मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ३० वा

पांडवप्रताप - अध्याय ३० वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ लोमश म्हणे राया धर्मा ॥ ऐकें हरिश्चंद्राचा महिमा ॥ ज्याचे सत्त्वधीरपणाची सीमा ॥ जाहली ब्रह्मांडमंडपीं ॥१॥
जो अयोध्येचा नृपती ॥ पुराणीं महिमा जयाचा वर्णिती ॥ सूर्यवंशींचा चक्रवर्ती ॥ हरिश्चंद्र राजेंद्र ॥२॥
पृथ्वीचे सकल नृपवर ॥ हरिश्चंद्रासी देती करभार ॥ दानशील सत्त्वसमुद्रा ॥ सेना अपार तयाची ॥३॥
दुःख दरिद्र दुष्काळ पाहीं ॥ अयोध्येंत नसे कांहीं ॥ लोक सभाग्य सकळही ॥ द्रव्या नाहीं मिति तेथें ॥४॥
अयोध्येचें सुंदरपण ॥ पाहूनि लाजे शक्रभुवन ॥ सदा सफल दिव्य वन ॥ वसंत देखोन सुखावे ॥५॥
जो व्यासवाल्मीकींचा गुरु ॥ जो सर्वसिद्धांमाजी मेरु ॥ तो नारद मुनीश्वरु ॥ अयोध्येसी पातला ॥६॥
रायें साष्टांग केलें नमन ॥ करी नारदाचें पूजन ॥ ऋषि म्हणे राया तूं धन्य ॥ पूर्ण निधान पृथ्वीवरी ॥७॥
नारद तेथूनि निघाला ॥ वेगें इंद्रसभेसी पातला ॥ सभा घनवटली ते वेळां ॥ नारदें वर्णिला हरिश्चंद्र ॥८॥
आजि पृथ्वीवरी हरिश्चंद्र ॥ परमसत्त्वधीर नृपवर ॥ ज्याची कीर्ति पवित्र ॥ त्रिलोकामाजी विस्तारली ॥९॥
नारदें हरिश्चंदासी वर्णितां ॥ वसिष्ठें डोलविला माथा ॥ म्हणे सत्त्वराशि पुरता ॥ हरिश्चंद्राऐसा नसेचि ॥१०॥
विश्वामित्र क्रोधावला ॥ म्हणे आपुला शिष्य वर्णिला ॥ करीन सत्त्वहीन तयाला ॥ क्षणमात्र न लागतां ॥११॥
कीं महिषापुढें मशक ॥ राजेंद्रापुढें जैसा रंक ॥ कीं सूर्यापुढें दीपक ॥ मंडन कोठें पैं त्याचें ॥१२॥
सत्त्वीं ढाळीन हरिश्चंद्र ॥ तरीच हा ऋषि विश्वामित्र ॥ तूं गुरु म्हणोनियां थोर ॥ अभिमान धरिसी तयाचा ॥१३॥
मग बोले वसिष्ठऋषी ॥ जरी हरिश्चंद्र टळेल नेमासी ॥ तरी मी मद्यपानी निश्चयेंसीं ॥ कल्पवरी जाहलों ॥१४॥
हरिश्चंद्र सत्त्व टाकील पूर्ण ॥ तरी मी ब्राह्मण्या वेगळा होईन ॥ विधवा जारकर्मी जाण ॥ तें गर्भस्थान मी पावेन ॥१५॥
मग विश्वामित्र बोले ॥ कोटिवर्षें तप केलें ॥ लोहपिष्ट भक्षिलें ॥ पंचाग्निसाधन बहुकाळ ॥१६॥
सत्त्वा न टळे हरिश्चंद्र ॥ तरी हें तप देईन तया समग्र ॥ वसिष्ठ म्हणे ईश्वर ॥ ऐसेंचि करो निश्चयें ॥१७॥
विश्वामित्र म्हणे वसिष्ठासी ॥ त्वां श्रुत हें न करावें रायासी ॥ येरू म्हणे निश्चयेंसीं ॥ कळूं राया नेदींच ॥१८॥
दोघे आश्चमां गेले ॥ वसिष्ठें तप आरंभिलें ॥ अपयश न यावें वहिलें ॥ हरिश्चंदा म्हणूनि ॥१९॥
कापटयानुष्ठान घोर ॥ द्वेषें करीत विश्वामित्र ॥ पराजय पावे हरिश्चंद्र ॥ ऐसा प्रकार ॥ मांडिला ॥२०॥
अकरा कोटी महाव्याघ्र ॥ वनांत सोडी विश्वामित्र ॥ मनुष्यें भक्षिती समग्र ॥ वाट अणुमात्र चालेना ॥२१॥
वनीं न वागे मनुष्य ॥ कच्चीं पिकें पडलीं ओस ॥ समाचार हा रायास ॥ सांगती लोक नगरींचे ॥२२॥
राजा म्हणे प्रजा पीडती ॥ मग मी कासया नृपती ॥ लेंकुराऐशा प्रीतीं ॥ प्रजा निश्चयें पाळीन मी ॥२३॥
सिद्ध करूनि चतुरंग सेना ॥ हरिश्चंद्र चालिला वना ॥ सवें तारामती अंगना ॥ निघती जाहली कौतुकें ॥२४॥
वनोवनीं धांवे हरिश्चंद्र ॥ करीत व्याघांचा संहार ॥ अनेक श्वापदें पीडाकर ॥ मारी नृपवर तेधवां ॥२५॥
सिद्धाश्रमीं वसे विश्वामित्र ॥ कळला त्यासी समाचार ॥ क्रोधावला ऋषीश्वर ॥ कपट थोर मांडिलें ॥२६॥
मायेचे मृग दोन करूनी ॥ पाठविले तये वनीं ॥ हरिश्चंद्रें ते देखोनी ॥ तुरंग वेगें लोटिला ॥२७॥
दोघेही मृग पळत ॥ आले सिद्धाश्रमीं धांवत ॥ हरिश्चंद्र पावला तेथ ॥ अपूर्व देखे सिद्धाश्रम ॥२८॥
गायी आणि व्याघ्र ॥ तेथें चरती निर्वैर ॥ सर्प मुंगुस मित्र ॥ द्वेष अणुमात्र नसेचि ॥२९॥
पक्षी करिती वेदाध्ययन ॥ वाखाणिती शास्त्रपुराण ॥ हरिश्चंद्रें तें देखोन ॥ आश्चर्य पूर्ण मानिलें ॥३०॥
तों तारामती आणि प्रधान ॥ मागें सेना येत संपूर्ण ॥ ऐकोनि पक्ष्यांचें भाषण ॥ मन ॥ संतोषलें सर्वांचें ॥३१॥
तों देखिलें शिवस्थान ॥ काश्मीराचें देऊळ जाण ॥ लिंग मणिमय प्रभाघन ॥ देखतां मन निवालें ॥३२॥
परिवार तेथें राहिला ॥ रायें नित्यनेम सारिला ॥ शिव षोडशोपचारें पूजिला ॥ श्रम गेला समस्ता ॥३३॥
विश्वामित्रें ते क्षणीं ॥ दोघी पाठविल्या मातंगिणी ॥ उत्तम गायन करूनी ॥ राव भुलवुनी मोहिला ॥३४॥
रंभेऐसें सुंदर ॥ गायन करिती त्या सुस्वर ॥ प्रसन्न जाहला हरिश्चंद्र ॥ म्हणे कांहीं वर मागा ॥३५॥
त्या म्हणती ऐक राया ॥ आम्ही होऊं तुझ्या भार्या ॥ तारामती दूर करूनियां ॥ भोग आम्हां देइंजे ॥३६॥
तों सत्कीर्तिप्रधान ॥ क्रोधावला ऐकून ॥ दूतांसी सांगे निग्रहेंकरून ॥ यांसी बाहेर घालवावें ॥३७॥
या दोघी चांडाळिणी ॥ आहेत केवळ मातंगिणी ॥ दूतीं बाहेर घातल्या ढकलूनी ॥ गेल्या ते क्षणीं ऋषीपाशीं ॥३८॥
सांगती सर्व वर्तमान ॥ आम्हां बाहेर घातलें ढकलून ॥ विश्वामित्र क्रोधेंकरून ॥ संगें शिष्य घेऊन चालिला ॥३९॥
कोपें कांपें थरथरां ॥ देवळांत आला सत्वर ॥ म्हणे चांडालकुमारा ॥ मज विश्वामित्रा नेणसी ॥४०॥
माझा महिमा न कळे तुला ॥ तुझा त्रिशंकु पिता म्यां उद्धरीला ॥ इंद्रपदा पाठविला ॥ याग करूनि स्वहस्तें ॥४१॥
पितृगुरुद्रोह गोहत्या ॥ घडल्या होत्या तुझिया पित्या ॥ केवळ चांडाळ जाहला होता ॥ तो म्यां तत्त्वतां उद्धरिला ॥४२॥
तें अवघें विसरून ॥ केला माझे दासींचा अपमान ॥ माझीं श्वापदें संपूर्ण ॥ तुज काय कारण वधावया ॥४३॥
श्वापदें माझीं बाळें सत्य ॥ क्रीडत होतीं वनांत ॥ तूं कोण वधावया येथ ॥ सांगें त्वरित दुर्जना ॥४४॥
तुझ्या गुरूचे शंभर पुत्र ॥ मीं वधिले न लागतां क्षणमात्र ॥ तो मी ऋषि विश्वामित्र ॥ माझें चरित्र न कळे तूतें ॥४५॥
म्यां ब्रह्ययाशीं वाद करून ॥ प्रतिसृष्टि केली निर्माण ॥ तूं वैभव मजलागून ॥ दाखवावया आलासी ॥४६॥
तों सत्कीर्तिप्रधाना समवेत ॥ राव घाली दंडवत ॥ तारामती चरण धरीत ॥ आम्ही सत्य अपराधी ॥४७॥
क्षमा करणें तुम्हीं ऋषिराया ॥ म्हणूनि मागुती लागती पायां ॥ ऋषि म्हणे श्वापदें वधावया ॥ कां या ठाया आलासी ॥४८॥
ऐसें विश्वामित्र बोलोन ॥ गेला आश्रमा कोपून ॥ राव परम श्रमून ॥ शिवभुवनीं प्रवेशला ॥४९॥
राव परम चिंताक्रांत ॥ निद्रा करी एक मुहूर्त ॥ तारामती मांडी देत ॥ उसां रायाचे तेधवां ॥५०॥
रायें देखिलें स्वन्प ॥ एक आला ब्रह्मण ॥ त्याचे पाय धुऊन ॥ राज्य दान दिधलें पैं ॥५१॥
ब्राह्मण म्हणे ते क्षणीं ॥ अंकुश लगाम लेखनी ॥ राया दे मजलागूनी ॥ येरें ते क्षणीं दीधलीं ॥५२॥
सवेंचि एक विवशी ॥ येऊनि झोंबे रायासी ॥ राव गजवजूनि मानसीं ॥ जागा जाहला तेधवां ॥५३॥
करूनियां हरिस्मरण ॥ तारामतीस सांगे स्वन्प ॥ समुद्र वलयांकित संपूर्व ॥ राज्य बाह्मणा दिधलें पैं ॥५४॥
तों विश्वामित्र वेष पालटून ॥ होऊन आला ब्राह्मण ॥ राया दिधलें आशीर्वचन ॥ नृपें पूजन पैं केलें ॥५५॥
रायासी म्हणे ब्राह्मण ॥ मज औटभार दे सुवर्ण ॥ राजा बोले प्रीतीकरून ॥ अवश्य घेऊन जाइंजे ॥५६॥
राव म्हणे ब्राह्मणासी ॥ चलावें आतां अयोध्येसी ॥ दक्षिणा देईन निश्चियेंसीं ॥ म्हणोनि भाक दीधली ॥५७॥
वारूवरी बैसला ब्राह्मण ॥ राव चालिला अयोध्येलागून ॥ सुखासनीं आरूढोन ॥ तारामती चालिली ॥५८॥
पुढें वेत्रधार जाती धांवोन ॥ अयोध्या श्रृंगारिली संपूर्ण ॥ मंदिरीं प्रवेशतां विघ्न ॥ विश्वामित्रें मांडिलें ॥५९॥
सुखासनीं तारामती ॥ मांदिरामाजी जात होती ॥ द्वेषें लोटूनि परती ॥ पाडिली क्षितीं तियेसी ॥६०॥
कोठें गे तूं जातेसी ॥ म्हणोनि ओढिली धरोनि केशीं ॥ देड हाती घेऊनि तियेसी ॥ मारिता जाहला द्वेषानें ॥६१॥
घाय उमटे जेथें ॥ चळचळां रक्त वाहे तेथें ॥ थरथरां कांपे चंडवातें ॥ केळी जैसी सुकुमार ॥६२॥
धांवूनि आला नृपनाथ ॥ ब्राह्मणाचे चरण धरीत ॥ येरू थरथरां कांपत ॥ क्रोधें बोलत तयासी ॥६३॥
म्हणे माझें औटभार सुवर्ण ॥ दे रे आधीं आणून ॥ तूं घरांत बैससी जाऊन ॥ माझें स्मरण तुज कैंचें ॥६४॥
मी आतां द्र्व्य घेईन ॥ तुज करूं नेदीं उदकपान ॥ रायें आणविलें सुवर्ण ॥ भांडारियां सांगोनियां ॥६५॥
पुढें केली सुवर्णराशी ॥ हें आमुचें आम्हांस म्हणे देसी ॥ हें धन माझें तूं  कां घेसी पडली कैसी भ्रांति तूतें ॥६६॥
आमुचें आम्हांसी देऊन ॥ काय करिसी मूर्खा दान ॥ गुरु वसिष्ठें शिकवण ॥ हेंचि शिकविलें तुलागीं ॥६७॥
तुवां सकल राज्य दान ॥ दिधलें मजला पाय धुऊन ॥ अंकुश लगाभ लेखनी जाण ॥ तुवांदान दीधलीं ॥६८॥
रायें चरणीं ठेविला माथा ॥ म्हणे मज धन्य केलें आतां ॥ राज्यांतीं नरक तत्त्वतां ॥ कोणीं भोगावा स्वामिया ॥६९॥
माझें ओझें उतरलें ॥ कृपाळुवा पावन केलें ॥ विप्र म्हणे बहुत न बोलें ॥ माझी दक्षिणा दे आधीं ॥७०॥
मग प्रधानादि सकल जनां ॥ राजा सांगे करोनि प्रार्थना ॥ राज्य दिधलें ब्राह्मणा ॥ याची आज्ञा पाळिंजे ॥७१॥
माझी दक्षिणादे मजलागूनी ॥ दोघें बांधिलीं तये क्षणीं ॥ तारामतीचे केश धरोनी ॥ क्रोधेंकरूनि पाडीत ॥७२॥
जिचा मुखप्रकाश देखोनी ॥ चंद्र लाजे अधोवदनीं ॥ तिचे हात बांधिले आंवळोनी ॥ सर्व जनांचे देखतां ॥७३॥
विश्वामित्रासी लोक शिव्या देती ॥ नगरा कैंचा आणिला म्हणती ॥ नरनारी प्रजा रडती ॥ तारामतीस पाहोनी ॥७४॥
तोंडावरी दोघांसी मारीत ॥ अशुद्ध भडभडां वाहात ॥ लोक सद्नद होती समस्त ॥ पीडा देखोनि तयांची ॥७५॥
नगर व्यवहारी धांवती ॥ म्हणती सोडवूंया नृपती ॥ आम्हां द्र्व्या नाहीं मिती ॥ मेळवूं निश्चितीं आणिका ॥७६॥
मग बोले हरिश्चंद्र ॥ प्रजाद्रव्य घेती जे नृपवर ॥ ते परम चांडाळ दुराचार ॥ भोगिती थोर रौरव ते ॥७७॥
विश्वामित्र म्हणे तयांचें द्रव्य घेसी ॥ परी मी देऊं नेदींच तयांसी ॥ सकल पृथ्वीचे धनासी ॥ स्वामी मीच निर्धारें ॥७८॥
मागुती तारामतीतें ॥ विप्र मारी कठिणहस्तें ॥ येरी धांवोनि धरी पायांतें ॥ गहिंवर लोकांतें न धरवे ॥७९॥
तंव रोधिदास पुत्र येऊन ॥ धरी विश्वामित्राचे चरण ॥ स्वामी मी गहाण राहीन ॥ फेडीन द्र्व्य तुमचें पैं ॥८०॥
विश्वामित्र म्हणे ते वेळे ॥ कोणाचें पोर हें मध्यें आलें ॥ बडबड करी आगळें ॥ म्हणोनि मारिलें तोंडावरी ॥८१॥
राव म्हणे माझा कुमार ॥ असे तुमचा जी किंकर ॥ विप्र म्हणे दावेदार ॥ पुढती राज्य घेईल हा ॥८२॥
म्हणोनि फडफडां मारीत ॥ बालक भूमीवरी लोळत ॥ मी हें राज्य न घें सत्य ॥ बापें तुम्हां दिधलें तें ॥८३॥
विप्र म्हणे तिघें जणें ॥ माझे राज्यांतूनि आतां जाणें ॥ माझी दक्षिणा आणूनि देणें ॥ वेगेंकरूनि आतांचि ॥८४॥
राव म्हणे नवखंडा बाहेरी ॥ जाईन वाराणसी नगरीं ॥ तुमची दक्षिणी निर्धारीं ॥ भलतेपरी फेडीन ॥८५॥
सातवे दिवशीं फेडीन ऋण ॥ म्हणोनि दिधलें भाषदान ॥ मग त्याची आज्ञा घेऊन ॥ तिघें चालिलीं काशीस ॥८६॥
तों विश्वामित्र धांवत ॥ तारामतीचे केश धरीत ॥ माझे वस्त्रालंकार समस्त ॥ फेडूनि जावें वनांतरा ॥८७॥
तिघांचीं वस्त्रें अलंकार ॥ घेऊनि उघडीं करी समग्र ॥ वल्कलें वेष्टूनि सत्वर ॥ निघतीं जाहलीं तेधवां ॥८८॥
नगरांतूनि उघडीं चालिलीं ॥ तेव्हां एकचि हांक जाहली ॥ सकल प्रजांनीं ते वेळीं ॥ शिरें आपटिलीं धरणीसी ॥८९॥
म्हणती सर्वेशा नारायणा ॥ हें कां दुःख दाविसी नयनां ॥ वना जातो हरिश्चंद्राराणा ॥ चरणचालीं चालत ॥९०॥
हरिश्चंद्रा ऐसा नृपती ॥ न देखों आम्ही पुढतपुढती ॥ लोक रडत पाठीं धांवती ॥ करिती खंती फार तेव्हां ॥९१॥
जन रडती धाय मोकलून ॥ पशुपक्षी करिती रोदन ॥ आकान्त जाहला दारुण ॥ कोणा अन्नपान नाठवे ॥९२॥
विश्वामित्र म्हणे रायाप्रती ॥ लोक कां तुजमागें येती ॥ मग काय करावें नि़श्चितीं ॥ ओस नगर सांग पां ॥९३॥
तों रायें सकळ लोक ॥ फिरविले जोडूनि हस्तक ॥ तिघें चालिलीं नैष्ठिक ॥ चरणालीं पुढती पैं ॥९४॥
पुढें हरिश्चंद्र नृपवर ॥ मागें तारामती सुंदर ॥ हळू हळू रोहिदास कुमार ॥ चरणीं जात वनातें ॥९५॥
सूर्यासी म्हणे विश्वामित्र ॥ आतां उघडीं द्वादश नेत्र ॥ तों तपों लागला दिनकर ॥ विश्वामित्राज्ञेनें तैं ॥९६॥
तीव्र तपे वासरमणी ॥ पाषाण उलती उष्ण धरणी ॥ वृक्ष गेले सर्व करपोनी ॥ उदक मेदिनीं असेना ॥९७॥
वरुणासी सांगे विश्वामित्र ॥ उदक ठेवूं नको अणुमात्र ॥ समीरा तू होईं स्थिर ॥ नको येऊं यांवरी ॥९८॥
वृक्षासी फळ नाहीं ॥ सूर्य तीव्र तपे पाहीं ॥ सरांटे पसरले महीं ॥ वाट कांहीं दिसेना ॥९९॥
उष्णें तापलई मही अत्यंत ॥ शेषाचाही माथा पोळत ॥ तळव्याची आग माथां येत ॥ तृषेनें जात प्राण त्यांचे ॥१००॥
तिघें तापलीं उष्णेंकरून ॥ तोंडीं खरस आली दता क्षमा अपार ॥ शांत धीर महाराज तो ॥१०१॥
माथा डोलविती सकल जन ॥ म्हणती याचें मोल करील कोण ॥ कांटां घातलें त्रिभुवन ॥ तरी न्यून हरिश्चंद्राशीं ॥१०३॥
घेतां हरिश्चंद्राचें नाम ॥ सकल पातकें होती भस्म ॥ कैंचा ब्राह्मण अधम ॥ छळी ऐशा महाराजा ॥१०४॥
तेथोंचा वीरबाहु महार ॥ त्यापाशीं द्र्व्य असे अपार ॥ तेणें सुवर्ण देऊनि दोन भार ॥ हरिश्चंद्र घेतला ॥१०५॥
प्रेतांचें द्र्व्य बहुत ॥ त्यापाशीं असे अमित ॥ द्रव्याविण निश्चित ॥ प्रेतें जाळूं देईना ॥१०६॥
राव म्हणे डोंबालागून ॥ तुम्ही सांगाल तेण काम करीन ॥ परी न घें तुमचें अन्न ॥ करोरडें धान्य मज द्यावें ॥१०७॥
दोन भार सुवर्ण ॥ विश्वामित्रासी अर्पून ॥ रायें धरिलें चरण ॥ म्हणे म्यां श्रमविलें स्वामीस ॥१०८॥
जावें आतां अयोध्येस ॥ राज्य करावें सावकाश ॥ मग डोंबासंगें नरेश ॥ जाता जाहला गृहा त्याचे ॥१०९॥
तों मांसाची दुर्गंधि येत ॥ प्रेतें पडलीं असंख्यात ॥ अस्थींचे असती पर्वत ॥ घराभोंवते तयाच्या ॥११०॥
राव मनीं कंटाळत ॥ म्हणे बाप रे कर्म बळिवंत ॥ तों महारीण आली त्वरित ॥ पत्नी वीरबाहुची ॥१११॥
म्हणे हाचि काय आणिला विकत ॥ हा तों सुकुमार श्रीमंत ॥ रक्तोत्पला ऐसे हात ॥ काय पूजिसी देव्हारां ॥११२॥
तुम्हां कोणीं बुद्धि दिधली सांगा ॥ हा सेवक नाहीं आम्हां जोगा ॥ राव म्हणे कर्मभोगा ॥ काय मागुती टाकील ॥११३॥
मग म्हणे डोंबालागून ॥ मी सांगितलें काम करीन ॥ दोन भार सुवर्ण ॥ वेंचिलें कीं मजलागीं ॥११४॥
पांघरावया पटकुर ॥ हरिश्चंद्रासी देत महार ॥ झाडी आंगण समग्र ॥ केर बाहेर टाकीतसे ॥११५॥
रायाहातीं महारीण दळवीत ॥ तरतरां फोड हातासी येत ॥ रक्त असे वाहत ॥ परी न दावी तयांसी ॥११६॥
ज्या हातें करोनि दान ॥ केले सुखी पृथ्वीचे ब्राह्मण ॥ त्याचि हातें करून ॥ करी दळण डोंबाघरीं ॥११७॥
रायांचे मुकुट समस्त ॥ ज्याचे चरणीं लोळत ॥ तो शिरीं घागर घेत ॥ पाणी वाहत डोबाघरीं ॥११८॥
तेज फांके दशदिशांतरीं ॥ ऐसा किरीट ज्याचे शिरीं ॥ पाणी भरूनि घेई घागरी ॥ रात्रंदिवस सर्वदा ॥११९॥
विश्वामित्र ते अवसरीं ॥ गुप्त रूपें फोडी घागरी ॥ दुजा घट देत महारी ॥ म्हणे हा तरी सांभाळीं ॥१२०॥
तोही फोडूनि टाकीत ॥ राजा थरथरां कांपत ॥ महारीण येऊनि लात ॥ मारी राया हरिश्चंदा ॥१२१॥
तिसरी दिली तेहीं फोडिली ॥ डोंबानें आणिक दिधली ॥ चुंबळ शिरींची नीट केली ॥ मनीं ते वेळीं भीतसे ॥१२२॥
शिव्या देत महारी ॥ कैंचा हा आणिला घरीं व्यर्थ द्र्व्य निर्धारीं ॥ बुडोनि गेलें आमुचें ॥१२३॥
चवथी घागर दिधली ॥ ते मेल्यानें दारवंटां फोडिली ॥ मग महारीण कोपली ॥ मरी ते वेळीं काष्ठदंडें ॥१२४॥
आणिक घट दिले ते क्षणीं ॥ मग पाणी भरीत रांजणीं ॥ विश्वामित्रें ते क्षणीं ॥ रांजणा छिद्र पाडिलें ॥१२५॥
अवघा वेळ पाणी भरिलें ॥ रांजणांत कांहीं नसे उरलें ॥ डोंब जेवावयाचे वेळे ॥ आला घरासी तेधवां ॥१२६॥
डोंब पाणी मागत ॥ तों रिता रांजण खडबडित ॥ केशीं धरोनि नृपनाथ ॥ तांब्या हाणीत डोंब तेव्हां ॥१२७॥
वेळ सारा पाणी भरिलें ॥ रांजणीं कांहीं नाहीं उरलें ॥ लांकूड मोळीचें घेतलें ॥ पुढती मारिलें डोंबानें ॥१२८॥
म्हणती मांस रांधीं वहिला ॥ राव चुलीपुढें बैसला ॥ अग्नि फुंकितां ते वेळां ॥ जळूनि गेल्या दाढीमिशा ॥१२९॥
सूर्य अस्तमाना गेला ॥ कोरडें धान्य देती त्याजला ॥ तें दळून घेऊनि आला ॥ भागीरथीतीरातें ॥१३०॥
स्नानसंध्यादि कर्म जाहलें ॥ पिठाचे  पानगे भाजले ॥ तयाचे भाग दोन केले ॥ अतिथीचा आणि आपुला ॥१३१॥
वेष पालटूनि विश्वामित्र ॥ म्हणे यजमाना भूक फार ॥ ते समयीं अन्न समग्र ॥ जेवी विप्र क्षणमात्रें ॥१३२॥
ब्राह्मण म्हणे ते वेळां ॥ उपवास कालचा मजला ॥ अवघें अन्न जेविला ॥ मिटक्या देत तेधवां ॥१३३॥
ब्राह्मण सवेंचि गुप्त जाहला ॥ ऐसा एक संवत्सर लोटला ॥ राव पोट बांधूनि ते वेळां ॥ डोंबाघरीं काम करी ॥१३४॥
हरिश्चंद्र बहुत रोडला ॥ पंजर अस्थींचा उरला ॥ महारीण म्हणे रोग याला ॥ लागलासे निर्धारें ॥१३५॥
येणें आम्हांसी नागविलें ॥ दोन भार सुवर्ण व्यर्थ गेलें ॥ मसण राखावया वहिलें ॥ डोंबें ठेविलें हरिश्वंद्रा ॥१३६॥
म्हणे तुवां मसण राखावें ॥ द्रव्याविण प्रेत जाळूं न द्यावें ॥ राव म्हणे बरवें ॥ आज्ञा प्रमाण मजलागीं ॥१३७॥
सूर्योदयीं करोनि स्नान ॥ ह्रदयीं आठवी वसिष्ठाचे चरण ॥ राखीत बैसे स्मशान ॥ रात्रंदिवस नृपवर ॥१३८॥
हरिश्चंद्र काशीस गेला ॥ मृत्यु नगरींचा खुंटला ॥ महारीण म्हणे आणिला ॥ निर्दैव कैंचा घरासी ॥१३९॥
यासी घरास आणिलें ॥ माणूस मरायाचें राहिलें ॥ दुखण्यास कोणी न पडे वहिलें ॥ व्याधिदुःख गेलें गांवांतूनि ॥१४०॥
आमुचे हातींचें द्रव्य गेलें ॥ कारटें ब्राह्मण उपवासी मेले ॥ याचें ऋण द्यायाचें होतें भलें ॥ दोन भार सुवर्ण ॥१४१॥
इकडे काळकौशिकाचे घरीं ॥ तारामती भावें काम करी ॥ उसंत नसे दिवस रात्रीं ॥ नानापरीम कष्ट करी ॥१४२॥
कालकौशिकाचे मुख्य शिष्य ॥ त्यांत असे रोहिदास ॥ ब्राह्मण म्हणे समस्तांस ॥ जावें तुळशी आणावया ॥१४३॥
दर्भ समिधा कमळें ॥ आणावया पूजेचे वेळे ॥ वनासी अवघे निघाले ॥ रोहिदासासमवेत ॥१४४॥
पुष्पें तुळशी तोडिती ॥ समिधा दर्भ खुडिती ॥ तों सरोवरीं कमळांप्रती ॥ रोहिदासें देखिलें ॥१४५॥
विश्वामित्रें तक्षक पाठविला ॥ तो कमळीं जाऊनि बैसला ॥ रोहिदास ते वेळां ॥ कमलें तोडी तांतडीं ॥१४६॥
तों अकस्मात दंशला हातास ॥ भयें हांक फोडी रोहिदास ॥ बत्तीसलक्षण बाळ डोळस ॥ मूर्च्छित पडला भूमीवरी ॥१४७॥
सकल शिष्य आले धांवोनी ॥ तों रोहिदास पडला धरणीं ॥ बाळें रडती आक्रंदोनी ॥ बा तुझे जननीस काय सांगूं ॥१४८॥
रोहिदास म्हणे बाळांसी ॥ माता राहवीत होती भोजनासी ॥ मी तैसाचि आलों वनासी ॥ सत्वर येतों म्हणोनियां ॥१४९॥
तुम्ही जाल आतां घरास ॥ माता पुसेल कोठें रोहिदास ॥ तरी माझा नमस्कार मातेस ॥ जाऊनियां सांगा हो ॥१५०॥
तीस शोक करूं न द्यावा कांहीं ॥ म्यां तिची सेवा केली नाहीं ॥ तों झेंडू आला ते समयीं ॥ प्राण सोडिला रोहिदासें ॥१५१॥
बाळें रडत आलीं घरासी ॥ समाचार सांगती मातेसी ॥ येरी मूर्च्छित धरणीसी ॥ पडली कल्पान्त ओढवला ॥१५२॥
उठोनि आक्रंदे तारामती ॥ पहा कैसी कर्माची गती ॥ माझें एक बाळ निश्चिती ॥ काळें नेलें हिरोनियां ॥१५३॥
माझी आंधळ्याची काठी ॥ अडकली जाऊनि कवणे बेटीं ॥ मज दरिद्याची गांठी ॥ कोणें सोडिली निर्दयें ॥१५४॥
मज दुबळीचें अन्न किंचित ॥ कोणीं नेलें हातोहात ॥ माझा कल्पवृक्ष निश्चित ॥ कोण्या निर्दयें उपटिला ॥१५५॥
राजहंस माझा रोहिदास ॥ काळें त्यावरी घातला पाश ॥ मग म्हणे त्या बाळकांस ॥ कोठें रोहिदास टाकिला रे ॥१५६॥
त्यास स्नानासी उदक ठेविलें ॥ बाळक माझें असेल भुकेलें ॥ कोणे वनीं टाकिलें ॥ काय बोलिलें तें सांगा ॥१५७॥
मी काम करितां आसमास ॥ म्हणे माते तूं भागलीस ॥ मज क्षणभरी म्हणे बैस ॥ रगडितों पाय तुझे मी ॥१५८॥
उठती पोटीं उमाळे प्रबळ ॥ भळभळां नेत्रीं वाहे जळ ॥ म्हणे मज पापिणीस ऐसा बाळ ॥ जिरेल कोठूनि सांग पां ॥१५९॥
म्यां पूर्वीं ईश्वर पूजिला ॥ व्रत जप तप नेम चालविला ॥ पूर्ण न करितां मध्येंचि टाकिला ॥ म्हणोनि गेला रोहिदास ॥१६०॥
मीं केला पंक्तिभेद ॥ कीं केला हरिकथेचा उच्छेद ॥ किंवा साधुसंतांसी कुशब्द ॥ नेणतपणें बोलिलें मी ॥१६१॥
कीं केला परद्रव्या भिलाष ॥ कीं भजलें नाहीं हरिहरांस ॥ कीं कोणाचे मुखींचा ग्रास ॥ काढूनियां म्यां नेला ॥१६२॥
कीं गुरुद्रोह केला सबळ ॥ कीं हें गुरुनिंदेचें फळ ॥ कीं पात्रावरूनि ब्राह्मण तत्काळ ॥ उठवूनियां दवडिला ॥१६३॥
कीं यतीश्वर आला ॥ भिक्षा ॥ न देतां दवडिला ॥ कीं म्यां विघड पाडिला ॥ कुरंगिणीपाडसांत ॥१६४॥
कीं हरिहरचरित्रें उच्छेदिलीं ॥ कीं वेदशास्त्रपुराणें निंदिलीं ॥ मातापुत्रां तुटी पाडिली ॥ विघ्न केलें परांला ॥१६५॥
जळत ह्रदया भीतरीं ॥ परी विप्र कोपेल घरीं ॥ म्हणोनि पुढती काम करी ॥ मध्यरात्र जाहली ॥१६६॥
समस्तांचीं भोजनें जाहलीं ॥ घरींचीं अवघीं निजेलीं ॥ हांक फोडीत चालिली ॥ रोहिदासा म्हणोनियां ॥१६७॥
राजसा कोठें पडलासी ॥ कां रे पाडसा ओ न देसी ॥ मज माते म्हणोनि न बोलसी ॥ गति कैसी तुज जाहली ॥१६८॥
बा रे तूं भेट मजला ॥ मी येऊनि चुंबीन तुजला ॥ पक्ष्यांस वृक्षीं गहिंवर आला ॥ शोक ऐकोनि तियेचा ॥१६९॥
बा रे  माझिया डोळसा ॥ सख्या ओ दे रे पाडसा ॥ कोठें आहेसी राजहंसा ॥ रोहिदासा सुकुमारा ॥१७०॥
बा रे तूं निष्ठावंत बालक ॥ न पिशी पोईचें उदक ॥ अंतरला अयोध्यानायक ॥ हरिश्चंद्र तुजलागीं ॥१७१॥
चहूंकडे वनीं धांवत ॥ झाडें कपाळा आदळत ॥ घडिघडी अडखखळोन पडत ॥ अशुद्ध वाहत न कळे तीतें ॥१७२॥
सरोवरीं जें होतें प्रेत ॥ तें विश्वामित्र पुढें टाकीत ॥ सतीचे पायां लागत ॥ येरी पाहे चांचपूनि ॥१७३॥
पुत्राचें शव ओळखिलें ॥ मग निढळा निढळ मेळविलें ॥ म्हणे बार रे मज नाहीं पुसिलें ॥ केलें तुवां गमन परदेशीं ॥१७४॥
सूर्यवंशमुकुटमणी ॥ बोल कांहीं मजशीं वाणी ॥ तूं अयोध्यापतीचा पुत्र वनीं ॥ परदेशी होऊनि पडिलासी ॥१७५॥
मग आडवें घेतलें प्रेत ॥ पान्हा स्तनीं दरदरां फुटत ॥ मुखीं तयाचे स्तन घालीत ॥ ह्रदयीं धरीत द्दढ त्यासी ॥१७६॥
मग आणिक रुप पालटोनी ॥ विश्वामित्र पुढें येऊनी ॥ म्हणे तूं कोण या वनीं ॥ रडतेसी आक्रोशें ॥१७७॥
ती म्हणे ऐक द्विजा ॥ सर्पें दंशिला पुत्र माझा ॥ जो हरिश्चंद्र महाराजा ॥ त्याचा पुत्र असे हा ॥१७८॥
ब्राह्मण म्हणे आतांचि रात्रीं ॥ लवकरी ॥ जाळीं याप्रती ॥ सूर्योदयीं डोंब येती ॥ जाळूं न देती तुजलागीं ॥१७९॥
प्रेत उचलोनि त्या अवसरा ॥ येता जाहला जान्हवीतीरा ॥ काष्ठें अग्नि सत्वरा ॥ घेऊनि आला आपण ॥१८०॥
पुत्र घातला सरणांत ॥ म्हणे तूं रोदन न करीं येथ ॥ पैल तो मसण रक्षीत ॥ आलिया जाळूं न देचि ॥१८१॥
ब्राह्मण तेथें गुप्त जाहला ॥ तारामतीनें आकान्त मांडिला ॥ कोल्हाळ हरिश्चंद्रें ऐकिला ॥ जाळ देखिला मसणांत ॥१८२॥
धांवोनि आला तिजपाशीं ॥ केशीं धरोनि ओढिलें तिजसी ॥ मज न पुसतां जाळिसी ॥ कां गे न देसी द्रव्य तें ॥१८३॥
तीस रागें दिधली लात ॥ उदक घालूनि सरण विझवीत ॥ काष्ठें चहूंकडे टाकीत ॥ बाहेरी प्रेत काढिलें ॥१८४॥
सतीपुढें प्रेत टाकिलें ॥ केश जळोनि अंग भाजलें ॥ सर्वांगासी फोड आले ॥ बीभत्स पडलें लेंकरूं ॥१८५॥
मग म्हणे तारामती ॥ पहा कर्माची कैसी गती ॥ सर्पदंशें मरण अवगती ॥ अन्ययाति स्पर्शला कीं ॥१८६॥
अग्निसंस्कार न होतां पुरता ॥ बाहेर ओढूनि काढिलें प्रेता ॥ या हरिश्चंद्राच्या सुता ॥ गति तत्त्वतां ऐसी हे ॥१८७॥
सूर्यवंश मावळला ॥ राव हरिश्चंद्र काय जाहला ॥ माझा प्राण कां उरला ॥ काय डोळां पहावें हें ॥१८८॥
हें ऐकतां उत्तर ॥ येऊनि पुसे हरिश्चंद्र ॥ सांग तूं कोणाची सुकुमार ॥ जाळिशी पुत्र कवणाचा ॥१८९॥
येरी म्हणे कां पुससी व्यर्थ ॥ माझें कर्म बळिवंत ॥ अग्निसंस्कार निश्चित ॥ पुरता नाहीं बाळकासी ॥१९०॥
मग तो बोले राजेंद्रा ॥ तुझा कोण गे भ्रतार ॥ सत्य सांग तुज आण साचार ॥ श्रीविश्वेश्वराची ॥१९१॥
तारामती बोले ते क्षणीं ॥ मी राया हरिश्चंद्राची राणी ॥ सर्पें पुत्र दंशिला वनीं ॥ अग्नि देऊं त्यासी आलें ॥१९२॥
ऐसें हरिश्चंद्रें ऐकूनी ॥ वक्षःस्थल घेत बडवूनी ॥ मूर्च्छागत पडे धरणीं ॥ मस्तक अवनीं आपटीत ॥१९३॥
मग म्हणे तारामती ॥ तूं कोण सांग मजप्रती ॥ येरू म्हणे मी चक्रवर्ती ॥ अयोध्येचा हरिश्चंद्र ॥१९४॥
मग म्हणे महासती ॥ त्याची सरी इंद्र चंद्र न पावती ॥ तो केवळ मदनमूर्ती ॥ तेजें गभस्ति तैसा तो ॥१९५॥
त्याचें नाम घेतां प्रातःकाळीं ॥ सकळ पापां होय धुळी ॥ येरू म्हणे तोचि मी ये स्थळीं ॥ दास्य करितों डोबाचें ॥१९६॥
कालकौशिकें तुज घेतलें ॥ म्यां डोबाघरीं दास्य केलें ॥ एक वर्ष लोटलें ॥ अन्न नाहीं मजलागीं ॥१९७॥
ऐकतां ऐसी खूण ॥ एकमेकांचे गळां पडोन ॥ शोक केला दारूण ॥ तो सांगतां ह्रदय फुटे ॥१९८॥
घेऊनि रोहिदासाचें मडें ॥ हरिश्चंद्र आक्रोशें रडे ॥ अहा बाळ माझें बापुडें ॥ होऊनि पडिलें ये स्थळीं ॥१९९॥
अरे सूर्यवंशीं पडिला अंधकार ॥ गेला रोहिदासा ऐसा कुमार ॥ उचंबळला शोकसागर ॥ नसे पार तयासी ॥२००॥
हरिश्चंद्र म्हणे तारामतीसी ॥ मी पुसोनि येतों आपुल्या धन्यासी ॥ आज्ञा घेऊनि यासी ॥ दहन करूं मग तेथें ॥२०१॥
राजा गेला डोंबाचे घरासी ॥ विश्वामित्र आला तिजपाशीं ॥ तुजला ग्रासील विवशी ॥ जाईं वेगें येथूनि ॥२०२॥
तुझा भ्रतार ये तोंवरी ॥ बैसें या देवळा भीतरी ॥ मग प्रेत घेऊनि सुंदरी ॥ देवालयांत बैसत ॥२०३॥
तीस दुःअख निद्रेनें व्यापिलें ॥ विप्रें प्रेताचें पोट फोडिलें ॥ आंतडीं काढूनि ते वेळे ॥ मुखीं लावी सतीच्या ॥२०४॥
देवालयांत मांस विखूरलें ॥ हात पाय चहूंकडे टाकिले ॥ रक्त तिच्या मुखासी माखिलें ॥ बाहेरी आला आपण ॥२०५॥
विप्र करी शंखध्वनी ॥ लांव बाळ खाते म्हणोनी ॥ तों सरली रजनी ॥ लोक धांवोनि आले तेथें ॥२०६॥
वेशींत होते महार ॥ त्यांसी हांक फोडी विश्वामित्र ॥ अरे तुम्हांसी लांव खाईल निर्धार ॥ कुळ तुमचें उरेना ॥२०७॥
माझे पाठीस होती लागली ॥ म्यां भयानें हांक फोडिली ॥ पळोनि आलों तुम्हांजवळी ॥ मग ती गेली देवळांत ॥२०८॥
देवालयांत ती जों आहे ॥ तों मारावी लवलाहें ॥ मग पुढें हाता न ये ॥ बाहेर गेल्या कोणासी ॥२०९॥
तुम्हां देखूनि आंत गेली ॥ दिवटी नेऊनि धरा वहिली ॥ मज ग्रासिती ये काळीं ॥ परी वांचलों तुमचेनें ॥२१०॥
मग महार तेथें आले ॥ बळकट ते आंत गेले ॥ तीस केशीं धरोनि ओढिलें ॥ प्रेत बांधिले तिचे गळां ॥२११॥
माघारे हात बांधोनी ॥ सोटे मारिती ते क्षणीं ॥ तें दुःख सांगतां धरणी ॥ उकलूं पाहे सत्वर ॥२१२॥
डोळे तियेचे बांधिले ॥ राजद्वारीं घेऊनि आले ॥ लोक बिदोबिदीं पळूं लागले ॥ लांव आली म्हणोनि ॥२१३॥
लेंकुरें घेऊनि घरांत पळती ॥ कित्येक कपाटें ढांकिती ॥ धीट ते जवळी जाती ॥ पाहावया लांवेसी ॥२१४॥
एक म्हणती कौशिकगृहीं ॥ ही होती कळलें नाहीं ॥ आतां खाईल सर्वही ॥ मनुष्यमात्र उरेना ॥२१५॥
परवां दोघे ब्राह्नण मेले ॥ ते इणेंचि खादले ॥ ईस ठेवितां नोहे भलें ॥ जिवें मारा आतांचि ॥२१६॥
मग वीरबाहु महार ॥ पाचारिला सत्वर ॥ म्हणती या लांवेचा संहार ॥ करीं बाहेर नेऊनि ॥२१७॥
मग डोंबानें केशीं धरोनी ॥ बाहेर आणिली ओढूनी ॥ हरिश्चंद्रासी बोलावूनी ॥ म्हणे मारूनि टाकीं इयेतें ॥२१८॥
येरू म्हणे आज्ञा प्रमाण ॥ ओळखिलें तारामतीनिधान ॥ तिचे हातीं करविलें स्नान ॥ भागीरथीचें ते वेळीं ॥२१९॥
स्नान करूनि बाहेर आली ॥ ह्रदयीं चिंतिला वनमाळी ॥ मान नीट करी वहिली ॥ येते पुशिली शस्त्रधारा ॥२२०॥
तारामती म्हणे तेधवां ॥ जय जय विश्वनाथा सदाशिवा ॥ हरिश्चंद्राऐसा पति व्हावा ॥ जन्मोजन्मीं मजलागीं ॥२२१॥
रोहिदासा ऐसा सुत ॥ वसिष्ठा ऐसा गुरुनाथ ॥ विश्वामित्रा ऐसा मागता ॥ सत्य ॥ असो पैं जन्मोजन्मीं ॥२२२॥
जय जगन्निवास नारायण ॥ म्हणोनि नीट केली मान ॥ म्हणे आतां वेगें हाण ॥ एका घायेंकरोनी ॥२२३॥
घयासी उचलिला कार ॥ तों भक्तकृपाळु सर्वेश्वर ॥ वैकुंठाहूनि श्रीधर ॥ एकाएकीं धांवला ॥२२४॥
हो हो रे म्हणोनि ते वेळां ॥ जगन्निवासें करें धरिला ॥ चहूं भुजांनीं आलिंगिला ॥ हरिश्चंद्र भगवंतें ॥२२५॥
चा‍र्‍ही भुजा दिव्य सरळ ॥ वदन सुहास्य तमालनीळ ॥ वैजयंती आपादमाळ ॥ ह्रदयीं कौस्तुभ झळकतसें ॥२२६॥
हरिश्चंद्राराजाचें कंठीं ॥ जगन्निवासें घातली मिठी ॥ रोहिदास अमृतद्दष्टीं ॥ उठविला भगवंतें ॥२२७॥
तारामतीस ह्रदयीं धरीत ॥ म्हणे पतिव्रताशिरोमणि तूं सत्य ॥ विमानीं सुर समस्त ॥ पाहों आले तेधवां ॥२२८॥
शिव भवानी समवेत ॥ इंद्र आला शचीसहित ॥ सत्यलोकेशा सावित्री त्वरित ॥ पाहों आले तयांसी ॥२२९॥
आले सकळ ऋषीश्वर ॥ वाराणसीचे नारी नर ॥ पूर्णज्ञानाचा सागर ॥ वसिष्ठा सत्वर धांवला ॥२३०॥
विश्वामित्रें रूप प्रकट केलें ॥ हरिश्चंद्रासी ह्रदयीं धरिलें ॥ तारामतीस आलिंगिलें ॥ कडे घेतलें रोहिदासा ॥२३१॥
धन्य तुमचें सत्त्व पूर्ण ॥ केलें सूर्यवंशाचें उद्धरण ॥ शोधितां हें त्रिभुवन ॥ उपमा नसे तुम्हांतें ॥२३२॥
विश्वामित्रें कोटिवर्षें तप केलें ॥ तें श्रेय हरिश्चंद्रा दिधलें ॥ म्हणे तुझ्या पित्यासी उद्धरिलें ॥ तुज अर्पिलें तें पुण्य ॥२३३॥
जाहला एकचि जयजयकार ॥ धडकत वाद्यांचा गजर ॥ पुष्पवृष्टि सुरवर ॥ वारंवार करिताती ॥२३४॥
लक्ष्मी सावित्री पार्वती ॥ तारामतीस भेटती ॥ अक्षय वरदान देती ॥ संतोषोनि तयांसी ॥२३५॥
वसिष्ठासी देखोन ॥ हरिश्चंद्रें केलें साष्टांग नमन वसिष्ठ दाटला प्रेमेंकरून ॥ म्हणे धन्य राजेंद्रा ॥२३६॥
आला वीरबाहु महार ॥ केला तयाचा उद्धार ॥ पावोनि दिव्य शरीर ॥ स्वर्गाप्रति तो गेला ॥२३७॥
कालकौशिक ब्राह्मण ॥ धरी तारामतीचे चरण ॥ म्हणे माते तुझें दर्शन ॥ घेतां पाप नुरेचि ॥२३८॥
विश्वामित्रें हरिश्चंद्रासी ॥ गजरें आणिलें अयोध्येसी ॥ लोक धांवती भेटावयासी ॥ आनंद आकाशीं न समाये ॥२३९॥
दोघें स्थापूनि सिंहासनीं ॥ आपुलें हातें शेंस भरोनी ॥ रोहिदासास पुढें बैसवूनी \। अभिषोकिलें रायातें ॥२४०॥
हरिश्वंद्रावरी धरिलें छत्र ॥ आज्ञा मागोनि विश्वामित्र ॥ बद्रिकाश्रमीं सत्वर ॥ गेला तेव्हां तपातें ॥२४१॥
साठसहसहस्त्र वर्षेंवरी ॥ हरिश्चंद्र अयोध्येचें राज्य करी ॥ मग रोहिदास त्यावरी ॥ सिंहासनीं स्थापिला ॥२४२॥
सकळ अयोध्यानगर ॥ विमानीं बैसवी हरिश्चंद्र ॥ करूनि सकळांचा उद्धार ॥ घेऊनि गेला वैकुंठीं ॥२४३॥
यापरी अयोध्या उद्धरिली ॥ क्षणें वैकुंठासी नेली ॥ हरिश्चंद्रें कीर्ति केली ॥ ऐकतां जळती सकल पापें ॥२४४॥
ही कथा करितां श्रवण ॥ त्यांसी लाभे जय कल्याण ॥ अंतीं पावती वैकुंठ भुवन ॥ सत्य वचन व्यासाचें ॥२४५॥
हे कथा अति सुरस ॥ धर्मासी सांगे लोमश ॥ युधिष्ठिरा तूंही विशेष ॥ सत्त्वधीर तैसाचि ॥२४६॥
पुढें कथा गोड गहन ॥। घोषयात्रे जाती कौरव दुर्जन ॥ तेथें गंधर्व नेतील धरून ॥ पाकशा सनाचे आज्ञेनें ॥२४७॥
पांडवप्रताप नंदनवन ॥ कल्पवृक्ष हरिश्चंद्रोपाख्यान ॥ सप्रेम भक्त पंडितजन ॥ श्रवण करोत सर्वदा ॥२४८॥
संतश्रोतयांसी नमस्कार ॥ साष्टांगें घाली श्रीधर ॥ ब्रह्मानंदें होऊनि निर्भर ॥ हें चरित्र परिसावें ॥२४९॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अरण्यपर्व व्यासभारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ तिसाव्यांत कथियेला ॥२५०॥
इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे त्रिंशत्तमाध्यायः ॥३०॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP