शेख महंमद चरित्र - भाग १५
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
महिपतीनें शेख महंमदाचा निरनिराळ्या प्रसंगानें उल्लेख करून संबंध जोडला आहे. तोहि पुरावा विचारांत घेऊं. कारण संतचरित्रें लिहितांना महिपति हाच मुख्य आधार मानला जातो. अर्थात् महिपतीच्या पुराव्यांची साग्र चर्चा केली कीं, इतर कथा-चरित्रांचा स्वतंत्र विचार करण्याचें कारण उरत नाहीं.
रामदासस्वामी एका आषाढीस पंढरपुरास गेले होते. त्याचें वर्णन महिपतीनें आपल्या ‘संतविजया’च्या दहाव्या व अकराव्या अध्यायांत केलें आहे. त्यांत त्यावेळीं तेथें निंबराज, तुकाराम, माणकोची बोधले वगैरेंबरोबर शेख महंमदहि होते असें लिहिलें आहे. ‘‘आणि चांमारगोंदियात साचार । शेख महंमद भक्त थोर । भक्तिज्ञानवैराग्यपर । कवित्वीं उद्गार जयाचा ॥१८॥’’ (अ. १०).
‘‘शेख महंमद ज्ञानसागर ।...... ।’’ इत्यादींनी नंतर प्रत्यक्ष सोंगे घेऊन काला केल्याचें वर्णन आलें आहे. (अ. ११).
नंतर रामदासांची तुकोबांनी सज्जनगडी भेट घेतली. तेव्हांहि निंबराज-जयरामादि संतांबरोबर ‘‘शेख महंमद सज्ञान थोर । जे अर्थांतर जाणते ॥१००॥’’ (अ. २२)
अशी पुस्ती जोडून तेथें असल्याचें सांगितलें आहे.
‘संतविजयां’ त आणखी एक उल्लेख आला आहे. तो वर्णनात्मक व सहजपणें दिला असल्यानें त्यास थोडेंबहुत महत्त्व प्राप्त होते. शेवटच्या म्हणजे सव्विसाव्या अध्यायांत अरणगांवास समाधि असलेल्या एका बाबाजीबावाची कथा आली आहे. त्यांत बाबाजीस अनुष्ठानासाठी जे स्थान सांगितलें त्या स्थानाचें वर्णन व महिमा सांगतांना महिपतिबाबा लिहितात की, आतां येथून लवलाहें । गुंडेगांवीं सत्वर जाये । तेथें पर्वतामाजीं पाहें । सरोवर आहे पुरातन ॥९०॥
वनसासी हिंडतां रघुनाथें । तें स्थळीं लिंग स्थापिलें स्वहस्तें । सुडलेश्र्वर नाम असे त्यातें । साक्षात्कार देत बहुतांसी ॥९१॥
सरोवरासी नाम शेवाळें । तेथींचे जीवन असे निर्मळ । अनुष्ठाना योग्य ते स्थळ । तीर्थें सकळ ते ठायीं । ॥९२॥
मांडव्य ॠषीनें एकांतीं । ते स्थळीं अनुष्ठान केलें प्रीति....॥९३॥
त्या सरोवरी अस्थि टाकितां देख । त्यांचे विखरोनि होय उदक । स्नानानें दोष नासती सकळिक । चमत्कार लोक पाहाती ॥९४॥
प्रस्तुत कलियुगामाजीं जाण । शेख महंमद जातीचा यवन । ते स्थळीं बैसतां एकाग्र मन । योग संपूर्ण सिद्धि गेला ॥९५॥’’
नंतर देवीचें निवेदन ऐकल्यावर बाबाजी गीता घेऊन तेथें गेला. ‘‘.....तो सप्तशृंगीं सांगती ब्राह्मण । गुंडेगांवीं जाऊन पाहावा ॥१०६॥’’.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP