शेख महंमद चरित्र - भाग २६
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
त्यावेळी ‘शेख महंमदी संतोष सद्गुरू खुणे । सत्य स्वामी जेव्हां लागली होती पानें । तेव्हां धावा केला अद्वैत बोधानें । मग झेंडू फुटोन गेला ॥९॥’.
हा प्रसंग बहुधा शेख महंमदांच्या उत्तर आयुष्यांतील असावा.
शेख महंमदांनीं आपला ‘योगसंग्राम’ ग्रंथ इ. स. १६४५ त संपविला. या ग्रंथाबद्दल एक दंतकथा शेख महंमदांच्या चरित्रांत आलेली सुरवातीस दिलीच आहे. या दंतकथेप्रमाणें शेख महंमदांनी आपला ग्रंथ त्याची प्रामाण्यप्रमाण्यता अजमावण्यासाठी आपल्या दोन श्ष्ियांबरोबर काशीस पाठवला. तेथें ब्राह्मणांनीं तो वाराणशींत बुडवला. नंतर सहा महिन्यांनीं ग्रंथ बुडविल्याचें शेख महंमदास अंतर्ज्ञनानें समजले. त्यांनी आपल्या शिष्यांस तो ग्रंथ परत आणावयास सांगितले. शिष्यांनी ब्राह्मणांजवळ ग्रंथ मागितला. त्यांतील एक ब्राह्मण गंगेवर जाऊन पाहतो तो ग्रंथ साफ कोरडाच निघाला. तेथील लोकांस कौतुक वाटले. एक ब्राह्मण त्या शिष्यांबरोबर ग्रंथ घेऊन श्रीगोंद्यास आला. ‘योगसंग्रामा’ सारखा ग्रंथ काशीच्या ब्राह्मणांच्या संमतीस पाठवील इतका कांही शेख महंमद दूधखुळा नव्हता. कथालेखकांनीं ग्रंथ न वाचतांच कथा रचली असावी. तुकोबांच्या वह्यांचें प्रामाण्य त्या तरल्यानें सिद्ध झालें तसेंच आपल्याहि आराध्य संताच्या पुस्तकाच्या बाबतीत न झाले तर त्याला गौणत्व येईल ही कल्पना या कथेच्या बुडाशीं असावी. म्हणूनच तुकोबांच्या वह्या तेरा दिवस पाण्यांत होत्या तर शेख महंमदांच्या सहा महिने ठेवविल्या. रामदासांचा ग्रंथही एक वर्षानें पाण्यावर ये म्हणतांच आपल्या गळ्यांतील तोडीसह वर आला, अशी कथा रामदासी परंपरेतील प्रसिद्ध कथाकारांनी रचली आहे. एखाद्या विशिष्ट चमत्काराची पुनरावृत्ति होत गेली की त्या पुनरावृत्तींत सत्याचा अभाव असतो, असें निदान पुष्कळशा दंतकथांवरून तरी स्पष्ट दिसून येते.
राजे महंमदाप्रमाणें शेख महंमदहि गृहस्थाश्रमी होते. ते मालोजीराजे यांच्याबरोबर इ. स. १५९५ च्या सुमारास श्रीगोंद्यास येऊन राहिले. त्यानंतर त्यांचा वंश आजतागायत तेथेंच वाढला आहे. शेख महंमदांच्या बायकोची कबर शेख महंमदांच्या शेजारी लागूनच त्यांच्याच दर्ग्यात आहे. हीहि मुसलमानी पद्धतीची आहे. शेख महंमदांच्या पुत्रांची व पौत्रांची नांवे मिळाली नाहीत. परंतु त्यांच्या पणतूचें नांव कागदपत्रांत येते. शेख महंमद ज्या गुंफेत आपली योगसाधना करीत होते तेथेंच त्यांनी समाधी घेतली. नंतर त्या गुहेचें तोंड बंद करून त्यावर दर्गा बांधला आहे. त्यांच्या बायकोचें नांव समजले नाहीं. परंतु त्यांचे शेजारी कबर आहे ती तिचीच असें मठवाले त्यांचे वंशज सांगतात. त्यांच्या बायकोलाहि त्याच गुंफेत कबरस्त केली किंवा कसें ते कळलें नाही. कबर बायकोचीच असेल तर ती शेख महंमदांनंतर पैगंबरवासी झाली असावी.
शेख महंमदांच्या शाखेची परंपरा ‘सिजर्या’ प्रमाणें दावलजी, हाकमी, बाला अशी दिली आहे. दावलजी व हाकीम हे बहुधा पुत्र व पौत्र असावेत. या सर्वांच्या कबरी त्या आवारांतच आहेत. परंतु दावलजी पुत्र व हाकीम नातू हें निश्र्चितपणें सांगण्यास पुरावा नाही. तत्कालीन कागदपत्रांचा अभाव आहे. या दोघांची कविता मात्र उपलब्ध आहे. बालाबावा हे शेख महंमदांचे पणतू होत. याबद्दल जनकोजी शिंदे यांच्या २० डिसेंबर १८३६ च्या पत्रांत तसा उल्लेख आला आहे. या सनदपत्रांत आणखीहि माहिती येत असल्यानें त्यांतील सर्वच भाग खालीं टीपेंत दिला आहे. या मजकुरावरून शेख महंमदांची मुख्य पारमार्थिक परंपरा वंशपरंपरेला धरून होती असें स्पष्ट दिसते. विशेषतः उछाहाबाबतचें गांवकीचें देणें या घराण्यांतील वडील पुरुषास मिळत असे. सारांश, शेख महंमदबाबा गृहस्थाश्रमी होते व त्यांचा वंश अद्यापि चालत आहे.
शेख महंमदांच्या उपलब्ध लेखसंग्रहाबद्दल वर चर्चा आलीच आहे. तसेंच त्यांच्या शिष्यानुयायी म्हणविणार्यांची माहिती त्यांच्या काव्यांत आढळली तिचाहि वर निर्देश केला आहे. शेख महंमद बरेच हिंडत असावेत असें त्यांच्या एका अभंगावरून म्हणतां येते. हाहि अभंग वर आलाच आहे.
शेख महंमदबाबांच्या कुटुंबपोषणार्थ मालोजीनें दिलेली जमीन अद्यापपर्यंत त्याच घराण्यांत आहे. नवीन मोजणीप्रमाणें ती १८ बिघे झाली होती. त्याशिवाय मौजे येणें येथेंहि १० बिघे जमीन त्यांस इनाम दिली होती असें कागदपत्रांवरून दिसते. शेख महंमदबाबा कोणत्या वर्षी पैगंबरवासी झाले हे नक्की समजत नाही. परंत या मठांतील उत्सवासाठी जीं वर्षासने होती त्यांतील एक भाद्रपदमासी होणार्या उत्सवासाठी व दुसरें फाल्गुनमासीं होणार्या उत्सवासाठी होते. त्यांतील फाल्गुनमासांत होणारा उत्सव शेख महंमदांचा व भाद्रपदांतील बालाबावाचा असावा. शेख महंमद फाल्गुन शुद्ध ९ मीस पैगंबरवासी झाले असें दिसते.
टीपः
‘‘श्रीनाथ प्रा.--राजश्री एकनाथ सीवजी कमाविसदार कसबे श्रीगोंदें प्रांत स्वदेश गोसावी--छ अखंडित अलंकृत राजमान्य स्ने ।. जनकोजीराव शिंदे दंडवत सा. सन सबा सलासीन मयातैन अलफ (१८३६-७ इ.) शेख महंमदबाबा संस्थान कसबे मजकूर यांचे पणतू बालाबावा जिवंत असतां आपला अधिकार मलंगबावास दिला. नंतर बालाबावाचा काल झाला. त्या उपरांतिक महंमदबाबाचे उछाहाचे दिवशी चिरागाण व महापूजा मलंगबाबांनी करून फकीर जेवूं घालावे व बालाबावाचा उछाह यांनी करावा. त्यांचे उछाहाबद्दल वर्षासन सालिना रुपये शंभर कसबे मजकूर येथील यैवजी कैलासवासी ती. दौलतराव महाराज यांनी छ. २ सफर सन इहिदे मयातैनाचे (२५ जून १८००) सालीं करून देऊन सनद करून दिली. त्याप्रो वर्षासन चालत आहे. पुढें मलंगबावाचा काल झाला. पुत्रसंतती नाही. सबब मलंगबाबा यांचे धाकटे बंधू हाफिजबाबा यांचे पुत्र हाली मलंगबाबा मारनिलेचे पुतणे याजकडे सालमजकुरापासून धर्मादाये कसबे मार येथील ऐवजी पेशजीप्रमाणे सालिना दरसाल-
रुपये ५० सेख महंमदबाबा यांचे उछाहाचे दिवशीं चिरागाण व महापूजा करून फकीर जेवूं घालावें ह्याबद्दल
रुपये ५०/१०० बालाबावाच्या उछाहास
एकूण शंभर रुपये नेमणूक पेशजीप्रमाणें धर्मादाये सरकारांतून करार करून देऊन हे सनत तुम्हास सादर केली आहे.....शंभर रुपये....कसबे मजकूर येथील हिसेबी खर्च लिहिणे.......जाणीजे छ ११ रजमान (२० दिसे. १८३६).’’ हे सहीशिक्क्याचें अस्सल सनदपत्र शेख महंमदबाबा मठ संग्रहांतील आहे.
या सनदपत्राचा गांवकीच्या खर्चांतहि उल्लेख आलेला आहे. मात्र देण्यांत येणारी रक्कम पुढें पुढें पुष्कळच कमी होत गेलेली आहे. (अहमदनगर जमाव, श्रीगोंदा रुमाल-पेशवे दप्तर).
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP