चरित्र - भाग १
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
शेख महंमदाचे नांव संतमालिकेत येते. परंतु त्यांचेबद्दलची माहिती फारशी उपलब्ध नाही. महिपतीनें तुकाराम चरित्राच्या अनुसंधानानें त्यांची थोडीशी हकीकत दिली आहे. त्यांतील सारांश असा - देहूस तुकोबांच्या कीर्तनांत सर्व मंडळी दंग झाली असतां, ‘‘हिलाल धरिला होता ज्यानें तयासी नाहीं देहभान ।....॥८५॥
त्यानें हिलाल करितां वरी । तो मंडपासी लागला ते अवसरी । इकडे आणीक कथा लागली दुसरी । ते सादर परिसावें ॥८६॥
चांभारगोंदियात प्रसिद्ध । ज्ञानसागर शेख महंमद । तो कीर्तन करित आनंदें ॥८७॥ श्रवणासी बैसले बहुत जण । अठरा वर्णाचे थोर लहान । अणिक चतुर श्रीमंत जन । सज्ञान ब्राह्मण पंडित जे ॥८८॥
.....ते वक्तियानें ते वेळा । उडी घेऊनि मंडप aचोळिला । हें कौतुक देखोनियां डोळां । आश्र्चर्य सकळां वाटलें ॥८९॥’’.
श्रोत्यांनी तसे करण्याचें कारण विचारलें. तेव्हां शेख महमंद बोलिले की, ‘‘वैष्णव तुका देहू गावांत । सप्रेम भावें कीर्तन करित । तो मंडपी हिलाल अकस्मात । लागला अवचित न कळतां ॥९२॥ तो जळतां दृष्टीस येथें मी निज करें विझविला येथें । ऐसी ऐकोनिया मात । श्रोते आशंकित जालें कीं ॥९३॥’’.
तेव्हां श्रोते बोलले की, तेथें पंढरीनाथ होते तर त्यांनीं तो कां विझविला नाहीं? तेव्हां शेख महंमदानीं सांगितलें की, प्रभु देवपण विसरून गेले होते. त्यांची त्या कीर्तनांत विदेही स्थिति झाली होती. त्यांतूनहि ‘‘हें जरी तुम्हांसी न वाटेल खरें । तरी तेथोनि आणावा समाचार । ऐसे ऐकोनि उत्तर । श्रोते चतुर संतोषले ॥१०७॥
देहूचिया पाटिलासी पत्र लिहूनी ॥ एक सांडणी पाठविली त्यांनीं । कीं रात्रीं कौतुक देखिलें नयनीं । यथार्थ लेहोनि पाठवा ॥१०८॥
अस्तमानासी जातां दिनकर । आलें तेयाचें प्रत्योत्तर । कीं रात्रीं होतां कीर्तनगजर । मंडपासी हिलाल लागला ॥१०९॥’’.
गांवकर्यांनी शेख महंमदास झाला मजकूर सांगितला. तेव्हां ‘‘शेख महंमद राहिले निवांत ।....॥११६॥’’. महिपतबोवांनी इ. स. १७७४ त पूर्ण केलेल्या ‘भक्तलीलामूतां’ त हा प्रसंग दिला नाही. कदाचित् या दंतकथेच्या प्रामाण्याबाबत ते पुढें शंकित झाले असावेत !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP