शेख महंमद चरित्र - भाग १२
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
एकनाथांच्या या उल्लेखाच्या आधारानें महिपतीनें बहुधा आपल्या ‘भक्तलीलामृतां’त विस्तृत आख्यान रंगविलें आहे. त्यांतील महत्त्वाचा भाग पुढें देतो. महिपतिबावा ‘भक्तलीलामृता’ च्या चवदाव्या अध्यायांत एकनाथ-तीर्थाटनास निघाले त्यावेळच्या त्यांच्या प्रवासाचें वर्णन करितांना लिहितात कीं, ‘‘ऐसा पंथ क्रमिता फार । तंव एक ग्राम लागलें थोर । ते स्थळीं ‘चंद्रभट द्विजवर’ । वैष्णववीर पैं होता ॥२३॥
त्याची सत्कीर्ति ऐकोनि श्रवणी । गुरुशिष्य संतोषयुक्त मनीं । मग अस्तमानासी जातां तरणी । उतरले सदनीं तयाचे ॥२४॥
चंद्रभाटें देखोनि वैष्णव वीर । केला तयांचा सन्मान आदर । नमन करोनि परस्पर । भेटले सत्वर तेधवां॥२५॥
चंद्रभटनामा विरक्त ब्राह्मण । कुटुंबी असोनि निराश मन । अयाचित वृत्ति करोन । योग निर्विघ्न चालवी ॥२६॥
कायिक वाचिक मानसिक केवळ । तपें आचरें सर्व काळ । ज्याच्या वाचेसी असत्य मळ । याचा विटाळ स्पर्शे ना ॥२७॥
स्नानसंध्या देवतार्चन । परोपकारी वेचितसे प्राण । आत्मवत मानी अवधे जन । दया संपूर्ण सर्वांभूतीं ॥२८॥
संसारपाशे तुटावया निश्र्चितीं । सर्वदा इच्छित सत्संगति । म्हणे कधीं आतां उगवेल गुंती । चित्तीं विरक्ति बाणली ॥२९॥
ऐसा तो चंद्रभट ब्राह्मण । निराश उदासीन विरक्त मन । तयासी एकनाथ जनार्दन । निज प्रीतीनें भेटले ॥३०॥
सायंकाळीं संध्या करोनि सत्वर । मग ते करिती उपहार । तों एकांतीं बैसोनि द्विजवर । पुस्तक सत्वर सोडिलें ॥३१॥
चतुःश्र्लोकीं भागवत निर्धारीं । ब्रह्मयासी उपदेशित श्रीहरि । चंद्रभट त्याची व्याख्या करी । अर्थांतरी विवरोनियां ॥३२॥
मग एकनाथ आणि जनार्दन । तयासमीप बैसती येऊन । म्हणती धन्य आजिचा सुनिद । जाहलें दर्शन संतांचें ॥३३॥
प्रेमळ श्रोते सर्वज्ञ निपुण । मिळतां उल्हासें त्याचें मन । अर्थ सांगतसे प्रांजळकरून । ऐकतांचि मन वेधतसे ॥३४॥
अनुभवाच्या गोष्टी सांगत । कंठ होतसे सद्गतित । प्रेमें नेत्रीं अश्रू वाहत । विदेह स्थिति तिघांची ॥३५॥
मज वाटतसे साचार ।....स्वानंदें रात्री क्रमीतसे ॥३७॥
पुस्तक समाप्त जालिया पाहीं । मग निद्रेसी मान देती कांहीं । यांची संगती सर्वदा असावी । हा हेत जीवीं उभयतां ॥३८॥
कर्म उपासना आणि ज्ञान । तिहीं शास्त्रीं असे निपुण । ऐसे एकनाथ जनार्दन । बोलती वचने परस्परें ॥३९॥’’.
दुसरे दिवशीं ते तिघे चंद्रभटाकडे जेऊन तीर्थाटणास बरोबर निघाले. पंचवटीस जाऊन परत देवगिरीस आले. चंद्रभट जनार्दनपंतांकडें राहिले. नंतर महिपतिबाबा लिहितात कीं, चंद्रभटाचें मनीं ‘‘पूर्ण बोध ठसावला जाण । यास्तव पालटे नामाभिधान । चांद बोधला त्याजकारणें । सर्वत्र जन बोलती ॥७२॥
कांहीं दिवस लोटतां ऐसे । मग जनार्दनासी स्वमुखें पुसे । आतां हेत उपजला असे । की समाधीस बैसावें ॥७३॥
त्याचे मनोगत जाणोनि पाहीं । समाधीस बैसला विदेही । परी यवन उपद्रव करितील कांहीं । मग एक युक्ति तिही योजिली ॥७४॥
जैसी अविंधाची मदार जाण । तैसेंच वर रचले स्थान । हिंदु आणि ते यवन । समाधान पावले ॥७५॥
देवगिरीच्या पर्वतावर । तें स्थान आहे अद्यापवर । होतसे नाना चमत्कार । देखती सर्वत्र दृष्टीसी ॥७६॥’’.
बारा वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘भक्तविजयां’त महिपतीनें हा प्रसंग दिला नाहीं. परंतु त्यानंतर लिहिलेल्या ‘संतविजयां’त (समर्थ-चरित्रांत) चंद्रगिरीचें वर्णन केलें आहे. त्यांत तें स्थळ कोल्हापुरजवळ असून तेथें समर्थ बरेच दिवस राहिले असें म्हटलें आहे. खास रामदासांचा एक अभंग देऊन आणखी माहिती देतांना ते लिहितात की, ‘‘चंद्रगिरीवरी तत्त्वतां । पूर्वीं निगर्वीं कवी रहात होता । इतुकी स्थानें पाहतां समर्था । आनंद चित्ता होतसे ॥२३॥’’.
हा अभंग व माहिती बहुधा तंजावरकर मठाधिपति भीमस्वामी यांनीं ‘समर्थचरित्रां’त दिलेल्या माहिती वरून घेतली असावी. कदाचित् एकनाथांनीं केलेला गिरीचा उल्लेख व ‘संतविजयां’ तील माहिती जुळत नसल्यानें महिपतीनें चंद्रभटाच्या ग्रामाचा उल्लेख करणें टाळलें असावें. असो.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP