चरित्र - भाग ३
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
कांहीं दिवसांनी त्या ब्राह्मणांनी इतर संतांना भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. तेव्हां शेख महमंदांनी त्यांस ‘‘देहू तुकाराम वडगांवीं जयराम । जीवासी विश्राम तेथें आहे ॥४३॥
’’ असें सांगितलें. तेव्हां ते ब्राह्मण प्रथम वडगांवीं गेले. तेथें ‘‘जाले ते विस्मित वैभव पाहातां । हत्ती घोडे धुतां पार नाहीं ॥४७॥
चोपदार हुदे सांगाते अपार । नौबद हत्तीवर वाजतसे ॥४८॥
......पांच शत शिष्यें संभावित असती । कीर्तन करिती स्वामीरांज ॥५०॥
’’. हें ऐश्वर्य पाहून ब्राह्णणांस आश्र्चर्य वाटले. त्यांनीं तेथील सर्वांना नमस्कार केले. तेव्हां जयराम रागावले व म्हणाले कीं, तुम्हीं द्विजांनीं सर्वांस नमस्कार करणें ही कोठली रीत ! ‘‘ब्राह्मण असोनि सर्वांनी नमिले । कोणें शिकविलें ऐसें तुम्हां ॥५६॥
देशाचा दंडवत पाहिला श्रीगोंदें । तेथें शेख महंमद संत थोर ॥५७॥
अनादिसिद्ध साधु सर्वां नमस्कार । देखिला प्रकार आम्हीं तेथें ॥५८॥
अवघे ब्रह्मरूप हेचि त्यांची निष्ठा । श्रद्धादिक निष्ठा सम भाव ॥५९॥
बोलिले जयराम यातीचा अविंद । काय अनुवाद सांगतसा ॥६०॥’’
नंतर जयराम आपल्या लव्याजम्यानिशीं शेख महंमदास पाहण्यास निघाले.
‘‘श्रीगोंद्या येऊनि मकरंदपुरा आले । येऊनि पाहिले गुंफेपाशीं ॥६३॥’’.
परंतु शेख महंमद तेथें नव्हते म्हणून त्यांस शोधित नदीतटीं गेले. ‘‘सरस्वती तिरीं उभा असे साधु । जोडा नालबद्ध पाई असे ॥६५॥’’.
त्यास जाऊन विचारलें कीं, ‘सेख्या’ कोठें आहे? त्यानें उत्तर दिलें की तो समोरील आंब्याच्या झाडाखालीं बसला आहे. जयराम तेथे जाऊन पाहतात ‘‘तंव तो पंचानन निजला असे ॥६९॥’’.
त्या वाघास पाहून जयराम घाबरून माघारे फिरले. शेख महमंदास विचारूं लागले की आम्हांस वाघाजवळ कां पाठविलेस? तेव्हां शेख महंमद ‘‘हांसोनिया साधु बोलती जयरामासी । तोचि तूं नेणसी सेख्या ऐसें ॥७२॥’’.
तेव्हां जयरामांनीं विचार केला कीं साधुरूप ‘कैशापरी’ असेल ते सांगावत नाहीं. असें म्हणून ते पुन्हां वाघाजवळ गेले व त्या वाघाच्या गळ्यास त्यांनी मिठी मारिली. तेव्हां शेख महंमदांनीं त्यांस आपले खरें स्वरूप दाखविले. ‘‘घेतला घोंगटा नालबंद जोडा । देखिला धडफुडा जयरामानें ॥७७॥’’.
जयरामानें त्यास घट्ट आलिंगन दिलें. नंतर इकडे तिकडे बोलणें झाल्यावर शेख महंमदानें जयरामास सांगितलें की, ‘‘करा तुम्हीं स्नाने नित्य कर्म सारा । आम्ही दाणा चारा सिद्ध करतों ॥८१॥’’.
नंतर सर्वांचें भोजन वगैरे झाल्यावर ‘‘संध्याकाळीं गुंफेत बैसोन । जयराम आपण उभयतां ॥८५॥
गुज गोष्टी तेव्हां त्यांनी काढियेल्या । जयरामा रुचल्या मनोभावें ॥८६॥’’.
नंतर ‘‘एकांताचे ठायी नवलाव ते केले । जानवे दाविले चिरुनी खांदा ॥९०॥ मुळींचे ब्राह्मण आलों याचि ठाया । दावियलें तया यज्ञोपवित ॥९१॥ सदाशिव लिंग अक्षईं मस्तकीं । देखिलें कौतुक जयरामानें ॥९२॥’’.
शेवटीं निरोप घेतांना जयराम म्हणाले, ‘‘आतां महाराजा कृपा ते करावी । समाधीसी द्यावी आज्ञा मज ॥९८॥’’.
तेव्हां ‘‘आइकावें स्वामी शेख महंमद म्हणे जन्मासी कारण नको करूं ॥१००॥
अडीच वर्षे आयुष्य तुमचें हो राहिले । करावें वहिलें पुरतें आतां ॥१०१॥
पांच वर्षे आणिक राहिले आमुचे । इच्छा हो जन्माची कशास व्हावी ॥१०२॥
....शेख महंमद म्हणजे ऐकावें जी स्वामी । समाधी हो नेमी तुम्ही ध्यावी ॥१०५॥ अडची वर्षांचा नेम तो धरावा । आनंदें करावा महोत्सव ॥१०६॥
साधु मुनि सिद्ध संत महा थोर । बोलवा सत्वर आधीं तुम्हीं ॥१०७॥
कीर्तनगजरीं आनंदें नगारे । म्हणा हरहर तेचि काली ॥१०८॥’’.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP