ये करवीरनिवासिनि, भवनाशिनि,
विश्वकाशिनि, दु:खशोषिनि,
नानावेषिनि, चित्प्रकाशिनि,
भक्ततोषणि लक्ष्मी सुवासिनी ॥ध्रु.॥
तुझे अधरींचा रंग, पाहुनि विष्णु झाला दंग,
त्याला नसतांही आकार, जाला साकार सांग.
तुझे अलकांचा पुंग, पाहुनि देव जाले भृंग! ॥१॥
करिति गुंजारव तूंग, पाहुनि नेत्रींचा पांग,
हरिण होउनि ठेले दंग, गेले वना सोडुनि संग,
फिरति चुंग असुनिया वनीं ॥२॥
पाहुनि वदन-अरविंद, चंद्र कांति करुनि मंद
जाला तव चरणीं ।
सरळ नासिक स्फुंद, दंतपंक्ती कळ्या कुंद,
भाळ विशाळ रुंद!
आदिशक्ती जगन्माय, जाल्या साह्य तुझे पाय,
आम्हांलागी उणें काय?
देई देई निजठाय, तुजवाचुनि उपाय
व्यर्थ करुनिया काय?
वृथा श्रम हाय हाय ! करी पूर्ण कृपासाह्य,
जिजप्राप्ती जेणें होय. देई ऐसाचि न्याय,
निरंजनीं मनीं असे, करी तैसें चित्सौदामिनी! ॥३॥
जय जय नदिपतिप्रियतनये । भवानी महालक्ष्मि माये ॥ध्रु.॥
आदि क्षिरसागररहिवासी । जय जय कोल्हापुरवासी ।
अंबे, भुवनत्रयिं भ्रमसी । सदा निजवैकुंठी वससी ।
दुर्लभ दर्शन अमरांसी । पावसि कशि मग इतरांसी? ।
करुणालये. मोक्षदानी ।
भक्त जे परम, जाणती वर्म, सदा पदिं नरम ।
कृपेने त्यांसी सदुपायें । संकटीं रक्षिसि लवलाहे ॥१॥
अमरेश्वर विधि-हरि-हर । मिळाले असुरांचे भार ।
मंदाचल नग रवि थोर । केला वासुकिचा दोर ।
ढवळिला सागर गरगर । रगडिले जलचर मीन मगर ।
लाजती कोटि काम पोटीं ।
तुझें सौंदर्य, गळालें धैर्य, म्हणति सुर आर्य ।
जाळितो रतिपति सोसुं न ये । होतां जन्म तुझा सुनये ॥२॥
त्रिभुवनिं स्वरूपें तूं आगळी । वरिलासी त्वां वनमाळी ।
तुजसम न मिळे वेल्हाळी । शंकर मकरध्वज जाळी ।
न मिळे स्पर्शहि पदकमळीं । पदरज लागो तरि भाळीं ।
पितांबर शोभतसे पिवळा ।
बहार जरतार, हरी भरतार, तरी मज तार ।
स्तवितां तुज जरि गुणग्रहे । दशशतवदनांही भ्रम ये ॥३॥
सनकादिक ब्रह्मज्ञानी । ध्याती चरण तुझे ध्यानीं ।
दृढासन घालुनि निर्वाणीं । बैसले महामुनि तपिं ध्यानीं ।
तरी मी मंदबुद्धि जननी । तुझे गुण वर्णुं कसे वदनीं ।
जरी हा विष्णुदास तुझा ।
बहु अपात्र, करि सुपात्र, कृपा तिळमात्र - ।
करोनी, मोक्षपदीं वाहे । अंबे, लौकरि वर दे ये ॥४॥