चरित्र - भाग २
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
श्रीगोंदे येथील शेख महंमदाचे मठांतील एका हस्तलिखित वहीत शेख महंमदाचे चरित्र दिले आहे. त्यांत लेखक व लेखनकाल यांचा निर्देश नाही. हे चरित्र अप्रसिद्ध असल्यानें त्यांतील मुख्य भाग पुढें उद्धृत करितोः
‘‘शेख महंमद पीर कबराचा अवतार । तयाचें चरित्र ऐका तुम्ही ॥१॥
श्रीगोंदियामध्ये पेठ मकरंदपूर । तेथें अवतार शेख महंमद ॥२॥
राजे महमंद पिता । पुव्हलेशा माता पतिव्रता । त्यांचें पोटीं संत अवतार ॥३॥
.... अखंड समाधि गुंफेत बैसावें । मनीं जिवीं भावें हरिनाम ॥५॥
......अवतारलीला दाविली अपार । संत साधु थोर वर्णित गेले ॥८॥
तुकोबा आणिक स्वामी जयराम । रामदासा प्रेम चरणीं त्यांच्या ॥९॥
.....अनादि सिद्ध साधु योगी दिगंबर । अविंधांत पीर मराठ्यांत साधु ॥१३॥
.....नित्य गमन करीं हिंडे चारी दिशां । जुती जोडा मासा एक लागे ॥१६॥......’’.
‘‘योगसंग्राम ग्रंथ तेव्हां आरंभिला । विचार तो केला सिद्ध तेव्हां ॥१८॥
सिद्ध करूनि ग्रंथ धाडिला वाराणसी । माने कीं दुषीती पहावया ॥१९॥
तेव्हां काशीमध्यें लोकांनी पाहिला । भाविकीं वंदिला करूनी नमन ॥२०॥
ब्राह्मण षड्शास्त्रीं अंगीं विद्यागर्व । निखंडिला सर्व ग्रंथ त्यांनीं ॥२१॥
अविंदाची वाणी नायकावी कानीं । ग्रंथ तो उचलोनी त्यांनीं नेला ॥२२॥
नेऊनियां ग्रंथ पाण्यांत बुडविला । विचार तो केला नाहीं त्यांनीं ॥२३॥
सेख महंमदासी अंतरीं कळले । पाण्यांत बुडविलें ग्रंथालागीं ॥२४॥
आपुल्या शिष्यांसी दृष्टांत दाविला । मागूनि वहिला ग्रंथ आणा ॥२५॥
ग्रंथ नेला काशीं होते दोघेजण । ब्राह्मणालागून बोलविलें ॥२६॥
आमचा ग्रंथ द्यावा आम्ही घेऊनि जातों । सांगातें विप्र तो एक आला ॥२७॥
ग्रंथ काढावया पाण्यांत तो गेला । कोरडा निघाला ग्रंथ तेव्हां ॥२८॥
ब्राह्मणांकारणें नवलाव जाला । ग्रंथ तो आणिला अवघ्या जवळीं ॥२९॥
समस्तीं मिळोनि नवलाव केला । ग्रंथ तो वंदिला भाळावरी ॥३०॥
कोरडे कागद निघाले बरवे । कैसीं त्या म्हणावी अविंद वाणी ॥३१॥
भाविक ब्राह्मण दोघेहि निघाले । शिष्यासंगें आलें श्रीगोंदिया ॥३५॥
.....ग्रंथ योगसंग्राम पुढें ठेवियेला । जगमान्य जाला काशीमध्यें ॥३७॥’’.
टीपः
बाडांक ४, क्र. संदर्भांक ३४०, शेख महंमद मठ संग्रह; ओव्या १३७ - ‘‘संपूर्ण चरित्र शेख महमंदाचें.’’ यांतील उतारे (एकदोनच) श्री. वागळे यांनी आपल्या ‘योगसंग्रामा’च्या प्रस्तावनेत दिले आहेत.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP