(६-४-१९२८). संगीत : मास्तर कृष्णराव, पटवर्धनबुवा
१
(राग : यमन, ताल : रूपक, चाल : कैसे जाऊ घरा)
कोकिला रमवी त्या ऋतुराज श्रवणा । तिज रसिक दिसला ।
भुलली श्यामला ॥धृ०॥ ललित भुवनी । गमत मजसी ।
अरसिकांनी रसिक बाणा दुखविला ॥
२
(राग : गरुडघ्वनि, ताल : त्रिवट, चाल : शरण पदा)
साराया दीन अबला या । दुरित प्रबल पापभार दशावतार वरिले ।
तेहि काया वांया ? ॥धृ०॥
सुबल वरिल अबलताच माना । प्राप्त अभय तिज नित्य भूतली ।
असुरदमन छळिता तिला स्वपद नाश वरिला ।
सार्थ सार्थ माया ॥
३
(राग : मिश्रकाफी, ताल : केवा, चाल : राघेकृष्ण बोल)
प्रेमभाव बोल विमले । याचनेस बोल सरले । काल हा अमोल ॥धृ०॥
भक्तिभाव मनी ठसला । नितदिन दास तुज भजला ।
विनवितो आज पदकमला । नच मनिंचा प्रेमा बोल । विमले ॥
४
(राग : अडाणा, ताल : त्रिवट, चाल : घगरि भरन)
धरि धवल यशाचि मम धाम । तोची खलबले हरियेला,
कलंक लांछन कुलशीला ॥धृ०॥
कंप घेत जणुं सांप्रत धरणी । तिमिर चंड ग्रासित सकला ॥
५
(राग : मांड, ताल : दीपचंदी, चाल : ठाकुर तव)
सांप्रत मज त्याजिले कां ? देवा ! फिरत कसे जग हे,
ग्रह तो फिरता । तरी थारा तव पदी धाता ॥धृ०॥
विधिशासन जगि चुके कुणाला । मनुजा तूची विसावा ॥
६
(राग : सोहोनी, ताल : त्रिवट, चाल :जोबनमदकर)
नंदनवन फुललें । त्यात रमले, कुठे लोपले ॥धृ०॥
विरहज्वाला । पेटल्या या । दाह करिती जणू दैव कोपले ॥
७
(राग : दुर्गा, ताल : त्रिवट, चाल : छबिले खेल खेले)
अखिल स्त्री जनांना । लोकीं । बंधुभावनी गणी भगिनी तयाना ॥धृ०॥
मानावे मजला । बंधु नव खरा । असे-विनति पदान्विता ॥१॥
प्रेमा त्या कसला । स्वार्थ नच शिवे । सुखा वितरि जनांतरि ॥२॥
८
(राग : पहाडी, ताल : रुपक, चाल : शबेमा दो बादाये)
स्वजनासि आसरा जाहला । पुरवी तयांच्या सुवासना ॥
भुलवी न कल्पना त्या मना । महती कशाची तपोधना
मुनिवर्य रंगले प्रेमी या । तप करिती ते ललनांसवे ।
मग कां ही माता कल्पना । जगती असावे सखीविना ॥१॥
९
(राग : कर्नाटकी, ताल : त्रिताल, चाल : पतितपावना)
पतित पावना । भेट नच पुन्हा । जीव आज सुना । माना ॥धृ०॥
निज कन्यका मज मानिलें । उतराई कैसे व्हावे ।
शतजन्म अपुरे माना ॥१॥
१०
(ताल : मांड-केरवा, चाल : जावो जावो सैयां)
दिव्य देशकार्या मी सजले सौख्य सोडुनी ।
मरण येत मजला तरी त्याचा खेद नच मनी ॥धृ०॥
जे देशास्तव सोडिती सुखपात्रा त्या स्वर्ग लाभे
जगीं होती धन्य जन्मुनी ॥१॥
ऐशी होईन, भूषण कुलशीला, मी वीरकन्या,
अजि रमलें स्वप्नरजनीं ॥२॥
मायापाखर आजवरीची, चिरकाल ठेवा,
ही विनंती चरण वंदुनी ॥३॥
११
(राग : भैरवी, ताल : केरवा, चाल : कसरमे जो०)
का घातुक रुसवा । धरिला । आजवरी हा ॥
की जीवहि रमला । अदया । घोरवनी त्या ॥धृ०॥
नव मंगल तुजला आता । तो प्रभु देवे ।
तू भूषण पितया । सखया । तूची विसावा