तयाचा दास योगी मुकुंदराज । सांगे निज गुज रामनाथा ॥८॥
आमची परंपरा चंद्र हा बोधला । प्रसाध लाधला आम्हांप्रतो ॥९॥
चंद्र बोधला मूळ जनार्दन खोड । शाखा पालव गोड एकनाथ ॥१०॥
तयाचें हें फळ आम्ही घनदाट । सेविती उत्कृष्ट साधुसंत ॥११॥
मुकुंदराज म्हणे ऐक रामनाथा । वंशावळी कथा सांगितली ॥१२॥’’.
मुकुंदराज अथवा मुकुंदमुनि अथवा मुकुंदयोगीयांची योगपर कविता या सर्व बाडांतून बरीच आली आहे. ज्याअर्थी हे एकनाथांचा श्ष्यि म्हणवतात त्याअर्थी ते शेख महंमद व तुकारामबोवांस समकालीन असावेतसे वाटते. यांच्या एका ग्रंथावर समाप्तिकाल आहे तो असाः ‘‘स्वस्ति श्रीनृपशालिवाहन शके हेमळ ॥१५७९॥
बिनाम संवत्सरे ॥ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदसि शुक्रवार (१५ में १६५७) तदिनं ग्रंथ संपूर्ण ॥......लिख्यते स्वहस्त नरहरि कासिकर । ग्रंथ सिवाजि भुजंग कासार याचा.’’ या क्रमांक ४९३ बाडाशिवाय आणखीहि या ग्रंथाच्या नकलांचे उल्लेख आलेले आहेत. नकल-काल इ. १७०० पूर्वीचेहि कांही आहेत.
या संग्रहांत चांद बोधलेची कविता या शीर्षकाखाली तीन अभंग आलेले आहेत. त्यांतील पहिला कालियामर्दनाचे प्रसंगीं कन्हैय्या ‘डोहात’ उडी घालतो त्याचे रूपकाचा असून त्याचें शेवटचें कडवें पुढीलप्रमाणें आहेः (१) ‘‘डोहो अखंड सदोदित । निज संतांचा एकांत । तेथें चांद बोधले जीवन्मुक्त । डोहो होऊनि खेळत रे ॥८॥
सदा सखोल तूं सपुरा० ॥ध्रु.॥’’ यानंतर पुढील दोन अभंग सद्गुरुप्रसाद किंवा महिमा यासंबंधीचें आहेत. त्यांची अंत्य कडवीं अशीः (२)
‘‘तें सुख सोलिव । आनंद निरावेव । पावले गुरुराव । चांद बोधलियासी ॥४॥’’. (३)
‘‘गुरूचा अंकिला हा चांद बोधला । तारोनि तरला आपोआप ॥३॥’’.
शेख महंमदाच्या कालनिर्णयाला मदत करणारा ‘योगसंग्रामा’ च्या समाप्तीचा मजकूर वर आलाच आहे. कालबोध करणारा मजकूर त्यांच्या एका अभंगांत आला आहे. तो मजकूर असाः ‘‘......मूर्ती लपविल्या अविंधीं फोडिल्या । म्हणती दैना जाल्या । पंढरीच्या ॥२॥ अढळ ना ढळे । ब्रह्मादिकां न कळे । त्या म्हणती आंधळे । देव फोडले ॥३॥
हरि जित ना मेले । आले ना गेले । हृदयांत लक्षिले । शेख महंमदें ॥४॥’’.
ही अभंग रचनेची स्फूर्ति बहुधा अफझलखानाच्या वेळी पंढरपूर व तुळजापूर येथे जे प्रसंग उद्भवले होते त्यावरून झाली असावी. त्यावेळी मूर्ति फोडल्याच्या व नंतर लपविल्याच्या वार्ता सर्वत्र फैलावल्या होत्या. अफझलखानाची स्वारी इ. स. १६५९ तील. अर्थात. हा अभंग त्यानंतरचा असला पाहिजे.
टीपः
बाडांक ४९३, पृ, ३८६, इंदुर मठांतील संग्रह, ‘रामदास आणि रामदासी’, भाग २८ वा, सर तिसरा, मणि सहावा, ‘श्रीरामदासी संशोधन’ प्रथम खंड, सत्कार्योत्तेजक सभा, धुळें, शके १८८५ (१९३३ इ.).
पोतदार-संग्रह, बाडांक १, क्र. ४०, संदर्भांक १६३.
पोतदार-संग्रह, बाडांक १, क्र. ४१ संदर्भांक १६४.
पोतदार-संग्रह, बाडांक १, क्र. ४२, सदर्भांक १६५.
पोतदार-संग्रह, बाडांक १, क्र. २६१, सदर्भांक २६५.