पांडवप्रताप - अध्याय २० वा
पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.
॥ श्री गणेशाय नमः ॥ यदुकुल कमल विकास मित्र ॥ जो सच्चिदानंद जलदगात्र ॥ पद्म संभव आणि त्रिनेत्र ॥ ह्रदयीं ज्यासी चिंतिती ॥१॥
पांडवपालक जगदीश्वर ॥ भक्त कैवारी पूर्णावतार ॥ लीला ]विग्रही यादवेंद्र ॥ भक्तवत्सल दयाब्धि ॥२॥
मागें संपला राजसूय यज्ञ ॥ द्वारकेसी गेला मनमोहन ॥ नारदें पाहोनि सभासदन ॥ धर्मराया जाणविलें ॥३॥
पुढें दिसतें विघ्न थोर ॥ आटतील पृथ्वीचे नृपवर ॥ हें जगद्रुरु येऊनि सविस्तर ॥ वेदव्यास कथील ॥४॥
नारद स्वामी ऐसें बोलोन ॥ सवेंचि पावले अंतर्धान ॥ तों सत्यवती ह्रदयरत्न ॥ वेदव्यास पातला ॥ ५॥
नमस्कारीती पांचही जण ॥ कनकासनीं केलें पूजन ॥ धर्म म्हणए ब्रह्म नंदन ॥ गेला संगोन संकलित ॥६॥
तें प्रकट करीं समस्त ॥ मग बोलिला शुकतात शुकतात ॥ बा रे विघ्नांचे आवर्त ॥ पुढें अत्यंत दिसताती ॥७॥
एकांतीं नेऊनि धर्मास । गुज कथीत वेदव्यास ॥ शत्रूंचा अत्यंत उत्कर्ष ॥ दिसतसे येथूनि ॥८॥
धैर्य न सांडीं सर्वथा सत्य ॥ पुढें तेरा वर्षेंपर्यंत ॥ अवदशा होईल प्राप्त ॥ असंख्यात क्लेश पैं ॥९॥
मावळेल ऐश्वर्यदिवस ॥ घडेल बहुत बनवास ॥ तेथेंही घडीघडी त्रास ॥ पाववितील दुरात्मे ॥१०॥
द्वारकाधीश मन्मथतात ॥ भक्त वत्सल स्नेहाळ बहुत ॥ तो रक्षील तुम्हां तुम्हां तथार्थ ॥ माय जैशी तान्हया ॥११॥
ईश्वरी माया गहन बहुत ॥ प्रारब्ध भोग बलवंत ॥ पडतील दुःखांचे पर्वत ॥ धैर्य अत्यंत धरीं मनीं ॥१२॥
धर्मात्मया धर्मनंदना ॥ न करीं कोणाची हेलना ॥ न बोलें निष्ठुरवचना ॥ दया दीनांवरी करीं पां ॥१३॥
वर्म न बोलें कोणाचें ॥ आशीर्वाद घेईं ऋषींचे ॥ विनोदेंही कोणी प्राण्याचें ॥ छलन न करीं सर्वथा ॥१४॥
दुर्जनांच्या गृहाप्रती ॥ सहसा न जावें निश्चिती ॥ दुर्जन बोलती दुरुक्ती ॥ परी प्रत्युत्तर न द्यावें ॥१५॥
नीचाशीं न करीं सहवास ॥ गोत्रजांचा न धरीं विश्वास ॥ षड्वैरी जिंकूनि मानस ॥ लावीं भगवंतीं तत्त्वतां ॥१६॥
पाश हातीं धरू नियां ॥ सांगतों तुज धर्मराया ॥ प्राणान्तही जाहलिया ॥ न खेळें द्यूत सर्वथा ॥१७॥
शत्रु जपती बहुत ॥ हस्तिनापुरा तळीं वाढत ॥ वरी इंद्र प्रस्थ श्रेष्ठ दिसत ॥ हत्तीवरी इंद्र जैसा ॥१८॥
गजपुरा कदा न जावें ॥ शत्रुगृहीं न बैसावें ॥ विदुराचे बुद्धीनें वर्तावें ॥ न खेळावें द्यूत कदा ॥१९॥
वैभव गेलिया समस्त ॥ खचों नेदीं धैर्य पर्वत ॥ ऐसें शिकवूनि सत्यवती सुत ॥ अंतर्धान पावला ॥२०॥
व्यासें कथिलें जें गुज ॥ तें बंधूंसी सांगे धर्मराज ॥ पुढें बरवें न दिसे मज ॥ काल कठिण वाटतो ॥२१॥
पार्थ बोले यथार्थ वचन ॥ पाठीशीं असतां जगज्जीवन ॥ कदा बाधूं न शके विघ्न ॥ कृष्णस्मरण करितां पैं ॥२२॥
कर्माच्या गती तों गहना ॥ आलें भगवंताचे मना ॥ तेथें कोणाचें चालेना ॥ कल्यांतींही सर्वथा ॥२३॥
सूत्रधारी तो गोपाळ ॥ न कळती त्याचे विचित्र खेळ ॥ हर्ता पाळिता सकळ ॥ त्याविण दुजा असेना ॥२४॥
असो जाहली जे विवंचना ॥ ते शकुनि आणि दुर्योधना ॥ कळों नेदितां मना ॥ माजी ठेविली सर्वही ॥२५॥
धर्मासी म्हणे शकुनी ॥ आवडी दुर्योधनाचे मनीं ॥ मयसभा पहावी नयनी ॥ सावकाश निवाडें ॥२६॥
अजातशत्रु पंडुसुत ॥ अवश्य म्हणोनि धरिला हात ॥ शकुनिदुर्योधनां सहित ॥ परिवारेंशीं निघाले ॥२७॥
निघाल्या राणिया ते वेळीं ॥ मुख्य राणी त्यांत पांचाळी ॥ सभेवरी चढल्या सकळी ॥ सुख भूमंडळीं न समाये ॥२८॥
सभा पाहतां भुले मन ॥ विसरोनि जाती भूकतहान ॥ यामिनी किंवा दिन ॥ न कळे कांहीं सर्वथा ॥२९॥
मागें सभा वर्णिळी बहुत ॥ काश्मिरी भिंती लखल खित ॥ द्वारें झांकिलीं कीं मुक्त ॥ न कळतीच पाहतिया ॥३०॥
परम कुशल डोळस पाहतां ॥ स्तब्ध होती पुढें चालतां ॥ जल कीं मही तत्त्वतां ॥ काचभूमि कळेना ॥३१॥
वस्त्रें सांवरी दुर्योधन ॥ सेवक म्हणती हें नव्हे जीवन ॥ तों स्फटिकवापिका भरून ॥ उदकें पूर्ण जाहलीसे ॥३२॥
इतुक्यांत दुर्योधन ॥ चालतां पडे निसरून ॥ वस्त्रें भिजलीं संपूर्ण ॥ हांसती जन गदगदां ॥३३॥
भीमार्जुन नकुल सहदेव ॥ टाळ्या पिटूनि हांसती सर्व ॥ सकळ स्त्रियांचा समुदाव ॥ पांचाली सहित हांसला ॥३४॥
नकुल सहदेव धांवती ॥ ह्स्त देऊनि बाहेर काढिती ॥ नूतन वस्त्रें लेवविती ॥ धर्माज्ञेनें तेधवां ॥३५॥
झांकिलीम कवाडें की मुक्त ॥ दुर्योधन हातें चांचपीत ॥ मुक्त म्हणोनि निःशंक जात ॥ शिरीं लागत मणिकपाटें ॥३६॥
नकुल सह्देव हातीं धरून ॥ पुढें चालविती सुयोधन ॥ भीतभीत टाकितां चरण ॥ भीमसेन बोलत ॥३७॥
अंधपुत्र हें अभिधान ॥ सुयोधनें दाखविलें खरें करून ॥ वर्मस्पर्शाचें वचन ॥ ऐकतां ह्रदय खोंचलें ॥३८॥
प्रलयाग्नी ऐसा क्रोध पेटत ॥ परी आवरी समयोचित ॥ जैसा विषदाह अद्भुत ॥ उमाधव कंठीं धरी ॥३९॥
मनीं म्हणे दुर्योधन ॥ याचें उसणें पुढें घेईन ॥ पांडवां हिंडवीन रानोरान ॥ अन्नवस्त्रांविरहित ॥४०॥
स्त्रियां सहित पांचाळी ॥ मज हांसली ये वेळीं ॥ सभेदेखतां तत्काळीं तत्काळीं ॥ नग्न करीन पुढें इयेतें ॥४१॥
येथें क्रोधे करितां अविवेकें ॥ होईल शिशुपाला सारिखें ॥ बुद्धिबळें यांचीं मुखे ॥ ठेचूनि चूर्ण करावी ॥४२॥
मग आज्ञा मागोनि सत्वरा ॥ दुर्योधन गेला हस्तिनापुरा ॥ परम प्रीति युधिष्ठिरा ॥ सुयोधनाचे सन्मानीं ॥४३॥
अनर्घ्य वस्त्रें उत्तम ॥ दुर्योधनासी देत धर्म ॥ शकुनि गौरवूनि परम ॥ कुंजरपुरा बोळविले ॥४४॥
दुर्योधन टाकीत श्वासोच्छवास ॥ आला वेगें कुंजर पुरास ॥ शरीर तप्त बहुवस ॥ अग्निसंगें लोह जैसें ॥४५॥
सर्पा ऐसा धुसधुसित ॥ नयनीं नीर सदा वाहत ॥ रागें अधर चावीत ॥ दांत खात करकरां ॥४६॥
मनगटें चावूनि करी चूर्ण ॥ म्हणे जळोनि जावो हा प्राण ॥ शुक्रनि पुसे येऊन ॥ खेदें क्षीण कां होसी ॥४७॥
दुर्योधन म्हणे मातुला ॥ शत्रूंची लक्ष्मी पाहिली डोळां ॥ मयस भेसी अपमान जाहला ॥ त्वां देखिला तो द्दष्टीनें ॥४८॥
शत्रुप्रताप पाहोनि अत्यंत ॥ मज नवज्वर जाहला अद्भुत ॥ वरी अपमान हा संनिपात ॥ जाहला प्राणान्त मज वाटे ॥४९॥
तरी तूं मातुल वैद्य पूर्ण ॥ देईं लवकरी रसायन ॥ यावरी शकुनि बोले वचन ॥ म्हणे प्राक्तन सबल त्यांचें ॥५०॥
भीमासी विष घातलें ॥ लाक्षागृहीं अवघे जाळिले ॥ परी पूर्ववत सगळे ॥ मागुती ऐश्वर्य पावले पैं ॥५१॥
गांठीं त्यांचे पूर्व पुण्य ॥ स्वयंवरीं लाधलें द्रौपदी रत्न ॥ मग मयदैत्य सभा करून ॥ रथ धनुर्बाण अग्नि देत ॥५२॥
महा पुण्याचे पर्वत ॥ तरी पाठिराखा श्री कृष्णनाथ ॥ त्यावरी सोय राखीत ॥ पडों नेदी उणें कांहीं ॥५३॥
तरी तुम्ही राज सूय यज्ञ ॥ करा समस्त राजे जिंकून ॥ त्यांहूनि विशेष उदारपण ॥ करूनि दावा लोकांतें ॥५४॥
दुर्योधन म्हणे पांडवीं बळें ॥ पृथ्वीचे राजे जिंकिले ॥ अवघे दीन जैसे कोल्हे ॥ अधीन करूनि सोडिले ॥५५॥
जरी दल आहे अकरा अक्षौहिणी ॥ तरी युद्ध करूनि समरांगणी ॥ पांडव मारूनि रणीं ॥ घ्यावें हिरोनि राज्य सर्व ॥५६॥
शकुनि म्हणे ऐक साचार ॥ व्यर्थ कां करिसी हा विचार ॥ युद्धीं जिंकोनि पार्थ वृकोदर ॥ जय कधींच पावान ॥५७॥
सुरांरमण ॥ आले पृथ्वीचे पार्थिव मिळोन ॥ तरी न जिंकवे अर्जुन ॥ विभांडील समस्तांसी ॥५८॥
छप्पन्न कोटी यादवां सहित ॥ कृष्ण त्याची पाठ राखीत ॥ द्रुपद धृष्टद्युन्म आप्त ॥ पाठिराखे सर्वदा ॥५९॥
यालागीं युद्धाची गोष्टी ॥ व्यर्थ काय बोलोनि ओष्ठीं ॥ जैसी दरिद्याची मुष्टी ॥ झांकली उघडी समान ॥६०॥
तरी पांडव जिंकावया मजमजवळ ॥ एक युक्ति आहे सबळ ॥ कपटपाश सोज्ज्वळ ॥ वश मज असती पैं ॥६१॥
त्याचि कपटपाशें करून ॥ नलाची संपत्ति हरून ॥ हिंडविला रानोरान ॥ तैसेंचि करीन पांडवां ॥६२॥
करूनि नाना लाघवभाव ॥ येथवरी आणावे पांडव ॥ पण करूनियां सर्व ॥ राज्य हरीन तयांचें ॥६३॥
इच्छिला डाव पडेल आपणां ॥ दुजया वश न होती कोणा ॥ कीं गारुडिया अधीन जाणा ॥ सर्प जैसा भयंकर ॥६४॥
वरकडांसी करील दंश ॥ तैसे आहेत मजपाशीं पाश ॥ ऐसें ऐकतां कौरवेश ॥ पाय धरी शकुनीचे ॥६५॥
म्हणे मातुला सांगों काई ॥ तुज मी काय होऊं उतराई ॥ मी सर्वस्वें तुझ्या पायीं ॥ अंकिला होईन जन्मवरी ॥६६॥
तरी हे अवघी मात ॥ प्रज्ञाचक्षूसी करीं श्रुत ॥ शकुनि येऊनि बोलत ॥ अंधाप्रति ते वेळीं ॥६७॥
तुझा वडील सुत दुर्योधन ॥ चिंताग्नींत गेला करपोन ॥ ऐसें ऐकतां अंबिकानंदन ॥ परम घाबरा जाहला ॥६८॥
पाचारोनि सुयोधना ॥ कुरवाळी त्याचिया वदना ॥ म्हणे ऐश्वर्य भोग भोगितां मना ॥ काय खेद जाहला ॥६९॥
दुर्योधन बोले ते वेळीं ॥ भुजंगफणेची साउली ॥ तेथें मंडूकासी निद्रा लागली ॥ ऐसें घडेल कीं सांग पां ॥७०॥
सर्पें क्रोधें ज्याचा चरण ॥ द्दढ धरिला आढी घालून ॥ तों व्याघ्र बैसला माने येऊन ॥ रक्तपान करावया ॥७१॥
शर्करेचे लाडू वळून ॥ त्याच्या मुखांत घातले नेऊन ॥ त्याचा तो स्वाद घेईल पूर्ण ॥ घडेल काय सांग पां ॥७२॥
शत्रूचें ऐश्वर्य देखोन ॥ माझे निघों पाहती प्राण ॥ कीं देशत्याग करून ॥ सेवीन विपिन एकला ॥७३॥
मयसभेंत चालतां ॥ जळीं बुडालों अवचितां ॥ द्रौपदी हांसली तो चित्ता ॥ खेद वाटे माझिया ॥७४॥
मार्ग म्हणूनि मी चालत ॥ तों कपाळीं भिंत आदळत ॥ भीम म्हणे अंधसुत ॥ यथार्थ होसी सत्य तूं ॥७५॥
ह्रदय पिटी दुर्योधन ॥ मी आतां विष भक्षीन ॥ मी पावलिया मरण ॥ नांदें घेऊन पांडवां ॥७६॥
धृतराष्ट्र म्हणे हा वृत्तान्त ॥ विदुरासी सांगावा समस्त ॥ दुर्योधन म्हणे तो चिंतीत ॥ आमुचा घात सर्वदा ॥७७॥
आमुचा अपमान करून ॥ पांडवांचें वर्णितो गुण ॥ शक्रप्रस्थाचें राज्य देऊन ॥ प्रबल केले तेणेंचि ॥७८॥
विदुराची बुद्धि कुटिल ॥ आम्हां समस्तां मारवील ॥ तुज पांडवांचे द्वारीं बैसवील ॥ भणंग प्राय नेऊनि ॥७९॥
दग्धकांतारीं वानर ॥ हिंडे जैसा क्षुधातुर ॥ कीं दरिद्री ओढवी कर ॥ अन्नालागीं घरोघरीं ॥८०॥
पांडवांचे साउलीसी ॥ बैसें जाऊनि अहर्निशीं ॥ मज घेऊनि काय करिसी ॥ मनीं चिंतिसी घात माझा ॥८१॥
शतपुत्र पवती मरण ॥ तुं वांचें जैसा सर्प जीर्ण ॥ आपुलें सपिंडीकरण ॥ पांडवांहातीं इच्छिसी ॥८२॥
अरे या ब्रह्मांडमंडपांत ॥ पांडवां ऐसें नाहींत भाग्यवंत ॥ त्याचें उच्छिष्ट भक्षितां यथार्थ ॥ हस्तिना पुरींचे राज्य पैं ॥८३॥
पांडवांपुढें निश्चितीं ॥ कुबेर आणि अमरपती ॥ मज मशकें वाटती ॥ द्वारीं तिष्ठती नृप सर्व ॥८४॥
सुवर्ण रत्नें वस्त्रभार ॥ घेऊनि घरा धांवती नृपवर ॥ नाना देशींचीं मनुष्यें विचित्र ॥ भेटी येती सर्वदा ॥८५॥
राजसूययज्ञीं म्यां देखिले ॥ राज यांनीं करभार पाठविले ॥ असंख्य हस्ती भरोनि आले ॥ उभे राहिले धर्मद्वारीं ॥८६॥
धर्मासी जाणविती मात ॥ आल करभार असंख्यात ॥ ठेवा म्हणावया उसंत ॥ धर्मासी तेथें होईना ॥८७॥
नाना देशींचे करी बहुत ॥ श्वेतवर्ण आणि चौदंत ॥ सप्तद्वीपींचे घोडे अद्भुत ॥ पाठविती धर्मातें ॥८८॥
रथ शिबिका नाना यानें ॥ मणिमय प्रकाशमानें ॥ सांगतां वस्तु नानाभिधानें ॥ शतवर्षें सरेना ॥८९॥
माझ्या अधीन होतें भांडार ॥ म्यां संपत्ति देखिल्या समग्र ॥ शत्रु मातले अपार ॥ करीं विचार एक आतां ॥९०॥
शकुनि कुशल मातुल ॥ मजलागीं परम स्त्रेहाळ ॥ तेणें विचार केला तो संमूळ ॥ मनासी आणीं राजेंद्रा ॥९१॥
शकुनि कर्णीं सांगत ॥ पांडव आणावे येथ ॥ यज्ञ एक आरंभावा यथार्थ ॥ असत्य निमित्त करूनियां ॥९२॥
विश्वासोनि आणावे येथ ॥ मग मांडूं कपटद्यूत ॥ पण करूनि समस्त ॥ जिंकूं वैभव क्षणार्धें ॥९३॥
मूळ पाठवावा विदुर तेथ ॥ त्याचे बोलें येतील येथ ॥ हा एकांतींचा वृत्तान्त ॥ कळों त्यासी न द्यावा ॥९४॥
महोत्साह पहावया आदरें ॥ राजांसी लिहावीं पत्रें ॥ यावरी विदुरासी अंबिकापुत्रें ॥ आज्ञा पिलें तें ऐका ॥९५॥
आरूढोनियां कनकरथीं ॥ जावें शक्रप्रस्था प्रती ॥ घेऊनि येईं पांडवां प्रती ॥ कुंतीद्रौपदी सहित पैं ॥९६॥
महोत्साह पाहोनि तत्त्वतां ॥ मग जावें पुरंदरप्रस्थ ॥ विदुर म्हणे राया समर्था ॥ अवश्य जातों आतांचि ॥९७॥
त्रिकालज्ञानी विदुर भक्त ॥ कळला पुढील सर्व वृत्तान्त ॥ मग रथारूढ होऊनि त्वरित ॥ शक्रप्रस्था चालिला ॥९८॥
जाऊनि विदुराचिये कंठीं ॥ दुर्योधन घाली प्रेमें मिठी ॥ म्हणे एकदां दावीं द्दष्टीं ॥ भीमार्जुनां आणूनियां ॥९९॥
धर्मराया ऐसा सुगुणी बंधु ॥ नव्हे ऐसा दुसरा साधु ॥ शांतिक्षमेचा केवळ सिंधु ॥ मज वेधु तयाचा ॥१००॥
मनांत वाटे बहुत ॥ केधवां देखेन धर्मा प्रती ॥ पांडावांहूनि निश्चिती ॥ मज नावडे दुसरें पैं ॥१०१॥
नयनीं आणिले अश्रुपात ॥ विदुरा आतां जाईं त्वरित ॥ सर्वज्ञ बंधु धर्म सत्य ॥ वदन दावीं तयाचें ॥१०२॥
द्रौपदी कुंती पांडव ॥ पहावया आणीं महोत्सव ॥ अवश्य म्हणोनि सर्वज्ञ राव ॥ विदुर तेव्हां चालिला ॥१०३॥
वाटेसी जातां विदुर ॥ मनांत करी विचार ॥ काय करील न कळें यादवेंद्र ॥ कठिण प्रकार दिसतो पैं ॥१०४॥
विदुर आला ऐकोन ॥ सामोरे येती पांडव धांवोन ॥ प्रीतीं वंदिती चरण ॥ देती आलिंगन सप्रेम ॥१०५॥
मंदिरांत नेऊनि प्रीतीं ॥ विदुरा प्रति आदरें पूजिती ॥ येऊनि भेटली कुंती ॥ द्रौपदी सती नमी तेव्हां ॥१०६॥
धर्म म्हणे दिवस धन्य ॥ आजि जाहलें पितृव्य दर्शन ॥ वडिला तुझे स्त्रेहेंकरून ॥ आम्ही बालकें सुखी असों ॥१०७॥
धेनु दूरी वना जाय ॥ परी वत्सापाशीं गुंतला स्त्रेह ॥ कीं कूर्मिणी दुरोनि पाहे ॥ पिलांकडे स्त्रेहानें ॥१०८॥
किंवा ते क्रौंचपक्षिणी ॥ समुद्र बेटीं पिलीं ठेघूनी ॥ चारा घ्यावया लागूनी ॥ जाय षण्मासपर्यंत ॥१०९॥
परी क्षणक्षणां आठवूनि बालक ॥ पाहे ऊर्ध्व करूनि मुख ॥ त्या स्त्रेहें तीं तृप्त देख ॥ तेचि रीतीं तूं आम्हांतें ॥११०॥
तूं आमुची स्त्रेहाल जननी ॥ रक्षिसी बालपणा पासूनी ॥ तुझिया ओसंगा घालूनी ॥ स्वर्गा गेला पंडुराव ॥१११॥
विवर त्वां कोरविलें ॥ लाक्षासदनांत रक्षिलें ॥ बोलतां नेत्रीं अश्रु आले ॥ धर्मरायाचे तेधवां ॥११२॥
विदुर म्हणे ऐकें निश्चित ॥ दुर्जनाचें नेणवे चित्त ॥ उत्तम बोलोनि घात ॥ करील केव्हां नेणवे हें ॥११३॥
पुढें काळ दिसतो कठिण ॥ नारद स्वामी गेला सांगोन ॥ तेंचि वेदव्यासें कथिलें पूर्ण ॥ ह्रदयीं गोष्टी धरीं ते ॥११४॥
आणीकही संतमहंत ॥ तुज सांगती हेंचि हित ॥ मीही तुज शिकवीं यथार्थ ॥ बुद्धिवाद तोचि कीं ॥११५॥
धृतराष्ट्र आणि दुर्योधन ॥ यांहीं मांडिला उत्साहयज्ञ ॥ बोलाविलें भेटी लागून ॥ कुंतीद्रौपदी सहित पैं ॥११६॥
दुर्योधन करी खंती ॥ धरी भेटीची बहु प्रीती ॥ ऐकतां पांचही बंधु हांसती ॥ हस्तीं हस्त मेळवूनि ॥११७॥
आश्चर्य वाटे बहुवस ॥ गोडीस आलें महाविष ॥ महासर्पें शांति विशेष ॥ धरिली नवल वाटतें ॥११८॥
शैतल जाहला वडवानल ॥ अमृत झालें हालाहल ॥ कीं व्याघ्रें धरिलें निर्मल ॥ शांत पण आजि वाटे ॥११९॥
नम्र जाहली वज्रधार ॥ क्षारसिंधु जाहला मधुर ॥ दुर्यो धनाची प्रीति साचार ॥ तैसी आजि वाटते ॥१२०॥
विदुर म्हणे सावधान ॥ तुम्हांसी मी नेतों बोला वून ॥ परी तेथें मिळतील दुर्जन ॥ मज वचन बोलतां न ये ॥१२१॥
त्यांशीं खेळों नको यथार्थ ॥ बळें मांडितील कपट द्यूत ॥ जाहलियाही प्रानान्त ॥ पण कांहीं न करावा ॥१२२॥
सहस्त्र गोष्टींत गोष्ट यथार्थ ॥ खेळों नको बा रे द्यूत ॥ अवश्य म्हणोनि कुंती सुत ॥ धर्मराव ऊठिला ॥१२३॥
द्रौपदी पाठवी सांगोन ॥ म्यां आजि देखिलें दुष्ट स्वन्प ॥ कौरवीं पांडव करूनि दीन ॥ सभारंगणीं बैसविले ॥१२४॥
सभेसी मज नेऊन ॥ गांगूनि करूं इच्छिति नग्न ॥ मग बोले अर्जुन ॥ स्वन्प असे व्यर्थ पैं ॥१२५॥
जागृती आठवी मनीं ॥ तोचि भास दिसे स्वन्पीं ॥ असो आज्ञा होतां सेवकजनीं ॥ भेरीं ठोकिल्या गमनार्थ ॥१२६॥
निघालें चतुरंगदल ॥ दणाणलें उर्वीमंडल ॥ वाद्यघोषें तत्काल सकल ॥ नभोमंडल कोंदलें ॥१२७॥
कुंती आणि याज्ञ सेनी ॥ निघाल्या बैसोनि सुखासनीं ॥ ज्यांचे वहनांपुढें वेत्रपाणी ॥ लक्षावधि धांवती ॥१२८॥
मागें पुढें वेष्टित दलभार ॥ रथारूढ चालती पंडुकुमार ॥ एके रथीं धर्म विदुर ॥ बोलत जाती प्रीतीनें ॥१२९॥
पृथ्वीवरी पसरे सागर ॥ तैसी सेना ॥ चालली अपार ॥ शतबंधूंशीं सत्वर ॥ येत सामोरा दुर्योधन ॥१३०॥
वहनाखालीं उतरोन ॥ धर्म आणि सुयोधन ॥ देत प्रीतीं आलिंगन ॥ अनुक्रमें समस्तांसी ॥१३१॥
महोत्साह करीत ॥ नेले आप्ल्या मंदिरांत ॥ नाना प्रकारें धर्माचें चित्त ॥ तोषवीत सुयोधन ॥१३२॥
शतबंधूंसमवेत ॥ दुर्योधन सदा तिष्ठत ॥ नाना उपभोग समर्पीत ॥ समयोचित म्हणोनि ॥१३३॥
शांति अवलंबूनि शुद्ध ॥ यात्रेंत हिंडती जैसे मैंद ॥ कीं वाटपाडे मार्गीं सिद्धा ॥ होऊनि जैसे बैसती ॥१३४॥
जंव ते गांवांत असती जाण ॥ आदरें बोलती गोड वचन ॥ कीं मुखीं घालितां पूर्ण ॥ बचनाग गोड वाटे पैं ॥१३५॥
कीं विष कुंभ भरोनि समस्त ॥ तोंडीं किंचित घालिती अमृत ॥ कीं बक बैसला समाधिस्थ ॥ गंगातीरीं क्षणभरी ॥१३६॥
तैसा तो कापटय सागर ॥ लटिकाचि वरी दावी आदर ॥ असो एके दिवशीं सारूनि विहिताचार ॥ सभे बैसले समस्त ॥१३७॥
कृपाचार्य द्रोण भीष्म ॥ श्रेष्ठासनीं बैसविला धर्म ॥ धृतराष्ट विदुर उत्तम ॥ अश्वत्थामा बैसला ॥१३८॥
दुर्योधन कर्ण शकुनी ॥ दुःशासनादि बंधु घेऊनी ॥ शाल्व बाल्हील विकर्ण येऊनी ॥ सभास्थानी बैसले ॥१३९॥
जयद्रथ मूरिश्रवादि समस्त ॥ पृथ्वीचे राजे विराजत ॥ दुर्योधन जांभई देत ॥ काय बोलत मातुलासी ॥१४०॥
दिवस न कंठे वाटे थोर ॥ युगासमान जाहला प्रहर ॥ सभारंग दिसे साचार ॥ ऐसा प्रकार करावा ॥१४१॥
शकुनि बोले तत्काळ ॥ मांडावा कांहीं द्यूत खेळ ॥ धर्म राज प्रवीण कुशळ ॥ ह्रदय जाणे अक्षांचें ॥१४२॥
पण करूनि खेळावें सवेग ॥ तेणें भरेल सभारंग ॥ सभावायक चतुर सांग ॥ साक्षी समस्त सांगती ॥१४३॥
द्युत खेळतां आळस हरत ॥ हारी येतां हांव भरत ॥ हारविलें तें हर्षयुक्त ॥ द्यावें दुःख न मानितां ॥१४४॥
जिंकिजे जें पनेंकरून ॥ तें अवश्य घ्यावें आपण ॥ न बोलावें दुष्ट वचन ॥ शेवटासी कोणीं नयावें ॥१४५॥
युद्धीं आणि द्यूतीं ॥ क्षत्रिय मागें न सरती ॥ न खेळतां सत्य जाती ॥ यश आणि प्रताप ॥१४६॥
कनकपाश बिशाळ ॥ आणूनि ठेविले सुढाळ ॥ पाश देखतां तत्काळ ॥ बुद्धि चळली सर्वांची ॥१४७॥
भ्रूसंकेत दावी दुर्योधन ॥ त्वरा करवी शकुनि य़ेऊन ॥ विदुर म्हणे द्यूत निंद्य पूर्ण ॥ खेळतां हानि सुकृताची ॥१४८॥
हरिकीर्तन पुराण श्रवण ॥ शास्त्रचर्चा वेदाध्ययन ॥ किंवा व्याससंजय मुखे करून ॥ सादर होऊन ऐकिजे ॥१४९॥
अवलक्ष्मीचें स्थान द्यूत ॥ खेळणारासी अपयश येत ॥ आठां ठायीं यथार्थ ॥ वास असे अवदशेचा ॥१५०॥
दीपाचे प्रतिच्छायेसी बैसणें ॥ रात्रीं दधिभोजन करणें ॥ यागींचा पुरोडाश न घेणें ॥ अवदशा जाण वसे ॥१५१॥
द्युत कर्मीं जो नर रत ॥ अवलक्ष्मी तेथें वसत ॥ कारा गृहीं रजस्वला होत ॥ अवदशा वसे तेथें सदा ॥१५२॥
संध्याकाळीं निद्रित ॥ वसनें मलिन अस्त्रात ॥ हीं आठ स्थलें निश्चित ॥ सज्जन नर पाळिती ॥१५३॥
धृतराष्ट्राचिया मनांत ॥ पांडव जिंकावे खेळोनि द्यूत ॥ बाह्य म्हणे विदुर जे सांगत ॥ ते उत्तम बुद्धि स्वीकारा ॥१५४॥
कर्ण शकुनि दुर्यो धन ॥ म्हणती विदुर बोले जें वचन ॥ तें अभाग्यासी पंथ पूर्ण ॥ खेळावें जाण द्यूत आधीं ॥१५५॥
पाश पाहतां चकचकित ॥ मुख स्तंभचि सर्व होत ॥ जे कर्वतूनि राक्ष सदंत ॥ श्वेत चौधार साधिले ॥१५६॥
स्थूल लांब वीत प्रमाण ॥ सुवर्णरसें आरक्तचिन्ह ॥ देखतां सर्वीं धरिलें मौन ॥ कोणी दुषण न ठेवी ॥१५७॥
भीम म्हणे दुर्योधना सत्य ॥ धर्माशीं तूं नको खेळूं द्यूत ॥ सुयोधन म्हणे यथार्थ ॥ बोलसी मात वृकोदरा ॥१५८॥
आम्ही तुम्ही सभाजन ॥ कौतुक पाहूं दुरून ॥ शकुनि धर्म दोघे जण ॥ परस्परें खेळती ॥१५९॥
विदुर म्हणे मनांत ॥ हा रे मांडिला येणें अनर्थ ॥ पृथ्वीच्या नृपांचा पूर्ण अंत ॥ जाहला यावरी तत्त्वतां ॥१६०॥
नारदव्यासोक्ति उत्तम ॥ विसरला कीं यथार्थ धर्म ॥ कृष्णमाया घोर परम ॥ न कळे विंदाण तियेचें ॥१६१॥
सूत्रधारी यादवेंद्र ॥ उतरावया पृथ्वीचा भार ॥ उपाय योजी श्रीधर ॥ न चले अणुमात्र कोणाचें ॥१६२॥
धर्में ढाळितां फांसे ॥ भीमें हांक फोदिली आवेशें ॥ टाळी वाजवी तेणें कांपतसे ॥ दिग्गजांसह भूमंडल ॥१६३॥
हांकेसरसा अवधारा ॥ खोटा डाव होय खरा ॥ थरथरां कांपे वसुंधरा ॥ हारी कौरवां येतसे ॥१६४॥
भीमाची हांक अतिभींम ॥ पांच डाव जिंकी धर्म ॥ दुर्योधन म्हणे परम ॥ खोटें कर्म ओढवलें ॥१६५॥
धर्मासी म्हणे दुर्योधन ॥ हांक फोडितो भीमसेन ॥ फांसे पडती उलथोन ॥ आम्ही न खेळूं सर्वथा ॥१६६॥
माज्या वांटचा तुम्हांशीं ॥ शकुनि प्रेरिला खेळा वयासी ॥ हार जीत लागली त्यासी ॥ माझी ऐसी जाणिजे ॥१६७॥
धर्म म्हणे भीम सेना ॥ क्षण भरी धरिजे मौना ॥ हांक न फोडीं सर्वज्ञा ॥ माझी आज्ञा पाळीं हे ॥१६८॥
हातीं पाश घेत शकुनीं ॥ म्हणे धर्मा पैज बोल वदनीं ॥ त्वां जिंकिलिया ये क्षणीं ॥ राज्य ओपूं गजपुरीचें ॥१६९॥
आम्हीं जिंकिल्या यथार्थ ॥ बोलिलें त्वां द्यावें सत्य ॥ यावरी धर्म पैज बोलत ॥ सभा सद ऐकती ॥१७०॥
हा रावणाचा मध्यमणि देख ॥ ज्याचें तेज सूर्य सम चोख ॥ तो देईन मी निःशंक ॥ फांसे टाकी शकुनि तों ॥१७१॥
जिंकिलें म्हणे ते क्षणां ॥ मध्यमणि दिधला सुयोधना ॥ दुसरे डावीं जाणा ॥ विजयरथ समर्पिला ॥१७२॥
तिसरे डावीं साचार ॥ दिधलें अक्षय्य भांडार ॥ त्यामाजी सिद्धि निरंतर ॥ वेंचितां न सरे कल्पांतीं ॥१७३॥
हांव चढे धर्मासी ॥ परमचतुर रंभा उर्वशी ॥ तैशा दिधल्या लक्ष दासी ॥ ज्यांचिया रूपासी मदन भुले ॥१७४॥
ज्या चौसष्टकला प्रवीण ॥ मृग मद सुवास पूर्ण ॥ त्या चौथे डावीं जाण ॥ दुर्योधनासी दीधल्या ॥१७५॥
परमचतुर लक्ष दास ॥ पांचवे डावीं देत निःशेष ॥ शकुनिदुर्योधनांचा हर्ष ॥ गगनामाजी न समाये ॥१७६॥
दशलक्ष दिव्य कुंजर ॥ सहित पाखरा श्रृंगार ॥ हिरे दांतीं जडले अपार ॥ सहावे डावीं देतसे ॥१७७॥
दश लक्ष दिव्य रथ । ज्यांची प्रभा सेनेवरी पडव ॥ तेही दुर्योधनासी देत ॥ मागें पुढें न पाहतां ॥१७८॥
पवनाहूनि जे वेगें गाढें ॥ गंधर्वीं पार्थासी दिधले घोडे ॥ ज्यांचे अंगकांतीचे पाडें ॥ चांदणें पडे पृथ्वीवरी ॥१७९॥
वरी रत्न जडित जीन ॥ क्षीरसागरीं आणिलें धुवोन ॥ कीं चंद्रकिरणें आटून ॥ श्याकर्ण घडियेले ॥१८०॥
किं शुद्ध रजताचे ओतिले साचार ॥ कीं नवनीताचे रचिले सुकुमार ॥ जे जान्हवीचें उदक निरंतर ॥ पाजूनियां वाढविले ॥१८१॥
ऐशा अश्वशाला समस्त ॥ लक्षा नुलक्ष नव्हे गणित ॥ सातवे डावीं देत ॥ दुर्योधनासी तेधवां ॥१८२॥
कुटिल बोल बोलती ते क्षणीं ॥ द्यूत रूप समरांगणीं ॥ टाकूनि जातां पावे हानी ॥ क्षत्रियधर्म निर्धारें ॥१८३॥
सौबल धर्मासी म्हणत ॥ उदार आहे कीं तुझें चित्त ॥ लोभ न धरीं यथार्थ ॥ धन तृणवत मानीं पैं ॥१८४॥
शकट उष्ट्र खेचर खर । आठवे डावीं समग्र ॥ भ्रमें भ्रमलासे युधिष्ठिर ॥ अधिक हांव भरतसे ॥१८५॥
ज्वाला देखोनि लवलहीं ॥ पतंग पडे मागें न पाही म सर्व उपेक्षूनि जाई ॥ सती जैशी पती सवें ॥१८६॥
तैसें धर्मासी जाहलें सत्य ॥ मागें पुढें न पाहे भ्रांत ॥ अक्षय्य भांडार कृष्णदत्त ॥ नववे डावीं दीधलें ॥१८७॥
धृतराष्ट्रासी म्हणे विदुर ॥ दुर्योधन तुझा ॥ परमचांडाळ अपवित्र ॥ घात करील कुलाचा ॥१८८॥
हा जन्मला जेव्हां चांडाळ ॥ अवचिन्हें प्रकटलीं पुष्कळ ॥ याचा त्याग करीं तत्काळ ॥ ऐसें पूर्वींच सांगीतलें ॥१८९॥
म्यां सांगीतला बुद्धिवाद ॥ परी तूं न ऐकसी बुद्धिमंद ॥ त्याचीं दुष्ट फळें हीं निषिद्ध ॥ भोगीं शेवटीं ॥१९०॥
अजूनि तरी द्यूत मोडीं ॥ चांडाळ हा शकुनि दवडीं ॥ दर्योधना घालूनि बेडी ॥ बंदीं रक्षीं दुर्जना ॥१९१॥
आज्ञा दे भीष्मद्रोणांसी ॥ धरावी याची भीड कायसी ॥ कारागृहीं रक्षूनि यासी ॥ शकुनि बाहेरी दवडावा ॥१९२।
सहज मागता मुखे करून ॥ तरी सर्वही देता पंडुनंदन ॥ द्यूत खेळोनि दुर्जन ॥ आणितो मरण सर्वांसी ॥१९३॥
ऐसें विदुराचें वचन ॥ ऐकोनि तेव्हां दुर्योधन ॥ म्हणे कळलें तुझें वडीलपण ॥ अमर्यादेनें जल्पसी ॥१९४॥
पांडवांचें कल्याण इच्छिसी ॥ आमुचा घात तूं चिंतिसी ॥ जैसी सर्पीण भक्षी पिलांसी ॥ पापराशी तैसा तूं ॥१९५॥
तूं उत्तरवयसा देख ॥ परी बुद्धिहीन शतमूर्ख ॥ मर्यादा सांडूनि निःशंक ॥ बोलसी येथें अपवित्र ॥१९६॥
ऐसें बोलावें वचन ॥ कीं जेणें निवती सभाजन ॥ न कळे तरी धरूनि मौन ॥ मृतप्राय असावें ॥१९७॥
बोलों नेणसी पामरा ॥ ऊठ जा आपुल्या घरा ॥ तुज रक्षिलें या अवसरा ॥ राजबंधु म्हणोनियां ॥१९८॥
विदुर म्हणे रे मशका ॥ सुयोधना ऐक कीटका ॥ वृद्धपणीं पुत्र शोका ॥ प्राप्त होईल धृतराष्ट्र ॥१९९॥
द्वेषाग्नि वाढला प्रबळ ॥ पतंग प्राय जळाल सकळ ॥ माझी बुद्धि केवळ ॥ विष प्राय वाटे तुम्हां ॥२००॥
पांडवांची लाभली संपत्ती ॥ मूर्खो सुख तुझे चित्तीं ॥ परी सांगतों तुजला निश्चितीं ॥ लाभ त्यांसींच जाहला ॥२०१॥
त्यांची संपत्ति त्यांसी जाईल ॥ परी निर्वैर पृथ्वी होईल ॥ ईश्वरी माया सबल ॥ अन्याय करवी तुजहातीं ॥२०२॥
त्यांचें त्यांसी सर्व द्याल ॥ कालांतरें प्राणही ओपाल ॥ अमर्याद आटेल दल ॥ परी तुमचें ऋण फिटेना ॥२०३॥
तुझा जीर्णपिता रडत ॥ पांडवांघरीं पडेल यथार्थ ॥ व्यासा श्रमीं अग्नींत ॥ दग्ध होईल शेवटीं ॥२०४॥
प्राण त्यागितां सुयोधना ॥ मग आठविसील माझे वचना ॥ द्यूत नव्हे तूझे प्राणा ॥ भीम ग्राहक पातला ॥२०५॥
माझीं वचनें आतां कठिण ॥ परी पुढें गोड अमृताहून ॥ औषध आधीं कडवट पूर्ण ॥ रोग हरण पुढें करी ॥२०६॥
जैसी नाबद साखर ॥ मुखीं घालितां खडखडे फार ॥ परी पुढें गोड अपार ॥ वचनें साचार माझीं तैसीं ॥२०७॥
तुरट वाटे आमलक ॥ परी पुढीं गोडी अधिक ॥ माझीं वचनें दुःखमोचक ॥ न्यायनिष्ठ तैसींचि ॥२०८॥
पिता वाढवी पुत्रा लागून ॥ त्यासी वाटे विषासमान ॥ परी पुढें गोडी जाण ॥ महिमा पूर्ण तेणें ॥२०९॥
असो ऐसें बोलून ॥ दिवुरें वरिलें मुखें मौन ॥ शकुनि म्हणे धर्मा लागून ॥ तुवां द्यूतयज्ञ आरंभिला ॥२१०॥
पूर्ण न होतां पूर्णाहुती ॥ जगीं वाढेल अपकीर्ती ॥ उदारपण धरीं चित्तीं ॥ धैर्य न सांडीं सर्वथा ॥२११॥
शुभ डाव पडतां एक सरा ॥ इतुकेंही नेसी आपुल्या घरा ॥ धर्म पेटला अविचारा ॥ शपय काय बोलत ॥२१२॥
पूर्व समुद्र धरून ॥ पश्चिम समुद्र पर्यंत जाण ॥ जीं खिल्लारें भरलीं सघन ॥ दिलीं तुम्हां तितुकींही ॥२१३॥
तोही डाव जिंकिला ॥ पुढें धर्म काय बोलिला ॥ देश दुर्ग गड ते वेळां ॥ सर्व राज्य ओपिलें ॥२१४॥
ब्राह्मणां दिधलें वित्ति धन ॥ तें वेगळें करूनि पूर्ण ॥ तेरावे डावीं जाण ॥ सर्व देश समर्पिले ॥२१५॥
द्रौपदीचे पांच पुत्र ॥ जिंकिले न लागतां क्षणमात्र ॥ चौघे बंधु पवित्र ॥ आप्ण पांचवा शेवटीं ॥२१६॥
म्हणे तुमचे नीच भृत्य ॥ तैसे हे बंधु यथार्थ ॥ तोही डाव जिंकिला समस्त ॥ जाहला अनर्थ म्हणती पैं ॥२१७॥
शेवटीं द्रौपदीचा डाव ॥ घालूनि खेळे धर्मराव ॥ जैसें पिशाच भुलोनि सर्व ॥ टाकूनि जाय आपुलें ॥२१८॥
द्रौपदी ऐसी सुंदरी ॥ त्रिभुवनांत नाहीं दुसरी ॥ इंद्रनीलकीळ गाळूनि निर्धारीं ॥ ओतिली ते सुढाळ ॥२१९॥
जिचे अंगींचा सदट ॥ जाय अर्धयोजन आसमास ॥ जैसें श्री कृष्णरूप विशेष ॥ तैसी द्रौपदी जाणिजे ॥२२०॥
एवं विसावे डावीं पूर्ण ॥ जिंकिले द्रौपदीनिधान ॥ हाहाकार करिती सज्जन ॥ महा अनर्थ भाविती ॥२२१॥
ऋषि वक्षःस्थलें पिटिती ॥ भूपाल कपाळें बडविती ॥ भीष्मद्रोणांचे नेत्रीं येती ॥ अश्रुपात ढळढळां ॥२२२॥
कर्ण दुर्योधन शकुनी ॥ यांचा आनंद न माये त्रिभुवनीं ॥ अंध आल्हादला मनीं ॥ म्हणे संपदा जतन ठेविजे ॥२२३॥
वीस डाव संपूर्ण जाहले ॥ आतां आणिक दोन उरले ॥ अरण्यवास पुढें बोलिले ॥ अज्ञातवास दुसरा पैं ॥२२४॥
जाहलें वस्त्रहरण ॥ पुढें आहे तें निरूपण ॥ व्यासशिष्य वैशंपायन ॥ जनमेजया प्रति सांगत ॥२२५॥
ब्रह्मानंद श्रीधर ॥ तेचि कथा वर्णी साचार ॥ श्रवण करोत पंडित चतुर ॥ विवेकी साचार सज्जन ॥२२६॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ सभापर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ विंशाध्यायीं कथियेला ॥२२७॥
स्वस्ति श्रीपांडवप्रातप ग्रंथ ॥ सभापर्वटीका श्रीधरकृत ॥ नारदव्यासीं बोधिला असतां द्यूत ॥ धर्मराज खेळला ॥२२८॥
॥ इति श्री श्रीधरकृतपांडवप्रताप सभापर्वणि विंशाध्यायः ॥२०॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 08, 2012
TOP