(१३-१-१८९९). संगीत : खुद्द नाटककार
१ (राग : झिंजोटी, त्रिताल)
अजुनि खुळा हा नाद पुरेसा कैसा होईना ॥धृ०॥
नाटक झाले जन्माचे, मनि का हो येईना ॥१॥
व्यसने जडली नवी नवी, कुणि तिकडे पाहिना ॥२॥
नाव बुडविले वडिलांचे, कीर्ति जगी माइना ॥३॥
२ (राग : पिलु, त्रिताल)
काय पुरुष चळले बाई ॥ ताळ मुळी उरला नाही
धर्म नीति शास्त्रे पायी ॥ तुडवितो कसे हो ॥धृ०॥
साठ अधिक वर्षं भरली ॥ नातवास पोरे झाली
तरिही नव्या स्त्रीची मेली ॥ हौस कशि असे हो ॥१॥
घोड थेरडयाला ऐशा ॥ देति बाप पोरी कैशा ॥
काहि दुजी त्यांच्या नाशा ॥ युक्ति का नसे हो ॥२॥
शास्त्रकुशल मोठे मोठे । धर्म गुरुहि गेले कोठे
काय कम असले खोटे ॥ त्यांस नच दिसे हा ॥३॥
३ (चाल : मंदस्मित अरविंद)
सुंदर खाशी सुबक ठेंगणी स्थूल न कृशहि न, वय चवदाची ॥धृ०॥
नयन मनोहर वन हरिणीचे; नाक सरळ जशि कळी चांफ्याची ॥१॥
भ्रुकुटि वांकडया; कसे सडक मृदु, दंतपक्ति ती कुंद कळ्यांची ॥२॥
ओंठ पोंवळी, हनु चिंचोळी, लालि गुलाबी गालांवरची ॥३॥
४ (राग : अडाणा, ताल : त्रिताल)
जठरानल शमवाया नीचा । कां न भक्षिसी गोमय ताजें ॥धृ०॥
धनलोभानें वद आजवरीं । किती नेणत्या मूख कुमारी
त्वां दिधल्या वृद्धवरकरीं । खाटिकही तव कृतिला लाजे ॥१॥
५ (कानडी चाल : रंगैया मनिगे बारानो)
स्वार्थी जो प्रीति मनुजाची सहज ती ॥धृ०॥
परि साधे जो स्वार्थ परार्थी, उत्तम तो गणितो ॥१॥
स्वार्थ परार्था इतुका असता, मध्यम त्या म्हणती ॥२॥
ज्यात न जनहित त्या स्वार्थाला साधु अधम वदती ॥३॥
६ (राग : काफी ताल : दादरा चाल : आवो आवो रंगेला)
जागृत ठेवा, लग्नाची ही स्मृति सारी ॥धृ०॥
व्हालचि माता दुहितांच्या कधिंतारि संसारीं ॥
होऊं न द्यावा तुम्हीं त्यांचा विक्रय बाजारी ॥१॥
७ (चाल : सखयानो दाखवा गे)
कधि करिती लग्न माझे तुझ ठावे ईश्वरा ॥धृ०॥
वाढली उंच ही किती । हसुनी बोलती ॥
नाक मुरडिती । स्त्रिया परभारा ॥१॥
मैत्रिणी वदति टोचुनि ॥ शब्द ते मनी
जाति भेदुनि ॥ सुरीच्या धारा ॥२॥
जनक तो नाव काढिना ॥ माय सुचविना
हौस मग कुणा ॥ कोण झटणारा ॥३॥
८ (चाल : माळिण नवतरणी)
तरुण कुलिन गोरा, हसतमुख, तरुण कुलिन गोरा ॥
पाहिजे मुलीला चतुर सद्गुणी सुंदरसा नवरा ॥धृ०॥
(चाल) पुरवील तिची जो हौस सदा बहुपरी
घालील शाल जो मायेची तिजवरी
तिळमात्र तिला जो दु:ख न देईल घरी
विद्वानात हिरा, चकाकत विद्वानात हिरा ॥१॥
९ (राग : बिलावल, चाल : कसा कोणरे मदन तो)
सावळा वर बरा गौर वधुला । नियम देवादिकी हाचि परि पाळिला ॥
गौर तनु जानकी राम घननीळ तो
रुक्मिणी गोरटी कृष्ण काळा । शुभ गंगा नदी सागराला वरी,
वीज मेघास ती घाली माळा ॥१॥
१० (चाल : करि दळो बारो कामिनी)
मज गमे ऐसा जनक तो ॥ मात्र साचा ॥धृ०॥
मुख सुरकुतले, मस्तक पिकलें ॥ शरीर रोगांनी पोखरिलें
स्मशान ज्यानें सन्निध केलें ॥ त्या प्रेताला दुहिता विकतो ॥१॥
क्रूराधम हा जनक कशाचा ॥ अपत्यभक्षी व्याघ्र मुखाचा
वास नसावा जगीं अशांचा ॥ नवल हेंच यम यास विसरतो ॥२॥
११ (चाल : आनंद सागरम)
बिंबाधरा, मधुरा विनयादिगुणीं मनोहरा मधुरा ॥धृ०॥
ती सुंदरा ॥ विगुणा वरा ॥ घटिता विधि पी काय सुरा ॥
१२ (चाल : जरि गंध गजाचा)
श्रीमंत पतीची राणी, मग थात काय तो पुसता ॥धृ०॥
बंगला नवा नवकोनी, फुलबाग बगीचा भवतां
किती दासी जोडुनी पाणी, “जी” म्हणतील कामाकरितां
ही जात्या चतुर शहाणी, पति मुठींत ठेविल पुरता
सुग्रास बसुनि खायाला, मऊ शय्या लोळायाला
गुजगोष्टि काळ जायाला, ना कामधाम, ना चिंता
ही फुगेल बघतां बघतां ॥१॥
१३ (चाल : शांति धरा नृपराज)
म्हातारा इतुका न अवघें पाऊणशें वयमान
लग्ना अजुनी लहान ! ॥धृ०॥
दंताजींचें ठाणे उठलें, फुटले दोन्ही कान
डोळे रुसले कांहीं न बघती, नन्ना म्हणते मान ! ॥१॥
तुरळक कोठें केंस रुपेरी, डोइस टक्कल छान
भार वयाचा वाहुनि वाहुनि, कंबर होय कमान ! ॥२॥
काठीवांचुनि नेटा न पाया, परि मोठें अवसान
उसनी घेउनी ऐट चालतां, काय ते दिसे ध्यान ! ॥३॥
१४ (चाल : ले गयो चिर वनमालि)
घेउनि ये पंखा वाळ्याचा जा जा जा झणीं ॥धृ०॥
नाजुक ही राणी घाबरि होय उन्हांनी, उमटेना बघ वाणी
मधुर सुवासाचें सुंदर झारि भरोनि आणि गडे, तू पाणी ॥१॥
१५ (राग : भीमपलास, चाल : बात हारकीजे जबानसे)
मूर्तिमंत भीति उभी मजसमोर राहिली ॥धृ०॥
वाटतें दुजा सुदाम मज दिसेल त्या स्थळीं
दाखवावयास मला तात नेत त्याकडे
राक्षसा रुचेल का पहावया जसा बली ॥१॥
१६ (चाल : जळो ग याचं स्नान)
बघुनि त्या भयंकर भूता फोडिली तिनें किंकाळीं
या ह्र्दया चरका बसला, कळवले मनहि त्या काळी
परि बाप तिचा तो कसला चांडाळ पूर्विचा वैरी
तिळभरही द्रवला नाही उलट त्या बिचारीस मारी
ती दीन भयाकुल मुद्रा रात्रंदिन दिसते बाई
रडविलें तिने मज कितिदा दचकतें भिउनि शयनींहि ॥१॥
१७ (राग : मालकंस, नंतर भीमपलास, चा: : राधा मनोहर)
जो लोककल्याण ॥ साधावया जाण ॥
घेई करी प्राण ॥ त्या सौख्य कैचे ॥धृ०॥
बहु कष्ट जीवास ॥ दुष्टान्न उपहास कारागृही वास ॥
हे भोग त्याचे ॥ निंदा जनीं त्रास ॥
अपमान उपवास ॥ अर्थी विपर्यास ॥ हे व्हावयाचे ॥
१८ (राग : मालकंस, चाल : जयति जय सुररी ॥)
घेई मम वचन हे सगुणमणिमंजिरी ॥धृ०॥
साच तुज वरिन मी भंगुनीहि मन्नियम
साक्षि अरुणासि, तो विश्वासाक्षी करी ॥१॥
१९ (चाल : आसजन गेले)
मी समजु तरि काय भुले मन ॥
पडति अक्षता शिरिन
तेचि उद्भवले मधि काय कळेचि न ॥धृ०॥
हासु काय सुटले मी म्हणुनी ॥
का रडु हे मस्तक पिटुनी.
लग्न होय की कुंवार अजुनी ॥
हर हर देवा काय विडंबन ॥१॥