलतां चालतां लोकीं ॥ समाधि त्याची मोडेना ॥१८१॥मेहुणे विनोद करिती ॥ त्यांत वर्में निंदोत्तर बोलती ॥ परंतु विषाद नुपजे चित्तीं ॥ कौतुकें हांसती गदगदां ॥१८२॥तैसें याज्ञ वल्क्यासी निंदितां ॥ कौतुक वाटे त्याच्या चित्ता ॥ एवं सर्वलक्षणीं पुरता ॥ जनकासी कळलें हें ॥१८३॥तो ज्ञानगंगेचा लोट ॥ कीं विवेकरत्नांचा मुकुट ॥ कीं विज्ञानवैरागरींचा सुभट ॥ महामणि प्रकटला ॥१८४॥तारावया जगतू समग्र ॥ त्याच्या रूपें अवतरला ईश्वर ॥ असो गौरवूनि समस्त ऋषीश्वर ॥ जनकें तेव्हां बोळविले ॥१८५॥जैसी चपला लवोनि जात ॥ तैसी गार्गेयी जाहली गुप्त ॥ राव जनक आश्चर्य करीत ॥ म्हणे धन्य सामर्थ्य सद्नुरूचें ॥१८६॥मग याज्ञवल्क्यासी शरण ॥ भूपति रिघे प्रेमेंकरून ॥ यावरी जनकाचें लक्षण ॥ पाहे लक्षून याज्ञवल्क्य ॥१८७॥तूं तनुमनधनांशीं शरण ॥ तरी हें राज्य समस्त देईं दान ॥ तत्काल उदक घेऊन ॥ जनकें सोडिले ऋषीपुढें ॥१८८॥शरीर आणि मन ॥ येथे केलें समर्पव ॥ पहावया जनकाचें शिष्यपण ॥ याज्ञवल्क्य तेथून ऊठिला ॥१८९॥महाघोर अरण्यांत ॥ ऋषि तेव्हां प्रवेशत ॥ जेथें उदक फळ न मिळे किंचित ॥ गेला तेथें महाराज तो ॥१९०॥जनकासी म्हणे ऐक ॥ तूं येथें उभा राहें नावेक ॥ मी एका ऋषीचें दर्शन देख ॥ घेऊनि योतों मागुती ॥१९१॥जनक तेथें उभा ठाकला ॥ महाऋषि तेथोनि गेला ॥ द्वादश वर्षें नाहीं आला ॥ अंत पाहिला शिष्याचा ॥१९२॥तों इकडे जनक वनीं ॥ उभा असे तेचि स्थानी ॥ सद्नुरु गेला ती दिशा लक्षूनी ॥ कर जोडूनि वाट पाहे ॥१९३॥केव्हां येईल स्वामी दयाळ ॥ कैं वदन देखेन निर्मळ ॥ त्याचे चरणकमळीं भाळ ॥ मी ठेवीन केधवां ॥१९४॥स्वामीच्या मुखेंकरून ॥ कैं ऐकेन दिव्य निरूपण ॥ जेणें गोधनांसी आणिले प्राण ॥ प्रेत उठविलें गार्गेयीचें ॥१९५॥ज्याच्या अक्षता पडतां अपूर्व ॥ शुष्ककाष्ठीं फुटले नवपल्लव ॥ ज्ञान ज्याचें अभिनव ॥ ऋषी सर्व जिंकिले ॥१९६॥चौदा वर्ष तप करून ॥ भरत इच्छी श्रीरामागमन ॥ तैसे पाहावया गुरुचरण ॥ जनकरावो आर्तभूत ॥१९७॥शरीर गेलें वाळोन ॥ कंठी ठेवूनियां प्राण ॥ वाट पाहे रात्रंदिन ॥ उदकें नयन भरूनियां ॥१९८॥माता बाहेरी ॥ तान्हें वाट पाहे घरीं ॥ तैसा जनकराव अंतरीं ॥ आठवीत गुरुचरण ॥१९९॥असो द्वादश वर्षें होतां पूर्ण ॥ याज्ञवल्क्य उभा ठाकला येऊन ॥ तों डोळां उरलासे प्राण ॥ गुरु देखोन सद्नद जाहला ॥२००॥ह्रदयीं आलिंगिला प्रेमेंकरून ॥ तेणें शरीर जाहलें दिव्य पूर्ण ॥ मग जनक घाली लोटांगण ॥ प्रेमेंकरून स्फुंदतसे ॥२०१॥ब्रह्मविद्या ते संपूर्ण ॥ उपदेशिली जनकाललागून ॥ ’ तत्त्वमसि ’ महावाक्यविवरण ॥ सांग श्रवण करविलें ॥२०२॥जैसी याज्ञवल्क्याची स्थिती ॥ तैसा जाहला जनकनृपती ॥ मग विदेही जनक म्हणती ॥ समस्त ज्ञानी तयातें ॥२०३॥गोलियाची खंती न करी ॥ असतांही आस्था न धरी ॥ ब्रह्मानंदें निर्धारीं ॥ बुद्धि बोधिला सर्वदा ॥२०४॥मग याज्ञवल्क्यानें जनकासी ॥ मागुती आणिलें निथिलेसी ॥ म्हणे राज्य करीं निश्चयेंसीं ॥ विदेहस्थिति न सांडितां ॥२०५॥आत्मस्वरुपसदनीं ॥ सुखरूप राहें समाधानीं ॥ विश्वाभास कौतुक पाहोनी ॥ स्वानंदघनीं प्रवर्तावें ॥२०६॥द्वेष प्रीति न करितां ॥ निश्चल रहावें तत्त्वतां ॥ गुरुस्थानीं सकल संतां ॥ सर्वदाही भजावें ॥२०७॥आणिक याज्ञवल्क्य बोले वचन ॥ बा रे ऐक सावधान ॥ नानाशास्त्रें करावीं श्रवण ॥ हेंही व्यसन कामा न ये ॥२०८॥नानाशास्त्रमतवादश्रवण ॥ ऐकतां चित्त होईल मलिन ॥ अद्वैतसाधन श्रवण मनन ॥ संतांच्या मुखें करीं कां ॥२०९॥एकचि अहोरात्र पठनव्यसन ॥ तें तों परमार्थासी करी मलिन ॥ घोकितां काळ गेला पूर्ण ॥ विश्रांति नव्हे चित्तासी ॥२१०॥तैत्तिरीयशाखेंत ॥ भारद्वाजें वर्णिले यथार्थ ॥ ऋषि एक नामें त्रिवर्त ॥ तेणें पठन श्रवण धरियेलें ॥२११॥पांचशत संवत्सर ॥ वेद पढला समग्र ॥ वाद करूनि जिंकिला इंद्र ॥ विद्या अपार तयाची ॥२१२॥वादविवादें तप्त शरीर ॥ ब्रह्मद्रोह घडला अपार ॥ तळमळ नवजाय अहोरात्र ॥ वादविवाद करितां बहु ॥२१३॥मग गुरुजवळी करितां वेदांतश्रवण ॥ समूळ टाकिलें वादव्यसन ॥ तैसेंचि अहोरात्र अनुष्ठान ॥ क्षुद्र साधनीं अनर्थ हा ॥२१४॥एतदर्थ ऐक सावधान ॥ ऋभुनामा ऋषि प्रवीण ॥ तेणें निदाघ शिष्य करून ॥ वेदांतज्ञान उपदेशिलें ॥२१५॥ऋभु सहज तेथूनि विचरत ॥ गेला द्वादश वर्वेंपर्यंत ॥ निदाघ आठवला मनांत ॥ परतोनि येत शिष्यापाशीं ॥२१६॥तंव तो श्रीगुरुसी विसरोन ॥ अद्वैतज्ञान सांडून ॥ करूं लागला अनुष्ठान ॥ क्षुद्रसाधन दैवतांचें ॥२१७॥ऋभुगुरु आला आश्रमासी ॥ परी निदाघ नोळखे तयासी तयासी ॥ म्हणे तुम्ही कोठील ऋषी ॥ काय मानसीं इच्छा असे ॥२१८॥गुरु बोले हांसून ॥ आम्हांसी देईं मिष्टान्नभोजन ॥ जें अविनाश न विटे मन ॥ क्षुधा दुसर्यानें न लागेचि ॥२१९॥तुंमीरहित मिष्टान्न ॥ कच्चेपण दूर करून ॥ अथवा गेलें करपोन ॥ ह्ठयोगेंकरूनियां ॥२२०॥तें न मी जेवीं तत्त्वतां ॥ मी असें हातापायांपरता ॥ मुख जिव्हा आणि दंतां ॥ विरहित मी वर्ततसें ॥२२१॥सकल इंद्रियांसी चोरून ॥ मज तें घालीं भोजन ॥ निदाघें शब्दावरून ॥ गुरुनिधान ओळखिलें ॥२२२॥मग घातलें लोटांगण ॥ एक मास गुरु राहोन ॥ पुनः त्यासी अद्वैतज्ञान ॥ तथासांग निरोपिलें ॥२२३॥गुरु गेला तीर्थाप्रती ॥ बारा वर्षें भरलीं निश्चितीं ॥ पाहावया शिष्य मागुती ॥ येता जाहला आदरें ॥२२४॥तों समिधा कुश घेऊन ॥ निदाघ परतला वनाहून ॥ तों राजाही मृगया करून ॥ गगरद्वारासमीप आला ॥२२५॥वेशींत दाटी जाहली बहुत ॥ निदाघ उभा राहिला तेथ ॥ तों ऋभुगुरु अकस्मात ॥ तोही तेथें पातला ॥२२६॥द्दष्टाद्दष्टि जाहली ॥ निदाघें ओळख सांडिली ॥ अनुष्ठानीं वृत्ति गुंतली ॥ गुरुमाउली नोळखेचि ॥२२७॥गुरु म्हणे निदाघासी ॥ कां येथें उभा आहेसी ॥ येरू म्हणे काय न दिसे द्दष्टीसी ॥ राजभार पुढें जातो ॥२२८॥गुरु म्हणे आम्ही जिरंजनीं ॥ वसत असों दिनरजनीं ॥ तेथें दुजें न देखों नयनीं ॥ आपणावांचूनि तत्त्वतां ॥२२९॥तरी सांग येथें राजा कोण ॥ वरकड कैसेनि लहान ॥ कोण मूर्ख सुजाण ॥ बद्ध मुक्त कोण ते ॥२३०॥मीही निजद्दष्टीं पाहीन ॥ मज न दिसे थोर लहान ॥ येरू म्हणे काय गेले नयन ॥ पुढें तुज दिसेना ॥२३१॥गजारूढ नृपवर ॥ भोंवता न देखसी परिवार ॥ येरू म्हणे हें क्षणभंगुर ॥ मज डोळां दिसेना ॥२३२॥येरू म्हणे खालता हस्ती ॥ वरती बैसला आहे नृपती ॥ गुरु म्हणे खालीं वर निश्चितीं ॥ द्दष्टि माझी न बैसे ॥२३३॥एक व्यापक चैतन्य ॥ दुजें न दिसे मजलागून ॥ गज राजा थोर लहान ॥ कोणी येथें न दिसेचि ॥२३४॥निदाघ म्हणे तूं वेडा ॥ तुज कांहीं न दिसे मूढ ॥ गुरु म्हणे रे दगडा ॥ व्यर्थ श्रम गेला माझा ॥२३५॥तूं केवळ पाषाण ॥ अंतर्द्दष्टि नाहीं तुज पूर्ण ॥ राजपरिवार दाविसी मजलागून ॥ नेणसी खूण शतमूर्खा ॥२३६॥राजा मज दाविसी ॥ राव म्हणावा तरी कोणासी ॥ जो साक्षी वर्तवी सर्वांसी ॥ तोचि नेमेंसीं राजेंद्र ॥२३७॥निदाघें गुरु बोलाविला ॥ म्हणे थोर अन्याय केला ॥ साष्टांगें लागला चरणकमलां ॥ स्फुंदतसे स्वापराधें ॥२३८॥मग गुरूनें धरिला ह्रदयीं ॥ बा रे भेद न करीं कांहीं ॥ अनुष्ठानें सर्वदाही ॥ चित्त तुझें भ्रष्टलेंसे ॥२३९॥अनुष्ठानाचा तूं कर्ता ॥ सर्वव्यापक अससी तत्त्वतां ॥ तेथें द्दष्टि घालितां ॥ साधन सहज ओसरलें ॥२४०॥असा द्दढ बोध करून ॥ ऋभु गेला आश्रमालागून ॥ यालागीं अनुष्ठानव्यसन ॥ मलिन करी ज्ञानासी ॥२४१॥त्याचा दासनामें दुसरा शिष्य ॥ तोही प्रवर्तला अनुष्ठानास ॥ जें तें अपवित्र दिसे त्यास ॥ बैसावयास ठाव न दिसे ॥२४२॥म्हणवी मी सोंवळा पवित्र ॥ ही पृथ्वी आहे अपवित्र ॥ मग वृक्षाग्रीं निरंतर ॥ आश्रम करूनि राहिला ॥२४३॥मेघोदकें स्त्रानपान ॥ ऐसा कर्मींच गेला भुलोन ॥ तेथें ऋभु आला धांवोन ॥ तंव तो वृक्षाग्रीं बैसला ॥२४४॥म्हणे वृक्षाखालीं उतर ॥ येरू म्हणे मेदिनी अपवित्र ॥ हांसत ऐकोन ऋभुवर ॥ म्हणे मूर्ख साचार अविवेकी तूं ॥२४५॥पंचभूतात्मक तुझें शरीर ॥ विटाळाचें परम अपवित्र ॥ तूं कर्मठ परम पवित्र ॥ त्याचा संग कां धरियेला ॥२४६॥तुझी शुद्धि तुज नाहीं ॥ वृक्षाग्रीं बैसोनि फळ कायी ॥ मग तेणें उतरोनि लवलाहीं ॥ चरण धरिले गुरूचे ॥२४७॥असो तो गुरूनें बोधून ॥ ब्रह्मनिष्ठ केला पूर्ण ॥ मग तो सत्कर्में करूनि ब्रह्मार्पण ॥ ब्रह्मानंदें विचरत ॥२४८॥दुर्वास शास्त्राभ्यास करून ॥ पुस्तकभार संग्रहून ॥ तीन शतें अश्व भरून ॥ कैलासाप्रति चालिला ॥२४९॥नारद म्हणे कैलासनाथा ॥ हा भारवाही रासभ तत्त्वतां ॥ दुर्वास क्षोभला ऐकतां ॥ मग शांत केला शंकरें ॥२५०॥म्हणे कासया हें पुस्कओझें ॥ याणें निवेना अंतर तुझें ॥ स्वानुभव सदनीं विराजे ॥ निजीं निज सर्वदा ॥२५१॥शंकरें बोधिला तो विशेष ॥ मग सुखी जाहला दुर्वास ॥ पुस्तकभार निःशेष ॥ समुद्रांत टाकिले ॥२५२॥याज्ञवल्क्य म्हणे जनकालागून ॥ तूं न धरीं भलतें व्यसन ॥ सांगितलें जें अद्वैतज्ञान ॥ निजसुखें भोगीं तें ॥२५३॥ऐसें जनकासी सांगून ॥ याज्ञवल्क्य गेला तेथून ॥ ही कथा करितां श्रवण ॥ होती ज्ञानी साधक ॥२५४॥लोमशऋषि परम प्रवीण ॥ करितां तीर्थयात्रा पर्यटन ॥ हें याज्ञवल्क्याचें आख्यान ॥ पुण्यपावन कथियेलें ॥२५५॥वैशंपायन म्हणे जनमेजया ॥ लावण्यचंद्रा नरवैडूर्या ॥ तुझ्या पूर्वजाची पवित्र चर्या ॥ वर्णितां न सरे कदापि ॥२५६॥अरण्यपर्व गोड बहुत ॥ शौनकाप्रति सांगे सूत ॥ पुढें चालिले पंडुसुत ॥ पहात पहात तीर्थमहिमा ॥२५७॥वनपर्व सुरस बहुत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ करूनि श्रीधरमुख निमित्त ॥ पंढरीनाथ बोलतसे ॥२५८॥पांडुरंगा ब्रह्मानंदा जगदंकुरा मूलकंदा ॥ श्रीधरवरदा अनादिसिद्धा ॥ अव्यंगा अभंगा अक्षय्या ॥२५९॥सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ अरण्यपर्व व्यासभारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ सत्ताविसाव्यांत कथियेला ॥२६०॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ वनपर्वटीका श्रीधरकृत ॥ याज्ञवल्क्यानें जनकासी वेदान्त ॥ सांगितला तें आख्यान संपविलें ॥२६१॥इति श्रीपांडवप्रतापे वनपर्वणि जनकयाज्ञवल्क्यसंवादे सप्तविंशाध्यायः ॥२७॥॥ श्रीपांडवप्रताप - वनपर्व - सप्तविंशाध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : February 09, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP